✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एअरलिफ्ट

A
Anand More यांनी
Sun, 01/24/2016 - 23:23  ·  लेख
लेख
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो. पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे. नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले. २०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या. इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले. "टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली. सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले. चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते. अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
मत
शिफारस
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
27878 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

चित्रपट आवडला नाही...

ब़जरबट्टू
Wed, 01/27/2016 - 10:47 नवीन
माफ करा, मला तरी हा चित्रपट आवडला नाही.. मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये. नक्की काय कौतुस्कापद आहे ? १,७०,००० भारतीयांनी युद्धप्रसंगी एकत्र येउन राहणे, का एवढ्या मोठ्या संखेने युध्दभूमीवरुन या लोकांना विमानाने बाहेर काढणे ? माझ्यामते तरी Airlift करणे जास्त कौतुस्कापद आहे. ४५० च्या आसपास विमानफेर्या युध्दभूमीवरुन करणे हा प्रसंग चित्रपटात मोजुन ५ मिनिटात आटोपण्यात आला आहे. पुर्ण चित्रपट केवळ अक्षयभोवती गुंफलेला वाटला. २ तासाच्या चित्रपटात १.५ तास सरकारी अनास्था दाखवुन शेवटी सरकारकडूनच केलेले सर्वात मोठ्या रेस्कू आपरेशनला असे चिंचवड बस फ़ेल आहे, म्हणून रावेत बस सोडली आहे, अश्या अविर्भावात दाखवणे, यातच किती विसंगती आहे. मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.
  • Log in or register to post comments

मुळात Airlift या नावासोबतच हा

जव्हेरगंज
Sun, 01/31/2016 - 21:53 नवीन
मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये.>>>>+1000 मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.>>>+10000000 पण तरीही चित्रपट आवडला ... शेवट गुंडाळ्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

पटलं..

चिगो
Sun, 01/31/2016 - 22:28 नवीन
चित्रपट आवडला.. त्यातल्या सर्व अभिनेते/अभिनेत्रींचा अभिनयपण आवडला. पण तुमचा मुद्दा मला पटला. मलापण 'इतिहासातील सगळ्यात मोठं रेस्क्यु ऑपरेशन' ह्यावरुन त्याच्या 'इंट्रीकसीज' बघायला मिळतील, असं वाटलं होतं. पण एक कोहली सोडून बाकी काही सरकारी यंत्रणा तेव्हा कशी वागली, हे काही दाखवलं नाही.. असो. सरकारी यंत्रणेचे अपयश ही चर्चणीय आणि चर्वणीय घटना असते, यश नव्हे. तेव्हा चित्रपट आवडला हेच पुन्हा म्हणेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

+१००००००००००००००००००००

माझीही शॅम्पेन
Mon, 02/01/2016 - 17:05 नवीन
+१०००००००००००००००००००० अगदी प्रचंड सहमत , इतका गाजावाजा झाला आणि चित्रपट बघायला गेलो आणि पार निराश झालो , कुठेही युध्द सदृश्य परिस्थिती झाली की भारत सरकार बर्‍या पैकी सतर्क होते , इतक प्रचंड ओपरेशन भारत सरकारने पार पाडल त्याच फारस कौतुक दिसत नाही उलट नोकरशाहीवर टीका करण्यात बराच वेळ वाया घालवला आहे मुळात हा चित्रपट बर्‍या पैकी काल्पनिक आहे , इराकी आर्मी ओफीसॅर हिंदी बोलतो इत्यादी तद्दन खोट वाटत.. चित्रपटाने जास्तीत जास्त काल्पनिक गोष्टी दाखवून पार निराश केल राव ह्या पेक्षा बेबी आणि हॉलिडे खूप सरस आहेत (ते बघून ह्या चित्रपट बघण्यच ठरवू नका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

