वेश्याव्यवसायाची नैतिकता

Primary tabs

धनंजय's picture
धनंजय in काथ्याकूट
11 Mar 2008 - 6:32 am
गाभा: 

या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती.

समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे?

कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो. दरोड्याने मिळालेल्या संपत्तीचे दान स्वीकारणेही आपल्याला मान्य होणार नाही. वेश्याव्यवसायाच्या जवळ राहून प्रगत झालेल्या कलांबाबत मात्र आपण तसे म्हणत नाही. अंग विकणारी कलावंतीण आणि अंग विक्षेपणारी कलावंतीण या दोघी पुष्कळदा एकच असू शकतात. पुण्यात नाट्योपयोगी वस्तूंची दुकाने बुधवार पेठेत, वेश्यावस्तीशेजारी आहेत, हे पूर्णतया योगायोगाचे नव्हे. लावणी रसिकतेने ऐकणारा आणि गाणारीशी चाळे करणारा रसिक एकच असू शकतो. अशा प्रकारे वेश्याव्यवसाय ज्याला शिवतो त्याला ओवळे करत नाही, हे त्याचे वेगळेपण.

(स्मृतिग्रंथादी धर्मशास्त्रांत वेश्याव्यवसायाविरुद्ध फार कडक धर्मनियम नाहीत. शिवाय पुरुषांना एका स्त्रीशी निष्ठावान राहाण्याचे बंधनही नाही. वेश्या हा कुलस्त्रिया नसल्यामुळे त्यांच्यावरही काही बंधन नाही. त्यामुळे या नैतिकतेच्या चर्चेत आपल्या जुन्या परंपरांचा फारसा संदर्भ देता येत नाही.)

(वेश्या व्यवसायात रोगांची लागण होऊ शकते, हे खरे आहे. पण त्याच प्रमाणे टाक्यात न्हायल्याने नारूची लागण होऊ शकते. लागण होऊ नये अशी काळजी घेणे हा स्वच्छतेचा विचार आहे, नैतिकतेचा नव्हे. त्यामुळे वैद्यकीय विचार या चर्चेत अगदीच अप्रस्तुत नसला तरी गौण आहे.)

नीती-अनीतीबद्दल मला सुचणारी काही कारणे अशी :
१. अविवाहित व्यक्तींच्या ब्रह्मचर्यास धोका : पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. ब्रह्मचर्य हे बर्‍यापैकी कठिण आहे, इतकेतरी मानण्यास जागा आहे. इतकेच नव्हे तर भोग हा स्थायीभाव आहे, आणि ब्रह्मचर्य अपवादात्मक आहे, असे मानण्यास जागा आहे. (ज्यांना भोगच नको असे संन्यासी प्रसिद्ध आहेत, ते वेगळे.) मग त्या अविवाहित व्यक्तीने लग्न का न करावे? काही कारणाने लग्न झाले नसणार, नाही का? ज्याचे लग्न तोंडावर आले आहे, त्यांच्या ब्रह्मचर्याला वेश्या फारसा धोका पोचवू शकणार नाही असे वाटते. आणि ज्याचे मनच ब्रह्मचर्यात नाही, तो कुणा दुसर्‍या व्यक्तीबरोबरही शरीरभोग घेऊ शकेल. त्यामुळे हे कारण मला पूर्णपणे ग्राह्य वाटत नाही, पण यात काही तथ्य असेल असे मानण्यास मी थोडाफार तयार आहे. तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? काही म्हटले तरी हा त्या अविवाहित व्यक्तीच्या नैतिकतेचा प्रश्न जास्त आहे, व्यवसायाचा कमी.

२. विवाहित व्यक्तींच्या एकनिष्ठतेस धोका : हा प्रकार मला तितकासा समजत नाही. वेश्यांकडे जाणे हे तर पूर्णपणे वैकल्पिक आहे. विवाहित व्यक्तीला कोणी तिथे जाण्याची बळजबरी तर करत नाही. मग ही गिर्‍हाइकाची अनैतिकता म्हणायला पाहिजे, व्यवसायाची का म्हणावी? आणि म्हणूया (हे तरी का म्हणूया?) की घरच्या सुखापेक्षा विकतचे सुख अधिक असते, तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही.

३. वेश्यांची स्वतःची नैतिक मूल्ये ढळलेली असतात : या विचारपद्धतीत काही दम आहे. पण पुष्कळदा सत्य नाही. (याच संकेतस्थळावर "विसोबा खेचर" यांनी लिहिलेली "रौशनी" कथा वाचावी.) मुळात अनेकांशी शरीरसंबंध ठेवणे (त्यांना न फसवता) हे अनैतिक का, हे जोपर्यंत पटवता येत नाही, तोवर "हे आपोआप अनैतिक" असे म्हणता येत नाही. नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे.

४. हा व्यापार स्वतंत्रपणे झालेला नाही : (हे मला सर्वात जास्त पटलेले कारण आहे.)
४अ. वेश्याव्यवसायात पुष्कळ देशांत अपहरण केलेल्या, विकत घेतलेल्या मुलामुलींना कामाला लावतात. लहान मुला-मुलींना सारासार विचार करून निर्णय घ्यायची योग्यता आलेली नसते. त्यांच्याकडून काम करून घेणे हे त्यांच्या स्वातंत्र्यास घातकच आहे. शिवाय कोणाचेही अपहरण त्याचे स्वातंत्र्यहरण आहे, ते अनैतिक आहे. आणि कुठल्याही व्यक्तीचा दुसर्‍या मनुष्यव्यक्तीवर मालकी हक्क असणे, तो हस्तांतरित करणे अनैतिक आहे. (येथे प्रत्येकास स्वातंत्र्य असावे, आणि प्रत्येक मनुष्याचे मूल्य समानच आहे, ही तत्त्वे नैतिक गृहीतके म्हणून घेतली आहेत. तुम्हाला ती मान्य नसल्यास चर्चेत त्यांचे खंडन करावे.)
४आ. शिवाय या "बालविक्रय" तथ्यातून माझे बाजारशास्त्रीय निष्कर्ष निघतात. एक तर स्वखुषीने या व्यवसायात उतरणार्‍या लोकांची संख्या मागणीच्या मानाने कमी असली पाहिजे. अर्थातच शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत स्वतंत्र व्यक्ती मागेल त्यापेक्षा कमी दिले जाते. बाजारात मूल्य सरासरीने लावले जाते (कारण या बाजारात "उत्तम कौशल्या"ची यादी प्रसिद्ध होत नाही, सहज उपलब्ध होत नाही.) त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी.

तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.)

पण हा असमतोल दूर केल्यास, बालकांचा उपयोग कडकपणे बंद केल्यास वेश्याव्यवसाय नैतिक होईल काय. माझे मत काय आहे? युरोपातील काही देशांत, अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात, हा अभ्यास करण्यासारखा आहे. त्या देशांत, राज्यांत वावर करण्याइतपतही मला चक्षुर्वै ज्ञान नाही.

पण त्याच्या जवळपासचे ज्ञान इतपत आहे - (पैशांच्यासाठी) देहप्रदर्शन करणार्‍यांचे. यांची थोडीफार वैयक्तिक ओळख आहे. हेदेखील बहुतेक समाजांत अनैतिक मानले जाते - का ते मला माहीत नाही. हे आमच्या राज्यात कायदेशीर आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी अर्ज खुल्या बाजारात होतात. बाजार ठरवतो ती किंमत "नाचा"साठी मिळते. किंमत न पटल्यास त्या बारमध्ये कंत्राट न स्वीकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. काही कॉलेजमध्ये जाणारी गरीब (प्रौढ) मुले-मुली हा व्यवसाय काही काळासाठी स्वखुषीने स्वीकारतात.

याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 7:35 am | विसोबा खेचर

धन्याशेठ,

तुझ्या काथ्याकुटाचा विषय आवडला. इंटरेश्टींग आहे! :)

आता माझी मतं -

पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे.

मी तर म्हणेन की भीष्मालादेखील स्वप्नदोष (झोपेतल्या झोपेत वीर्यस्खलन) झाला असणार. कारण मनुष्यप्राणी हा स्खलनशील आहे, आणि मेडिकल सायन्स प्रमाणे मनुष्य शरीर हे ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्याच्या शरीरात तयार होणारे स्पर्मस रोखून ठेवू शकतच नाही. तेव्हा माझ्या मते भीष्म देखील ब्रह्मचारी नव्हता जर तो मनुष्यप्राणी असेल तर! आणि वीर्यस्खलन झाले की ब्रह्मचर्य संपले! मग भले ते १) स्त्रीशी संग येऊन होवो किंवा २) अपना हाथ जगन्नाथ हस्तमैथूनाने होवो किंवा झोपेतल्या झोपेत होवो! जी मंडळी १) व २) प्रमाणे वीर्यस्खलन रोखून धरू शकतात त्यांना निद्रावस्थेत ब्रह्मचर्यभंगाला सामोरे जावेच लागते लागते कारण मेडिकल सायन्सचा तसा नियमच आहे!

तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय?

माझ्या मते तरी नाही! कारण बाजारी नकद व्यवहारात रोगराईची भितीच अधिक असते. तेव्हा त्या वाटेला न जाणंच अधिक श्रेयस्कर! आणि मी म्हणतो की 'भुरळपाडून',' फूस लावून भोग घेणं' असं तुम्ही म्हणताय खरं पण भुरळ पाडून घेणार्‍याला किंवा घेणारीला ते समजायला नको काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही!

तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही.

हा हा हा! धन्याशेठ, हा तू भलताच मुद्दा मांडला आहेस. यावर मला ठाम असं एक उत्तर देता येत नाहीये! :) कारण व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप तरी मी अविवाहीत आहे आणि अद्याप तरी कुणी कळकळीने माझ्यासमोर ह्या प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला नाही! :)

बाय द वे, 'नवविवाहितांना प्रशिक्षण देऊन' असं तू म्हटलं आहेस, त्या ऐवजी अविवाहितांना विवाहाला वर्ष सहा महिने असताना पूर्वप्रशिक्षण देण्यास काय हरकत आहे? भावी वराची/वधूची याला संमती असेल तर फारच उत्तम! बाहेरचे ट्रेनिंग कोर्सेसही जॉईन करायला नकोत! :)

जोक्स अपार्ट, परंतु 'प्री मॅरिटल सेक्स' हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात कुणा तज्ञाने मिपावर काथ्याकुटास सुरवात करावी असे वाटते. इथे या बाबत अधिक चर्चा केल्यास विषयांतर होईल!

नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे.

आहेस खरा तर्कशुद्ध! :)

तुझ्या '४अ' या मुद्द्याशी मी पूर्णत: सहमत आहे....

त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी.

नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला!

बहुत करून काही श्रीमंत घरातल्या काही बायका नवर्‍याच्या अपरोक्ष खुलेआम नव्हे, तर ओळखी ओळखीत लपूनछपून दुसर्‍या पुरुषासोबत शैय्या करतात त्यांचे दर आवाच्या सव्वा असतात. माझ्या माहितीत अश्या काही चांगल्या घरंदाज, श्रीमंत, खात्यापित्या घरच्या अत्यंत देखण्या स्त्रीया आहेत! तसेच काही अभिनेत्रीही आहेत ज्यांचा उल्लेख मी रौशनीच्या एका भागत केलेला आहे!

अर्थात माझं वरील म्हणणं हे काही अपवादात्मक स्त्रीयांबद्दलच आहे. खुलेआम बाजार मांडून बसणार्‍या स्त्रीयांच्या बाबतीत तू म्हणतोस त्याप्रमाणे 'कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी' हे कदाचित खरंही असू शकेल!

तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी.

तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.)

सहमत आहे!

याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.

हा शेवटचा परिच्छेद अप्रतिम! विचार करायला लावणारा!

आपला,
(धन्याच्या बुद्धीमत्तेचा फ्यॅन!) तात्या.

मुक्तसुनीत's picture

11 Mar 2008 - 8:26 am | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , धनंजय यांचे एका उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन - आणि मिसळपावचेही. धनंजय यांचा आपल्या या लाडक्या स्थळावरचा वावर म्हणजे या स्थळाचा मानबिंदू आहे असे विधान करणे धाडसाचे होणार नाही.

धनंजय यानी एका गुंतागुंतीच्या आणि अगदी जुन्या सामाजिक संस्थेविषयी उहापोह केला आहे. ('वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन्' असा उल्लेख वेश्याव्यवसायाबद्दल केला जातो.) त्यांच्या लिखाणाचे एक तात्पर्य असे असू शकते की शरीराचा क्रय आणि विक्रय या गोष्टी स्वत:मधे अनैतिक नाहीत (द ऍक्ट्स इन देमसेल्व्स आर नॉट अन्-एथिकल) .

धनंजय यांच्या लिखाणाचा अजून एक अर्थ "या व्यवसायाचा डिफेन्स" असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. वेगवेगळे मुद्दे मांडून ते निर्विवादपणे सिद्ध करू पाहतात, की या व्यवसायाशी संबंधित असणारे इतर घटक अनैतिक , प्रसंगी सर्वात वाईट , नीच जातीचे गुन्हेगार असू शकतात , परंतु ज्या व्यक्ति (पक्षी : वेश्या) हा व्यवसाय करतात त्या व्यक्तिना अनैतिक म्हणता येणार नाही. पर्यायाने या व्यक्तिंच्या व्यवसायालाही अनैतिक म्हणता येणार नाही.

मला वाटते , अशा प्रकारचा डिफेन्स मांडायला धनंजय यांच्यासारख्या अतिशय बुद्धिमान वकिलाची गरज नाहीच. मुद्दा सोपा आहे. तो असा की, या व्यवसायात पडणार्‍या बहुतांश स्त्रिया या त्यांच्या परिस्थितीच्या शिकार असतात. (दे आर द विक्टिम्स ऑफ देअर डायर सर्कम्स्टान्सेस.) सर्व पर्याय उपलब्ध असताना वेश्याव्यवसायात उतरणार्‍या स्त्रिया किती टक्के स्त्रिया असतील यावर संशोधन होऊ शकेल ; पण कॉमन सेन्सने असे म्हणता येईल की, बहुतांश स्त्रिया इतर पर्याय उपलब्ध नसल्याने, बर्‍याचदा बळाच्या वापराने, किंवा कौटुंबिक-सामाजिक परंपरेने या व्यवसायात पडलेल्या असतात. ("पडलेल्या" असतात या क्रियापदावरूनच हे सूचित होते.) आणि यात आपण कायद्याच्या बंधनाच्या आतल्या मुलींचा मुद्दा बाजूला ठेवू - त्याना विक्रीस बसविणे सरळसरळ गुन्हा होय.

आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील.

पण कुठल्याही गोष्टीचा असा संदर्भविरहित अर्थ लावणे - विशेषतः नैतिकतेच्या दृष्टिने - अपुरेच ठरते. सर्व समाजात , सर्व काळात स्त्रियांचे शोषण होते. या शोषणाचा सगळ्यात वाईट बाय्-प्रोडक्ट म्हणजे दि वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन.

तळटीप : मित्रानो, माझ्या लिखाणात इंग्रजी शब्द अति आले आहेत. या गोष्टीची मला शरम वाटते. मी अशी आशा करतो की एक दिवस असा येईल जेव्हा मी भेसळविरहित मराठीत लिहायला शिकेन. आमेन :-)

प्राजु's picture

11 Mar 2008 - 8:32 am | प्राजु

धनंजय यांनी हा विषय काथ्याकुट या सदरात का टाकला याचाच मी विचार करते आहे. कारण त्यांनी विषय मांडणी इतकी सुंदर केली आहे की इथे चर्चेला जागाच नाही. मुक्तसुनित म्हणतात त्याप्रमाणे-

आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील.
आणि जिथे उत्तरे मिळतात तिथे चर्चा कशावर करणार?

एक अतिशय विचार करायला लावणारा आणि सुंदर लेख लिहिल्याबद्दल धनंजय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.

(सर्वव्यापी)प्राजु

जगातल्या एका सर्वात जुन्या चर्चाविषयाला (पुन्हा एकदा) हात घातला गेला आहे.

नैतिक अनैतिक सर्व सापेक्ष झाले आहे.

जगभरातुन अनेक माहितीपट आले आहेत व सर्वात एकच कायम धागा दिसतो की या लोकांचे (बायकांची) फसवणूक, अत्याचार, शोषण. जर का ते थांबले तर या व्यवसायात सहभागी व्हायला किती जणी (जण) येउ शकतील याचे उत्तर मिळणे कठीण नव्हे.

मुक्त शारीरिक संबंधाला चालना मिळाली तर जर का हा व्यवसाय कमी होईल असे म्हणले तर पश्चिमात्य देशात हा व्यवसाय कमी व्हायला हवा पण तसे तर दिसत नाही. शिवाय मग मुक्त शारीरिक संबंधाचे तोटे दिसले (वैद्यकिय तोटे) आता भर सुरक्षित शारीरिक संबंधावर जास्त.

मधल्या मधे वेश्याव्यवसाय आहे तसा आहेच. उलट (चुकीच्या दिशेने) प्रगत होत आहे. जास्त पैसा येत आहे शेवटी मग पैसा, अज्ञान, पुरवठा, मागणी यांचा जोर वाढुन बाकी सगळे फोल.

व्यवसायाचे नाव काही असो सत्य फक्त शोषण, पैसा.

आनंदयात्री's picture

11 Mar 2008 - 11:07 am | आनंदयात्री

याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.

पटले! अन मी एक धाडसी विधान करु इच्छितो, वर उल्लेखलेल्या सर्व दोषांचे (ज्यामुळे हा व्यवसाय अनैतिक आहे) निर्मुलन जरी झाले तरी हा व्यवसाय अनैतिकच राहिल.

कारणः वेश्या व्यवसाय जितका जुना तितकाच माणुस हा कळपात रहाणारा प्राणी आहे हे ही सत्य खरे. आपली आजची समाजव्यवस्था ही पोट भरल्यानंतरच्या भुकांची वा मानसिकतेची (जसे प्रेम, भविष्याबद्दलची हवी असणारी निश्चितत) फलित आहे, असे मानण्यास जागा आहे. आयुष्याच्या प्रत्येक पर्वात सर्व सामान्य माणुस हा कोणत्या ना कोणत्या नातेसंबधांवर जगत असतो, जसे लहान असतांना आई वडिलांबरोबर, तारुण्यात प्रेयसी/सहचारिणी बरोबर, प्रौढावस्थेत सहचारिणी बरोबर, म्हातारपणात सहचारिणी अन मुलांबरोबर. आता या सर्व नातेसंबधात सुखी रहायला, अहंकार जपायला त्याने/ तिने व्यवसाय करणे गरजेचे असते, खाणकामगार सुद्धा कष्ट करतांना उद्याच्या सुखी आयुष्याचाच विचार करत असतो/ असावा. वेश्या व्यवसायात जेव्हा आपल्या समाजाचा बेस असणारी कुटुंबव्यवस्थाच जेव्हा बाद होते, तेव्हा हा व्यवसाय अनैतिक ठरतो असे मला वाटते. कारण बहुतांश वेश्यांना कुटुंबे नसतात/ होउ शकत नाहित, त्यांचे उत्तरायुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत जाते परिणामी 'व्यवसाय' करण्याची कारणे फलित होउ शकत नाहित. प्लस काही प्रमाणात नादी लागलेल्या विवाहित पुरुषांचे सुध्धा संसार उध्वस्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय असावे.

चोरी जशी अनैतिक, ती या समाजव्यवस्थेच्या मॉडेलला पुरक नाही तसेच वेश्या व्यवसाय पण अनैतिकच तो ही पुरक नाही.

मनस्वी's picture

11 Mar 2008 - 12:52 pm | मनस्वी

हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी या व्यवसायाला जन्म देणारे वि़कृत, षंढ (कितीही आणि कितीही खालच्या शिव्या दिल्या तरी अपुर्‍याच पडतील) पुरुष समाजात होते, आहेत आणि रहातील.

ते अशा ठिकाणी जाउन आपली XX XXX घेतात.

अशा व्यावासायिक स्त्रिया आहेत म्हणून कित्येक संभाव्य बलात्कार वाचतात / वाचत असतील. (माझा या विषयावर सखोल अभ्यास नाही, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.)

ह्याला उपाय म्हणजे १००% सुरळीत समाजव्यवस्था आणि समाजाची १००% सात्विक मनोवृती - दोन्ही गोष्टी अशक्य आहेत!

मनस्वी

आनंदयात्री's picture

11 Mar 2008 - 12:59 pm | आनंदयात्री

करा पण, तुम्हाला जर नैतिक असे वाटत असेल तर त्याची काही कारणे द्या ! म्हणजे आम्हाला (म्हणजे माझ्यासारखे मत असणार्‍या) कळेल तरी की हा व्यवसाय नैतिक कसा आहे ते !

मनस्वी's picture

11 Mar 2008 - 2:33 pm | मनस्वी

प्रथम, मी हा व्यवसाय नैतिक आहे असे म्हटलेले नाही.

हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी...

ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत.

लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्‍यांबरोबर, कर्मचार्‍यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्‍याचदा ते करणार्‍यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते.

वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत -

काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}),

काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) ,

एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी,

एखादी पत्नी नवर्‍याच्या आजारासाठी,

काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात.

तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही.

माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत.

("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.)

वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत.

मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक.

तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का?

