काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
10 Jul 2010 - 12:49 pm
गाभा: 

परवा डी.एन्.ए. वृत्तपत्रात "काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती" (Kashmir's New Reality) या विषया लेख वाचनात आला. श्री. आर्. जगन्नाथ यांचे लेख बर्‍याचदा प्रश्नाला थेट हात घालणारे असतात व एक बाजु ठाम घेणारे असतात. त्यांची मते माझ्या मतांशी कधी जुळतात तर कधी विरुद्ध असतात. मात्र त्यांनी मांडलेले मुद्दे नेहमीच विचार करण्याजोगे असतात असे मला वाटते. त्यांचा हा लेख मला आवडला त्याचे त्यांच्या परवानगी शिवाय त्यातील काहि भागाचा इथे स्वैर अनुवाद देत आहे:

ज्याने काश्मिरमधील दुर्दैवी घटना टिव्हीवर घडताना बघितली असेल त्याला कोण आक्रमक आणि कोण बचावात्मक परिस्थितीत आहे हे सहज कळून येईल. तो जमाव दंगल करतोय, चिथावतोय, आक्रमण करतोय आणि पोलिस व सशस्त्र बळावर कुरघोडी करतोय. ते (सैनिक) मात्र त्यांच्या कोषात आहेत, तिथुनच त्यांना जितका शक्य आहे तितका बचाव करत आहेत. जर आपण नागरीकांच्या मृत्यूबद्दल ऐकत असु तर ते का ह्याची कल्पना करणं कठीण नाहि: जेव्हा हल्लेकरी खूपच जवळ येतात किंवा खूप भीती परवू पाहतात तेव्हा हे पोशाखातले सैनिक गोळ्या चालवतात, आणि कधीतरी, कोणीतरी मारलं जात. (म्हणजे) ते (सैनिक) गोळ्यामारण्याची मजा घेणारे होतात असे नाहि.

ही वेळ आपल्या सैनिकांना हतोत्साहित करण्याची नाहि. ते अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे आपल्या देशासाठी लढत आहेत. आपले राजकारणी नेहमी गोंधळ घालतात आणि तो निस्तरायला सैन्याला पाठवले जाते. (आणि दुसरीकडे) लोकांनी सैन्याला गुन्हेगारांसारखे (थोडे कमी) समजलेले तथाकथित मानवाधिकारवाल्यांना हवेच आहे.


एक आहेत ते अशक्य त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताहेत. आणि कोणी असं म्हणत नाहि की सैनिकांना नागरीकांवर इतकं सैल सोडावं की ते जेव्हा हवं तेव्हा बलाक्तार किंवा खून पाडतील. मात्र हेही खरे की कायदाचिहिन एकट्या दिल्लीमधे काश्मिरपेक्षा जास्त बलात्कार आणि खून होत आहेत मात्र ह्यांना सैनिकांनाच काश्मिरचे खलनायक ठरवायचे आहे. लिबरल म्हणवणार्‍यांनी लक्षात घेतले / ठेवले पाहिजे की हे सैनिक सुद्धा इतरांनइतकेच भारतीय आहेत, भारताचे नागरीक आहेत.


:
:

सदर लेख प्रताधिकार मुकत आहे की नाहि माहीत नाहि म्हणून फक्त काहि भाग स्वैर अनुवादीत केला आहे. इंग्रजीतला पूर्ण लेख इथे वाचता येईल

सध्याच्या प्रश्नावर भारत सरकारची, काश्मिरच्या राज्य सरकारची, मेहबुबा मुफ्तींची, हुर्रीयतची, भाजपची, काँग्रेसची, विहिंपची वेगवेगळी भुमिका आहे. काश्मिरातील अंतर्गत प्रश्न कसे सोडवावेत? सैन्याचा वापर करावा का? कसा व किती करावा?

याबद्द्ल व याच्याशी संलग्न प्रश्नांवर मिपाकरांना काय वाटते?

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Jul 2010 - 12:56 pm | यशोधरा

लिबरल म्हणवणार्‍यांनी लक्षात घेतले / ठेवले पाहिजे की हे सैनिक सुद्धा इतरांनइतकेच भारतीय आहेत, भारताचे नागरीक आहेत.

आणि लिबरल आणि सैनिकांमधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे हूं का चूं न करता हे सैनिक जीवावर उदार होऊन देशासाठी लढत आहेत. एखाद्या एनजीओच्या आर्थिक बळावर, एसीमधे बसून लिबरल बनणे आणि स्वतःच्या जीवाला जराशीही तोशीस न लावून घेता अखिल मानवजातीचा पुळका येणे खूप सोपे!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2010 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार

(आणि दुसरीकडे) लोकांनी सैन्याला गुन्हेगारांसारखे (थोडे कमी) समजलेले तथाकथित मानवाधिकारवाल्यांना हवेच आहे.

ह्या मानवाधिकारवाल्यांची एक लिस्ट बनवुन, जेंव्हा जेंव्हा अशी दंगल होईल अथवा जमाव हिंसक बनण्याची शक्यता असेल त्या त्या वेळी ह्या मानवाधिकारवाल्यांना त्यांना रोकण्यास का पाठवत नाहीत ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पुष्करिणी's picture

10 Jul 2010 - 1:23 pm | पुष्करिणी

ते जातात की, सगळं झाल्यावर मेणबत्त्या लावून परत येतात

पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 2:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि वांझोट्या चर्चा करतात, लेख लिहीतात, दंगलखोरांना, हिंसक माओवाद्यांना पाठींबे देतात, कसले कसले लेखनविषयक पुरस्कार मिळवतात ...

अदिती

शानबा५१२'s picture

10 Jul 2010 - 3:22 pm | शानबा५१२

ही दंगल घडवण्यात पाकीस्तानी अतिरेकींचा हात आहे अस म्हणत भाजपाचे प्रकाश जा. यांनी "त्या शहरात ट्रकने दगड आणले जातात,शिकवलेल्या माणसांकडुन दंगला घडवल्या जातात" अस विधान केल.बाकी सर्व बाजुंना इमारती असलेल्या भागात दगड आणि ते ही एवढे मजबुत दगड येतात कुठुन हीसुध्दा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

सैनिक व अत्याचार म्हणाल तर खर चित्र गावात जाउन बघा तिथे अन्याय 'मसालेदार व धक्कादायक' नसतो म्हणुन आपल्या एकण्यात येत नाही.पण तिथली परीस्थीती कठीण आहे.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

अभिषेक९'s picture

10 Jul 2010 - 7:14 pm | अभिषेक९

काश्मीर... गेल्या ६० वर्षांपासून घोळ चालूच आहे... ४७ चे युद्ध, ६५, ७१ च्या युद्धातील ९५००० पाकिस्तानी सैनिक, कारगिल, आग्रा परिषद, पडद्यामागची चर्चा... असे बरेच प्रकार झाले... निकाल काय तर अजून काश्मीर चे घोंगडे भिजतेच आहे... का ?? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे!! आपले सैन्य / सुरक्षा दल तो सोडवायला कमी पडत आहेत ? का काश्मीर च्या लोकांना शांती नकोच आहे ? का ते नेहमीच इस्लामाबादच्या चिथावणीला बळी पडतात? का दिल्ली ला तो प्रश्नच मुली सोडवायचा नाही? का यात खरच कोण बाहेरच्या शक्तीला फायदा आहे, उदा. अमेरिका?

खूप प्रश्न आहेत, कधी असे वाटते तर कधी तसे... पण अजून तरी उत्तर मिळाले नाही!! का आपल्यालाच उत्तर शोधायची घाई आहे!!

नुकत्याच झालेल्या घडामोडी पाहता आणि श्रीनगर आणि परिसरात दिसलेला भारत राष्ट्राविरुद्ध राग पाहता, अंगावर शहरे आले.. हीच का आपली राष्ट्र उभारणी... म्हणजे नक्की कोण खरे कोण नाही... कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही...

जेवढे माझे वाचन / अभ्यास आहे, तेवढ्या वरून एवढाच अंदाज येतो की हा सारा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे... नव्हे तर कोणाची हिम्मतच होईना काही ठोस निर्णय घेण्याची. ना कॉंग्रेस ची सध्या आहे (तशी ती ६० वर्षात कधीच दिसली नाही), ना भाजप ची होती. राज्यातल्या पक्षांबद्दल बोलाल तर ओमार अब्दुल्ला ची NC यांची भूमिकेत मात्र सलगता आहे. विरोधी पक्ष पीडीपी मात्र कायम आपले रंग बदलताना दिसतो. त्यांना मुळात भारतात राहण्याची इच्छाच दिसत नाही. उलट NC वेळोवेळी राष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करताना दिसते.

सध्याच्या घडामोडींचे मूळ कुठेतरी पाकिस्तानात आहे यात बरेच तथ्य आहे. वेळ पण योग्यच निवडली आहे. चिदंबरम पाकिस्तानात, मनमोहन सिंघ कॅनडात आणि श्रीनगर पेटलेले असे एक चित्र जगासमोर उभे करण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला. इस्लामचे नाव दिले की त्या नावाखाली किती लोक मारायचे याला काही मर्यादा नाही. तेच times now ने प्रकाशित केलेल्या telephone conversation वरून स्पष्ट होते. आत यात दिल्ली ने काय करावे??

याला खरच उत्तर नाही. पण थोडी राजकीय इच्छाशक्ती आणि थोडा 'दम' दाखवला तर हे नक्की शक्य आहे... ज्या अर्थी काश्मीरचा एक तरुण IAS साठी होणाऱ्या परीक्षेत भारतात पहिला येतो, ज्या अर्थी काश्मीर मतदानात हिरहिरीने भाग घेतं, सजाद लोने सारखे एकेकाळचे फुटीरवादी पण निवडणुकीत भाग घेतात, त्याअर्थी अजूनही वेळ घेली नाही. काश्मीर शांत झाले की अपोआप काश्मिरी लोक राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील. होत काय तर प्रत्येक वेळेस त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा प्रश्न उभा केला जातो, पण राष्ट्राने त्यांना काय दिले हे पण लक्षात घेतले पाहिजे. नाही का??

स्वाती२'s picture

10 Jul 2010 - 7:22 pm | स्वाती२

दुव्या बद्दल धन्यवाद.

अशोक पतिल's picture

10 Jul 2010 - 10:27 pm | अशोक पतिल

ते जातात की, सगच झाल्यावर मेणबत्त्या लावून परत येतात.सर्वात अगोदर ह्या मानवाधिकारवाल्यांना गोळया घाला.

तिमा's picture

11 Jul 2010 - 7:48 am | तिमा

सत्यपरिस्थिती समजावूनच घ्यायची नाही असे आत्तापर्यंत भारत सरकारचे धोरण वाटते.
आपल्याला आवडो वा न आवडो, बहुसंख्य काश्मिरींना 'हिंदुस्तान' परका वाटतो.
पाकिस्तानने गिळलेला व चीनने गिळलेला भाग वगळून जर काश्मीरचा नकाशा बघितला तर असे लक्षांत येईल की ही लढाई आपण हरलो आहोत. आपली एखादी गोष्ट दुसर्‍याने बळकावलेली असताना व ती आपण परत मिळवू शकत नसताना ती आपलीच आहे असे समजणे ही आत्मवंचना आहे.
हा प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या अनेक संधी वेळोवेळी वाया घालवल्यामुळे व राजकीय इच्छाशक्ति, धाडस हे अजिबातच नसल्यामुळे हा प्रश्न कधी सुटेल असे वाटत नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सहज's picture

11 Jul 2010 - 8:51 am | सहज

यातला पाकव्याप्त व चीनकडे असलेला प्रदेश, हा स्वतंत्र भारतात किती वर्षे आपल्या अधिपत्या खाली होता? व गेल्या किती वर्षे नाही आहे?

अर्थात हा नकाशा http://en.wikipedia.org/wiki/File:Kashmir_map.svg#file येथुन घेतला आहे. तो चुकीचा असेल तर कृपया अशीच विभागणी दाखवणारा नकाशा दाखवा. हे तर नक्की आहे की पाकव्याप्त काश्मिर व चीनकडे काही भूभाग आहे.

तसेच गेल्या ५० वर्षात भारत-पाक चर्चेत काश्मिर प्रश्नावर नेमकी झालेली प्रगती काय आहे? का सुरवातीला होता तोच वाद आजही आहे की अजुन चिघळला, वाढला आहे? जर गेली ५०-६० वर्षे एखादा वाद परस्पर चर्चेत सुटत नसेल तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपापली वकीली करुन एकदाचे आजच्या घडीला संयुक्तीक असा न्याय मागणे चुकीचे आहे का?

जर तुम्ही त्या भारताच्या अधिपत्याखाली नसलेल्या प्रदेशात जन्मापासुन रहात असाल व भारतीय नागरीकत्व हक्क, फायदे, जबाबदार्‍या, शिक्षण सोडाच फक्त भारत द्वेष ऐकायला मिळाला असेल (जसा आपल्याकडे पण त्यांनी आपला भूभाग बळकावला, ते दहशतवादी इ अशी जनधारणा घट्ट आहे) तर एक दिवस अचानक मनाने भारतात येउ शकतील का?

भारत - पाकीस्तान बरोबर या प्रकरणात स्थानीक संपुर्ण काश्मिरच्या लोकांचे मत धरले पाहीजे की नाही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2010 - 2:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>गेल्या ५० वर्षात भारत-पाक चर्चेत काश्मिर प्रश्नावर नेमकी झालेली प्रगती काय आहे ?
गेल्या पन्नास वर्षात काश्मीर बाबत काहीच तोडगा निघालेला नाही. राजोरी,पुंछ,कुपवाडा, या परिसरात पाकडे नेहमीच नाहक गोळीबार करतात. कधी काळी आपण लाहोरपर्यंत धडक मारली होती आता इतिहास झाला आहे. आपण दाखवलेल्या भारत म्हणून नकाशात दिसणारा कोटली,मिरपूर,भिमबार आपला भाग नाही. वर दिसणारा गिलगीट ही नाही. अक्साई चीनबाबतही तसेच असावे.

इतिहासात काश्मिरमधे हिंदु जनतेचे प्राबल्य होते असे वाचून आहे. आणि १९५१ च्या शिरगणतीत तिथे सत्यात्तर टक्के संख्या मुस्लीमांची होती. तेव्हाच जर काश्मीरच्या जनतेने ठरवले असते की, कोठे विलीन व्हायचे तर मला वाटतं त्यांनी पाकिस्तान पसंत केला असता. काही लोक म्हणतात की स्वतंत्र राहिले असते. आजही दुर्दैवाने बंदुकीच्या जोरावर काश्मीर आपले आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. फुटीरवाद्यांनी काश्मीर कधीच शांत होऊ दिला नाही, होऊ देत नाही. आणि आपण म्हणता तसे तेथील जनता आता कंटाळली आहे. भारतीय सैनिक त्यांना शत्रु वाटतात. त्यांची प्रतिमा तिथे मलीन होत चालली आहे. काश्मीरसरकारच त्यावर तोडगा काढू शकतो त्यावर भारतीय लष्कर बोलावणे हा उपायच होऊ शकत नाही असे वाटते.

या निमित्ताने 'पंचावन्न कोटीचे बळी या गोपाळ गोडसेंच्या पुस्तकातील आठवण होते. त्यात 'काश्मीर' नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे त्यात काश्मिरविषयी बराच इतिहास आणि राजकारण वाचायला मिळते . कश्मीर मधील इस्लाम कसा वाढत गेला त्याचा एक इतिहास असाही आहे की, सिकंदर नावाच्या सुलतानाने तेथील हिंदूंना सांगितले की, काश्मीरमधे राहावयाचे असेल तर धर्मांतर, देशत्याग किंवा मरण याला स्वीकारावे. त्यात अनेक हिंदुंचा शिरच्छेद झाला. काहींनी धर्मांतर केले.
पुढे कोणी हिंदु राजा आला तेथील धर्म बदललेल्या मुस्लीमांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा हिंदु धर्मात यायचे आहे. राजाने काशीच्या पंडितांना विचारले तर पंडित म्हणाले असे काही करता येणार नाही. राजा म्हणाला मी काश्मिरचा राजा आहे, मी स्वत: मोठा यज्ञ करुन त्यांना हिंदुधर्मात प्रवेश करुन देईन. तिथेही हे राजपुरोहित आडवे आले त्यांनी तुम्ही असे काही कराल तर आम्ही झेलम नदीत जीव देऊ असे सांगितले. काहींनी नदीत उड्या मारल्या राजाने तो यज्ञ रद्द केला. पुढे ते नागरिक मुस्लीम म्हणून वाढले.

आज संपूर्ण नसेल पण त्यांचीच पिढी हातात दगड घेऊन भारतीय सैन्यकाविरुद्ध लढतांना दिसत आहे. मला काही त्या पुरोहितांना दोष द्यायचा नाही. बिचार्‍यांचा माणसांपेक्षा श्रुतिस्मृतिपुराणावर विश्वास होता.

दुर्दैवाने असे म्हणावे वाटते की, काश्मीरची जनता दुर्दैवी आहे. वेगवेगळ्या शासनव्यवस्थेत राजेमहारांजापासून ते आजच्या सरकारापर्यंत पिढ्यानपिढ्या तिथे शांतता नांदली नाही. पुढे कधी नांदेल तेही माहित नाही.

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

12 Jul 2010 - 9:33 am | ऋषिकेश

काही अतिशय रोचक प्रतिसाद आहेत. धन्यवाद.
हीच चर्चा मी अन्य संस्थावरही सुरू केली होती तेथील दुवा.
या दोन्ही ठिकाणची मते वाचून एक लक्षात येते की काश्मिर प्रकरणाला निदान फक्त पाकिस्तान किंवा अलगतावादी कारणीभूत नव्हते. उपक्रमावर श्री. थत्ते हे काश्मिर प्रश्नामागे जे नेहरूंना दोषी धरण्यात येते त्याचा सुंदर प्रतिवादही केला आहे, जो वाचनीय आहे.

याविषयावर मिपाकरांची अजून मते वाचण्यास उत्सुक आहे.

कन्फेशनः या विषयावर इथे म्हणावी तशी चर्चा झाल्याचे दिसले नाहि म्हणून थोडासा खाली गेलेला धागा एकदा वर घेऊन येत आहे. :)

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा