✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तकांविषयी सर्वकाही...

म
मोदक यांनी
Mon, 02/27/2017 - 13:39  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात. ही माहिती सर्वांसोबत वाटून घेण्याच्या अनुषंगाने हा धागा काढत आहे. सध्या काय वाचत आहात, अलिकडे काय वाचले, एखाद्या पुस्तकाची माहिती हवी आहे किंवा एखादे पुस्तक मिळत नाहीये / मिळवायचे आहे, एखादे पुस्तक पूर्वी कधीतरी वाचले पण नांव आठवत नाहीये अशा कोणत्याही गोष्टी लिहिण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकता. एखादे पुस्तक विकत घेतले आणि सध्या नको आहे अशावेळी कुणाला विकत / तसेच द्यावयाचे असेल तर त्यासाठीही हा धागा जरूर वापरा (फक्त मिपा प्रशासनाला आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवा) चला तर मग.. सर्व मिपाकर मिळून पुस्तकांविषयी कोणत्याही शंका, निरीक्षणे, सल्ले, अनुभव यांची पोतडी उघडूया. वाचनसंस्कृतीची आपल्या परीने जपणूक करूया. (पुस्तकप्रेमी) मोदक. **************** १) येथे मराठी, हिंदी, इंग्लीश.. सर्व भाषांमधील पुस्तकांबद्द्ल लिहू शकता. हा धागा फक्त मराठी पुस्तकांपुरता मर्यादित नाही. २) शक्य झाले तर मराठीशिवाय इतर भाषांमधील पुस्तकाबद्दल लिहिताना, त्याचे मराठीत भाषांतर झाले आहे का आणि झाले असल्यास भाषांतरीत पुस्तकाचे नांव दिले तर पुस्तक शोधणे सर्वांना सोयीचे पडेल. ****************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
आस्वाद
समीक्षा
शिफारस
सल्ला

प्रतिक्रिया द्या
47994 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

मी सुरूवात करतो.

मोदक
Mon, 02/27/2017 - 13:42 नवीन
मी सुरूवात करतो. आज एकच दिवस मेहता प्रकाशनमध्ये मराठी भाषा दिनानिमीत्त सर्व पुस्तकांवर ४०% सूट आहे. किमान ३४००/- रूपयांची खरेदी आवश्यक, म्हणजे एकूण डिस्काऊंट मिळून बिल २०००/- दरम्यान होते.
  • Log in or register to post comments

छान धागा

सागर
Mon, 02/27/2017 - 15:14 नवीन
मोदका छान धागा सुरु केलास सध्या मी भा. रा. भागवतांनी अनुवाद केलेले "शाब्बास शेरलॉक होम्स" ही ५ छोट्या पुस्तकांची मालिका वाचतो आहे. डायमंड प्रकाशनाने गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" या दोन खंडांची पुनर्र्छ्पाई केली आहे. इतिहासाची आवड असणार्‍यांनी अवश्य संग्रही ठेवावा असा हा ग्रंध आहे. असो मला जुनी काही पुस्तके हवी आहेत. कोणी मदत करु शकले तर खूप आनंद होईल. - वारसा नॉस्ट्राडेमसचा - मूळ लेखक : रेमंड लिओनार्ड - मराठी अनुवाद : अनिल काळे - द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - शकुंतला - आनंद साधले (याची झेरॉक्स प्रत देखील चालेल )
  • Log in or register to post comments

- द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन

मोदक
Mon, 02/27/2017 - 15:18 नवीन
- द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर हे पुस्तक सध्या छपाईत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

हो ना. जेव्हा उपलब्ध होते

सागर
Mon, 02/27/2017 - 15:20 नवीन
हो ना. जेव्हा उपलब्ध होते तेव्हा घेतले नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

श्री. राजा शिवछत्रपति ऑनलाईन ऑर्डर करता येईल.

सागर
Mon, 02/27/2017 - 15:19 नवीन
गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" २ खंड ऑनलाईन ऑर्डर करता येतील. मी घेतले आहेत. २०% सवलतीने खरेदी करण्यासाठीचा दुवा : http://www.diamondbookspune.com/viewdetails.php?bid=118&disc=20
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

बढिया

वरुण मोहिते
Mon, 02/27/2017 - 15:38 नवीन
मला एक पुस्तक हवंय..डार्क गॉड्स नावाचं .टेड क्लेन म्हणून लेखक आहेत अमेझॉन वरून मागवलं तर २० दिवसांनी त्यांचा परत मेल आला कि उपलब्ध नाही म्हणून. असं म्हणतात हे पुस्तक नारायण धारपांचं इन्स्पिरेशन आहे.ते गेल्यावर त्यांच्या घरातली पुस्तक जेव्हा विकली तेव्हा रद्दीत हे पुस्तक हृषीकेश जोशी सध्या भयकथा वैग्रे लिहितात त्यांना मिळालं . अशी कथा ऐकल्यावर उगाच उत्सुकता लागलीये ते पुस्तक वाचायची .
  • Log in or register to post comments

उपलब्ध आहे पण किंमत बरीच आहे

सागर
Mon, 02/27/2017 - 16:33 नवीन
वरुण हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे पण खुप महाग आहे. अ‍ॅमेझॉन च्या साईट वर सर्च मधे नाहि सापडले. पण गूगल सर्च मधून सापडले. लिन्कः http://www.amazon.in/gp/offer-listing/0330297147/ref=dp_olp_used_mbc?ie=UTF8&condition=used बहुदा वापरलेले (सेकंड सेल आहे) पुस्तकाच्या रेटिंग वरुन बरेच प्रसिद्ध पुस्तक आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

माझ्याकडे इतिहासकालीन

वरुण मोहिते
Mon, 02/27/2017 - 17:30 नवीन
सातवाहन कालीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास ..महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ मंडळासाठी विजयानगर पुणे ३०... अशी बऱ्यापैकी रेअर असलेली यादी पण आहे . रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??
  • Log in or register to post comments

रोज इकडे एखाद पुस्तक शेयर

मोदक
Mon, 02/27/2017 - 17:46 नवीन
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का?? हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे

दीपक११७७
Mon, 02/27/2017 - 18:19 नवीन
मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे मला या पुस्तकाचं फक्त नावच पुसटस आठवत, हे पुस्तक अनुवदित आहे, जर कुणाला याबद्दल काही माहीत असल्यास क्रुपया सांगावे. छान धागा मोदक मित्रा!
  • Log in or register to post comments

Readers Digest चे अंक

Nitin Palkar
Mon, 02/27/2017 - 18:49 नवीन
१९९० ते २०११ या काळातील Readers Digest चे सुमारे शंभर मासिक अंक (संमिश्र, सलग नव्हेत) माझ्याकडे आहेत. हौशी संग्रहाकास नाममात्र किमतीस विकणे आहेत. संपर्क: ७०४५६ ३६३४६
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि

आदूबाळ
Mon, 02/27/2017 - 18:51 नवीन
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ऑनलाईन ईबुक्स https://msblc.maharashtra.gov.in/pdf/ (यापद्धतीने लिंक द्यायचं कारण म्हणजे 'छुपी' पुस्तकंही दिसतात.)
  • Log in or register to post comments

हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही

केडी
Mon, 02/27/2017 - 19:40 नवीन
हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही म्हणून मग audible (ऍमेझॉन) वर पुस्तक श्रवण करतो, ऑफिस ला गाडीतून जाता येता. आधी थोडं वेगळं वाटत, पण सवय होते, आणि नंतर मज्जा येते. ह्यावर आवर्जून ऐकावे/वाचावे असे पुस्तक म्हणजे Man versus Wild च्या Bear Grylls चे पुस्तक Mud, Sweat and Tears. हे माझ्या १२ वर्षाच्या मुलाला देखील ऐकवले आणि त्याने मन लावून ऐकले। विलक्षण अनुभव आहेत ह्या माणसाचे. नक्की वाचून बघा।
  • Log in or register to post comments

भारी पुस्तक....

देशपांडेमामा
Wed, 03/01/2017 - 18:51 नवीन
लय भारी पुस्तक आहे हे. मी वाचतोय सध्या :-) देश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केडी

India Since Independence: Making Sense of Indian Politics

गॅरी ट्रुमन
Mon, 02/27/2017 - 21:41 नवीन
India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जनेयुमधील प्राध्यापक व्ही.कृष्ण अनंत यांचे पुस्तक माझ्या अगदी 'ऑल टाईम फेव्हरेट' मध्ये आहे. हे पुस्तक भारतीय राजकारणात स्वातंत्र्यापासून जवळपास १९९० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेते. तसेच या पुस्तकामध्ये घटना जशा घडल्या तशा दिल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जनेयुमधील प्राध्यापक असले तरी जनेयु स्टाईलमध्ये हलकटपणा करायला स्कोप नाही. मिपावर राजकारणावरील चर्चांमध्ये माझ्या अनेक प्रतिसादांना या पुस्तकाचा आधार असतो. या पुस्तकात नेहरूंचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, आणीबाणी, जनता पक्ष, राजीव गांधींचा कालावधी इत्यादी काळात झालेले राजकीय चढउतार भरपूर सविस्तरपणे दिले आहेत. माझ्यासारख्या राजकारणात अतोनात रस असलेल्याला हे पुस्तक म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कितीही वेळा वाचले तरी मधूनमधून ते पुस्तक मी परत वाचत असतो. हे पुस्तक उत्तम आहेच फक्त पुस्तकात अनेकवेळा तारखांचा घोळ झाला आहे (म्हणजे फार घोळ नाही--२-४ दिवस इकडेतिकडे) ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते.
  • Log in or register to post comments

रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा

पुंबा
Wed, 03/01/2017 - 17:19 नवीन
रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा आणि रामचंद्र गुहा या दोघांची स्वातंत्र्योत्तर भारतावरची पुस्तके संग्रही आहेत. आता हेदेखील वाचायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

धन्यवाद, रोचक वाटत आहे.

अत्रे
Sun, 03/05/2017 - 17:19 नवीन
धन्यवाद, रोचक वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

सध्या आतिवास सविता ह्यांचे

अभिजीत अवलिया
Tue, 02/28/2017 - 09:08 नवीन
सध्या आतिवास सविता ह्यांचे अफगाणिस्तानमधील अनुभवावर आधारित 'भय इथले' हे पुस्तक वाचत आहे. त्यानंतर जयंत नारळीकर ह्यांचे 'चार नगरातील माझे विश्व' वाचणार आहे.
  • Log in or register to post comments

सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी

प्रचेतस
Tue, 02/28/2017 - 10:09 नवीन
सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेले 'श्री राजा शिवछत्रपती' हे पुस्तक वाचत आहे. प्रचंड माहितीच्या ओघाने निव्वळ थक्क व्ह्यायला होतंय.
  • Log in or register to post comments

सध्या विश्वस्त वाचतोय

वरुण मोहिते
Tue, 02/28/2017 - 10:27 नवीन
वसंत वसंत लिमये यांचं . रहस्य कथा कथा वर्तमान काळाशी सुसंगत ह्या धर्तीवर . आधीचं लॉक ग्रिफिन पण तसेच होते. 'शोध 'पण असेच होते मुरलीधर खैरनार यांचे . अंग्रेजी मध्ये सध्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल ' वाचतोय शशी थरूर यांचे .
  • Log in or register to post comments

नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द

पुंबा
Tue, 02/28/2017 - 10:28 नवीन
नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द डझन' आणि 'सारे प्रवासी घडीचे' ही तीन पुस्तके वाचून संपवली. अत्यंत सुंदर पुस्तके आहेत तीनही. सध्या कथासंग्रह वाचायचा मूड आहे, दि बा मोकाशींचा 'दिवेलागण' आणि श्री दा पानवलकरांचा 'सूर्य' असे दोन कथासंग्रह वाचत आहे. मिपावर बॅटमॅन यांनी अफाट स्तुती केल्याने मराठी 'वांग्मयाचा गाळीव इतिहास' हे देखील आणले आहे, दुकानात चाळत असताना पहिली एक दोन पाने वाचूनच जो वेड्यासारखा हसत होतो. नॉन फिक्शनमध्ये मायकेल सँडेल यांचे 'जस्टिस: व्हॉट्स द राईट थिंग टू डू' आणि 'गावगाडा' ही दोन चालू आहेत पण तितका सलग वेळ देता येत नसल्याने एखादे प्रकरण वाचून थंड पडत आहेत. न सांगण्याजोगी गोष्ट आणले आहे, पण सुरू करण्यासाठीच मूड येत नाहीये. मुख्य ओढा कथासंग्रहांकडे असल्याने, मिपाकर, कृपया चांगले कथासंग्रह सुचवा. तसेच, 'जप्ती' ही कथा मी सातवीत असताना वाचली होती, ती खूप आवडली होती, दुर्दैवाने लेखिकेचे आणि कथासंग्रहाचे नाव लक्षात येत नाही. बहुदा, वसुंधरा पटवर्धन किंवा असेच काही तरी त्यांचे नाव होते. कुणाला ही कथा ठाऊक असल्यास अधिक माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

सारे प्रवासी घडीचे जबरदस्त

मोदक
Tue, 02/28/2017 - 11:14 नवीन
सारे प्रवासी घडीचे जबरदस्त पुस्तक आहे. =)) ********************** अवांतर - मी पूर्वी कधीतरी या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते. ********************** सारे प्रवासी घडीचे ही कथा आहे एका कोकणातल्या एका प्रतिष्ठीत घरातील जमीनदाराच्या मुलाची. "आपू" ची. शिक्षणानंतर शहरात गेलेला आपू गावामध्ये एक दोन दिवसांसाठी येतो, वाड्याचे बंद दारही पाहण्याची सवय नसणारा आपू त्याच वाड्याच्या रिकाम्या उदास भकास खोल्यातून जुन्या आठवणी शोधत फिरतो, वाळवी व कसर लागलेले देव पाहून खिन्न होतो, एखाद्या पाहुण्यासारखे पूजा करणार्‍या भटजींच्या डब्यातले अन्न खातो या व अशा उदास वातावरणात आपूची आत्म-कथा सुरू होते. आपूला एकेक गोष्टी आठवतात.. या पुस्तकातील सर्व घटना माणसांभोवती विणलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला दळवींनी दिलेली विनोदाची झालर त्यांचे विनोदावरील प्रभुत्व दाखवून जाते.. निर्वीष, निर्वैयक्तीक आणि निव्वळ प्रसंग व संवादातून उभा केलेला विनोद!! आबा.. त्यांची ग्रामदैवत रवळनाथावरील निष्ठा. रवळनाथाचे त्यांना आलेले अनुभव. आबांचा कट्टर वैरी बाबुली. त्याच्याशी नेहमी सुरू असलेले कोर्टकचेरीतील दावे. आपूच्या शाळाप्रवेशाची नांदी. भविष्य पाहण्यासाठी आलेले भटजी व त्यांनी काढून दिलेला मुहूर्त. आपूचे व त्याच्या आजीचे विडी आणण्यावरून जमलेले द्वैत, आपू शाळेत गेला तर विड्यांचे काय ही आज्जीला लागलेली काळजी. शाळेत न जाण्याची आपूची तर त्याला शाळेत घालण्याची आबांची धडपड. "सरस्वती आयली तर लक्ष्मी जातली" हे आज्जीने सांगीतलेले तत्वज्ञान! आपूने शाळेतच बसावे - पळून जावू नये म्हणून केलेल्या दादुल्याची नेमणूक. शाळेतला "ढ" पण जिवलग मित्र नरू. "भो पंचम जॉर्ज"ची मनापासून प्रार्थना करणारे व शाळामास्तर हेच पोस्टमास्तर असलेले बागाईतकर मास्तर. "माका नाव W W कुळकर्णी असत" असे म्हणून V V कुळकर्णी नावाने आलेले पत्र नाकारणारे (पण कार्ड असेल तर वाचून परत देणारे) आपूचे शेजारी "वामन विष्णु कुळकर्णी" शाळेचे गॅदरींग, "घनतमी शुक्र राज्य करी" व "अहाहा चेंडू.." या गाण्यांच्या अयशस्वी प्रयोगानंतर सर्वानुमते ठरलेले "देवाजीने करूणा केली" हे गाणे. गॅदरींगमध्ये आपूच्या विळ्याने किरकोळ जखम झालेला परशा व त्यानंतर परशाचा विळा हातात घेवून बागाईतकरांचे धोतर (घामाने!) ओले होईपर्यंत भांडण केलेला परशाचा बा. बागाईतकरांच्या रिटायरमेंट नंतर शाळेत अवतरलेला पावटे मास्तर. हा मास्तर बाबुलीच्या गटातील असल्याने त्याने केलेले आपूचे हाल. पावटे मास्तरच्या हाताचा मार खाऊन खाऊन एक दिवस त्याच्या खुर्चीवर खाजकुयलीची कुसे टाकून व नंतर पावटे मास्तरच्या "दुर्गाबाय" नावाच्या एका विधवेशी असलेल्या प्रकरणावरून "दुर्गेदुर्गट भारी तुजविण संसारी.." हे आरती टाळ्या पिटून भर बाजारात पावटे मास्तरच्या मागी लागणारा नरू.. पावटे मास्तर जातपात पाळत असल्याने केशा चांभाराला शिक्षण कमीटीचा मेंबर म्हणून निवडून देणारे आबा व केशाने केलेले शाळेचे "इन्स्पेक्षन" एका चांभाराला निवडून देणारे गाव पुरोगामी असलेच पाहिजे म्हणून गावात अवतरलेले "खुळो डाक्टर" डॉ.रामदास. त्यांनी आयोजीत केलेले गावकर्‍यांनी सर्वभोजन. दारूचा गुत्ता चालवणारा पेस्तँव.. दारूडा बाबल्या मडवळ. पशू, पक्षी व वनस्पतींची जिवापाड काळजी घेणारा हाफमॅड तात्या. आपूला जेलमध्ये डांबले म्हणून गेम करून सस्पेंड केला गेलेला हवालदार मुंगी. दशावतारी जिवा, त्याने साकारलेला शंकासूर.. जिवाचा प्रतिस्पर्धी व रवळनाथाचा पुजारी बाबू गुरव. बाबूने केलेले एकमेव नाटक द्रौपदी वस्त्रहरण - ज्याचा शेवट "लंगोटीमध्ये उभी असलेली द्रौपदी विडी ओढणार्‍या भगवान कृष्णाच्या तोंडात भडकावते" असा होतो. गावातील रिकामटेकडे व सतत कोणाचीतरी माहिती काढत त्यावरून वेळ घालवणारे लोक.. त्यांनी वेगवेगळ्या सवईंवरून लोकांना बहाल केलेली झोंबणारी टोपणनावे.. नायनाय भाऊ, हाफमॅड तात्या, अमृतांजन प्रेमजी, दुलाजीचा मुलगा "यम" (रेड्यावर बसून शेतातून घरी येणारा म्हणून!) लंगडा तातू.. हे अगदी छोटेखानी पुस्तक हास्याचे कारंजे उडवते. या व अशा अनेक माणसांचे चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण.