मनस्वी

आनंदयात्री's picture

11 Mar 2008 - 2:46 pm | आनंदयात्री

आपण माफ केलेत आम्ही उपकृत झालोत.
आणी बहुतांश अशिक्षित गरजू महिला नैतिक व्यवसायच करतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे, या कारणामुळे आम्ही कोणतेही पर्याय सुचवु शकत नाही.
धन्यवाद.

मनस्वी's picture

11 Mar 2008 - 2:53 pm | मनस्वी

अतिशय नैतिक उत्तराबद्दल धन्यवाद हं.

मनस्वी

चित्तरंजन भट's picture

11 Mar 2008 - 12:45 pm | चित्तरंजन भट

"मला वेश्याव्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते," असे जवळपास कुणीही म्हणणार नाही. हा 'धंदा' शोषणावर आधारित आहे. बहुतेकांना भुलवून, फसवून ह्या व्यवसायात आणले जाते. तर अनेकांना कमाईसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय उपलब्ध झाला असता तर ते इकडे वळलेच नसते. त्यामुळे हा व्यवसाय, शोषणावर आधारित इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच, अनैतिकच वाटतो.

१.
तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?" असे एकाने विचारल्यावर एकीने "मला 'आयएएस ऑफिसर' व्हायचे होते/आहे," असेही सांगितल्याचा एक खरा किस्सा मला एकाने ऐकवला आहे. कदाचित ती 'हाय सोसायटी'ची असती तर तिला असा प्रश्न विचारण्याची हिंमत संबंधिताला झाली नसती. किंवा तिचे असे उत्तर देणे आम्हा खोटारड्या लोकांना हास्यास्पदही वाटले नसते. असो.

कोलबेर's picture

11 Mar 2008 - 7:51 pm | कोलबेर

नुसते वेश्या व्यवासायच का? धुणी भांडी करणार्‍या महिलांना देखिल हा प्रश्न (तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?)विचारला तर "मला हा व्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते" अहे कुणीही म्हणणार नाही.. कारण हे सर्व व्यवसाय समाजात फारसे प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय आहेत इतकेच.. परंतू त्यामूळे ते 'अनैतिक' असलेच पाहिजेत असे मात्र नाही. धुणीवाली/ भांडीवाली ह्यांच्या कामाला कुणीही अनैतिक म्हणणार नाही!

चित्तरंजन भट's picture

11 Mar 2008 - 10:59 pm | चित्तरंजन भट

कोलबेर, धुणीवाली आणि भांडीवाला ह्यांच्या कामाला कुणीच अनैतिक म्हणणार नाही.
पण ह्या कामांत शोषण आहेच. ह्या बायांना भविष्यनिर्वाह निधी (प्रॉविडंट फ़ंड), ग्रॅच्युइटी (मराठीत काय म्हणतात), किमान वेतन मिळायला हवे. इतरांसारख्या सुट्ट्या मिळायला हव्यात. आम्ही ह्या गोष्टी देतो काय? नाही!
थोडक्यात दोन्ही ठिकाणी सेवा घेणारे अनैतिक कामच करीत आहेत आणि परिस्थिती जैसे-थे राहण्यास कळत-नकळत कारणीभूतही ठरत आहेत.

कोलबेर's picture

14 Mar 2008 - 3:18 am | कोलबेर

बरोबर... धुणी वाली आणि वेश्याच कशाला..अगदी (काही) सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही हे शोषण चालते..आणि कसल्याही प्रकारचे शोषण हे अनैतिकच त्यात काहीही वाद नाही..पण म्हणून सरसकट संपूर्ण व्यवसायच अनैतिक म्हणता येईल का?..समजा वेश्या व्यवसाय कसलेही शोषण न होऊ देता चालवला तरीही तो अनैतिकच ठरेला का?

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2008 - 4:18 pm | प्रकाश घाटपांडे

१) कोठेवाली/घरवाली ही व्यावसायिक; वेश्या ही नोकरदार/गुलाम (अनुभवातुन तीच पुढे व्यावसायिक होउ शकते) आणि ग्राहक हा गिर्‍हाईक.
२) कुठलाही व्यवसाय हा ग्राहकांच्या गरजेतून निर्माण होतो.
३) नैतिक / अनैतिक, प्राकृत / विकृत सापेक्ष आहे
४) ही तुलना भुक लागली असता व घरात अन्न नसता उपहारगृहात जाणे, डबा लावणे किंवा उपाशी राहणे याच्याशी करुन पहा.
५) ही तुलना नाट्यनिर्माता , रंगकर्मी व मायबाप प्रेक्षक यांच्याशी करुन पहा
६) गणिका व्यवसाय हा पुर्वीपासुन आहे. योग्य/अयोग्य ही मतमतांतरेही पुर्वीपासूनच आहेत.
७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?
८) हा व्यवसाय नसता तर बलात्काराचे गुन्हे वाढले असते असे म्हणणे म्हणजे या व्यवसायाचे समर्थन करणे होत नाहि. तो प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखा आहे.
९) योनिशुचिता जशी गौण व्हायला लागेल तसा हा व्यवसाय वाढीस लागेल
१०) वेश्यांच्या जागी आपल्या आया बहिणि असत्या तर? याचे चित्र डोळ्या समोर आणा. असे करताना स्वामी विवेकानंद यांची शिकागो ला वेश्यावस्तीकड फेरफटका मारताना " या तर आमच्या भगिनी आहेत" या बोधकथेतील वाक्याची आठवण करुन पहा.
११) http://www.misalpav.com/node/114 इथ 'पोटाला नाही आटा अन चोटाला उटण वाटा 'इथे ओशाळणारी अश्लिलता आठवते.
१२) क्या करें शेवटी अपना अपना हाथ अपना अपना जगन्नाथ
प्रकाश घाटपांडे

अनिकेत's picture

11 Mar 2008 - 4:25 pm | अनिकेत

अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि बायका, हे कायमच नफा देणारे धंदे होते आणि आहेत.
युरोपातील वेश्याव्यवसायावर ही एक थरारक documentary आहे.. आपल्याकडे जे नेपाळमधे किंवा गरीब राज्यांत होते तेच पूर्व युरोपातही होते.
येथे

नैतिकतेच्या गप्पा मारण्याआधी अवश्य पहा.

पण अधिक पैशांसाठी (गरजेपोटी नव्हे!) धंदे करणार्‍या कॉलेजातील पोरी अथवा डेली सोपमधील नट्यांचा उपभोग घेण्यात गैर आहे असे मला वाटत नाही.

अनिकेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Mar 2008 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नैतिक, अनिकतेचा विचार करण्याअगोदर आमचे मत असे आहे की, वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. जशी श्रमाला प्रतिष्ठा आहे,त्या प्रमाणे. ती मिळाली की नैतिक, अनैतिक राहणार नाही असे वाटते. पण, व्यवसाय म्हणतांना वेश्यांना आर्थिक गरजा भागवता येत नाही, म्हणुन त्या वेश्या व्यवसाय करतात. जर आर्थिक संपन्नता असेल तर त्या या गोष्टीकडे वळल्या असत्या का ? याचे उत्तर मला तरी 'नाही' असेच वाटते. ती सामाजिक गरज असेलही पण प्रतिष्ठा नसल्यामुळे मोठ मोठ्या मॉल्स मधे माणूस जितक्या सहजपणे प्रवेश करतो तितक्या सहजपणाने वेश्येच्या वस्तीत प्रवेश करण्याचे धाडस करतो का ? 'नाही'. म्हणुन समाधानासाठी ( आर्थिक सुबत्ता इथे प्रश्न नाही ) येणार्‍या स्त्रिया वेगळ्या. पण अधिक नफ्यासाठी व्यवसायात येणार्‍या या गरजू स्त्रिया आहेत, आणि त्यातही उच्च गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा व्यवसायात तरुण मुली, स्त्रिया दिसतात. पण,योनिशुचिता ही व्यवसायातील/ बाजारपेठेतील मुख्य अडचण असल्यामुळे येत्या काळात वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि तीही भारतात यावर माझा तरी विश्वास नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुधीर कांदळकर's picture

11 Mar 2008 - 8:25 pm | सुधीर कांदळकर

वस्तूंच्या अगर सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आणि या व्यवसायात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे शरीराच्या मर्यादा व मनाचे आस्तित्त्व . या मर्यादांमुळे तिला ग्राहक नाकारण्याचा हक्क असायला हवा. असे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच फूट उंच व ४० किलो वजनाच्या स्त्रीकडे १२५ - १५० किलो वजनाचा सहासाडेसहा फुटी माणूस किंवा गलिच्छ किळसवाणा पण भरपूर पैसे मोजायला तयार असणारा श्रीमंत माणूस, पोलीस, गुंड वगैरे व्यक्ती आली तर तिने काय करावे?

४अ मुद्याबाबत बहुतेक लोक सहमत होतील.

असो. एक चांगली चर्चा.

धन्यवाद.

धनंजय's picture

12 Mar 2008 - 2:56 am | धनंजय

आणि नवीन मुद्दे आले आहेत. असे वेगवेगळे विचार वाचून चर्चा प्रगल्भ होत आहे.

तात्यांनी उल्लेख केलेला विवाहपूर्व संबंधांचा मुद्दा अवांतर नाही. अविवाहित व्यक्तीला लबाडीने भोग घेणे आणि विकत भोग घेणे हे दोनच पर्याय नाहीत. दोघांच्या स्वातंत्र्यास धक्का न देता, दोघांच्या भावनांची कदर करून, दोघांच्या गरजा भागवणे हा पर्याय आहेच. या बाबतीत "दोघांच्या भावनांची कदर, स्वातंत्र्य" यांना मी बर्‍यापैकी कडक निकष लावतो तो मागे एका कवितेत चर्चिला आहे. हा पर्याय असणे माझ्या विचारधारेला समर्थन देतो - कारण हा राजमार्ग असताना जो अविवाहित व्यक्ती वेश्याबाजारामुळे चळतो, तो त्याच्या इच्छेने, वेश्याबाजाराच्या अनैतिक भुरळीमुळे नाही.

काही वेश्यांना पुष्कळ शुल्क मिळते हे खरे आहे. कालच न्यू यॉर्क राज्याचे राज्यपाल गोत्यात अडकले (दुवा) त्या ठिकाणच्या वेश्या ताशी १०००-५००० डॉलर दर लावत. अशा वेश्यांना बहुतेक नकाराधिकाराचे, किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. येथे राज्यपाल स्पित्झर हे विवाहित आहेत की नाहीत, त्यांच्या कुटुंबसंस्थेवर काय परिणाम होत आहे, हे बघण्याची मुख्य जबाबदारी स्पित्झर यांचीच आहे, ते जिला भेटले त्या "क्रिस्टेन"ची (विक्रेती म्हणून) नव्हे. जर हा बाजार खरोखर मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तींमधला असेल तर हा माझ्या आर्थिक चर्चेतून निसटतो. तो मी केलेल्या वेगळ्या चर्चेत याच्या नैतिकतेचा विचार व्हावा - त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांस पूर्ण माणुसकीने वागवत आहेत की नाहीत. तेही होत असेल - कोणी कोणाला जनावर किंवा वस्तू म्हणून वागवीत नसेल तर या विषयाबद्दल मला वेगळे कुठले नैतिक कुतुहल नाही.

तरीही हा अपवादात्मक, दुर्मिळ मालाचा व्यापार आहे. माझा मुख्य मुद्दा बहुसंख्य वेश्यांबद्दल आहे, ज्या पूर्ण स्वातंत्र्याने व्यापार करत नाहीत.

मुक्तसुनीत म्हणतात (शिवाय वेगळ्या शब्दांत प्राजु, चित्तर, अनिकेत यांनी दिलेली चित्रफीत, म्हणतात) की पर्याय उपलब्ध असताना हा पेशा कोणीही स्वीकारणार नाही. यात बळजबरी, किंवा अगतिकता आलीच. (याला अपवाद स्पित्झर यांस विक्रय करणारी, वगैरे असेल - आपल्याला माहीत नाही.) मीही तो अगतिकतेचा मुद्दा आर्थिक ताळमेळ लावून करू इच्छितो. तो मुक्तसुनीत म्हणतात तसा सोपा नाही. मागे मुंबई पोलिसांनी "सोडवलेल्या" काही वेश्यांबद्दल ऐकले होते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वखुषीने धंदा करत आहोत. सोडवणूक नको होती. अनिकेत यांनी दिलेल्या चित्रफितीतही काही वेश्यांचे असे मत होते, की जर इंग्लंडमधून हद्दपार होणार असतील तर गुलामगिरीतून सोडवणूकच गैरसोयीची. (इथे अगतिकता थेट दिसते, पण मुंबईत सोडवलेल्या वेश्यांच्या बाबतीत ते स्पष्ट दिसत नव्हते.) माझ्या समान मनुष्य म्हणून त्या "आपखुषी" वेश्यांची साक्ष खरी मानण्यास माझी तयारी असलीच पाहिजे. दुसर्‍या कुठल्या बाबतीत थोडाफार अगतिक असल्याचा माझा अनुभव आहे, म्हणून त्यांचे "आपखुषीचे" विश्लेषण करू इच्छितो. आर्थिक गणित करून त्यांचा बाजार स्वातंत्र्याचा नाही हे दाखवतो. सर्वच वेश्या आपण नाखुषीने या धंद्यात आहोत अशी तक्रार करत असतील (म्हणजे कारकूनही तक्रार करतात, त्यांपेक्षा जास्त!) तर या लांब सिद्धतेची गरज नव्हती. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही (टंकनदोष सुधार केला).

सहज आणि काही वेगळ्या पद्धतीने प्रकाश घाटपांडे विचार करतात की येथे नैतिक/अनैतिक सापेक्ष आहे, किंवा होऊ लागले आहे. त्या दोघांच्या बहुतेक मुद्द्यांचा मी स्वीकार करत असलो तरीही पूर्ण सापेक्षता नाही असे माझे मत आहे. अधिकाधिक सापेक्षता मानूनही नैतिकतेचा विचार केला जाऊ शकतो, असे मला या चर्चेत म्हणायचे आहे. स्वातंत्र्यहरण आणि मनुष्य-मूल्य-समानता (मूल्य=किंमत) या सापेक्ष मानू नयेत, असे मला वाटते. या नैतिक मूल्याला (मूल्य=तत्त्व) इंग्रजीत गोल्डन रूल असे म्हणतात. "जसे माझ्याशी वागणे इष्ट तसे सर्वांशी वागणे इष्ट, जसे माझ्याशी वागणे अनिष्ट तसे सर्वांशी वागणे अनिष्ट". "इष्ट" म्हणजे मला जपणे, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मला स्वस्त न करणे. हे कमीतकमी तत्त्व सापेक्ष मानू नये.

बाकी प्रकाश घाटपांडे म्हणतात तसे वेश्यांना आयाबहिणी मानूनच त्यांच्या व्यापारातील स्वातंत्र्याचे विश्लेषण करतो आहे. "७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?" हे अगदी चपखल माझे तर्कशास्त्र आहे - फक्त माझा निष्कर्ष आहे की विद्यापीठाशी वाटाघाटीत माझ्या बुद्धीचे मूल्य ठरवण्याचे मला जितपत स्वातंत्र्य आहे, तितके स्वातंत्र्य शरीरविक्रीच्या वाटाघाटीतही असले पाहिजे. माझ्या गणिताप्रमाणे तितके स्वातंत्र्य नाही, त्याहून खूपच कमी आहे, त्यामुळे ती बाजारपेठ अनैतिक मानावी.

सहज विचार करतात की मुक्त शरीरसंबधाची मुभा असलेल्या पाश्चिमात्य देशांत वेश्याबाजार अजून कार्यरत का? त्याचे कारण हे असावे की मुक्त (मोफत) भोग घेणारे व्यक्ती आणि विकतचा भोग घेणारे व्यक्ती बहुधा वेगवेगळे असावेत. "मोफत" शरीरभोग घेण्यात भावनांचा, वेळेचा खर्च करावा लागतो, हे विसरता कामा नये. तो खर्च करण्यास जे असमर्थ आहेत, त्यांना कदाचित रोख व्यवहारच सोपा जात असावा.

मनस्वी आणि घाटपांडे "या सेफ्टी-वाल्वमुळे काही संभाव्य बलत्कार टळतात" त्याच्याकडे लक्ष वेधतात. हा मुद्दा वेश्याव्यवसाय या संदर्भात लागू तर आहेच. पण नैतिकता या संदर्भात लागू नाही असे तेही म्हणतात, ते योग्यच.

मनस्वी अन्य कामधंद्यासाठी मुभा नसलेल्या स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल सांगतात. पण या अगतिकतेमुळे त्या कामाला लागलेल्या स्त्रियांना शुल्क ठरवायचे स्वातंत्र्य नाही हे त्यांचे मत आहे, असे त्यांच्या लिखाणावरून मी समजतो.

प्राडॉ मुद्दा उपस्थित करतात की या श्रमाला प्रतिष्ठा नाही; योनिशुचितेचे स्तोम आहे, याची आठवण देतात. सुधीर कांदळकर सांगतात की सेवा पुरवण्याबाबत नकाराधिकार असल्याशिवाय हा व्यवसाय अन्य व्यवसायांपेक्षा जाचक आहे, हे पटण्यासारखे आहे. कोलबेरही श्रमबाजाराची नैतिक तत्त्वे लागू व्हावीत, अशा मताचे दिसतात.

सर्वांपेक्षा आनंदयात्री वेगळा दृष्टिकोन आणतात. त्यांचे मत असे की वेश्याव्यवसाय हा समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कुटुंबसंस्थेला घातक आहे. यातही ते दोन्हीकडून विचार करत आहेत ही त्यांच्या विचारातील प्रगल्भता आहे. वेश्येला कुटुंबसुख नकारले जाते हा त्यांचा मुद्दा एक आगळीवेगळी सहानुभूती दाखवतो. वेश्येला जोडीदार-पती मिळण्याचे सौख्य नाही, हे व्यापाराच्या दृष्टीने सक्तीचे नाही, तरी आजच्या समाजातली परिस्थिती आहे. शारिरिक इजेसारखी ही मानसिक इजा आहे. अशा प्रकारची प्रीति-वैफल्याची मानसिक इजा काही थोड्याच काही व्यवसायांत होते. कुठल्याकुठे वर्षानुवर्षे पोस्टिंग झालेले सैनिक, खतरनाक व्यवसायामुळे षंढत्व आलेले कामगार, वगैरे. या कामगारांना या इजेच्या बदल्यात ज्या प्रकारचा मोबदला मिळतो, तितपत मोबदला वेश्येला मिळाला नाही, तर तो व्यापार योग्य मूल्याचा कसा म्हणावा. (वर तात्यांनी उल्लेखलेल्या उच्चवर्गीय वेश्यांना जोडीदार-पतीचे सुख मिळत असते, ते अपवादात्मक. तसेच प्रसिद्ध सिनेनट-नट्यांना पुढे जोडीदार करता येत असावा. पण त्यांचे सेवाशुल्क बघितल्यास व्यापारातील त्यांचे स्वातंत्र्य, नकाराधिकार, वगैरे बाजारबसव्यांपेक्षा अधिक असतो हे दिसते.) वेश्यागामी व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते, हा दुसर्‍याबाजूनेही आनंदयात्री विचार करतात, तो योग्यच. पण त्याविषयी वरील लेखात मी थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. एक मुख्य की त्यांचे मुद्दे व्यक्तींच्या कुटुंबाचा घात होण्याबद्दल आहेत. समाजात कुटुंबव्यवस्था नष्ट होण्याबद्दल नाहीत. दुसर्‍या कोणाचे तेही मत असू शकते. पण वेश्याव्यवसाय हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे, हे चर्चेत अनेकांनी नमूद केले आहे (वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन). त्या अर्थी वेश्याव्यवसाय हजारो वर्षांत समाजातील कुटुंबव्यवस्थेला नाहिसे करू शकला नाही, त्यात तेवढी शक्ती नाही, हे उघडच आहे.

मला वाटत होते की केवळ "अनेकांशी भोग भोगणे अनैतिक हे गृहीतक मानावे" असे म्हणणारे कोणी चर्चेत सहभागी होईल. त्यांच्याशी माझा वेगळा वाद झाला असता - बहुतेक एकमेकांचे मुद्दे पटले नसते. पण तेही उद्बोधक ठरले असते.

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2008 - 2:46 am | मुक्तसुनीत

>>> मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक आहे.

या ऐवजी

मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही.

असे वाचावे.

विसुनाना's picture

12 Mar 2008 - 12:38 pm | विसुनाना

कालपासून चर्चा वाचत असलो तरी प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. चर्चेचे प्रस्तावक आणि संचालक श्री. धनंजय यांनी चर्चेचा गोषवारा घेतल्यामुळे चर्चा संपली की काय अशी शंका आली.
परंतु विषय फारच व्यापक असल्याने ती पुढे सुरू राहील असे वाटते. म्हणून माझेही मत -
चर्चा 'वेश्या व्यवसायाची नैतिकता/अनैतिकता' या विषयावर सुरू असली तरी केवळ स्त्री वेश्यांपुरतीच मर्यादित राहिली काय अशी शंका येते.
वेश्यांमध्ये लिंगपरत्वे तीन प्रकार आहेत -
पुरुष वेश्या - (जिगोलो), क्लीब वेश्या आणि स्त्री वेश्या.
हे तीन्ही व्यवसायप्रकार फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत.

शिवाय समलैंगिक वेश्यावृत्ती आणि विषमलैंगिक वेश्यावृत्ती यांच्याबाबतही विचार झाला पाहिजे.(केवळ समलैंगिकता या विषयावर अथवा मानसिक लैंगिकता या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकेल.)

माणूस हा विचारशील असला तरी प्राणी आहे. :) वंशसातत्य टिकवणे हा त्याच्या अस्तित्वाचा इतर सर्व जीवसॄष्टीप्रमाणे एक प्रमुख (कदाचित एकमेव) हेतू आहे. आणि त्यामुळे त्याला शारिरिक आणि मानसिक लैंगिक गरजा असणारच. शिवाय समलैंगिकता अनेक प्राण्यांमध्येही आढळते. निसर्गतयः अनेक भागिदारांशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये दिसते.या सर्व संबंधांत पशूनरांची अनेक पशूमाद्यांशी संबंध जास्त आढळतात. याउलटही काही उदाहरणे आहेत.
या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करण्याची 'गरज' माणसानेच निर्माण केली आहे. कारण केवळ पशुत्वाप्रमाणे संबंध नियंत्रित केले असते (किंवा अनियंत्रित ठेवले असते तर) तर मानवसमाजातील अनेक कमजोर, दुबळ्या नरांना त्यांचे वंशसातत्य टिकवणे अशक्य होऊन बसले असते.
याशिवाय अनेकसंबंधी लैगिक वर्तनामुळे शारिरिक रोगांचेही प्रमाण वाढून समाजाचा र्‍हास होण्याची शक्यता मानवाने पूर्वीच हेरली असावी. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे एकूणच लैंगिक नैतिकता (पक्षी -समाजाने मान्य केलेले शरीरसंबंध) ही मानवसमाजाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून निर्माण झाली आहे.किंबहुना विवाहसंस्थेचे मूळही यातच आहे.लैगिक अनैतिकता हा सर्वाधिक सामाजिक तुच्छ्तेचा आणि घृणेचा विषय आहे.

Morality: the character of being in accord with the principles or standards of right conduct; right conduct; sometimes, specif., virtue in sexual conduct
त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य, विवाहपूर्व अथवा समलैंगिक संबंधांकडे समाजाने अनैतिक म्हणून पहाणे स्वाभाविकच आहे. वेश्याव्यवसाय यात मोडतो हे स्पष्टच आहे.

परंतु कोणत्याही गरजा विचारांच्या सहाय्याने काबूत ठेवायच्या किंवा नाही ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. काही लोकांच्या गरजा विचारांवर मात करण्याइतक्या प्रबळ असू शकतात. तर काही लोकांना मिळणारे प्रलोभन हे विचारांवर मात करणारे असते.
हे केवळ लैंगिक गरजांबाबतच नव्हे तर इतरही सर्व गरजांना लागू होते. यातूनच सामाजिक हिताची नैतिकता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (इथे पुलंचे रावसाहेब आठवतात - 'तुम्ही पण शहाणेच की वो! म्हणे चोरी कशाला करायची, मागून घ्यायचे...'किंवा 'घरी एक चांगलं सुख मिळत असलं तर माणूस बोगारवेशीत कशाला जातंय वो?')
Ethics: the system or code of morals of a particular person, religion, group, profession, etc.
त्यामुळे एखाद्या माणसाने स्वतःचे वर्तन हे नैतिक किंवा अनैतिक ठरवणे हा ज्याचात्याचा अधिकार आहे.

असा गुंतागुंतीचा मामला आहे.

माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी. (उदा. उच्चभ्रू स्त्री वेश्या, पुरुष वेश्या आणि क्लीब वेश्या.) अलेक्झांडरसारख्या पुरुषाबरोबर हेफायस्तियनचे समलैगिक संबंध होते. हेफायस्तियन हा एक प्रकारे पुरुष वेश्याच होता असे म्हणावे लागेल. तसेच काही देशात/प्रांतात (जसे गोवे - भाविणी) वंशपरंपरेने काही स्त्रिया हा व्यवसाय करतात. त्यात त्यांच्या आर्थिक फायद्याचा मोठा वाटा असतो. 'राख' हा प्रकारही याच पद्धतीचा आहे.
अर्थात या भागिदारांमधील एक किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांच्या इतर (वैवाहिक) भागिदारांचे या व्यावसायिक संबंधांमुळे (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही ना? याचाही या नैतिकतेच्या व्याख्येत विचार करावा लागेल.

पण व्यावसायिक शरीर संबंधात जर कोणत्याही बाजूचे (आर्थिक, शारिरिक, मानसिक) नुकसान होत असेल तर मात्र तो अनैतिक आहे असे म्हणावे लागेल.बारबाला या कितीही उत्कृष्ट नृत्यांगना असल्या तरी त्यांच्या नृत्यातला शारीरभाव आणि कामुकता यांचा वापर त्या आर्थिक फायद्यासाठी करत होत्या हे उघड आहे. त्यामुळे अनेक पुरुषांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तो व्यवसाय अनैतिक. केवळ अंधश्रद्धेमुळे (जसे जट आली म्हणून देवदासी) एकाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध/ तिला न कळता या व्यवसायात ढकलणे अनैतिक. गरीबीमुळे एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध हा व्यवसाय करायला लावणे अनैतिक. वेश्येच्या संबंधांमुळे जर लैंगिक आजार होणार असतील तर ते अनैतिक. रखेलीमुळे वैवाहिक जीवनात पत्नी, मुले यांची आर्थिक, मानसिक कुतरओढ झाली तर ते अनैतिक.अशी अनेक उदाहरणे देता येतील.

सध्या इतकेच. श्री. धनंजय आणि इतरांची मते कळावीत.

अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी-
'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. '
(ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2008 - 2:55 pm | प्रकाश घाटपांडे

अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी-
'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. '
(ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)

हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते.
मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्‍यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते.
"समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे.
मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला.
मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे.
प्रकाश घाटपांडे

विसुनाना's picture

12 Mar 2008 - 3:37 pm | विसुनाना

आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव चेहेर्‍यावर होताच.
चर्चेतले एक ऐकीव मत (माझे नव्हे) म्हणून अवांतरमध्ये नोंदवले. आपलेही मत ग्राह्य आहेच.

तुमच्या पुढील म्हणण्याशी सहमत :

माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी.

वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल.

या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो.

क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात.

बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.)

पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच.

"सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.

लिखाळ's picture

13 Mar 2008 - 8:32 pm | लिखाळ

धनंजय,
अतिशय छान लेख.

.... नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.
खरेच असेच वाटते.

पण यावर अनैतिकतेचा शिक्का सर्व समाजात आहेच. पहा ना आत न्युयॉर्क मधले प्रकरण. यात पैशाच्या अपव्ययाबद्दलची ओरड आहे तसेच वश्या प्रकरण हा सुद्धा महत्वचा नैतिक मुद्दा आहे.

वरचे सर्व प्रतिसाद वाचून झाले नाहित. वाचत आहे.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

कोलबेर's picture

14 Mar 2008 - 3:47 am | कोलबेर

विसुनानांच्या प्रतिसादातुन ह्या विषयाला असणारे अनेक कंगोरे दिसल्याने आम्हीही आमचे पावशेर त्यात टाकतो आहोत :)

मुळातच 'वेश्याव्यवसाय' ह्याची सामाजिक व्याख्या आपण समजतो तितकी संकुचित नाही. पैसे मोजुन शरिर उपभोगायला देते ती वेश्या इतकाच अर्थ 'वेश्या' शब्दातुन अभिप्रेत नाही. त्यालाही अनेक कंगोरे आहेत. एखादी स्त्री जेव्हा कामात बढती मिळवण्यासाठी (आपला स्वार्थ साधुन घेण्यासाठी..विशेषतः सिनेजगतात) वरिष्ठांना शरीर भोगायला देते अश्या स्त्री ला देखिल 'वेश्या' असेच संबोधले जाते.. म्हणजेच शरीर भोगायला देण्यामागे 'पैसे' हाच एकमेव मोबदला दरवेळेस असेल असे नाही.बर्‍याचदा अश्या स्त्रियांविषयी बोलताना अमकी अमकी पेक्षा, 'सरळ पैसे मोजुन घेणारी वेश्या बरी!( नैतिकतेच्या दॄष्टीकोनातुन)' असा देखिल उल्लेख केला जातो..

म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही मोबदल्यासाठी/फायद्यासाठी एखाद्याला संभोग करु देते ती वेश्या अशी व्याख्या योग्य ठरेल का?..तर नाही..करण कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या मना विरुद्ध लग्न करावे लागते. अशा वेळेस प्रेम दुसर्‍या कोणावर जडले असले तरी समाजाच्या दबावाला बळी पडून लग्न तिसर्‍याशीच केले जाते. ह्या स्त्रियांना देखिल आपल्या मनाविरुद्ध आपले शरीर दुसर्‍याच व्यक्तिला अर्पण करावे लागते( समाजाच्या कडवेपणा टाळण्याच्या मोबदल्यात)..पण त्याला मात्र कुणीही वेश्या/अनैतिक म्हणू शकत नाही. तेव्हा ही व्याख्या देखिल बाद!!

थोडक्यात विषय दिसतो तितका सोपा नाही..:)

सृष्टीलावण्या's picture

14 Mar 2008 - 9:26 am | सृष्टीलावण्या

संस्कृत साहित्यात आपला संबंध वारंवार गणिका ह्या पात्राशी येतो. किंबहूना विदूषक आणि गणिका
संस्कृत साहित्याचे अभिन्न अंग आहेत.

ती गणिका देहविक्रय करतेच असे नाही तर काही गणिका केवळ आपल्या गाण्याने अथवा नृत्याने ग्राहकांची घटकाभर करमणूक करणार्‍या सुद्धा असतात. तसेच ह्या गणिका चाणाक्ष असतात
आणि हेरगिरीसाठी त्यांचा फार उपयोग केलेला आढळतो (माताहारी सारखा).

चाणक्याने हेरगिरीसाठी सुंदर, बुद्धिमति गणिकांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे.

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2008 - 11:30 am | प्रकाश घाटपांडे

बंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एक नाट्यप्रयोगा बद्दल माहिती http://www.indiatogether.org/2008/mar/wom-dhande.htm इथे वाचा. मीन सेशू या सामाजिक कार्यकर्तीने वेश्या अन्याय मुक्ती परिषद (VAMP) व संग्राम या एनजीओ च्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी ही निर्मिती केली. सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेला प्रयोग या दुर्लक्षित विषयावरचे जनजागरण आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2008 - 1:41 pm | प्रकाश घाटपांडे

http://esakal.com/esakal/03162008/SaptarangACAEFD66F3.htm या ठिकाणी मीना सेशू यांचा नजरा बदला दृष्य बदलेल हा एक लेख आहे.
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

16 Mar 2008 - 3:27 pm | ऋषिकेश

वैश्या बनणे हे नैतिक की अनैतिक हा चर्चेचा विषय निवडण्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन वर अनेक घटकांचा उत्तम उहापोह झाला आहे. धन्ंजय यांचा सारांशही रोचक आहे. मी जरा उशीराच चर्चेत प्रवेश करत आहे. असो.
वैश्या व्यवसायाची नैतिकता.. यात वैश्या 'व्यवसाय' हा शब्दच मला खटकतो. या बाजारातील प्रत्येक विक्रेती ही "व्यावसायिक"च असते असे नाहि. कित्येक जणी (किंवा बहुतांशजणी?) ह्या नोकर असतात. खरा व्यवसाय कोणीतरी वेगळीच व्यक्ती करत असते. तेव्हा या प्रकारास केवळ एक व्यवसाय ना नजरेतून बघणे मला सर्वस्वी चूक वाटते.
आता नोकरीचे निकष लावा पाहु. आमच्या (आयटी) नोकरीशी तुलना करू. आमच्याकडे उत्तम जाहिरातीसाठी नोकरदार मंडळीनी केलेली आधीची प्रोजेक्टस बढवून नवीन क्लायंटला ऐकवली जातात, कधी एखादा क्लायंट आपखूशीने कंपनीचे नाव सुचवतो, क्लायंटने दिलेल्या पैशातून त्यात काम केलेल्यांचे पगार वगैरे तर होतातच शिवाय मुळ व्यावसायिकाला उत्तम मोबदला मिळतो, अनेकदा बराच एक्पिरियन्स झाला आणि तुमच्यात 'गुण' असतील तर बढती मिळते/पगारवाढ मिळते/आपल्या हवे तेच काम करायची संधी दिली जाते, एरवी इथे काय काम करायचे, कीती करायचे, कधी करायचे हे तुमच्या हातात नसते.
आता हे सगळं वैश्यांनाही लागु होत नाहि का? मग हा व्यवसाय कसा? ही तर नोकरी !!! आणि नोकरी करतान सुरवातीला चॉईस नसतो त्यात ही नैतिकता कुठे? (निदान सुरवातीला) बर्‍याचजणांचे नोकरी असते म्हणून घर चालते (फार तर फार एका व्यावसायिकाची नोकरी आवडली नाहि तर दुसरा जॉईन करता येतो )

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jul 2021 - 4:34 pm | प्रकाश घाटपांडे

मित्रांनो हा लेख व त्यावरील आपल्या सर्व चर्चा लिंकद्वारे मी त्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांना पाठवल्या. मीना सेशू ज्यांचा उल्लेख मी वर प्रतिक्रियांमधे केला आहे त्यांनी त्या सेक्सवर्कर साठी काम करणारी वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटने द्वारे प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या काही ध्वनीप्रतिक्रिया त्यानी पाठवल्या आहेत व मिसळपाव चे आभार मानले आहेत.

मार्कस ऑरेलियस's picture

8 Jul 2021 - 8:25 pm | मार्कस ऑरेलियस

मोदी आणि भाजपा सत्तेत यायच्या आधी मिपावर किती गंभीर विषयांवर प्रगल्भ चर्चा वादविवादसुसंवाद व्हायचे ! कुठेही राजकीय टिप्पण्णी नाही, कोणत्याही धर्मावर , धर्मपरंपरा श्रध्दांवर , कोणत्याही जातीवर, समाजावर चिखलफेक नाही, कुठेही तारतम्य सोडून तिरकस टिप्पण्णी नाही !

हा काथ्याकुट एक अतिषय आदर्श काथ्याकुट म्हणुन पिन करुन ठेवला पाहिजे मुख्यपानावर !

बाकी -
श्या: , आमच्या काळचं मिपा राहिलं नाही आता !

Ujjwal's picture

9 Jul 2021 - 8:28 am | Ujjwal

.