माणसांचा प्रश्न दिवसेंदिवस भारत, अमेरिकेत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर देशांतसुद्धा असेलच. रात्रीसुद्धा आणि विशेषकरून दिवसा उजेड पडल्यावर या माणसांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या दिवसाच्या मोठमोठ्या महत्त्वाकांक्षामुळे जंगलतोडसुद्धा होते.
झाडे, पशु-पक्षी, सगळ्यांनाच या माणसांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने अपघात होऊन प्राण्यांचा मृत्यू होण्याचा संभव असतो. मनुष्यप्राणी सोडून सर्वांनाच माणसांचा त्रास होतो. माणूस (वाहन) चालवून/लचका तोडून प्राण्याला मरण देवू शकतो. माणसांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.
काही कथित मनुष्यप्रेमी कुत्रे या माणसांच्या घरांचं संरक्षण का करतात हे आकलनापलिकडचे आहे. त्यांना घाबरणे उचित नसेल तर मनुष्यप्रेमी प्राण्यांनी जंगली किंवा प्राणीसंघटनेच्या किंवा स्वत:च्या कल्पकतेतून त्या माणसांसाठी एक जरब/त्रास निर्मून त्यात त्यांना कोसावे आणि २४ तासांनी चावावे. नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी ऐकले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे! मनुष्यप्रेमी कुत्रे-मांजरी मंडळींनी एकदा तरी रात्री हमरस्ता सहीसलामत ओलांडून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल.एकदा तरी माणसांना प्राण्यांच्या मर्जीने आयुष्य जगणं भाग पडावं, त्यांच्या पिल्लांऐवजी इतर प्राण्यांनी दुधावर हक्क गाजवावा, एकदा तरी प्राण्यांच्या "स्वच्छता-मोहिमे"मुळे माणूस बेघर व्हावा, एकदा तरी प्राण्यांनी निर्माण केलेल्या विषारी वायूत गुद्मरून मरावा, एकदा तरी माणूस प्राण्यांचं वाहन बनावा, अशा माझ्यासारख्य असंख्य प्राण्यांच्या अनेक इच्छा आहेत.
तसेच माणसांकडे राहणार्या पाळीव मनींनी (मांजर म्हणू नका बरं! त्या चिडतील आणि त्यांच्या 'मालकिणी'ही !) आमच्यासारख्या रस्त्यावरील मांजरींचे बिनधास्त चालणे मुश्कील करून टाकले आहे. (त्यांनी पट्टा बांधून स्वत:ला सुरक्षित ठेवलंय आणि म्युनिसिपालटीची "माणसं" आम्हाला उचलून नेतात X( ) एवढे बरे की, निदान जंगली प्राण्यांना, विशेषत: बिबट्यांना आणि पिसाळलेल्या हत्तींना माणूस घाबरतो आहे. नाहीतर माणसापासून सगळंच भीत भीत करण्याची पाळी येईल.
याबाबत काय करता येईल?
पाळीव श्वान व मन्या "माणूस"मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतात?
मनुष्यप्रेमी श्वान, मनी, गोमाता, ढवळ्या-पवळ्या, अश्व, या माणसांना अद्दल का नाही घडवत?
माणसांबाबत कुठे तक्रार करायची?
हत्ती पिसाळून, बिबट्या घरात घुसूनही माणूस शहाणा का होत ननाही? प्राणीप्रेमी माणसे प्राणीहक्कांची राखण करतात, पर्यावरणसंतुलनास त्याचा उपयोग होतो, ही एक वेगळी गोष्ट झाली, पण म्हणून सामान्य माणसांना प्राण्यांना त्रास देण्याची/मारून टाकण्याची परवानगी द्यावी, असे नाही.
प्रतिक्रिया
8 Mar 2010 - 5:50 am | राजेश घासकडवी
टेबलं फिरवून लेख डोक्यावर उभा करण्याची भट्टी चांगली जमली आहे. सगळेच विचार मान्य नाहीत (मूळ लेखातले पण मान्य नव्हते) पण वाचायला मजा आली.
राजेश
8 Mar 2010 - 11:05 pm | कवितानागेश
बरोबर आहे.