गाभा:
सरकार आता जातीनिहाय जनगणना करणार आहे म्हणे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6296105.cms
हा सगळा ओबीसी ना आरक्षण देण्यासाठी चा फार्स आहे काय?
तुम्हाला काय वाटते ?
टीपः माझ्या मनात ओबीसी बद्दल कोणताही आकस नाही, क्रुपया व्यक्तीगत घेउ नये
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 9:49 am | खालिद
प्रथम आपणाला काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
12 Aug 2010 - 10:16 am | नितिन थत्ते
मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षण या विषयावर निर्माण झालेल्या वादात एक मुद्दा खालीलप्रमाणे मांडला गेला होता.
सध्या ओबीसींची जी संख्या सांगितली जाते ती १९३१ च्या जनगणनेनुसार सांगितली जाते. आत्तासुद्धा तेवढेच ओबीसी आहेत असे म्हणून त्याप्रमाणात आरक्षण देणे योग्य नाही. त्यांची नक्की संख्या किती व त्या जातींपैकी आता किती जाती मागासलेल्या (सोशली आणि इकॉनॉमिकली) राहिल्या आहेत हे ही माहिती नाही.
वरील कारणास्तव जातीनिहाय गणना गरजेची आहे.
दुसरेही (मागासलेपणा आणि जात यांचे भारतात घट्ट समीकरण असल्याने) विविध मागास जाती-जमातींचा उत्कर्ष व्हावा म्हणून अनेक योजना राबवल्या जातात. त्यांचा कितपत परिणाम होत आहे हे पाहण्यासाठीदेखील जातिनिहाय गणना आवश्यक आहे. सध्याच्या जनगणनेत कुटुंबांची आर्थिक स्थिती वगैरेचाही सर्व्हे होत आहे. त्यामुळे योजनांच्या परिणामकारकतेचे मोजमाप सुकर होईल. तसेच योजना आखताना कोणत्या गटाला टार्गेट करावे वगैरे ठरवणेही सुकर होईल.
(मतांवर डोळा ठेवून सारे चालू असे म्हणत राहिल्याने काही साध्य होईल असे वाटत नाही). ओबीसींना आरक्षण देण्यासाठी हा फार्स करण्याची आवश्यकता नाही.
12 Aug 2010 - 10:23 am | आंबोळी
सहमत आहे.
पण येणार्या आकडेवारीवरून एखाद्या समुहाला आरक्षण देणे / वाढवून देणे त्यासाठी गरज पडल्यास आधी दुसर्यांना असलेले आरक्षण कमी करणे हे शक्य होईल असे वाटत नाही.
असो.
मिडियाला , राजकारणात मागे पडलेल्या नेत्यांना , मिपावरच्या लोकांना , चघळायला एक विषय मिळाला...
13 Aug 2010 - 12:24 pm | गिरधर पाटील
मच्छीमार कधी माशांची जनगणना करून मासे मारायला जातो का ? गरीबांना मदतच करायची असली जे धडधडीत समोर दिसतात त्यांना सोडून हा जनगणनेचा फार्स कशासाठी ? सेनगुप्ता समितीच्या अहवालानुसार ६७ टक्के लोकसंख्या अजूनही एकवेळच्या जेवणाला मोताद आहे. ६७ टक्के हा आकडा पुरेसा नाही काय ?
13 Aug 2010 - 1:18 pm | समंजस
थत्ते साहेबांशी सहमत.
माझ्या मते जातीनिहाय गणना आवश्यक आहे खालील काही कारणामुळे;
१. जाती/वर्ग आधारीत आरक्षण पुढेही चालू ठेवायचे झाल्यास किंवा बंद करायचे झाल्यास.
२. जाती/वर्ग आधारीत आरक्षण पुढे चालू ठेवताना कुठल्या जाती/वर्गाला ला किती टक्के आरक्षण मिळावे हे ठरवायला.
३. आता पर्यंत जे आरक्षण देण्यात आले त्याचा कितपत फायदा झाला हे ठरवायला.
४. आता पर्यंत जे आरक्षण देण्यात आले त्याचा कुठल्या जाती/वर्गाला जास्त, कुठल्या जाती/वर्गाला कमी फायदा झाला हे ठरवायला तसेच त्या प्रमाणे आरक्षणाच्या टक्के वारीत बदल करायला.
५. ज्या जाती/वर्गाला आता पर्यंत च्या आरक्षणातून पुरेसा लाभ मिळाला त्यांना आरक्षणातून वगळायला आणि ज्यांना पुरेसा लाभ नाही मिळाला त्यांच्या करता आरक्षण चालूच ठेवायला.
६. ज्या जाती/वर्गाला आता पर्यंत आरक्षणाचा लाभ नाही मिळाला परंतु आवश्यक आहे अश्यांना लाभ द्यायला.
[जाती/वर्ग हा भेद आपल्या देशात-समाजात आहेच. हे नाकारून काही साध्य होणार नाही. त्या ऐवजी जर सध्याची खरी परिस्थीती माहिती करून घेउन जर पुढिल योजना ठरवण्यात आल्यात तर समाजाचा फायदाच होईल अन्यथा चुकीच्या योजनांवर पैसा खर्च होत राहील आणि समाजात आर्थिक विषमता तशीच राहील.
राहीला प्रश्न या पासून राजकीय फायदा मिळवण्याचा तर तो तसाही राजकीय पक्ष मिळवत आहेच मागील कित्येक दशकांपासून. बर्याचदा निवडणूकींच्या वेळेस तिकीटांचं वाटप करताना मतदार संघात कोणत्या जाती/वर्गाची मते जास्त आहेत ही माहिती काढून त्या जाती/वर्गाच्या नेत्याला तिकीट देण्याचा राजकीय पक्षांचा कल असतो. निवडणूकीच्या काळात वृत्तपत्रे सुद्धा कुठल्या मतदार संघात कुठल्या जाती/वर्गाची एकगठठा मते आहेत, त्यामुळे कोणत्या उमेदवाराला जास्त फायदा होउ शकतो या प्रकरच्या बातम्या देताना आढळुन येतात. ही सद्द परिस्थीती असताना या जातीनिहाय गणनेमुळे काय विशेष फरक पडणार? ]
12 Aug 2010 - 10:28 am | नितिन थत्ते
>>पण येणार्या आकडेवारीवरून एखाद्या समुहाला आरक्षण देणे / वाढवून देणे त्यासाठी गरज पडल्यास आधी दुसर्यांना असलेले आरक्षण कमी करणे हे शक्य होईल असे वाटत नाही.
शक्य आहे. पण सध्या याविषयी नक्की काही सांगता येणार नाही.
पण सध्या योजनांच्या बाबतीत बर्याच प्रमाणात अंधारात तीर मारणे असते. म्हणजे नक्की लाभार्थी किती असण्याची शक्यता आहे, किती निधी लागू शकतो वगैरे गोष्टी फारच अंदाजपंचे असतात. ते कमी होऊ शकेल.
12 Aug 2010 - 10:36 am | आंबोळी
पण सध्या योजनांच्या बाबतीत बर्याच प्रमाणात अंधारात तीर मारणे असते. म्हणजे नक्की लाभार्थी किती असण्याची शक्यता आहे, किती निधी लागू शकतो वगैरे गोष्टी फारच अंदाजपंचे असतात. ते कमी होऊ शकेल.
खरय.
12 Aug 2010 - 11:05 am | भारतीय
जातीनिहाय जनगणनेची काहीच आवश्यकता नव्हती.. आजपर्यंत कधीही जातीनिहाय जनगणना झाली नव्हती.. हे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे.. जातीव्यवस्था संपल्याशिवाय भारताची सर्वांगीण प्रगती शक्यच नाही. पण लक्षात कोण घेतो? प्रत्येकाला व्होट बँकेची जास्त काळजी.. चालू द्या देशाचे लचके तोडण्याचे काम..
12 Aug 2010 - 11:43 am | अभिरत भिरभि-या
>> जातीनिहाय जनगणनेची काहीच आवश्यकता नव्हती..
वर श्री. थत्ते यांनी याचे प्रयोजन थोडक्यात सांगितले आहे.
>> आजपर्यंत कधीही जातीनिहाय जनगणना झाली नव्हती..
इसवीसन १९३१ ला शेवटीची झाली असे संदर्भ जालावर आहेत.
>> जातीव्यवस्था संपल्याशिवाय भारताची सर्वांगीण प्रगती शक्यच नाही. पण लक्षात कोण घेतो?
बरोबर .. पण कशी संपवावी ??
उत्तरेत प्रामुख्याने जे ऑनर किलींगचे प्रकार होताहेत ते काही शुभलक्षण वाटत नाही.
NBT ने प्रकाशित केलेले गिरमिटियांवरचे एक सुंदर पुस्तक वाचनात आले होते. गिरमिटिये म्हणजे उत्तर भारतातून Agreement करून फिजी, वेस्स्ट इण्डिज आदी सुदूर भागात नेलेले हिंदी मजूर. स्थलांतरामुळे या मजूरांना जातीतील स्त्रिया मिळेनाशा झाल्या. आदिम गरजेपुढे स्त्रीया परजातीय असणे ही बाब क्षुल्लक ठरली. त्यामुळे आज या भागातील हिन्दू समाजात जात ही संकल्पना बहुतांशाने नाही.
मोठ्या प्रमाणावरील आंतरजातीय विवाहच जातीव्यवस्था मोडून काढतील असे माझे मत आहे.
12 Aug 2010 - 12:03 pm | भारतीय
>>इसवीसन १९३१ ला शेवटीची झाली असे संदर्भ जालावर आहेत.
मी भारतीय संघराज्य अस्तित्त्वात आले तेंव्हापासूनचे बोलतोय..
>>जातीव्यवस्था संपल्याशिवाय भारताची सर्वांगीण प्रगती शक्यच नाही. पण लक्षात कोण घेतो?
बरोबर .. पण कशी संपवावी ??
संपवावी कशी याचे उत्तर कदाचित आज आपल्याकडे नसेल, पण जातिव्यवस्था अधिक बळकट होऊ नये म्हणून ही 'सो कॉल्ड जातीनिहाय' जनगणना गरजेची नव्हतीच..
मला स्वतःला आज असे वाटतयं कि एखादी बंदूक घ्यावी हातात अन ह्या राजकारणातील लांडग्यांना गोळ्या घालाव्यात (अर्थात तसे करता येणे शक्य नाही)
12 Aug 2010 - 12:44 pm | गांधीवादी
>> मला स्वतःला आज असे वाटतयं कि एखादी बंदूक घ्यावी हातात अन ह्या राजकारणातील लांडग्यांना गोळ्या घालाव्यात
मला तर हे रोजंच वाटतं.
>>(अर्थात तसे करता येणे शक्य नाही)
एकाला दुसर्याला संपवला तरी बाकीचे रेडे आपल्याला फासावर देतील आणि परत देशद्रोही म्हणून आपलेच नाव बदनाम करतील.
त्यांच्या जीवावर काय आले तर मात्र सगळ्या हालचाली एकदम वेगाने होतील.
तो कसाब मस्त पैकी बिर्याणी झाडत आहे आणि हे आपलेच एकेक हाड वेगळ करतील.
अहो माहिती कायद्या द्वारे ज्यांनी पाठपुरावे केले त्यांन सुद्धा ह्यांनी सोडलं नाही.
हे खरतर गुंड लोक आहेत.
आपली सारख्या सामान्य माणसांची त्यांना टक्कर द्यायची ऐपत नाही.
आपण फक्त ५ वर्षांनी एखाद मत पेटीत टाकणार, आणि असंच कुठतरी काहीतरी खरडत राहणार
त्यापेक्षा चालू द्या ना जसे चाल्ले आहे तसेच. जेव्हा क्रांती व्हायची असेल तेव्हा होईल.
कोणाला घाई आहे.
12 Aug 2010 - 1:46 pm | अभिरत भिरभि-या
>> मी भारतीय संघराज्य अस्तित्त्वात आले तेंव्हापासूनचे बोलतोय..
आपल्या मूळ प्रतिक्रियेत असा उल्लेख नव्हता .. असो
>> संपवावी कशी याचे उत्तर कदाचित आज आपल्याकडे नसेल, पण जातिव्यवस्था अधिक बळकट होऊ नये म्हणून ही 'सो कॉल्ड जातीनिहाय' जनगणना गरजेची नव्हतीच..
मुळात जातीला वाहिलेल्या अनेक पत्र-पत्रिका असताना; जातीजातींचे रजिस्टर्ड संघ - संस्था असताना; हिन्दू समाजातील बहुतांशी लग्ने जात्याधारित असताना; खैरलांजीसारखी प्रक्करणे होत असताना नुसती जात मोजली म्हणजे जातीसंस्थेस बळकटी येते हे म्हणणे तर्काला धरून वाटत नाही.
आज या देशातील अनेक योजना जात-उतरंडीतील तथाकथित खालच्या वा पूर्व-अस्पृश्य जातींसाठी आहेत. यांची परिणामकता, या जातींची आर्थिक परिस्थिती जनगणनेतून स्पष्ट होऊ शकतात. सरकारी मदतीची भावी दिशा यातून स्पष्ट होऊ शकते.
जात हे दुर्दवाने भारतीय समाजाचे एक "सामाजिक वास्तव" असताना त्याकडे डोळेझाक करणे, नाकारणे हा भोंदूपणा वाटतो.
जातीनिहाय' जनगणना केली वा न केली तरी जातींचे राजकारण आपले राजकारणी सोडणार नाहीत. आपल्या मतदारसंघात कोण मातब्बर आहे, कोणाला धरून रहावे याचे ज्ञान त्यांना उपजत असते. त्यांना त्यासाठी जनगणनेतून मिळणार्या विद्याची (Data) गरज नाही. पण अशी गणना न झाल्यास मागास वर्गासाठीच्या उपाययोजना "अंदाजपंचे दाहोदरसे" वा "अंधेरेमे तीर" प्रकारच्या होतील.
जनगणनेची प्रश्नावली अतिशय comprehensive स्वरूपाची आहे यातून कुटुंबाची व पर्यायय्ने समाजाचे प्रत्यक्ष चित्र उमजू शकते. म्हणून जातीनिहाय' जनगणना गरजेची वाटते.
13 Aug 2010 - 12:28 pm | गिरधर पाटील
अगदी खरे आहे !
12 Aug 2010 - 11:42 am | येडबंबू
>>> जातीव्यवस्था संपल्याशिवाय भारताची सर्वांगीण प्रगती शक्यच नाही.
हे जरी खरे असले तरी "जात नाही ती जात" हे ही तितकेच खरे :)
जातीनिहाय जनगणना जरुर करावी पण मग एखादी जात "अल्पसंख्यांक" च्या निकषामध्ये बसत नसेल तर त्या लोकान्ना मिळणार्या सवलती बंद करताना मागे पुढे पाहू नये
-
मागासवर्गियांना आर्थीक सवलती सोडून इतर कुठल्याही सवलतिंच्या विरोधात असणारा
येडबंबू
13 Aug 2010 - 1:03 am | आळश्यांचा राजा
सवलती की आरक्षण? आणि अल्पसंख्यांक असणे हा सवलतींसाठी/ आरक्षणासाठी निकष केंव्हापासून झाला बुवा? ब्राह्मण ही जात अल्पसंख्यांक आहे हे समजायला जनगणनेची गरज नाही. या अल्पसंख्यांक जातीला कोणत्या सवलती/ कोणती आरक्षणे मिळतात?
12 Aug 2010 - 12:07 pm | भारतीय
मागासवर्गीय असोत अथवा उच्चवर्णीय.. सवलती केवळ आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाच मिळायला हव्यात.. जातीनिहाय जनगणनेऐवजी 'आर्थिक स्तरनिहाय' जनगणना जास्त गरजेची होती असे वाटते..
13 Aug 2010 - 1:12 am | आळश्यांचा राजा
अशी जनगणना ऑलरेडी होत असते. त्याला बीपीएल सर्व्हे म्हणतात. अर्थात दारिद्र्यरेषेखालच्या लोकांची पाहणी. त्यांच्यासाठी विविध योजना असतात. दारिद्र्य दूर करण्यासाठी. शिवाय वर थत्तेंनी म्हणल्याप्रमाणे या जनगणनेत प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक सर्व्हेही झालेला आहेच.
12 Aug 2010 - 12:23 pm | हेरंब
साडेतीन टक्के वगळून उरलेल्या ९६.५% जनतेला आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यानुसार त्यांना आरक्षण द्यावे. म्हणजे या देशात आरक्षण मागणारे कोणी शिल्लकच रहाणार नाही व त्यावरच्या निरर्थक चर्चा, आंदोलने बंद होतील.
12 Aug 2010 - 12:59 pm | प्रकाश घाटपांडे
जात न नोंदवण्याचा पर्याय खुला आहे.
12 Aug 2010 - 2:40 pm | विसुनाना
पण तो किती आणि कोण स्विकारणार हा प्रश्न आहे. ;)
12 Aug 2010 - 1:00 pm | Dipankar
ज्या जाती आरक्षणामुळे पुढारलेल्या आहेत त्या आरक्षण सोडावयास तयार होतील काय?????
12 Aug 2010 - 3:33 pm | टग्या टवाळ
जातीनिहाय जनगणनेची काहीच आवश्यकता नव्हती मात्र आता आरक्षण मागणारे जातीनिहाय टक्के वारी नुसार प्रत्येकाला
आरक्षण भेटावे या साठी प्रयत्न करणार आहेत.?
12 Aug 2010 - 5:51 pm | विदुषक
ह्या पेक्षा 'नक्षल ग्रस्त ' भारत मध्ये जन गणना पूर्ण करता आली तरी खूप आहे !!
12 Aug 2010 - 6:47 pm | चिन्मना
नितिन थत्ते आणि अभिरत भिरभिर्या यांच्या मताशी सहमत. कुठल्याही कल्याणकारी योजनेच्या यशस्वितेसाठी ती योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांचा व्यवस्थित विदा माहित असणे आवश्यक आहे. त्या विद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असेल तर अशा गैरप्रकाराला आळा घालायच्या उपायांबद्दल चर्चा करावी; पण म्हणून विदाच गोळा करू नये हे म्हणणे चुकीचे आहे.
12 Aug 2010 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठल्याही कल्याणकारी योजनेच्या यशस्वितेसाठी ती योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांचा व्यवस्थित विदा माहित असणे आवश्यक आहे. त्या विदाचा गैरवापर होण्याची शक्यता असेल तर अशा गैरप्रकाराला आळा घालायच्या उपायांबद्दल चर्चा करावी; पण म्हणून विदाच गोळा करू नये हे म्हणणे चुकीचे आहे.
अगदी महत्त्वाचा मुद्दा.
-दिलीप बिरुटे
13 Aug 2010 - 10:47 am | अविनाशकुलकर्णी
जात न नोंदवण्याचा पर्याय खुला आहे...........प्रकाश राव खरे आहे खरे पुरोगामी कोण व बोल घेवडे पुरोगामी कोण या निमित्ताने समोर येतील....पुरोगामी मंचाने अशी चळवळ उभी करुन समाज प्रबोधनास सुरवात करावि...
13 Aug 2010 - 11:36 am | प्रकाश घाटपांडे
समाजवादी लोकांचा यावर एसे एम जोशी सभागृहात दोन महिन्यांपुर्वी परिसंवाद झाला होता. त्यावेळी मी गेलो होतो. त्यांनी जातीनिहाय जनगणना होणे म्हणजे जातीयवाद नव्हे असा निर्वाळा दिला. जाती निहाय जनगणनेला पाठिम्बा दिला. भाई वैद्य अध्यक्ष होते. जातीनिहाय जनगणना नको असे सांगणारा एकही वक्ता नव्हता.
13 Aug 2010 - 11:40 am | गिरधर पाटील
जातिनिहाय जनगणना – लोकशाहीकरणाला बाधक
जातिनिहाय जनगणनेबाबत निर्णय करणा-या मंत्रीगटाने नुकतीच या जनगणनेला मान्यता दिल्याचे जाहिर झाले आहे. या गटातील सदस्यांची ‘राजकीय जात’ बघता असा निर्णय जाहिर होणे यात काही विशेष नाही. ज्यांचे राजकारणच जातींवर अवलंबून आहे अशांपुढे चिदंबरम, सिबल, अंटोनीसारख्या पुरोगाम्यांचे फारसे चालणार नाही हेही स्पष्ट होते. अर्थात मंत्रीमंडळात अंतीम निर्णय अजून व्हावयाचा असल्याने या लढाईत शेवटी जातियवादी की लोकशाहीवादी जिंकतात हेही तेव्हाच ठरेल.
भारतीय संघराज्याने स्वीकारलेल्या व आताशी काहीशा स्थिरावलेल्या लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय घातक असून जनसामान्यांची सहभागी लोकशाहीकडे म्हणजे समतेकडे वाटचाल होत असतांनाच त्यांना परत जातीजातींच्या कप्प्यात विभागून निर्माण होणा-या सामाजिक अशांततेवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. जनतेला कायम असुरक्षित ठेवायचे, त्याचवेळी सरकारी मदतीने होणा-या उध्दाराचे गाजर दाखवायचे व आपल्या व्होटबँका निश्चित करायच्या अशी ही व्युहरचना आहे.
यात पुढे आणलेला ओबीसींच्या हिताचा मुद्दा ओबीसींचीच नव्हे तर सा-या जनतेची दिशाभूल करणारा असून लोकशाहीच्या नावाने नवसरंजामशाही राबवून ख-या लोकशाहीला अडगळीत टाकणा-या प्रवृत्तींचा नवा डाव आहे. या जनगणनेसाठी जी समर्थने दिली जातात त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास सारे काही स्पष्ट होते.
या जनगणनेमुळे ओबीसींची संख्या निश्चित होऊन सरकारतर्फे त्यांना प्रचंड आर्थिक मदत मिळून त्यांचा उध्दार होईल असे सांगितले जाते. म्हणजे अशी मदत मिळण्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेत सध्या ओबीसी आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर घटनेद्वाराच निश्चित केलेल्या आरक्षणामुळे लाभार्थी ठरलेल्या दलित व अदिवासी जातीजमातींचा अशी मदत मिळून त्यांचा आजवर कितपत उध्दार झाला याबद्दलही वाद आहेत. दलित-अदिवासींचे आरक्षण तर सर्वंकष आहे. ओबीसींना शैक्षणिक व सरकारी नोक-यां (आताशा त्याही संपत आल्या आहेत) वरच समाधान मानावे लागणार आहे. दलित व अदिवासी विकासावर खर्च झालेल्या रकमा बघितल्या तर त्यांचे नेमके काय झाले असावे हे लक्षात येते. एवढेच नव्हे तर केवळ आर्थिक निकषावर दारिद्र्य रेषेखालील गरिबांवर प्रचंड खर्च करून देखील नुकत्याच जाहिर झालेल्या सेनगुप्ता समितीच्या अहवालानुसार देशातील ६७ % लोकसंख्या अजूनही एकवेळच्या जेवणाला मोताद आहे. यातही प्रामुख्याने दलित व अदिवासींचाच समावेश असल्याचे दिसून येईल. घटनेने निश्चित व आश्वासित केलेल्या समाज घटकांची ही अवस्था असेल तर ज्यांची म्हैस अजून पाण्यातच आहे अशा ओबीसींचे केवळ त्यांच्या मतांवर डोळा असणारे राजकारणी सांगतात म्हणून अशा सरकारी मदतीने भले होईल या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
यातला दुसरा मुद्दा सामाजिक व शैक्षणिक मागासपणाचा. आज लोकशाहीकरण म्हणा वा जागतिकीकरणामुळे प्रत्येक इच्छुक व्यक्तीला, मग ती कुठल्याही जातीची असली तरी, स्वकर्तृत्वावर स्वविकासाच्या एवढ्या शक्यता व संधी उपलब्ध झाल्या आहेत की केवळ जातीमुळे ती यापासून वंचित राहील अशी परिस्थिती राहिलेली नाही. विकासाची संधी हा जात विसरायला लावणारा प्रमुख घटक आहे. आज वाढत्या शहरीकरणातील विकसित समाजघटक बघितले तर सा-या जातीजमातीनी सर्वच क्षेत्रात सर्वदूर आघाडी घेतल्याचे दिसते आहे. सामाजिक विकास हा ठरवून होत नसल्याने अडथळा असलाच तर या नवसरंजामशाहीतील सर्वसामान्यांचे शोषण करणा-या शैक्षणिक संरचनांचा. एकीकडे या समाजाच्या संधींचा संकोच करणारे घटक दुसरीकडे त्यांच्या वंचितपणाचे भांडवल करून आपले नेतृत्व सिध्द करताहेत. घटनाकारांनासुध्दा आरक्षण हे समान वाटपाचे साधन नसून समान संधींची उपलब्धताच अभिप्रेत असून जातिअंताचे उदिष्ट गाठतांना आरक्षण हे साध्य नसून साधन असल्यानेच अतिशोषित दलित व अदिवासींसाठींसुध्दा ठराविक काळापुरतेच आरक्षण असावे असेही अभिप्रेत होते.
या विषयाला एक दुसरेही परिमाण आहे. भारतातच नव्हे तर सा-या जगात सरकारशाहीचा पुर्नविचार होऊ लागला आहे. वैश्वीकरणामुळे देशोदेशीच्या सीमारेषा पुसट होत आर्थिक क्षेत्रासारखी बरीचशी महत्वाची क्षेत्रे सरकारशाहीच्या हातातून सुटून चालली आहेत. सरकारची व्याप्ती, आकारमान व प्रभाव याच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत. दहशतवाद वा नक्षलवाद्यांचा सरकार नामक व्यवस्थेशी काही कार्यकारण संबंध जोडता येतो का याचाही शोध घेतला जाऊ लागला आहे. राजकीय परिमाणापेक्षा आर्थिक परिमाणांचे प्राबल्य वाढते आहे. या सा-यांवर प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावही तेवढाच दखलपात्र ठरतो आहे. या गदारोळात सरकार नामक व्यवस्था काहीशी विरळ होत आपल्या अस्तीत्वाबाबत सतर्क झाल्याचे दिसते आहे. एनकेन प्रकारे जनमानसावर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी असुरक्षित जनमानस व सामाजिक अशांतता हे आवश्यक घटक ठरतात. या घटकांची बेगमी अशा निर्णयातून करता येते.
या निर्णयाबाबत अनेक विरोधाभास आहेत. या मंत्रीगटाचे एक सभासद महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राजकारणाशी संबंधित आहेत. यांच्या पक्षातून नेहमीच मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत आंदोलने केली जातात. याच पक्षातील एक ओबीसींचे नेते समजले जाणारे प्रभावी मंत्री या मराठ्यांच्या आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेतात. मनुवाद्यांनी या समाजाचे अपरिमित नुकसान केले असाही यांचा आरोप असतो. मात्र मनुवाद्यांच्याच पक्षातील एका प्रमुख नेत्याच्या खांद्याला खांदा लावून ओबीसींचा लढा लढू असेही जाहिर केले गेले आहे. मात्र या लढ्यात वेळ आली तर आम्हाला आमचा पक्षच प्रिय असेल, ओबीसींच्या लढ्यासाठी पक्षाचा राजीनामावगैरे देणार नाही हे दोन्ही नेत्यांनी अगोदरच जाहिर केल्याने या लढ्याचे भवितव्य तसे अगोदरच निश्चित झाले आहे.
मुळात ओबीसी हा दलित व अदिवासींसारखा एकमय समाज नाही. हा कसबी बाराबलुतेदार, हरहुन्नरी कारागीर व कलाकारांचा समाज आहे. उद्योजकता, कलात्मकता व स्वकर्तृत्वावर विश्वास असणा-या या समाजाला योग्य व लायक नेतृत्व मिळाले नाही हे या समाजाचे दुर्दैव आहे. कदाचित स्वावलंबनाच्या या गुणवैशिष्ठ्यांमुळेच या समाजाला नेतृत्वाची गरज भासत नसावी. महाराष्ट्रात तरी ओबीसींचे स्वतःसाठीचे एकादे मोठे आंदोलन झाल्याचे दिसत नाही. ओबीसींच्या नावाने भरवल्या जाणा-या मेळाव्यांना सरसकट ओबीसीच असतात असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरावे. अशा वा कुठल्याही मेळाव्यांना गर्दी जमवण्याचे तंत्र हे चांगलेच विकसित झाले असून त्यात काही गुपित राहिले आहे असेही नाही.
लोकशाहीतील नेत्यांनी स्वतःला राजे समजायचे व जनतेला आश्रित बनवून भ्रामक आश्वासने देत हाती कटोरा घेऊन कायम आपल्यामागे फिरवायचे दिवस आता संपले आहेत. सरकारी मदतीचा फोलपणाही आता सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ लागला आहे. लोकशाहीला अभिप्रेत असलेला प्रत्येक नागरिकाचा विकास साधण्यासाठी असे ठरवून केलेले अडथळे जोवर दूर होत नाहीत, तोवर भारतीय लोकशाही व नागरिकांना यातून जावेच लागेल असेच सध्यातरी दिसते आहे.
डॉ.गिरधर पाटील. girdhar.patil@gmail.com
13 Aug 2010 - 5:08 pm | भाऊ पाटील
>>ज्यांचे राजकारणच जातींवर अवलंबून आहे अशांपुढे चिदंबरम, सिबल, अंटोनीसारख्या पुरोगाम्यांचे फारसे चालणार नाही हेही स्पष्ट होते.
-चिदंबरम पुरोगामी नाहीत असे त्यांच्या मतदारसंघात दीड वर्ष राहून आल्यावर माझे मत झाले आहे. बाकी चालु द्या.
13 Aug 2010 - 11:41 am | इन्द्र्राज पवार
सरकारची प्रत्येक कृती ही "अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्यांक" आदी गटावर सवलतींचा वर्षाव करण्यासाठीच असते असा विचार इथला सुशिक्षित वर्गच जर करू लागला तर मग अन्य वर्गही तसे म्हणू लागला तर दोष कुणाला द्यायचा? देशाच्या अनेक कारणासाठी विविध प्रकारचा विदा एकत्रित करून, तीवर परत विविध समित्या नेमून काही निर्णय घेणे केन्द्र सरकारला आवश्यक वाटत असते, जे राष्ट्राच्या जडणघडणीसाठी पूरक मानले जातात. भारताच्या ईशान्य सीमेवर आदिवासींची त्रिपुरा, नागालँड, मिझोराम यासारखी राज्ये आहेत, पण ती बिगर आदिवासी परक्यांनी बेकायदेशीर घुसकोरी करून व्यापली असल्याने पुरती ईशान्य सीमा असंतोषाने पेटून उठली आहे. आता या भागातील मूळ (अॅबओरिजिन) आदिवासींच्या हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. मग असे जर असेल तर मूळ कोण याचा विदा "जातीनिहाय जनगणने"नुसार करायला नको का? जनगणनेतील "जाती" या सज्ञेने आपण हकनाक रान उठवित आहोत. "आरक्षण" नावाखाली शासनातर्फे ज्या सवलती दिल्या जातात तिच्याशी या जातीनिहाय जनगणनेचा काही संबंध असलाच तर त्या सवलती योग्य आणि कायदेशीर घटकांनाच मिळतात का हे पाहण्यासाठी आहे. प.बंगाल, केरळ आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्हे अशा सवलती लाटण्याबाबतीत अग्रेसर आहेत असे तेथील विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षप्रवृत्तेदेखील म्हणतात. अशी बेकायदेशीर प्रकरणे उघडकीला आणून त्यात एकसुत्रीपणा आणणे या "जातीनिहाय" जनगणनेनुसार शक्य होणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न आणि वर्गव्यवस्थेचे प्रश्न हे सर्वस्वी वेगळे आहेत. हिच मात्रा जनगणलेला लावली गेली आहे. अवैधरितीने इथे प्रवेश घेतलेले शोधणे, अल्पसंख्याकांच्या सांप्रदायिक संघटनांशी संगनमत करून रहिवाश्याचे बनावट दाखले पैदा केलेले, बिहारसारख्या "जमीनदारी" राज्यात अजूनही वर्षभराच्या तत्वावर वेठबिगारीच्या साखळीत अडकलेल्या शेतमजूरांना "स्वतंत्ररित्या भूमीपती" चा दर्जा देऊन त्यांना खर्या अर्थाने सक्षम बनविण्यासाठी इ. अनेकविध कारणासाठी ही जातीनिहाय जनगणना आवश्यक मानली गेली आहे.
हे कुणीही मान्य करेलच की, प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याला जनतेचा पाठिंबा आहे हे दाखविण्याची गरज असते आणि खर्या अर्थाने (किंवा त्यांच्या मताच्या दृष्टीने) ही जनता, मतदार प्रचंड संख्येने खेड्यापाड्यात पसरलेला आहे. यामुळे 'ग्रामीण जनतेचे कल्याण' हा स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकी कळीचा मुद्दा बनला आहे आणि तो सातत्याने तसाच राहिल. मग अशा मतदारासमोर जाण्यासाठी सत्ताधारी असो वा विरोधक त्याना अशारितीने केलेल्या जनगणनेचा विदा लागणारच.
थोडक्यात या प्रश्नावर व्यापक दृष्टी ठेवणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.
13 Aug 2010 - 12:15 pm | गिरधर पाटील
ओबीसी नेतृत्वाचे आऊटसोर्सिंग
महाराष्ट्रातील ओबीसी समाज तसा नशीबवान समजला पाहिजे. इतरजातीय समाजांना नेतृत्वाची वानवा असतांना ओबीसींना मात्र एक राष्ट्रवादी-तथाकथित सेक्युलर व दुस-या भाजपा-तशा अर्थाने जातीयवादी म्हणून ओळखल्या जाणा-या या दोन्ही पक्षाच्या धुरंधर नेत्यांनी स्वघोषित पाठींबा जाहीर केला आहे. हे नेते एवढ्यावरच थांबले नाहीत तर संपूर्ण चळवळच त्यांनी ‘हायजॅक’ केल्याचेही दिसते आहे. पैकी या जातवार जनगणनेचे सारे श्रेय भुजबळांनी स्वतःकडे ओढून घेतल्याचेही काही लेखातून ध्वनित होते आहे.
आजवर ही चळवळ जिवंत ठेवण्यात ज्या ओबीसी नेत्यांचे योगदान कारणी पडले आहे, ते मात्र या जल्लोषात कुठेच दिसत नसून ओबीसींची ‘नुसती’ जनगणना जाहीर झाल्याने (ती आनंदोत्सवाचा लेख प्रसिध्द होईपर्यंत रद्दही झाली) ओबीसींचे कसे भले होणार ही भली मोठी शंका व त्याबरोबर येणारे धोकेही त्यांना दिसत असल्याने ते चिंतीत असावेत. तसे पाहिले तर या सा-या संघटनांनी २००१ च्याच जनगणनेत ओबीसींची जातनिहाय मोजणी व्हावी यासाठी सरकार दरबारी निवेदने व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या मेरीटबाबत कुठल्याही शंका न घेता केवळ जनगणनेची प्रक्रिया आधीच सुरू झाल्याने असे मधेच बदल करणे शक्य नसल्याचे न्यायालयांनी नमूद केले होते.
आताच्या ओबीसी जनगणनेला मंत्रीमंडळात चर्चा करून निर्णय घेऊ असा सावध पवित्रा पंतप्रधानांनी घेतला आहे. खुद्द भाजपानेही अशीच आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका जाहिर केली आहे.अशा जनगणनेतील संभाव्य धोके ओबीसींनाच अडचणीचे ठरू शकतील असाही एक विचारप्रवाह आहे. आरक्षणाचे वा सवलतीचे वाढीव लाभ पदरात पाडून घेण्यासाठी नोकरशाहीतील ओबीसी हा आकडा फुगवण्याची शक्यता नाकारता येत नाही. (मतदारयाद्या कशा बिघडाव्यात याचा तसा अनुभव नोकरशाहीला आहेच) याहीपेक्षा गंभीर धोका तो आरक्षणाच्या उंबरठ्यावर बाशिंग बांधून बसलेल्या मराठा समाजाचा आहे. यांनी ओबीसी म्हणून नोंदवायचे मनावर घेतले तर ओबीसींचा आकडा आजच १७ टक्क्याने फुगतो. ओबीसींची संख्या जेवढी फुगेल तेवढा ताण या सवलती देण्यावर येणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्याच्या वर आरक्षण देता नाही. (नियम व अपवाद यांच्या न्याय्य संतुलनात यापेक्षा अधिक आरक्षण देता येणे शक्य नाही.)
उच्च व क्रीमी मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणा-या राष्ट्रवादी पक्षाचे छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. सध्याच्या ओबीसी आरक्षणात मराठ्यांना सामील करून घेण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. याच पक्षाचे काही नेते वरिष्ठांची फूस असल्याने मराठ्यांना ओबीसींचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आंदोलन करीत असतात. भुजबळाच्या ओबीसी प्रेमाला स्वपक्षातील असुरक्षिततेची अशीही एक किनार आहे. एकाच पक्षाच्या एवढ्या विरोधाभासी भूमिका असण्याबरोबर वेळ आली तर आम्ही आमचा पक्ष कदापि सोडणार नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीरही करून टाकले आहे. म्हणजे पक्ष की ओबीसी यातली निवड स्पष्ट आहे. या त्रांगड्याचा अर्थ काय समजायचा ?
वाली नसणा-या एकाद्या रूपवान स्रीचे सौंदर्यच तिच्या सामान्यतेने जगण्याआड येऊ शकते. ओबीसींची मतदार म्हणून डोळ्यात सलणारी संख्या व सक्षम नेतृत्वाचा अभाव त्यांच्या विकासाच्या आड येत असल्याचे दिसते आहे. आश्वासनांची अनेक गाजरे, प्रत्यक्षात मात्र काहीनाही अशी ओबीसींची अवस्था झाली आहे. आताच्या आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घटनादुरूस्तीशिवाय देता येत नाही हे या नेत्यांना माहित असून देखील केवळ मतांच्या लालसेपोटी ओबीसींना नादी लावण्याचा खेळ चालू आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आक्टोबर २००४ च्या निवडणूकीच्या काही दिवस आधी म्हणजे आगस्ट २००४ मध्ये महाराष्ट्र मंत्रीमंडळाने तिस-या सूचीची यादी करून केंद्र शासनाला पाठवण्यास मंजूरी दिली. त्यावेळी काही आमदारांनी, मंत्र्यांनी पेपरमध्ये आपापले फोटो चमकवले. तिस-या सूचीत आम्ही तेली समाजाचा समावेश केला याच्या जाहिराती झळकावल्या. त्याचा परिणाम म्हणून तेली समाजाची भरपूर मते घेऊन अनिल देशमुख (काटोल) व सतीश चतुर्वेदी (नागपूर पूर्व) हे दोन्ही बिगरओबीसी भरघोस मतांनी निवडून आले. मात्र या यादीवर नंतर आक्षेप घेण्यात आले. खुद्द छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून तारून नेण्यासाठी ओबीसी मतांचीच बेगमी कामी आली. अशा या ओबीसींचे प्रश्न मार्गी लावायचे नाहीत व दर निवडणुकीत मते मात्र लाटत जायची अशी ही रणनिती आहे.
वाढीव सवलतींचा लाभ ख-या लाभार्थींना न होता त्या त्या जातीतील सत्ताधा-यांनाच होत असल्याचे लक्षात आले आहे. खरे म्हणजे सद्यपरिस्थितीत ओबीसींचे लाभ मिळवण्यासाठी तशी जातवार जनगणनेची आवश्यकता नाही. ओबीसीत समावेश होण्यासाठी जातीच्या संख्येचा निकष नाही. न्यायालयात या वर्गाच्या वाढीव मागण्यांसाठी मात्र ख-या आकडेवारीची गरज भासू शकते. मात्र तेथेही आरक्षणाच्या मर्यादेचा घोळ आहेच.
अशा अविश्वासार्ह्य जनगणनेतून निर्माण झालेल्या आकडेवारी बद्दल विवाद होऊ शकतात. जातीजातीत तेढ निर्माण होऊ शकते. (मराठा-ओबीसी वाद हे ताजे व चांगले उदाहरण आहे) न्यायालयेही अशा आकडेवारीवर कितपत विश्वास ठेवतील हीही शंका आहे. कलम ३४० अन्वये ज्या घटनात्मक अधिकाराचा उल्लेख या लेखात केला आहे तो कधीच कार्यरत असून त्यानुसार केंद्र व राज्य मागासवर्गीय आयोग ओबीसींचे निकष व अमलबजावणी सक्षमतेने हाताळताहेत. मराठ्यांना हे आरक्षण मिळू न देण्यात या आयोगाचीच निष्पक्षतता कारणीभूत आहे. आरक्षण वा सवलतींचे लाभ हे ‘कमाल’ पेक्षा ‘पात्र’ लाभार्थ्यांपर्यंत पोचावेत हे खरे उदिष्ट्य असायला हवे. मच्छीमाराला जसे मासे मारण्यासाठी सागरातील माशांच्या गणनेची आवश्यकता नसते, तद्वतच एकदा ओबीसींचे निकष पार केले की उपलब्ध विहित लाभ पदरात पडायला तशी काही अडचण नसते. अडचण होते ती आटा कम फकीर ज्यादा या परिस्थितीची.
आरक्षणाचे प्रमाण वाढवायचे असेल तर नचिअप्पन समितीचा अहवाल केंद्राने स्वीकारला पाहिजे. या अहवालात राज्यांनी ओबीसींच्या सवलती व आरक्षणाबाबत केलेल्या हेळसांडीचा लेखाजोखा आहे. त्यांनी सुचविलेल्या तरतुदींचा योग्य अंमल झाला तर ओबीसींना बराच दिलासा मिळू शकेल. तातडीने घेण्यासारख्या या कामात ओबीसींना या सत्ताधारी व विरोधी नेत्यांची खरी मदत लागणार आहे. या ओबीसी नेत्यांच्या ओबीसी प्रेमाची खरी कसोटी लोकसभेत या नचिअप्पन समितीच्या अहवालावर चर्चा व तो अहवाल स्वीकारायला भाग पाडण्यातच लागणार आहे. नव्हे ती जबाबदारी ओबीसींनी या दोघांवर टाकली पाहिजे, कारण तेच त्यांचे खरे कार्यक्षेत्र आहे. अन्यथा येणा-या निवडणुकांमधून मतांसाठी ओबीसींशी चालू असलेले ‘फ्लर्टींग’ पुढेही असेच चालू राहील.
डॉ.गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com