✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

म
मार्गी यांनी
Wed, 02/25/2026 - 20:30  ·  लेख
लेख
✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती ✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली ✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं ✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं! ✪ पहाड़ाची नानाविध रूपं! ✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ ९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन. (हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. ) एका सुंदर गाण्यासह जीपमधून बघितलेला नजारा इथे बघता येईल.  .  .  .  .  .  .  .  मुन्सियारी गांव! तालुक्याचं ठिकाण आहे आणि पिथौरागढ़ जिल्ह्यातील जवळ जवळ उत्तरेकडचं सर्वांत मोठं गाव. इथे फिरताना खूप महिला डोक्यावर सिलेंडर घेऊन जाताना दिसत आहेत. इतक्या जास्त की, असं वाटलं की, कदाचित महिन्यातून आजच इथे सिलेंडर मिळत असतील आणि म्हणून त्या नेत असतील. आणि रिक्षा नसल्यामुळे डोक्यावरून नेत असाव्यात. पण नंतर कळालं की, इथे सिलेंडर रोज मिळतो आणि महिला अशाच त्या नेतात. पुढे महिला इतरही मोठं सामान नेताना दिसल्या. मुन्सियारी गाव फिरलो. छोटी छोटी आणि चौकोनी घरं. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये इथे बर्फवृष्टी होते. त्यासाठी अनेक घरांमध्ये रूम हीटरही असतो. हे गाव तसं सीमेलगत जाणा-या रस्त्यांवर येत नाही. त्यामुळेही कदाचित इथले जवळचे रस्ते इतके सुस्थितीत नाही आहेत. पायवाटेवरून हिमालयाच्या शिखरांचा आनंद घेत मस्त चाललो. छोटे धबधबे दिसले. पायवाटेवर शाळेत जाणारे मुलं भेटले. पहाड़ामध्ये येण्या जाण्याची‌ साधनं कमी असल्यामुळे पायी जाण्याचं आणि मेहनतीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे शक्यतो लठ्ठपणा कमी दिसतो. पायवाट छोट्या गावांकडे जातेय. रस्त्याच्या बाजूने आतमध्ये जातेय. पुढे गेल्यावर पायवाट परत रस्त्याकडे आली आणि येताना मुख्य रस्त्यावरून चालत आलो. रस्त्यावरही शाळेत जाणारे मुलं आणि पालक दिसले. कितीही फिरलो आणि कितीही निसर्ग सौंदर्य बघितलं तरी कमी वाटेल असा आसमंत! परत होमस्टेकडे गेलो आणि पंचा चुलींना न्याहाळत चहाचा आनंद घेतला! जीपचा प्रवास करायचा असल्यामुळे नाश्ता टाळला. जीप होमस्टेपाशीच मिळाली. फक्त मुनिस्यारीमध्ये सगळ्या लोकांना घरपोच जाऊन घेण्यात आणि पेट्रोल भरण्यात वेळ गेला. त्यामुळे प्रत्यक्ष बाहेर पडायला १२ वाजले. ह्या प्रवासात समोरची सीट मिळाली! त्यामुळे मनसोक्त फोटोज आणि व्हिडिओ घेता आले. पहाड़ी लोकांचा साधेपणा आणि एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती सतत जाणवते. एका महिलेने अगदी सहजपणे जीप ड्रायव्हरकडे मोठी रक्कम दिली आणि पुढे एका गावात द्यायला सांगितली. त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं की, ते काही आधीपासून ओळखीचे नाहीत. पण विश्वासाने तिने पैसे दिले आणि तितक्याच सहजपणे त्याने देतो म्हणून सांगितलं. मुख्य मार्गालगतच्या गावांमध्येही जीपने नंतर सामान पोहचवलं. जीपचा प्रवास खूप सुंदर झाला. खूप सुंदर व्ह्यू मिळाला. पुढे बरम गावात जीप जेवायला थांबली तेव्हाही बाजूच्या गोरीगंगेचं छान दर्शन घेता आलं. वाटेत अनेक वेळा थांबत थांबत गेल्यामुळे आणि जेवणाच्या ब्रेकमुळे पोहचायला उशीर होत गेला. जौलजिबीपासून मोठा रस्ता सुरू झाला. तरीही प्रत्यक्ष सत्गडला पोहचायला ५ वाजत आले. सत्गडला घरापर्यंत आता कच्चा रस्ता झाला आहे. पण तोही ट्रेकइतकाच सुंदर आहे. लॅपटॉप, बायनॅक्युलर आणि टेलिस्कोप घेऊन हा छोटेखानी १० मिनिटांचा ट्रेक केला. संध्याकाळच्या लाल सूर्यप्रकाशात काय विलोभनीय आसमंत दिसतोय! अर्थात् जाताना वाघाची आठवण आलीच! काही गाववासीही भेटले. अंधार पडण्याच्या थोडं आधी सत्गडला पोहचलो. सामानसह चालल्यामुळे मिळालेली उष्णता लवकरच गेली आणि थंडीचा कडाका सुरू झाला! अशा वेळी चहा खरोखर अमृततुल्य! घराच्या गच्चीतून दिसणारे डोंगर आणि झाडी हळु हळु काळोखात विलीन झाली. तारेही प्रकट झाले! आणि ध्वज मंदिरातला तेजस्वी दिवाही प्रकाशित झाला. चंद्र अजून जास्त उशीरा येत असल्यामुळे रात्री सत्गडमध्येही आकाश खूप छान मिळालं आणि आणखी छान फोटो घेता आले. उद्या ध्वज मंदिराचा ट्रेक करेन आणि परवा परतीचा प्रवास सुरू होईल! पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 फेब्रुवारी 2026.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
141 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा