✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 08/20/2017 - 16:22  ·  लेख
लेख
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
227730 वाचन

💬 प्रतिसाद (589)

प्रतिक्रिया

Irctc websiteच वापरतो पण

कंजूस
Tue, 07/19/2022 - 17:19 नवीन
वारंवार फोन नं, इमेल अपडेट नाही असं येत राहतं. मग ते करायचं. Ntes site https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या मध्येही खूप गोंधळ आणि चुका आहेत. Twitter वर कळवलं पण सुधारणा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

कॉलॉनिअल रेल्वेज मध्ये मजेशीर प्रकार होते

जेम्स वांड
Sun, 07/17/2022 - 19:52 नवीन
त्यापैकी एक म्हणजे "ब्रॅडशॉज रेल्वे गाईड" ऑक्टोबर १८३९ ते मे १९६१ अशी ही गाईड पब्लिश झाली. ब्रॅडशॉज गाईड ह्या कॉंटिनेंटल (युरोप), ईजिप्त, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया ह्या देशांतील तसेच इंग्लंड स्कॉटलंड अँड वेल्स मिळून असलेल्या "ग्रेट ब्रिटन" मधील रेल्वे टाईमटेबल्स, फिरण्याच्या जागा, कनेक्टिंग ट्रेन्स इत्यादी प्रकाशित करत असत. तत्कालीन भारतासाठी ब्रॅडशॉज गाईड प्रकाशित करणाऱ्या डब्ल्यु जे ऍडम्स अँड कंपनीने खालील "गाईड बुक्स" काढल्या होत्या. १. ब्रॅडशॉज हँडबुक टू द बंगाल प्रेसिडेन्सी अँड वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (इसवीसन १८६४) २. ब्रॅडशॉज हँडबुक टू द बॉम्बे प्रेसिडेन्सी अँड नॉर्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (इसवीसन १८६४) आणि ३. ब्रॅडशॉज इलस्ट्रटेड हँडबुक टू द मद्रास प्रेसिडेन्सी अँड द सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (१८६४) ह्या गाईडबुक्स प्रकाशित केल्या होत्या. मध्यंतरी टीपीकल ब्रिटिश गब्दूल गोट्या शोभणारा एक ट्रॅव्हलर ती गाईड बुक अन त्यातील वर्णन केलेल्या जागा व स्टेशने धुंडाळत भारत अन बांग्लादेशात फिरल्याची एक डॉक्युमेंट्री पण बीबीसी अर्थ वर आली होती (नाव विसरलो आता) ब्रॅडशॉज गाईड अन टाईमटेबल्स जवळपास खालील प्रमाणे बांधणीचीच असत :- Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Sun, 07/17/2022 - 19:59 नवीन
ब्रॅडशॉज गाईड >>> सुंदर माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

हे एक ब्रॉडशॉ कल्याण स्टेशनला होते दहा बारा वर्षांपूर्वी.

कंजूस
Tue, 07/19/2022 - 17:23 नवीन
मी ते घेणार होतो एक आठवण म्हणून (१५०रु) पण तो विक्रेताच म्हणाला "अंकल मत लो, ये सब जानेवाला है। " मग त्याचा सल्ला धुडकावून खरेदी केले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

ब्रिटनमध्ये उष्णतेच्या लाटेने

जेम्स वांड
Tue, 07/19/2022 - 10:37 नवीन
ब्रिटनमध्ये उष्णतेच्या लाटेने झालेली अवस्था ब्रिटनमध्ये टेम्प्रेचर्स इतकी वाढली आहेत की तिथल्या रेल ट्रॅकची प्री स्ट्रेस्ड टेम्प्रेचर रेझिस्टन्स लेव्हल पण क्रॉस झाली आहे, इंग्लंडमध्ये रेल्स (रूळ) लो टेम्प्रेचर्ससाठी प्री स्ट्रेस्ड असतात हायसाठी नाही त्यामुळे उष्मालाटेमुळे आता युके मध्ये रेल्वे स्पीड्स पण कमी केले गेले आहेत, नुसत्या रेल्स व्हलनरेब्ल होण्याची शक्यता नाही तर ओएचई केबल्स पण लोंबण्याच्या लेव्हल पर्यंत एक्सपांड होऊ शकतात म्हणे.
  • Log in or register to post comments

खरंय

हेमंतकुमार
Tue, 07/19/2022 - 14:12 नवीन
जागतिक तापमान बदलाचे वेगवेगळे परिणाम.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

श्या!!

जेम्स वांड
Tue, 07/19/2022 - 14:45 नवीन
ते जागतिक तापमान वाढ वगैरे सगळ्या डाव्या विचारसरणीच्या अंधश्रद्धा अन थोतांडे असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

डांबरही मऊ पडतं

गामा पैलवान
Tue, 07/19/2022 - 19:06 नवीन
जेम्स वांड, हो, खरं आहे. रेलवेच्या रुळांप्रमाणे डांबरावरही अनिष्ट परिणाम होतात. प्रसंगी मऊही पडतं. ते टाळण्यासाठी गेले काही दिवस रेती टाकताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

होय

जेम्स वांड
Wed, 07/20/2022 - 11:50 नवीन
उन्हाळ्यात तर आपल्याकडेही विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणाच्या काही भागात हायवेवर डांबर वितळून त्यात ट्रकच्या चाकोऱ्या छापलेल्या बघायला मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आता

हेमंतकुमार
गुरुवार, 07/21/2022 - 08:32 नवीन
उष्णतेचे ही लाट जर्मनीत पोचली आहे तिथे तापमान 40 C पर्यंत गेल्याच्या बातम्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

उष्णतेच्या लाटेचे

हेमंतकुमार
Sat, 07/23/2022 - 16:29 नवीन
अन्य परिणाम बघा: एक प्रवासी रात्री निघणाऱ्या गाडीत बसला व झोपून गेला. पहाटे उठून पाहतो तर काय? गाडी आहे त्याच स्थानकातून निघालेली नव्हती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

चौपट खर्चिक

हेमंतकुमार
Tue, 07/26/2022 - 12:16 नवीन
युरोपमधील रेल्वे मार्गांचे अतिउच्च तापमानात संरक्षण कसे करता येईल याबद्दल इथे काही माहिती आहे : https://interestingengineering.com/railroad-tracks-struggling-under-heat Solid concrete slabs अशी यंत्रणा वापरावी असे त्यांनी दिले आहे. मात्र ही चौपट खर्चिक असते. स्थापत्य अभियंता अधिक प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

सिग्नल्स वितळले....

हेमंतकुमार
गुरुवार, 07/21/2022 - 19:30 नवीन
इंग्लंडमध्ये ट्रेनचे सिग्नल्स वितळत आहेत उष्णतेची लाट चालूच आहे https://www-newprocessfromhome-com.cdn.ampproject.org/v/s/www.newprocessfromhome.com/amp/trending-news/story/train-signals-melt-in-uk-as-unprecedented-heatwave-bakes-europe-see-pics-1977942-2022-07-20?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16584082584259&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.newprocessfromhome.com%2Ftrending-news%2Fstory%2Ftrain-signals-melt-in-uk-as-unprecedented-heatwave-bakes-europe-see-pics-1977942-2022-07-20
  • Log in or register to post comments

नदीखालून जाणारी मेट्रो

हेमंतकुमार
Fri, 07/22/2022 - 15:54 नवीन
भारतातील पहिली नदीखालून जाणारी मेट्रो लवकरच तयार होत आहे. बंगालमधील हुगळी नदीच्या खालून हा मार्ग आहे
  • Log in or register to post comments

भारतातल्या पहिल्या 'भुयारी'

अनिंद्य
Fri, 07/22/2022 - 17:22 नवीन
भारतातल्या पहिल्या 'भुयारी' मेट्रो रेल्वेचा मान कोलकात्याकडे आहे, भवानीपूर ते एस्प्लनेड हा मार्ग १९८४ पासून वापरात आहे आता हुगळीखालून शहराचे पूर्व-पश्चिम भाग जोडण्यात येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ठाणेखाडीखालून भुयारी मार्ग

गामा पैलवान
Fri, 07/22/2022 - 18:00 नवीन
मुंबईत ठाणेखाडी व वसईखाडी यांच्याखालनं भुयारी मार्ग बांधले पाहिजेत. कितपत व्यवहार्य आहेत ते माहित नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

CO2 निचरा

हेमंतकुमार
Sat, 07/23/2022 - 08:46 नवीन
मालगाड्यांमधून जो प्रचंड कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो तो वातावरणात जाऊन न देता तो पकडून त्याचे द्रव रूपांतर करून अन्य प्रकारे निचरा करता येईल. या तंत्रज्ञानाबाबत इथे काही माहिती आहे सर्व समजले नाही. या विषयातील तज्ञ अधिक सांगू शकतील.
  • Log in or register to post comments

प्रगती ...

हेमंतकुमार
Tue, 07/26/2022 - 09:38 नवीन
आता प्रगती एक्सप्रेसलाही विस्टा डोम कोच बसवले आहेत https://www.punekarnews.in/pragati-express-third-train-between-pune-mumbai-pune-to-run-with-vista-dome-coach-reflects-the-growing-popularity/
  • Log in or register to post comments

मुंबई पुणे रूटवर

जेम्स वांड
Tue, 07/26/2022 - 10:14 नवीन
म्हणे ट्रेन १८ उर्फ वंदे भारत ट्रेन सेट्स चालवणार आहेत ?
  • Log in or register to post comments

भाड्यातील सवलत

हेमंतकुमार
Wed, 07/27/2022 - 20:40 नवीन
ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी भाड्यातील सवलत वयाच्या 70 वर्षानंतर करावी तसेच ती फक्त स्लीपर क्लास पुरती ठेवावी असा विचार रेल्वे बोर्ड करीत आहे
  • Log in or register to post comments

ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी भाड्यातील सवलत वयाच्या 70 वर्षानंतर

धर्मराजमुटके
Wed, 07/27/2022 - 22:16 नवीन
ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी भाड्यातील सवलत वयाच्या 70 वर्षानंतर करावी तसेच ती फक्त स्लीपर क्लास पुरती ठेवावी असा विचार रेल्वे बोर्ड करीत आहे
चमकोगिरीचे उत्तम उदाहरण ! मी पहिला जिथे राहत होतो तिथे एक राजकारणी जून महिना आला की मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करायचा. त्यासाठी महिनाभर जिकडे तिकडे जाहिरातबाजी करायचा. मग वह्यावाटपाच्या दिवशी पोरे पोरी चांगली दोन चार तास उन्हात तापेपर्यंत रांगेत उभी राहत. चांगली भाषणे झोडून झाली की मग प्रत्येकी एक किंवा दोन वह्या असे मोफत वही वाटप व्हायचे. त्यातही ओळखीतल्यांना मिळायचा आणि अर्धी जनता तशीच बोंबलत निघून जायची. इतका राग यायचा म्हणून सांगू त्याचा की विचारता सोय नाही. ही फुकटची नाटके करण्यापेक्षा एक दोन गरजु मुलांना दत्तक घेऊन त्यांचा खर्च केला असता तर त्यांचे आयुष्य तरी मार्गी लागले असते पण यांना झळकायची खाज फार ! आतापर्यंत बायका रेल्वेत ५८ व्या वर्षी जेष्ठ नागरीक होतात, बाप्ये ६० वर्षी. हिच माणसे महाराष्ट्र एस.टी .मधे ६५ वर्षी जेष्ठ नागरीक होतात. दुसर्‍या राज्यात गेले की परत वयात बदल. उद्या ९० वर्षे वयाच्या प्रवाशाला रेल्वे प्रवासभाड्यात ९०% सुट देणार किंवा १०० वर्षे वयाच्या प्रवाशाला १००% सुट असली बिनकामाची योजना देखील प्रत्यक्षात आली तर नवल वाटायला नको. कोकणात गणपती साठी जाणार्‍यांना टोल मधे माफी, पंढरपूर ला वारी ला जाणार्‍यांना टोल माफी, हज ला जाणार्‍यांना अजून काही वेगळे अनुदान. नुसता पोरखेळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

आज सायंकाळी टिपलेल्या

जेम्स वांड
Wed, 07/27/2022 - 22:45 नवीन
मुंबई सेंट्रल स्थानकाच्या काही छबी Image removed. Image removed. काही उत्तम अभियांत्रिकीच्या नमुन्यात मोडणाऱ्या ब्रिटिशकालीन महिरपी, ट्रसेसचा कलात्मक उपयोग, आणि टिकण्यासाठी बनवलेले स्ट्रक्चर. Image removed. ह्या जुन्या स्ट्रक्चरला कालानुरूप आधुनिकतेचा फील देणारा हा पॉड हॉटेलचा निऑन बोर्ड Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

या ठिकाणी जेव्हा हमसफर ट्रेन उभी असते तेव्हा

कंजूस
Sun, 07/31/2022 - 06:33 नवीन
मागच्या जेनरेटरचा प्रचंड आवाज होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

हमसफर नव्हती

जेम्स वांड
Sun, 07/31/2022 - 12:48 नवीन
मुंबई सेंट्रल - इंदौर अवंतिका एक्सप्रेस होती, तिच्यावरच सोडायला आलो होतो काही कंपनीच्या क्लायंट लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नवलच...

हेमंतकुमार
Sat, 07/30/2022 - 17:52 नवीन
छानच. धन्यवाद. …. ऐकावे ते नवलच ! बहुतेक जग अधिकाधिक वेगवान रेल्वे गाड्या तयार करण्याच्या मागे आहे परंतु अमेरिकेतील ही भन्नाट कल्पना बघा. १९४० मध्ये त्यांच्या ट्रेन्स ज्या वेगाने धावत होत्या त्यापेक्षा कमी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स त्यांना आता चालू करायच्या आहेत !
  • Log in or register to post comments

सर्वात लांब बोगदा

हेमंतकुमार
Sun, 07/31/2022 - 18:38 नवीन
सध्या उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्पाचे काम जोरात चालू आहे. या मार्गावर एकूण 38 बोगदे असणार आहेत. त्यातील एक महत्त्वाचा बोगदा आत्ता पूर्ण झाला Image removed. या पुढचा एक बोगदा १२.७५ किलोमीटर लांब असणार असून तो भारतातील सर्वात लांब बोगदा असेल.
  • Log in or register to post comments

बनिहाल ते कात्रा

कंजूस
Sun, 07/31/2022 - 18:56 नवीन
जोडणेच मोठे काम आहे. कोरोना बंदीमुळे लांबले. ते २०२५ पर्यंत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पुणे सोलापूर गाडी चालू झाली असेल तर . . .

कंजूस
Mon, 08/01/2022 - 09:21 नवीन
जुनी मुंबई - पुणे इंद्रायणी काही काळ सोलापूरपर्यंत चालवत होते ती एकाच नंबराने पुन्हा चालू करायला हवी. उरुळी स्टॉपसह.
  • Log in or register to post comments

गतीवाढ

हेमंतकुमार
गुरुवार, 08/04/2022 - 07:23 नवीन
लोणावळा पुणे दौंड मार्गावरील रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी संबंधित मार्गावर थिकवेब स्विच बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर इथून जाणाऱ्या गाड्यांची गती वीस किलोमीटर प्रतितास वाढेल. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना बसणारे झटकेही कमी होतील. ( बातमी : छापील सकाळ ३/८/२२)
  • Log in or register to post comments

गेली दोन वर्षे आयआयटी मुंबईने

हेमंतकुमार
Mon, 08/08/2022 - 20:22 नवीन
गेली दोन वर्षे आयआयटी मुंबईने विशेष अभ्यास करून भारतीय रेल्वेसाठी "शून्य बेस वेळापत्रक" योजले होते. त्यामध्ये रेल्वेला होणारा तोटा कमी करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले होते: १. रेल्वे थांबा कमी करणे २.पॅसेंजर गाड्या कमी करून त्यांचे एक्सप्रेस मध्ये रूपांतर करणे आणि ३.कमी उत्पन्न असणाऱ्या गाड्या बंद करणे परंतु सध्या तरी या सूचना पूर्णपणे गुंडाळून पूर्वीप्रमाणेच कारभार चालू आहे.
  • Log in or register to post comments

विस्टाडोम :५

हेमंतकुमार
Wed, 08/10/2022 - 20:26 नवीन
आता पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला विस्टाडोम कोच लावला आहे. असा कोच असणारी मध्य रेल्वेची ही पाचवी गाडी आहे
  • Log in or register to post comments

च्यायला

जेम्स वांड
Wed, 08/10/2022 - 22:04 नवीन
हे विस्टाडोम कोचेस आता पैसा कमविण्यासाठी केलेला पाजीपणा वाटू लागला आहे, कोकण रेल्वे, पूर्वोत्तर सीमा रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे वगैरे प्रेक्षणीय रूट किंवा मुंबई पुण्यासारख्या प्रवासात विस्टाडोम लावले तर समजू शकतो, पण वाटेल तिथं कश्याला लावतात ? बरं पैसा प्रीमिअम भरून बसायचं ह्यात, onward journey ला ठीक आहे return मध्ये तर कित्येकदा रेक अरेंजमेंट करण्यातही कंटाळा रेल्वेला म्हणजे premium charges भरून पूर्ण प्रवासात लॉबी मध्ये उभं राहून बघायचं तरी काय ? तर लोकोमोटिवचे डब्याला जोडलेले ढुंगण... काय अर्थ ह्याला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अर्थ सांगतो....

गामा पैलवान
Sat, 08/13/2022 - 12:36 नवीन
अलिशान अंगणवाडी नाही म्हणून अतिरिक्त पैसे मोजून अलिशान ढुंगणवाडी बघा. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

रात्रीची पूर्वसूचना

हेमंतकुमार
Sat, 08/13/2022 - 10:31 नवीन
प्रवाशाचे उतरायचे स्थानक जर मध्यरात्री येत असेल तर रेल्वेने पूर्वसूचना फोनकॉलची सोय केली आहे. नोंदणी करावी लागते. २० मिनिटे आधी फोन येईल.
  • Log in or register to post comments

उपक्रम

हेमंतकुमार
Sun, 08/14/2022 - 14:20 नवीन
येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या बेडशीट्स राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्गाच्या एसी कोचमध्ये 15 ऑगस्टपासून पुरविल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
  • Log in or register to post comments

इंजिन स्वच्छतागृह

हेमंतकुमार
Sun, 08/14/2022 - 14:30 नवीन
डिझेल इंजिनच्या जागेत स्वच्छतागृह नसल्याने चालकांची गैरसोय होते. आता १२० विद्युत इंजिनात ती सोय केली आहे. महिला चालकांची संख्या आता १०००वर पोचल्याने हा विषय महत्वाचा ठरला आहे.
  • Log in or register to post comments

सुपर वासुकी

हेमंतकुमार
Wed, 08/17/2022 - 12:46 नवीन
भारताची सर्वात लांब (२९५ वाघिणी ) व २५९६२ टन वजन वाहणारी मालगाडी. इथे पाहू शकता
  • Log in or register to post comments

लांबलचक मालगाडीला 'वासुकी'

अनिंद्य
Wed, 08/17/2022 - 13:42 नवीन
लांबलचक मालगाडीला 'वासुकी' नाव ... कल्पक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद !

हेमंतकुमार
Fri, 08/19/2022 - 11:28 नवीन
या भागाला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवा धागा काढत आहे. भाग २ सर्वांचे तिकडे स्वागत !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा