आज गणेशचतुर्थी. मिपाचा वर्धापन दिन. मिपावर मला येऊन एक वर्ष देखील झालं नाही. मिपाचा, किंवा एकंदरीत मराठी संस्थळांचा शोध लागला तेव्हा माझी वैयक्तिक स्थिती अतिशय वाईट होती. अजूनही ती पूर्णपणे सुधारली नाही, पण मिपामधून मला जो आधार मिळाला, मनात साचून राहिलेलं खूपसं लिहायला मिळालं, वाचायला मिळालं त्यामुळे ती सुसह्य झाली. आपल्या विशाल कुटुंबात मिपाने मला मोकळ्या हातांनी सामील करून घेतलं. माझं लेखन वाचलं, बरेवाईट प्रतिसाद दिले. नवीन लिहायला स्फूर्ती दिली. समधर्मी लोकांशी, मराठी भाषिकांशी सुसंवाद (कधी कधी नुसताच वाद) साधण्याची संधी दिली. त्याही पलिकडे जाऊन अनेक नाती जोडली गेली. सातासमुद्रापलिकडून नवीन ओळखी झाल्या. इतकंच नाही, तर माझ्या आसपास इतके धमाल लोक राहातात हे मिपाच्या कट्ट्यांमुळेच कळलं. खदाखदा हसणं, टिंगलटवाळ्या करणं, आश्चर्याने मुग्ध होणं, फोटो बघून सह्याद्रीत काल्पनिक सफरी करणं, चर्चांमध्ये समरसून तात्विक दणके देणं/घेणं, उत्तम कथा कविता वाचून भारावून जाणं, एखादा जिव्हारी लागणारा अनुभव किंवा कथा वाचून मन व्याकूळ होणं.... एवढ्याशा स्क्रीनमधून काय नाही मिळालं?
मिपाचे ऋण कसे व्यक्त करावे यासाठीच शब्द अपुरे पडतात.
या सगळ्या चान चान गोष्टींबरोबरच काही निरर्थक पण आनंददायी गोष्टीही मिळाल्या
- खरडवह्या उचकपाचक करण्याची सवय : हिच्याशिवाय मी इतकी वर्षं कसा जगलो कोण जाणे
- दशावतार (एकाच व्यक्तीच्या अनेक आयडी) बघण्याची संधी : हे खेळ माझ्यासाठी नवीनच
- एकोळीचे धागे, धाग्यांवर चर्चा, चर्चांवर कौल.... : या विश्वाची आत्माभिमुखताच दिसून येते.
- चूळ, मूळ, धूळ ... अशा विडंबनांचं खूळ!
- पुणेरी लोकांचं प्रचंड प्रेम :)
वगैरे वगैरे.
वर म्हटलं आहे त्याप्रमाणे मिपाचे ऋण व्यक्त करणं एवढंच मला करता येईल. मिपाचा परिवार वृद्धिंगत होतो आहे. तो असाच दिवसेंदिवस वाढत जावो ही इच्छा. मिपावर लेखन करणाऱ्यांना, वाचन करणाऱ्यांना, प्रतिसाद देणाऱ्यांना आणि हो मिपाच्या संपादक व व्यवस्थापकांनाही मनापासून शुभेच्छा. हे सगळे म्हणजेच मिपा (मिपाचा सर्व्हर सोडला तर)! या सगळ्यांची भरभराट होवो ही गणेशाकडे प्रार्थना.
आपणही आपले मिपाचे अनुभव खेळीमेळीने मांडावेत ही विनंती.
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 1:30 am | पाषाणभेद
मिसळपावला परिवाराला वर्धापन दिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
11 Sep 2010 - 1:47 am | अर्धवटराव
काय मस्त भावना मांडल्यात घासकडवीजी ! अगदी प्रातिनीधीक म्हणता येतील अश्या..
मलाहि मिपा ने भरभरुन दिलय. मनाच्या मोकळेपणासारखं स्वातंत्र्य नाहि.. आणि हे स्वातंत्र्य उपभोगायला (किमान माझ्यासाठी) मिपासारखं संस्थळ नाहि. निसर्गाच्या समस्त अद्भुत देणग्यांपैकी एक देणगी म्हणजे अभीव्यक्ती. या देणगीचं इतकं गोजीरं रूप मिपावर विलसतय कि आनंदाचे डोही आनंद तरंग.
मिपाला आणि मिपा परिवाराला मानाचा मुजरा !!
गणपतीबाप्पा मोरया !!!!!!!!
(मिपाकर) अर्धवटराव
11 Sep 2010 - 2:28 am | शुचि
प्रथम सर्व मिपाकरांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.
सुसंस्कृत, सभ्य, बेरकी, विनोदी, विक्षीप्त, टवाळ, कलंदर, भटके, मनस्वी, कलावंत, रसिक, विचारवंत, अभ्यासू इतक्या विविधतेने नटलेले मराठी लोक कुठे बरं भेटले असते मला?
इतक्या व्यासंगी लोकांत वावरणं या जन्मी मला तरी शक्य नव्हतं.
मला मिपा खूप आवडतं त्याची कारणं बरीच आहेत. पैकी एक म्हणजे विचारांना उत्तम खतपाणी देणार्या चर्चा इथे घडतात, मनाला निरोगी सूर्यप्रकाश देणारं मराठी साहीत्य वाचायला मिळतं. रोज सकाळी साहीत्य वाचलं की मनावर मळभ येत नाही, दिवस आनंदात जातो. माय मराठीशी परत नाळ जुळल्याचा अवर्णनीय आनंद लाभतो. अगदी आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटतं.
जेव्हा "मूर्त्या नाही रे मूर्ती चं अनेकवचन मूर्ती च असतं" असं कुणीतरी कुणाचा तरी कान पिळून सांगतं तेव्हा मला अगदी आनंदाचं भरतं येतं की नाही अजून माझी मराठी भाषा तिच्या शुचितेसह जिवंत आहे. "सबकुछ चलता है" असं अजून तरी झालेलं नाही आहे.
अनवट मराठी शब्द, संस्कृत नादमाधुर्य असलेले शब्द, ग्रामीण मराठी शब्द किती तरी प्रकारच्या मराठी सुंदर सुंदर शब्दांची फुलं इथे फुलतात. त्याहूनही सुंदर मनं हळूवार उलगडली जातात त्या शब्दा शब्दांतून, लेखांतून, कवितांतून ..... अस्सल १००% मर्हाटमोळी. प्रतिसादांतून स्वभावांचे कॅलिडोस्कोपिक नमुने दिसतात, प्रतिभा बहरते. नवीन माहीती कळते.
ही झाली काही कारणं मला मिपा आवडण्याची.
11 Sep 2010 - 2:42 am | प्राजु
गणपतीबाप्पा मोरया !!!!!!!!
सर्व मिपाकरांना वर्धापन दिनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा!!
11 Sep 2010 - 3:00 am | गणपा
आम्हाला काय गुर्जीवाणी चान चान लिहिता येत नाही.
पण त्यांनी आमच्या मनीचे बोलच रेखाटले असल्याने वेगळ काय लिहायच बर?
अडिच-दोन वर्षापुर्वी चुकुनच इथे आलो आणि इथलाच होउन राहीलो. शाळा सुटल्यावर मराठी लिहायची सवय एकदम तुटली आणि देश सोडल्यावर तर मराठी वाचनही बरच कमी झाल होत. बरेच वेळा एखाद पत्र लिहितानाही मिंग्रजीच लिहिल जायच. खोट नाही सांगत काही अक्षर आठवायची नाहीत कशी लिहितात ते.
आणि अश्यात मग एक दिवस इथे येउन थडकलो. इतक काही मराठीत वाचायला मिळाल. मराठीतुन टाईप करता येउ लागल. खुप बर वाटल. इकडे मिसळीतल्या अनेक पदार्थांसारखी वेग वेगळ्या चवीची/रंगाढंगाची माणसे भेटली. शक्यतो अबोल असणार्या मला जीवाभावाचे अनेक मित्र मिळाले. टिवल्या बावल्या करत कधी कुणाला टपली मारत वेळ मजेत जाउ लागला. चर्चांमध्ये भाग घेता येत नसला तरी वाचन मात्र राहुन जे काय चार ज्ञानाचे शिंतोडे उडायचे ते वेचु लागलो. हाणामार्या ही पाहील्या :) नुसत्या पाहिल्याच नाही तर कधी कधी हातही धुवुन घेतले ;)
देशापासुन लांब असुनही अगदी घरीच असल्या सारख वाटत.
मिपाला या तिसर्या वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा.
आणि मिपाला जन्माला घालणार्या तात्यांचे आभार.
11 Sep 2010 - 5:46 am | मीनल
मी अजून तरी फक्त म्हणजे फक्त मिपाचीच सभासद आहे.
अजून इतर स्थळे ही वाचते.ती ही मनापासून आवडतात. पण सभासदत्व घेतलं नाही.
मिपाला शुभेच्छा.
11 Sep 2010 - 6:45 am | नंदन
वर्धापनदिनाच्या मिपाला अनेक शुभेच्छा! कविता महाजनांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर फेसबुकसारख्या सुविधेबद्दल व्यक्त केलेले मत एकंदरीतच सार्या संकेतस्थळांना किंवा आंतरजालावरील संपर्कसाधनांना कमीअधिक प्रमाणात लागू पडावे -
11 Sep 2010 - 7:46 am | चतुरंग
घासूशेट तुमचेही मनोगत आवडले.
विचारांना व्यक्त व्हायला जागा मिळणे ही आजची मोठी गरज आहे. कुटुंबसंस्था आकसत चालल्याने आपले म्हणावे असे माणूस दुर्मिळ होत चालले आहे. मानसिक कोंडमारा हा सगळ्यात वाईट. भल्याबुर्या विचारांना वाट मिळाली नाही तर त्याचे चित्रविचित्र परिणाम व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यात दिसल्याखेरीज राहत नाहीत.
इतकेच नव्हे तर आपण लिहू शकतो आपले विचार लोकांना आवडू शकतात हे तरी आपल्याला एरवी कसे कळाले असते.
मी मिसळपावावर आलो त्याला जवळपास पावणेतीन वर्षे झाली. जालावरचे मित्र हे पाहतापाहता प्रत्यक्षातले मित्र कधी झाले ते समजलेही नाही. इतरत्र वावरताना जसे उणेअधिक असते तसेच इथेही असणार परंतु त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. जे काही जमेच्या बाजूला आहे ते प्रामुख्याने पाहावे असे आवर्जून सांगावेसे वाटते.
पुन्हा एकदा मिपाकरांचे आणि मिपा जन्माला घालणार्या तात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
(खूष)चतुरंग
11 Sep 2010 - 7:46 am | चतुरंग
घासूशेट तुमचेही मनोगत आवडले.
विचारांना व्यक्त व्हायला जागा मिळणे ही आजची मोठी गरज आहे. कुटुंबसंस्था आकसत चालल्याने आपले म्हणावे असे माणूस दुर्मिळ होत चालले आहे. मानसिक कोंडमारा हा सगळ्यात वाईट. भल्याबुर्या विचारांना वाट मिळाली नाही तर त्याचे चित्रविचित्र परिणाम व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यात दिसल्याखेरीज राहत नाहीत.
इतकेच नव्हे तर आपण लिहू शकतो आपले विचार लोकांना आवडू शकतात हे तरी आपल्याला एरवी कसे कळाले असते.
मी मिसळपावावर आलो त्याला जवळपास पावणेतीन वर्षे झाली. जालावरचे मित्र हे पाहतापाहता प्रत्यक्षातले मित्र कधी झाले ते समजलेही नाही. इतरत्र वावरताना जसे उणेअधिक असते तसेच इथेही असणार परंतु त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. जे काही जमेच्या बाजूला आहे ते प्रामुख्याने पाहावे असे आवर्जून सांगावेसे वाटते.
पुन्हा एकदा मिपाकरांचे आणि मिपा जन्माला घालणार्या तात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
(खूष)चतुरंग
11 Sep 2010 - 7:07 am | सूड
गुर्जी छान लिहीलंय !!
मिपावर मी ही नवीनच, पण खरंच इथल्या चर्चा, काथ्याकूट, खर्डी, सदस्यांच्या कोट्या, लेख असे काही अगदी वाचनीय तर काही निव्वळ टाईमपास पण तरीही आनंददायी अनुभवले.
मिपाला व मिपाच्या परिवाराला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !!
11 Sep 2010 - 7:18 am | मराठमोळा
मिपाला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा!!!
आणि गुर्जी,
मस्त मनमोकळा लेख!! :) एकदम आवडेश
मीसुद्धा मिपावर नविन आलो होतो तेव्हा आभार मिपा व मिपाकरांचे कविता लिहिली होती.
11 Sep 2010 - 8:55 am | विदेश
श्री गणेशागमनानिमित्त व मिपा-वर्धापनदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
ग ण प ती बा प्पा ..
मो र या !
11 Sep 2010 - 9:11 am | निवेदिता-ताई
मिपा वर मी अगदी नवीन आहे, खुप छान आहे,
मिसळपाव परिवाराला वर्धापन दिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!
11 Sep 2010 - 9:57 am | दिपोटी
घासकडवीजी,
गणपती बाप्पा मोरया !
प्रकटन / मनोगत / आढावा सुंदरच आहे. त्यातील भावनांशी सहमत तर आहेच आहे.
वर काहींनी म्हटल्याप्रमाणे मिपाने बर्याच मंडळींना वाचते तर झालेच पण लिहिते सुध्दा केले आहे. अर्थात सर्वच धाग्यांशी व सर्वच प्रतिसादांशी आपण सर्व सहमत असूच असे नाही - किंबहुना मतवैविध्य टिकवण्याच्या दृष्टीने असे असणे बरे नाहीच - परंतु अशा वादविवादांतूनच संवाद साधला जातो हेही तितकेच खरे. मराठी संकेत-संस्थळे बरीच आहेत, पण मिपाची सर त्यांना नाही हे नि:संशय.
वर चतुरंगजींनी म्हटल्याप्रमाणे मिपाची जमेची बाजू बरीच मोठी आहे. मिपाने आजपावेतो दिलेल्या सर्वच अनुभवांबद्दल व आनंदांबद्दल आजच्या वर्धापनदिनी मिपाचे व त्याबरोबरच तात्यांचे / नीलकांतचे / संपादक मंडळाचे आभार व अभिनंदन !
अर्थातच मिपाच्या या अखंड वाटचालीमध्ये मुसु / धनंजय / प्रियाली / विकास / चतुरंग / चिंतातुरजंतू / विसोबा खेचर / घासकडवी / रामदास / एडी जोशी या व अशा अनेक सिध्दहस्त लेखक-लेखिकांचा देखील मोलाचा वाटा आहे. तेव्हा या सर्व लेखक-लेखिकांचे सुध्दा आभार व अभिनंदन !
- दिपोटी
11 Sep 2010 - 9:21 am | विंजिनेर
गुड! मिपा छान आहेच. अगदी त्यातल्या सगळ्या बर्या वाईट गोष्टींसकट!
पण पुणेरी लोकांवरचं तुमचं प्रेम आणि त्यांचा आवर्जून उल्लेख पाहून मन उचंबळून आलंय ;)
11 Sep 2010 - 9:39 am | नितिन थत्ते
घासकडवी यांच्या भावनेशी सहमत आहे. माझे जालीय जीवन (असे म्हणण्याइतके काही ते समृद्ध नाहीये) मिपापासून सुरू झाले. बिपिन कार्यकर्त्यांच्या एका मेलमुळे दीड पावणेदोन वर्षांपूर्वी माझी मिपाशी ओळख झाली.
त्या आधी ऑर्कूटचा सदस्य झालो होतो. त्यावरही काही फोरम, थ्रेड वगैरे असतात. पण त्यात सामील होऊन लिहावे असे कधी मनापासून वाटले नव्हते.
मिपा कसे आहे हे पहिल्या दहा मिनिटातच कळल्यासारखे वाटले आणि लगेच सदस्य झालो. [आमच्या वेळी ;) लगेच सदस्यत्व मिळत असे. :) ]
हळूहळू रुळत गेलो. पहिल्यापहिल्यांदा टंकनाची अडचण येत असे. तेव्हा जमेल तसे टंकून कंसात 'हे कसे लिहायचे' अशी कॉमेंट टाकायचो. १०-१५ मिनिटात खरड यायची आणि उत्तर मिळायचे. आणि खरड पाठवणारा ओळखीचाच असायचा असे नाही. मदतीला सगळेच तत्पर!!
या काळात काही अप्रिय प्रसंग आले तेव्हा 'दहा आकडे मोजण्या'चा [काही दिवस लेखन न करण्याचा] उपाय केला आणि परत सक्रिय झालो. येथून निघून जायची इच्छा कधी होईल असे वाटत नाही.
पुढील वाटचालीसाठी मिपा आणि मिपाकरांना सदिच्छा.
दहा आकडे मोजण्याचा उपाय सर्वांनी करण्यासारखा आहे असा माझ्यातर्फे मिपाकरांना सल्ला !!!!!!
इतर भारतीय भाषांमध्ये अश्या साईट्स आहेत की नाही याची कल्पना नाही.
11 Sep 2010 - 9:43 am | मदनबाण
सर्व मिपाकर मंडळींना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... :)
11 Sep 2010 - 9:47 am | इन्द्र्राज पवार
"पण मिपामधून मला जो आधार मिळाला, मनात साचून राहिलेलं खूपसं लिहायला मिळालं, वाचायला मिळालं त्यामुळे ती सुसह्य झाली."
~~ श्री.राजेश घासकडवी यांच्या भावनाप्रधान लेखातील वरील वाक्य हे जसेच्यातसे माझेदेखील आहे (अनेकांचे असू शकेल...). मी तर श्री.घासकडवी यांच्यापेक्षाही इथे नवीन, पण सदस्यत्व घेतलेल्या दिवसापासून (थॅक्स टु श्री.मुक्त सुनीत) इथल्यांनी मला आपल्यातीलच करून घेतले. पहिला आठवडा घडामोडी कशा उलगडल्या जातात, धागा देण्याची पध्दत, प्रतिसादात प्रकटला जाणारा अभ्यास, विषयांची गटवारी, सभासदांत प्रकर्षाने दिसून येत असलेली आपलेपणाची भावना, खेळकरपणा, हे पाहण्यात/नोंदण्यात गेला; आणि ज्या दिवशी प्रतिसादाद्वारे इथे प्रवेश केला त्या दिवशीच 'तो' आवडल्याबद्दल लागोपाठ दोन खरडी आल्या, हा प्रकार मला सर्वस्वी नवीन होता. शिवाय राज्यापासून दूर राहणार्या माझ्यासारख्याला 'मिसळपाव' हा फारच जिवलग मित्र झाला. इतका की, त्या भागातील अन्य भाषिक मित्र मला माझ्या या "वाढत्या व्यसना" बद्दल नावेही ठेवू लागली. [अगदी गेल्या आठवड्यात "यमुना" नदीला आलेल्या पुरामुळे एका छोट्या गावात चार मित्रांसमवेत २० तासापेक्षा जास्त काळ, ट्रॅफिक जाम/रस्ता खचणे यामुळे अडकलो होतो, बाकीचे अपरिहार्यतेमुळे थांबावे लागल्यामुळे वैतागले होते, पण माझ्या सोबतीला 'मिसळपाव' असल्याने अगदी आरामशीरपणे आवडीच्या विषयांवर प्रतिसाद देत/वाचत बसलो....हा एक वेगळाच आनंद].
"त्याही पलिकडे जाऊन अनेक नाती जोडली गेली. सातासमुद्रापलिकडून नवीन ओळखी झाल्या."
~~ हा अनुभव मला याहू आणि रेडिफ या दोन इंग्लिश प्लॅटफॉर्मवरूनदेखील मिळालेला आहे आणि तिथूनही मैत्रीचे बंध घट्ट झालेले आहेतच, पण 'मिसळपाव' माध्यमातून जी "घरची" मंडळी मिळाली आहेत त्याबद्दल तर मी फार कृतज्ञ आहे.
'मराठी नेटताई मराठी नेटभावा'ची जी हक्काने थट्टा करते त्याची गोडी विलक्षण आहे आणि त्याचे सर्वश्री श्रेय 'मिसळपाव' ला जाते हे निर्विवाद सत्य आहे !
वर्धापनदिनानिमित्य मिसळपावचे संस्थापक, संपादक मंडळ आणि सर्व सदस्य तसेच त्यांचे कुटुंबिय यांच्यावर श्री गणेशाचा वरदहस्त असाच राहो, ही मंगलमूर्तीसमोर प्रार्थना !
इन्द्रा
11 Sep 2010 - 9:49 am | सहज
विघ्नहर्ता सर्वांची दु:खे दूर करो. मुख्य म्हणजे मिपाच्या बाहेरचे आयुष्य देखील समृद्ध करो. :-)
11 Sep 2010 - 10:04 pm | प्रभो
सहजरावांसारखेच म्हणतो.... :)
11 Sep 2010 - 10:06 am | दशानन
:)
मी अगदी सुरवातीच्या दिवसापासून मिपा पाहतो आहे, अगदी तिकडे चर्चा चालू झाली तेव्हा पासून. माझा पहिला आयडी होता बिल्ला नंबर ९७ !
मिपाने काय नाही दिले. सर्वात आधी माझे मराठी प्रचंड सुधारले ;) ( नाही आधी मी काही लिहले की लोक विचारायची अरे हे हिंदीत आहे की मराठीत =)) ) असो. आता देखील खुप सुधारले आहे असे नाही पण ओके आधी पेक्षा कितीतरी बरे आहे आता.
मित्राचा जो गोतावळा येथे मिळाला त्या बद्दल तर मी तात्याचा शतः शतः ऋणी आहे. मित्रांची ओळख वाईट प्रसंगात सर्वात जास्त नीट पध्दतीने होते असे म्हणतात, चांगल्या वाईट प्रसंगी अनेक मिपा-मित्र पाठीशी उभे राहिले ह्याची जाण आहेच मला. ( धडपड्या असल्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणींना अनेकवेळा माझ्या मागे उभे राहावे लागले ही गोष्ट अलहिदा ;) ज्यांना शक्य असायचे ते समोरासमोर मदतीसाठी दोन्ही हात घेउन उभे राहीले व ज्यांना शक्य नव्हते त्यांनी कसे ही करुन फोनद्वारे, ईमेल द्वारे, चॅटवर मला अनेक वेळा मानसिक आधार दिला. काही मित्रांबरोबर घरच्या सारखे संबध निर्माण झाले ह्यातच सर्व काही आले.
कोणाची नावे घ्यावी व कोणाची नाही ? म्हणून एकाचे ही नाव घेत नाही आहे पण वर जे त्यांच्यासाठी हे लिहले आहे त्यांना नक्कीच समजेल.
मिसळपावला परिवाराला वर्धापन दिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
आपलाच,
जैनाचे कार्टे / || राजे || व सध्या दशानन !
(डु आयडी नाही आहेत रे हे ;) खरोखरचे आयडी होते , पहिला आयडी बळी पडला होता ११/०८ ला. व आताच राजे हा आयडीचे नाव बदलुन दशानन घेतले आहे.)
11 Sep 2010 - 11:35 am | jaypal
लेखाशी अणि प्रतिसाद कर्त्यांच्या प्रतिसादाशी १०००००००००००........% सहमत.
मला तरी मिपा एक कालाईडोस्कोप वाटतो क्षणाक्षणाला वेगळ चित्र ,एक वेगळा आकार आणि वेगळा रंग
मिपा संस्थापक तात्या, निलकांत आणि आताचे संपादक मंडळ यांचे मनःपुर्वक धन्यवाद.
मिपाला पुढील यशस्वी वाटचालिस लक्ष,लक्ष शुभेच्छा
मिपा
11 Sep 2010 - 11:56 am | विसोबा खेचर
म्हटलं तर 'मिसळपाव' हा वास्तविक मला आणि सर्वांनाच आवडणारा एक पदार्थ..
कसं सुचलं, हे आता सांगू शकणार नाही परंतु संकेतस्थळाला 'मिसळपाव' हेच नांव द्यावं असं मनापासून वाटत होतं.. मनामनातलं प्रेम, लोभ, आदर, मोह, माया, मस्तर, आपुलकी, मतंमतातरं..इत्यादी सार्यांची एक मिसळच ही! :)
आजच्या घडीला खाद्यपदार्थांच्या दुनियेत 'मिसळपाव' हे एक आकर्षक नाव तर आहेच परंतु मराठी संस्थळांच्या आणि पर्यायाने मराठी संस्कृती, सारस्वताच्या दुनियेतही 'मिसळपाव' हे नाव (आणि पर्यायाने हा पदार्थही :) ) आता लोकप्रिय झाले आहे याचा आनंद वाटतो..
मिपाला जिवापाड जपणार्या नीलकांताचे अन् त्याच्या सार्या टीमचे, मिपाच्या सर्व सभासदांचे, वाचकांचे आणि हितचिंतकांचे मनापासून अभिनंदन, आभार व शुभेच्छा..
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
संस्थापक, मिसळपाव डॉट कॉम.
11 Sep 2010 - 11:57 am | अविनाशकुलकर्णी
मिसळपावला परिवाराला वर्धापन दिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा
11 Sep 2010 - 12:00 pm | प्रकाश घाटपांडे
या निमित्ताने आम्हाला आनंद घारे यांचे मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख प्रकर्षाने आठवला.
मिपाला शुभेच्छा देताना प्रत्येकाचे आपल्या मिपावरील अस्तित्वाचे आत्मपरिक्षण नकळत होईलच.
मिपावरील लेखन हे उर्मट व असंवेदनशील होण्या ऐवजी संवादी व मतभिन्नतेचा आदर करणारे होवो ही या निमित्ताने सदिच्छा
11 Sep 2010 - 12:32 pm | दाद
लेखाशी अणि प्रतिसाद कर्त्यांच्या प्रतिसादाशी सहमत !
मिसळपावला परिवाराला वर्धापन दिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा
11 Sep 2010 - 12:34 pm | आनंदयात्री
मिपा वर्धापनदिनाच्या समस्त मिपाकरांना शुभेच्छा आणि मिपाची मुहुर्तमेढ रोवणार्या तात्यांचे अनेक आभार.
इतके सुंदर मनोगत लिहिणार्या धागालेखकाचे आणि अनेक प्रतिसादकांचे (जसे इंद्रा) ही आभार !!
तर मिपाकरांनो होउन जाउद्या जल्लोश साला !!
येsssssssssss
धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड ..
तत्तड तत्तड .. तत्तड तत्तड ..
धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड ..
!!
11 Sep 2010 - 1:10 pm | क्लिंटन
मी मिपाचा अगदी पहिल्या दिवसापासूनचा सदस्य आहे.अनेकदा इतर कामांमुळे मिपावर वरचेवर लिहिता येत नाही पण गेल्या तीन वर्षांत मिपा हा एक दैनंदिन जीवनाचा घटकच बनला आहे. अनेकविध विषय असे असतात की त्याविषयी वाचले की पहिला विचार मनात येतो की याविषयी मिपावर काही लिहिता येईल का?काही वेळा ते लिहिणे शक्य होते तर काही वेळा नाही पण मिपाविषयीची आपुलकी मात्र वाढतच जाते.
मिपाच्या वर्धापनदिनाबद्दल सर्व मिपाकरांना शुभेच्छा.असे नितांतसुंदर मराठी संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल तात्यांना, तांत्रिक गोष्टी बघणाऱ्या नीलकांतला आणि मिपा समर्थपणे सांभाळणाऱ्या संपादकांना मन:पूर्वक धन्यवाद.
(जगात कुठेही असेल तरी मिपावर यायची इच्छा असलेला) क्लिंटन
11 Sep 2010 - 1:10 pm | प्रभाकर कुळ्कर्णी
सर्व मिपाकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. “मिसळपाव.कॉम” च्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तात्या अभ्यंकर उर्फ़ विसोबा खेचर द ग्रेट जिंदाबाद! रोशनी पुर्न होवून जावू द्या राव लवकर.
11 Sep 2010 - 4:51 pm | प्रियाली
मिपाचे अभिनंदन! सध्या इतरांचे प्रतिसाद वाचायला वेळ नाही. ;) आंब्याचे मोदक बनवायचे आहेत.
तूर्तास तीन वर्षांपूर्वी मिसळपावच्या उद्घाटनाचा हा लेख सर्वांनी नजरेतून घालावा. असंच आपलं भूतकाळातील आठवणींना उजाळा. ;)
11 Sep 2010 - 7:41 pm | अमोल खरे
मला खुप मदत झाली आहे मिपा ची. अतिशय सुंदर संकेतस्थळ आहे. थँक्स तात्या.
11 Sep 2010 - 10:00 pm | अबोल
मिसळपावला परिवाराला वर्धापन दिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा.
त्याचबरोबर मिसळपाव परिवार असे अनेक वर्धापन दिन साजरे करो हिच श्रीगणेशापाशी प्रार्थना
11 Sep 2010 - 11:12 pm | चित्रा
आणि समस्त मिपाकरांना यानिमित्ताने शुभेच्छा! मिपाची उत्तरोत्तर प्रगतीच व्हावी, अशी इच्छा.
11 Sep 2010 - 11:18 pm | बिपिन कार्यकर्ते
साला या गुर्जीला एकदा फिक्स केला पाहिजे. माझा लेख स्वतःच्या आयडिने टाकला.
गंमत जाऊ द्या... पण मी लिहिले असते तर १००% हेच आणि असेच लिहिले असते. बस्स.
मिसळपाव सुरू करणारी टीम... तात्या, नीलकांत आणि त्यांच्याबरोबर असणारे इतर सदस्य... खुप उपकार आहेत सगळ्यांचे. मला व्यक्तिशः मिपाने खूप काही दिलं... जीवाभावाचे मित्र दिले, आयुष्यात अन्यथा यायची शक्यता नव्हती असे अनुभव दिले, मी दूर देशी एकाकी असताना आपुलकीने फोन करून जिव्हाळा दाखवणारी माणसं दिली... आज जगात अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथे अगदी रात्री अपरात्री पण हक्काने बिन्धास्त दार वाजवून 'मी आलोय' असं नि:संकोचपणे सांगू शकेन.
मिपा असेच वर्धिष्णु रहावे हीच सदिच्छा.
12 Sep 2010 - 12:05 am | प्रभो
मिपाशिवाय दिवस सरत नाही हेच खरं... :)
12 Sep 2010 - 12:41 am | सुनील
मिपाला अनेकानेक शुभेच्छा!!!
लोकांना (थोडेफारका होईना पण) आवडेल असे लिहिता येते, हा विश्वास मिपानेच दिला!
12 Sep 2010 - 3:12 am | पुष्करिणी
मिपा आणि मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा