धर्म आणि संयुक्त राष्ट्रसंघ

विकास's picture
विकास in काथ्याकूट
19 Apr 2008 - 4:22 am
गाभा: 

आज पोप बेनेडीक्ट न्यू यॉर्कमधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) मुख्यालयात गेले होते आणि सार्वजनीक भाषण केले. त्यांची ओळख करून देताना युएन सरचिटणीस बान की मुन यांनी कॅथलीक चर्च आणि युएन मधे साम्य आहे असे सांगीतले (सेवा या अर्थी). स्वतः पोप हे मानवी अधिकारांवर बोलत असताना " धार्मिक हक्कांबद्दल" पण बोलले. यात कोणी फार गैर बोलले असे वाटले नाही. पण एक प्रश्न नक्कीच पडला की असे इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का? आज कॅथलीक सिस्टीम (मी सिस्टीम मुद्दाम म्हणत आहे कारण यात धर्मापेक्षा, धर्माधारीत इतरांवर राज्य करणे जास्त उर्धृत आहे)ही अफ्रिका आणि आशियाकडे नजर लावून आहे. कारण युरोपात त्यांची चर्चे ओसाड पडत आहेत आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे. असे आधि पण बघितले आहे आणि तेही विशेष करून हिंदूं/बुध्दीस्टांना बाजूस ठेवण्याचे प्रकार पाहीला आहे...

पण आजचा प्रकार पाहताना, एकंदरीत असे फक्त एकाच धर्माला आणि त्यातीलही एकाच पंथाच्या धर्मगुरूला संपुर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणार्‍या संस्थेने महत्व देणे हे अयोग्य वाटले. यात अजून एक गंमत म्हणजे रीडीफ ने मोठी बातमी या संदर्भात दिली आहे. ते ठीक आहे. पण गेल्या आठवड्यात पंतप्रधान मनमोहनसिंगना युएन कडून विशेष पारीतोषीक शेतीनिमित्त मिळाले त्याची बातमी पण नाही...

आपल्याला काय वाटले ते समजून घेयला आवडेल.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

19 Apr 2008 - 6:54 am | मुक्तसुनीत

सर्वात प्रथम मला हे नमूद करायला हवे की भूतकाळात इतर धर्माच्या पुढार्‍याना इतक्या मोठ्या नि महत्त्वाच्या व्यासपीठावर बोलावले होते किंवा कसे , हे मला माहीत नाही. दलाई लामांसारख्यानी आपली वक्तव्ये केली आहेत आणि त्यांच्या धार्मिक अंगाबरोबर त्यांच्या भौगोलिक नि राजकीय प्रश्नांना त्यांनी यूएन समोर नक्की वाचा फोडली असेल असे मी मानतो. चूभूद्याघ्या. असे असले , तरी , पोपना इतके अनन्यसाधारण महत्त्व दिले गेल्यानंतर काही मुद्दे उभे रहातातच.

यूएन ही प्रामुख्याने पाश्चात्य देशांची धोरणे राबविणारी संस्था आहे असा इतर ठिकाणच्या देशांकडून जो आरोप केला जातो त्याला पुष्टी देणारी - त्याच्याशी सुसंगत अशी ही घटना म्हणता येईल. यूएन चे सर्व जगातल्या प्रश्नांकडे लक्ष आहे ; परंतु त्यांच्या अर्थिक संस्था , सुरक्षामंडळे या सर्वांवर यूएस आणि त्याच्या बगलबच्चांचीच पकड आहे. आणि एरवी कितीही निधर्मीपणाचे धोरण अंगिकारले तरी त्या त्या देशांना "आपल्या" लोकांचे भले करणे , "आपल्या" लोकांचे हितसंबंध जपणे आवश्यक ठरते. आणि "आपले" लोक म्हणजे जास्तीत जास्त संख्येच्या लोकांचा गट. पाश्चात्य देशाचा समूह एकत्रित लक्षात घेतला तर , अर्थातच हा गट ठरतो कॅथलिकांचा.

सर्वात महत्त्वाचा असा वरचा मुद्दा सोडला तर पोपच्या यूएनसमोर भाषण देण्याचा संदर्भात काही मुद्दे सांगता येतील. कॅथलीक पंथ सोडला तर इतर कुठल्याही धर्म आणि पंथास एकच एक अशा सर्वोच्च पदाकडे बोट दाखविता येईल का हा प्रश्न येऊ शकतो. अगदी ख्रिस्ती धर्मामधल्या इतर पंथांच्या बाबतीत असे काही सांगता येईल की नाही ते मला माहीत नाही.

पिवळा डांबिस's picture

19 Apr 2008 - 8:28 am | पिवळा डांबिस

कारण युरोपात त्यांची चर्चे ओसाड पडत आहेत
पूर्ण माहिती नसल्याने मत व्यक्त करता येत नाही!
आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
पूर्णपणे असहमत!! अतिशय असत्य विधान!!!! अमेरिकेतील बरीचशी चर्चेस स्थानिक लोकांमुळेच चालत आहेत!! आता तीन-चार पिढ्यांनंतर तरी काळ्या लोकांना स्थानिक मानायला हरकत नसावी!!

सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की पोप ला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून युनोमध्ये भाषण करायला बोलावले नव्हते. त्याला भाषण करायचा अधिकार आहे तो व्हॅटिकन या छोट्याश्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून! आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या तलवारी म्यान करायला हरकत नाही!!
जर लोकांना हिंन्दू धर्मगुरूंना अशीच संधी मिळावी असे वाटत असेल तर खुशाल संसदेत बहुमताने निवडून या, भारताचा एखादा भाग स्वतंत्र हिन्दू साम्राज्य म्हणुन घोषित करा आणि एखाद्या शंकराचार्यांना तिथे राष्ट्रप्रमुख म्हणून घोषित करा. मग त्यांनाही युनोमध्ये भाषण करण्याचा अधिकार लाभेल!!!

कोलबेर's picture

19 Apr 2008 - 8:35 am | कोलबेर

अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये ह्यांचा गोंधळ बघावा. स्टारबक्स पेक्षा जास्त चर्चेस दिसतात. आणि सगळी अमेरिकन लोकांनीच भरुन वाहत असतात.

विकास's picture

19 Apr 2008 - 11:11 am | विकास

>>>>आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
पूर्णपणे असहमत!! अतिशय असत्य विधान!!!! अमेरिकेतील बरीचशी चर्चेस स्थानिक लोकांमुळेच चालत आहेत!! आता तीन-चार पिढ्यांनंतर तरी काळ्या लोकांना स्थानिक मानायला हरकत नसावी!!
<<<

अहो डँबिस मी नाही म्हणत स्वतःला ! (ह. घ्या.)

असो. मी जे काही म्हणत आहे त्याचा संदर्भ हा न्यू यॉर्क टाईम्स मधील लेख, प्यू रीसर्च सेंटरचे संशोधन आणि व्हॅटीकनचे संशोधन आहे.

आता त्यातील वाक्ये पहा:

Hispanics are transforming the nation's religious landscape, especially the Catholic Church, not only because of their growing numbers but also because they are practicing a distinctive form of Christianity. (न्यू यॉर्क टाईम्स आणि प्यू रीसर्च सेंटर)

Vatican stats: Catholic Church growing, especially in Asia, Africa
The latest Vatican statistics confirm that the church's population and ministerial workforce are continuing to shift to developing countries, especially those in Africa and Asia.

बाकी युरोपबद्दल मी एनपीआर वर ऐकले होते आणि व्हॅटीकनवरील बातमी पाहील्यास त्यात उलटसुलट नंबरांवरून कल्पना येऊ शकेल.

>>>सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की पोप ला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून युनोमध्ये भाषण करायला बोलावले नव्हते. त्याला भाषण करायचा अधिकार आहे तो व्हॅटिकन या छोट्याश्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून! आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या तलवारी म्यान करायला हरकत नाही!!
<<<

त्यांना युएनमधे बोलावले ते "हेड ऑफ स्टेट" म्हणून पण ते जे बोलले ते कॅथलीक धर्मगुरू म्हणून असे मला म्हणायचे आहे आणि त्यात आपल्याला पटले नाही तरी ते माझे मत आहे. विचार करा जगात मतदानाचा हक्क असलेले किती हेड्स ऑफ स्टेट्स आहेत (व्हॅटीकन ला मतदानाचा हक्क नाही आहे - नॉन व्होटींग मेंबर) आणि त्यातील किती जणांना अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि प्रसिद्धी मिळते? त्यांना असे स्पेशल का बोलावायचे. बोलवा की त्यांना सप्टेंबरमधे जनरल असेंब्लीत लाईनीत भाषण ठोकायला. तशीच इतर हेड्स ऑफ स्टेट्स ना संधी मिळते.

म्हणून माझ्या दृष्टिने मी असे म्हणले होते की, "इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का?" थोडक्यात ह्यात धार्मिक आपपर भाव दिसला आणि त्याबद्दल मी बोललो. तरी देखील त्यात "हिंदूत्ववादी" वगैरे शब्द आपण वापरत आहात कारण कदाचीत आपली विचार करायची मजल तितकीच असावी.

मी चर्चेत म्हणल्याप्रमाणे मी धर्माबद्दल आणि धर्माविरुद्ध बोललो नव्हतो तर "कॅथलीक सिस्टीम" असा शब्द वापरला होता ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते.

घरचा अभ्यास करून लिहीले होते आणि तशीच प्रतिक्रीया देत आहे.

पिवळा डांबिस's picture

19 Apr 2008 - 12:22 pm | पिवळा डांबिस

अहो डँबिस मी नाही म्हणत स्वतःला ! (ह. घ्या.)
जरूर! अहो नाहीतर हे नांव आम्ही स्वतःला कशाला घेतले असते?

बाकी युरोपबद्दल मी एनपीआर वर ऐकले होते आणि व्हॅटीकनवरील बातमी पाहील्यास त्यात उलटसुलट नंबरांवरून कल्पना येऊ शकेल.
आम्ही युरोपातील बातमीबाबत माहीती नसल्याने मत देता येत नाही असे स्पष्टच लिहिले आहे तेंव्हा त्याबद्दल गैरसमज होण्यावा प्रश्नच उदभवू नये!!

त्यांना युएनमधे बोलावले ते "हेड ऑफ स्टेट" म्हणून पण ते जे बोलले ते कॅथलीक धर्मगुरू म्हणून असे मला म्हणायचे आहे आणि त्यात आपल्याला पटले नाही तरी ते माझे मत आहे.
तुमच्या मताविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. पण मला सांगा की ऍट लीस्ट अमेरिकेत तरी (जो देश >९०% ख्रिस्ती आहे) त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी विचारांशिवाय आणखी कशाला प्रसिद्धी मिळणे प्राप्त होते?

तरी देखील त्यात "हिंदूत्ववादी" वगैरे शब्द आपण वापरत आहात कारण कदाचीत आपली विचार करायची मजल तितकीच असावी.
आपण म्हणता असे असेलही कदाचित, पण पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून न स्वीकारता पुनः पुनः त्याचा एक धर्मगुरू म्हणून उल्लेख आपल्या लेखात केला गेला आहे म्हणून आमची तशी समजूत झाली. कारण एकदा पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून स्वीकारलं की त्याला का युनोसमोर भाषण करायची संधी का दिली हा प्रश्नच निकालात निघतो. हां, आता तो काय बोलला हे कुणाला आवडणार नाही कदाचित, पण युनो ही एक लोकशाही मानणारी संस्था आहे त्यामुळे तेथे वक्त्यांना त्यांचे मनोगत बोलायचा ( आपल्याला आवडणारे नसले तरीही) अधिकार आहे असे आम्हाला वाटते!
हां, आता पोपलाच का बोलावले आणि जगातील इतर धर्मीय धर्मगुरूंना का नाही बोलावले असा प्रश्न येऊ शकतो. पण इथे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे की ख्रिस्ती धर्म हा युरोप व उत्तर-दक्षिण अमेरिकेत प्राबल्याने आहे. त्यामुळे या राष्ट्रातल्या धर्माला त्या त्या राष्ट्रांत अधिक प्रसिद्धी मिळणारच!!

मी चर्चेत म्हणल्याप्रमाणे मी धर्माबद्दल आणि धर्माविरुद्ध बोललो नव्हतो तर "कॅथलीक सिस्टीम" असा शब्द वापरला होता ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते.
आपण जर धर्माबद्द्ल किंवा धर्माविरूद्ध बोलला नव्हतात तर "कॅथलिक सिस्टीम" या शब्दप्रयोगामागील आपल्याला अपेक्षित अर्थ काय होता? आर्थिक, राजकीय, वा सामाजिक संस्थान?

या चर्चेमध्ये मूळ लेखकाचा वा त्याच्या हेतूंचा विपर्यास वा अनादर करण्याचा उद्देश्य नाही. पण उगाचच या प्रसंगाबद्द्ल युनोला दोष देण्याने काही साधणार नाही असे माझे मत आहे! हां या नवीन पोपला दूषणे द्यायची असतील तर हा युनोचा प्रसंग विचारात घ्यायची गरज नाही. त्याने आत्तापर्यंत अशी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत की ज्यासाठी त्याला जोड्याने मारता येउ शकते! फक्त प्रस्तुत प्रसंग त्यातील नाही हेच नम्रपणे नमूद करू इच्छितो!!:))

विकास's picture

19 Apr 2008 - 7:22 pm | विकास

नमस्कार,

सर्व प्रथम आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी खाली आपल्या मुद्यांसंदर्भात प्रतिसाद देत असलो तरी तो व्यक्तिगत नाही. आपल्या प्रतिसादात आपण शेवटी म्हणालात की, "हां या नवीन पोपला दूषणे द्यायची असतील तर हा युनोचा प्रसंग विचारात घ्यायची गरज नाही. " तर मला हे पण स्पष्ट करावेसे वाटते की मी पोपच्या विरुद्ध लिहीलेले नाही, ख्रिस्तीधर्माच्या विरुद्ध पण लिहीलेले नाही. तो काय बोलतोय आणि त्याचे काय अर्थ लावायचे हा त्याचा आणि त्यांच्या फॉलोअर्सचा प्रश्न आहे. त्याचे त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. कोणी कुठली श्रद्धा ठेवावी अथवा न ठेवावी याचे पण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असे मानतो आणि म्हणूनच कोणी कुणाच्याच, कुठल्याच धर्माला जो पर्यंत तेथे इतरांचा द्वेष येत नाही तो पर्यंत बोलू नये/नावे ठेवू नये असे वाटते आणि तसाच इथे आणि जगात वावरतो.

मला सांगा की ऍट लीस्ट अमेरिकेत तरी (जो देश >९०% ख्रिस्ती आहे) त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी विचारांशिवाय आणखी कशाला प्रसिद्धी मिळणे प्राप्त होते?

सर्व प्रथम आपण हे कुठल्या संदर्भाने म्हणालात ते समजले नाही. पण प्यूच्या संशोधनाप्रमाणे अमेरिकन ख्रिश्चन हे ७८.५% आहेत त्यातील फक्त २३.९% स्वतःला कॅथलीक समजतात म्हणजे पोपचे धार्मिक नेतृत्व मानतात. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कच्या संशोधनाप्रमाणे , "the proportion of the population that can be classified as Christian has declined from eighty-six in 1990 to seventy-seven percent in 2001;". पण माझा मूळ मुद्दा हा अमेरिकेसंदर्भात नव्हता कारण बूश ने राष्ट्राध्यक्ष म्हणून कुणाला बोलवावे हा त्याचा प्रश्न आहे जरी एकाच धर्माला जर तो "अवाजवी" भाव देत असणे हे त्यांच्या घटनेप्रमाणे अयोग्य वाटले तरी. शिवाय आपण असेच भारतात हिंदूंना प्रसिद्धी मिळाली आणि कोणी हरकत घेतली तर म्हणाल का? प्रामाणिक उत्तर आहे नाही आणि तसे असणे (म्हणजे केवळ हिंदूंना हिंदू म्हणून प्रसिद्धी देणे) हे मला पण योग्य वाटणार नाही. पण तीच गोष्ट आपण अमेरिकेत अथवा इतर राष्ट्रांबाबत आणि अर्थातच इतर धर्मासंदर्भात सहज मान्य करता आणि त्यात काही गैर देखील आपल्याला वाटत नाही. आपण जर स्वतःला सेक्यूलर समजत असाल तर हा प्रामाणिक सेक्युलॅरीझम आहे का?

>>>...कारण एकदा पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून स्वीकारलं की त्याला का युनोसमोर भाषण करायची संधी का दिली हा प्रश्नच निकालात निघतो....<<

या संदर्भात मी आधी मुद्दा मांडला पण त्यावर आपण भाष्य केलेले नाही... तो असा की, "राष्ट्रप्रमुख म्हणून इतर कुठल्या राष्ट्रप्रमुखाला असे वेगळे बोलावले जाते, म्हणून पोप ला बोलवायचे?" अर्थातच नाही. सप्टेंबर मधे जनरल असेंब्लिचे (आमसभेचे) अधिवेशन असते त्यात सर्व राष्ट्राध्यक्षांना बोलावले जाते आणि काय जे बोलायचे ते बोलायची संधी मिळते, बाकी लाड नाहीत. म्हणून आपण जरी युनो ही लोकशाही मानणारी संस्था म्हणत असलात (आणि तशी ती बर्‍यापैकी वादातित मुद्यांपुरती आहे पण) तरी असे विशेष महत्व एका धार्मिक व्यक्तिस देणे हे ना धड सेक्यूलर की लोकशाही तत्वात बसणारे.

आपण जर धर्माबद्द्ल किंवा धर्माविरूद्ध बोलला नव्हतात तर "कॅथलिक सिस्टीम" या शब्दप्रयोगामागील आपल्याला अपेक्षित अर्थ काय होता? आर्थिक, राजकीय, वा सामाजिक संस्थान?

त्याचे उत्तर माझ्याच वाक्यात आहे नीट वाचले तर समजेलः "...ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते.." ब्रिट्नमधे प्रोटेस्टंट चर्च का तयार झाले? तर इटालीतील रोम मधील एक व्यक्ती धर्माच्या नावाखाली राज्यावर ढवळाढवळ करायला लागली म्हणून. आज ब्रिटीश आणि अनेक अमेरिकन्स हे प्रोटेस्टंट आहेत कॅथलीक नाहीत. याचा अर्थ ते त्यांच्या त्यांच्या देशातील चर्च संस्थेशी संलग्न आहेत. "कॅथलीक सिस्टीमशी" नाहीत. आणि जेथे असे आहे तिथे चांगले चालले आहे. पण त्या उलट एकच उदहरणार्थ पहा कॅथलीक चर्च मधील पाद्र्यांनी बॉस्टन भागात विशेषकरून (आणि तिथे ते बाहेर काढले गेले म्हणून) आणि इतरत्र अमेरिकेतही लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केले. अनेक वर्षे हा प्रकार चालला होता. याची कल्पना "कॅथलीक सिस्टीमला" होती पण त्यांनी ती व्यवस्थित दाबून ठेवली. स्वतःचे नाव वाचवायला त्याला प्रसिद्धी दिली नाही तरी समजू शकतो पण येथे तर अशा माहीत असलेल्या पाद्र्यांना मुलांच्यापासून दूर करण्या ऐवजी जवळच केले गेले...थोडक्यात स्वतःला देशाच्या कायच्यापेक्षा जास्त मोठे समजायला यांना काही वाटले नाही. आणि याच संबंध परत म्हणूनच ख्रिश्चॅनिटीपेक्षा "कॅथलीक सिस्टीमशी" आहे असे माझे म्हणणे आहे.

आणि आता आपला शेवटचा मुद्दा:

पण उगाचच या प्रसंगाबद्द्ल युनोला दोष देण्याने काही साधणार नाही असे माझे मत आहे!

हा काही एकच प्रसंग नाही आहे. एक उदाहरणः मी संपूर्ण बातमी देत नाही पण पर्यावरण बदलावरून जगभरच्या बिनसरकारी संस्थांच्या जागतीक आधिवेशनात युनोमधे गेल्या सप्टेंबरात खालील विशेष परीसंवाद होता:
Faith Responses to Climate Change -Focus will be on the Abrahamic traditions’ (Christian, Jewish, Muslim) evolution in ecological practice and theology, with enrichment by other religious traditions’ participants. Best practices and challenges will be shared.

वक्ते फक्त राबाय, कॅथलीक आणि इतर चर्चचे पाद्री, इमाम, नेटीव्ह अमेरिकन /कॅथलीक (ही वक्ती ५०/५०% होती) आणि मध्यपुर्वेतील म्हणून पारशी. अर्थातच हिंदू, बुद्ध (भारतीय धर्म) आणि कुठल्याच पुर्वेकडील परंपरांना बोलावणे नाही...वास्तवीक पर्यावरण हा विषय हा धर्मातीत आणि (असल्या पद्धतीच्या) राजकारण विरहीत असावा पण युनो मधे झालेला हा प्रसंग आहे...

मतितार्थः

मी चर्चा चालू करताना त्याच्या मागील उद्देश काय होता हे समजून घेतल्यास बरे होईल. उगाच कुणाबद्दल द्वेष पसरवायला अथवा फक्त आम्हीच (भारतीय/हिंदू आणि मीच!) शहाणे असे म्हणायचा काही उद्देश नव्हता. मला सर्वप्रकारचे मित्र आहेत आणि त्यांनापण मी मित्र वाटतो... फक्त राजकीय आणि जागतीक पातळीवर घडलेल्या घटनेचा मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता विश्लेषण करायचा आणि तो ही माझी ओळख (परकीयांच्या नजरेतून आयडेंटीटी या अर्थी) जी भारतीय/हिंदू आहे त्या नजरेतून केलेला हा प्रयत्न होता. यावर इतरांनी देखील विचार करताना त्यातील राजकारण आणि समाजकारण ह्यासंदर्भात केला असता तर बरे झाले असते. उगाच मला हिंदूत्ववादी म्हणल्याने माझे काहीच बिघडणार नाही पण स्वतःला चुकीचे विश्लेषण करण्याची सवय मात्र लागेल. आणि त्याचा परीणाम काय तर नजरेला सर्व जगच पिवळे दिसू लागेल! (शेवटचे वाक्य ह.घ्या.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2008 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोप बेनेडीक्ट यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भाषण केले ही बातमी तशी चर्चेचीच आहे. पोप यांनी मानवअधिकारावर आपले विचार मांडले, तेव्हा त्याकडे त्या व्यासपीठावर एकाच पंथाचा धर्मगुरु म्हणुन पाहिले की मग अनेक शंका निर्माण होतात, तसे होऊ नये असे माझे मत आहे. अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात त्याचे प्रवचन ठेवण्याची गरज का वाटली ? कारण त्या सभेतून जगभरात मानवतेचा संदेश पुढे ढकलायचा असावा ती काळाची गरज आहे म्हणुन तसे असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे, पण तसे असण्याची शक्यता फार कमी वाटते. आपल्या लोकांचे हितसंबध जोपासण्यासाठी त्यांना बोलावले असेल तर ते हितसंबध कोणते ते आम्हाला तरी माहित नाही. त्याचवेळी माझ्या मनात अशी कल्पना आली की उद्या त्यांनी शंकराचार्यांना त्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली आणि जगभरात पोहचेल असा संदेश द्यायचा आहे तर ते कोणता विचार बोलून दाखवतील, पारंपारिक विचाराशिवाय ते पुढे जाणार नाही असे वाटते. मात्र उद्या जगातील सर्व धर्मगुरुंनी एक वैश्विक विचार मानवाच्या हितासाठी, विचार मांडण्यासाठी असे मोठे विचारपीठ मिळत असेल तर संयुक्त राष्ट्राच्या अशा धोरणाचे मी नक्की स्वागत करेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास's picture

19 Apr 2008 - 11:16 am | विकास

>>>त्याचवेळी माझ्या मनात अशी कल्पना आली की उद्या त्यांनी शंकराचार्यांना त्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली आणि जगभरात पोहचेल असा संदेश द्यायचा आहे तर ते कोणता विचार बोलून दाखवतील, पारंपारिक विचाराशिवाय ते पुढे जाणार नाही असे वाटते.

हे मान्यच आहे.

पण आधी म्हणल्याप्रमाणे मी केवळ हिंदूंसंदर्भात म्हणले नव्हते तर एकंदरीतच एका "हेड ऑफ स्टेटला" बोलवायचे पण प्रसिद्धी मिळताना मात्र धर्मगुरू म्हणून देयची याबद्दल होते. युएन सारख्या संस्थेला ते शोभत नाही. विचार करा जगात मतदानाचा हक्क असलेले किती हेड्स ऑफ स्टेट्स आहेत (व्हॅटीकन ला मतदानाचा हक्क नाही आहे - नॉन व्होटींग मेंबर) आणि त्यातील किती जणांना अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि प्रसिद्धी मिळते?

विजुभाऊ's picture

21 Apr 2008 - 4:45 pm | विजुभाऊ

एक शंका आहे.
विवेकानन्द ज्या सर्वधर्म परिषदेला गेले होते तशी सर्वधर्म परिषद त्या नन्तर पुन्हा कधी झालीच नाहीका? आणि झाली असल्यास त्यांचे फलीत काय?
बाकी एक खरे ;गालीब म्हणाला होता की " दिल बेहलाने के लिये ये खयाल अच्छा है गलिब"
धर्म हे वेळ घालवण्याचे उत्तम साधन आहे.

विकास's picture

21 Apr 2008 - 6:13 pm | विकास

>>>विवेकानन्द ज्या सर्वधर्म परिषदेला गेले होते तशी सर्वधर्म परिषद त्या नन्तर पुन्हा कधी झालीच नाहीका?

आपण प्रश्न विचारला म्हणून शोधले तर तशा परिषदा होतात असे दिसतयं. कदाचीत परीषदा होत असाव्यात पण कुठल्याच धर्मात तसा विवेकानंद परत तयार होऊ शकला नाही त्यामुळे त्या गाजल्या देखील नाहीत....हा विकीचा दुवा आणि हा सर्वधर्मपरीषदेचा.

तरी देखील एक प्रथा झाली असावी...आता २००९ ची मेलबोर्नला आहे. आपण म्हणता तसे धर्म हे वेळ घालवायचे (वन ऑफ द) उत्तम साधन असेल ही. ज्याला जसा वेळ घालवायचा आहे तसा त्याला घालवण्यात काही हरकत नसावी. पण कुठल्याही धर्माबाबत, धर्मसंस्था अथवा धर्मसत्ता जेंव्हा चालू होते तेंव्हा सगळे प्रश्न चालू होतात. मग ते खरे धर्मस्वातंत्र्य पण नसते तर चार संस्था/मठांना जे हवे ते सामान्यांकडून करवून घेण्याचे मागितलेले स्वातंत्र्य असते. असो. हा भाग थोडा अवांतर झाला. पण असल्या धर्मपरीषदा ह्या बहुतांशी कुठल्याही इतर कॉन्फरन्सेस प्रमाणे अथवा हळदीकुंकवांप्रमाणे एकत्र येण्यासाठी, थोडे सोशलायजिंग, थोडे गॉसिप, थोडी आत्मप्रौढी यांनी भरलेल्या म्हणूनच असल्यावर थोडीशी अडचण वाटू शकणार्‍या पण नसल्यास परस्परातील संवादाचे साधन खुंटल्यामुळे खोळंबा होणार्‍या असाव्यात. बाकी काही नाही...