पुंबा
Tue, 02/28/2017 - 13:47 नवीन
मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण. सगळी उजळणी झाली मनातल्या मनात, परत हसतोय.
चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!
मी खरेच आहे असे मानतो.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भारी! अतिशय आवडतं हे पुस्तक.

पिशी अबोली
Fri, 03/03/2017 - 00:10 नवीन
भारी! अतिशय आवडतं हे पुस्तक. सगळी उजळणी झाली खरंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ

शैलेन्द्र
Mon, 03/20/2017 - 21:02 नवीन
सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ बुक आहे, हव असेल तर सांंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

द्या की.. मेल आयडी पायजे का..

मोदक
Mon, 03/20/2017 - 21:46 नवीन
द्या की.. मेल आयडी पायजे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मलाही द्या प्लीज. मेल आयडी

पुंबा
Tue, 03/21/2017 - 10:39 नवीन
मलाही द्या प्लीज. मेल आयडी व्यनी करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मलाही द्या प्लीज

इडली डोसा
Tue, 03/21/2017 - 10:58 नवीन
कशावर पाठवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

फिल्ड मार्शल एर्विन रोमेलचे

फेदरवेट साहेब
Tue, 02/28/2017 - 14:42 नवीन
फिल्ड मार्शल एर्विन रोमेलचे चरित्र 'डेझर्ट फॉक्स' वाचण्याचा मूड होतोय इतक्यात.
  • Log in or register to post comments

फोनमध्ये डाउनलोड केलेली epub

कंजूस
Wed, 03/01/2017 - 16:54 नवीन
फोनमध्ये डाउनलोड केलेली epub / txt पुस्तके Kindle स्टाइलमध्ये वाचता येणारे Windows app " Bookviser Reader" मधून-- Image removed.
  • Log in or register to post comments

मी ereader prestigio वापरतो.

पुंबा
Wed, 03/01/2017 - 17:17 नवीन
मी ereader prestigio वापरतो. .mobi, तसेच epub दोन्हीही प्रकारची पुस्तके निश्चिंतपणे वाचता येतात. फाँट आणि मार्जिन कमी जास्त करता येते. google books व किंडल छानच आहेत पण मोबाईलमधील जास्त जागा खातात.
  • Log in or register to post comments

आमच्याकडून आजचं

वरुण मोहिते
Wed, 03/01/2017 - 18:03 नवीन
मराठी _तुही यत्ता कंची?? तुही यत्ता लेखक -नामदेव ढसाळ अंग्रेजी -वॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टींग लेखक _एम टी राजू
  • Log in or register to post comments

सध्या जनरल जे. जे. सिंग यांचे

अमर विश्वास
Wed, 03/01/2017 - 19:16 नवीन
Image removed. सध्या जनरल जे. जे. सिंग यांचे "माझे सैनिक - माझा लढा" वाचत आहे. टाटायन वाचून संपवले
  • Log in or register to post comments

टाटायनमधली अजित केरकर आणि

मोदक
Wed, 03/01/2017 - 19:54 नवीन
टाटायनमधली अजित केरकर आणि टाटा फायनान्स (पेंडसे ?) ही दोन प्रकरणे वाचून धक्का बसला होता. बाकी टाटांसंबंधी पुस्तके वाचायची असतील तर आर एम लाला यांच्या पुस्तकांना पर्याय नाही. (तसेच बिझनेस लिजंड आणि बिझनेस महाराजे मधली जेआरडी आणि रतन टाटांची व्यक्तीचित्रे.) __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

सुंदर धागा झकास प्रतिसाद !

मारवा
Wed, 03/01/2017 - 20:34 नवीन
तुनळीवर एक झकास वल्ली आहे पुस्तकांवर जबरा बोलतो व सुचवतो. विशेषता आधुनिकोत्तर एकदा जरुर आजमवा त्याच्याच सुचवणीवरुन सध्याच वाचन सुरु आहे. युट्युबात. जावुन bookchemist टाइप करा व सर्च करा मजा आजायेगा गॅरंटी !
  • Log in or register to post comments

मोदकजी ...

अमर विश्वास
Wed, 03/01/2017 - 22:02 नवीन
मोदकजी ... टाटांबद्दल जेव्हडे वाचु तेभाडे कमीच आहे गिरीश कुबेर यांचे यांचे सध्याचे (लोकसत्ता जॉईन केल्या नंतर) लिखाण वाचल्यानंतर त्यांचे पुस्तक वाचायला भीतीच वाटते .. पण टाटायन चांगले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजित केरकर आणि टाटा फायनान्स ही दोन प्रकरणे खरच खळबळजनक आहेत. खुद्द पेंडसेंनी लिहिलेले जे आर डी - मी पाहिलेले हे पुस्तक ही वाचनीय आहे. त्याचप्रमाणे जे आर डी चे "key notes address " एकत्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे (मराठी भाषांतर) जरूर वाचा
  • Log in or register to post comments

कुबेरांबद्दल सहमत. ;)

मोदक
गुरुवार, 03/02/2017 - 17:00 नवीन
कुबेरांबद्दल सहमत. ;) मी पाहिलेले जेआरडी लिहिणारे द. रा. पेंडसे - हे टाटा ग्रुप मध्ये वरिष्ठ अर्थतज्ञ होते. (टाटा फायनान्स वाले पेंडसे वेगळे.) तसेच टाटा याच विषयावर आर एम लाला यांचे "क्रिएशन ऑफ वेल्थ" नावाचे एक पुस्तक आहे. टाटांची सुरूवातीपासूनची कथा आणि मारिओ मिरांडा यांची विषयानुरूप बहारदार रेखाचित्रे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुण्यात मंगळदास रोडवर "टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज" आहे. तेथे कधीतरी जरूर भेट द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

धन्यवाद मोदक ...

अमर विश्वास
गुरुवार, 03/02/2017 - 21:47 नवीन
धन्यवाद मोदक ... खुप वर्षांपूर्वी मी पाहिलेले जेआरडी हे पुस्तक वाचले होते.. नावात घोळ झाला .... चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज ला भेट दिली आहे .. तसेच कामानिमित्त बॉम्बे हाऊस ला ही भेट देण्याची संधी सुद्धा मिळाली ... आत्तापर्यंत अनेक कॉर्पोरेट हाऊसेस ना भेट दिली .. पण बॉम्बे हाऊस चा अनुभव वेगळाच होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 03/02/2017 - 11:02 नवीन
माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र Matters of Discretion: An Autobiography मध्यंतरी वाचले होते. माझ्या मते हे एक चांगले पुस्तक आहे पण त्यातील काही गॅप मात्र जाणवण्यासारख्या आहेत. १. गुजराल यांनी मॉस्कोमधील भारतीय वकिल म्हणून १९७६ ते १९८० ही चार वर्षे काम पाहिले. आज इंदरकुमार गुजराल हे नाव ऐकले की आपण परराष्ट्रधोरणाबरोबर ते नाव ताबडतोब निगडीत करतो. मला वाटते की गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील एकूणच दृष्टीकोन या काळात जास्त बदलला. गुजराल यांना हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ वाटत असणे स्वाभाविक आहे आणि त्यांनी पुस्तकातली अनेक प्रकरणे त्यावर दिली आहेत. पण अर्ध्याहून जास्त भारतीयांचा जन्म त्यांची मॉस्कोतील कारकिर्द संपल्यानंतर झालेला आहे. या वाचकवर्गाला त्यांचे मॉस्कोमधील अनुभव काहीसे कंटाळवाणे आणि फार रस वाटावे असे असतील असे वाटत नाही. त्यातील काही अनुभव तर खूपच विस्ताराने लिहिले आहेत असे मला वाटले. उदाहरणार्थ राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींच्या मॉस्को भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळी ब्रेझनेव्ह उपस्थित राहिले नाहीत हा रेड्डींना अपमान वाटला आणि त्यामुळे कूटनैतिक संकट उभे राहिले असते आणि ते कसे टळले यावर काही पाने खर्ची पाडली आहेत. हे अनुभव सामान्य भारतीय वाचकांना फार भावतील असे नाही. तसेच सोव्हिएट रशियाच्या इतिहासात रस असलेल्या वाचकालाही हे फार भावेल इतक्या विस्तारानेही या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. म्हणजे हे काही अनुभव कोणत्याच वाचकाला भावतील असे वाटले नाहीत आणि ते नक्की कशाकरता पुस्तकात आहेत असेही वाटले. २. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात गुजराल माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी आणीबाणीच्या काही दिवस आधी संजय गांधींनी त्यांच्यावर इंदिरा समर्थकांच्या सभांना रेडिओ-टिव्हीवर प्रसिध्दी द्या असा आदेश दिला होता आणि तो त्यांना मान्य नव्हता यावर त्यांनी लिहिले आहेच. पण आणीबाणी या स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटनेविषयी त्यांनी पुस्तकात फार लिहिलेले नाही हे पण जरा खटकलेच. ३. गुजराल सुरवातीपासून काँग्रेसशी संलग्न होते. पण एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडायचा प्रयत्न केला याविषयी त्यांनी लिहिले आहे. पण त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली याविषयी गुजराल यांनी काहीच लिहिले नाही हे नक्कीच खटकले. मला स्वतःला १९८९ पूर्वीच्या घटना केवळ पुस्तके वाचून माहित आहेत त्यामुळे अशा महत्वाच्या घटनेविषयी काहीच न लिहिलेले मात्र खटकले. ४. गुजराल पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत कल्याणसिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस केली होती. ती राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाकडे परत पाठवली. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर हा नक्कीच डाग होता. याविषयी त्यांनी मायावतींनी कल्याणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुजराल यांचे राज्यपाल रोमेश भंडारी यांच्याशी काय बोलणे झाले एवढेच लिहिले आहे. आणि त्यानंतर "उत्तर प्रदेशातील पेचप्रसंग सुटल्यावरच मला व्यवस्थित झोप लागू शकली" असे लिहिले आहे. पण तो पेचप्रसंग नक्की कसा सुटला याचा उलगडा मात्र वाचकांना होत नाही. ५. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरच्या त्यांच्या जीवनाविषयी फार त्यांनी लिहिलेले नाही. विशेषतः १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर गुजराल यांनी लोकसभेत वाजपेयी सरकार नक्की कोणत्या चुका करत आहे यावर भाष्य केले होते. गुजराल यांची इंग्रजी भाषेवरील पकड आणि वक्तृत्व मला नेहमीच भावत असे. त्यांचे लोकसभेतील हे भाषण मी मुद्दामून बघितले होते. तसेच गुजराल पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ही घटना दोन महिन्यातच झाली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रधोरणाला नवे वळण लावणारी ही घटना होती. गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील रस लक्षात घेता या महत्वाच्या घटनेवर त्यांनी काहीतरी लिहायला हवे होते असे वाटून गेले. ६. जेव्हा एखादा नेता आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्या जीवनात घडलेल्या घटना एकामागोमाग एक लिहिणे एवढाच त्याचा उद्देश नसावा असे वाटते. तर त्या नेत्याच्या विषयात पुढे काय घडामोडी होऊ शकतील याविषयीचे स्वतःचे मत असायला हवे असेही वाटते. विशेषतः गुजराल हे परराष्ट्रधोरणातील जाणकार असल्यामुळे यानंतरच्या काळात भारताला परराष्ट्रधोरणात नक्की कोणती आव्हाने उभी राहतील आणि ती पेलण्यासाठी काय करायला हवे याविषयी थोडे तरी भाष्य हवे होते असेही वाटले. एकूणच माझ्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असलेल्या वाचकाला इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाकडून ज्या अपेक्षा होत्या या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. हे पुस्तक गुजराल यांनी वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर प्रकाशित झाले होते. कदाचित त्यावेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसावी. तसेच गुजराल यांचे निधन होण्यापूर्वी दोनेक वर्ष त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या वयात हा विरहाचा धक्का पचविणे तसे कठिणच असेल याची कल्पना करता येते. तसेच प्रकाशकांना आधीच कबूल केल्यामुळे प्रकृती साथ देत आहे तोपर्यंत पुस्तक पूर्ण करायचे हे पण दडपण असेल. या सगळ्या कारणांमुळे त्यांचे आत्मचरित्र हे एखाद्या अपूर्ण मूर्तीप्रमाणे वाटले. हे पुस्तक त्यांनी ८-१० वर्षे आधी लिहिले असते तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे झाले असते असेही वाटून गेले. अर्थातच हे पुस्तक वाईट आहे असे नक्कीच नाही. गुजराल, अडवाणी इत्यादी नेत्यांचे राजकीय जीवन म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासच. या आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील पहिल्या ५० वर्षांचा लेखाजोखा थोडा तरी नक्कीच समजतो. तसेच वि.प्र.सिंग यांच्या मंत्रीमंडळातील लाथाळ्या, १९९० चे इराक-कुवेत प्रकरण इत्यादींचा चांगलाच आढावा त्यांनी घेतला आहे. पण असाच आढावा इतर महत्वाच्या घटनांचाही घेतला गेला असता तर बरे झाले असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटून गेले.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे मोबाईल वर

दा विन्ची
गुरुवार, 03/02/2017 - 16:48 नवीन
माझ्याकडे मोबाईल वर वाचण्यासाठी ३०-४० इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत pdf फॉरमॅट मध्ये. साईझ साधारण १ ते २ Mb. सिडने शेल्डन, रॉबिन कुक, रॉबर्ट लुडलुम, मायकल क्रिश्टन, जॉन ग्रिशॅम आणि डॅन ब्राऊन ची. हवी असल्यास व्हाट्स अँप वर देऊ शकतो.
  • Log in or register to post comments

मला आवड्तील ही पुस्तके

पिनू
Sun, 03/05/2017 - 12:48 नवीन
मला आवड्तील ही पुस्तके वाचायला, व्यनि केला तर चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची

आजचं पुस्तक

वरुण मोहिते
Fri, 03/03/2017 - 14:12 नवीन
मातोश्रीवर अर्धी रात्र लेखक -विजय तेंडुलकर ....काही अप्रकाशित कथा अंग्रेजी -गुड स्ट्रॅटेजी बॅड स्ट्रॅटेजी लेखक -रिचर्ड रुमेल्ट मॅनेजमेंट आवडणाऱ्या लोकांनी रुमेल्ट ह्यांचं पुस्तक वाचावं
  • Log in or register to post comments

हा एकच धागा असेल तर खरंच बरं

पिलीयन रायडर
Sat, 03/04/2017 - 08:13 नवीन
हा एकच धागा असेल तर खरंच बरं होईल. मागे एकदा बोका भाऊंनी काही पुस्तकं मला एका धाग्यात सुचवली होती. तो धागा कोणता हेच मला आठवत नाही. कुणी कृपा करुन मिपावर आजवर पुस्तकांच्या याद्याविषयक आलेल्या धाग्यांच्या लिंक्स सुद्धा इथे देईल का? मी खुप दिवसात पुस्तकंच वाचलेले नाही. :( उद्याच लायब्ररीत जाईन. आणि इथे त्या पुस्तकाविषयी लिहेन. ह्या आधी वाचलेलं पुस्तक म्हणजे रिबेका. चांगलं आहे. शेवटाची ओढ लावतं पण शेवट नीटसा कळत नाही. भाषा मात्र अत्यंत प्रवाही आहे. कथा अप्रतिमपणे उभी केली आहे वाचकासमोर. गॉन विथ... वाचायला सुरूवात केली खरी. पण मला इतकी वर्णनं असलेली पुस्तकं वाचता येत नाहीत. त्यामुळे सोडुन दिलं.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर असणारे पुस्तका

पी. के.
Sat, 03/04/2017 - 13:05 नवीन
मिसळपाव वर असणारे पुस्तका विषयी हे काही जुने धागे वाचता वाचता वाढे..... मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र पुस्तक खरेदी - मदत दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके मला आवडलेले पुस्तक मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत) मला आवडलेली ५० पुस्तके ऑगस्ट महिन्यात "मला आवडलेली ५० पुस्तके" हा धागा वाचनात आला. प्रतिसाद वाचताना आपण पुस्तक वाचण्याच्या बाबतीत किती आळशी आहोत याची जाणीव झाली. वडिलांना आणी भावाला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे घरातील माळे, कपाटे, पलंगाचे कप्पे पुस्तकांनी तुडूंब भरलेले. मग काय झटकला आळस, काढली पुस्तकं कपाटातून बाहेर आणी केली सुरवात.. सद्य वि. ग. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल वाचतोय. मागच्या पाच महिन्यात वाचलेली पुस्तके. फकिरा:- अण्णाभाऊ साठे लोक माझे संगती:- शरद पवार राजा शिवछत्रपती :- बाबासाहेब पुरंदरे. डोंगरी ते दुबई हुसेन ज्वलज्वलनतेजास संभाजीराजे J R D मन मे है विश्वास राऊ स्वामी ययाती धागे अरब जगाचे पानिपत एक होता कार्व्हर अमृतवेल आजून ही खूप पुस्तकं आहेत घरात जी वाचायची बाकी आहेत. बघू कसं जमतंय ते शेवटी मिपाकरांचे आभार माझ्यात वाचायची आवड निर्माण केल्या बद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय

एमी
Wed, 03/22/2017 - 07:51 नवीन
रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय कळलं नाही? मी फार पुर्वी पुस्तक वाचलंय आणि चित्रपट पाहिलाय. जमल्यास शंका समाधान करायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मराठी पुस्तके पीडीएफ स्वरुपात मिळतील का?

urenamashi
Sun, 03/05/2017 - 23:26 नवीन
मराठी पुस्तके पीडीएफ स्वरुपात मिळतील का?
  • Log in or register to post comments

प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow

गॅरी ट्रुमन
Mon, 03/06/2017 - 12:39 नवीन
अर्थशास्त्रातील २००२ चे नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्सटन विद्यापीठातील एमेरीटस प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow हे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच वाचले. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीतच. ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तरीही त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचे कारण सूक्ष्मअर्थशास्त्रातील ( मायक्रोइकॉनॉमिक्स) विविध मॉडेल ही माणसे 'रॅशनल' असतात या गृहितकावर आधारीत आहेत पण माणसे प्रत्यक्षात 'रॅशनल' नसतात हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील दुसरे मानसशास्त्रज्ञ कै. Amos Tversky यांनी १९७० च्या दशकात अनेक प्रयोग करून सिध्द केले. Thinking, Fast and Slow हे पुस्तक त्या दोघांनी (आणि इतरानी) केलेल्या विविध प्रयोगांवर आधारीत आहे. प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते आपण विचार करतो तो विचार दोन पातळ्यांवर होतो-- सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२. सिस्टिम-१ म्हणजे intuitive विचार करणारी व्यवस्था (फास्ट थिंकिंग) तर सिस्टिम-२ म्हणजे अधिक खोलात जाऊन अधिक वेळ घेऊन विचार करणारी व्यवस्था (स्लो थिंकिंग). प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते सिस्टिम-२ ही 'आळशी' व्यवस्था असते. म्हणजे शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे सिस्टिम-२ चा कल असतो. या दोन सिस्टिमचे कार्य कसे चालते आणि आपण नक्की कसा विचार करतो याविषयी पुस्तकात कित्येक उदाहरणे दिली आहेत. खरे तर या पुस्तकावरील प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. पण आतापुरते एक उदाहरण देतो: प्राध्यापक कॅनेमन यांनी एक 'लिंडा प्रॉब्लेम' म्हणून उदाहरण दिले आहे. त्यांनी लिंडा या एका काल्पनिक ३१ वर्षीय स्त्रीचे वर्णन दिले आहे. ती single, outspoken आणि तल्लख आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूध्द आणि सामाजिक न्यायाच्या बाजूची तिची स्पष्ट भूमिका आहे आणि तिने अण्वस्त्रांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतला आहे अशा स्वरूपाचे तिचे वर्णन आहे. हे वर्णन देऊन झाल्यानंतर प्राध्यापक कॅनेमन यांनी या प्रयोगातील लोकांना लिंडा नक्की कोणत्या पेशामध्ये असू शकेल याचे ८ पर्याय दिले. लोकांना ती ज्या पेशात असेल याची सर्वात जास्त शक्यता वाटेल त्या पेशाला क्रमांक १, त्यानंतर शक्यता असलेल्या पेशाला क्रमांक २ अशा पध्दतीने ८ पेशांची क्रमवारी लावणे अपेक्षित होते. त्या ८ पेशांच्या यादीत तिसरा पेशा होता-- "स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर", सहावा पेशा होता "बँकेत टेलर" आणि आठवा पेशा होता "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर". त्या प्रयोगात भाग घेणार्‍यांपैकी बहुसंख्य लोकांनी लिंडा "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" ला नुसत्या "बँकेत टेलर" पेक्षा वरचा क्रमांक दिला. वास्तविकपणे बँकेत टेलर असलेल्या समजा १०० स्त्रिया असतील तर स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या बँकेतील टेलर नक्कीच १०० पेक्षा कमी असतील. म्हणजे 'रॅशनल' माणूस "बँकेत टेलर" या पेशाला "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" पेक्षा वरचा क्रमांक देईल. पण तसे झाले नाही. आपण नक्की कसा विचार करतो याविषयी अशा कित्येक (किंबहुना काही शे) उदाहरणांचा खजिना आहे या पुस्तकात. या पुस्तकाने मला पूर्णपणे अंतर्बाह्य हलवून टाकले हे लिहिणे म्हणजे या पुस्तकाचा माझ्यावर जो परिणाम झाला आहे त्याचे अगदी मिळमिळीत वर्णन झाले. सूक्ष्मअर्थशास्त्रात मानसशास्त्राचाही अंतर्भाव असावा असे पूर्वीही अनेक रिसर्चर म्हणत असत.पण प्राध्यापक कॅनेमन आणि Amos Tversky यांच्या कामामुळे या प्रयत्नांना एक महत्वाची दिशा मिळाली. त्यातूनच 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हे सूक्ष्मअर्थशास्त्रातील एक महत्वाचे क्षेत्र विकसित झाले. याचा जाहिराती, सेल्स तसेच ह्युमन रिसोर्सेस इत्यादी अनेक मॅनेजमेन्टच्या क्षेत्रांवर अमूलाग्र परिणाम होऊ शकेल. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांना २००२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याबद्दलचे सायटेशन होते: "for having integrated insights from psychological research into economic science, especially concerning human judgment and decision-making under uncertainty".प्राध्यापक Amos Tversky यांचे १९९६ मध्ये निधन झाले. अन्यथा त्यांनाही प्राध्यापक कॅनेमन यांच्या बरोबरच नोबेल पारितोषिक मिळाले असते. युट्यूबवर प्राध्यापक कॅनेमन यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक व्हिडिओ या पुस्तकाविषयी गुगल टॉक्समध्ये आहे. तो पुढीलप्रमाणे: असले जबरदस्त काम करणारे लोक बघितले की खरोखरच भारावून जायला होते. जरी अर्थशास्त्रात फार इंटरेस्ट नसेल तरी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी म्हणेन. आपण ज्या पध्दतीने विचार करतो त्यात कित्येक त्रुटी नकळतपणे कशा असू शकतात (ज्याविषयी आपल्याला काहीही माहित नसते) हे समजले की खरोखरच थक्क व्हायला होते. पुस्तकात Bayes' theorem , Binomial distribution याविषयीचे काही प्रोबॅबिलिटीतले उल्लेख आहेत. तो भाग माहित नसेल तर तेवढी २-३ प्रकरणे समजली नाहीत तरी इतर प्रकरणांमध्ये खरोखरच खजिना भरलेला आहे.
  • Log in or register to post comments

आवडले

आनंदयात्री
Tue, 03/07/2017 - 21:53 नवीन
आवडले, विवेचनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

उत्तम ओळख!

चतुरंग
Tue, 03/07/2017 - 22:46 नवीन
आजच वाचनालयातून घेऊन येतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

थोडी घुसखोरी

गॅरी ट्रुमन
Tue, 03/14/2017 - 11:07 नवीन
प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांनी म्हटल्याप्रमाणे विचार करायच्या सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ चे एक उदाहरण याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिले आहे. या पुस्तकावर आणखी काही लिहून विनाकारण टी.आर.पी वाढवायचा नाही पण हा विषय मला प्रचंड आवडला आहे. तसेच यावर नवा लेख लिहावा इतपत मसालाही नाही. त्यामुळे इथेच घुसखोरी करत आहे. समजा एका शहरात दोन मॅटर्निटी होम्स आहेत. एकात दररोज सरासरी १५ बालकांचा जन्म होतो तर दुसर्‍यात दररोज सरासरी ४५ बालकांचा जन्म होतो. त्यापैकी कोणत्या मॅटर्निटी होममध्ये एखाद्या दिवशी जन्मलेल्या बालकांपैकी ६०% मुली असायची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचे मी 'सिस्टिम-१' चा वापर करून दोन्ही मॅटर्निटी होममध्ये ही शक्यता सारखीच आहे हे उत्तर दिले. प्रत्यक्षात ही शक्यता लहान मॅटर्निटी होममध्ये (दररोज १५ जन्म होणार्‍या) जास्त आहे. हा प्रश्न बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सोडवता येईल. हे उत्तर लहान मॅटर्निटी होमसाठी सुमारे १५.३% तर मोठ्या मॅटर्निटी होमसाठी सुमारे ४.९% इतके येते. मी स्वतः बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांना गेली जवळपास ६ वर्षे शिकवत आलेलो आहे. हे उत्तर काढून ती शक्यता लहान मॅटर्निटी होमसाठी नक्कीच जास्त आहे हे मला समजले नसते असे नक्कीच नाही. पण अशा प्रकारची आकडेमोड करणे हे सिस्टिम-२ चे काम आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे सिस्टिम-२ आळशी असते. शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे त्या सिस्टिमचा कल असतो.त्यामुळे आपली सिस्टिम-१ एकदम intuitive उत्तर असते ते देते. एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक नाणे १० वेळा उडवले तर त्यात ६ छापे यायची (६०%) शक्यता बर्‍यापैकी असेल हे आपल्याला कळतेच. पण समजा तेच नाणे १ लाख वेळा उडवले तर त्यात ६० हजार छापे यायची (परत ६०%) शक्यता तितकी नसेल. कारण जसा सॅम्पल साईझ वाढतो त्याप्रमाणे 'अ‍ॅव्हरेज आऊट' होते आणि टोकाचे रिडिंग यायची शक्यता कमी होते. मी हा भाग स्वतः शिकवत असूनही आणि मी मुळातले पुस्तक वाचूनही (त्यात सॅम्पल साईझचा परिणाम काय होतो हे व्यवस्थित समजावून दिले आहे) माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले. हाच अनुभव मिपाकरांपर्यंत पोहोचवावा म्हणून इथेच घुसखोरी करत आहे. त्याबद्दल दिलगिरी. पण हे पुस्तक वाचलेत तर असे चकित व्हायचे अनुभव कित्येकवेळा येतील हे मात्र अगदी स्वानुभवावरून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा