आधुनिक दान

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
14 Mar 2008 - 11:14 pm

बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्‍यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते.

एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू
देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील. तुम्हाला स्वत:त सामावून घेतील.

आम्ही मुंबईकरांनी प्रत्येक आपत्तीत हेच अनुभवले आहे. आणीबाणीच्या प्रसंगात मुंबईकर दुसर्‍यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतो. संकटकाळी समोरच्याला जमेल ती मदत करणे हाच अस्सल मुंबईकराचा धर्म होय.

एकच उदाहरण द्यायचे म्हणजे बाँबस्फोट इ. झाल्यावर रक्त देण्यासाठी लागणारी रांग. अगदी लांब लांबहून लोक त्यासाठी ज्या ठिकाणी निकड असेल त्या ठिकाणी पोहोचतात. तरुण, वयस्क, बायका कोणीही मागे राहात नाही.

मुख्य म्हणजे रक्तदानात दिवाभीत समजला जाणारा गुजराती समाज विशेष पुढे आहे (आता मराठी तरुणांच्या सबबी इथे दिल्या तर एका नवीन भांडणाला सुरवात होईल आणि मूळ विषय बाजूलाच राहिल).

मी तर म्हणेन रक्तदान असे दान आहे की ज्यामुळे तुमच्या खिशाला काही तोशीस पडत नाही. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे फारच थोडे रक्त आपल्या शरीरातून काढले जाते ते २४ तासांच्या आत भरून निघते.

विशेषत: रक्ताचा कर्करोग किंवा काही दुर्मिळ आजारी व्यक्तींसाठी निरोगी लोकांनी मुद्दाम रक्त दिले पाहिजे. कारण अश्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. पण बरेचदा आपण बघतो की रुग्णांचे जवळचे नातेवाईकसुद्धा रक्त द्यायचे टाळतात. ह्या पाठी अनेक गैरसमज कारणीभूत आहेत.

१) रक्त दिल्याने एड्स होतो - हल्ली सर्वत्र इंजेक्शनसाठी "वापरा आणि फेकून द्या" पद्धतीच्या सुया वापरल्या जातात. रक्त घेताना लागणारी सर्व उपकरणे निर्जंतुक केलेली असतात.

२) रक्त दिल्याने अशक्तपणा येतो - जर रक्त देण्यापूर्वी व दिल्यानंतर भरपूर खाल्ले तर कुठल्याही प्रकारे अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही असा माझा अनुभव आहे. कॉफी आणि बिस्किटे तर रक्तदान केल्यावर डॉक्टर लगेचच देतातच.

असो. ह्या विषयीचे इतर गैरसमज ह्या मंचावरील डॉक्टर मंडळी दूर करतीलच. पण मी एव्हढेच म्हणेन की दिलेल्या रक्तामुळे आपल्या शरीरात जी रक्ताची कमी निर्माण होते ती २४ तासांत भरून निघतेच वर
आपल्या शरीराकडून नवीन रक्ताची निर्मिती झाल्याने प्रसन्न वाटते.

www.indianblooddonors.com ही एक अशी निरपेक्ष वेबसाईट आहे जिथे प्रत्येक सुदृढ व्यक्तीने नाव नोंदविले पाहिजे. ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या जवळ रक्त देण्याची सोय उपलब्ध करून देते.

पूर्वी म्हणायचे,

अन्नदानं महादानं विद्यादानं अत: परम् ।

मी म्हणेन,

रक्तदानं परमोच्चदानं नेत्रदानं च सर्वोच्चेति ।

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

15 Mar 2008 - 10:59 am | सृष्टीलावण्या

www.indianblooddonors.com ह्या वेबसाईटवर आपल्याला रक्ताची गरज असेल तर इच्छुक
रक्तदात्यांची सूचीपण उपलब्ध असते. जी आणीबाणीत उपयोगी पडू शकते.

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

तरुण भारत's picture

15 Mar 2008 - 8:42 pm | तरुण भारत

रक्तदान हे महादान

प्रमोद देव's picture

15 Mar 2008 - 11:03 am | प्रमोद देव

मी आजवर जवळ जवळ तीस वेळा रक्तदान केलंय. गेली २०-२२ दर वर्षे १५ ऑगस्ट रोजी मी राष्ट्र सेवा दलाच्या शिबीरात रक्तदान करत आलोय आणि एरवी जेव्हा जशी जरूर होती तेव्हा तिथे जाऊन केलेय.
एक वेळ अशी होती की नुसते रक्त पाहूनच मला भोवळ आली होती; पण नंतर मनातले गैरसमज आणि भिती दूर झाल्यावर मी त्यावर मात करू शकलो. माझेही समस्त तरूण/तरूणींना आवाहन आहे की जमेल तेव्हा आणि जमेल तिथे निदान वर्षातून एकवेळा तरी रक्तदान करा.
तसे पाहायला गेले एखादी सशक्त व्यक्ती तीन ते सहा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून २-४ वेळा रक्तदान करू शकते. पण हे प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्यामुळे निदान वर्षातून एकदा रक्तदान करायला काहीच हरकत नाही.

सर्किट's picture

16 Mar 2008 - 6:45 am | सर्किट (not verified)

काय सांगताय !

तुम्हाला रक्त लागले की माझे रक्त खुशाल शोषून घ्या (ओ पॉझिटिव्ह आहे म्हाराजा, काय समजलात काय ?)

- (रक्त दाता.. जो काउंट ठेवत नाही) सर्किट

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 11:24 am | विसोबा खेचर

थोडक्यातच परंतु खूप चांगला लेख..

रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे आणि ते अवश्य करावं याबद्दल दुमत नाही. परंतु माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी कधीही रक्तदान शिबिरात रक्तदान करत नाही कारण बर्‍याचदा शिबिराचे आयोजक आपण केलेल्या रक्तदानाचा धंदा करतात व गरजू व्यक्तिला ते रक्त बर्‍यापैकी महाग पडतं.

मात्र कुणी कुठे ओळखीपाळखीत, नातेवाईकात, मित्रमंडळीत कुणी गरजू असेल तर मात्र रात्रीबेरात्रीही रक्तदान करायला मागेपुढे पाहात नाही. मात्र रक्तदान शिबिरात मी कधीही रक्तदान करत नाही...

मध्यंतरी पश्चिम रेल्वेवर जे सिरियल बॉम्बस्फोट झाले तेव्हा दुसर्‍याच दिवशी मुद्दामून ठाण्याहून जाऊन मी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात माझ्या जखमी मुंबईकरांकरता रक्तदान केले. स्वत:चं कौतुक सांगू नये, परंतु हे वाचून एखाद्या वाचकाला जरी, 'आपणही कधी असं करावं' असं वाटलं तरी मला ते पुरेसं आहे!

रक्तदानामुळे साहजिकच शरीरातील रक्त रिसायकल होते व अर्थातच ताजे रक्त शरीरात खेळू लागते! त्यामुळे रक्तदान हे रक्तदात्यालाही फायद्याचेच ठरते.

निरोगी प्रौढ व्यक्तिचे रक्तदानाच्या वेळेला फक्त ३५० मिलि एवढेच रक्त काढले जाते आणि मेडिकल सायन्सच्या नियमाप्रमाणे १२०० मिलिपर्यंत जरी रक्त गेले तरी मानवी जीवाला काहीच धोका नसतो. त्यामुळे ३५० मिलि रक्तदान करणे हे अत्यंत सुरक्षित आहे...

असो...

आपला,
(रक्तदाता) तात्या.

प्राजु's picture

15 Mar 2008 - 8:23 pm | प्राजु

भारतात असताना २ वेळा केले आहे रक्तदान. माझे बाबा तर दरवर्षी करतात रक्तदान.
लघुलेख आवडला.

आवांतर : मी कॉलेज मध्ये असताना माझ्या तब्बेतीमुळे "प्राजक्ता गेली करायला रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण" असा फिशपाँड पडला होता.
- (सर्वव्यापी)प्राजु

इनोबा म्हणे's picture

15 Mar 2008 - 8:30 pm | इनोबा म्हणे

"प्राजक्ता गेली करायला रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण"
हा हा हा! मग आणला का चमचा...

आपण साला आजपर्यंत एकदाही नाही केले,पण आता एवढे लोक सांगत आहेत म्हटल्यावर करायलाच पाह्यजे.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

स्वाती राजेश's picture

16 Mar 2008 - 12:50 am | स्वाती राजेश

माझ्या मुलाच्या शाळेमध्ये शिबीर होते मी व नवरा गेलो होतो. माझ्या नवर्‍याने रक्तदान केले पण तेथील डॉक्टर मला म्हणाले," तुम्ही करणार आहात का रक्तदान?, तुमच्याकडे पाहून मला वाटते कि तुम्हालाच एक बाटली रक्त द्यावे लागेल..

बाकी लेख आवडला. मस्त विषय...

सचिन's picture

16 Mar 2008 - 6:23 pm | सचिन

रक्तदानासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे.
साईट दिली आहेत, ती ही उपयोगी पडू शकेल. मनापासून धन्यवाद.
परन्तु, याव्यतिरिक्त विशेष काही माहिती लेखातून मिळू शकली नाही.
तुम्ही लिहिलेल्या गैरसमजांबद्दल बोलायचं झालं तर , मला नाही वाटत मिपाकरांपैकी कोणाचा असा काही गैरसमज असेल म्हणून.
मी देखील दर वर्षी वाढदिवसाला रक्तदान करतो, आणि इतर गरजेच्या वेळी..अर्थातच.

आणखी एक, तुम्ही नको म्हटलं असलं तरी हा मुद्दा मांडू इच्छितो.
रक्ताविषयी बोलताना गुजराथी - मराठी चा चिमटा टाळायला हवा होता...कारण ते कंसातले वाक्य निश्चितच बेसलेस आहे.
भांडण सुरू होईल आणि मूळ विषय बाजूला राहील म्हणून सबबी देत नाही असं तुम्ही म्हटलय्...तर मग ते वाक्यच तुम्ही टाकलं नसतत तर अधिक बरं झालं नसतं का ? म्हणजे तुम्ही चिमटा काढायचा..आणि आम्ही ओय.. सुद्धा म्हणायचं नाही ?

राजमुद्रा's picture

17 Mar 2008 - 1:27 pm | राजमुद्रा

रक्ताविषयी बोलताना गुजराथी - मराठी चा चिमटा टाळायला हवा होता...कारण ते कंसातले वाक्य निश्चितच बेसलेस आहे.
भांडण सुरू होईल आणि मूळ विषय बाजूला राहील म्हणून सबबी देत नाही असं तुम्ही म्हटलय्...तर मग ते वाक्यच तुम्ही टाकलं नसतत तर अधिक बरं झालं नसतं का ? म्हणजे तुम्ही चिमटा काढायचा..आणि आम्ही ओय.. सुद्धा म्हणायचं नाही ?

सचिनशी सहमत :)

सृष्टीलावण्या,
खरंच काय गरज होती? तुम्ही काय तिथे माणसे मोजायला गेला होतात का? गुजराती किती, मराठी किती ?
रक्तदान करताना जातीची पण नोंद करतात काय? तुम्हाला कुठून कळले?

राजमुद्रा :)

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Mar 2008 - 8:01 pm | ब्रिटिश टिंग्या

कावीळ झालेल्या व्यक्तीने रक्तदान करु नये असे म्हणतात्......खरं आहे का?
मी स्वत: रक्तदान करायला गेल्यावर मला हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि मला पुर्वी कावीळीची लागण झाली असल्याने माझे रक्त नाकारण्यात आले.....
या संबंधीत कोणी खुलासा करु शकेल काय?

आपला,
(कावीळ झालेला) छोटी टिंगी.

पिवळा डांबिस's picture

17 Mar 2008 - 4:48 am | पिवळा डांबिस

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाच्या रक्तात हेपाटायटिस (ए, बी, की सी माहित नाही) चे जंतू असतात. कावीळ बरी झालेली असली तरी ते जंतू म्हणे आयुष्यभर रक्तात रहातात. मला पूर्वी कावीळ झालेली असल्याने माझेही रक्त घेत नाहीत.
तेंव्हा तुम्हाला जर पुर्वी कधीही कावीळ झालेली असेल तर रक्तदान करण्यापूर्वी तिथे असलेल्या नर्सला ते सांगा...

इसम's picture

16 Mar 2008 - 7:56 pm | इसम

सर्वसाधारण रक्तगट असणार्‍या लोकांनी रक्तदान करण्यावर वरती पुष्कळ माहिती योग्यप्रकारे चर्चिली गेली आहे. मला दिला गेलेला एक सल्ला इथेही पारखला जाऊ शकतो म्हणून लिहितोय.
असाधारण रक्तगट असणार्‍यांनी गरजेवेळीच दान करावे असे मला एकदा, म्हणजे १५ वर्षांपूर्वी, सहजच रक्तदान करतांना तेथील डॉक्टरांनी बजावले होते. अशा लोकांनी आपले नाव आणि पत्ता योग्य संस्थांकडे नोंदवलेले असणे जास्त गरजेचे आहे असे त्यांचे मत होते आणि ते मला योग्य वाटले.

विषाणूंमुळे झालेल्या काविळीची लागण रक्ताद्वारे पुढे कैक वर्षांनंतरही होऊ शकते असे मी ऐकले होते.

-एक इसम

रक्त देतायत का लोक इथे?
मलाही द्या....

(५४ किलो)
अनिकेत