इन्द्रराज पवारांचा (http://misalpav.com/node/12007)पिंडदानाचा अनुभव एक अशीच आठवण जागी करून गेला. त्यांनी पिंडदानाचे दोन वेगवगळे विधी का असा प्रश्न विचारला आहे. मला त्याचे उत्तर असे द्यावेसे वाटते की विधी ज्या समाजाची जशी समूहदृष्टी तसे आकार घेतात.
सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव वैकुंठावर घेऊन गेलो तेव्हा त्या दिवशी गर्दी अशी नव्हती पण क्यु मध्ये ४-५ पार्थिवे होती. काकांच्या पार्थिवा अगोदर एका वृद्धम्हातार्या मजुराचे पार्थिव होते. तो एका सोसायटीचा वॉचमन म्हणुन काम करत होता. त्याचे क्रियाकर्म करण्यासाठी सोसायटीमधले काही लोक उपस्थित होते. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन दहनपूर्व विधी करायचे नाही असे काकांच्या आम्ही निकटर्तीयानी ठरवले होते आणि शांतपणे सर्व जण रांग पुढे सरकण्याची वाट बघत होते.
एवढ्यात हळुहळु लोकांची गर्दी वाढायला लागली म्हणता म्हणता १००-१५० मजुर आणि झोपडपट्टीवासीयांचा जमाव जमला. एक शववाहिका भरकन आली आणि एका पोरसवदा मजुराचे पार्थिव बाहेर काढून ठेवण्यात आले. इतका वेळ असलेली शांतता पूर्णपणे भंग पावली होती. जमलेल्या जमावाचा कर्कश्श गोंगाट चालला होता. मरण पावलेला तरूण भाजून मृत्युमुखी पडला होता.
आज दहनासाठी रांग आहे आणि नंबर लागायला वेळ लागेल असे जेव्हा जमावाच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्या काही जण पुढे येऊन अगोदर वाट पहात असलेल्या लोकांकडे जाउन आम्हाला रांगेत पुढे जाउ द्या म्हणुन आग्रह करु लागले. अगोदर वाट पहात असलेल्या लोकानी शांतपणे जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला तेव्हा जमावाने आवाज वाढवायला सुरुवात केली आणि वैकुंठाचे ऑफिस गाठले. ऑफिसात ते काय करतात याची मला त्या प्रसंगात पण उत्सूकता निर्माण झाली म्हणुन मी पण हळुच मागे गेलो.
"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!" जमावातील एकाने अर्ज केला.
ऑफिसातील कर्मचार्याने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की, एकच दाहिनी चालु असल्यामुळे आज वेळ लागेल याची कल्पना दिली. पण जमाव ऐकायच्या मनस्थितीत नव्ह्ता.
"मालक, तिकडे स्लॅब अर्धवट राहिलीय. तुमचं च्या-पाणी देतो की राव!" गर्दीतून एक आवाज आला. जमाव 'च्या-पाण्या'वर आल्याने वैकुंठातले कर्मचारीपण खजिल आणि हतबल झाले आणि बाहेर येउन रांगेत ताटकळत असलेल्या लोकांची परवानगी मागू लागले.
साहजिकच सुशिक्षितपणाने झुंडशाही पुढे हार खाल्ली. तोवर मृत्युबद्द्लच्या सर्व जाणीवा बोथट होऊन गेल्या होत्या. मी ज्या समाजात जन्माला आलो आणि वाढलो त्याने दिलेला सुसंकृतपणा हा कुचकामाचा असून तो कमकुवतपणा असल्याची खात्री झाली.
अजूनही वैकुंठावर कुणासाठी जायची वेळ आली त्या दिवशीचा कोलाहल आठवतो, आणि कानात घुमत राहतात ते शब्द - "ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"
प्रतिक्रिया
21 Apr 2010 - 1:10 pm | बिपिन कार्यकर्ते
"मालक, तिकडे स्लॅब अर्धवट राहिलीय. तुमचं च्या-पाणी देतो की राव!"
'द शो मस्ट गो ऑन' अशा प्रकारची जीवनेच्छा मृत्यूवर नेहमीच मात करते याचे उत्तम उदाहरण...
आत्तापर्यंत बर्याच प्रसंगांना उपस्थित राह्यलो आहे (एकदा तर मृतदेहाच्या बाजूला बसून संपूर्ण रात्र काढली होती एका अंधार्या खोलीत). इतक्या टोकाच्या शोकातसुद्धा मागे राहिलेल्यांची जीवनेच्छा तितकीच तीव्र असते हे बघितले आहे. पण असेही दोन प्रसंग पाहिले आहेत की शोक खरोखर इतका तीव्र होता की एका प्रसंगात मृत व्यक्तीची बायको आणि दुसर्या प्रसंगात मृत व्यक्तीचे वडिल तिथल्यातिथे मृत झाले होते.
बिपिन कार्यकर्ते
21 Apr 2010 - 1:24 pm | युयुत्सु
'द शो मस्ट गो ऑन'
हे मला तितकसे पटले नाही कारण वैकुंठावर आलेला प्रत्येक जण ज्याचा त्याचा शो सोडून येतो तिथला कार्य्भाग आटपला की तो ज्याला त्याला पुरा करायचा असतो.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Apr 2010 - 1:32 pm | मनिष
छोटेखानी प्रसंग चांगला वर्णन केला आहे....
दुर्दैवाने हे आता सार्वत्रिकच होऊ लागलय, नाही का?