लेखनप्रकार (Writing Type)
गेले दोन दिवस इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि चेतन भगत यांचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कंपन्यां कशा या मुलांना वापरतात यावरून वाद चालला होता. पण दोघांचाही आपल्याकडील सिस्टीम आणि त्या सिस्टीमचे प्रॉडक्ट असलेले व्यावसायीक अशा दोन्हीवर रास्त असला तरी काहीसा त्रागाच दिसत होता.
त्याच्याकडेच बघण्याचा दुसरा दृष्टीकोन कर्मधर्मसंयोगाने मला काल ऐकायला मिळाला. ठिकाण होते एम आय टी आणि वक्ते होते, डॉ. रघुनाथ माशेलकर. विषयाचा मथळा होता: Innovation's Holy Grail: Getting More from Less for Many. उपस्थित हे भारतीय तसेच अभारतीय होते - विद्यार्थी, प्राध्यापक/फॅकल्टी, उद्योजक आणि शास्त्रज्ञ. लवकर गेल्याने बसायला जागा मिळाली, अनेक जण शेवटपर्यंत उभे राहून बोलणे ऐकत होते.
विषयाच्या मथळ्याप्रमाणेच माशेलकरांच्या बोलण्याचा मतितार्थ होता की कल्पकतेने/इनोवेशनने आपण कमी रिसोअर्सेस मधे बरेच जास्त करू शकतो. अर्थात गरज असते ती कल्पकतेची. या संदर्भात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय वेगळ्या पद्धतीने विचार करत पुढे जात आहेत. ज्यासाठी त्यांनी इंडोवेशन असा शब्द वापरला. त्यांच्या भाषणाचा मुद्दा समजावून सांगण्यासाठी त्यांनी भारतात कसे आणि काय चालले आहे, काय यशस्वी झाले आहे याची आपल्याला माहीत असलेलीच पण त्यांच्या दृष्टीकोनातून उदाहरणे दाखवली. ती येथे परत थोडक्यात सांगतो:
सर्वप्रथम त्यांनी जयपूरच्या संस्थेकडून तयार केला गेलेला कृत्रिम पाय दाखवला. तशाच कृत्रिम पायाला अमेरीकेत $२००० पडतात. पण असा सामान्य भारतीयाला कसा परवडणार असा विचार करून त्यावर संशोधन करून भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेला पाय हा $५० च्या खाली मिळतो. त्याचा वापर दाखवण्यासाठी त्यांनी एक चित्रफीत दाखवली ज्यात गुढघ्यापासून खालचा पाय नसलेल्या एका माणसास त्यांनी तो पाय लावला होता. तो झाडावर चढला, तिथून उडी मारली, सायकल चालवली, चार मिनिटात एक किलोमिटर पळून दाखवले इत्यादी... ती बघत असताना सगळे अवाक झाले होते. त्यांच्या ते लक्षात आले का ते कळले नाही. पण शांतता पाहून ते मिष्कीलपणे म्हणाले, या दृश्यानंतर लोकं टाळ्या वाजवात! आणि मग सगळे एकदम जागे झाले आणि टाळ्या वाजवू लागले. :-) अर्थात त्यानंतर ते जे काही म्हणाले ते महत्वाचे होते. त्यांच्या दृष्टीने ह्या चित्रफितीतून एक संदेश जातो: जर संधी मिळाली तर सामान्य गरीब माणूस हा प्रस्थापितांच्या बरोबरीने अथवा त्याहूनही पुढे जाऊ शकतो. प्रश्न आहे तो तशी संधी उपलब्ध करून देण्याचा आणि त्यासाठी लागणार्या कल्पकतेचा.
त्या नंतर त्यांनी टाटा नॅनोचे उदाहरण सांगितले. नॅनो संदर्भात चाळीसएक आंतर्राष्ट्रीय पॅटंट्स आहेत. तंत्रज्ञांना रतन टाटांनी अक्षरशः अखुड शिंगी बहुदुधी गाय शोधायला सांगितले होते. किंमत काही झाले तरी $२००० अथवा कमीच असली पाहीजे. आज ते म्हणाले कंपन्यांमधे नॅनो हा शब्द स्वस्तातील इनोवेशनसाठी प्रचलीत झाला आहे. त्या संदर्भात त्यांनी "छोटू" फ्रिजचा एक फोटो दाखवला जो ग्रामिण भागात वापरात आहे.
धिरूभाई अंबानी नव्वदच्या दशकात म्हणाले की पोस्टाच्या स्टँप इतका फोन कॉल स्वस्त झाला तर सगळे जण फोन घेतील. आपण तशी मोबाईल क्रांती झालेली पाहतोच... त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील एका खेड्याचे एक गंमतीशीर उदाहरण दिले - रात्री नवरा दारू पिऊन घरी येऊन जर भांडण-मारहाण करेल असे वाटले तर मोबाईलने जोडलेल्या स्त्रीया एकमेकींस टेक्स्ट करून बोलावतात आणि अशा नवरोबाला गप करतात. थोडक्यात मोबाईल बरोबर सोशल फायदे पण झाले. अर्थात याहून अधिक फायदे त्यांनी कोळी, भाजिविक्रेते वगैरेंच्या संदर्भात सांगितले. धिरूभाईंनी त्यावेळेस ती जबाबदारी मुकेश अंबानी आणि त्याच्या टीमवर टाकली. त्यांना फक्त रिफायनरीच्या कामाचा अनुभव होता. पण आऊट ऑफ बॉक्स विचार करत त्यांनी प्रस्थापित इन्फ्रास्ट्रक्चर कसे वापरले आणि पुढे गेले.
सरते शेवटी अरविंद आय इन्स्टीट्यूटचे उदाहरण. ज्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना कमीतकमी $३००० पडतात त्या त्यांनी $३० ते $३०० मधे आणल्या. अर्थात ऐपतीप्रमाणे $३० का $३०० हे ठरवले जाते आणि साधारण ४०% शस्त्रक्रीया गरीबांवर मोफत केल्या जातात. बरं गुणवत्तेवर शंका येणार म्हणून त्याचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी लंडनच्या एका रॉयल इस्पितळाशी केला होता. आणि लक्षात येते की सक्सेस रेट हा अरविंद आय केअरचा जास्त आहे. (या प्रकल्पावर अधिक लिहीता येईल पण नंतर कधीतरी).
हे सगळे सर्वसमावेशक (इन्क्लूजिव) इनोवेशन आहे. त्यांना नंतर एका बाईने प्रश्न विचारला की पण असे स्वस्त होत असेल तर ज्यांनी त्यात मिलीयन्स डॉलर्स गुंतवून पद्धती तयार केल्यात त्यांचे काय? अर्थात उत्तर साधे होते - असा ट्रेंड झाला तर त्यांना बदलावे लागेल अथवा बुडावे लागेल. (माझ्या लेखी चीनशी स्पर्धा करताना आता अमेरीकेस या वास्तवाचे वेगळ्या संदर्भात भान येऊ लागले आहे).
अर्थात हे सगळे असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याचे त्यांना भान आहे. ही उदाहरणे देताना काही व्यक्तींची स्तुती चालली नव्हती, त्यांचे उदात्तीकरण चालले नव्हते. तर फक्त माणसे वेगळा विचार करत कमी रीसोअर्सेस मध्ये जास्त कल्पकता कशी दाखवता येते, समाजाला उपयुक्त कसे करता येते हे दाखवण्याचा उद्देश होता...
म्हणून त्यांच्या दृष्टीने इनोवेशन हे केवळ आय आय टी अथवा तत्सम इतर संस्थांपुरतेच मर्यादीत नाही तर ते अगदी व्यक्तीगत पातळीवर सेकंड नेचर होणे महत्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण त्या संदर्भात एकदा टाटा च्या ऑफिसात कुणाशीतरी बोलताना ते म्हणाले की इतरत्र धोका पत्करण्यास प्रोत्साहन दिले जाते, पण आपल्याकडे धोका पत्करल्यास फासावर लटकवतात (अर्थात हे वक्प्रचार म्हणून घ्यावे!). रतन टाटांना ते भावले आणि नंतर त्यांनी "Daring to Try" नवाचे पारीतोषिक चालू केले जे अशा नव्या रीस्कस घेऊन कल्पकता दाखवणार्यांना दिले जाते. असे अजूनही काही सांगितले.
अर्थात एका उदाहरणामुळे "आहे मनोहर तरी गमते उदास" असेच वाटले - त्यांनीच सांगितल्याप्रमाणे लंडनमधे एका ब्रिटीश व्यक्तीने टाटाचे युरोपातील एक मोठा एम्प्लॉयर म्हणून कौतूक केले. पण नंतर विचारले की, "काही भारतीयांमध्ये वैभव आहे पण भारत कधी वैभवशाली होणार?"
त्याचे उत्तर अर्थातच सोपे नाही... म्हणून शेवटी त्यांचा मंत्र (जो नंतर त्यांनी परत व्यक्तीगत बोलताना परत परत सांगितला) तो असाच होता: "Doing well by doing good" , "Do well by doing good".
प्रतिक्रिया
चांगली माहिती
बातमी खरच चांगली आहे.. प्रोडक्टही तसच असावं अपेक्षा आहे.
लेखन आवडले. अगदी व्यक्तीगत
+१
जोपर्यंत गप्प बसा संस्कृती
हो बरोबर मी आणखी काही अशी
अगदी! कितीतरी आया अगदी
त्या संदर्भात
सहमत
चांगली माहिती.
वा वा वा!! मस्त वृत्तांत. अशी
त्या संदर्भात
मेकींग ब्रेकथ्रु ईनोव्हेशन्स हॅपन
एक माहित असलेले कमी खर्चिक
उत्तम उदाहरणं
+१
कालपासुन संध्या हा शब्द
खरचं की!
अहो
गप्प बसा हो!
छान
लेख चांगलाच.
भाषणाचा दुवा
सांगेन
दुवा आला नाही
मस्त. वरील बहुतेकांशी सहमती.
धागा प्रतिसाद आवडले. सतत
इंडोटेशन
सुंदर लेख आहे . माझ्या मते