✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

न
नितिन थत्ते यांनी
Sun, 12/11/2011 - 10:52  ·  लेख
लेख
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले. मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते. कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते. परंतु गाडीत पेट्रोल हवा भरून तेथे पोचेपर्यंत आणि पार्किंगला जागा सापडेपर्यंत (चारचाकी गाडी आहे असे सांगण्याचा क्षीण प्रयत्न :) )मला साडेसहा वाजले. तेव्हा रामदासकाका, सर्वसाक्षी, विश्वनाथ मेहेंदळे, अमोल खरे, मस्त कलंदर, निखिल देशपांडे, मिसळलेला काव्यप्रेमी वगैरे आणि खुद्द लेखक आधीच पोचलेले होते. नंतर येणार्‍यांना तिथल्या गर्दीत हे सगळे कोठे आहेत हे शोधायला विमेंचा टीशर्ट फार उपयोगी पडला. :P माझ्याच बरोबर विलासराव देखील पोचले. किसन शिंदे उशीरा येणार असे कळले. पुण्याहून 'मोठ्या संख्येने' मिपाकर या कार्यक्रमासाठी आले होते. :) आम्ही सगळे कार्यक्रम सुरू होण्याची वाट पहात होतो. तेवढ्यात मी विजयराज बोधनकरांनी काढलेली विविध लेखकांची अर्कचित्रे (मराठीत - कॅरिकेचर) पाहून आलो. आयोजकांनी वेळ घालवण्यासाठी प्रेक्षकांना या प्रदर्शनाविषयी काय वाटते ते सांगायची विनंती केली. तेव्हा काही हौशी प्रेक्षक सुरू झाले. त्यांनी जवळजवळ अर्धा तास पकवले. तेवढ्यात इंडियन स्टॅण्डर्ड टाईमच्या बरेच आधी म्हणजे साडेसात वाजताच राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांनी प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. हे होत होत श्री राज ठाकरे मंचावर पोचले तोवर आणखी वेळ गेला. मग मंचावर नमस्कार चमत्कार सत्कार झाले. शेवटी ज्याची उत्सुकतेने वाट पहात होतो तो क्षण आला. राज ठाकरे यांनी ग्रंथाचे वेष्टण काढून पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक जरी छोटेसे असले तरी त्यातल्या ज्ञानाच्या भाराने आणि लेखकाच्या तेजापुढे राजजी झुकलेले दिसतात. परा यांच्या लेखनाच्या तेजाने चंद्रानेही आपले तोंड काळे केले. तदनंतर राज ठाकरे यांनी जमलेल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केले. मात्र त्यांनी शाब्दिक आतषबाजी असलेले लांबलचक भाषण केले नाही. त्याचे कारण पुढच्या महिन्यात खूप भाषणे करायची आहेत असे सांगितले. मात्र रामदासकाकांच्या मते याचे खरे कारण बिपिन कार्यकर्ते, विजुभाउ आणि छोटा डॉन हे कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे राजजींचा मूड गेला हे होते. राजजींनी भाषण फार लवकर आटोपते घेतल्याने आता पुढे काय असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला. मग सर्वांनी तिथल्या मेजवानी स्टॉलकडे मोर्चा वळवला. आणि बरीचशी भजी आणि चहा यांना या जगातून मुक्ती देऊन त्यांचा उद्धार करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात नीलकांत, किसन शिंदे वगैरे मंडळीही "वेळेवर" पोचली. मग जेवायला कुठे जायचे याचे चिंतन सुरू झाले. हे चिंतन खेळीमेळीच्या वातावरणात झाले. चर्चा करताना विलासराव, निखिल देशपांडे, श्री सावंत व मस्त कलंदर त्यातली चर्चा ऐकून मालकांनी डोक्याला हात लावला. चर्चा चालू होती तेवढ्यात मिपाच्या सिद्धहस्त लेखकांचा एक फोटो घेण्यात आला. वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली. मध्येच मिपावरील कोणते वाङ्मय पुस्तकरूपात प्रसिद्ध करता येईल यावर प्रकाशक श्री कीर्तिकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली. जेवायला कुठे जायचे ही चर्चा खूपच लांबली. त्यामुळे शेवटी पोळीभाजीच मागवून तिथेच जेवायचे ठरले. "पोळीभाजीच" ठरल्यामुळे काहींची निराशा झाली. पोळीभाजी येईपर्यंत इतका वेळ गेला की सर्वांना कडकडून भूक लागली. त्यामुळे सगळे जेवणावर तुटून पडले. सत्ते पे सत्ता मधील जेवणाच्या सीनची आठवण आली. मस्त कलंदर पदर खोचून (आपलं- ओढणी खोचून) वाढायला वगैरे लागल्या. पण त्याची काही गरजच नव्हती इतकी भूक सर्वांना लागली होती. जेवणे झाल्यावर मंडळींनी निरोप घेतला. प्रकाशनाच्या दिवशी पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली असे आमचे प्रतिनिधी कळवतात. (वि. सू. - पोळीभाजीचे बिल कोणी दिले हे कळू शकले नाही). बाकीचे हजर सदस्य अधिक भर घालतीलच. अतिअवांतर : पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल पराचे पुन्हा एकदा अभिनंदन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन
बातमी
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17018 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

आला आला आला.

चिंतामणी
Sun, 12/11/2011 - 11:00 नवीन
फर्स्ट हॅंड रिपोर्ट आला पराच्या लाडक्या चाचांकडुन. मस्त. तीथे आल्यासारखे वाटले. :) :-) :smile: पण फोटोंनी अंमळ निराषा केली आहे. थोडे आउट ऑफ फोकस आहेत असे वाटते. (बहुधा मोबाईलवर काढले असावे).
  • Log in or register to post comments

सही वृत्तांत

अमोल खरे
Sun, 12/11/2011 - 11:47 नवीन
माझ्याकडुन थोडी भर. काल सही मजा आली. मी, रामदास काका, निखिल, मकी, मिका, विमे, प्रशांत तायडे, साक्षीकाका, (आणखीन एक मुलगा होता, नाव आठवत नाहीये, हल्ली अ‍ॅक्टिव नसतो ), विलासराव, थत्तेकाका आणि माननीय परा असे सर्वजण आले होते. आम्ही भरपुर गप्पा मारल्या. का कोणास ठाउक पण निखिल एकदम बिचारा बिचारा वाटला. (ह.घे रे) पराने गुलजार नार चा पुढचा भाग श्रामो टाकणार आहेत असे सांगितले......... नवल वाटले. मग कॅफेत येणारा क्राऊड, पुण्यातला ट्रॅफिक ह्यावर मौलिक चर्चा झाली. आम्ही शांतपणे बाजुला उभे होतो तर आम्हाला जबरदस्तीने खाली बसायला लावलं. एकीकडे लोकं स्टेजवर येऊन बोलत होते. एक कॉलेजमधला मुलगा स्टेजवर येऊन आम्ही हल्लीची पिढी असं करतो, तसं करतो वगैरे बोलत बसला. आम्हा सर्वांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका तरुण, कॉलेजकुमाराची आठवण झाली. :)) मग राज आला. लोकं मजबुत आवाज करत होते, त्याचे फोटो काढायला धडपडत होते. आम्ही जमेल तेवढ्या मोठ्या आवाजात एक्मेकांशी बोलत होतो. मग पराला स्टेजजवळ यायला सांगितलं. थोड्यावेळाने राज स्टेजवर आला आणि निवेदिकेने पराचं नाव घेऊन त्याच्या पुस्तकाचे राज प्रकाशन करेल असं सांगितलं. ते ऐकुन सॉल्लिड बरं वाटलं. मग परा पुढे आला आणि एकदम आदराने राजला नमस्कार वगैरे केला. लगेच पुस्तक प्रकाशन झालं आणि सर्व लोकांनी ( आम्ही सर्वांनी त्यातल्या त्यात जास्त) टाळ्या वाजवल्या. एकदम सही वाटलं. मग एक ५-७ मिनिटे बोलुन राज निघुन गेला आणि आम्ही सर्व परत जमलो. परा त्याची किती पुस्तकं खपतायत त्यावर लक्ष ठेवुन होता. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. सभा सुरु असताना थत्तेकाका त्यांच्या पॉवरफुल कॅमेर्यातुन फोटो काढत होते. सॉलिड पॉवरफुल कॅमेरा आहे. रामदास काका तर फुल फिदा झाले होते त्यावर. आम्ही खुप लांब बसलो होतो, तरीही फोटो चांगले आहेत. आउट ऑफ फोकस वाटत असले तरी नॉर्मल कॅमेर्यामधुन तेही आले नसते. तो पर्यंत नीलकांत पण आला होता. पण रात्रीचे ९-९.३० झाले होते आणि मला बोरिवली पर्यंत जायचे होते. मग थोड्यावेळात मी पण निघालो. पुढील बातम्या रामदास काका देतील.
  • Log in or register to post comments

वाटच बघत होते!

पैसा
Sun, 12/11/2011 - 11:49 नवीन
कोण लिहितंय म्हणून वाटच बघत होते! मस्त खुसखुशीत वर्णन. राज साहेबांची जरा निराशा झाली तर! ़़
  • Log in or register to post comments

सही छोटेखानी वृत्तांत....

सुहास झेले
Sun, 12/11/2011 - 11:54 नवीन
सही छोटेखानी वृत्तांत.... :) :) मला यायचं होतं, पण म्यानेजर ने माती खाल्ली आणि शनिवार-रविवार शिफ्ट दिली :( :(
  • Log in or register to post comments

+१ मी पण येणार होतो .....

टवाळ कार्टा
Sun, 12/11/2011 - 12:25 नवीन
+१ मी पण येणार होतो .....
  • Log in or register to post comments

मी ही येणार होते. पण खुद्द

प्रीत-मोहर
Sun, 12/11/2011 - 12:37 नवीन
मी ही येणार होते. पण खुद्द पर्‍याने ऊप्स नै नै .. माननीय लेखकमहोदयांनी येउ नको म्ह्॑टल्यावर... :( असो. ह्या घोर अपमानाचा योग्य त्या पद्धतीने बदला घेण्यात येइल.
  • Log in or register to post comments

खूपच छान कार्यक्रम होता

पुण्याचे वटवाघूळ
Sun, 12/11/2011 - 13:16 नवीन
काल योगायोगाने मुंबईतच असल्यामुळे मी माझे पुण्याला परतणे लांबविले आणि कार्यक्रमाला मी पण आलो होतो आणि कार्यक्रम खूपच आवडला. अर्थात मी मिसळपाव परिवारात इतर कोणाला ओळखत नसल्यामुळे मला इतरांना भेटता आले नाही. श्रीयुत परिकथेतील राजकुमार, पुढच्या पुस्तकाची वाट बहत आहे. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments

छान

अन्या दातार
Sun, 12/11/2011 - 13:18 नवीन
झालेला दिसतोय कार्यक्रम. आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments

चिच्चा भन्नाट कार्यक्रमाचा

गणपा
Sun, 12/11/2011 - 13:20 नवीन
चिच्चा भन्नाट कार्यक्रमाचा तेवढाच भन्नाट वृत्तांत. साला आम्हीच कमनशिबी, कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावू शकलो नाही. :( (ईनो घेत आहे.) ;)
  • Log in or register to post comments

पुनःश्च अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Sun, 12/11/2011 - 13:25 नवीन
श्री. परीकथेतील राजकुमाराचे पुनःश्च हार्दिक अभिनंदन. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. एवढे मिपाकर जमून फक्त एकच पुस्तक ह्या मंडळींमध्ये विकले गेले? आश्चर्य वाटले. (जेवण्याखाण्याची चर्चा मुख्य वाटली.) भारतात आल्यावर पुस्तक नक्कीच विकत घेतले जाईल.
  • Log in or register to post comments

एकच नाय हो..

मस्त कलंदर
Sun, 12/11/2011 - 14:36 नवीन
मिपाकरांनी चार पुस्तकं तरी घेतली. एक आम्ही दोघांनी, एक वाहिदा, थत्तेचिच्चा आणि विलासरावांनी एक अशी. वाहिदा आणि विलासरावांनी या जहांबाज पर्‍याची पुस्तकावर स्वाक्षरी घेतली पण नंतर त्याच्या दोन्ही सह्या वेगवेगळ्या असल्याचं निदर्शनास आलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वाट्लच. हा पर्‍या इथेही

प्रीत-मोहर
Sun, 12/11/2011 - 14:49 नवीन
वाट्लच. हा पर्‍या इथेही हलकटपणाच करेल. आणि झालेही तस्सेच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

धन्यवाद..

प्रभाकर पेठकर
Sun, 12/11/2011 - 14:59 नवीन
धन्यवाद मस्त कलंदर. अपेक्षा होती की मिपाकर हजर राहात आहेत तर पुस्तकात हाताळलेल्या मुद्यांचा परामर्श घेतील. अगदी तपशिलात नाही, ते तर नीट वाचल्यावर येईलच पण जरा अनुक्रमणिका पुस्तकाचे वरवरचे तरी निरीक्षण. त्या मानाने आपले कार्यक्रमाचे वर्णन वाचनिय आहे. पुन्हा एकवार धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

बगुनाना

मैत्र
Sun, 12/11/2011 - 23:30 नवीन
एक सही नाना फडणवीस आणि एक सखारामबापू बोकील अशी आहे का? नाही पेठेतले आहेत परा साहेब्...त्यामुळे सांगता येत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मस्त खुसखुशीत वृत्तांत

मस्त कलंदर
Sun, 12/11/2011 - 13:37 नवीन
मिपाकर भेटतात आणि धमाल करत नाहीत असं कधी होत नाही, आणि कालचा कार्यक्रमही अपवाद नव्हताच. कॅरीकेचर्स, ब्रश न वापरता फक्त बोटं आणि नखांच्या साह्याने काढलेली चित्रं, पुस्तक प्रदर्शन सगळंच छान होतं. पुस्तकांच्या इथे जास्त वेळ गेला हे वेगळं सांगायला नकोच. मेजवानी हा खास मराठमोळ्या पदार्थांचा स्टॉल मुद्दाम आयोजित केल्याचं नवताचे प्रकाशक किर्तीकुमार शिंदें यांनी सांगोतलं. कोथिंबीर वडी,बटाटा-खेकडा भजी, थालीपीठ, वडापाव असं बरंच काही होतं पण आम्ही भुकेने कासावीस होऊन थांबायची तयारी नसल्याने भज्यांवरच हल्ला चढवला गेला. आधी मैदान बरंचसं रिकामं असलं तरी नंतर गर्दी वाढत गेली. काही क्षणाचित्रे: १. आम्ही सहजपणे कल्टी.कॉम करता येईल म्हणून कडेला बसलो होतो पण मधले लोक उठून जाताना न दिसताही आम्हाला लोकांनी पुढे सरकवून सरकवून बरंच पुढे आणलं!! २.राज ठाकरे आल्यावर आधी फटाक्यांचे फक्त आवाज येत होते, यावरून मला आणि विमेला फक्त आवाजाची सीडी लावलीय की काय असंच वाटलं. ३.नंतरची आतषबाजी मात्र राज ठाकरेंच्या भाषणाहून जास्त वेळ चालली इति प्रशांत. ४. बाकी स्टेजवरचं काही दिसण्याइतकं स्पष्ट नव्हतं पण थत्तेचिचांचा कॅमेरा लैच भारी होता. त्यात बरीचशी सेटिंग्ज होती. ५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत. ६. थत्तेकाका खूपच शांत आणि गंभीर असावेत असं मला वाटलं होतं, पण माझा समज साफ खोटा ठरला. ७. प्रशांत हा मनुष्यप्राणी आधीच्या भेटीवरून खूप सज्जन असेल असं वाटलं होतं. पण तो मुलखाचा टवाळ आहे याचा काल साक्षात्कार झाला. :-) बाकी इतर लिहितीलच. @अमोल खरे: १. तो मुलगा देवदत्त गाणार होता २. तुला पोचल्यावर क्षणाची उसंत घेऊ न देता झापतात ते लोक बिचारे असतात असे दिसते. पुढच्या वेळॅस मीही हेच करेन.
  • Log in or register to post comments

प्रांजळपणा आवडला.

चिंतामणी
Mon, 12/12/2011 - 00:45 नवीन
>>>५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत. मिपावर राहूनसुध्दा प्राजंळपणाचे उदाहरण दाखवल्याबद्दल आभार. :D :-D :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हा हा. मस्त वृतांत.

दादा कोंडके
Sun, 12/11/2011 - 13:56 नवीन
मजा आली वाचून. फोटो आउट ऑफ फोकस वाटत नाहित. पण कॅमेराचं रिजोल्युशन मात्र खत्रा असलं पाहिजे. अगदी एक-दोन किलो पिक्सेल तरी सहज! :)
  • Log in or register to post comments

वृत्तांत वाचून मजा आली. राज

यकु
Sun, 12/11/2011 - 14:07 नवीन
वृत्तांत वाचून मजा आली. राज साहेब भर दिवाळीत एका मराठी वाहिनीवर चांगले अर्धा-पाऊण तास अड्डा जमवून बसले होते, इथंही तसं झालं असतं तर मजा आली असती. पुस्तक फ्लिपकार्ट्याकडून हस्तगत करणेत येईल. थत्ते काकांचे चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद वगळता त्यांनी लिहीलेलं असं लेखन पहिल्यांदाच वाचले. ;-) बाकी आपले इतर ठाणेकर कुटं गायबले? अवांतरः मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का? अतिअवांतरः मामलेदाराची मिसळ किंवा तिथं रांगेत उभं राहून मिसळ घ्यावी लागते म्हणून गेला बाजार किमान 'आमंत्रण' मधली मिसळ दिसेल अशी आशा होती. ;-)
  • Log in or register to post comments

मागचं अ.भा.मराठी साहित्य

देवदत्त
Sun, 12/11/2011 - 23:02 नवीन
मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का? नाही, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

क्यामेरा

नितिन थत्ते
Sun, 12/11/2011 - 14:12 नवीन
कॅमेरा १२ मेगापिक्सेल आणि १२ एक्स झूम वाला कॅनन आहे. :( फोटोग्राफरच्या तंत्रात दोष आहेत. आम्ही मुख्य कार्यक्रमापासून इतके लांब बसलो होतो की १२ एक्स झूमनेही फोटो दूरच दिसत होते. म्हणून पुढे आणखी डिजिटल झूम करून फोटो काढले. त्यामुळे थोडे ब्लर आले असतील. शिवाय काही क्रॉपिंग देखील केले आहे. अवांतर : फायरफॉक्सवर मिपाचा स्क्रीन दोन्ही बाजूस एक इंच सोडून दिसतो त्यात फोटो ठीक दिसतात. आय ई वर (माझ्याकडे) पूर्ण स्क्रीनच्या रुंदीएवढे दिसतो तेथे थोडे ब्लर दिसतात.
  • Log in or register to post comments

वॄतांत वाचून छान वाटले.

अप्पा जोगळेकर
Sun, 12/11/2011 - 14:29 नवीन
वॄतांत वाचून छान वाटले.
  • Log in or register to post comments

श्रद्धा - सबुरी

कुंदन
Sun, 12/11/2011 - 14:50 नवीन
सकाळी सकाळी आमचे मित्र थत्ते चाचांना विचारले , कार्यक्रम कसा झाला? तर चाचा बोलले "श्रद्धा - सबुर" म्हटले चाचा वृत्तांत टंकण्यात व्यस्त असतील ( हो त्यांना स्व:तच टंकावा लागणार ना , त्यांच्याकडे टंकनिका थोडीच आहे ;-) वृत्तांत छानच लिहिला आहे. पर्‍याचे पुन्हा एकदा अभिनंदन. मनसे आता उमेदवारांसाठी परिक्षा घेते , तेंव्हा पुढील पुस्तक आता पराने या उमेदवारांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचे लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

एक राहीले

सर्वसाक्षी
Sun, 12/11/2011 - 14:54 नवीन
पराच्या सन्मानर्थ झालेली आतषबाजी! आहाहा. ते सांगयचेच राहीले की.
  • Log in or register to post comments

परा वावा आम्हाला तुझ्झा

पर्नल नेने मराठे
Sun, 12/11/2011 - 15:19 नवीन
परा वावा आम्हाला तुझ्झा अभिमान वाट्टओ
  • Log in or register to post comments

नुसता अभिमान

कुंदन
Sun, 12/11/2011 - 15:59 नवीन
नुसता अभिमान वाटुन काय उप्यओग? ५-५० प्रती खपव पुस्तकाच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

हो हो ( हेच म्हणेन भलेही किती

पियुशा
Mon, 12/12/2011 - 12:55 नवीन
हो हो ( हेच म्हणेन भलेही किती जिवावर आले असले तरी ) पर्या आम्हाला तुझा अभिमान वाट्तो रे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

खुसखुशित वृत्तांत. मजा आली

प्रचेतस
Sun, 12/11/2011 - 15:47 नवीन
खुसखुशित वृत्तांत. मजा आली वाचून. पर्‍याचे पुनश्च अभिनंदन.
  • Log in or register to post comments

बरं झालं रिपोर्ट आला , वाचुन

५० फक्त
Sun, 12/11/2011 - 18:09 नवीन
बरं झालं रिपोर्ट आला , वाचुन आनंद जाहला. येणं शक्यच नव्हतं. परा पुण्यात आल्यावर भेटतोच आहे रे.
  • Log in or register to post comments

टेस्टिंग

नितिन थत्ते
Sun, 12/11/2011 - 19:15 नवीन
हा फोटो पाहून रेझोल्युशन कसे वाटते? Image removed.
  • Log in or register to post comments

रेझोल्युशन भारी वाटले

प्रास
Sun, 12/11/2011 - 19:22 नवीन
रेझोल्युशन भारी वाटले आणि परा राजचा धाकटा भौ वाटला ;-) प्रकाशन कार्यक्रम आणि कट्टा आणि थत्ते चाचांचा नि बाकी कट्टेकरांचा वृत्तांत मस्त झालाय हे समजून येतंच आहे. (हे सर्व हुकलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

अन्या दातार
Sun, 12/11/2011 - 19:34 नवीन
रेझोल्युशन भारीच, परा राजचा धाकटा भाऊ वाटलाच, आणि उजवीकडच्या कोपर्‍यात उभे असलेले गृहस्थ मला प्रासभौ वाटले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

ते गृहस्थ स्वतःच्या खांद्यावर

प्रास
Sun, 12/11/2011 - 19:39 नवीन
ते गृहस्थ स्वतःच्या खांद्यावर स्वतःच उभे राहिले असते तर कदाचित प्रासभौंच्या खांद्यापर्यंत आले असते..... ;-) (हा कार्यक्रम हुकलेला) <--- हे तेवढं विसरू नका अन्याभौ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हा फोटो पाहून परा फेशियल

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/12/2011 - 00:31 नवीन
हा फोटो पाहून परा फेशियल वगैरे करून गेला असावा असे वाटते. जरा बरा दिसतोय! लवकरच निवडणुकीला वगैरे उभा राहिल असेही वाटून गेले. बाकी आम्ही असले छप्पन्न परा आणि सत्तावन्न पुस्तकं बघितली असल्यामुळे फारसे कौतुक वगैरे वाटले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

फारच मस्त.

चिंतामणी
Mon, 12/12/2011 - 00:37 नवीन
असाच शार्पनेस बाकी फोटोत आणा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

फोटो टाकताना (अज्ञानामुळे)

नितिन थत्ते
Wed, 12/14/2011 - 16:19 नवीन
फोटो टाकताना (अज्ञानामुळे) कमी रेझोल्युशनच्या लिंकस टाकल्या गेल्या होत्या. संपादक मंडळाला विनंती करून फोटो दुरुस्त करून घेतले आहेत. संपादक मंडळाला धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अरे वा ! कार्यक्रम झकास

माझीही शॅम्पेन
Sun, 12/11/2011 - 19:59 नवीन
अरे वा ! कार्यक्रम झकास झालेला दिसतोय ! नेमके काही आठवडे अमेरिकेत पडिक असल्याने मिपाचे मागचे दोन्ही कट्टे बुडाले बाकीची नेहमीची कट्टे-बाज मंडळी कुठे दिसत नाही आहेत ती ? ( गवी , किस्णा इत्यादी) राज काय बोलले हे कोणीच सांगायला तयार नाही ? एकही शूर मीपकारंने मंदाकीनीचे फोटो टाकले (उपस्थितीत असलेली कुठलीहीचालली असती) नाहीत हे पाहून हळवा झालो ;)
  • Log in or register to post comments

राज मोजुन ५-७ मिनिट्स बोलला

अमोल खरे
Sun, 12/11/2011 - 20:18 नवीन
राज मोजुन ५-७ मिनिट्स बोलला असेल. आणि मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे. उद्या ऑनलाईन आल्यावर परा कन्फर्म करेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

गंडवागंडवी

श्रावण मोडक
Sun, 12/11/2011 - 20:21 नवीन
मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे.
मी त्या धाग्यावरच लिहिलं होतं, हा पऱ्या गंडवणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

वा वा कार्यक्रमाचा वृत्तांत आवडला!

चतुरंग
Sun, 12/11/2011 - 20:37 नवीन
स्टेजवर दोन्ही हात पुढे धरुन शक्य तेवढ्या नम्रपणे उभे राहण्याचा प्रयत्न करणार्‍या पराचा फोटू आवडला! ;) सगळे जेवायला बसलेले असताना मस्त कलंदर तै वाढायला उभ्या राहिलेल्या बघून डोळे पाणावले. (निखिल आठवडाभर घरीच भरपूर काम करुन दमला असल्याने मदतील उभा राहिला नसावा, असा आपला एक अंदाज! ;) ) मालकांनी कपाळाला हात लावलेला बघून चर्चेचा अंदाज आला! ;) अवांतर - पुस्तकाबद्दलही कोणीतरी लिहा रे. -रंगा
  • Log in or register to post comments

परा अभिनंदन रे

jaypal
Sun, 12/11/2011 - 21:06 नवीन
कार्यालयीन कामा निमीत्त बाहेरगावी असल्याने एका चांगल्या संधिस मुकलो अन्यथा अजुन नविन ओळखी सहज झाल्या असत्या. :-(
  • Log in or register to post comments

थत्तेचाचा, मस्त

सोत्रि
Sun, 12/11/2011 - 21:33 नवीन
थत्तेचाचा, मस्त वृत्तांत! पर्‍याचे पुनश्च अभिनंदन!!! - (स्वतःच्या घोडचूकीने कार्यक्रम आणि सर्व मिपाकरांची भेट चुकलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

पराशेठचे पुनश्च

अभिज्ञ
Sun, 12/11/2011 - 21:43 नवीन
पराशेठचे पुनश्च अभिनंदन. थत्ते काकांचा वृत्तांत आवडेश.
  • Log in or register to post comments

अरे वा!

हरिकथा
Sun, 12/11/2011 - 22:45 नवीन
इथे लिखाण करणारे, पुस्तके प्रकाशित होणारे प्रथितयश लेखक आहेत, हे वाचून फारच आनंद झाला. श्री. परिकथेतील राजकुमार यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुस्तकांच्या प्रति शेकड्याने विकल्या जावोत याबद्दल मनापासून शुभेच्छा! तसा श्री. परा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विषय फारच जिव्हाळ्याचा आहे कारण हा प्रतिसाद लिहिण्यासाठीही मला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. तेव्हा सदर पुस्तक स्वखर्चाने मिळवून स्वतःच्या मराठी टंकनामध्ये सुधारणा करण्याचा विचार मनात उचल खात आहे. आमच्या टंकनात सुधारणा झाल्यास लगेच कळवले जाईल याची नोंद घ्यावी. बाकी या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमाचा वृत्तांतही आवडला आहे.
  • Log in or register to post comments

परा चे अभिनंदन. (काल

देवदत्त
Sun, 12/11/2011 - 23:04 नवीन
परा चे अभिनंदन. (काल प्रत्यक्ष भेट झाली, पण काही कामामुळे प्रकाशन सोहळ्यास थांबता आले नाही.)
  • Log in or register to post comments

श्री. परिकथेतील राजकुमार उर्फ

अविनाशकुलकर्णी
Sun, 12/11/2011 - 23:58 नवीन
श्री. परिकथेतील राजकुमार उर्फ परा...यांचे हार्दिक अभिनंदन ...
  • Log in or register to post comments

कार्यक्रम छान झालेला दिसतोय व

मोहनराव
Mon, 12/12/2011 - 00:25 नवीन
कार्यक्रम छान झालेला दिसतोय व वृतांतही छान आहे. पुस्तक नक्कीच घेतले जाईल. परासाहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आमच्या मनाच्या गाभार्‍यातुन

शिल्पा ब
Mon, 12/12/2011 - 00:58 नवीन
आमच्या मनाच्या गाभार्‍यातुन अभिनंदन!! आम्ही जेव्हा कधी भेटु तेव्हा आमच्या येण्याने आनंद झाल्याने पर्‍या स्वत:चे आता प्रकाशित झालेले अन येईपर्यंत जे काही प्रकाशित करेल ते भेट म्हणुन सही करुन देईलच. चिच्यांचा वृत्तांत आवडला हेवेसांनल आणि स्वताचा भारी क्यामेरा नवशिक्यांच्या हाती दिल्याने काय होते ते सुद्धा सगळ्यांनी पाहीलेच. विमेंचा सुर्यालासुद्धा लाजवणार्‍या पिवळ्या रंगाचा टीशर्ट पाहुनच साहेबांचे डोळे दुखुन ते लवकर निघुन गेले असावेत असा आमचा अंदाज आहे. (आणि त्याला तुम्ही लोकं राज म्हणणं सोडा पाहु!! )
  • Log in or register to post comments

छान वॄतांत..

कौशी
Mon, 12/12/2011 - 02:00 नवीन
वॄतांत वाचून छान वाटले. पराचे पुन्हा एकदा अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

वा वा वा!! परा जियो!! छान

प्राजु
Mon, 12/12/2011 - 05:20 नवीन
वा वा वा!! परा जियो!! छान दिसतो आहेस हो फोटो मध्ये. तुझीच अशीच आणखीही पुस्तके प्रकाशीत होवोत!!! खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments

आज्ञाधारक पराचा फोटू

रेवती
Mon, 12/12/2011 - 05:58 नवीन
आज्ञाधारक पराचा फोटू आवडला. (आंतरजालीय मिपा विवाहमंडळात नाव नोंदवून घेतल्या गेले आहे.) कार्यक्रम चांगला झालेला दिसतोय. अभिनंदन! पुढचे पुस्तक हे मिपावरच्या पाकृ आणि त्यातील पदार्थ बाजारात कसे शोधावेत यावर येऊदेत अशी मागणी करीत आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा