Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जीएस on Tue, 10/21/2014 - 05:57
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे. आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते. कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे. उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे. युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू. (१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या. (२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते. (३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता. (४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया. (५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे. (६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो. जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ? (७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३. (८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५. (९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०. (१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२. (११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे. (१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते. पुन्हा घोडचुकीकडे (१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही. (१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. ( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही) (१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ? -जीएस
  • Log in or register to post comments
  • 54468 views

प्रतिक्रिया

Submitted by क्लिंटन on Wed, 10/22/2014 - 16:48

In reply to भाजप जरी शिवसेनेशीच घरोबा by जानु

Permalink

मुंबईचे आर्थिक महत्व कमी केले

मुंबईचे आर्थिक महत्व कमी केले जाणार असेल तर ते चांगलेच होईल. मुंबई,ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ आणि बदलापूर या भागात महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या २०% लोकसंख्या तरी नक्कीच आहे. सगळ्यांनी मुंबईत यायचे, इथे घाण,ट्रॅफिक जॅम, गर्दी, प्रदूषण इत्यादींबरोबरच जागांच्या किंमती वाढवायच्या हेच तर इतकी वर्षे चालू आहे. जर मुंबईचे महत्व कमी होणार असेल तर हे सगळे प्रश्न थोडे तरी कमी होतील. या राज आणि उद्धव या रिकामटेकड्यांचा मराठी बाणा जपता यावा म्हणून लाखो लोकांना दररोजचा त्रास सहन करायला लावणे नक्कीच बरोबर नाही. मी तर म्हणतो की काही उद्योगांना सक्तीने मुंबईबाहेर घालवले पाहिजे. मुंबईतील गर्दी किमान अर्ध्याने कमी व्हायला हवी. (मराठी बाणा वगैरे फुकाच्या गोष्टींना फाट्यावर मारणारा) क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 10/26/2014 - 12:47

In reply to मुंबईचे आर्थिक महत्व कमी केले by क्लिंटन

Permalink

अगदी अगदी...

अगदी अगदी...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/22/2014 - 15:23

Permalink

नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या

नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या झारखंड (२०१४) बिहार (२०१५) आणि उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड (२०१६) या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेपुढे लोटांगण घालणारा पक्ष अशी आपली प्रतिमा होऊ नये असे भाजपला वाटत असावे. या चार राज्यातून मोठ्या प्रमाणावर भय्ये महाराष्ट्रात येत असतात आणि यांच्या विरुद्ध मनसे आणि शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन करून आपली मराठी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु येथे येणारे भय्ये हे मोठ्या प्रमाणावर पैसे आपल्या "घरी" पाठवत असल्याने त्यांच्या मतांना त्यांच्या राज्यात किंमत/ वजन असते. त्यामुळे महाराष्ट्राचे सिंहासन नाही मिळाले तरी चालेल ( नाहीतरी दुसरा कोणीही येथे येऊ शकतच नाही) पण वरील राज्यात नुकसान झाले तर राज्यसभेतील सदस्यसंख्येवर परिणाम होईल या डावपेचाअंतर्गत भाजप शिवसेनेला जास्त भिक घालत नाही असे वाटते. बाकी शिवसेना किंवा मनसे किती मुत्सद्दी आहेत हे लोकांनी लिहिलेले आहेच. महत्त्वाचे -- मी राजकीय विश्लेषक/ विशेषज्ञ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 10/22/2014 - 17:56

Permalink

मला ही असेच वाटत होते. थोडं

मला ही असेच वाटत होते. थोडं डोक्याचा वापर गेला असता तर मोदी लाटे वर

सर्फिंग

करत मुख्यमंत्री ही झाले असते. आता लाटेत बुडाले एवढेच.
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on Wed, 10/22/2014 - 17:59

Permalink

मुंबईचे आर्थिक महत्व कमी करून

मुंबईचे आर्थिक महत्व कमी करून ते अहमदाबाद, दिल्लीकडे वळवायचे असेल तर का विरोध नसावा. मात्र मोठ्या शहरांपेक्षा महाराष्ट्रातीलच बाकी लहान शहरे विकसित करायची असल्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 10/22/2014 - 18:02

In reply to मुंबईचे आर्थिक महत्व कमी करून by दुश्यन्त

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on Wed, 10/22/2014 - 18:05

Permalink

शहा-मोदींनी आधीच राज्य भाजपला

शहा-मोदींनी आधीच राज्य भाजपला बजावून सांगितले होते की मुख्यमंत्री आपलाच असायला हवा. परवा रुडी पण बोलून गेले की मित शहांनाच युती तोडायची होती. युती केली असती तरी सेना जिथे लढत देते किंवा मागे कधी जिंकली होती त्या जागांवर पण भाजपने उमेदवार आयात करायला सुरुवात केली होती (ठळक उदा. भुसावळ) शिवसेनेने हे आधीच ओळखायचे होते. एकतर युती तोडायची किंवा ते न जमल्यास सेनेच्या निवडून येणाऱ्या जागा आपल्याकडे खेचून सेनेची कोंडी करायची जेणेकरून आपलेच आमदार जास्त यावेत हा भाजपचा डाव होता. अर्थात पक्ष वाढवायचे प्रत्येकाला स्वतन्त्र्य आहे त्यात दोष नाई मात्र सेनेला हे लवकर लक्षात आले नसावे.शिवसेनेने भाजपने आमचा कसा विश्वासघात केला हा मुद्दा कारणाशिवाय जास्त लांबवला. लोकांना या गोष्टीचे सोयरसुतक नसते आणि मिळाली थोडी सहानुभूती तरी असल्या मुद्द्यावर फार लोक मत देत नसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 10/22/2014 - 19:51

Permalink

चला झाले उद्धवजी जागे.

चला झाले उद्धवजी जागे. पण माझ्यातर्फे शुभरात्री. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 10/22/2014 - 21:37

Permalink

उत्तम

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि बरीचशी चर्चा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 10/23/2014 - 08:55

Permalink

१. उद्धव ठाकरेचे नेतृत्व

१. उद्धव ठाकरेचे नेतृत्व कमकुवत आहे असे म्हटले जात होते. २. लोकसभा निवडणुकीत युतीने ४८ पैकी ४४ जागा मिळवल्या. त्या केवळ भाजप-मोदीमुळे. त्या लाटेत शिवसेनेला फुकटात फायदा झाला असे म्हटले जात होते. म्हणजे शिवसेनेला स्वतःचा काही जनाधार उरलेला नाही; शिवसेनेचे जे खासदार निवडून आले ते आलेच नसते वगैरे.... ३. उद्धवला मुख्यमंत्री व्हायचे होते. धाकट्या भावाची भूमिका घेऊन ते मिळालेच नसते. त्यामुळे त्यांना हा जुगार खेळणे भागच होते. जुगार खेळून मुख्यमंत्री होता आले नसले तरी इतर आक्षेपांना व्यवस्थित उत्तर दिले गेले आहे. शिवसेनेतील त्याचे नेतृत्व सध्यातरी बळकट झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, बाळ ठाकरे नसताना, 'मोदी लाटे'च्या विरोधात एकट्याने लढून ~६० जागा मिळाल्या हे लक्षणीय यश आहे असे मला वाटते. त्यामुळे भाजप बहुमतापासून रोखला गेला हे कुणाकुणाला आवडले नाही तरी उद्धवसाठी (बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत) स्वतःला सिद्ध करणे भाग होते ते त्याने केले आहे असे या निकालांतून दिसून येते. थोडक्यात उद्धव वाटतो तितका भोट नाही इतके या निकालांनी स्पष्ट होत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 10/24/2014 - 13:05

In reply to १. उद्धव ठाकरेचे नेतृत्व by नितिन थत्ते

Permalink

>>> ३. उद्धवला मुख्यमंत्री

>>> ३. उद्धवला मुख्यमंत्री व्हायचे होते. धाकट्या भावाची भूमिका घेऊन ते मिळालेच नसते. त्यामुळे त्यांना हा जुगार खेळणे भागच होते. धाकट्या भावाची भूमिका घेऊन मुख्यमंत्रीपद मिळालेच नसते. स्वतंत्र लढूनही ते मिळाले नसते. जर मोठ्या भावाची भूमिका कायम ठेवून भाजपने दिलेला १२५-१४५-१८ हा फॉर्म्युला स्वीकारला असता तरच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवायला मिळाल्याने भाजपपेक्षा शिवसेनेच्या जास्त जागा जिंकून आणणे शक्य झाले असते. हा फॉर्म्युला मान्य करून शिवसेनेची मोठ्या भावाची झाकली मूठ झाकलेलीच असती आणि आपण २४ जागा सोडून भाजपवर उपकार करत आहोत असे मिरविता आले असते व त्याच्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे, सभापतीपद, महामंडळाची अध्यक्षपदे इ. पदे मागून घेता आली असती. आता स्वतंत्र लढल्याने शिवसेनेच्या सामर्थ्याची झाकली मूठ उघड झाली, मोठ्या भावाची भूमिका कायमची संपली, मुख्यमंत्रीपद गेलेच आणि आता भाजपकडून अवहेलना सहन करावी लागत आहे. उद्धव ठाकरे खेळले तो जुगार नसून आत्मघात होता. >>>> जुगार खेळून मुख्यमंत्री होता आले नसले तरी इतर आक्षेपांना व्यवस्थित उत्तर दिले गेले आहे. शिवसेनेतील त्याचे नेतृत्व सध्यातरी बळकट झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, बाळ ठाकरे नसताना, 'मोदी लाटे'च्या विरोधात एकट्याने लढून ~६० जागा मिळाल्या हे लक्षणीय यश आहे असे मला वाटते. शिवसेनेत त्यांच्या नेतॄत्वाला आव्हानच नव्हते. त्यामुळे त्यांचे नेतृत्व बळकट झाले आहे या विधानाला अर्थ नाही. आघाडी सरकारविरोधात इतकी प्रचंड लाट होती की त्यामुळेच शिवसेनेला स्वतंत्र लढूनही ६३ जागा मिळाल्या. जर १२५-१४५-१८ असे जागावाटप असते तर शिवसेनेला किमान १०० जागा मिळाल्या असत्या. >>> त्यामुळे भाजप बहुमतापासून रोखला गेला हे कुणाकुणाला आवडले नाही तरी उद्धवसाठी (बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत) स्वतःला सिद्ध करणे भाग होते ते त्याने केले आहे असे या निकालांतून दिसून येते. स्वतःला सिद्ध करताना उद्धवमुळे शिवसेनेची मात्र वाट लागली. एकतर मोठ्या भावाचे स्थान कायमचे गमावले, भाजपपेक्षा आम्ही ताकदवान आहोत हा २५ वर्षे जोपासलेला भ्रम उघडकीला आला, कोकण वगळता सर्वत्र भाजप शिवसेनेपेक्षा ताकदवान आहे हे दिसून आले, भाजप नेतृत्वाविरूद्ध असभ्य व नकारात्मक प्रचारामुळे मतदारांची नाराजी पत्करावी लागली, कायम गुर्मीत वावरणार्‍या शिवसेनेला आता भाजपच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत आहेत आणि भविष्यात मुंबई व इतर महापालिकातील सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेला कायम भाजपचे पाय धरावे लागतील. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात उद्धवने पक्ष कमकुवत केला. >>> थोडक्यात उद्धव वाटतो तितका भोट नाही इतके या निकालांनी स्पष्ट होत आहे. उद्धव वाटतो त्याच्यापेक्षा जास्त अप्रगल्भ व लघुदृष्टीचा आहे हे या निकालांनी स्पष्ट होत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 10/23/2014 - 11:00

Permalink

इंटरनेट जोक

मनसे आणि आप पक्ष आता एकत्र येऊन 'मनस्ताप' पक्ष स्थापन करणार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 10/23/2014 - 16:42

Permalink

थत्ते यांच्याशी सहमत . आणि

थत्ते यांच्याशी सहमत . आणि एका निवडणुकी मधल्या पिछेहाटिने पक्ष संपत नसतात . ना मनसे संपेल आणि शिवसेना तर नाहीच नाही . जोपर्यंत महानगरामध्ये भूमिपुत्रांचे मुद्दे आहेत तोवर या पक्षाना मरण नाही . १९८४ मध्ये २ जागांवर सिकुडलेली भाजप आज पूर्ण बहुमताने देशात सत्तेवर आहे आणि ज्यांचा मृत्युलेख माध्यमांनी लिहून ठेवला होता त्या कॉंग्रेस ने २००४ साली वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गजाला धूळ चारली होती . ज्या राणे यांनी २००४ साली शिवसेनेला सिंधुदुर्ग मधून संपवून टाकल होत त्याच शिवसेनेने राणे याना १० वर्षानंतर का होईना पण भुइसपाट केल . त्यामुळे एका पराभवाने पक्ष संपत नसतात . शिवसेना आज बाळासाहेबांच्या काळात पण नव्हती . मुंबई -ठाणेमहानगरपालिका , १८ खासदार , ६३ आमदार आणि अनेक स्वराज्य संस्था मध्ये असणारा पक्ष एका रात्रीत नाही संपणार . राज ठाकरे पण चाणाक्ष राजकारणी आहेत .आता त्यांनी तळ गाठला आहे . त्याना माहित आहे कि आता गमावण्यासारखे त्यांच्याकडे काही फार नाही . ते नक्कीच bounce back करतील . महाराष्ट्राच्या जनतेला जेन्व्हा त्यांची गरज वाटेल तेंव्हां ते पुन्हा वापसी करतील . बाकी एका निवडणुकी मधल्या यशा अपयशाने महाराष्ट्रात मोदी लाट आहे असे म्हणे किंवा शिवसेना -मनसे - कॉंग्रेस -राष्ट्रवादी संपले अशा हाकाटी करणे कितपत योग्य ठरेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 10/24/2014 - 13:10

In reply to थत्ते यांच्याशी सहमत . आणि by पिंपातला उंदीर

Permalink

>>> मुंबई -ठाणेमहानगरपालिका

>>> मुंबई -ठाणेमहानगरपालिका , १८ खासदार , ६३ आमदार आणि अनेक स्वराज्य संस्था मध्ये असणारा पक्ष एका रात्रीत नाही संपणार . राज ठाकरे पण चाणाक्ष राजकारणी आहेत .आता त्यांनी तळ गाठला आहे . त्याना माहित आहे कि आता गमावण्यासारखे त्यांच्याकडे काही फार नाही . ते नक्कीच bounce back करतील . महाराष्ट्राच्या जनतेला जेन्व्हा त्यांची गरज वाटेल तेंव्हां ते पुन्हा वापसी करतील . एका रात्रीत हा पक्ष संपणार नाही. परंतु शिवसेनेबरोबरच महाराष्ट्रातील इतर प्रादेशिक पक्षांच्या अंताची ही सुरूवात आहे. पुढील काळात हे पक्ष हळूहळू कायमचे संपतील किंवा इतर मोठ्या पक्षात विलीन होतील किंवा आपापसात विलीन होतील किंवा शेकापसारखे कोमात असणारे मृतप्राय पक्ष होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 10/24/2014 - 19:10

In reply to थत्ते यांच्याशी सहमत . आणि by पिंपातला उंदीर

Permalink

सहमत

नितिनराव आणि पिंपातला उंदीर यांच्याशी सहमत. वर "पिंपातला उंदीर" यांनी अनेक उदाहरणे दिली आहेतच. त्यात भर आणि निव्वळ उदाहरण म्हणून एशिअन एज मधील The isolated man of Indian politics लेख पहा. २०१२ च्या या लेखात लेख लिहीणार्‍या विचारवंताने मोदी कसे संपले ("They, and he, must know that his political career is now almost over") असे शेवटच्या परीच्छेदात खूप छान पटवून दिले आहे. सध्या या महाशयांचे journalistic career केवळ व्टिटर ब्लॉग पुरतेच मर्यादीत असावे. ;) या पुढचा काळ हा राजकारण्यांसाठी पुर्वीसारखा सोपा असेल असे वाटत नाही. काम करा नाहीतर घरी बसा ही अवस्था येऊ शकेल. त्यात कुठलिही तडजोड केली जाण्याची लक्षणे नाहीत. मोदी हे जाणून आहेत आणि त्या दिशेने प्रयत्न करत आहेत, तीच कथा विशेष करून शिवराजसिंग चौहान आणि मनोहर पर्रीकरांची आहे असे वाटते. इतरांचे माहीत नाही... महाराष्ट्रात जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला देखील असेच जागून काम करावे लागेल. नाहीतर पुढच्या वेळेस नारळ मिळेल. ही गोष्ट विशेष करून राज ठाकर्‍यांना समजली तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला परत भवितव्य येईल. नाहीतर मनसेचा पण समाजवादी नसून समाजवादी पक्षांसारखी अवस्था होईल ... इतिहासजमा. शिवसेनेकडे आत्ता स्थानिकपातळीवर सत्ता आहे आणि अगदी युतित जायचे नाही ठरवले तरी प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काम करता येईल आणि अजून मोठे होता येईल. पण त्यासाठी पारंपारीक जमिनदारी माज आणि आळस यांना कायमचे गाडावे लागेल. नाहीतर बापाने कमावले आणि पोराने (आणि नातवाने) गमावले होईल. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 10/23/2014 - 20:49

Permalink

शिवसेना

शिवसेनेने मोदी व भाजपाबद्दल सभ्यतेची पातळी सोडून वाईट भाषा वापरली ह्याचा त्यांना फटका बसला असेलच. मोदींचा बाप काढणे, एका संघाचा वारसा सांगणार्‍या नेत्याला अफझलखान वगैरे उपमा देणे ह्याने संघावर श्रद्धा असणारा एक वर्ग शिवसेनेच्या विरोधात गेला. हे असंस्कृतपणाचे प्रदर्शन प्रगल्भतेचे लक्षण नव्हे. मुंबई महानगरपालिका इतकी वर्षे आपल्या हातात असताना काही चांगले करुन दाखवायचे नाही, निव्वळ बाळासाहेब अमुक बाळासाहेब तमुक करुन उमाळे काढायचे. हे काही वर्षे चालेल पण नंतर जनता कामाकडेच बघणार. जर निव्वळ माज, शिवराळ आणि आक्रमक भाषा, भाषणावळ्या आणि विरोधकांना लाथाळ्या इतकेच भांडवल असेल तर शिवसेनेची घसरण होतच राहील. प्रचाराला वेळ कमी असताना भाजपावर तोंडसुख घेण्यात उद्धव ठाकरेने वेळ वाया घालवलाच पण नुकसानही करुन घेतले. एखाद्या पक्षाचा सर्वेसर्वा बनण्यातला तोटा असा आहे की तुम्ही काहीतरी चूक करताय असे सांगणारा कुणी उरत नाही. तळागाळातून वर येऊन सर्वश्रेष्ठ पदावर बसणे वेगळे आणि निव्वळ वारसाहक्काने बसणे वेगळे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 10/23/2014 - 21:48

In reply to शिवसेना by हुप्प्या

Permalink

+१

एखाद्या पक्षाचा सर्वेसर्वा बनण्यातला तोटा असा आहे की तुम्ही काहीतरी चूक करताय असे सांगणारा कुणी उरत नाही. तळागाळातून वर येऊन सर्वश्रेष्ठ पदावर बसणे वेगळे आणि निव्वळ वारसाहक्काने बसणे वेगळे. +१ सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 10/26/2014 - 10:59

In reply to शिवसेना by हुप्प्या

Permalink

>>एका संघाचा वारसा सांगणार्

>>एका संघाचा वारसा सांगणार्‍या नेत्याला अफझलखान वगैरे उपमा देणे ह्याने संघावर श्रद्धा असणारा एक वर्ग शिवसेनेच्या विरोधात गेला. हे असंस्कृतपणाचे प्रदर्शन प्रगल्भतेचे लक्षण नव्हे. अफझलखान म्हटले नसते तर (भाजप-सेना युती नसताना) हा वर्ग शिवसेनेच्या बाजूस राहणार होता का?
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sun, 10/26/2014 - 11:05

In reply to >>एका संघाचा वारसा सांगणार् by नितिन थत्ते

Permalink

लोळलो हसून हसून

लोळलो हसून हसून
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 10/26/2014 - 12:51

In reply to >>एका संघाचा वारसा सांगणार् by नितिन थत्ते

Permalink

ठ्ठो

ठ्ठो =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 10/24/2014 - 14:16

Permalink

बसप ला ७% पेक्षा जास्त मत

बसप ला ७% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत, ह्या कडे सर्वच लोक दुर्लक्ष करत आहेत. मनसे पेक्षा पण दुप्पट. काँ आणि राकॉ संपले तर बसप आणि भाजप अशीच फाईट् होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Wed, 10/29/2014 - 13:53

Permalink

नवा प्रश्न

उध्दव ठाकरेंच्या उध्दटपणामुळे आता शिवसेनेपुढे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्वच मंत्री-नेत्यांची अफझल खानाच्या फौजांशी तुलना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजप हायकमांडने दिल्याचे वृत्त आहे असे मटामध्ये आले आहे. आता यावर उध्दव ठाकरे समर्थकांचे काय म्हणणे आहे हे बघणे इंटरेस्टींग ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 10/29/2014 - 14:35

In reply to नवा प्रश्न by क्लिंटन

Permalink

माफी बिफी प्रकार उगाच आहे.

माफी बिफी प्रकार उगाच आहे. निवडणूकीत सगळेच दुसर्‍याला शिव्या घालत असतात. त्यात माफी काय मागायची.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 10/29/2014 - 14:35

Permalink

माफी

ठाकरे माफी मागणार नाहीत . भाजपाने एवढा माज दाखवणे चुकीचा आहे. भाजपाचे मराठी मतदार यामुळे दूर जाणार आहेत आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केले तर संघीय मतदार दूर जातील .
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 10/29/2014 - 16:30

Permalink

भाजपला हवी उद्धव यांची माफी!

भाजपला हवी उद्धव यांची माफी!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 10/29/2014 - 17:38

Permalink

श्री उद्धव सभ्य सामाजिक संकेत

श्री उद्धव सभ्य सामाजिक संकेत विसरले. माननिय मु.म श्री देवेन याना अभि नंदनाचा फोन पण केला नाहि.. ना कुठल्या नेत्याने केला..्ना सामना तुन लेख लिहिला खर तर उद्धव यानी पुष्पगुछ्छ देऊन अभिनंदन करणे अभिप्रेत होते.. त्याला मन विशाल लागते ... असो..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/29/2014 - 21:09

Permalink

भाजप जरा जास्तच माज करत आहे.

भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 10/29/2014 - 21:30

In reply to भाजप जरा जास्तच माज करत आहे. by श्रीगुरुजी

Permalink

+१

पवार साहेब काहिच काहि कुरबुर न करता पाच वर्षं सरकार टिकु देतील आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचं पाप जनता सहज माफ करेल अशा भ्रमात जर भाजपश्रेष्ठी असतील तर अवघड आहे. सेनेची झाली तेव्हढी शोभा पुरे. भाजपने थोरल्या भावाचे मोठेपण कृतीने सिद्ध करायची संधी गमवु नये.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on गुरुवार, 10/30/2014 - 13:43

Permalink

ताठर भूमिका जास्त आव्हानात्मक

झालेल्या घटनांवरून असेच म्हणता येईल की, राजकारणात छोटा भाऊ-मोठा भाऊ असे काही नसते. असतात ती फक्त राजकीय समीकरणं. म्हणूनच मला युतीमध्ये सारे काही आलबेल होते आणि ती केवळ जागा वाटपावरून तुटली असे वाटत नाही. उद्भवलेल्या सध्य परिस्थितीत उद्धवला माफी मागणं भाग आहे. त्याला दोन कारण आहेत. पहिलं म्हणजे, एक जमाना होता तेव्हा सेना नेत्यांची निष्ठा बाळासाहेबांवर होती. आत्ताचे किती नेते उद्धववर आणि "बाळराजेंवर" निष्ठा ठेवतील ही शंका आहे. निष्ठा जरी काही विचारांवर असली तरी, खास करून पक्षाचं भवितव्य अंधारात असताना बराचकाळ सत्तेबाहेर राहणं ही पण एक कसोटीच असेल. दुसरं म्हाणजे, भाजपाच्या पाठींब्यावर चालू असलेल्या महानगर पालिकेच्या राज्यकारभारातून पक्ष चालवायला मिळणा-या "रसदीवरही" त्याचा परिणाम होईल. एकूणच ताठरपणामुळे सगळीकडून कोंडी होईल. जर नमतेपणा नाही घेतला तर पक्ष फुटायला आणि काही भागांपुरताच /महानगरपालिकेपुरताच शिल्लक रहायला वेळ लागणार नाही. एकूणात "पवार प्ले" मुळे आणि भाजप हायकमांडच्या संबंध ताणण्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा एक प्रतिस्पर्धी दुस-या एका प्रतिस्पर्ध्याकडून कमकूवत होण्याची शक्यता जास्त वाटते. बाकी, "हाय कमांड" आणि त्याअनुशंघाने येणारे "गटबाजीचे राजकारण" म्हटल्यावर याआधी एकच पक्ष माझ्या डोळ्यासमोर यायचा. सेना कमकुवत झाली की, "ॲंटी बिजेपी (कॉमन एनिमी)" अजेंडातून आणि नव्या राजकीय समीकरणातून बाकी पक्ष एकत्र येऊ शकतात. बाय पोल निवडणूकीत त्याची एक चुणूक दिसलीच
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on गुरुवार, 10/30/2014 - 16:35

Permalink

आदित्य आणि शिवाजी राजे यांची तुलना.

आदित्य ठाकरे यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवणे तसे योग्य होते ( पक्षाचा भावी वारसदार), परंतु आदित्य आणि शिवाजी महाराज यांची तुलना करणे अतिशय अयोग्य असेच होते. निवड्णुकांच्या काळात चायवाला प्रंतप्रधान असे सांगणे, त्यांच्या वडिलाचा उद्धार करणे हे अयोग्य असे होते. आतातरी सर्वच नेत्यांनी सभ्यपणे आणि सुसंस्कृत वागणे असेच अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on गुरुवार, 10/30/2014 - 17:14

Permalink

सेनेने विरोधी बाकावर बसावे.

सेनेने विरोधी बाकावर बसावे. १२२ आमदार घेवून भाजपा सरकार बनवू पाहत आहे. अपक्ष आले तरी १३५ होतील आणि अपक्ष पण काय सहजासहजी येत नसतात. भाजपला एनसीपीचा बाहेरून/आतून पाठींबा घ्यावा लागणार आणि त्याची किंमत पण द्यावी लागणार. लोकांना कळून चुकेल मग भाजपच खर रूप.
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on गुरुवार, 10/30/2014 - 17:26

Permalink

हे माफीबिफी मागा वगैरे

हे माफीबिफी मागा वगैरे बातम्या न आगा ना पिछा असलेल्या आहेत. कुणी माफीची मागणी केली वगैरे काही उल्लेख नाही नुसत्या पुड्या आहेत या. काल रुडी पण म्हणाले कि आम्ही माफी मागायला लावत नाही आणि सेना/उद्धव पण कुणाची माफी मागत नसतात हे पण पक्कं आहे. सरकार भाजपला स्थापन करायचं तर बहुमत जमवायची जबाबदारी त्यांची आहे. शिवसेनेला जर ६३ आमदार असूनही पुरेसा वाटा मिळणार नसेल तर त्यांनी सन्मानाने विरोधात बसायला हवे. भाजपला तडजोडी करून पवार साहेबांच्या मर्जीनेच सरकार चालवायला लागेल. राष्ट्रवादीच्या मागच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालायला लागेल.'नाचुरली करप्ट पार्टी', महाभ्रष्टवादी वगैरे शब्द घश्यात घालून पवारांची मर्जी राखावी लागेल. आणि पवार साहेब काही ५ वर्षे सरकार चालवू देणार नाहीत. मुंबई / ठाणे महापालिकांत भाजप गेली तर मनसे आहेच. २ वर्षे शिवसेना आरामात तिथे सत्ता ताब्यात ठेवू शकते. जनता मात्र भाजप एनसीपी यांची मिलीभगत समजून घेईल आणि भाजप/मोदींची गोची होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 10/30/2014 - 19:29

Permalink

शिवसेना नेते व उद्धव ठाकर्

शिवसेना नेते व उद्धव ठाकर्‍यांना अजूनही परिपक्वता आलेली दिसत नाही. आता म्हणे आमचा सन्मान राखला नाही तर शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार. सन्मान हा मागून मिळत नसतो. तो स्वकर्तृत्वाने कमवायचा असतो. सेनेने बहिष्कार टाकला तर सेनेचेच हसे होईल व शपथविधी सोहळा काही त्यांच्यावाचून अडून राहणार नाही. एकंदरीत शिवसेना यावेळी सुरवातीपासूनच घोडचुका करत गेली आणि अजूनही चुका सुरूच आहेत. एकतर विरोधी पक्षात बसा किंवा भाजप जे देईल ते गोड मानून घ्या. आम्हाला हीच खाती हवीत आणि आम्हाला इतकी मंत्रीपदे हवीत अशा मागण्या करत बसला तर मिळणार काहीच नाही. उलट जनतेत हसे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on गुरुवार, 10/30/2014 - 19:47

Permalink

शिवसेनेन विरोधी बाकावरच बसाव.

शिवसेनेन विरोधी बाकावरच बसाव. भाजपकडे कुठे पूर्ण बहुमत आहे. अपक्ष, राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर आणि त्यांच्या कलानेच सरकार चालेल. सेनेचा पाठींबा पण पाहिजे आणि बिनशर्त पाहिजे ही कुठली पद्धत? भाजप आणि एनसीपीची मिलीभगत लोकांना पण कळू देत की.हसं तर भाजपच होईल. राष्ट्रवादी नाहीतर महाभ्रष्टवादी पार्टी, न्याचुरली करप्ट पार्टी, राष्ट्राव्दीचा पाठींबा घेणार नाही नाही वगैरे गप्पा प्रधानसेवक आणि भाजपचे नेते मारत होते त्यातला फोलपणा लोकांना समजून चुकेल. बाहेरून पाठींबा म्हणजे आतून काय काय सेटिंग असते ते लोकांना माहित नसते काय? पवारांच्या कृपेवरच नवीन सरकारचे भवितव्य अवलंबून असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on गुरुवार, 10/30/2014 - 19:57

Permalink

भाजप आणि एनसीपीची मिलीभगत

भाजप आणि एनसीपीची मिलीभगत दिसत आहेच तर उगाच कशाला ताकाला जावून भांड काय लपवायचं? ६३ आमदार असलेली पार्टी पाठींबा देवून बदल्यात सत्तेत सन्मानपूर्वक वाटा मागत असेल तर त्यात चूक काय? नाही तर बसतील विरोधी बाकावर.भाजपला पाठींबा पण हवा आहे आणि त्याच्या अटी पण तेच ठरवणार म्हणजे काय? त्यांना सेना नकोच आहे मग घ्या एनसीपीचा पाठींबा. आणि शपथविधीला जायची बळजबरी असते काय? स्वतः न जाता एखादा प्रतिनिधी पाठवतील. हाय काय आणि नाय काय.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on गुरुवार, 10/30/2014 - 20:31

Permalink

माझे मत…

आधी कोण तो मिलिंद नार्वेकर सहाय्यक सचिव होता. आता कुठे आहे तो! प्रसारमाध्यमे आणि लोकांकडुन बोंबाबोंब झाल्यावर त्याला हाकलुन दिला/बाजुला केला का? बहुदा त्याची जागा आता संजय राऊत आणि भावी वारसदार(?) यांनी घेतली आहे. हे दोघे शिवसेनेला अधोगतीकडे घेऊन चालले आहेत. (प्रसारमाध्यमांत जाहीर झाल्याप्रमाणे) भाजपाला मोदी/शहा यांचा अपमान केल्यापध्दल शिवसेनेकडुन जाहीर/खाजगी माफी हवी आहे. खरे/खोटे देव जाणे! सेनेतले बुजुर्ग(?) आमदार (इतका अपमान सहन करून सुध्दा) सत्तेत सहभागी व्हावे या मताचे आहेत कारण गेली पंधरा वर्षे ते विरोधात बसले आहेत आणि पुढल्या वेळी आपल्याला निवडणुक लढवायला मिळेल/आपण निवडुन येऊ याची त्यांना खात्री नाही. याऊलट नविन आमदार विरोधात बसायला तयार आहेत कारण त्यांना पुढल्या वेळी निवडणुक लढवायची आहे आणि कदाचित तेव्हा आपल्याला एखादे मंत्रीपद मिळेल अशी त्यांना आशा आहे. शिवसेना सगळ्याच बाजुंनी अडचणीत आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com