मासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके आणि एलवण्याची कढी

जागु's picture
जागु in पाककृती
21 Dec 2010 - 3:17 pm

खुबड्या समुद्रातील खडपांवर ओहोटीच्या दिवसांत मिळतात. ह्या पकडण्यासाठी रात्री कंदील घेउन जावे लागते. अंधारात ह्या खुबड्या कडकांवर येतात त्या ओंजळीने गोळा करतात. सकाळी किंवा दिवसा ह्या खुबड्या तुरळक दिसतात दगडा खाली लपलेल्याही असतात.

खुबड्या हे शेलफुड असल्याने त्यात भरपुर कॅल्शियम असते. ह्या खुबड्या लहान मुलांच्या चिंबोर्‍याप्रमाणे आवडीच्या असतात. सुईने गोळे काढतानाच लहान मुले अर्ध्या फस्त करतात.

खुबड्या चांगल्या ४-५ पाण्यात धुवुन घ्यावात व त्या बुडतील इतके पाणी आणि थोडे मिठ टाकुन उकडून घ्याव्यात.

उकडलेल्या खुबड्या थंड झाल्या की उकडलेले पाणी एका भांड्यात काढून घ्यावे कढीसाठी. खुबड्यांच्या पाण्याच्या कढीला एलवण्याची कढी म्हणतात.

सुई घेउन खुबडीच्या वरील कच सुईचे टोक खुपसुन काढावी.

ह्या कचेला चिकटूनच खुबडीचा गर (गोळा) बाहेर येतो.

कच टाकून देउन गोळा घ्यावा. हा गोळा पुढे क्रिम कलर, राखाडी कलर आणी शेवटी काळा कुळकुळीत गोळा असतो. काही काही खुबड्यांचा काळा गोळा खुबडीतच अडकुन बसतो. आम्ही लहान असताना आईच्या सगळ्या खुबड्या काढून झाल्या की हा गोळा काढण्यासाठी दगड घेउन खुबडी फोडून हा गोळा काढून खायचो. काय आनंद असायचा त्यात ? मग टाकलेल्या रिकाम्या खुबड्या आम्ही कवडी कवडी म्हणून खेळायला घ्यायचो.

सगळ्या खुबड्या काढताना चुकुन एखादी कच जाण्याची शक्यता असते. पण ही कच आढळल्यास लगेच काढून टाका. कारण ह्या कचेला धार असते. ह्या खुबड्या एक एक काढायला भरपुर वेळ लागतो. साधारण एक तास तरी लागतो ४ ते ५ वाट्यांना. ज्यांना पेशन्स आहेत अशेच खवय्ये हे काम करतात.

सुक्यासाठी लागणारे साहित्य:
खुबड्यांचे ४ ते ५ वाटे
२ कांदे
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
सिमला मिरची १ कापुन
मिठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी मुठ
१ हिरवी मिरची
तेल
अर्धा चमचा गरम मसाला
टोमॅटो किंवा आमसुल

खुबड्यांचे सुके ची पाककृती:
तेलावर लसूणाची फोडणी देउन त्यावर कांदा बदामी रंगावर परतवा. हिंग, हळद, मसाला घालुन परतवुन त्यात खुबड्या घाला. सिमला मिरचिच्या फोडी घाला. झाकण ठेउन त्यावर पाणी ठेउन एक वाफ आणा. खुबड्या शिजवण्याची गरज नसते कारण त्या उकडल्यामुळे आधीच शिजलेल्या असततात. आता त्यावर चिरलेला टोमॅटो किंवा आमसुल घाला. टोमॅटो घातल्यास वाढणीसाठी भर पडते. मिठ, गरम मसाला, हिरवी मिरची मोडून, चिरलेली कोथिंबीर घालुन परतवा व २ ते ३ मिनीटे शिजवुन गॅस बंद करा.

एलवण्याच्या कढीचे साहित्य
खुबड्या उकडल्याचे पाणी
१ कांदा बारीक चिरुन
५-६ लसुण पाकळ्या चिरुन
१ ते २ मिरच्या बारीक चिरुन
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
हिंग, हळद
मिठ
थोडा चिंचेचा कोळ

एलवण्याची कढीची पाककृती
तेलावर लसुण, हिंग, हळद, टाकुन जास्त न परतवता (लसुण शिजवायचा नाही पटापट सगळ टाकायच) खुबड्यांचे पाणी व चिंचेचा कोळ टाकुन चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर टाकावी. मिठ टाकावे ही कढी उकळवायची नाही. चव जाते. गरम झाली की बंद करायची. अगदी बेस्ट लागते. साधारण चिंचेच्या कढी सारखीच.

एलवण्याच्या कढी करण्यामागचे रहस्य खुबड्यांचे व्हिटॅमिन्स पुर्ण मिळणे हेच असेल.

प्रतिक्रिया

गवि's picture

21 Dec 2010 - 5:17 pm | गवि

एकदम नवीन काही पहिल्यांदाच कळलं.

तिसर्‍या माहीत होत्या पण हे पण खूप इंटरेस्टिंग वाटतंय.

घरी बनवणे शक्यच नाही. हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..)

कुठे खायला मिळेल. जबरदस्त इच्छा झाली आहे. कसे लागते? माशांसारखे की शिंपल्यांकडे झुकणारी चव?

स्वाती२'s picture

21 Dec 2010 - 5:27 pm | स्वाती२

जागू, तू ग्रेट आहेस. मी हे इथे एशियन स्टोअरमधे पाहिले होते. आता दिसले की करुन बघेन. शिंपल्या प्रमाणे हे ताजे/खराब ओळखायचे काही खूण आहे का?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍याच दिसतोय हा प्रकार. पाहूनच समाधान झाले.

आणि काय ग येवढा कांदा कुठून आणलास ? ऑ ??

स्पा's picture

22 Dec 2010 - 12:05 pm | स्पा

मायला बघून लाळ गळायला लागलीये...........

गगनविहारी धन्स.

स्वाती अग ह्या जिवंत असतात. भांड्याला चिकटून बसतात किंवा थोड्या जगच्या जागी गोगलगाई सारख्या हालचाल करतात.

आणि काय ग येवढा कांदा कुठून आणलास ? ऑ ??

कांदा स्वस्त असताना केलेला प्रकार आहे हा. आत्ता केला असता तर अर्धा कांदा दिसला असता त्यात.

प्रियाली's picture

21 Dec 2010 - 6:52 pm | प्रियाली

काही गडबड आहे की हापिसातून ब्लॉक आहेत ते कळले नाही. खुबड्या म्हणजे कालवे का?

वेताळ's picture

21 Dec 2010 - 7:59 pm | वेताळ

जागु असले प्रकार फक्त आम्हाला फोटोतच बघायला मिळणार का कधी बोलवणार तु ?

प्रभो's picture

21 Dec 2010 - 8:02 pm | प्रभो

ज ब र द स्त!!!

दिपाली पाटिल's picture

21 Dec 2010 - 11:03 pm | दिपाली पाटिल

जागू, नेहमी प्रमाणे छान माहीती आणि पाककृतीही पण ते कच म्हण्जे नक्की काय ते समज्लं नाही ... माझ्या आईकडे आजुबाजूला आग्री-कोळी च राहतात, त्यानी हे आणलेलं पाहीलंय पण कधी खाण्याचा योग नाही आला आणि इकडे चायनिज दुकानातही अस्तं. ते कच नक्की काय असतं ते सांग म्हणजे आणून बघेन एकदा तरी...

गोगोल's picture

22 Dec 2010 - 6:32 am | गोगोल

वर्टिब्रेट्स वरुन एकदम इनवर्टिब्रेट्स?
इतके दिवस तुमच्या पाक कृतींनी तोंडाला पाणी सुटायचे. पण त्या खुबड्या भांड्यात हालचाल करतात ऐकून कसेसेच वाटले.

हो.. रत्नांग्रीस असताना ते मोठ्ठे खेकडे विकायला कोळीणमाम्या दारावर यायच्या. त्यांच्या हातात ते भयंकर नांग्या हलवत वळवळत असायचे. माम्यांची बोटेही पकडायला पहायचे पण माम्या बोलता बोलता शिताफीने बोटांत खेकडा फिरवून त्याला चकवायच्या.

सौदा फिक्स झाला की मग त्यांच्या नांग्या तोडून त्या गिर्‍हाईकाने आणलेल्या भांड्यात टाकायच्या.

नंतर अगदी पातेल्यात शिजवायला घातल्यानंतरही हालचाल करायचे. कारण हेच असावे की त्यांना शिजवण्यापूर्वी कसे मारायचे हे माहीत नाही. मासे ऑक्सिजन अभावी आधीच मरतात. बकरे, कोंबडे मान कापून आधीच मारलेले असतात. खेकडे, शिंपले, निवट्या हे हवेतही जगू शकतात.

सर्वच प्राण्यांना मारताना असे काहीतरी होते पण आपले मनाचे लाड असतात.. डोळ्याआड झाले की ते क्रूर नाही..डोळ्याला दिसले की वाईट वाटते.

मलाही खेकडा ताटात पडताना टण असा आवाज येतो म्हणून तो आवडायचा नाही..असो.

गोगोल, आहो सगळेच मासे आधी हालचाल करत असतात. फक्त मासे पाण्यातुन बाहेर काढल्यावर मरतात पण चिंबोरे, खुबड्या, खुबे, निवट्या हे प्रकार काही काळ जिवंत राहतात.

प्रियाली नाही ग कालवे वेगळी ती दगडाला चिकटलेली असतात पुर्णपणे आणि बाहेरुन पांढरे कवच असते ते कवच फोडून तिथल्यातिथे कालव काढावी लागतात. मी आधी कालव टाकली आहेत. मी थोड्यावेळाने सगळ्याच माझ्या माश्यांच्या लिंक देते इथे. त्यात समजेल. खुबड्या ह्या गोगलगाईच्या आकाराच्या पण छोट्या आणि काळ्या असतात.

वेताळ कधी येताय सांगा.

दिपाली धन्स ग. मी अजुन फोटो टाकते खाली त्यात कच खाली भांड्यात पडलेल्या आहेत बघ. आख्ख्या खुबड्यांचाही देते.

गवि's picture

22 Dec 2010 - 11:42 am | गवि

थोडे अधिक स्पष्ट करायचे झाल्यास शंखाचे तोंडाचे झाकण उचकटून आतील खाद्यभाग (मऊ) काढण्याच्या प्रक्रियेत ते धारदार कवचसदृश झाकण (किंवा / आणि) शंखाचे कवच हे पूर्ण किंवा याचा काही भाग तुटून मऊ पदार्थात मिसळू शकते (अंडे फोडल्यावर त्यात चुकून कवचाचा एखादा तुकडा पडावा तसे).

पण या प्राण्याचे हे कवच धारदार असल्याने तसेच अन्नात आले तर टोचू/कापू शकते, म्हणून अधिक खबरदारी घ्यावी..

इतिश्री..

बरोबर ना जागु ताई?

बाकी..

हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..)

कुठे खायला मिळेल. जबरदस्त इच्छा झाली आहे. कसे लागते? माशांसारखे की शिंपल्यांकडे झुकणारी चव?

या आमच्या उपरिनिर्दिष्ट भागावर काहीच उत्तर नाही..

:(

जागु's picture

22 Dec 2010 - 11:45 am | जागु

गगनविहारी ह्यांची चव शिंपल्यांकडे झुकणारी आहे.

पण या प्राण्याचे हे कवच धारदार असल्याने तसेच अन्नात आले तर टोचू/कापू शकते, म्हणून अधिक खबरदारी घ्यावी..

हो अगदी बरोबर. कालवांच्या बाबतीतही तसेच आहे.

हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..)

धन्यवाद. म्हणजे मिळाले नाहीत तरी तिसर्‍या खाऊन समाधान करून घेतो.

दिपाली पाटिल's picture

22 Dec 2010 - 12:04 pm | दिपाली पाटिल

अच्छा कच म्हणजे एक छोटासा झाकणासरखा भाग...

हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..)

हॉटेलातील खुबड्या निवडणारी पोर पळून जातिल किंवा त्यांना रोज रोज साफ करुन स्पाँडीलायसीस तरी होईल.
:sad:

याच कारणाने बिरड्याची उसळ, गव्हल्याची खीर वगैरे पदार्थ हाटेलांत फार दिसत नाहीत.

कच्ची कैरी's picture

23 Dec 2010 - 6:45 pm | कच्ची कैरी

जागुताईची रेसेपी म्हटली म्हणजे काहितरी 'हटके'च असणार्,नाही का?बाकी पदार्थ बघुन तोंडाला पाणीच सुटले.

पहिल्यांदाच पाहिले आणि ऐकले या बद्दल.
जे आहे ते मी स्वतः करीन असे वाटत नाही. जागु, तुझ्याकडेच येईन मी. चालेल ना?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 2:00 am | निनाद मुक्काम प...

@तुझ्याकडेच येईन मी. चालेल ना?
मी पण
आम्ही सारेच खवय्ये

जागुताई तुझ्यामुळे हे सगळे प्रकार बघायला मिळातात नाहितर आमच्या सारख्या मध्यभारतात राहणार्‍या लोकांना कोण सांगतोय!! धन्यवाद !! :)