साहित्यः
बासमती तांदूळ २ वाट्या
तोंडली १ वाटी
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
तिखट १ लहान चमचा
कच्चा मसाला ४ लहान चमचे
दही १ वाटी
गूळ लिंबा एवढा
कोथिंबीर १ वाटी
ओले खोबरे १ वाटी
मीठ चवीनुसार
तेल फोडणीसाठी
मोहरी २ लहान चमचे
कढीलिंब पाने दोन डहाळ्या
काळीमिरी १ लहान चमचा.
काजू तुकडा १२ ते १५
साजुक तुप १ छोटा डाव
तयारी:
तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा.
तोंडल्यांची दोन टोके कापून त्यांच्या चार उभ्या फोडी करा.
कोथिंबीर चिरुन घ्या.
४ वाट्या पाणी तापत ठेवा.
कच्चा मसाला:
अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, शाहिजिरे २ लहान चमचे, १२ लवंग, ८" दालचिनी. हे सर्व साहित्य न भाजता मिक्सरवर दळून घ्या. (आवश्यकता भासल्यास बारीक चाळणीने चाळून घ्या) पाककृतीत हा मसाला फक्त ४ लहान चमचे घ्यायचा आहे. उरलेला मसाला उसळींसाठी वापरता येईल.
कृती:
पातेल्यात ४ मोठे चमचे तेल घेऊन मध्यम आंचेवर तापवा. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की कढीलिंबाची पाने आणि काळीमिरी घाला.
आता काजू घालून परता. काजूंचा रंग बदलायला लागला तोंडली घालून अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून तोंडली अर्धवट शिजवा. तोंडली शिजली की निथळविलेले तांदूळ घालून परता. आता त्यावर हळद, तिखट, कच्चा मसाला, फेटलेले दही घालून परता.
जरा परतल्यावर गरम केलेले ४ वाट्या पाणी घालून सर्व हलक्या हाताने मिसळा. आता त्यात गूळ घाला. सजावटीसाठी थोडी बाजूला ठेवून बाकीची कोथिंबीर आणि ओले खोबरे घाला. चवीपुरते मीठ घालून पुन्हा सर्व मिसळा>
आता आंच अगदी बारीक करून भात पूर्ण शिजवून घ्या.
भात शिजल्यावर वरून एक छोटा डाव साजूक तुप सोडा.
भाताची मुद पाडून त्यावर थोडे ओले खोबरे, कोथिंबीर घालून लिंबाची फोड आणि लोणच्या बरोबर खायला घ्या.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
19 Sep 2012 - 4:32 pm | गणपा
मस्त दिसतोय मसाले भात.
19 Sep 2012 - 4:43 pm | प्रभाकर पेठकर
अरे पण ते छायाचित्र वरती दिसायला हवं. आधीची सोय चांगली होती. किंवा ही नवी सोय कशी वापरायची? हे जरा नीट सांगा माझ्या सारख्या संगणक मठ्ठाला.
19 Sep 2012 - 4:48 pm | प्रभाकर पेठकर
'मसालेभात' ह्या शीर्षका खाली मिपाचे मुखपृष्ठ झळकते आहे. आणि नंतर त्याच्या खाली पाककृती दिसते आहे. कृपया तपासून पाहावे.
19 Sep 2012 - 5:06 pm | गणपा
योग्य ते बदल केलेत.
19 Sep 2012 - 5:09 pm | प्रचेतस
मसालेभात छानच झालाय.
19 Sep 2012 - 5:33 pm | इरसाल
काकांनी मागील बॅकलॉग भरायचा चंगच बांधलाय जणु. मस्त काका.
19 Sep 2012 - 7:23 pm | रेवती
गणेशचतुर्थीच्या दिवशी सणावाराला शोभेल असा भाताचा प्रकार आणि फोटू आवडला.
19 Sep 2012 - 11:22 pm | शिल्पा ब
या आठवड्यात करुन बघते. तोंडल्याबरोबरंच अजुन कोणत्या भाज्या चांगल्या लागतील?
20 Sep 2012 - 12:33 am | सानिकास्वप्निल
मसालेभात अतिशय आवडतो
छानच झालाय :)
धन्यवाद
20 Sep 2012 - 12:40 am | अभ्या..
पेठकर काका छानच झाला आहे मसाला (काळा) भात.
एकाहून एक छान छान (आणि घरी पटकन करता येणार्या ) पाकृ बद्दल आभार.
20 Sep 2012 - 1:10 pm | अस्मी
एकदम छान दिसतोय मसालेभात!!
मस्त पाकृ.
20 Sep 2012 - 3:29 pm | पियुशा
मस्त !!! कधी येउ काका जेवायला तुमच्याकडे ? ;)
20 Sep 2012 - 4:18 pm | प्रभाकर पेठकर
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर काकांची थट्टा करायचा मूड दिसतो आहे. छान छान.. कधीही ये. फक्त यायच्या तासभर आधी कळव म्हणजे झालं.
22 Sep 2012 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा
@फक्त यायच्या तासभर आधी कळव म्हणजे झालं.>>>
22 Sep 2012 - 5:41 pm | पिंगू
पेठकरकाका, फोडणी आवडली.
22 Sep 2012 - 6:21 pm | पैसा
काय मस्त दिसतोय! खास मराठी पाकृ! ते पुलाव आणि बिर्याणी आणि फ्राईड राईस खाता खाता याला विसरायलाच झालं होतं!
23 Sep 2012 - 9:31 pm | प्रास
सुंदर, अप्रतिम पाककृती. लगेच करून खावीशी वाततेय. असं काही लिहावसं वाटतंय पण....
धागा पाहिला, वाचला, फोटो आवडला.
इतकंच लिहितोय. बाकी समजून घ्या....
16 Jan 2013 - 3:41 am | सुदेशा
ही पाकक्रूती मला दिसत नाही.
16 Jan 2013 - 4:36 am | दीपा माने
पाकृ अतिशय सात्विक वाटली. लग्नातील जेवणावळीतल्यापेक्षा नैवेद्याच्या ताटात शोभणारा असा.
16 Jan 2013 - 10:35 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद दीपा माने.
16 Jan 2013 - 11:28 am | धनुअमिता
माझा वीक पॉइंट आहे मसालेभात.नक्की करुन बघणार.
16 Jan 2013 - 11:37 am | जयवी
वाचन खूण म्हणून कसं साठवायचं ?
16 Jan 2013 - 6:54 pm | त्रिवेणी
माझा मसालेभात केल्यावर खिचडीच्या रूपात प्रकट होतो. सो खिचडीच मसालेभात म्हणून खाते.
16 Jan 2013 - 11:26 pm | श्रिया
फोटोतला मसालेभात एकदम खास! सोपी अन छान रेसिपी.
17 Jan 2013 - 1:57 am | शुचि
फार आवडीचा पदार्थ. मठ्ठा किंवा ताकाबरोबर चापायचा पदार्थ!!
20 Jan 2013 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर
धनुअमिता, जयवी, त्रिवेनि, श्रिया आणि शुचि धन्यवाद.
24 Jan 2022 - 12:00 pm | रुपी
मला फोटो दिसत नाही, पण आज हीच पाकृ बघून तोंडली भात केला. खूप छान झाला होता.