राम राम मंडळी
कधी कधी एखादा लेख, कथा वाचतांना आपल्याला एखादे वाक्य खुप आवडते किंवा त्यावर आपण अनेकदा विचार करत बसतो. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या परिस्थितीत जेव्हा तेच वाक्य समोर येते तेव्हा आधी न केलेला विचार मनात येतो. त्या वाक्याचे वेगळे पैलु नजरेस पडतात.
मागे कधी तरी वेगळ्या संकेतस्थळावर मी एक लेखमाला लिहिली होती. तिच्यात मीच एक वाक्य सहज लिहिले होते. आज परत काही कारणाने तो लेख परत वाचला, अन माझेच वाक्य मला परत परत नजरेसमोर तरळु लागले. अनेक विचार मनात आले. तुमच्या मनात असे काही विचार येतात का हे पहावे यासाठी हा प्रपंच. मुळ लेख काय होता ह्याचे प्रयोजन नसल्याने ती लिंक देत नाही, पण ते वाक्य खाली देत आहे.
सदर वाक्य वाचुन आपल्या मनात काय प्रतिक्रिया उमटते हे प्रतिसादातुन लिहावे अशी अपेक्षा आहे...खरड वा व्यनीतुन कळवले तरी हरकत नाही.
साहित्यात काय असावे काय नसावे याचा निर्णय समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणा-या मंडळीनी करायला सुरवात केली की त्या त्या प्रदेशातील साहित्याला अवकळा येत असते.
प्रतिक्रिया
27 Nov 2010 - 12:13 pm | ए.चंद्रशेखर
साहित्याला अवकळा फक्त एकाच कारणाने येऊ शकते असे मला वाटते. ते कारण म्हणजे वाचकांचा अभाव. लिहिलेले साहित्य जर कोणी वाचतच नसले तर त्या भाषेतील साहित्याला अवकळा येणारच. समीक्षक कशाची व काय समीक्षा करतात यावर साहित्य निर्मिती थोडीच अवलंबून असते?
27 Nov 2010 - 12:18 pm | अवलिया
सहमत आहे. परंतु अमुक एक साहित्य विवक्षित गुणवत्तेचे नाही किंवा त्यात अमुक गोष्टी असल्याने सदर लेखक हा दुय्यम दर्जाचा असुन त्याचे साहित्य सभ्य लोकांनी वाचण्याजोगे नाही असा अपप्रचार करुन सदर लेखकाच्या साहित्यावर समीक्षक गंडांतर आणु शकतात. सर्वसामान्य लोकांनी एखाद दुसर्या पुस्तक/ग्रंथाला असभ्य भाषा अथवा दिशाभुल करणारी वाक्ये म्हणुन केलेल्या विरोधापेक्षा अशा विचारवंत समीक्षक भुमिकेतुन जाहिर अथवा कुजबुज माध्यमातुन केलेली टीका किंवा वितरण माध्यमांवर दबाव आणुन अशा साहित्याची केलेली मुस्कटदाबी ही जास्त घातक असावी असे मला वाटते.
27 Nov 2010 - 12:26 pm | ए.चंद्रशेखर
सिनेमा नाटकांची समीक्षणे लोक आवडीने वाचतात. साहित्य वाचताना काय समीक्षण आले आहे ते बघून त्यावरून कोणी काय वाचावे हे ठरवत असेल असे मला तरी वाटत नाही. Word by mouth प्रसिद्धी ही सर्वात महत्वाची वाटते.
27 Nov 2010 - 12:28 pm | अवलिया
तुमच्या मताबद्दल आदर आहे.
27 Nov 2010 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे हो नानबा.
सहित्यात काय असावे किंवा नसावे ह्यावर एकवेळ एखाद्या वाचकानी टिपणी केली अथवा त्या विशिष्ठ साहित्याची खिल्ली उडवली तरी एकवेळ योग्य आहे. कारण 'स्वांतसुखाय लेखन करतो' वगैरे म्हणणारे लेखक हे खरच ढोंगी असतात. आपण लिहिलेले चार जणांनी वाचावे, दोघांनी प्रतिक्रीया द्याव्यात, कोणा एकाला ते वाचुन आनंद वाटावा असेच सर्वसाधारण लेखकांचे मत असते. (किंवा हे मक्त माझे मत आहे असे म्हणले तरी हरकत नाही)
पण जेंव्हा स्वतः पांढर्यावर काळे करण्याचे कष्ट देखील न घेणारे स्वयंघोषीत साहित्यीक आणि समिक्षक अधिकारी पदावर बसतात तेंव्हा तर साहित्याला नुसती अवकळाच येत नाही तर साहित्याची बरबादी होते. कारण हे अधिकारी नुसती टिकाच करणारे नसतात तर साहित्याचे अस्तित्व सुद्धा त्यांच्या मर्जीवर ठरायला सुरुवात होते.
असो....
प्रदेश असो वा संस्थळे वरिल नियम सर्व ठिकाणी लागु आहे !
27 Nov 2010 - 12:25 pm | अवलिया
पण जेंव्हा स्वतः पांढर्यावर काळे करण्याचे कष्ट देखील न घेणारे स्वयंघोषीत साहित्यीक आणि समिक्षक अधिकारी पदावर बसतात तेंव्हा तर साहित्याला नुसती अवकळाच येत नाही तर साहित्याची बरबादी होते. कारण हे अधिकारी नुसती टिकाच करणारे नसतात तर साहित्याचे अस्तित्व सुद्धा त्यांच्या मर्जीवर ठरायला सुरुवात होते.
सहमत आहे.
27 Nov 2010 - 1:29 pm | शाहरुख
>>सदर वाक्य वाचुन आपल्या मनात काय प्रतिक्रिया उमटते हे प्रतिसादातुन लिहावे अशी अपेक्षा आहे
"नानाजींचं लिखाण उडवलेलं दिसतंय" अशी प्रतिक्रिया मनपटलावर उमटली !
28 Nov 2010 - 3:14 pm | Nile
=)) =))
थँक्सगिव्हींगचा टर्की मानावला दिसतोय शारूखा!
27 Nov 2010 - 3:18 pm | मनीषा
समीक्षकांचे लेखन कोणी वाचत का ?
आणि वाचल्यास त्यातील मतानूसार काय वाचायचे आणि काय नाही हे कोणी ठरवतं का?
कदाचित पुरस्कार (विशेषतः सरकारी ) मिळणे , न मिळणे या बाबत काही फरक पडू शकतो .
28 Nov 2010 - 12:12 am | शुचि
>> समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणा-या मंडळीनी >>
गवताच्या दवणीवर बसलेले कुत्रे. स्वतः खात नाहीत आणि दुसर्याला सुखाने खाऊ देत नाहीत .
27 Nov 2010 - 6:45 pm | अविनाशकुलकर्णी
बरेच वेळा असे घडते...काहि व्याक्ये..व विचार तर तुमच्या जीवनाची व विचारांची दिशाच बदलून टाकतात..इतके प्रभावि असतात.......
27 Nov 2010 - 9:09 pm | नंदू
धागाप्रवर्तक हे आंतरजालीय विचारवंत आहेत ;-)
27 Nov 2010 - 10:18 pm | मुक्तसुनीत
उपरोक्त वर्णनातला एक शब्द चुकला असावा काय अशी शंका आली. पण असो असो.
27 Nov 2010 - 11:27 pm | आमोद शिंदे
अर्धाच शब्द चुकला आहे.
28 Nov 2010 - 11:10 am | अवलिया
वरील तीनही प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी सुसंगत नसल्याने अवांतर आहेत. पण उडणार नाहीत याची खात्री आहे.
28 Nov 2010 - 3:13 pm | Nile
माफ करा, फक्त एकच अक्षर चुकले आहे. :-)
28 Nov 2010 - 12:17 am | छोटा डॉन
मजेशीर धागा आणि 'रोचक' प्रतिसाद.
सध्या गडबडीत आहे, सोमवारी व्यवस्थित उहापोह करु ...
- छोटा डॉन
28 Nov 2010 - 8:18 am | रन्गराव
इतका गंभीर विचार मजेशीर कसा असू शकतो? ह्यात मजेशीर काय आहे हे डॉनरावांनी कृपया समजावून सांगावे!
28 Nov 2010 - 11:11 am | अवलिया
हेच विचारतो. धाग्यातील विषयातील मजेशीरपणा समजेल अशा भाषेत विस्तृतपणे समजावुन सांगावा अशी डान्रावांना कळकळीची विनंती !
28 Nov 2010 - 8:20 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !
;-)
29 Nov 2010 - 9:42 pm | रन्गराव
सोमवार संपत आला राव! डॉन राव कुठ पोहं कराया आलं नाहीती?
1 Dec 2010 - 10:32 am | रन्गराव
डॉन रावासनी Gentle Reminder ;)
28 Nov 2010 - 1:55 am | सद्दाम हुसैन
सुंदर विचार.
28 Nov 2010 - 10:48 am | चिगो
अमुक गोष्ट उच्च अभिरुचीची आणि तमुक कनिष्ठ दर्जाची हे वर्गिकरणच चुकीचे आहे असे मला वाटतं.. काहीतरी शाब्दिक जंजाळ लिहुन क्लिष्टतेचा आणि अनुशंगाने विद्वत्तेचा भाव आणि आव आणणारे लेखन हे समिक्षकांना बरेचदा आवडतं, पण म्हणुन वाचकांनाही ते आवडेलच असे नाही.. शेवटी काय, ज्याला जे आवडतं, ते त्यानी वाचावं.. समिक्षकांना वारंवार वाचकांनी योग्य त्या जागी मारलेच आहे..
28 Nov 2010 - 12:26 pm | सर्वसाक्षी
हा देखिल एक साहित्यप्रकारच नाही का? काव्य, कथा, वैचारिक, ललित असे आपापल्या आवडी नुसार लिहिले जाते. मग समिक्षा हे देखिल एक प्रकारचे लेखनच आहे. किंबहुना उत्कृष्ठ समिक्षण हे फार अवघड असते असे माझे वैयक्तिक मत आहे. एखाद्या लेखनाचे समिक्षण करण्यासाठी मुळात ते लेखन सखोलपणे वाचावे लागते, त्यामागची लेखकाची भूमिका जाणुन घ्यावी लागते, त्या लेखनातुन लेखकाला अभिप्रेत असलेल्या व्यतिरिक्त अन्य काही अर्थ प्रतित होतो का याचा अभ्यास करावा लागतो. मुळात समिक्षा ही अत्यंत निरपेक्ष असणे अत्यंतिक महत्वाचे आहे.
समिक्षकाला समिक्षा करताना 'मला रुचले का? मला उमगले का? आशय मला पटला वा आवडला का? ' इत्यादिचा विचार करुन चालत नाही तसेच प्रथम वाचनात ते लेखन लेखकाचे नाव न पाहता वाचले जाणे आवश्यक आहे. समिक्षा ही पूर्वग्रहदूषीत नसावी, वैयक्तिक पसंती-नापसंती वर आधारित नसावी आणि निरपेक्ष असावी; किंबहुना व्यक्तिसापेक्ष असू नये. कुठलेही समिक्षण एखादा लेखक आपला आवडता/ चाहता आहे किंवा या लेखकाचे लेखन उत्तम असते/ सुमार असते यावर आधारित नसावे तर ते समिक्षण हे सर्वार्थाने निरपेक्ष असावे. अर्थात समिक्षणोत्तर समरोपात ज्याची समिक्षा केली अहे ते लेखन त्या लेखकाच्या अन्य साहित्यकृतींच्या मानाने कसे आहे यावर समिक्षकाचे मत अवश्य असावे.
निरपेक्ष समिक्षणातुन समिक्षक सदर लेखनात 'काय आहे ' ते सांगायचा प्रयत्न करु शकतो, त्यावर आपले साधक बाधक विचार मांडु शकतो. मात्र साहित्यात काय असावे वा नसावे हे समिक्षकाने वाचकांना ठरवु द्यावे. जर समिक्षण हे निरपेक्ष आणि सखोल असेल तर त्याचा प्रभाव वाचकांवर अवश्य पडेल, मग असावे/नसावे हे सांगण्याचा प्रपंच करायची गरज भासणार नाही. जर एखादे लेखन समिक्षकाला आवडले नाही परंतु वाचकांना आवडले (आणि ते लेखन लेखनस्थळाच्या मर्यादेत बसत असले) तर त्या आवडण्यावर समिक्षकाने टिका करु नये कारण समिक्षणाचा अधिकार जसा समिक्षकाला आहे तसाच काय वाचावे आणि काय आवडावे हा अधिकार वाचकाचा आहे.
यापलिकडे जाउन सांगायचे तर कुठलीही कला रुजते, जगते आणि बहरते ती कलाकृतीवर प्रेम करणार्या असंख्य रसिकांमुळे; मूठभर समिक्षकांमुळे नाही.
28 Nov 2010 - 12:28 pm | अवलिया
अतिशय सुरेख प्रतिसाद. :)
>>>>यापलिकडे जाउन सांगायचे तर कुठलीही कला रुजते, जगते आणि बहरते ती कलाकृतीवर प्रेम करणार्या असंख्य रसिकांमुळे; मूठभर समिक्षकांमुळे नाही.
क्या बात है ! मस्त ! बेस्ट !!
28 Nov 2010 - 5:36 pm | अप्पा जोगळेकर
अगदी पटण्यासारखा असा हा प्रतिसाद आहे. समीक्षा हादेखील एक साहित्यप्रकारच मानला पाहिजे. पण सध्या पेड पत्रकारितेचा सर्वत्र सुळसुळाट झाला असल्याने कोणते समीक्षण निरपेक्ष आहे आणि कोणते विशिष्ट हेतूने प्रेरित झालेले आहे (जसे - पैसा,एखाद्याची बदनामी करणे इत्यादी) हेच कळत नाही. म्हणजे अशा पेड समीक्षेचे उदाहरणच घ्यायचे झाले तर लोकसत्ता मधील अग्रलेखांचे घेता येईल.
काही समीक्षक समीक्षा करताना आम्ही अमुक एका दॄष्टीकोनातूनच परीक्षण करत आहोत असे स्पष्टपणे सांगतात. जसे - श्री. सावरकर यांच्या 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथामध्ये 'सदर ग्रंथ हा इतिहासाची हिंदुराष्ट्रीय दॄष्टीकोनातून समीक्षा करणारा ग्रंथ आहे' असा स्पष्ट उल्लेख आहे. समीक्षकाने स्वच्छपणे अशा गोष्टी मान्य करणे हे केंव्हाही चांगले म्हणजे वाचकांचा गोंधळ होत नाही. आणि वाचक उगाचच निरपेक्ष लिखाणाची अपेक्षाही ठेवत नाही.
28 Nov 2010 - 9:23 pm | रन्गराव
>>यापलिकडे जाउन सांगायचे तर कुठलीही कला रुजते, जगते आणि बहरते ती कलाकृतीवर प्रेम करणार्या असंख्य रसिकांमुळे; मूठभर समिक्षकांमुळे नाही.
एका वाक्यात सगळा हिशोब संपला! :)
28 Nov 2010 - 8:17 pm | चित्रा
समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणार्या लोकांच्या जागा रिकाम्या होण्याच्या मार्गाला लागल्या आहेत असा माझा अंदाज आहे. तेव्हा या जागा लवकरच बहुलेखनप्रसवी लोकांनी भरून काढाव्यात असे आवाहन करते म्हणजे स. वृ. ले. न. क. लोकांना समीक्षा न करायला लागल्याने लिहायला वेळ मिळून ते लेख लिहीतील आणि ब.ले.प्र. लोक या नव्याने लिहू लागलेल्या लेखकुंच्या थातुरमातुर लेखनाची समीक्षा कशी करतात याचे प्रात्यक्षिक सर्वांनाच बघायला मिळेल.
29 Nov 2010 - 1:06 pm | अवलिया
चुकीच्या धाग्यावर प्रतिसाद दिलात काय? काही म्हणता काही कळलं नाही. धाग्याच्या विषयाशी दुरुन सुद्धा काही संबंध लागला नाही.
असो असो.