कालच हा चित्रपट पाहिला. बरा

पिलीयन रायडर
Wed, 01/27/2016 - 11:35 नवीन
कालच हा चित्रपट पाहिला. बरा वाटला पण अगदी फार आवडला असं म्हणवत नाही. मी मुद्दमच आधी फारशी काहीच माहिती न घेता पाहिला. त्यामुळे अगदी कोर्‍या मनाने पहाता आला. सगळ्यात आधी तर चित्रपटाचा वेग फारच संथ आहे. बेबी मध्ये जसं भराभर नाट्य घडत जातं तसं इथे होत नाही. उलट गाणी वगैरे टाकल्याने (अगदी पहिल्या ३ मिनिटातच आयटम नंबर..!) अनेकदा महत्वाच्या प्रसंगातुन अकारण लक्ष उडते. ह्या प्रकारचे रेस्क्यु ऑपरेशन्स घडलेच नाहीत असं नाहीये.. पण तरीही ही घटना महत्वाची होती ते लोकांच्या संख्येमुळे. पावणे दोन लाख भारतीयांना सोडवण्याची ही एकमेव घटना असावी. "पावणे दोन लाख" हा भयंकर अंगावर येणारा आकडा आहे. पण संपुर्ण चित्रपटात तो अजिबात जाणवत नाही. एवढ्या लोकांची व्यवस्था दोन चार लोकांनी मिळुन एका शाळेत केली हे पटत नाही. हे लोक राहिले कसे? खाल्लं काय? पिण्याच्या पाण्याची सोय काय? औषधपाणी? रोजचा स्वयंपाक? त्याचे वितरण? टॉयलेट्स? कितीतरी गोष्टी होत्या. पण एवढ्या खोलात चित्रपट जातच नाही. एकदाही "रणजित कट्याल" हा मनुष्य पावणे दोन लाख लोकांची व्यवस्था पहात आहे असं वाटत नाही. तो फक्त म्हणत रहातो की आम्ही एवढे लोक अडकलेले आहोत.. भारतीय सरकारला मात्र अगदीच व्हिलन करुन टाकले आहे. आपल्या सरकारला रणजित कट्यालनेच फोन करुन कळवलं की असे हल्ले झालेत आणि आता पहा आमचं काहीतरी असं मला वाटायला लागलं. सरकारकडुन एकही प्रयत्न नाही झाला. कोहली नामक मनुष्याने तगादा लावुन काहीतरी करुन घेतलं इतकंच समजतं. पण ते ही नाट्य उरकले आहे. जॉर्डनची बॉर्डर उघडतात तो प्रसंग अजुन थरारक करता आला असता. एवढ्या प्रचंड संख्येने लोक एका देशातुन दुसर्‍या देशात जाणार असतील तर विचार करा किती प्रचंड गोंधळ उडेल. चित्रपटात मात्र लाईन लावुन एक माणुस नावं लिहुन घेतो आणि आजुबाजुच्या फोडलेल्या गाड्या गोळा करुन "पा व णे दो न ला ख" लोक जातात. अगदी दोन चार दिशांना पांगले म्हणलं तरी किमान चार पाचशे गाड्या एकत्र दिसायला नकोत का? अगदीच पाच पन्नास गाड्या.. त्यातही अर्ध्या कार.. कसे काय इतके लोक वाळवंटातुन प्रवास करत गेले? सरळ एका दमात १००० किमी प्रवास केला का? त्यांचं खाणं पिणं? काही म्हणजे काही दाखवलेलं नाही.. मुळात ह्या सगळ्या घटनेच्या "टाइमलाईन्स" कळतच नाहीत. किती दिवस हे लोक कुवेत मध्ये अडकले? किती दिवस प्रवास करत होते? एवढ्या लोकांना भारतात न्यायला किती दिवस लागले? सगळा खेळ "स्केल" चा होता. चित्रपट आपला कट्याल भोवतीच फिरत रहातो. पावणे दोन लाख फक्त आपलं म्हणायला. बरं एवढा निवांत चालवलेला पिक्चर, शेवटच्या माहिती देणार्‍या दोन स्लाईडला मात्र पळवला. नीट काही वाचताच आलं नाही. मी आपली कट्यालचे फोटो दाखवतील म्हणुन पहात होते तर मॅथ्युज आणि वेदी म्हणुन दोघं सेकंदाभरासाठी दिसले. हा काय प्रकार म्हणुन घरी येऊन गुगल करुन माहिती काढली थोडीफार तेव्हा कळालं की मुळात "रणजित कट्याल" नाहीच. मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. पण ह्या घटनेत असणारे अनेक लोकांना त्यांचेही नाव माहिती असेलच असे नाही. एका लेखात असेही वाचले की ह्या घटनेत जवळपास ७५% केरळी लोक होते. त्यामुळे केरळमध्ये मॅथुजना आदराने आठवले जाते. ह्याच ढंगाचे नाव मुख्य हिरोला द्याला काय हरकत होती खरं तर? नेहमी पंजाबी बिझिनेसमनच का हवा असतो हे सगळं करायला? पण बॉलीवुड म्हणलं की काही गोष्टी सोडुन द्याव्या लगतात.. हे सगळं रेस्क्यु ऑपरेशन करायला खरं तर पुष्कळच महिने लागले. एअर इंडिअयाच्या जवळपास ५०० खेपा झाल्या होत्या म्हणतात. लोकांना वाळवंटात तंबु ठोकुन रहावं लागलं. एका लेखात तर ह्या भारतीयांमध्ये असणार्‍या एकाने UN ने पांघरुणं वगरे पुरवल्याचेही सांगितले आहे. हे सगळे बारकावे अर्थातच चित्रपटात नाहीत. सरकार करुन गुजराल तेव्हा परराष्ट्र मंत्री होते आणि ते स्वतः जाऊन सद्दामला भेटले होते. त्यांच्या सद्दम सोबतच्या फोटोवर बरीच टिकाही झाली होती. तेव्हा सरकार कशामुळे असे नकारात्मक दाखवले आहे ते कळत नाही. पिकचरच्या सुरवातीलाच "इस कहानी के सभी पात्र काल्पनिक है.." वगैरे दाखवल्यामुळे सत्य घटनेवर रचलेली ही एक कथा आहे. जास्त संताप वगैरे असलं काही झालं नाही पण खेद वाटला. बर्‍याच चांगल्या पद्धतीने दाखवता आली असती पण... असो..
  • Log in or register to post comments

मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा

संदीप डांगे
Wed, 01/27/2016 - 11:55 नवीन
मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. >> मॅथ्युज चे नाव सनी मॅथ्युज असे होते. मेसी म्हणजे प्रत्यक्षात "मसिहा मॅथ्युज" - "देवदूत" असे त्याला आदराने संबोधले गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अच्छा असय होय ते!! थॅन्क्यु

पिलीयन रायडर
Wed, 01/27/2016 - 12:52 नवीन
अच्छा असय होय ते!! थॅन्क्यु हां!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पिरा छान प्रतिक्रिया…

पगला गजोधर
Wed, 01/27/2016 - 12:04 नवीन
भारतीय लोकप्रतिनिधींना हलकासा व्हिलनिश टच आलाय खरं, त्यावेळी प्रत्यक्षात भारतात राजनैतिक अस्थिरता होती (लोकसभेत सरकारला विश्वासदर्शक ठराव इ गोष्टीत भयानक अडकलेलं होते), तरीही भारतीय सरकारने यथाशक्ती प्रयत्न केलेलेच. उदा. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सद्दामला आक्रमणानंतर बोल लावायचे टाळले, त्याच्या राजवटीशी जुळवून घेतले, (अग अग मगरी … तुझी पाठ किती मऊ याप्रकारे), अन्न व औषधे देऊ केली (तेलाच्या बदल्यात ह्युम्यानेटेरिअन बेसिसवर), भारतीय मिलिटरी विमाने जर लोकांना रेस्कू करायला, युद्धक्षेत्रात पाठवली असती, तर अजून परिस्थिती चिघळली असती, व क्लिअरन्स घेण्यात बराच काळ खर्ची पडला असता, म्हणूनच, पूर्ण विचाराअंती सिविलिअन एअर लाइन (सार्वजनिक क्षेत्रातली) वापरली, (र च्या क ने , आत्ता खासगी विमान कंपन्याच्या बाजूने जे सरकारी विमान कंपन्यांवर ताशेरे ओढतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की अश्या परिस्थितीत खासगी कंपन्या कदाचितच पुढे आल्या असत्या, की ज्या नेहमी फायदेशीर मार्गावर बिसिनेस घ्यायला नेहमी सरसावतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

चित्रपट चांगला आहे, पण बर्याच

मालोजीराव
Wed, 01/27/2016 - 15:11 नवीन
चित्रपट चांगला आहे, पण बर्याच महत्वाच्या गोष्टी दाखवल्या नाहीत. सद्दाम ला दाखवला नाही :) , ज्यांच्यामुळे Airlift शक्य झाले ते परराष्ट्र मंत्री गुजराल आणि सद्दाम ची तेव्हा गाजलेली गळाभेट दाखवली नाही. अर्थात हे दाखवलं असत तर चित्रपटाच्या हीरोचं क्रेडीट कमी झालं असतं
  • Log in or register to post comments

पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे

Anand More
Wed, 01/27/2016 - 15:52 नवीन
पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे ? तांत्रिक बाजू भक्कम आहेत की नाही? संपूर्ण घटनेला न्याय देण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी झाले की नाही? या सर्व प्रश्नांच्या फंदात न पडता, तो बघताना माझ्या मनात कोणते विचार आले ते मी नोंदवले आहे. हे पिक्चरचे समीक्षण किंवा रसग्रहण नाही. त्या तीन तासात मला आठवलेल्या गोष्टी असे माझ्या लेखाचे स्वरूप आहे.
  • Log in or register to post comments

मोरेसाहेब, डोण्ट वरी. पब्लिक

संदीप डांगे
Wed, 01/27/2016 - 16:09 नवीन
मोरेसाहेब, डोण्ट वरी. पब्लिक धाग्याचा मूळ विषय पाहून लिहिते. धाग्यावर आपले म्हणणे मांडण्यासारखे वातावरण आहे का हे बघून प्रतिसाद येतात. बाजीराव-मस्तानी, कट्यार काळजात घुसली, ह्याबद्दल अनेक धागे निघाले. जिथे योग्य वाटले तिथे लोकांनी लिहिले. तेव्हाही मूळ लेखकाने कोणता दृष्टिकोण ठेवून लिहलंय हे बघितलं नाही. वातावरण बघितले. तुमच्या धाग्यावर इतरांचेही अनेक चांगले प्रतिसाद आले, ही चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

मला परीक्षण आवडले. बघणार आहे

यशोधरा
Wed, 01/27/2016 - 16:14 नवीन
मला परीक्षण आवडले. बघणार आहे सिनेमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

सॉरी हां तुमच्या लेखावर काही

पिलीयन रायडर
Wed, 01/27/2016 - 17:51 नवीन
सॉरी हां तुमच्या लेखावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मी वाचला नव्हता कारण त्यातुन स्टोरी कळेल असं मला वाटलं. लेख आवडला. म्हणजे चित्रपटापेक्षाही तुमच्या आठवणी जास्त आवडल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

धन्यवाद... :-)

Anand More
Wed, 01/27/2016 - 19:10 नवीन
धन्यवाद... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आज airlift पाहिला. आवडला.

हेमंत लाटकर
Wed, 01/27/2016 - 19:33 नवीन
आज airlift पाहिला. आवडला.
  • Log in or register to post comments

वा

स्वाती दिनेश
Wed, 01/27/2016 - 21:49 नवीन
परीक्षण व त्या अनुषंगाने मांडलेले विचार असा लेख आवडला, चित्रपट बघेन. स्वाती
  • Log in or register to post comments

माझ्या मते मेध्यू ने

निनाद मुक्काम …
Wed, 01/27/2016 - 23:33 नवीन
माझ्या मते मेध्यू ने एकट्याने लाख भर लोक घेऊन अम्मान ला जातांना दाखवणे हे सिनेमच्या अंगाने घेतलेली लिबर्टी होती जे सिनेमाच्या सुरवातीला दाखवले आहे. मात्र त्याने केलेले प्रयत्न इराक व दिल्लीत साधलेला संपर्क व निदान काही हजार लोकांना भारतात पाठवण्यास जबाबदार होता . दोन वर्ष अबुधाबी मध्ये होतो तेव्हा भारतीय दूतावासाचा सुखद अनुभव आला , खाडीभागात कनिष्ठ वर्गातील अनिवासी भारतीय राहतात त्यांचे पैसे सरकारला आवडायचे मात्र त्यांना सुविधा देण्यास त्यांचे उत्तर दायित्व घेण्यास आपण बांधील आहोत ह्याबाबत त्यांची उदासीनता असायची जेथे भारतातील भारतीयांना सरकारी कारभाराचा लाल्फितीचा अनुभव येतो तेथे खाडीदेशात लेबर केंप मध्ये राहणर्या लोकांची पर्व कोण करेल मोदी ह्यांनी यु ए इ मध्ये लेबर केंप ला भेट दिली त्या लोकांशी संवांद साधला ह्या गोष्टीला महत्व न देता त्यांचा मॉस्क ला भेट देण्याच्या बातमीवर चर्विचरण केले. ह्यामुळे केरळातील शहरात महानगरपालिकेत भाजपचे मुसंडी मारली. सिनेमा भयानक आवडला डोळ्यात पाणी तरळले. दुबई मधील आप्त मंडळींनी बाबरी निमित्ताने घडलेला किस्सा सांगितला होता बाबरी पडल्याचे टीव्ही वर पाहून तेथील केरळी मुसलमानांनी दुबई मध्ये रस्त्यावर मोर्चा काढला व हिंदूचे मंदिर तोडले हिंदू त्यावेळी दहशती खाली होते तेव्हा दुबई मधील सिंधी व इतर व्यापारी वर्गाने दुबईच्या शेखला दुबई सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा दिला व पुढे दुबई च्या शेखने स्वतः ते मंदिर बांधून दिले- आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

अगदीच अवांतर:

आदूबाळ
गुरुवार, 01/28/2016 - 05:16 नवीन
अगदीच अवांतर: मोरेसाहेब, एक्झॉडस आवडलं असेल तर "मिला १८" नक्की वाचा.
  • Log in or register to post comments

सिनेमा बघितला... खूप काही

सुहास झेले
गुरुवार, 01/28/2016 - 10:16 नवीन
सिनेमा बघितला... खूप काही मिसिंग वाटले. अनेक प्रसंगात ती गंभीरता दिसली नाही. सिनेमाचा वेळ वाढवून रेस्क्यू ऑपरेशनची आणखी दृश्य टाकली असती तर प्रभाव पडला असता असे वाटते. परीक्षणासाठी आभार :)
  • Log in or register to post comments

माझ्या एका मित्राचे मत आहे की

Anand More
गुरुवार, 01/28/2016 - 10:34 नवीन
माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. त्याच्या मते या या चित्रपटात सरकारची भूमिका नगण्य आणि निष्क्रिय दाखवली आहे, जे वास्तवाला धरून नाही. असे करण्यामागचे कारण तेंव्हाचे सरकार वेगळ्या पक्षाचे होते. कोन्स्पिरसी थिअरिज वर कमी विश्वास असूनही मला हे मतही थोड्या प्रमाणात पटले आहे.
  • Log in or register to post comments

येक शिम्पळ लोजिक

चौकटराजा
Fri, 01/29/2016 - 17:21 नवीन
सरकार जबाबदार दाखवले असते तर नायकाच्या देशभक्त प्रतिमेचे काय ? दुसरे असे की वास्तवात घडत असले तरी दगाबाज मित्र व यारी यात भारतीय प्रेक्षक यारी पसंत करतो.जारकर्म करणारी भारतीय स्त्री त्याला पडद्यावर आवडत नाही .एका नायकाने अनेकाना यमसदनी पिस्तूल न वापरता पाठ वल्याचे आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

.

पगला गजोधर
Fri, 01/29/2016 - 18:34 नवीन
नायकाच्या देशभक्त प्रतिमेचे काय ?
तरी नशीब प्रेक्षकांच, निदान नायक पंजाबी दाखवलाय, गुजराती नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ते पण दाखवतील

उदय८२
Sun, 01/31/2016 - 19:23 नवीन
उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

;)

पगला गजोधर
Mon, 02/01/2016 - 09:21 नवीन
उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल
इथे, 'सिंगल ह्यांडेंडली' १५००० गुजरात्यांना बाहेर काढले, असा शब्दप्रयोग तुमच्याकडून राहिला… (आठवा रामायणातील मारुतीरायने 'सिंगल ह्यांडेंडली' पर्वत एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलेला… ) कोणी सांगावे, कदाचित पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी येईलही तसा चित्रपट…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय८२

कुणी सांगावं हा चित्रपट

संदीप डांगे
Mon, 02/01/2016 - 10:10 नवीन
कुणी सांगावं हा चित्रपट त्याचेच रुपक असेल.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

असूही शकतं…

पगला गजोधर
Mon, 02/01/2016 - 10:24 नवीन
हा बेपारी, अक्की पन बेपारी… ह्याला हलकी दाढी, त्याला पण दाढी…. हा शादीशुदा, तो पन शादीशुदा… अक्की इराकी सैनिक अधिकार्याला, वरपर्यंत ओळखी असल्याच्या थापा मारतो…. हा सिंगलह्यान्डेडली बरेच काही करतो, तो १.७ लाख भारतीयांना १००० किमी वर लपवून घेवून जातो… अजुन बरेच काहि....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ह ह ग लो (हसून हसून गडबडा

Anand More
Wed, 02/03/2016 - 15:54 नवीन
ह ह ग लो (हसून हसून गडबडा लोळतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

१५००० काय ?

गामा पैलवान
Tue, 02/09/2016 - 03:37 नवीन
Image removed. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय८२

जाऊ द्या हो गा.पै

गॅरी ट्रुमन
Tue, 02/09/2016 - 09:33 नवीन
जाऊ द्या हो गा.पै मोदीविरोधात गरळ ओकली की आपण किती पुरोगामी,लोकशाहीवादी,सहिष्णु इत्यादी इत्यादी सर्टिफिकिटे मिरवता येतात ना लोकांना. त्यातलाच हा एक प्रकार. भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगवर अशाच प्रवृत्तीविषयी लिहिले आहे--"मोदी विरोधात काहीही बरळावे, कोणतेही आरोप करावेत, त्यावर माध्यमे तुटून पडतात. म्हणून असे विनोद निर्माण होत असतात." (मोदींनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली हा आरोप आझमखानने केला आहे त्याला तोरसेकर "असा" विनोद म्हणत आहेत) अशा लोकांकडे दस्तुरखुद्द मोदी जर "हाथी चाले अपनी चाल कुत्ते भौके हजार" असे म्हणत दुर्लक्ष करत असतील तर आपल्यासारख्यांनी तरी ते फार गांभीर्याने का घ्यावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बंधो… भक्तगणाचाच हा प्रताप होता…

पगला गजोधर
Tue, 02/09/2016 - 09:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

बंधो ज्यांचा प्रताप होता त्या

मृत्युन्जय
Wed, 02/10/2016 - 14:57 नवीन
बंधो ज्यांचा प्रताप होता त्या टैम्सने स्पष्टीकरण दिले आहे आणि मान्य केले आहे की ही त्यांचीच चूक होती. राजनाथ सिंग म्हणतात की " पार्टी वर्कर्सनी असे केलेले असु शकेल. पण आमचे असे काही म्हणणे नाही" . पार्टी वर्कर्सनी हे विधान केलेच असे काही ते म्हणाले नाही. ज्यांनी वातमी लिहिली त्यांनीच मान्य केले की चूक भाजपा, मोदी अथव त्यांच्या समर्थकांची नव्हती तर त्यांची स्वतःची होती. त्यानंतर इतर कोण काय म्हणते हे सर्वथा गौण आहे. काहिही करुन मोदींवर किंवा त्यांच्या समर्थकांवर टीका करायचीच या घाईत तुम्ही वरची गोष्ट विसरत आहात. अर्थात टाइम्स देखील मोदींचा पित्त्या आहे त्यामुळे तो देखील "भक्त" त्यामुळे ही परत भाज्पाचीच चूक असा आरडाओर्डा करायचा असेल तर गोष्ट वेगळी ;) शिवाय हे देखील वाचा: LUCKNOW: BJP chief Rajnath Singh on Wednesday said the Gujarat chief minister Narendra Modi never claimed that he has saved 15,000 Gujaratis from Uttarakhand. He was reacting to allegations that Modi made tall claims after his visit to calamity-struck Uttarakhand and tried to take political mileage. "Modi went to Uttarakhand to express his sympathies and it is being said that he evacuated 15,000 Gujaratis from there. I myself talked to him and he said that he never gave any such statement," said Singh while talking to reporters. "How it is being publicised is beyond his understanding," he added. Singh arrived in Lucknow for a two-day visit of the state on Wednesday. It was his first trip after being made national president of the party earlier this year. Twice his visit was cancelled in the past few months. Singh also flagged off the relief material collected by the state BJP unit for the Uttarakhand. The Congress and other parties had attacked the BJP for projecting Modi as Rambo following reports that the Gujarat chief minister helped in evacuating 15,000 Gujaratis who were stuck in Uttarakhand. Singh said he had appealed to party workers that not to politicise Uttarakhand disaster. The UP BJP also announced a financial assistance of Rs 56 lakh to Uttarakhand and Rs five lakh each to the kin of those killed in the helicopter crash during rescue operation in Uttarakhand. Singh said he had appealed to all party MPs and MLAs to donate at least their one month's salary.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

बन्धु.....

पगला गजोधर
गुरुवार, 02/11/2016 - 09:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

माझ्या एका मित्राचे मत आहे की

मृत्युन्जय
Mon, 02/08/2016 - 13:55 नवीन
माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. कुठल्याही गोष्तीचे खापर मोदी आणि भाजपावर फोडण्याची कमाल हातोटी आहे ही. तुमच्या मित्राला खाली पॉईंट्स पुरवा तो अजुन खुष होइलः १. मूळ घटनेतील हिरो ख्रिश्चन असुनही चित्रपटात तो हिंदु दाखवण्यामागे मोदींचे षडयंत्र आहे २. हिंदी चित्रपटस्रूष्टीत इतके यशस्वी मुसलमान कलाकार असुनही हिंदु भाटियाला चित्रपटात घेण्यामागे जातीय आ़णि धर्मांध भाजपाचा हात आहे. ३. चित्रपटातले कटकटे पात्र ख्रिश्चन दाखवुन मूळ घटनेत नायक असलेल्या धर्माला खलनायक ठरवण्याचा संघीय डाव आहे. ४. जगात चित्रपट बनवण्यासाठी इतके विषय असताना मुसलमानांमधल्या युद्धावर चित्रपट बनवण्यामागे केंद्रसरकारचे मुस्लिमविरोधी धोरण कारणीभूत आहे. ५. मुसलमान इराकी सैन्याधिकारी भ्रष्ट दाखवुन मुसलमानांची जाणुनबुजुन अवहेलना करण्याचे आदेश प्रत्यक्ष मोहन भागवतांकडुनच दिले गेले होते. होउन जौद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

हा हा हा.... काय वकील वगेरे

Anand More
Mon, 02/08/2016 - 14:18 नवीन
हा हा हा.... काय वकील वगेरे आहात की काय? मी तर या वादाच्या भानगडीत पडतंच नाही.... मला आलेला अनुभव महत्वाचा..... असे मानून सगळ्यांनाच मान डोलावतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अक्की नेव्हीचा ब्रांडअँम्बँसीटर

पगला गजोधर
Mon, 02/08/2016 - 14:51 नवीन
आत्ताच ऐकलेल्या बातमीनुसार, सध्याच्या केंद्रसरकारने अक्की वर खुश होवून त्याला नेव्ही चा ब्रांड अँम्बँसीटर म्हणून नेमलेल आहे. ख खो मो जा अक्कीच्या या चित्रपटानंतर हा निव्वळ योगायोग समजावा, अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक

मृत्युन्जय
Mon, 02/08/2016 - 15:06 नवीन
अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे. तेंडुलकर इतकेच अद्वितीय असावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

तेंडुलकरचे एयर फोर्स बाबत आहे

मृत्युन्जय
Mon, 02/08/2016 - 15:08 नवीन
तेंडुलकरचे एयर फोर्स बाबत आहे तितकेच एकमेवद्वितीय असावे असे वाचा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तेंडुलकरांनी गाडीचा कर माफ

Anand More
Mon, 02/08/2016 - 15:08 नवीन
तेंडुलकरांनी गाडीचा कर माफ करण्याचा अर्ज करून आपली देशभक्ती सिद्ध केलीच होती. आता मी पण देशभक्त व्हायचे म्हणतोय. पण कोणी गाडीच भेट देत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अक्की रे अक्की काही दिवसांनी

Anand More
Mon, 02/08/2016 - 15:06 नवीन
अक्की रे अक्की काही दिवसांनी तुझे भारतरत्न नक्की:;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

काही दिवसांनी

पगला गजोधर
Mon, 02/08/2016 - 16:58 नवीन
भारतरत्न नाही … तर निदान, गेला बाजार… फिल्म टेले इन्स्टी संस्थेचे अध्यक्षपद नक्की ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

@आनंद मोरे

भंकस बाबा
Sun, 01/31/2016 - 22:50 नवीन
चित्रपटापेक्षा तुमचा लेख आवडला.
  • Log in or register to post comments

मला मी अक्षय कुमारला टक्कर

Anand More
Wed, 02/03/2016 - 15:52 नवीन
मला मी अक्षय कुमारला टक्कर देतोय अशी स्वप्न दिसू लागली. पण पुढे आलेल्या पोटाने घात केला. आणि किंचित कमी उंचीने… आणि विरळ होत चाललेल्या केसांनी…. आणि बायकोचे नाव ट्विंकल नसल्याने… जाऊ द्या … प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

वास्तव आणि चित्रपट.

प्रभाकर पेठकर
Mon, 02/01/2016 - 10:48 नवीन
ही डॉक्यूमेंटरी नसून व्यावसायिक चित्रपट आहे ह्यात वाद नाही. १७०००० लोकं वाहनातून १००० किमी प्रवास करत आहेत असं जाणवत नाही तसेच ३-४ जणांनी एव्हढ्या मोठ्या जनसमुदायाची खाण्यापिण्याची, टॉयलेटची व्यवस्था पाहणे अशक्य कोटीतील आहे हेही चित्रपट पाहताना जाणवत होते. त्यातील गाणी तर अगदी ठिगळासारखी जोडलेली वाटतात. भारतिय सरकारी पातळीवरील 'हालचाल' अजून विस्ताराने दाखविता आली असती पण दोन अडीच तासात सर्व दाखविणे, वास्तव उभे करणे शक्य नाही. शिवाय चित्रपट रटाळ होऊ नये हा ही प्रयत्न ठेवावा लागतो. सतत दु:ख, त्रास आणि अपयश बघुनही प्रेक्षक कंटाळतो आणि चित्रपटाचा मुळ उद्देश काळवंडतो. एवढ्या मोठ्या ऑपरेशनची 'क्षणचित्रे' एकसंघ दाखवूनच प्रसंगाचे गांभिर्य, भयानकता दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. विमानाच्या ५०० फेर्‍या दाखविल्या असत्या तर त्या बघत बसणे प्रेक्षकाला सुसह्य झाले असते का? तो चित्रपट रटाळ झाला असता. पण भारतिय प्रवासी विमानांनी भारतियांना उचलण्यास सुरुवात केली आहे हे दाखविणे महत्त्वाचे होते. कोहलीच्या रुपातून प्रशासन हलल्याचे दर्शविले आहे. पण शेवटच्या प्रसंगात मंत्री, जो आपले सरकार अस्थिर आहे ह्या कारणास्तव, विशेष हालचाल करीत नाही तो शेवटच्या प्रसंगात सर्व 'भारतियांच्या सुटकेचे' श्रेय मात्र स्वतःकडे घेतो आणि कोहली दूर एकटा उभा असतो हा प्रसंग बहुतेकांच्या नजरेतून सुटला आहे. त्या काळातील सरकारी हालचाली अगदी एकांगी दाखविल्याचे वाटंत होते. सरकारी हालचालींचा सर्वांगिण अभ्यास करून दिग्दर्शकाने त्या हालचालींना जरा जास्त महत्व द्यायला हवे होते आणि दृश्यीकरण करायला हवे होते असे वाटले. त्या काळात 'वॉर झोन' मध्ये असल्यामुळे जे भितीचे सावट अनुभवले आहे त्यामुळे प्रत्यक्ष कुवेत मधील परिस्थितीची भयानकता, दहशत, भारतिय दूतावासाचे महत्व आणि हतबलता हे सर्व जास्त प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे अनेक त्रूटी असूनही चित्रपट बरा वाटला. एकदा नक्कीच पाहावा.
  • Log in or register to post comments

सरकारी अनास्था ही दाखवणे

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 02/01/2016 - 11:40 नवीन
सरकारी अनास्था ही दाखवणे गरजेचे होते असे वाटते, ओरिजिनली सरकारी यंत्रणा हालते बरीच जास्त हे ह्या वेळच्या सीरिया एयरलिफ्ट मधे ही दिसले (थैंक्स टु सोशल मीडिया अन एग्रेसिव साइबर सेल) अन जुन्या एयरलिफ्ट मधे सुद्धा होतेच, ह्यावेळी कनेक्ट झाले कारण स्वतः कळत्या वयाचे आहोत अन सगळे एफर्ट पाहतोय. आमचे एक परममित्र आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वैनीसाहेब एयर इंडीया ला केबिन क्रू हेड आहेत, सीरिया एयरलिफ्ट सुरु झाले तेव्हा त्याच दिवशी त्यांना लहानाचे मोठे करणाऱ्या काकांचे निधन झाले होते, ते दुःख बाजुला सारून नवरा अन ६ वर्षांची एकुलती एक छोकरी सोडुन आमच्या वहिनी एयरलिफ्ट ऑपरेशन्स मधे क्रू मॅनेज्मेंट करायला म्हणून ग्राउंड जीरो वर ड्यूटी ला हजर होत्या दुसऱ्यां दिवशी, अश्या कमिटेड सिविल लोकांचा विलक्षण आदर वाटतो आम्हाला :)
  • Log in or register to post comments

.

प्रभाकर पेठकर
Mon, 02/01/2016 - 15:35 नवीन
विनम्र प्रणाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

_/\_

Anand More
Wed, 02/03/2016 - 15:49 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

घ्या! आणि वर तर इथेच एइं ला

यशोधरा
Wed, 02/03/2016 - 20:55 नवीन
घ्या! आणि वर तर इथेच एइं ला शिव्या घातल्यात अगदी बेकार सेवा वगैरे म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

पॉझिटिव्ह-निगेटिव्ह

गॅरी ट्रुमन
Mon, 02/01/2016 - 15:49 नवीन
चित्रपट बघितला. मी स्वतः चित्रपटांच्या बाबतीत फारच अनुत्सुक असल्यामुळे चित्रपट आवडला असे म्हणत नाही आणि आवडला नाही असेही म्हणत नाही. तरीही चित्रपटांमध्ये दाखविलेल्या गोष्टींची सत्यासत्यता कितपत आहे याबाबतीत शंका तर वाटतच आहे. एकतर तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल यांना अगदीच बेपर्वा, परिस्थितीची आणि जबाबदारीची जाणीव नसलेले इत्यादी इत्यादी दाखविले आहे.माझ्या माहितीप्रमाणे इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसातच गुजराल बगदादला जाऊन सद्दाम हुसेनला भेटले होते आणि भारतीयांना कुवेतमधून बाहेर आणण्यासाठी बोलणी केली होती.(या भेटीदरम्यान गुजराल यांनी सद्दामला मिठीही मारली होती.त्यामुळे त्यांच्यावर बरीच टिकाही झाली होती.) तसेच असे संकट अचानक आल्यानंतर त्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करणे भारत सरकारला तितक्या प्रमाणात सोपे नक्कीच गेले नसणार. तसेच धसमुसळेपणाने काहीतरी केले असते तर आपल्याच लोकांचे प्राण धोक्यात आले असते तर तो दोषही सरकारच्याच माथी आला असता. एकूणच सरकार काही करत नाही म्हणून नुसती टिका करण्याचा प्रकार वाटला. त्यावेळी कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांची सरकारकडून अधिक अपेक्षा असेल हे समजू शकतो. पण त्या घटनेनंतर २५ वर्षांनंतर निघालेल्या चित्रपटात आपल्याच सरकारला बावळट दाखविणे हे काही फारसे पटले नाही. यासाठी बेंचमार्कींगसाठी एक उदाहरण द्यायचे झाले तर १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली आणि अयातुल्ला खोमेनी सत्तेवर आला.त्यावेळी अमेरिकन वकिलातीतील कर्मचार्‍यांना दीडेक वर्ष ओलीस ठेवले गेले होते.अमेरिकेसारखी महासत्ताही त्यावेळी ५००+ दिवस फार काही करू शकली नव्हती. मान्य आहे दीड लाख भारतीयांना ओलीस ठेवले गेले नव्हते. पण त्याचवेळी १९९० मध्ये आपली जगातील वठ आणि कुवेतमधली परिस्थिती लक्षात घेता भारत सरकार सद्दामबरोबर बोलणी करून आपल्या लोकांना सेफ पॅसेज उपलब्ध करून घेऊन सोडविण्याव्यतिरिक्त काय करू शकणार होते? एकूणच आपल्याच सरकारला बावळट दाखवायचा प्रकार फारसा रूचला नाही. याबाबतीत चित्रपटाविषयीचे माझे मत निगेटिव्ह. दुसरे म्हणजे इराक्यांनी कुवेतमध्ये केलेले अत्याचार चित्रपटात दाखविले यामुळे सद्दाम हुसेन कित्ती कित्ती चांगला होता असे वाटत असलेल्या भारतीयांना सद्दामने नक्की काय केले हे समजून येईल अशी आशा आहे. याबाबतीत माझे मत पॉझिटिव्ह. एक गोष्ट समजत नाही. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे असे काही एन.आर.आय तिकडे गेले की कायमचेच तिकडचे होऊन जातात आणि भारतीय असे म्हणण्यापेक्षा त्यांना कुवेती (किंवा अन्य कोणी) म्हणणे भूषणावह वाटते. पण असे काही संकट आले की मग मात्र भारताचीच आठवण कशी होते? आयत्यावेळी रथाचे चाक अडकल्यावर कर्णाला धर्म कसा आठवतो?
  • Log in or register to post comments

एक गोष्ट समजत नाही. चित्रपटात

संदीप डांगे
Mon, 02/01/2016 - 17:10 नवीन
एक गोष्ट समजत नाही. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे असे काही एन.आर.आय तिकडे गेले की कायमचेच तिकडचे होऊन जातात आणि भारतीय असे म्हणण्यापेक्षा त्यांना कुवेती (किंवा अन्य कोणी) म्हणणे भूषणावह वाटते. पण असे काही संकट आले की मग मात्र भारताचीच आठवण कशी होते? आयत्यावेळी रथाचे चाक अडकल्यावर कर्णाला धर्म कसा आठवतो? अगदी अगदी, ट्रेलर पाहल्यावर हाच प्रश्न पडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

अशी लोकं

भुमन्यु
Wed, 02/03/2016 - 15:42 नवीन
अशी लोकं सरकारच्या प्रयत्नामुळे सुखरुप बाहेर पडली तरी धन्यवाद अल्लाला - देवाला किंवा गॉडलाच देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा