ताम्रोत्सव...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
22 May 2010 - 1:01 pm

वैशाख वणवा पेटला की गुलमोहर देखील पेटतोच. तो असा तसा पेटत नाही, दुरून नखशिखांत अग्निज्वालांनी वेढलेला भासतो. मृगजळामागगील गुलमोहराची फुले म्हणजे सक्षात ज्वालांचे ज्वलंत उदाहरणच! उन्हाळ्यामुळे त्याची हिरवी पाने झडली तरी लाल कळ्या उमलून येतात, त्यातून फुले फुलतात. अन् आख्खं झाड ताम्रोत्सव साजरा करतांना दिसतं. इतरांची पानझड झालेली असतांना हे झाड मात्र ओकंबोकं न वाटता काहीतरी भरगच्च वाटू लागतं आणि ऐन उन्हाळ्यात शीतलता, शांतता शोधणारी आपली नजर त्या भगभगीत फुलांमुळे आणखीनच गरम होण्याची शक्यता असते
गुलमोहराच्या फुलांचा एक वेगळाच साचा असतो. एकूण पाकळ्या पाच. चार आत्यंतिक लालभडक तर पाचवी पाकळी जराशी हटके रंगाची. लालभडक रंगावर पांढऱ्या शेड्सचे फटकारे१ फुलातील लक्षवेधी भाग हाच. तिला नावानेही ‘राणी’च म्हणायचं.चौघांच्या गराड्यात सापडलेली ती एक चित्तवेधक युवतीच जणू! लहान मुले गुलमोहराच्या पाकळ्यांतील नेमका हा सम्राज्ञीचा भाग विलग करून तिचा आस्वाद घेतात. आंबट गोड चवीच वेड तेव्हापासूनच अंगवळणी पडणारं. एका राणीच्या स्वयंवरासाठी जमलेले ते चार स्पर्धक असावेत किंवा राणीचे अंगरक्षक तरी असावेत इतका एकत्र आलेला तो जामानिमा पाहून कुणाचंही (फुलांवर उडणाऱ्या फुलपाखरांपासून मनाशी जडणाऱ्या पाखरांपर्यंत) कुतूहल जागं व्हावं अशी ती निसर्गाची किमया! असा गुलमोहराचा लौकिक.
....
परंतु त्या माळावरच्या गुलमोहराचा मामलाच निराळा होता...
एकाकी असलेलं ते झाड अनेक प्रेमिकांच आशास्थान होतं, हक्कानं भेटण्याचं ठिकाण होतं. माळरानावर बरीच झाडी असली तरी उन्हाळ्यात पेटलेला गुलमोहर एकटाच असायचा. गावापासून दूर एकांतात त्याची वस्ती. त्याभोवती बसायला ओबडधोबड दगडं होती. शिवाय कुणाचा वावर नाही, कुणाचे एक नाही की दोन नाही. एकदम चिडीचुप्प जागा. त्यात कॉलेज कुमारांचे सुट्टीचे दिवस. अभ्यास नाही, परीक्षा संपलेली. मोठी माणसं त्यांच्या त्यांच्या कामात गर्क. भरीस भर म्हणून गावात परगावचं बहुदा शहरातलं नवं पाखरू आलेलं. मग काय पोरांना प्रेमाचं भरतं येणार नाही तर काय हो?
गुलमोहराची फुले फुलली की त्या प्रेमिकांचा उत्सव सुरु व्हायचा. कुणीतरी त्या नव्या पाखराला घेऊन गुलमोहराची ओळख करून देण्याच्या बहाण्याने माळावर घेऊन येतो. तिलाही ती निवांत जागा आवडते. मग तिथे गप्पांना ऊत येतो. शहर आणि गाव यातला फरक दूर होऊ लागतो.. आणि जसा जसा सूर्य मावळतीला डोंगरांत जाऊ लागतो तसे तसे हे दोघे आणखी जवळ येऊ लागतात. अंधारू लागल्याने ते दोघे जायला निघतात. फुलांचा रंग आता काळोखाने मातकट होत जातो. अन् या प्रेमिकांच्या प्रीतीला मात्र नवा बहर फुटलेला असतो. गुलमोहर काळोखात बुडणं अन् ह्यांचं प्रेम उजेडात येणं हा योगायोग की प्राक्तन, की नवकथा?
कितीतरी प्रेमी युगलांचा प्रेमळ थंडावा पाहून गुलमोहर शांत अन् स्तब्ध उभा राहतो. जणू पाठमोऱ्या प्रेमिकांना तो मानवंदनाच देत असतो.

जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

22 May 2010 - 5:27 pm | शुचि

मस्त!!! फार आवडला नेहेमीप्रमाणे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अरुंधती's picture

22 May 2010 - 8:11 pm | अरुंधती

दिवटेसाहेब, फोटू का दिसत नाहीए? :(

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/