पट्टा उर्फ विश्रामगडावर.....

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
10 Oct 2010 - 11:58 am

नाशिकला एका खाजगी समारंभाचे बोलावणे आले व माझ्या डोक्यात बरेच दिवस मनात असलेला एक किल्ला करण्याचा प्लॅन भिरभिरू लागला. नाशिकला अर्थातच पुणे-मनमाड व्हाया नासिक रेल्वेनेच गेलो कारण २ घाटांतून दिसणारे सह्यपर्वताचे विलक्षण सौंदर्य. शनिवारी नाशिकला पोहोचलो. रविवारचा संध्याकाळचा समारोह आटोपला. तेव्हाच मामेभावाबरोबर सोमवार सकाळचा सिन्नर - घोटी दरम्यान असलेला पट्टा किल्ला पाहायाचा बेत आखून ठेवला. अर्थात इतरही गप्पागोष्टींबरोबर झालेल्या जागरणामुळे एकवेळ ट्रेक करणे रद्द करावे की काय असे वाटून गेले. पण किल्ला पाहायच्या ओढीमुळे आळसावर मात केली. दोघेही पहाटे लवकर उठलो व सात वाजता नासिक सोडले.
पट्टा उर्फ विश्रामगडावर जायचे मुख्यत्वे २ मार्ग आहेत. एक सिन्नर-ठाणगावमार्गे तर दुसरा घोटी-टाकेद मार्गे याशिवाय कडवा कॉलनी - निनावी -औंढ्या किल्ल्यावरून येणारा खास डोंगरभटक्यांचा तिसरा मार्गही आहेच.

अर्ध्या तासातच सिन्नरला पोहोचलो. उजवीकडे राजूर-भंडारदरा रस्त्याला लागून लगेचच डावीकडे डुबेरवाडीच्या दिशेने वळलो. कातळभिंतींचा डुबेरगड लक्षवेधी होता. आता उजवीकडे पवनचक्क्या दिसायला लागल्या होत्या.

एक छोटासा घाट चढून वरच्या पठारावर आलो. तिथून ठाणगावला पोहोचलो. इथून पुढे साधारण १०/१२ किमीवर पट्टावाडी हे पट्ट्याच्या पायथ्याचे गाव आहे. ठाणगावपासून पुढे रस्ता कच्चाच आहे पण खडबडीत मात्र नाही. असंख्य लहानमोठी पठारे ओलांडून जावे लागते.
ठाणगाव पर्यंत रूक्ष असलेला रस्ता एकदम आपले रोप बदलू लागला होता. चहुकडे झाडी, तेरड्याच्या जांभळ्या, सोनकीच्या पिवळ्याजर्द सोनेरी फुलांची पखरण सगळीकडे झाली होती. अशातच समोर पट्टा किल्ल्याची भव्य कातळभिंत समोर दिसू लागली. त्यापाठोपाठ पट्ट्यामागून उसळणारे ढगही. लांबूनच थेट किल्ल्यावर जाणारी ठळक वाट दिसत होती.

पट्टावाडीत पोचलो. गाडी थेट किल्ल्याच्या पायथ्यालाच लावली. सुरुवातीलाच एक तोफ बसवली आहे. व थोडे बाजूला एका झाडाखाली काही मुर्त्यांचे अवशेष आहेत. किल्ला चढायला सुरुवात केली वाट अत्यंत सोपी आहे. १५ मिनिटातच एका बुरुजापाशी पोहोचलो. हडसरच्या बुरजाशी साध्यर्म असलेला हा बुरुज आहे. इथून डावीकडे २ खोदीव गुहा आहेत. गुहांच्या वरील बाजूस शिवनेरीच्या गंगा-जमुना टाक्यांप्रमाणेच असलेली पाण्याची खोदीव टाकी आहेत. गुहा आणि टाक्यांची बांधणी पाहून हा किल्ला सातवाहनकाळातील असावा हे सहजच समजते. जालन्याची लूट घेउन येतांना शिवाजी महाराजांनी पट्टा किल्यावर मुक्काम केल्याची नोंद आहे. म्हणूनच ह्या किल्ल्याला 'विश्रामगड' असेही सार्थ नाव दिलेले आहे.
पट्टा हा कळसूबाई रांगेच्या एका सलग अतिशय प्रचंड पठारावर वसलेला आहे. याच रांगेत पश्चिमेकडे अलंग, कुलंग, मदन, असे अभेद्य किल्ले आहेत.कळसूबाईचे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर आहे. व पुर्वेकडे बितनगड, पट्टा, औंढ्या असे तालेवार किल्ले आहेत.


तर गुहांवरून उजवीकडून वर चढत गेलो. वाटेवर परत कमानदार खोदीव गुहेचे बांधकाम आहे. त्यात अष्टभुजा देवीची स्थापना केलेली आहे.

तिथून थोडे वर चढताच अनपेक्षितपणे एक अप्रतिम दरवाजा समोर आला. पुर्णपणे कमान शाबूत असलेला हा दरवाजा हा औंढ्या किल्ल्याकडून येणार्‍या वाटेवर आहे. दरवाजाच्या बाजूलाच बुरुजही आहे. व त्याबाजूलाच थोडे पुढे तटबंदीचे अवशेष दिसतात.


अजून थोडे वर चढून आम्ही वरच्या पठारावर आलो. व किल्ल्याचे एक आतापर्यंत न दिसणारे नवीनच रूप डोळ्यांसमोर आले. अगदी प्रचंड मोठे लांबचलांब पठार 'पट्टा' नावाची सार्थकता पटवून देत होते. अगदी दूरवर किल्ल्याच्या तटबंदीचे बांधकामही दिसत होते. सर्वत्र हिरवाई पसरली होती. मध्ये मध्ये सोनकीचे ताटवेच्या ताटवे होते.

अजूनही एक छोटासा उंचवटा ओलांडून आम्ही किल्ल्याच्या पुढल्या पठारावर पोहोचलो. आता समोरच एक अतिशय सुरेख अशी इमारत दिसली. झुडपांतून वाट काढतच इमारतीपाशी पोहोचलो. इमारतीच्या भिंती व छप्पर अजूनही शिल्लक आहे. इमारत बरीच लांबरूंद आहे. आत शिरायला पुढून एक मोठा दरवाजा, मध्ये एक व पाठीमागे डावीउजवीकडे एक एक असे एकूण चार दरवाजे आहेत. इमारतीमध्ये आतील कमानी कमानींचे बांधकाल इस्लामिक स्थापत्यशैलीची ओळख पटवून देत होते.
इमारतीतून मागच्या दरवाजाने बाहेर पडलो. बाहेर पडताच गवतातून भावाच्या पायावरून २ फूट लांबीचा साप वळवळत गेला. दचकून त्याने उडी मारल्याने २/३ दगड उडाले ते शेजारीच असलेल्या कातळावर पडले व अचानक पोकळ असल्यासार्खा आवाज आला. आम्ही दगडाने कातळ ठोकून बघितला थोड्याश्या भागात कातळ आतून पुर्णपणे पोकळ असल्यासारखा घुमणारा आवाज येत होता. अनपेक्षितपणे दिसलेल्या ह्या निसर्गानवलामुळे आम्ही अचंबित झालो. व गवतातूनच पुढे निघालो.

आता मोठे मोठे ढग किल्ल्याच्या मागच्या बाजूला धडका देत होते. किल्ल्याच्या मागची बाजू म्हणजे एक तुटलेली अख्खी धारच आहे. थेट पलीकडच्या कोकणवाडीला हा सरळ तुटलेला लांबचलांब कडा भिडतो. तसेच कडेकडेने थोडे पुढे गेलो. तटबंदी होतीच. अशातच पुर्णपणे ढासळलेला व प्रचंड गवतामुळे वाट बंद झालेला एक भग्न दरवाजा सामोरा आला. आताशी वाट मात्र तो दरवाजा टाळून थोडी पुढे काढली आहे. ही वाट पलीकडे असलेल्या कोकणवाडीत उतरते.

पट्ट्याचे लांबच लांब पठार-

अजून थोडे पुढे जाताच माकडांची एक मोठी झुंड लांबच्या एक कड्यावर दिसली. मर्कटे जास्त व मनुष्य दोघेच असल्याने आम्ही त्यांना टाळून परतीच्या मार्गाने उतरायला सुरुवात केली.

अर्ध्या तासातच गुहांपाशी आलो. व तिथून १० मिनिटातच पायथ्याला आलो. उतरता उतरताच नासिकला टाकेद-घोटी मार्गे जायचा खल झाला होता. आता पावसाला सुरुवात झाली होती. गाडी चालू केली. किल्ल्याला वळसा मारून पलीकडच्या कोकणवाडीत आलो. इथून आता बर्‍याच पवनचक्क्या दिसत होत्या. उजवीकडे पट्याची भव्य कातळभिंत दिसत होती. आता थेट पवनचक्यांच्या पायथ्यालाच पोचलो. दुरून छोट्या दिसणार्‍या पवनचक्क्या प्रत्यक्षात किती प्रचंड आहेत हे नजरेस आले. निम्म्याअधिक अश्या त्या ढगांमध्ये गुरफटून गेल्या होत्या. तो परीसर पार करून आम्ही उजवीकडे वळलो. आता मोठा घाट चालू झाला होता. किल्ल्याचे मोठे पठार , त्याच्याखाली पवनचक्कीचे दुसरे पठार व त्याच्याखालचे अजून एक पठार उतरून आम्ही खाली पोहोचलो. प्रत्यक्ष पट्टावाडीपासून जेमतेम २५/३० मिनिटांची चढाई असलेला हा किल्ला एकावर एक असलेल्या पठारांमुळे समुद्रसपाटीपासून मात्र ४५०० फूट उंचावर आहे. त्यामुळे येथे कायमच आल्हाददायक हवामान असते.

आता धानोशी गावावरून आम्ही सर्वतीर्थ टाकेदला आलो, येथे रावण-जटायू युद्धा जटायूचा एक पंख पडल्याचे मानले जाते. येथे जटायू मंदिर आहे. बरोबरीनेच राममंदिर ही आहे. आजूबाजूला देवी, गणपती, शंकर व हनुमानाची मंदिरे आहेत. पवित्र कुंड ही आहे. सिंहस्थात येथे मोठी यात्रा भरते.

जटायू मंदिर -


दर्शन घेउन आम्ही निघालो. व घोटीवरून मुंबई-नासिक महामार्गाला लागलो. वाटेत ढाब्यावर जेवण घेतले व नासिक गाठले ते या पट्ट्याच्या आठवणी जागवतच.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

10 Oct 2010 - 12:51 pm | अप्पा जोगळेकर

सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन. तुम्ही खरोखरंच योग्य मोसमात गेलात. पाच वर्षांपूर्वी मी एप्रिल महिन्यात येथे गेलो होतो. सगळं नुसतं ओसाड. असा वैताग आला.

जिप्सी's picture

10 Oct 2010 - 4:24 pm | जिप्सी

वल्लीसो ! छान फोटो आणि वर्णन. आत्ता आत्ता तर ट्रेकचा मौसम चालू झालाय. भरपूर फिरा आणि लेख येउद्या !

२००७ साली मी औढा,पट्टा आणि बितनगड असा ट्रेक केलेला होता,पण त्यावेळी माझ्याकडं कॅमेरा नव्हता.त्यामुळ सध्या फोटोग्राफीसाठी परत केलेलेच ट्रेक परत करायला सुरुवात केलेली आहे.

पट्ट्याचा ईतिहास म्हणजे,१६ नोव्हे. १६७९ ला जालना लुटून महाराज परत येत होते,त्यावेळी मोगल सरदार रणमस्तखान त्यांच्या पाठलागावर होता,यावेळी महाराजांकडे अफाट लूट होती,आणि सैन्यही दमलेले होते.त्यावेळी बहीर्जी नाईकांनी महाराजांना पट्टा गडावर आणले.त्यावेळी महाराज १५ दिवस पट्ट्यावर मुक्कामाला होते. त्यावेळी महाराजांनी या गडाचे नाव 'विश्रामगड' असे ठेवले.

सूर्य's picture

10 Oct 2010 - 4:37 pm | सूर्य

मस्त वर्णन.

-सूर्य

मेघवेडा's picture

10 Oct 2010 - 6:08 pm | मेघवेडा

क्लास फोटो नि वर्णन! मजा आली!

विसोबा खेचर's picture

10 Oct 2010 - 7:38 pm | विसोबा खेचर

मस्तच फोटो..

तात्या.

गुंडोपंत's picture

11 Oct 2010 - 5:53 am | गुंडोपंत

सुंदर चित्रे - थोडा इतिहासपण द्या की....

simplyatin's picture

18 Oct 2010 - 4:16 pm | simplyatin

पुन्हा एकदा पट्ट्या ला जाउन आलो अस वाटल.

आम्ही निसर्ग गिरिभ्रमण तर्फे ३०-डिसेम्बर २००७ - ०१ जानेवारी २००८ च्या सह्याद्रि सायकल मोहिमेत आड-आवन्ध-पट्टा-बितन असा मार्ग क्रमित केला होता.

त्या वेळी ह्या ४ किल्ले केले होते. सगळ्या किल्ल्यान्च्या सर्वोच्च माथ्यावर सायकलि पोहोचल्या होत्या.

एक वेगळाच अनुभव होता. शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणारा प्रवास होता...

यतिन नामजोशी.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 6:05 pm | बिपिन कार्यकर्ते

!

वल्ली लैभारी फोटु आणि वर्णन रे.
विमुक्ताची आठवण झाली.
(विमुक्त कुठे हरवलाय सध्या?)

सुहास..'s picture

18 Oct 2010 - 6:47 pm | सुहास..

विमुक्ताची आठवण झाली.
(विमुक्त कुठे हरवलाय सध्या?) >>>

अगदी असेच म्हणतो ..

श्रावण मोडक's picture

18 Oct 2010 - 6:48 pm | श्रावण मोडक

लय भारी.