माझे रिकामपणाचे उद्योग--पेपर क्विलिंग!!!!

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
3 Sep 2010 - 1:07 am

आमचे आधीचे रिकामपणाचे उद्योगः
१. ग्लासपेंटिग
२. बुकमार्क्स

सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते. पण भेटली, तेव्हा तिने नुसता एकच रूमाल न देता एक आख्खी पेपर बॅगच दिली. आणि मी आतल्या भेटवस्तू पाहायचं सोडून बॅगकडेच पाहात राहिले. कागदाच्या पातळ पट्ट्या नीट्सपणे कापलेल्या. आणि त्या पट्ट्यांची सुंदरशी पिवळी-तांबडी, पिवळी-निळसर फुले, हिरवीगार पाने अशी मस्त नक्षी. प्रत्येक फूल दिमाखात... आपलाच तोरा सांगणारं!!!

लगेच डोक्यात किडा वळवळला. पुढचे रिकामपणाचे उद्योग म्हणून जमण्यासारखे आहे. अगदीच किचकट नाहीए, पण पूर्वतयारीला वेळ चांगलाच लागेलसं काम दिसत होतं खरं. करायचे म्हटलं तरी त्याचा तेव्हा श्रीगणेशा झाला नाही तो नाहीच.

माझं घर तळमजल्यावरचं. खेळता खेळता तहान लागली म्हणून पाणी प्यायला येणार्‍या बाळगोपाळांचं हक्काचं. मग पाणी पिता पिता चॉकलेटस खायला, टॉम-ऍंड-जेरी पाहायलाही ही मंडळी रेंगाळू लागली. त्यातलीच एक आनंदिता. आहे आता पहिलीतच, पण जाम गोडुलं आणि पक्कं डॅंबीस ध्यान आहे. आली की हटूनच बसते. बिचारे आई-बाबा तिला विनवून थकतात, आणि ही त्या कारवारी कोंकणीत काय बोलते, त्यातले मला अर्धं कळतं, राहिलेलं डोक्यावरून जातं, पण हिला आणखी थोडावेळ सवलत मिळते. एकदा मी तिला आणि तिच्या आईला माझ्याकडचे बुकमार्क्स दिले. माझी परिक्षा जवळ आल्यावर मी तिला अभ्यास आहे असे सांगून घरी पिटाळले तर पठ्ठी परत आईला घेऊन हजर. दोघींनी मिळून माझ्यासाठी छानसे परीक्षेच्या शुभेच्छा देणारे ग्रीटिंग आणले होते. आत नांव आनंदिताचे असले तरी बनवलं आईनंच होतं.

एकदा मी कॉलेजमधून येतायेताच ती भेटली. सोबत येणार हे तसे ठरलेलंच. आल्या-आल्या तिची नजर पुस्तकाच्या कपाटावर भिरभिरली. “ये मेरी मम्मीको आता है.” हे तिचे वाक्य आणि पाठोपाठ “ताई आताच आलीय तिला त्रास देऊ नको” असे म्हणायला तिची आई. व्वा!!!! कावळा बसायला... आपलं बोलाफुलाला गाठ पडली. त्या म्हणाल्या,” अगं हे तर क्वीलिंग. गुगल कर ढीगभर नमुने सापडतील. क्वीलिंगचे किट मिळते. या पातळ पट्ट्या अशा कापाव्या लागत नाहीत, कापलेल्या आयत्या मिळतात”. म्हटलं ,चला, आळशी माणसाची सोय झाली”. लागलीच बाजारात जाऊन एकदम मोठाले हॅंडमेड कागद(माझीच पुस्तके बुकमार्क्सशिवाय तशीच पडलीयेत.. एखादा कुठेतरी सापडतोय आणि मग त्यालाच या पुस्तकातून त्या पुस्तकात नाचवतेय), रेशमी धागे, क्वीलिंग पेन, क्वीलिंगचे पॅड, दोन-तीन प्रकारच्या वेगवेगळ्या कापलेल्या पट्ट्या असे चांगले साताअठशे रूपये कागदावर उडवून आले. माझ्या त्या नेहमीच्या दुकानाचा मालक म्हणजे एक शितू सरमळकर आहे. येणारी निवडुंग-गुलाबे काही खरेदी न करता सगळं दुकान उचकटतात आणि हा त्याच तन्मयतेने सगळ्या आघाड्यांवर तोंड देत असतो. साहजिकच मला दहा रूपयांचे धागे घ्यायला कमीतकमी पंधरा मिनिटांचा वेळ द्यावा लागतो. म्हणून जे काही असेल ते एकाच वेळी घेतले की परत परत तिथे जायला नको. मग आल्यावर उत्साहात त्याच दिवशी दोनचार पट्ट्यांवर प्रयोग करूनही झाले. आधी त्या सुईला आरपार भेग आहे हेच नाही कळलं. त्या गुंडाळ्या जमेचनात. ते कधीतरी दुसर्‍या दिवशी लक्षात आले. पण कामाला मुहुर्त असा काही लागला नव्हता. काल मात्र झोपतानाच आज क्वीलिंगचा फडशा पाडायचा असे ठरवूनच झोपले.

हे असं असतं क्विलींगचे पेनः

त्यातल्या फटीत कागदाचे एक टोक अडकवायचे आणि मग हवे तसे हलके किंवा घट्ट हाताने गुंडाळ्या बनवायच्या. पट्ट्या या अशा मिळतातः

भल्या सकाळी(?) उठून मी सगळा पसारा पसरून त्या गराड्यात बसले. सुरूवात कुठून करावी हेच समजत नव्हते. कशावर करायचे, तेही नक्की होत नव्हते. बुकमार्क बनवू की ग्रीटिंग??? पुस्तकातली चित्रे बघून करू, की मी काही चित्रे डाऊनलोड केली आहेत ती बघू, की नव्याने चित्रे शोधू? त्यात त्या पट्ट्यांची जाडी, पोत, दर्जाही वेगवेगळा. त्यातल्या नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या चित्रासाठी योग्य ठरतील? हे सगळं कमी की काय म्हणून मधून मधून मिपा, फोन, चॅटिंग चालूच होतं. मग शेवटी एक पांढरा हॅंडमेड कागद घेतला. त्याची दोन ग्रीटिंग्ज करायची ठरवली. हातात कात्री आली की आधी चालवायची आणि नंतर “आई गं, हे काय झालं?” हे नेहमीचंच. (नशीब संपादक नाहीए मी). एका कागदात दोन भेटकार्डे जरा जास्तच मोठी वाटली म्हणून मी त्याची तीन केली होती. आता ती रूंदीला जास्तच कमी वाटू लागली. आता जो घोळ घालायचा तो यावरच घालू असा विचार करून बरीच चित्रे शोधून शोधून त्यातही थोड्या सुधारणा करून सोप्यात सोप्या प्रकरणाच्या वाटेला जायचे ठरवलं. मग चित्राबरहुकूम आकार बनवायला घेतले. आधी सोपे आणि पटकन होईलसे वाटणारं काम आता रंग दाखवत होते चांगलंच.

मग जरा वॉर्म-अप. आधी साध्या गुंडाळ्या. मग पुस्तकातली चित्रे पाहून पाहून त्यांना आकार दिले. घट्ट गुंडाळी केली की फूल, पाकळी, कळी जे काही असेल ते छोटे होत होते. म्हणून मग कधी घट्ट तर कधी हलक्या हाताने गुंडाळ्या करून , टोकं चिकटवून करून पाहिल्या. ते क्वीलिंग पॅड काही आवडलं नाही.. मग दिलं ठेवून सरळ बाजूला. बरं, हे सगळं करण्यात नीट लक्ष असावं की नाही? कुठले काय, जोडीला मिपा-फोन-चॅटिंग चालूच. मग काही लाक्षणिक प्रगती दिसेना. नुसत्याच गुंडाळ्या, कागद, कपटे, कात्र्या, आणि मध्ये मी आणि लॅपटॉप!!!!


फोटो खूपच छोटा आहे. काही विशेष केलेले नाहीए त्यात. एक गुंडाळी बनवायची आणि काही ठिकाणी हवा तितका दाब देऊन पान, बाण, पाकळी, डोळा असे आकार बनवायचे.

मग परत कंटाळा आला नुसत्याच भेंडोळ्यांचा. मग म्हटलं वेगळा आकार करून नुसतीच गुलाबाची फुले करावीत. पण हाय रे दुर्दैवा.. त्यासाठी कागद गोल कापायला हवा. वर्तुळ काढायला तर काहीच नव्हते माझ्याकडे. चालायचंच. आपल्याला अक्कल पाजळायला संधीच लागते ना!! पट्टीने मापे घेऊन सहा खुणा केल्या आणि काढलं वर्तुळ. हैच काय त्यात. मग आधी साध्या कागदावर प्रयोग केला. सारखे सारखे शितू सरमळकडे उगीच जायला लागायला नको म्हणून. करायचे काय होतं, तर दिलेल्या प्रमाणानुसार एक सहा इंच व्यासाचं वर्तुळ आखायचं, त्यात टोकापासून अर्धा इंचाचं स्पायरल वर्तुळ मध्यापर्यंत जाईल असे काढायचे आणि त्या स्पायरल रेषेवर कापायचे. आणि टोकापासून आतपर्यंत उलट्या बाजूने गुंडाळत यायचे. मग ते एखादी डिश सजवायला करतात तसे टोमॅटोच्या फुलासारखे दिसते. हे असे:

सराव तर झाला.. पण ते सहा इंचाचे फूल मोठे वाटत होते, अर्ध्या इंचाच्या पाकळ्या पण.. म्हणून मग आणखी लहान मापे घेतली आणि यावेळी थेट रंगीत कागदावर आकार कापला. आता आला का घोळ?? सरावाचा कागद साधा होता. हा एका बाजूने रंगीत आणि दुसर्‍या बाजूने पांढरा. आकार कापला पांढर्‍या बाजूने. पण टोकाकडून फुलाचा रंग दिसण्यासाठी नक्की गुंडाळायचा कसा?? त्यात सगळं लक्ष अदितीसोबत फोनवर खिदळण्यात. एक फुल आधी या बाजूने गुंडाळले, मग त्या बाजूने.. तरी पुढच्या फुलाच्या वेळी घोळ आहेच. शेवटी अदितीलाच सांगितले, “पुढच्या वेळी मी विचारले की सांग, पांढर्‍या बाजूने गुंडाळायचे म्हणून” आणि मग फोनवर बोलता बोलताच माझ्याकडे दोन पेपर बॅग्ज आहेत, त्यातली एक तुझ्यासाठी आणि दुसरी माझ्यासाठी म्हणून ठरवूनही झाले.

हुश्श!!! आता मांडामांड ठरवू लागले.. मनाजोगती जमेना. मग पुन्हा एकदा ब्रेक घेतला. मिपा रिफ्रेश केलं.. दोन वाजून गेले होते. पटापट सॅंड्विचेस बनवून खाऊन घेतली. आणि पटकन जशी सुचेल तशी फुले ठेवून बॅग बनवली!


(अदिती, आणखी एक फूल वाढवलं गं)

मग काही ग्रीटिंग कार्डस. तीही अशी तशीच नेटावरचे फोटो तसेच्या तसे वापरले असते पण गुंडाळ्या बनवायचा आळस केला आणि मग तयार कच्च्या मालातूनच सगळं साकार(!) केलं!

हे केशरी फूल आनंदिताच्या आईने बनवलेल्या कार्डवरती होते अगदी तस्संच आहे.

मग नुसतीच काही फुलं शिल्लक होती म्हणून माझी छोटुशी बचतबँक पण सजवून टाकली.

ही तर नुसती सुरूवात आहे. पहिलाच प्रयत्न. अवघड असे काहीच नाही. क्वीलिंगसाठी तयार पट्ट्या मिळतायत. आता कुणी तयार गुंडाळ्या देतं आहे का हे शोधेन!!!

टीपः घरातल्या कॅमेर्‍याने नुकताच राम म्हटलाय आणि मोबाईलच्या कॅमेरा लेन्समध्ये खंडीभर धूळ गेलीय. त्यामुळे गरजेपुरते फोटोज जालावरून घेतलेले आहेत. मी काढलेले फोटोज तितकेसे चांगले आले नाही आहेत. त्याबद्दल आधीच क्षमस्व!!!

कलाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अनामिक's picture

3 Sep 2010 - 1:12 am | अनामिक

काय मस्तं कला आहे ही... आणि तुझे उद्योगही छानच जमलेत!

चतुरंग's picture

3 Sep 2010 - 1:23 am | चतुरंग

पेपर किलिंग ...आपलं क्विलिंग, क्विलिंग छानच जमलय गं मके! ;)
मस्त दिसताहेत पिशव्या आणि कार्डं. पिशवी तर खूपच आवडली! :)

(खुद के साथ बातां : तरी बरं रंगा मकी संपादक नाहीये, नाहीतर उत्साहाच्या भरात स्वतःच्याच लेखाचा काही भाग उडवून शोधत बसली असती कुठे गेला म्हणून! ;) )

सुस्त बिलंदर

मस्त कलंदर's picture

3 Sep 2010 - 1:26 am | मस्त कलंदर

लहानपणी मी आणि माझा भाऊ राहत्या घराच्या खरेदीखतावरच्या नोटा कापून व्यापार-व्यापार खेळलो होतो. आईने चांगलेच रँडमली फटके दिले होते. तरी अजून सवय काही जात नाही. :)

चतुरंग's picture

3 Sep 2010 - 1:28 am | चतुरंग

संत तुकाराम सुद्धा एवढे निरिच्छ नसतील! ;)

(इच्छाधारी)चतुरंग

असुर's picture

3 Sep 2010 - 1:35 am | असुर

आवरा!! खरेदीखत??

__/\__ तोही साष्टांग! :-)

रँडमायझेशन अल्गोरिदम कधीच का चुकला नाही ते यातून कळतंय बरं!

क्विलींग मस्तच जमलंय की! पण जाम वेळखाऊ प्रकार वाटतोय! आणि अवघडसुद्धा!

--असुर

बापरे !
हे येरागबाळ्यांचे काम नव्हे ! म्हणजे माझ्यासारखीचे :))
वाचूनच दमले.
ए मला पण एक ग्रीटिंग दे न प्लीज..

शिल्पा ब's picture

3 Sep 2010 - 1:30 am | शिल्पा ब

मस्त फुलं आहेत.

गबोल वर ठरल्याप्रमाणे मी प्रतिसाद दिला नाही आहे... ;)

रेवती's picture

3 Sep 2010 - 1:37 am | रेवती

नविनच प्रकार पहायला मिळाला.
हे असं काही वाचलं कि लगेच करावसं वाटतं पण माझीच जुनी धुळ खात पडलेली कलाकुसर आठवत राहते.
'मक' मात्र उत्साही आहे. नेहमी काही ना काही चालू असतं!:)
सगळे प्रकार क्युट आहेत.

खूपच सुबक ...!!
मस्तच दिसतंय :)

जबरदस्त!!!
खूपच छान जमलंय गं मके!!

संदीप चित्रे's picture

3 Sep 2010 - 2:28 am | संदीप चित्रे

तू म्हणजे महान आत्मा आहेस !
आमचा रिकामपणाचा उद्योग म्हणजे डोळे मिटून ध्यान लावणे... ह्या आम्ही झोपा काढणे म्हणत नाही :)
रंग्या म्हणाला तसं 'संत तुकाराम'ही इतके निरिच्छ नसतील !

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 2:38 am | पुष्करिणी

मस्तच आहे, बॅग खूप आवडली.
ते पेन पण खूप आवडल मला
माझ्या अंगात कला आणि कुसर दोन्ही नसल्यान तयार गुंडाळ्या मिळाल्या तरी जमणार नाही मला.

क्रिएटिव्ह आहेस एक्दम.

इंटरनेटस्नेही's picture

3 Sep 2010 - 2:39 am | इंटरनेटस्नेही

खरचं सुंदर.. तुम्ही भाग्यवान आहात, देवाने तुम्हांला एक विशेष कला प्रदान केली आहे. :)

(आर्टिष्ट मंडळींबद्दल अत्यंत आदर असणारा)

भाग्यश्री's picture

3 Sep 2010 - 3:02 am | भाग्यश्री

प्रचंड आवडले!! सर्वच !!

चित्रा's picture

3 Sep 2010 - 3:24 am | चित्रा

छान जमले आहे. खालून चौथ्या चित्रातील वळणे छान दिसत आहेत.
मीही असेच मधून मधून काही बाजारातून घेऊन येत असते. त्यातील अर्ध्या गोष्टी मला वापरताही येत नाहीत, मुलगीच मात्र हाती लागले की वापरून संपवते. मणी, रंग, धागे-दोरे सगळे. :)

खरच अभिमान वाटावा अशी कला आहे तुमची. मस्त आहेत नमुने - कौतुकास्पद!

नेत्रेश's picture

3 Sep 2010 - 4:22 am | नेत्रेश

रिकामपणा... बरीच वर्ष झाली, रिकामपणा अनुभवायला मिळाला नाही. कमीत कमी १० वर्ष झाली असतील. खुप आठवले सगळे आम्ही केलेले रिकामपणाचे उद्योग, शाळा/कॉलेज ला सुट्टी असताना केलेले.

बाकी फुले छानच जमली आहेत. चालुद्या तुमचे रिकामपणाचे उद्योग...

धनंजय's picture

3 Sep 2010 - 5:38 am | धनंजय

सुंदर
(अवांतर : खरेदीखत!)

मुक्तसुनीत's picture

3 Sep 2010 - 6:06 am | मुक्तसुनीत

उत्तम लेख. रोचक छंद.
माझ्या एका मैत्रिणीच्या छंदांची साईट : http://desiknitter.com/

सुहास..'s picture

3 Sep 2010 - 7:28 am | सुहास..

मकीचे उद्योग ,आय मीन रिकामपणचे उद्योग , नेहमीच आवडतात !!

आजचे ही आवडले..

मदनबाण's picture

3 Sep 2010 - 7:30 am | मदनबाण

छान उद्योग.

निवेदिता-ताई's picture

3 Sep 2010 - 7:38 am | निवेदिता-ताई

सुंदर...मस्त...मी पहातच राहिले.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2010 - 8:06 am | बिपिन कार्यकर्ते

ताई, भगवंत आपल्याला नेहमीच रिकामपण देवो... आणि त्याचा लाभ इतरांना पण होवो.

- (निरीच्छ) संत तुकाराम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Sep 2010 - 9:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ अँटीसंत पोस्टमन, आधी माझ्यासाठी पाठवलेले बुकमार्क्स परत करा नाहीतर खुर्ची* खाली करा.

मके, तू महान आहेस याची शंका होती, खरेदीखताचा किस्सा वाचून खात्रीच पटली. फक्त ही महानता त्या बॅगेच्या बाबतीत दाखवू नकोस. मी आले की डायरेक्ट माझ्या हातातच ती बॅग दे! सुंदर झाल्ये पिशवी, मला आवडली.
आणि लिखाणही मस्तच ... मी फोनवर खिदळता खिदळता दिलेल्या दोन-चार टीप्स आणि पाच-सात कोट्या इथे वापरून घेतल्यास ते बरं केलंस! ;-)

*'कोणती खुर्ची' या अधिक माहितीसाठी कृपया धमुला खरड करणे.

मस्त कलंदर's picture

3 Sep 2010 - 12:16 pm | मस्त कलंदर

अगं तेव्हा मीच होते तिसरीत. भाऊ माझ्याहून आणखी लहान. आम्हाला काय कळतंय ते काय आहे ते! दिसली नोटांची चित्रे आणि आम्ही बसून कापली!!! :)

बाकी, तुला म्हटले की एक बॅग तुला आणि एक माझ्यासाठी बनवेन म्हणून. सगळं झाल्यावर मी दुसरी बॅग शोधायला गेले. आणि मग मराठी पिक्चरमध्ये तेच तेच नाणं कसं पुन्हा पुन्हा सापडतं तसं एकच बॅग मी आवराआवर करताना हलवली आणि तीच दुसर्‍यांदा हाताला लागली होती असा महान शोध लागला!!! :D
काळजी नको करू. मी शोधला त्या बॅगचा सोर्स. कुठून मिळते ती तो. आज-उद्यापर्यंत मिळेल मला आणखी एक बॅग. मग आपण दोघी ती घेऊन फिरायला जाऊ!!!

>>मी फोनवर खिदळता खिदळता दिलेल्या दोन-चार टीप्स आणि पाच-सात कोट्या इथे वापरून घेतल्यास ते बरं केलंस!

हो हो.. हे असं म्हणायचे आपले ठरलंच होत नै? :P

प्राची's picture

3 Sep 2010 - 8:45 am | प्राची

झक्कास मॅम.. :)
सोमैय्यात आल्यावर शिकवण्याबरोबरच विरंगुळा म्हणून Extracurricular activites चे क्लासपण काढा. :)

मस्त कलंदर's picture

3 Sep 2010 - 12:19 pm | मस्त कलंदर

आधीच तुम्हा लोकांच्या वरताण दंगा घालते म्हणून सततचा ओरडा खात असते. हे उद्योग केले तर मग आहेच गच्छंती. त्यापेक्षा असे कर ना... नाहीतरी मी येईपर्यंत तुझे शिक्षण आटोपेल, तेव्हा तुलाच इच्छा असेल तर ये घरी. शिकवते आणि करूनही देते. :)

सहज's picture

3 Sep 2010 - 11:15 am | सहज

चान चान.

संभाव्य उद्योग काय बरे?
१) कॅलीग्राफी
२) ज्वेलरी डिझाईन
३) popuri

:-)

प्रीत-मोहर's picture

3 Sep 2010 - 9:45 am | प्रीत-मोहर

सही..........मीपन कर्नारे..........बूक्मार्क्स आनि पेपर क्विलिन्ग चे उद्योग...पन कधि मुहुर्त येतो ते बघु.......

चान चान

बाकी प्रतिक्रिया लेख वाचुन झाल्यावर द्यावी वाटली तर देईल

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

मस्त ग मके. मकीच्या हातात मात्र कला आहे बॉस. ह्याआधी बनवलेले बुकमार्क्स देखील मस्तच.
बाकी आता तु पुढच्या वेळी येशील तेंव्हा बॅग घेउन येशीलच भेट द्यायला म्हणा.

अवांतर :-

सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते.

मला लॅपटॉप घेतलाय माझ्यासाठी म्हणुन सांगीतले होते. पुढे काय झाले कळले नाही त्या प्रकरणाचे.

ऋषिकेश's picture

3 Sep 2010 - 11:44 am | ऋषिकेश

वा वा वा!हा धागा वाचलाच नव्हता
मस्त आहे कागदी घोडे आपलं पिशव्या नाचवणे ;)
मस्त जमली आहे पिशवी!

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 12:28 pm | विसोबा खेचर

सुरेख..

मेघवेडा's picture

3 Sep 2010 - 1:39 pm | मेघवेडा

वा वा! चान चानच आहे अगदी!

अस्मी's picture

3 Sep 2010 - 3:22 pm | अस्मी

वा! मस्त :)
पिशवी तर मस्तच दिसतिये आणि बचतबँकपण!!

निखिल देशपांडे's picture

3 Sep 2010 - 3:48 pm | निखिल देशपांडे

वा वा चान चान
असे म्हणायचे असते म्हणुन प्रतिसाद.
बाकी पिशवी चांगली जमलिए... शेवटचा फोटोत मागे चिमण्या पण तुच बनवल्या आहेत का??? ;)
असो आमच्या अगांत कला नाहीच.. त्यामुळे असले काही उद्योग शक्य नाहीत.

निखिल देशपांडे

तुम्ही असले काय कसलेच उद्योग करू पण नका.

छानच आहे. मला कधी शिकवतेस?

अविनाशकुलकर्णी's picture

3 Sep 2010 - 9:15 pm | अविनाशकुलकर्णी

वा! मस्त

पिंगू's picture

3 Sep 2010 - 10:40 pm | पिंगू

असा रिकामा उद्योग करायला मलापण जाम आवडतं... पण रिकामा वेळच मिळत नाय... :(

- (व्यस्त रिकामटेकडा) पिंगू

स्वाती दिनेश's picture

5 Sep 2010 - 1:21 pm | स्वाती दिनेश

हे पहायचे कसे राहिले? खूपच क्यूट आहे पिशवी ,कार्डे आणि बाकीचे सगळे क्विलिंग उद्योगही,:)
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 1:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुला पुस्तक देताना गिफ्ट रॅप कसं करायचं हे ही समजलं! :-)

हेम's picture

5 Sep 2010 - 4:04 pm | हेम

वा:!! मस्तच

..पन याचा पेन शाला थोडा म्हाग हाय कांय? घरातच फोकटमंदी कांय होव शकेल तर सांगेल कांय?

ओरीगामी शिकवा ना कुणीतरी?

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 7:16 pm | मस्त कलंदर

मी स्टेपल्समधून घेतलेलं पेन १६९ रूं. ना मिळालं. पण माझ्या नेहमीच्या दुकानात तेच ३० रूपयांत होतं. पट्ट्या २५किंवा ४० रूपयांना (त्यांची जाडी व पोतावर अवलंबून) मिळतात. ते घरच्या घरीही होईल, फक्त तितकीशी सफाई यायची नाही.
काल अरूंधतीने दिलेला एक व्हिडिओ पाहिला. त्यात एका बाईने जाड हँडमेड कागद पेपर कटरने कापून त्याचे क्विलिंग केले. असा A साईजचा कागद २५ रूपयापर्यंत साध्या दुकानात मिळेल. किंवा त्याचे अ४ पेक्षा थोडे मोठ्या आकाराचे तुकडे प्रत्येकी ६ ते ८ रूपयापर्यंत (त्यांची जाडी व पोतावर अवलंबून) मिळतात.

त्यामुळे अगदीच खर्चिक नाहीए प्रकरण. मी लिहिलेल्या सात-आठशे रूपयांत धागे, क्विलींगचे पुस्तक आणि मी न वापरलेलें क्वीलिंग पॅड यासगळ्या गोष्टींनी जास्त पैसे खाल्ले.

शाहरुख's picture

5 Sep 2010 - 6:52 pm | शाहरुख

अंगात कलाकुसर असणार्‍यांचा मला नेहमीच आदर वाटत आला आहे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अंगात कलाकुसर नसतानाही कागदाची फुलंबिलं बनवणार्‍यांचा मला जास्तच आदर वाटतो! ;-)

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2010 - 1:30 pm | राजेश घासकडवी

हे बघायचं राहूनच गेलं होतं की. मस्तच जमलंय सगळं. लेखनशैलीदेखील छान आहे... ते खरेदीखत वगैरे म्हणजे कहर.

प्राजक्ता पवार's picture

6 Sep 2010 - 4:18 pm | प्राजक्ता पवार

छान ! असेच तुझे रिकामपणाचे उद्योग चालु राहु देत म्हणजे मलादेखील नविन गोष्टी शिकता येतील. घरी जातांना आज क्विलींग कीट विकत घेणार आहे.

सुरेख जमलं आहे पेपर क्विलिंग.

हे पेपर किलिंगचं क्विलिंगचं पेन कुठे मिळतं?

मस्त कलंदर's picture

19 May 2015 - 8:24 pm | मस्त कलंदर

क्रॉसवर्ड्स, स्टेपल्स, हॉबी आयडियाज किंवा ज्या लोकल जनरल स्टोअर्मध्ये टिकल्या, मणी, हँडमेड कागद मिळतात, तिथं मिळतं.

आदूबाळ's picture

19 May 2015 - 8:36 pm | आदूबाळ

व्हीनस ट्रेडर्स, फ-कॉ-रोड येथे नक्की मिळतं. त्या गुंडाळ्यापण.

सूड's picture

19 May 2015 - 9:15 pm | सूड

माताय, माझं कामच सोपं झालं!!