'गरीब व श्रीमंतांना कॉंग्रेसच एकत्र आणू शकते'
माननीय युवराज राहुल गांधी यांनी नुकतेच 'फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात.' असे विधान केले, तसेच 'सध्या देशात दोन हिंदूस्थान निर्माण झाले आहेत. एक अतिशय वेगाने प्रगती करतो आहे आणि दुसरा गरिबीमुळे अडचणीत आला आहे.' हेही मान्य केले. इतके मान्य करून पुन्हा आपल्या पक्षाची जाहिरात केली.
'या दोघांनाही एकत्र आणण्याचे काम फक्त कॉंग्रेसच करू शकते.'
त्यामुळेच कदाचित काही राजकारण्यांनी गेली साठ, (sorry ६०-१५=४५) गेली ४५ वर्षे भारत प्रगत होण्यासाठी जास्तीत जास्त गरीब तयार करण्याची जबाबदारी पार पडलेली आहे.
काहीना याची माहिती नव्हती. ती माहिती करून दिल्याबद्दल माननीय युवराज यांचे अभिनंदन.
फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकत असल्याने सर्वांना गरीब होण्याचे आमच्या तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
तर मित्रांनो,
चला उठू, भारत गरीब बनवू, देशाची प्रगती करू.
मला काही प्रश्न पडले आहेत. जमले, वेळ मिळाला तर उत्तर देण्याचा प्रयत्न देखील करू शकता.
१) CWG कोणत्या हिंदुस्तानासाठी झालेले होते ?
२) लवासा कोणत्या हिंदुस्तानासाठी होत आहे ?
३) आदर्श गृहप्रकल्पात कोणत्या हिंदुस्तानची घरे आहेत ?
४) राजकारणांत प्रवेश घेण्यासाठी (केवळ प्रवेश नाही, तिथे प्रवेश करून जिवंत राहण्यासाठी) कोणत्या हिंदुस्तानात जन्म घ्यायला हवा ?
५) पांढरे दहशतवादी कोणत्या हिंदुस्तानात राहतात ? तसेच भगवे, निळे, हिरवे, काळे, पिवळे यांच्या बाबतीत सुद्धा विचारता येईल.
६) प्रगत हिंदुस्तानचा पत्ता काय आहे ? (काही नाही, तिथे जाऊन जरा एक चक्कर मारून येईल म्हणतो)
प्रगत हिंदुस्तान वासियांना, गरीब हिंदुस्तान वासियांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
तसेच (मिपावरील) प्रगत हिंदुस्तानात राहणाऱ्या लोकांना गरीब हिंदुस्तानात दिवाळी निमित्त फराळाचे आमंत्रण आहे.
फराळ : एक खव्याचा पेढा, जमल्यास थोडा चिवडा.
(खवा कोणता ? ते विचारू नका, आमच्या हिंदुस्तानात चौकातल्या हलावायीच्या दुकानात स्वस्तात स्वस्त जे पेढे मिळतात ते आम्हाला गोडच लागतात, )
प्रतिक्रिया
3 Nov 2010 - 7:38 am | सुनील
चालू द्या.,,,,,
सोबत इनो ठेवा!!
3 Nov 2010 - 9:58 am | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
अवांतर : मूळ लेखातले निळे, काळे आणि पिवळे दहशतवादी म्हणजे कोण ते कळले नाही.
अतिअवांतर : गांधीवादी युवराजांची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट फॉलो करतात त्याअर्थी त्यांना युवराजांचे फॉलोअर म्हणावे का?
अतिअतिअवांतर : लेख कोणत्या देशाविषयी लिहिला आहे त्याचा उलगडा झाला नाही. तीन अॅटलास शोधले. हिंदुस्तान नावाचे काहीच सापडले नाही.
3 Nov 2010 - 7:06 pm | वाहीदा
सहमत !! ;-)
3 Nov 2010 - 9:14 am | सूर्याजीपंत
या बातमीत एक मजेदार गोष्ट आढळली "अधिवेशनात राहुल गांधी मंचावर सर्वांत मागच्या रांगेत बसले होते. कार्यकर्त्यांनी वारंवार त्यांना विचार मांडण्याची विनंती केल्यानंतर ते बोलण्यास तयार झाले. " म्हणजे राहुल गांधीनी या वेळेला भाषण वाचून नाही दाखवला का ? उगाच लोकांना मूर्ख बनवायचे धंदे आता तरी बंद करावेत यांनी. काय तर म्हणे कि संघ आतंकवादी आहे. आणि हे जुनीच टेप अजून चालू आहे " अन्य पक्ष प्रादेशिक आहेत किंवा जाती आणि धर्माधिष्ठित" तुम्ही मोठे धर्मनिरपेक्ष आहात तर मग सच्चर आणि बनेर्जी कमिट्या कशाला स्थापन केल्या ? पण राहुल गांधींचा भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास महान असल्याने त्यांचे जोडे उचलण्याची संधी मिळाली तरी आपले मंत्री धन्य होतात. त्यांचंपण बरोबरच आहे म्हणा अशा महान माणसाचे जोडे नाही उचलायचे तर काय सावरकरांच्या फोटोची पूजा करायची ?
3 Nov 2010 - 7:23 pm | कोकणप्रेमी
एकदम सहमत
3 Nov 2010 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll
भावनांशी सहमत आहे. नेहरुभक्त असल्यामुळे इनो घेऊन मग लेख वाचला आहे.
3 Nov 2010 - 10:05 am | अप्पा जोगळेकर
मतं पटोत अथवा न पटोत. गांधीवादी मनापासून लिहितात असं वाटतं.
3 Nov 2010 - 10:50 am | पंख
अत्यंत ऊथळ व कुठलाही अभ्यास नसलेला नेता.. नेताही तो केवळ गांधी या आडनावामुळे झालाय.. त्याच्याविषयीचे काहीच वाचावेसे वाटत नाही..
3 Nov 2010 - 10:53 pm | विजुभाऊ
ज्या संजय गांधीना ;विरोध केला गेला होता. आणि मृत्यू नन्तर देखील त्यांच्याबद्दल वाइटच बोलले गेले त्या संजय गांधींचे चिरंजीव वरूण गांधी हे देखील त्याच गुणांमुळे नेते बनवले गेले आहेत. अर्थात ते एका आदर्श पक्षाचे फायर ब्रॅन्ड नेते आहेत. त्यामुळे ते पावन असू शकतात.
असो.
राहूल महाजन हे देखील महाजन या आडनावामुळे असेच काही काळ् पावन करून घेतले गेले होते.
( या उत्तरात अनावश्यक असे काही नसावे असे वाटते )
4 Nov 2010 - 10:55 am | पंख
बापाच्या पुण्यामुळे जन्मजात वलयांकित असणार्या या ठोंब्यांविषयी मला कुठल्याही प्रकारची आत्मीयता नाही.. मग ते राहूल असोत अथवा वरुण गांधी..राहूल महाजन तर मुर्खपणाचा पणाचा कळस आहेत..
4 Nov 2010 - 12:05 pm | रणजित चितळे
हे पाहील्यावर नशिबावर विश्वास बसतो बघा.
some are born great, some achieve greatness and on some greatness is thrust upon them - Willaim Shakespere ने राहुल (शेवटचा भाग) साठी कैक वर्षांपुर्वीच लिहुन ठेवले होते.
3 Nov 2010 - 11:14 am | वेताळ
त्यामुळे त्याच्या इतपत आम्ही फिरलो नसल्यामुळे बोलणे उचित होणार नाही.
पण भारत पुर्वीपासुन गरीब आहे हे ५/६ हजार वर्षापुर्वीच्या अध्यात्मिक कथा वाचल्यातरी लक्षात येते.त्यामुळे गरीबी बद्दलचे श्री गांधीवादीचे मत पटले नाही.
3 Nov 2010 - 11:56 am | विजुभाऊ
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
अत्यन्त आवश्यक लेख लिहिण्यासाठी धन्यवाद
3 Nov 2010 - 11:58 am | विजुभाऊ
देशात दोन भारत आहेत हे माहीत होते.
दोन हिन्दुस्थान आहेत हे नव्याने कळाले
3 Nov 2010 - 12:22 pm | मराठमोळा
ह्म्म्म्म.
हे झाले दोन हिंदुस्थानांबद्दल. इथे दोन पाकिस्तान देखील आहेत त्याबद्दल काँग्रेस कधीच काही का बोलत नाही?
3 Nov 2010 - 3:44 pm | अविनाशकुलकर्णी
.
3 Nov 2010 - 3:44 pm | अविनाशकुलकर्णी
.
3 Nov 2010 - 3:10 pm | अविनाशकुलकर्णी
३ हिंदुस्थान आहेत
गरीबांचा.
अमीरांचा
राजकारण्यांचा
3 Nov 2010 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार
पण हे ३ वेळा कशाला लिहुन सांगायला पाहिजे ? ;)
3 Nov 2010 - 3:43 pm | अविनाशकुलकर्णी
काहि कळत नाहि..एकदा क्लिकले तर ३ वेळा आले.
3 Nov 2010 - 4:58 pm | तिमा
त्ये शेतकरी संघटनावाले कधीचं सांगत्यात , इंडिया आनि भारत म्हनून. त्येच राहुलनं येगळ्या शब्दामंदी सांगितलं न्हवं का ?
3 Nov 2010 - 5:59 pm | JAGOMOHANPYARE
फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकत असल्याने
अगदी बरोबर आहे..... श्रीमंतानी स्वतःचे कपडे स्वतः धुवावेत व इस्त्री करावेत..... स्वतःसाठी शेतात धान्य पिकवावे.... म्हशीचे दूध पिळावे.......... आणि त्यानंतर उरलेल्या वेळात मग श्रीमंत होऊन दाखवावे.......
श्रीमंताना कुणी तरी या सेवा स्वस्तात देत असतो. म्हणुनच ते श्रीमंत होतो...........
3 Nov 2010 - 6:50 pm | विकास
देशात दोन हिंदूस्थान आहेत का काय ते माहीत नाही... असे म्हणताना गांधीवादींना काय म्हणायचे आहे ते समजले नाही....
मात्र आजची काँग्रेस म्हणजेच १२५ वर्षांपुर्वींची कॉंग्रेस म्हणणे हे पटत नाही. हे ते येथे म्हणलेले नाहीत, त्यांचे मत माहीत नाही, पण माध्यमात काँगेससंदर्भात सतत येत असते. स्वातंत्र्यापुर्वीची इंडीयन नॅशनल काँग्रेस ही प्रामुख्याने स्वातंत्र्यलढ्याची चळवळ होती, राजकीय पक्ष नव्हता. आजची काँग्रेस जरी स्वतःला इंडीयन नॅशनल काँग्रेस असे अधिकृतपणे म्हणत असली तरी त्याचे मूळ हे आणिबाणीनंतर हरल्यावर काँग्रेसजनांनीच एकाकी पाडलेल्या इंदिरा गांधींनी जी "इंदिरा काँग्रेस" चालू केली त्यात आहे. त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच्या वर्षातच काँगेसचळवळीची जन्मशताब्दी होती. त्या वेळेस राजीव गांधी आणि तत्कालीन इं कॉ. पुढारी आमच्या पक्षाची जन्मशताद्बी असे म्हणू लागले. अर्थातच शरद पवारांच्या तत्कालीन काँग्रेस (समाजवादी), यांनी आक्षेप घेऊन, स्वतः एक वेगळी जन्मशताब्दी देखील साजरी केली होती. कदाचीत याच सुमारास, आता इंदिराजी पण हयात नाहीत आणि नाव कायमस्वरूपी पाहीजे म्हणून नाव बदलले गेले आणि इंडीयन नॅशनल काँग्रेस असे केले गेले असावे.
तात्पर्यः आत्ताचा काँगेसपक्ष हा अजून एक राजकीय पक्ष आहे, त्याने केवळ आपणच काँगेस चळवळीचे उत्तराधिकारी आहोत असे म्हणणे हे धूळफेक आहे तर माध्यमांनी तसे म्हणणे हे त्यांचे एकतर अज्ञान आहे अथवा पक्षपाती विचार पसरवणे आहे असे वाटते.
3 Nov 2010 - 7:34 pm | नितिन थत्ते
आणिबाणी नंतर नव्हे.
१९६९च्य सिंडिकेट इंडिकेट वादावरून पडलेल्या फुटीपासूनच.
पक्षाचे नाव अजूनही काँग्रस आय असेच आहे असे मला वाटत होते. पण आता निवडणुक आयोगाकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इतकेच नोंदलेले आहे.
जोवर काँग्रेस आय खेरीज अजून इतर काँग्रेस पक्षांचे लक्षणीय अस्तित्व होते तोपर्यंत हा पक्ष काँग्रेस आय या नावानेच उल्लेखला जाई. उदा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी (यशवंतराव चव्हाण-ब्रह्मानंद रेड्डी यांचा पक्ष), काँग्रेस -एस (पवार, उन्नीकृष्णन) वगैरे.
या काँग्रेस लयाला गेल्यावर उरलेल्या काँग्रेसला म्हणजेच आय काँग्रेसला नुसते काँग्रेस म्हटले जाऊ लागले. त्यामागे आणखी इतिहास आहे. जेव्हा काँग्रेस फुटत असे तेव्हा आमची काँग्रेस खरी असा दावा दोन्ही गट करत असत. पुढे निवडणुकांचे निकाल पाहून बहुतेक नेते काँग्रेस आय मध्ये परत जात असत. त्यामुळे आमची काँग्रेस खरी हा आय पक्षाचा दावा आपोआप सिद्ध होत गेला. इंदिरा गांधींचे पुनरागमन झाले नसते तर दुसरी काँग्रेस खरी म्हणून ओळखली गेली असती.
राहिला प्रश्न काँग्रेस आय ने मूळ काँग्रेसची लीगसी सांगण्याचा, शताब्दी कोणी साजरी करायची याचा. त्याचे उत्तर असे देता येईल. १९८५ मध्ये मूळ काँग्रेसमध्ये असलेले आणि त्यावेळी इतर पक्षांत असलेल्या पुढार्यांनी (समाजवादी वगैरे) उत्साहाने शताब्दी साजरी केली असती तर काँग्रेस आय ने एकट्याने शताब्दी साजरी करायचा प्रश्न आला नसता. (शताब्दी साजरी करायला तेव्हाची काँग्रेस आहे की नाही हा प्रश्न येत नाही. हल्ली केव्हातरी आपल्या संरक्षक दलांपैकी कोणाची तरी शताब्दी की काहीसे साजरे केले गेले होते. ज्या दलाला १०० वर्षे झाली असतील ते तर ब्रिटिशांचे आणि ब्रिटिशांना निष्ठा वाहिलेले असणार).
जुन्या काँग्रेसच्या लीगसीमुळे (नाव, झेंडा वगैरे) सध्याच्या बर्याच लोकांना सारखी इनो घ्यायची गरज पडते. पण त्याला काही इलाज नाही. :)
3 Nov 2010 - 8:14 pm | विकास
बहुतांशी सहमत आहे. फक्त मूळ मुद्दा हा एक चळवळ होती ज्यात सर्व विचारांना सहभागी केले गेले होते. तर दुसरा "काँग्रेसला विसर्जीत करा" हा गांधींचा विचार न मानलेला स्वातंत्र्यानंतरचा काँग्रेसपक्ष आहे. थोडक्यात १२५ वर्षे होणार आहेत ती त्या चळवळीस राजकीय पक्षास नव्हे आणि तो देखील असा ज्याचाच केवळ काँग्रेसचळवळीशी वारसा आहे आहे असे सांगण्याचा हक्क नाही.
पक्षाचे नाव अजूनही काँग्रस आय असेच आहे असे मला वाटत होते. पण आता निवडणुक आयोगाकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इतकेच नोंदलेले आहे.
मला देखील असेच वाटायचे. पण ते आधी म्हणल्याप्रमाणे राजीव गांधींच्या कालावधीत बदलले गेले असावे नाहीतर नरसिंहरावांनी हुषारी दाखवली असावी. ते नाव काही कॉपीराईट नाही (जसे "गांधीवादी" हा कॉपीराईट नाही ;) ) त्यामुळे त्यांनी ते इतरांनी घेण्याआधी घेतले म्हणून काहीच बिघडत नाही.
१९८५ मध्ये मूळ काँग्रेसमध्ये असलेले आणि त्यावेळी इतर पक्षांत असलेल्या पुढार्यांनी (समाजवादी वगैरे) उत्साहाने शताब्दी साजरी केली असती तर काँग्रेस आय ने एकट्याने शताब्दी साजरी करायचा प्रश्न आला नसता.
शरद पवारांनी तसे केले होते, स्वतःच्या पक्षात नसलेल्या इतर काँग्रेसजनांना देखील बोलावून त्यांनी साजरी केल्याचे आठवते. अर्थात तरी देखील माध्यमांचे तुणतुणे हे राजीव गांधींच्या भोवतालीच वाजत होते.
हल्ली केव्हातरी आपल्या संरक्षक दलांपैकी कोणाची तरी शताब्दी की काहीसे साजरे केले गेले होते. ज्या दलाला १०० वर्षे झाली असतील ते तर ब्रिटिशांचे आणि ब्रिटिशांना निष्ठा वाहिलेले असणार
ब्रिटीशांशी निष्ठा वाहीलेले जरी असले तरी तेंव्हा देखील ते भारतीय सेनादलच होते आणि आत्ता देखील तेच आहे. त्या शिवाय त्यांचे आधीचे ध्येय हे भारतीय सीमांचे रक्षण करणे हेच होते आणि आत्ताही तेच आहे. थोडक्यात ध्येयधोरणात सातत्य आहे. मात्र स्वातंत्र्यापुर्वीची काँग्रेसचे ध्येय हे ब्रिटीशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे होते तर आत्ताच्या काँग्रेसचे ध्येय हे स्वतःची सत्ता टिकवणे हे आहे. थोडक्यात ध्येयधोरण वेगळे आहे आणि त्यात आश्चर्यही नाही कारण दोन संस्था म्हणून निराळ्या आहेत.
जुन्या काँग्रेसच्या लीगसीमुळे (नाव, झेंडा वगैरे) सध्याच्या बर्याच लोकांना सारखी इनो घ्यायची गरज पडते. पण त्याला काही इलाज नाही.
जसे जुन्या गांधीवाद्यांच्या लिगसीमुळे सध्या येथील काही सभासदांना नवीन "गांधीवादी" पाहीले की होते तसेच असावे. :-)
4 Nov 2010 - 12:07 am | फारएन्ड
अगदी ९१ च्या निवडणुकीत सुद्धा मतपत्रिकेवर इन्डियन नॅशनल कॉन्ग्रेस असेच नाव वाचल्याचे आठवते.
4 Nov 2010 - 5:33 am | अर्धवटराव
काँग्रेसचा इतीहास, त्या पक्षाचे देशाच्या उन्नती/अवनतीत असलेले योगदान आणि भविष्यात हा पक्ष देशाचं काय वाटोळं/सोनं करेल यावर तर पी.एच्.डी करता येईल. पण सगळी वादळे, संकटे पचवून आज इतकी वर्षे काँग्रेस भारताचा राज्यकारभार चालवते आहे, आणि पुढील काहि वर्षे हेच चित्र कायम राहील असं दिसतं कारण काँग्रेस जवळ तुमच्या सारखे चोख इन्फोर्मेशन बाळगणारे, घटनेची (दोन्ही अर्थाने... राज्यघटना आणि इन्सीडंन्स) डिटेलींग करणारे आणि थंड डोक्याने विचार करु शकणारे समर्थक/कार्यकर्ते आहेत. या अदाकारीचा मिपा वरचा दुसरा फनकार म्हणजे इंद्रजीत.
(तुमच्या माझ्या विचारधारेत अनेक मतभेद आहेत... तरी पण) हॅट्स् ऑफ्फ
(अपक्ष) अर्धवटराव
4 Nov 2010 - 8:24 am | नरेशकुमार
हिंदूस्थान A : अमीर हिंदूस्थान
हिंदूस्थान B : भिकारी हिंदूस्थान
4 Nov 2010 - 9:21 am | बेसनलाडू
(खवा कोणता ? ते विचारू नका, आमच्या हिंदुस्तानात चौकातल्या हलावायीच्या दुकानात स्वस्तात स्वस्त जे पेढे मिळतात ते आम्हाला गोडच लागतात, )
हे वाचा. झालंच तर हे सुद्धा वाचा. स्वस्त असो वा महागडे .. तुम्ही घेतलेल्या/खाणार असलेल्या पेढ्यांसाठीचा खवा गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान इकडून कुठून आला असेल, तर पेढे वाटताना आणि मटकावताना देवाचे नाव घ्यायला विसरू नका :)
(सावध)बेसनलाडू
4 Nov 2010 - 9:24 am | गांधीवादी
http://72.78.249.107/esakal/20101104/5428283399138645895.htm
भारत कसा आहे, यावर आता फार बोलून झाले. भाऊ आता प्रश्न तो बदलण्याचा आहे. उजेड एकाच ठिकाणी का साचतो आहे, हे उजेडाचे दलाल कोण आहेत, हे शोधण्याचा आहे. आपल्या मांडीला मांडी लावूनही ते दिसणार नसतील, तर उद्या तिसरा हिंदुस्थान तयार होईल. राहुलबाबा आपल्या पणजोबांप्रमाणे कदाचित "शोध आणखी एका हिंदुस्थानचा' असे काहीतरी लिहितील. त्याला "बुक्कर' की काय असा कुठला तरी पुरस्कार मिळेल; पण त्यातून दोन हिंदुस्थान साधण्यासाठी फेविकॉल काही मिळणार नाही. पक्षातल्या नेत्यांनी मूल्ये पाळावीत, आदर्श पाळावेत, सचोटी पाळावी असे भाषण या सरदारांनी वर्षानुवर्षे ऐकले आहे. एसी मांडवात बसून सारेच अशी भाषणे ऐकतात; पण प्रश्न आहे तो खरेच अंधार दूर करण्याची कॉंग्रेसकडे इच्छा आहे काय आणि ती असेल तर कशा पद्धतीने अमलात येणार आहे?
'तिसरा' हिंदुस्थान म्हणजे नक्की लेखकाला काय म्हणायचे आहे हे माझ्या सारख्या पामराला कळले नाही, पण जसे मला अभिप्रेत आहे तसा 'तिसरा' हिंदुस्थान जर का निर्माण झाला तर तो 'पहिल्या' आणि (नाईलाजाने) 'दुसर्या' हिंदुस्थानाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. त्याची एक खूप मोठी किंमत देशाला आणि संपूर्ण मानवजातीला चुकवावी लागेल. हे निश्चित.
दोन हिंदुस्थान साधण्यासाठी फेविकॉल काही मिळणार नाही
हे वाचून आमच्या एका फेवरेट शहीद मिपा सदस्याची आठवण झाली.
4 Nov 2010 - 10:52 am | अनामिका
आमच्यासारख्यांसाठी कॉंग्रेसच्या युवराजांनी अनवधानाने स्वदेशाचा केलेला हिंदुस्थान हा उल्लेखच महत्वाचा आहे.
4 Nov 2010 - 12:00 pm | रणजित चितळे
एकदम सहमत गांधीवाद्यांशी, राहुलला आता समजले आहे वाटते. ते कोणत्या भारतात आहेत कोणजाणे. त्यांचे शिक्षण असेच चालु रहावे हिच देवा कडे मागणी म्हणजे अजुन किती भारत आहेत ते कळतील त्यांना.
5 Nov 2010 - 5:06 pm | JAGOMOHANPYARE
आजकालची नेत्यांची पोरं आणि नवे पक्षवाले , राजकारण म्हणजे 'आपल्या राज्यातलं एका शहराचं कुरण' एवढाच अर्थ घेतात... त्यामानाने निदान या पोरानं हिंदुस्तान हा शब्द वापरला.. हे काय कमी आहे? :)
6 Nov 2010 - 2:42 pm | राजेश घासकडवी
लोकं मोजताना काहीतरी गडबड करताहेत का? गरीब आणि श्रीमंत असे दोनच हिंदुस्तान कसे काय मोजता येतात ते मला अजून कळलेलं नाही. हिंदुस्तान कुठच्या नकाशावर नाही, म्हणून मी भारताविषयी लिहितो.
१. किमान एक कार असलेल्यांचा भारत
२. कार नाही, पण घरात दोन टू-व्हीलर्स (स्कूटर, मोटरसायकल, मोपेड इ.) असलेल्यांचा भारत
३. दोन नाही, पण किमान एक तरी टू-व्हीलर्स (स्कूटर, मोटरसायकल, मोपेड इ.) असलेल्यांचा भारत
४. टू-व्हीलरही नाही तरी टीव्ही, फ्रिज, फोन व सेलफोन हे सर्व असणाऱ्यांचा भारत
५. टीव्ही, फ्रिज, फोन व सेलफोन यापैकी तीनच गोष्टी असणाऱ्यांचा भारत
६. टीव्ही, फ्रिज, फोन व सेलफोन यापैकी दोनच गोष्टी असणाऱ्यांचा भारत
७. टीव्ही, फ्रिज, फोन व सेलफोन यापैकी एकच गोष्ट असणाऱ्यांचा भारत (बहुधा सेलफोन)
८. वरील काहीच नाही, पण जेमतेम रोजीरोटीचा व्यवसाय/सोय असणाऱ्यांचा भारत
९. हमखास रोजीरोटीची सोय वर्षातले नऊ महिनेच असणाऱ्यांचा भारत
१०. रोजीरोटीची भ्रांत असल्याने कुपोषित असणाऱ्यांचा भारत
११. कुपोषणामुळे आयुर्मान कमी होणाऱ्यांचा भारत
१२. कुपोषणामुळे - उपोषणामुळे तडफडून मरणाऱ्यांचा भारत
१३. दुष्काळग्रस्त प्रदेशांत लाखोंच्या संख्येने उपासमारीने मरणाऱ्यांचा भारत
१४. साथीच्या रोगांत लाखोंच्या संख्येने मरणाऱ्यांचा भारत
१५. या सर्वाची संधीच न मिळणाऱ्या, वय वर्ष एकच्या आत मरणाऱ्या बालकांचा भारत
१६. कुठलीच सामाजिक सुविधा नसणारा, अगदी आदीमानवी जीवन जगणारा, रानटी पशूंशी मुकाबला करणाऱ्यांचा भारत
या यादीतले गरीब कुठचे आणि श्रीमंत कुठचे, याची मर्यादारेषा कुठे आखायची हे कोणी सांगेल का? बरं, शेवटच्या पाच मधले गेल्या सत्तरेक वर्षांत निश्चितच कमी झाले आहेत. त्याचं श्रेय कॉंग्रेसला द्यावं की नाही, हा गौण मुद्दा आहे. पण मग गरीब वाढले आहेत असं म्हणण्यात काय अर्थ आहे?
बाकी विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट घराण्यातल्या लोकांवर जे काही बोलणं चालू आहे, त्याबाबतीत मला काहीही म्हणायचं नाही. भारतात गरीबी वाढते आहे (ब्रिटीश गेल्यापासून) या मताला विरोध आहे. वरील क्रमवारीबाबत आकडेवारी देऊन लेखकाने ते सिद्ध करावं.