इसवी सन ३०१०

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
9 Nov 2010 - 12:51 pm
गाभा: 

भाषा सतत बदलत असते असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची भाषा ते तुकारामाची, रामदासांची भाषा ते आगरकर, सावरकर, पुल ते आज आपण तुम्ही आम्ही बोलतो ती भाषा.. सतत बदल झाला आहे, होईल. नव नवे शब्द दुसर्‍या भाषेतले येतात, येतील, नवे शब्द तयार होतात, होतील. वीस वर्षांनी वळुन पाहिले की भाषा खुप बदललेली दिसते. मी इथे फक्त प्रमाणभाषा (जिच्यात साधारणपणे लेखन केले गेले आहे तिच्याबद्दल बोलत आहे) डोळ्यासमोर ठेवुन बोलत आहे.

तर मंडळी कल्पना करा की इसवी सन ३०१० चालु आहे. होय आजपासुन १००० वर्षांच्या भविष्य काळात आपल्याला जायचे आहे... चला !

मराठी भाषा म्हणून विचार करता काय शक्यता असतील?

१) १००० वर्षांत मानवाने केलेल्या काही चुका, युद्धं इत्यादी मुळे मानववंश नामशेष झाला. मानव नाही. भाषा असण्याची शक्यताच नाही. पण आपल्याला सध्या हा पर्याय विचारात घ्यायचा नाही म्हणुन बाद.

२) अनेक विचारवंतांच्या म्हणण्यानुसार जुन्या गोष्टी या अडगळी सारख्या असल्याने सर्व जुने संदर्भ संपुष्टात आणले जाऊन मानवाची एक नवी सुरवात केली असुन एकच भाषा, एक शासन अशी प्रणाली सर्वत्र लागु केल्याने आणि ती भाषा मराठी नसल्याने मराठी भाषा असा काही प्रकारच अस्तित्वात नाही. पण आपल्याला हा सुद्धा पर्याय विचारात घ्यायचा नाही.

३) मराठी भारताची राष्ट्रभाषा झाली आहे. २२ व्याशतकात एक समग्र क्रांती होऊन मराठीचे संस्कृतप्रमाणे घट्ट रुप तयार केले आणि ती भाषा आज भारत भर वापरात आहे. हा पर्याय असु शकतो

४) मराठी राज्य भाषा म्हणुन आहे पण राष्ट्रभाषा नाही. महाराष्ट्र (किंवा जे नाव तेव्हा असेल ते) राज्यात हीच भाषा सर्वत्र वापरली जाते पण स्वरुप मात्र घट्ट आहे त्यात १००० वर्षांत फारसा बदल झाला नाही. हा पर्याय विचारात घेता येईल

५) चौथ्या पर्यायाप्रमाणेच मात्र मराठीत बदल प्रचंड झाला आहे. जसा १३ व्याशतकातली ज्ञानेश्वरीची भाषा आणि २१व्या शतकातली भाषा यात बदल आहे तसाच. हा पर्याय विचारात घेता येईल

६) मराठी राज्यभाषा नाही. मराठी बोलणारे अगदी तुरळक आहेत. या पर्यायात बदल झालेली अगर न झालेली असे दोन उपपर्याय असु शकतात. हा पर्याय विचारात घेता येईल

७) मराठी मृत भाषा असुन केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमातुन शिकवली जात आहे. हा पर्याय विचारात घेता येईल

८) मराठी मृत असुन अभ्यासक्रमात सुद्धा नाही पण काही हौशी लोक शिकत असतील. सर्वसामान्य लोकांना अशी काही भाषा होती येवढेच माहित असेल. हा पर्याय सुद्धा विचारात घेता येईल

अशाच प्रकारचे अनेक पर्याय विचारात घेता येतील

आपल्याला काथ्या या विषयावर कुटायचा आहे की.

अशा प्रकारे अनेक पर्याय मराठीबाबत संभवत असतांना इसवी सनाच्या ३०१० साली म्हणजेच आजपासुन १००० वर्षांनी आजच्या काळातील म्हणजेच सोईसाठी इसवी सन १९०० ते २०१० या काळातील कोणत्या पाच साहित्य कलाकृती तेव्हा नाव राखुन असतील? जरी वाचनात नसतील (असे समजुन की भाषा मृत आहे) तरी नावाने माहित असतील ? किंवा वाचनात असतील आणि त्यावर चर्चा होत असेल?

साहित्यिकाचे नाव, कलाकृती आणि का टिकुन राहतील याची कारणमीमांसा अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

9 Nov 2010 - 1:00 pm | रणजित चितळे

सावरकरांचे सहा सोनेरी पाने
पुलं चे व्यक्ती आणि वल्ली
साने गुरुजिंची शामची आई
बम पुरंद-यांचे शिवाजी वरचे पुर्वार्ध व उत्तरार्ध
गोनीदांचे आईची देणगी किंवा वि वा शिरवाटकरांचे नटसंम्राट

kamalakant samant's picture

9 Nov 2010 - 1:29 pm | kamalakant samant

फक्त स॑त साहित्य टिकून राहील.
ज्ञानेश्वरी,गाथा,दासबोध,भागवत इत्यादि.
स॑त सहित्य हे अजरामर असल्याने तेच राहील.
आपटे,फडके,माडखोलकर स्मरणात राहणार नाहीत.
गेल्या ८०० वर्षाचा इतिहास हेच सा॑गतो.

रणजित चितळे's picture

9 Nov 2010 - 2:36 pm | रणजित चितळे

आपले म्हणणे बरोबर आहे. मी अॅक्सेप्ट करतो मी चुकलो. खरे म्हणजे वरील वाङ्मय माझ्या आवडीचे आहे.

रणजित चितळे's picture

9 Nov 2010 - 2:36 pm | रणजित चितळे

आपले म्हणणे बरोबर आहे. मी अॅक्सेप्ट करतो मी चुकलो. खरे म्हणजे वरील वाङ्मय माझ्या आवडीचे आहे.

अजून हजार वर्षांनी आजची मराठी भाषा नामशेष होईल; आज संस्कृत झालीय त्या परिस्थितीत जाईल.
म्हणून अजरामर मराठी साहित्य उपलब्ध असले तरी ३०१० मधील लोकांना ती "त्यांची" भाषाच नसल्याने नेमकं काय लिहून ठेवलंय तेच कळणार नाही.
म्हणून मराठीच्या तयार झालेल्या तुरळक पण्डीतांमध्ये वाद होतील - आज संस्कृत पण्डीत संधी-विग्रह, धातुसाधीत आणि अर्थ यावरून घालतात तसे.

वि. स. खांडेकरांचे ययाति मूळ हिब्रू /अरेमॅक भाषेतील बायबल सारखे मूळ मराठी मानले जाईल. ;-)
शिवाजी सावंतांचे मृत्यूंजय हे लिखाण मृत्यूवर मात कशी करायची त्याबाबतचा ग्रंथ होईल! ;-)
पुलं च्या साहित्यात ७० टक्के भाग हा जुन्या काळातील आठवणींचा असतो - बाकी विनोद असतो - पण तो विनोद आहे की नक्की काय ते निश्चित नसेल. त्यामुळे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर ते नक्की काय आहे याचा शोध घेणारी संशोधन होतील ;-)
आजच्या कविता वगैरे कुठल्या कुठे गायब होऊन जातील.

धमाल मुलगा's picture

9 Nov 2010 - 6:46 pm | धमाल मुलगा

पुलं च्या साहित्यात ७० टक्के भाग हा जुन्या काळातील आठवणींचा असतो - बाकी विनोद असतो - पण तो विनोद आहे की नक्की काय ते निश्चित नसेल. त्यामुळे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर ते नक्की काय आहे याचा शोध घेणारी संशोधन होतील

हे बाकी पटलं राव :)
अगदी १००० वर्षं कशाला, आणखी दहा वर्षांनंतर पोरांना पु.ल. वाचायला दिलं काही तर निम्म्याहून अधिक तर डोक्यावरुन जाईल त्यांच्या. :)

यकु's picture

9 Nov 2010 - 7:07 pm | यकु

हो ना! माझ्या ओळखीच्या काही महाभागांना पुलं चे म्हैस हे कथाकथन सुरूवातीपासून शेवटपर्यंत ऐकवले, ते म्हशीसारखेच तोंड करून बसले होते शेवटपर्यंत, एकदाही न हसता!
लोक मुळातच फार बोर झालेत; त्याला पुलंचा काय कुणाचाच इलाज नाही.
आणि पुढच्या पिढ्यांतील लहान मुलांना तर काही संदर्भच लागणं अशक्य.

धमाल मुलगा's picture

9 Nov 2010 - 8:42 pm | धमाल मुलगा

धन्य आहेत असे जीव. :)
काय बोलु?

ज्ञानेश्वरी मधील काही शब्द आजदेखील वाचायला अवघड जातात आणि त्याच्या आजच्या मराठीमधील भाषांतराची गरज भासते. अजून १००० एक वर्षांनी ज्ञानेश्वरी राहीलच याची शाश्वती मला तरी देता येत नाही. जरी रहावी असे वाटत असले तरी.

तिमा's picture

9 Nov 2010 - 7:41 pm | तिमा

घट्ट भाषा म्हणजे काय ते समजले नाही.

बाकी तेंव्हाच्या ट्रेंडप्रमाणे

वासुनाका
अजगर
गणुराया आणि चानी
माहीमची खाडी
चक्र
ही पुस्तके टिकून राहतील असे वाटते.

इनोबा म्हणे's picture

9 Nov 2010 - 8:11 pm | इनोबा म्हणे

'मचाक' तेवढं शेवटपर्यंत टिकून राहिल. ;)

धमाल मुलगा's picture

9 Nov 2010 - 8:43 pm | धमाल मुलगा

आयचा घो! च्यायला...ते मचाकवाले पण आता ॠणं फिणं मानायला लागतील. =))

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2010 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

मी परवाच नीलकांतला विचारले की ह्या वेळच्या दिवाळी अंकात मिपाचे ॠण मानु काय ?

मचाकचा अंक निघेपर्यंत रात्री झोपेतुन दचकुन उठत होता म्हणे तो.

मॉरीशसमधील मराठी भाषिक आजही ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठी बोलतात. श्रीलंकेतील तामिळी लोक अशीच ३००-४०० वर्षांपूर्वीची तामिळ बोलतात असे माझ्या तामिळी मित्रांकडून ऐकले आहे. मी त्रिनिदादला कांहीं महिने राहिलो होतो तिथे अनेक बिहारी मजूर १००-१५० वर्षांपूर्वी येऊन वसले आहेत. आम्हाला पाहून ते आपुलकीने भजने म्हणू लागत. ती भजनेही खूप जुन्या काळात बिहारमध्ये म्हटली जाणारी होती असे आमच्यातले बिहारीही आम्हाला सांगत. म्हणजे अशा दूरवरच्या भागातील मराठी-तामिळ-हिंदी-भोजपुरी-मैथिली बदलली नाहीं. पण मराठीचे-तामिळचे 'माहेरघर' असलेल्या प्रदेशातच ती Dynamic असल्याने बदलत गेली असे वाटते.
मराठी नामशेष व्हायला १००० वर्षे लागणार नाहींत. १०० वर्षेच पुरतील. मराठी तरुणांना मराठी लिहा-वाचायला आताच त्रास होतो हे दिसते तसाच माझ्या तामिळ मित्रांची व बंगाली मित्रांची मुले अद्याप त्या भाषा बोलतात पण लिहू-वाचू शकत नाहींत. आंग्ल भाषेतून शिक्षण घेतल्याचा हा side-effect आहे.
थोडक्यात काय? तर संतसाहित्य गाव्य किंवा वाच्य माध्यमात टिकेल पण लिखित माध्यमात टिकेल कीं नाहीं कुणास ठाऊक. बहुदा नामशेषच होईल.
संस्कृत तर दूरच राहिली! मराठीची स्थिती आजच्या अर्धमागदीसारखी होईल असे सखेद वाटते!

धार्मीक लेख व ग्रथ सोडून ?

ज्ञानेश...'s picture

10 Nov 2010 - 10:06 am | ज्ञानेश...

पाचव्या पर्यायाला मत देतो.

शिवाय, शरदिनीतैंच्या कवितांवर तेव्हा थेसिस लिहिले जातील असेही वाटते, ;)

नरेशकुमार's picture

12 Nov 2010 - 8:55 am | नरेशकुमार

शेवटि English राहानार, computer मुळे.

राजेश घासकडवी's picture

12 Nov 2010 - 9:40 am | राजेश घासकडवी

जगात सुमारे सहा हजार भाषा आहेत. त्यातल्या बहुतांश नष्ट होणार याबद्दल वाद नाही. पण सहा अब्जात दहा कोटी ही पुरेशी मोठी लोकसंख्या आहे - त्यामुळे मराठी भाषाच नष्ट होणार असं काही वाटत नाही. तंत्रज्ञान इतकं झपाट्याने विकसित होतं आहे की लवकरच भाषांतरयंत्रं विकसित होऊ शकतील... मग तुम्ही कुठच्याही भाषेत बोला, समोरच्याला ते आपल्या भाषेत ऐकू येऊ शकेल.

बाकी टिकून राहाणं म्हणजे नक्की काय ते कळलं नाही. टिकून राहाण्याच्या देखील अनेक पातळ्या असतात. संत वाङमय टिकून राहील म्हणजे ते अजून टिकून आहे हे गृहित आहे. पण म्हणजे नक्की काय? आज ज्ञानेश्वरी किती जण वाचतात? तरी ती 'टिकून आहे' याबद्दल वाद नाही. पुलंचं लेखन त्यांनी लिहिलं त्या काळात वाचलं गेलं त्यापेक्षा अधिक संख्येने आज वाचलं जात असावं. कारण वाचकवर्गच वाढलेला आहे. (हे पुस्तकांच्या खपावरून सहज शोधून काढता येईल)

असो. तर मूळ मुद्दा आहे की काय टिकून राहील. चर्चाप्रस्तावकाने टिकून राहाण्याची व्याख्या करावी ही विनंती.