✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

ग
गंगाधर मुटे यांनी
Wed, 12/31/2014 - 23:56  ·  लेख
लेख
उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?


              शेती हा विषयच मोठा विचित्र आहे. या विषयात जितके खोलवर अध्ययन करत जावे तितके गुंते वाढत जातात. एक गुंता सोडवायला बघावं तर तो गुंता सुटायच्या आतच नवे दहा गुंते निर्माण व्हायला लागतात. शेतीच्या उभारणीत साहित्यविश्वाचे काय योगदान असेल याचा आज थोडासा अंदाज घ्यायला निघालो तर चिंतनाची गाडी पहिल्याच पायरीवर अडखळली. शेतीची दहापट अधोगती घडवून एकपट प्रगती झाल्याचं आज जे ठसठशीतपणे जाणवत आहे त्याला बर्‍यापैकी शेतीशी संबंधीत साहित्यविश्व आणि एकंदरीतच सृजनशीलतेची अपरिपक्व मोघमता कारणीभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि शरद जोशी यांच्याखेरीज शेतीविषयाची नाडच कुणाला कळली नाही. रोगाचे योग्य निदान न करताच केले जाणारे औषधोपचार जसे रोग्याच्या जिवावर उठतात, कधीकधी चुकीच्या उपचारपद्धतीने जसा रोगी दगावतो अगदी तसेच शेतीमध्ये घडले आहे. शेतीच्या अधोगतीचे कारणच न कळल्याने साहित्यिकांनी जरी शुद्ध भावनेने शेतीच्या उन्नतीसाठी साहित्य निर्माण केले असले तरी ते काही तुरळक अपवाद सोडले तर अन्य साहित्यिकांचे शेतीविषयक किंवा शेतीसंबंधित साहित्य हे शेतीसाठी तारक कमी आणि मारकच जास्त ठरले आहे.

              महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत, हे विधान मी अत्यंत जबाबदारी आणि सर्वांचा रोष पत्करण्याची मानसिक तयारी ठेवून करत आहे. शेती हा एकमेव विषय असा झाला आहे की, उठसूठ जो-तो स्वतःच्या पात्रतेचा अथवा आवाक्याचा विचार न करताच शेतीविषयक सल्ला द्यायला उतावीळ असतो. शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो. शेती हा कदाचित एकमेव विषय असेल जेथे सल्ला ऐकणार्‍यांची संख्या नगण्य आणि सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.

              एखाद्या रोगाची साथ आली तर जो-तो उठसूठ आपापले उपचारविषयक ज्ञान पाजळत फिरत नाही. आरोग्य शास्त्रातले तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. कायदेविषयक गुंता असेल तर कायदेविषयक तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. व्यापारामध्ये यशस्वी व्यापार्‍याचा शब्द प्रमाण मानला जातो. मात्र शेतीमध्ये अगदीच उलट आहे. शेतीमध्ये यशस्वी असलेल्या शेतकर्‍याला मूर्ख, अज्ञानी असे गृहीत धरून ज्याने कधीच शेती केली नाही, केली असेल तर निव्वळ शेतीच्या भरवशावर निदान सुपरक्लासवन अधिकार्‍याच्या तोडीचे जीवनमान उंचावून दाखवता आले नाही किंवा ज्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे सुद्धा माहीत नसते तो सुद्धा स्वतःला शेतकीतज्ज्ञ समजून शेतकर्‍याचे प्रबोधन करायला अत्यंत उतावीळ असतो.

              पण खरी मेख त्याही पुढे आहे. विशेषज्ञ डॉक्टरचा पेशा डॉक्टरकीच असतो. नामवंत कायदेतज्ज्ञाचा पेशा कायदेविषयाशीच संबंधीत असतो. शिक्षणतज्ज्ञ हा शिक्षणक्षेत्रातील वाटसरू असतो. किर्तन-पारायण करणारे तर प्रत्यक्ष संत बनून संतत्वाला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तद्वतच या सर्वांच्या उपजीविकेचे साधनसुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधितच असते. त्याच प्रमाणे या विषयातील साहित्यनिर्मिती करणारे, मार्गदर्शन करणारे अथवा उदबोधन करणारे त्या-त्या विषयातीलच कर्मयोगी असतात. ट्रकचा वाहनचालक आरोग्यशास्त्राशी संबंधीत पुस्तक लिहीत नाही. ढोलकीवादक कायदेविषयक पुस्तक लिहीत नाही, एखादी नृत्यांगना विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवत नाही किंवा मासोळ्या विकून पोट भरणारा किर्तन करत नाही. शेती वगळता अन्य सर्व विषयामध्ये "आधी स्वतः करून दाखवले मग सांगितले" हेच सूत्र असताना शेतीत मात्र अगदी विपरित घडत असते.

              विशेषज्ञ मास्तर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती खडू घेऊन फळ्यावर लिहून दाखवतो. विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते. शेती हा विषयच मोठा विचित्र आहे, इथे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी सोडून अन्य व्यवसायावर किंवा आयत्या शासकीय अनुदानावर उपजीविका करणारेच शेतकी तज्ज्ञ होतात. शेतीवर ज्याची उपजीविका अवलंबून नाही तो शेती साहित्याची निर्मिती करतो. ज्याला शेती करून स्वतःचे पोट जगवण्यात कधीच यश आले नाही तो "शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. शेतकी तज्ज्ञ किंवा शेतकीविषयावर लिहिणारा साहित्यिक आपल्या हातात नांगर धरत नाही, विळा हातात घेऊन खुरपणी करत नाही, पाठीवर फवारा घेऊन फ़वारणी करत नाही. विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. विशेषज्ञ उद्योजक उद्योग करून जगत असतो त्याच न्यायाने स्वतः गहू, धान, बाजरी, दाळी, कापूस, सोयाबीन, कांदा यापैकी एखाद्या पिकाची शेती करून, त्याच शेतीवर आपला उदरनिर्वाह करून आणि इतर सर्व शेतकर्‍यांपेक्षा अधिक मिळकत मिळवून दाखवणारा शेतकरी तज्ज्ञ या संपूर्ण भारत देशात एकही सापडत नाही. झाडून सारेच्या सारे शेतकीतज्ज्ञ सरकारी पगारावर जगत असतात. त्यामुळे शेतकी तज्ज्ञ आणि शेतीसंबंधित साहित्यिक हे उंटावरचे शहाणेच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. शेतीचे विशेष आणि वास्तविक ज्ञान असल्याशिवाय उच्च प्रतीची आणि वास्तवाचे भान असणारी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. हे आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी सर्वांना मान्य करावेच लागेल आणि तो दिवस उजाडेपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची हातावर हात ठेऊन प्रतिक्षा करत बसावे लागेल.

              शेतीला केंद्रस्थानी ठेऊन विचार केला तर साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही. शेतीव्यवसायाचा सर्वांगीण विचार करणारे साहित्यच लिहिले गेलेले नाही. समजा एखाद्या नवतरुणाला नव्याने शेती करायची असेल तर त्याला सर्वंकश मार्गदर्शन करू शकेल किंवा शेती करताना त्याला साहित्याचा आधार घेऊन दमदारपणे वाटचाल करता येईल असे साहित्य उपलब्ध नाही. ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. शेती करायची असेल तर मशागत कशी करावी, कष्ट कसे करावे, आधीच गळत असलेला घाम आणखी कसा गाळावा, बियाणे कोणते वापरावे, फ़वारणी कोणती करावी एवढेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज काढून आणखी कर्जबाजारी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करणारी, दिशानिर्देश देणारी पुस्तके रद्दीच्या भावात घाऊकपणे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र बँकेकडून कर्ज काढून बियाणे घेऊन ते मातीत पेरल्यानंतर, खते जमिनीत ओतल्यानंतर, कीटकनाशके फवारून हवेत गमावल्यानंतर जर अतिपावसाने किंवा कमी पावसाने शेतातील उभे पीक नेस्तनाबूत झाले आणि बँकेतून कर्जरुपाने आणलेले पैसे जर मातीत गेले, पाण्यात गेले किंवा हवेत गेले तर मग बँकेचे कर्ज फेडायला पैसे कुठून आणायचे याचे उत्तर देणारे एकही पुस्तक शेतकी तज्ज्ञांना आणि सरस्वतीच्या लेकरांना आजतागायत लिहिता आलेले नाही. शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, कोणत्या पिकाचा उपादनखर्च किती येतो, कोणते पीक घेतले तर खर्च वजा जाता कीती रक्कम शिल्लक असू शकते याचा शास्त्रशुद्ध ताळेबंद उपलब्ध करून देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही.

              शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय केला आणि व्यवसायावर जर कोणत्या कारणाने विपत्ती आली आणि मुद्दलसुद्धा नष्ट झाले तर विमाकंपनी कडून भरपाई मागावी, कोणता, कुठे आणि कसा फ़ॉर्म भरावा याची शिकवण देणारी पुस्तके आहेत. शेतीसाठी मात्र अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. जर शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय कुठल्याही कारणाने पूर्णपणे तोट्यात गेला, दिवाळं निघालं तर त्याला दिवाळखोरी/व्यवसाय आजारी किंवा नादारी घोषित करायचा कायदेशीर मार्ग सांगणारी आणि त्या बिगरशेती व्यावसायिकाला संरक्षण देणारी कायद्याची चिक्कार पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र सर्वांना समान न्यायाचं तत्त्व सांगणारी कायद्याची पुस्तके सुद्धा शेतकर्‍याच्या बाजूने उभी राहायला तयार नाही.

              कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काहीही संबंध उरलेला नाही. साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अत्यंत लाजिरवाणेच आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. एक खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडो पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे ’होय’ अशीच येत असतील व ”खपणार तेच विकणार" हाच सरस्वतीच्या उपासकांचा अंतरस्थ हेतू असेल तर "साहित्य म्हणजे समाजाचा आरसा" ही उक्ती प्रत्यक्षात उतरेलच कशी? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्र आणि सरस्वतीची लेकरं यांची पात्रता आणि प्रतिभेची उंची अजूनही अत्यंत खुजी आहे, हे स्पष्ट व्हायला पुरेसे आहे.

              शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे शरद जोशींचे लेखन वगळता काहीही अन्य लेखन साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे अशा कांगावखोर आणि शास्त्रशुद्ध अर्थवादाचा लवलेश नसलेल्या लेखनापलीकडे साहित्याच्या महामेरूंना काही लिहिताच आलेले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

              शेतीला भाकड शेतकीतज्ज्ञांचा आणि शेती साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर विषाच्या बाटलीपर्यंत किंवा गळफ़ासाच्या दोरापर्यंत शेतकर्‍यांना पोहचवून देऊ शकते. शेतकर्‍यांच्या मुक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन शेतकर्‍यांना मुक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही शेतकर्‍यांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना निसर्गशेती करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना जोडधंदे करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना मार्केटिंग कशी करावी हे शिकवू पाहतो. त्यामुळे शेतकरी गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने शेतकर्‍यांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांची शेती आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्‍यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्‍यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.

              आता काही मिनिटातच वर्षे २०१४ मावळणार आहे आणि नवे वर्ष येणार आहे. हे नववर्षा! जुने जाऊदे मरणालागुनी....... बळीराजासाठी काहीतरी नवीन घेऊन येरे बाबा!!

                                                                                                                - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
43215 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

धन्यवाद

गंगाधर मुटे
Sat, 01/03/2015 - 22:39 नवीन
@कंजूसराव, धन्यवाद. @बोका-ए-आझम, संपूर्ण देशातील शेतीची वाट का लागली, याचे कारण सांगाल काय? @प्रसादराव, रडगाणी, मागणे या शब्दांचा मराठी शब्दकोषात अर्थ बघून घ्यावा. नंतर लेख वाचा. कदाचित लेखात काय लिहिले आहे, ते थोडेफार कळू शकेल. पूर्ण लेख समजण्याची अपेक्षा मी तुमच्याकडून करतच नाही. @सुबोध खरे साहेब, "पुरुष स्त्रीरोग तज्ञ स्त्रियांना" हे उदाहरण माझ्या लेखाला लागू पडते काय? लेखात "जावे त्याच्या वंशा" असे म्हटले आहे काय? कायच्या कायबी वांगीत घोडे घालता राव! प्रतिसाद लेखाला सुसंगत तरी असायला हवा की नाही? @कोंबडाप्रेमी, तुम्हाला स्वतःला काही येत का? की नुसतेच अनुमोदन देत बसणार? @काळा पहाड, हे सर्व तुमच्या आवाक्याबाहेर आहे. उखळात बोट घालून ठेचून घेण्यात काय अर्थ आहे? @बाबा पाटील, धन्यवाद. @यशोधरा, तुम्हाला शोधून बघायला काय अडचण आहे. सारं काही आयतं खाण्याची सवय चांगली नाही. @इस्पीकचा एक्का, व्यवस्थापन कशाला म्हणतात ते शेतकर्‍यांनाही चांगले कळते. व्यवस्थापनाचे ज्ञान त्याला उपजतच असते. कथा, कादंबरी, कविता वगैरे साहित्याचा समाजाच्या जडघडणीवर आणि समाजाच्या मानसिकतेवर परिणाम होतो, हे प्रायमरी शाळेचे शिक्षण सुद्धा मी तुम्हाला द्यावे काय? इतके दिवस काय शिकलात तुम्ही? @बोका-ए-आझम, साधनांची आणि उपकरणांची निर्मिती करण्याचे कसब शेतकर्‍यांमध्ये जन्मजातच असते. हजारो वर्षापासून शेतीउपकरणांची तोच संशोधन आणि निर्मिती करत आला. त्यात विशेश असे काहीही नाही. @नाद खुळा, इतरांना सांगण्यापूर्वी तीच बातमी तुम्हीच हजारदा वाचा. पाचपंचेविस वेळा वाचल्याने तुम्हाला कळू शकत नाही. बिजोत्पादन, अनुदान वगैरेचा अर्थ कळतो काय तुम्हाला? बिजोत्पादन किती घेतले जाऊ शकते? त्याला भाव किती मिळतो, अनुदान किती मिळते याची कृषिखात्याकडून माहिती करून घ्या. उचलली जीभ लावली टाळ्याला, असे करू नका! - गंगाधर मुटे

उंटावरील शहाण्यांनो उठा रे या

जेपी
Sun, 01/04/2015 - 07:59 नवीन
उंटावरील शहाण्यांनो उठा रे या 'धाग्यावरुन', ह्यांच 'हे' पाहुन घेतील. *wink*
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

शोधून फारसं ठोस काही सापडलं

यशोधरा
Sun, 01/04/2015 - 15:26 नवीन
शोधून फारसं ठोस काही सापडलं नाही म्हणून तर विचारलं. नसेल काही तर राहू द्या.
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

इतके दिवस काय शिकलात तुम्ही?

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/04/2015 - 15:31 नवीन
इतके दिवस काय शिकलात तुम्ही? सभ्य भाषेत संवाद करणार्‍यांशी सभ्य भाषेत संवाद करावा आणि जमेल तेवढा इतर लोकांशीही सभ्य भाषेतच संवाद करावा हे शिकलो. भाषेचा बाज ज्याला उद्देशून ती भाषा वापरली आहे त्यापेक्षा जास्त ज्याने ती वापरली आहे त्याचे गुणविशेष दाखवते, असंही आम्हाला शिकवलं गेलंय.
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

उंटांचे भाव काय आहेत हो हल्ली

काळा पहाड
Sat, 01/03/2015 - 23:28 नवीन
उंटांचे भाव काय आहेत हो हल्ली?

नक्की कोण ?

गब्रिएल
Sun, 01/04/2015 - 13:22 नवीन
उंटावर्नं शेळ्या हाक्ताना हा माबोवर्चा अभय आर्वीकर यांचा लेख दिस्ला. तो इतं सोताच्या नावानं टाकताना तुमी त्येंची पर्मीसन घ्येतल्याचं लिवलेलं दिस्लं नाय. का ब्र ? :)

नाय म्हंजे तुमी नक्की कोन ?

गब्रिएल
Sun, 01/04/2015 - 13:25 नवीन
नाय म्हंजे तुमी नक्की कोन ? मुटे की आर्वीकर ? की आन्की कोनी ? नाय म्हंजे परश्न पडतोच की, की कोनावर इश्वास ठॅवायचा ?
↩ प्रतिसाद: गब्रिएल

उंटावर्नं शेळ्या हाक्ताना हा

विशाल कुलकर्णी
Sun, 01/04/2015 - 15:11 नवीन
उंटावर्नं शेळ्या हाक्ताना हा माबोवर्चा अभय आर्वीकर यांचा लेख दिस्ला. तो इतं सोताच्या नावानं टाकताना तुमी त्येंची पर्मीसन घ्येतल्याचं लिवलेलं दिस्लं नाय. का ब्र ?>>>> अभय आर्वीकर हां मुटेदादांचाच आय.डी.आहे. 'अभय'हां त्यांचा गझल लेखनासाठी घेतलेला तखल्लूस असून 'आर्वी'चे रहिवासी म्हणून आर्वीकर. तेव्हा संदेह नसावा.
↩ प्रतिसाद: गब्रिएल

हाफशेंच्युरी निमीत्त श्री

जेपी
Sun, 01/04/2015 - 14:06 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.गंगाधर मुटे आणी गब्रिएल यांचा सत्कार एक-एक उंट देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

(No subject)

रुस्तम
Sun, 01/04/2015 - 15:34 नवीन
=))
↩ प्रतिसाद: जेपी

या उंटाबरोबर..

नाखु
Mon, 01/05/2015 - 09:25 नवीन
एक शहाणा सुद्धा देणार असाल तरच स्वीकार केला जाईल. स्वभय मागणीकर.
↩ प्रतिसाद: रुस्तम

कैच्याकै... उद्या शेळ्याही

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/05/2015 - 16:02 नवीन
कैच्याकै... उद्या शेळ्याही द्या म्हणाल ! : निर्भय देणगीकर
↩ प्रतिसाद: नाखु

आम्ही एकदम काही मागत नाही..

नाखु
Mon, 01/05/2015 - 16:13 नवीन
सगळं कस हप्त्या-हप्त्याने!! शहाणा उंट (दोन्ही वेगवेगळे शब्द) पाठवा.. शेळ्यांचं नंतर बघू ! सबब सांगणीकर
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कमल नमनकर

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/05/2015 - 16:20 नवीन
:) कमल नमनकर
↩ प्रतिसाद: नाखु

धन्यवाद

गंगाधर मुटे
Sun, 01/04/2015 - 14:59 नवीन
@हुप्प्या, ही आदळाअपट नाहीये. प्रतिसादात तुम्ही दिलेली उदाहरणेही माझ्या लेखाशी सुसंगत नाहीत. शेतकरी आणि बिगरशेतकरी अशा वादाचा लेखात अजिबात अंतर्भाव नाही. आणि शुभेच्छा द्यायच्याच असतील तर नव्या वर्षातील संभाव्य शेतकरी आत्महत्त्यांना द्या! आडवळणाने का लिहिता? रोखठोक लिहा! ताकाला जायचं आणि उगीच गाडगं लपवल्याने माझ्या सारख्याच्या नजरेतून तुमचं गाडगं लपू शकत नाही आहे. @बाळ सप्रे, तुमचं जग आणि अवलोकन क्षेत्र सिमित असेल तर मी इथे बसून तुमच्या अवलोकनाच्या कक्षा कसा काय रुंदावून देवू शकतो. तुम्ही जेवढे येते तेवढे लिहित राहा. वैचारिक स्तर वाढवणे हे सर्वांच्या आवाक्यात नसतेच. @माईसाहेब कुरसूंदीकर, स्वतःच्या नावासमोर स्वतःच "साहेब" लावायचं आणि इतरांना "अरे-तुरे" मध्ये संबोधायचे. हे बालपणी झालेल्या सुसंस्काराचं प्रतिक आहे. त्याला तुम्हीसुद्धा जबाबदार नाहीत. बालपणी कुणी तरी आपल्यावर संस्कार करत असतो. हा त्या कुणीतरी चा दोष आहे. तुमचा नाहीच. @अत्रन्गि पाउस, :) @जेपी, प्रतिवाद करण्यापूर्वी तुम्हाला लेख तरी कळतो का याचा अदमास घ्या. मी आता जशास तसे च्या मुडमध्ये आहे. उगीच आपल्याच हाताने आपला फजितवाडा करून घेऊ नका.

सूचना

संपादक मंडळ
Sun, 01/04/2015 - 15:30 नवीन
चर्चेला विनाकारण वैयक्तिक दोषारोप आणि अपमानास्पद शब्दप्रयोगांचे अप्रस्तुत वळण लागत आहे. अशा गंभीर धाग्यावर गांभीर्याने चर्चा अपेक्षित आहे अन्यथा धागा वाचनमात्र करावा लागेल

संपादक मंडळ,

गंगाधर मुटे
Sun, 01/04/2015 - 15:40 नवीन
संपादक मंडळ, कृपया एवढा एक धागा प्रयोग म्हणून घ्यावा. डिलिट नंतर केव्हाही करता येईलच. माझ्यावर इतरांनी वैयक्तिक दोषारोप आणि अपमानास्पद शब्दप्रयोग केले तरी माझा आक्षेप असणार नाही. मग मी उत्तरादाखल जे लिहित्याव्रर मूळ प्रतिसादकांचे आक्षेप असण्याचे कारण नाही. कदाचित या निमित्ताने प्रतिसाद लिहिताना वैयक्तिक दोषारोप आणि अपमानास्पद शब्दप्रयोग करायचे नसतात. एवढे सर्वांना भान येईल. कृपया, प्लीज!

अजून उर्वरित प्रतिसादकांना

गंगाधर मुटे
Sun, 01/04/2015 - 15:42 नवीन
अजून उर्वरित प्रतिसादकांना उत्तरे द्यायची बाकी आहेत. ती वाचल्याशिवाय तरी धागा गुंडाळू नका, ही विनंती

काही खुलासे

गंगाधर मुटे
Sun, 01/04/2015 - 19:14 नवीन
काही खुलासे हा लेख आंतरजालावर आणि व्हाटसपवर १६ ठिकाणी प्रकाशित केला आहे. गंमत अशी आहे की, माझा मुद्दा ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना कळलाच नाही, हे स्पष्टपणे जाणवत आहे. त्याची २ कारणे असू शकतात. १) मला मुद्दा नीट मांडता आलेला नाही. मला जे म्हणायचे आहे ते शब्दात नेमकेपणाने उतरलेले नाही, लेखनशैलीत माझी लेखनी कमी पडली. आणि/किंवा २) वाचकांना हा दृष्टीकोन नवा आहे. त्यांनी अशा तर्‍हेने कधी विचार केलेलाच नव्हता. त्यामुळे समजायला अवघड चाललेय. अनेकदा जे आपण कधीच ऐकलं नाही, शाळेतल्या पुस्तकांनी शिकवलं नाही, कोणत्याही ग्रंथात आलेलं नाही, आपल्या गुरुजनांनाही त्याचा गंध नव्हता; असंही बरंच काही असू शकते आणि ते समजून घ्यायला बरंच काही लागते. वाचकांची कसोटी आणि अभ्यास लागू शकते. पण ते माझ्यासारख्या सामान्य माणसाने लिहिले असल्याने मेहनत करून समजून घ्यायची कल्पना वाचकांना शिवली नाही. लेखात उतरला किंवा नाही ते मी सांगू शकत नाही पण माझ्या डोक्यात असलेला मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे आणि तो बिनतोड आहे. बघुयात. नाहीतर कधीतरी हाच लेख नव्याने लिहावा लागेल. :) ------------------------------------------------------------ १) लेख साहित्यिक, शेतीविषयक माहितीपर लेखन करणारे, श्रीमुखाने मार्गदर्शन करणारे, शेतीविषयक सल्ला देणारे शिबीरे आयोजित करणारे वगैरे या सर्वाना उद्देशून आहे, म्हणून मी सरस्वतीची लेकरं असा केंद्रस्थानी शब्द वापरला आहे. २) यात कुठेही शहरी - बिगरशहरी, शेतकरी-बिगरशेतकरी असा मुद्दा नाही. लेखात जागोजागी मी विशेषज्ञ असा शब्द आवर्जून वापरला आहे. त्यामुळे शेतीविषयावर सर्वसामान्यपणे आपापले मतप्रदर्शन करणारी सामान्य माणसे या लेखाच्या कक्षेत येतच नाही. ३) शहरी हस्तिदंती मनो-यातून खाली उतरा अन एसी केबिनमधे बसून आम्हाला सल्ले देऊ नका असा मुद्दा या लेखाचा नाही आहे. ४) अनुभवहीन ताशेरे मारणार्‍या सर्वसामान्य माणसांची सुद्धा या लेखाने दारे बंद केलेली नाहीत.

अवांतर

आतिवास
Mon, 01/05/2015 - 14:16 नवीन
हा लेख आंतरजालावर आणि व्हाटसपवर १६ ठिकाणी प्रकाशित केला आहे.
इतकी ठिकाणं आहेत - असतात - हेही मला माहिती नव्हतं!
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

उंटावरच्या शहाण्यांचे पहिले

सुबोध खरे
Mon, 01/05/2015 - 09:47 नवीन
उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा. हि सभ्य भाषा नव्हे "लेखात "जावे त्याच्या वंशा" असे म्हटले आहे काय? कायच्या कायबी वांगीत घोडे घालता राव! प्रतिसाद लेखाला सुसंगत तरी असायला हवा की नाही?" विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. आपले म्हणणे काय आहे डॉक्टर स्वतावर इलाज करीत असतो काय किंवा वकील स्वतःचेच खटले लढवीत असतो काय ? तद्वत प्रत्येक शेतकी तज्ञाने स्वतः शेती केली पाहिजे असा आपला आग्रह दिसतो. मागे आपल्या लेखाला प्रतिसाद देताना मी एक विधान केले होते कि लष्कराच्या विचार मंचात अनेक सिव्हिलियन्स आहेत ज्यांनी कधी बंदूक हाती घेतली नव्हती कि रणांगणावर गेले नव्हते तरीही त्यांची अत्यंत मौलिक अशी भर भारताच्या लष्करी डावपेचात होत असतेय़ आधारानेच मी म्हत्ले होते . लष्करात नागरी समाजापेक्षा जास्त लोकशाही असते असा माझा अनुभव आहे. लष्करात अगदी कनिष्ठ अधिकार्याचे म्हणणे सुद्धा नीट ऐकून घेतात कारण त्यातून एखादा महत्त्वाचा मुद्दा लक्षात येऊ शकतो पण प्रत्यक्ष निर्णय घेतल्यावर त्याची अंमल बजावणी करणे हे प्रत्येकाला सक्तीचे असते परंतु आपण सवंग टीकेचा आधार घेत आहात. असो यावर मला पुढे काहीच म्हणायचे नाही

गंडलेले विचार

अन्या दातार
Mon, 01/05/2015 - 10:31 नवीन
त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्‍यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्‍यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे.
लेखाच्या सुरुवातीत व शेवटात प्रचंड गोंधळ झाल्याचे आपणास वाटत नाही का? कारण एकीकडे तुम्ही म्हणता की शेती-निगडीत साहित्य निर्माणच झाले नाही. लेखाचा शेवट तुम्ही लेखण्या आवरा व शेतकर्‍याच्या छातीवरुन उठा असा करता. याचाच अर्थ शेतकरी या शेतीआधारीत साहित्यनिर्मितीत दबून गेला आहे. हे परस्परविसंगत नाही वाटत? मुद्दा क्र. २ - जर शेतकरी स्वतःचे स्वतः बघायला आणि स्वतःचा मार्ग शोधायला समर्थ आहे, तर अडवलंय कुणी त्याला? इतरांचे (इन्क्लुडींग शेतीतज्ञ्य) सल्ले मान्य नसतील तर वापरु नयेत. सक्ती कुणी केली आहे काय? मग उगाच बोंबा कशाला ठोकता?

ध चा मा

जेपी
Mon, 01/05/2015 - 14:09 नवीन
संपुर्ण लेखातील एकाही शब्दात बदल न करता,फक्त शिर्षक बदलल्यास हा लेख एक छान विडंबन होईल. नवे शिर्षक-उंटावरचे शहाणे की संघटनेची लेकरे ? *wink*

चला म्हणजे शेतकर्‍यांच्या

बॅटमॅन
Mon, 01/05/2015 - 14:18 नवीन
चला म्हणजे शेतकर्‍यांच्या मसीहालाच शेतकरी मेले तरी फरक पडत नाही तर. शेतकरी मेले तरी चालतील पण उंटावरचे शहाणे गप्प झाले पाहिजेत ही हिडीस आणि हिणकस विचारसरणी बाळगणारे स्वयंघोषित मसीहा पाहून धन्य झालो. स्वतःची पातळी अशी एकदम प्रकटपणे दाखवल्याबद्दल कचकून आभार.

निषेध

आदिजोशी
Mon, 01/05/2015 - 15:02 नवीन
ही & ही असा मिपामान्य शब्द न वापरता 'हिडीस आणि हिणकस' असे पूर्ण लिहिल्या बद्दल श्रीयुत बॅटमॅन ह्यांची आर्खम मधे त्वरीत रवानगी करावी अशी सूचना करण्यात येत आहे. तिथे जोकर, बेन आणि रिडलर ह्यांच्या सोबत फार्मविल खेळायची शिक्षा देण्यात येत आहे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऊप्स...येकडाव मापी असावी

बॅटमॅन
Mon, 01/05/2015 - 15:05 नवीन
ऊप्स...येकडाव मापी असावी द्येवा...पायजे तर कमिष्नर गॉर्डनभौंना सांगून शेटलमेंट करूया की. येताव का राच्च्याला वेन वाड्यावर ;)
↩ प्रतिसाद: आदिजोशी

माफी मिळेल..

नाखु
Mon, 01/05/2015 - 15:22 नवीन
फक्त चार उंट आणि त्यावर बसलेले गाढव असे चित्र काढून एक समर्पक निबंध लिहून आणलास तर == विषय : मीच एक कैवारी तुम्ही या रैवारी !! :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय यमक आहे _/\_

बॅटमॅन
Mon, 01/05/2015 - 16:35 नवीन
काय यमक आहे _/\_
↩ प्रतिसाद: नाखु

@गं.मु. - हे अभय आर्वीकर कोण?

प्रसाद१९७१
Mon, 01/05/2015 - 14:30 नवीन
@गं.मु. - हे अभय आर्वीकर कोण? ते तुमचे लेख दुसरीकडे छापत आहेत आणि उत्तरे देत आहेत. \ का तुम्ही त्यांचे लेख आपले म्हणुन छापताय? फसवणुकीला इथपासुनच सुरुवात. कसे होयचे बिचार्‍या शेतकर्‍यांचे?

जेवढं शेतीशी संबंधीत अर्थकारण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/05/2015 - 14:40 नवीन
जेवढं शेतीशी संबंधीत अर्थकारण आणि राजकारण मला कळतं त्याप्रमाणे खालील गोष्टी जरुर करता येतीलः १. जिल्हा / तालुकानिहाय शेतकरी संघटीत झाला पाहिजे. आपला माल त्यांनी मार्केट यार्डाऐवजी थेट शहरात विकायला आणावा. मधल्या दलालांना "बाबाजी का ठुल्लु द्यावा. २. मधला दलाल ह्या वर्गाचे उच्चाटन झाले तर ते शेतकरी आणि ग्राहक दोघांना परवडेल. ३. व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर नक्की फायद्यात येउ शकेल. फायनान्शिअल मॅनेजमेंट तेवढी स्ट्राँग पाहिजे. ४. शेतकरी साहित्य वगैरे च्या नावानी बोंबलण्यापेक्षा शेतकर्‍याला सहज समजेल रुचेल अश्या भाषेत शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानं रुपांतरीत करा की. उगाचं शेतकर्‍याच्या बायकापोरांचे आसु, आत्महत्त्या वगैरेचं विषय कश्याला हायलाईट करायला पाहिजेत? ५. शेतीला मिळणारं अनुदान पहिलं बंद करा (नैसर्गिक आपत्तीवालं सोडुन कारण हे शेतकर्‍याच्या किंवा शासनाच्या हातात नाही). ढुंगणाला चटके लागल्याशिवाय शेतकरी काय किंवा पगारदार काय झटुन कामाला लागतचं नाहीत. कश्याला पाहिजे अनुदान? पगारदाराची नोकरी अपघातानी म्हणा किंवा आर्थिक मंदीनी म्हणा गेली तर सरकार अनुदान देतं का त्याला? घराचे इ.एम.आय. वगैरे माफ करतं काय सरकार? हा जीवनावश्यक सेवा असं घोषीत करुन अतिशय सवलतीच्या दरात बी, बियाणं, खतं वगैरे पुरवण्यास आमची ना नाही. ६. आम्हीचं भरलेल्या करामधुन शेतकर्‍याला अनुदान आणि कर्जमाफी मिळत असते, त्यामुळे उगीचं आमच्याचं नावानी बोंब ठोकायचे बंद करा. धन्यवाद.

मंगळवेढ्यातील ध्येयवेडे !

मदनबाण
Mon, 01/05/2015 - 14:57 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||

प्रश्न उत्तरे

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 15:31 नवीन
विवेक पटाईत यांनी बरेच चांगले मुद्दे संयमीपणे हाताळले आहेत आणि सरकारच्या धोरणा बद्दल लिहिले आहे. मुटेंपेक्षा त्यांचा प्रतिसाद मुद्देसूद आहे आणि त्यावर प्रतिवाद करायचे बर्‍याच जणांनी टाळले आहे . कुठेतरी मुटेंना कॉर्नर केल्यासारखे वाटते . यांचा चेसुगु होणार

चेसुगु म्हंजे काय हो? चेतन

असंका
Mon, 01/05/2015 - 15:45 नवीन
चेसुगु म्हंजे काय हो? चेतन सुभाष काय?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

विवेक पटाईत यांनी बरेच चांगले

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/05/2015 - 16:13 नवीन
विवेक पटाईत यांनी बरेच चांगले मुद्दे संयमीपणे हाताळले आहेत तुम्हीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे असे तुम्हाला वाटत नाही काय ?!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धागकर्ता

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 16:32 नवीन
मुटेंपेक्षा त्यांचा प्रतिसाद मुद्देसूद आहे आणि त्यावर प्रतिवाद करायचे बर्‍याच जणांनी टाळले आहे .
धागाकर्त्यापेक्षा मुद्दा महत्वाचा ! मुटेंना मुद्दा मांडता येत नाही . .पण पटाईत यांनी तो चांगल्या पद्धातीने मांडला आहे. त्यावर चर्चा झाली तर उत्तमच!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पटाईतांच्या मुद्यांना उत्तर

प्रसाद१९७१
Mon, 01/05/2015 - 16:37 नवीन
पटाईतांच्या मुद्यांना उत्तर दिले आहे. @कपिलमुनी - तुम्ही आणी आपण सर्वांनीच घर्-घर ह्या धाग्यावर लिहीले आहे. कोणी सरकार कडुन घरे स्वस्तात किंवा फुकट मिळावीत अशी अपेक्षा केली आहे का? कोणी असे लिहीले आहे का की आमचा ईएमआई परवडत नाही, शेतकर्‍यांनी फुकट रेशन द्यावे महीन्याचे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

१. आपल्या सरकारचे धोरण शेतीचे

प्रसाद१९७१
Mon, 01/05/2015 - 16:21 नवीन
१. आपल्या सरकारचे धोरण शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे असे आहे. उचित भाव देण्याचे नाही. जास्त उत्पन्न झाले तरी ही शेतकऱ्याला नुकसानच होते.
सरकार नी भाव ( उचित किंवा अन्उचित ) द्यावा ही अपेक्षाच का? सरकार कुठल्या दुसर्‍या उत्पादनाला उचित भाव मिळवुन देते?
२. ग्राहकाला स्वस्तात शेत माल उपलब्ध करून देणे (१६ रुपये लागतच गहू २ रुपयात विकणे).
ह्या गोष्टीशी शेतकर्‍यांचा संबंध काय? शेतकर्‍यांना मार्केटरेट प्रमाणेच पैसे मिळतात. आणि शेतकरी ग्राहक पण असल्यामुळे त्याला नाही का २ रुपयानी गहू मिळत?
३. गेल्या २० वर्षांत महागाई जर १००% वाढली आहे, तर शेतमाल केवळ ५०%. उदा: कांदा १९९८ मध्ये ही seasan च्या हिशोबाने ५-५० रु किलो होता आणि आज ही महागाई ५ पटीने वाढली तरी ही १०-५० रु हाच आहे. साखर १३.५० रु. आज ४० रुपये, या काळात महागाई १० पटीने तरी वाढली आहे.
माझ्या माहीतीत इलेक्ट्रोनिक वस्तुंच्या कीमती तर गेल्या १५ वर्षात कमी झाल्या आहेत. पाहीजे तर टीव्हीचे उदा घेउन बघा. मारुती अल्टो ची किंम्मत पण गेल्या १० वर्षात फक्त २०% वाढली आहे ( जास्तीत जास्त ). दहा पटीनी महागाई वाढली वगैरे असले काहीतरी ठोकुन देवु नका.
४. महागाईचा हिशोब केला तर खाद्य तेल कमीत कमी २०० रु किलो विकल्या गेले पाहिजे. पण सरकारी धोरण भारतीयांच्या सेहत साठी हानिकारक पामोलीन विदेशातून आणून स्वस्तात विकणे आहे. मग सोयाबीन उत्पादकाला उचित किमत कशी मिळणार. देशात तेल उत्पादन कसे वाढणार, कुणी या साठी निर्णय घेतला तर दुसरा ग्राहकांच्या हिताच्या नावाने आणि कमिशन साठी निर्णय बदलतो आणि उत्पादक आणि तेल मिल वाल्यांवर ही .... पाळी येते. हेच मी 'बळी' या कथेत सांगण्याचा प्रयत्न केला होता.
वर उल्लेख केलेल्या गोष्टींप्रमाणे तेल २० टक्क्यानी पण वाढायला नको आहे.
देशात तेल उत्पादन कसे वाढणार
तेलाचे उत्पादन वाढवणे हेच एक महान कार्य आहे का? जी गोष्ट बाहेरच्या देशातुन स्वस्तात मिळते आहे त्यासाठी भारतीय रीसोर्सेस कशाला खर्च करायचे? ५. बाकी माई साहेब 'सरकारच्या मते महागाई म्हणजे खाद्य पदार्थ आणि भाजी पाल्यांची महागाई' आणि त्यांची किमत कमी ठेवणे एवढेच मग शेतकरी मेला तरी चालेल.उदा. २००४ मध्ये गव्हाला ५६० एम एस पी होती महागाईचा हिशोब करा आणि शेतीच्या खर्चाचा कमीत कमी २००० तरी मिळाले पाहिजे. पंजाब हरियानात शेतकरी ३ वेळा उत्पादन घेतो. शिवाय घरात कोणी न कोणी केंद्र किंवा राज्य सरकारच्या नौकरीत असतोच. संघटीत असल्या मुळे वीज इत्यादीचे बिले कधीच देत नाही त्या मुळे तो जिवंत आहे. तो ही केवळ गहू आणि तांदूळच लावतो. मधल्या काळात भाज्या (दिल्लीचे मार्केट जवळ असल्या मुळे). स्वत:च्या डोक्यावर महागाईची बदनामी घेऊन केबिनेट मध्ये शरद पवार शेतकर्यांचे हित बघण्याचा प्रयत्न करत होते, आता ते ही नाही.
६. महाराष्ट्रातील ८०% टक्के जमीन कोरडेवाहू आहे, त्यांना बँकांचे कर्ज मिळत नाही. माफीचा प्रश्नच येत नाही.
काय सांगता? कर्ज मिळत नाही?
७. आधीच कमी एम एस पी आणि उत्पादन जास्त झाल्यास ती ही मिळत नाही. सोयाबीन ची एम एस पी किती आहे आणि मंडी मध्ये शेतकर्यांना काय भाव मिळत आहे, सांगू शकाल का? . कापसाचे भाव ही कमी ठेवण्या साठीच सरकारचे नियोजन असते. त्या मुळे या वर्षी रिकॉर्ड उत्पादन झाले पण शेतकर्याच्या पदरी काय पडणार.
शेतकर्‍यांनी शेती सोडुन द्यावी.
७. सबसिडी रासायनिक खाद कारखान्यांना दिली जाते, त्यात हजारो कोटींचा घोटाळा होतो. पकडणे ही अशक्य आहे. शेतकर्यांना वेळेवर खाद मिळत नाही आणि पैशे ही जास्त मोजावे लागतात.
आम्ही सर्व सबसीडी बंद कराच म्हणतो आहोत.
७. एयर इंडियाला दरवर्षी १० ते १५ हजार कोटी अनुदान दिले जाते. पण साखर कारखान्याचे केवळ ७०० कोटीचे व्याज माफ केले जाते तर त्याचा गवगवा सर्व चेनेल वर होतो.
काय फेकताय राव? दर्वर्षी १५ हजार कोटी अनुदान. जरा अभ्यास करा हो. आणि साखर कारखान्याचे ७०० का ७००० कोटी हे शेतकृयांना मिळत नाहीत ते राजकारणी खातात म्हणुन त्याला विरोध आहे.
मुंबईत पुण्यात राहून सल्ले देणे आणि एक घूंट वर चर्चा करणे वेगळे. जाणकार अधिकारी ही 'डोळ्यांवर पांघरून' घेऊन बसतात. त्याचेच नवल वाटते.
म्हणुनच आमचे म्हणणे आहे, नसेल परवडत तर शेती करणे बंद करा. पवारसाहेबांनी तेच सांगितले होते.

सबसिडी

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 16:40 नवीन
सबसिडी
28,500 करोड़ रुपये की पेट्रोलियम सब्सिडी, एयर इंडिया में करीब 2,000 करोड़ रुपये की इक्विटी पूंजी और कुछ छोटी मदों के लिए 300 करोड़ रुपये
बाकी सापडेल तसे देतो !
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

28,500 करोड़ रुपये की

प्रसाद१९७१
Mon, 01/05/2015 - 16:49 नवीन
28,500 करोड़ रुपये की पेट्रोलियम सब्सिडी
ही कोणाला दिली? एयर इंडिया टर्नओव्हर पण नाही हो तेव्हडा. पेट्रोलियम सब्सिडी कधीच बंद झाली. आणि जर काही असली तर ती आपल्याला पण मिळते आणि शेतकर्‍यांना पण मिळते.
2,000 करोड़ रुपये की इक्विटी पूंजी और कुछ छोटी मदों के लिए 300 करोड़ रुपये
प्रत्येक वर्षी २००० कोटी देते की काय सरकार?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मिपाकरांनी अशा धाग्यांवर

सूड
Mon, 01/05/2015 - 16:29 नवीन
मिपाकरांनी अशा धाग्यांवर प्रतिसाद देणेच बंद करावें? कसे? चालूद्या अरण्यरुदन!!

अरण्यरुदन हा शब्द इथे अस्थानी

प्यारे१
Mon, 01/05/2015 - 16:39 नवीन
अरण्यरुदन हा शब्द इथे अस्थानी वाटतो आहे. जंगलात रडून उपयोग होत नाही. इथं रडणारा खरं रडत नाहीये असा संशय आहे.
↩ प्रतिसाद: सूड

ओके !! । इति लेखनसीमा ।

सूड
Mon, 01/05/2015 - 17:26 नवीन
ओके !! । इति लेखनसीमा ।
↩ प्रतिसाद: प्यारे१

असं कसं

नाखु
Mon, 01/05/2015 - 16:47 नवीन
त्यांनी एकमेका साह्य करू केलं तर चालत परस्पर पाठखाजव. आणि तसेही मिपावाचक डायरेक आभाळातून पडल्येत. (त्यांच कुणीही शेतकरी नाही) असा जावईशोध सर्वश्रुत आहेच.
↩ प्रतिसाद: सूड

अत्यंत सुंदर लेखन

प्रसाद गोडबोले
Mon, 01/05/2015 - 19:49 नवीन
मुटेजी धागा अत्यंत आवडला .
. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा.
ही भाषा पाहुन , आपण एकदा म्हणाला होतात ना की , आपण ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ वगैरे आयोजित करता , त्या वर एकदम १००% विश्वास बसला :) बाकी तुमचा वांगमय शेतीच्या जोडीला सुरु असलेला वाङमय शेतीचा धंदा बरा सुरु आहे असे दिसते . असे लालपंथीय वादग्रस्त लेखन करुन लवकरच शेतीला चांगले दिवस येतील ... किमान गाजराच्या/ बीटाच्या / पोकळ्याच्या शेतीला तरी येतीलच ;) ! पुनश्च एकदा अभिनंदन !

(No subject)

विशाल कुलकर्णी
Tue, 01/06/2015 - 17:35 नवीन
;)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मुटे साहेब

अद्द्या
Tue, 01/06/2015 - 17:23 नवीन
मुटे साहेब एकही प्रतिसादाला तुम्ही प्रतिसाद्कर्त्याचि अक्कल न काढता उत्तर दिल्याचं दिसत नाही . असं का बरं ? स्वतःलाच सगळं कळतं आणि मीच काय तो शेतकऱ्यांचा तारणहार कि काय ते हे दाखवून द्यायचा खटाटोप (अट्टाहास ?? ) कि समोरच्या माणसाला सुद्धा काही गोष्टी कळू शकतात हे सहनच होत नाही ?

या भावजी राव साहेबजी..

नाखु
Wed, 01/07/2015 - 08:44 नवीन
कदाचीत तुम्हाला इथे फुकट फौजदारीचा खरा उद्देश मिळण्यास मदत होइल.
↩ प्रतिसाद: अद्द्या

हेवनवासी अवतार

अन्या दातार
Tue, 01/06/2015 - 17:34 नवीन
@बाळ सप्रे, शेतीविषयाचे मला अगाध ज्ञान नसेल पण जेवढे आहे तेवढे प्रगाढ पंडितांच्या बुद्धीचातुर्याला आव्हाण देण्यासाठी पुरेसे आहे.
इतर (तुमच्यालेखी निर्बुद्ध व उंटावरच्या शहाण्या) लोकांशी वाद घालण्यापेक्षा आणि ग्राहकांनाच दूषणे देण्यापेक्षा शेतकर्‍याची शेती फायद्यात कशी येईल याचा विचार जास्त चांगला, व्यवहार्य वाटत नाही का?
@अत्रुप्त आत्मा, लेखच मुळात अत्यंत स्पष्ट आहे, त्यामुळे आणखी स्पष्ट बोलायची गरज नाही.
तसं असेल तर माझ्या या प्रतिक्रियेबद्दल आपले विचार वाचण्यास उत्सुक आहे. :)

इतर (तुमच्यालेखी निर्बुद्ध व

अद्द्या
Tue, 01/06/2015 - 18:00 नवीन
इतर (तुमच्यालेखी निर्बुद्ध व उंटावरच्या शहाण्या) लोकांशी वाद घालण्यापेक्षा आणि ग्राहकांनाच दूषणे देण्यापेक्षा शेतकर्‍याची शेती फायद्यात कशी येईल याचा विचार जास्त चांगला, व्यवहार्य वाटत नाही का?
आमच्या घरा कडचा एक मेकानिक म्हणतो . "तुमची गाडी पूर्ण चांगली केली तर माझा धंदा कसा चालणार ? "

@ मुटेसाहेब

कपिलमुनी
Tue, 01/06/2015 - 18:01 नवीन
मी मात्र शेतीविषयी बोलू शकतो ! सरकारचे धोरण आणि पॅकेज दोन्ही चुकीचा आहे आणि शेतकरी संघटना हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणार्‍या आहेत हे पण सांगतो . ७०-८० च्या दशकामधल्या कामगार चळवळीसारखा झालेला आहे . बाकी इमेल द्या ७/ १२ मेल करतो .
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा