✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

आ
आकाश खोत यांनी
Sun, 02/22/2026 - 18:06  ·  लेख
लेख
२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता. ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली. जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती. मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो. त्यांची मुलगी फार लहान असल्यामुळे त्यांनी फक्त जयपूर मध्ये पाच दिवस फिरून परतायचं, तर आम्ही पुढे आणखी 3 दिवस उदयपूर भागात फिरायचं आणि मग निघायचं असा बेत होता. i1 दिवाळीच्या काळात चमचमते पुणे शहर पुण्याहून रात्री उशिराचं विमान होतं. त्याने आम्ही जयपूरला मध्यरात्री २ च्या सुमारास पोहोचणार होतो. त्यामुळे रात्री दूरचा प्रवास न करता विमानतळाच्या परिसरातच एक हॉटेल बघितलं, जेणेकरून तेथे पटकन पोहोचून उरलेली रात्र झोप पूर्ण करता येईल. दुसऱ्या दिवशीपासून जयपूर सोडेपर्यंत चार दिवसांसाठी एअरबीएनबी वरून एक घर बुक करून ठेवलं होतं. विमानतळ रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी प्रीपेड रिक्षा कॅब असे काउंटर टाकलेले असतात. ते प्रवाशांच्या सोयीसाठी की लुटीसाठी असा प्रश्न कधी कधी पडतो. मागे दिल्लीत मला बरा अनुभव होता. इथे मात्र विमानतळाच्या दारापासून अवघ्या दीड किलोमीटर असलेल्या हॉटेल साठी त्यांनी आम्हाला एका सेदान गाडीचे ४५० रु. सांगितले. त्यापेक्षा कमी दरात उबर वरून SUV गाडी मिळाली. समोरच प्रशस्त पार्किंग आणि तिथे कॅब मिळणेसुद्धा सोयीस्कर होते. आठवड्याभराचे सामान, अर्धवट झोपेतली मुले सोबत असल्यामुळे कॅब आवश्यक होती. एरवी हलके सामान असताना एवढे अंतर चालून जायला काही वाटत नाही. २–४ मिनिटांत हॉटेलला पोहोचलो आणि झोपलो. पहिल्या दिवशी सर्वांची झोप पूर्ण करण्यावर भर दिला. निवांत उठलो, आवरले, नाश्ता करून आधी त्या एअर-बीएनबीवाल्या घरी सामान नेऊन टाकले आणि मगच फिरायला बाहेर पडलो. गलताजी मंदिर पहिले ठिकाण होते गलताजी मंदिर, यालाच मंकी टेम्पल म्हणूनही ओळखले जाते. याला कारण या परिसरात प्रचंड संख्येने असलेली माकडे. i2 i3 इथे गलताजी नावाच्या महाराजांचं, मारुतीचं, राम लक्ष्मण जानकी अशी छोटी छोटी लागून काही मंदिरे आहेत. दोन डोंगरांच्या मधोमध असलेल्या खिंडीत ही मंदिरे आहेत आणि इथून वाहणाऱ्या प्रवाहाला अडवून दोन मोठे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगळे असे स्नानकुंड आहेत. तिथे स्नान करून फार पुण्य मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे, आणि त्यामुळेच फार गर्दी सुद्धा. आणि ओघानेच थोडा गचाळ राडासुद्धा. असो. i4 मंदिराकडे जाताना राजस्थानी शैलीचे सुंदर वाडे आहेत, कुंडाच्या आजूबाजूचे बांधकाम फार सुंदर आहे. वर सांगितलेली मंदिरे ही कुंडाच्या बाजूने पायऱ्या वर चढून गेल्यावर आहेत. तिथून आणखी पुढे गेल्यास टेकडीवर एक सूर्य मंदिर आहे, तिथून जयपूर शहराचे दृश्य छान दिसते असे समजले. पण ऊन फार असल्यामुळे, आणि जयपूर शहराच्या दृश्यासाठी प्रसिद्ध असलेले नाहारगड हे आमच्या यादीत असल्यामुळे आम्ही आणखी वर जाणे टाळले. i5 i6 हे मंदिर शहराच्या फार बाहेर आहे, जाताना आम्ही उबर केली होती, पण रस्ता पाहून येताना पटकन गाडी मिळणे अवघड आहे अशी आमची चर्चा चालूच होती, ती ऐकून त्या ड्रायवर ने पुढे कुठे जायचे असे विचारले. आम्ही यापुढे गोविंद देव मंदिर ठरवले होते ते सांगितले. ते उबर वर टाकून किती होतात ते त्याला सांगितले, तो आणखी १५० घेऊन तिथेच आमच्यासाठी थांबायला तयार झाला. त्याच कॅबमध्ये बसून आम्ही गोविंद देव मंदिराकडे निघालो. हे मंदिर सिटी पॅलेसच्याच परिसरात होते. इथे येताना जयपूरला पिंक सिटी असा लौकिक देणारा भाग सुरू झाला. पिंक सिटी प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड हे १८७६ च्या सुमारास भारतात येणार होते, जयपूरला भेट देणार होते. हल्ली जशी राष्ट्रपती पंतप्रधानांची भेट असली की रस्ते आणि परिसराची डागडुजी करण्याची लगबग उडते तशी झाली. तेव्हाच्या जयपूरच्या राजांनी सगळं शहर रंगवून काढलं. i7 खरं पाहता हा रंग गुलाबी नाही. अरिजितच्या गाण्यामधला गेरूआ आहे. त्याला गुलाबी का म्हटलं गेलं त्याची दोन तीन कारणं सांगितली जातात. -
  • एक म्हणजे हा रंग इंग्रजांसाठी फारसा परिचित नव्हता. त्याला इंग्रजीमध्ये नेमका शब्द मिळाला नाही, त्यामुळे टेराकोटा पिंक किंवा नुसताच जवळपास चा म्हणून पिंक असा शब्द तेव्हाच्या पत्रकारांनी वापरला आणि तोच रूढ झाला.
  • किंवा तेव्हा एडवर्ड सोबत आलेला कारकून कलर ब्लाइंड होता त्यामुळे त्याला हा रंग नेमका समजला नव्हता आणि त्याने जो लिहिला तोच रंग रूढ झाला.
  • आणखी एक कारण म्हणजे राजाच्या मनात गुलाबी हाच रंग होता, आतिथ्याचे प्रतीक म्हणून तो रंग निवडला होता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो रंग बनला नाही, जे सामान वापरलं गेलं त्यातून रंगकाम झाल्यावर हीच छटा दिसू लागली. तरीही गुलाबी रंगाचा बेत असल्यामुळे तोच शब्द वापरला गेला असं ही सांगतात.
यातलं कुठलंही किंवा आणखी काही कारण असो, तेव्हापासुन जयपूरची गुलाबी शहर अशी ओळख निर्माण झाली हे मात्र खरं. हीच ओळख जपण्यासाठी नंतर हा रंग तेव्हापासुन आजपर्यंत वापरला गेला. जे जुनं शहर आहे, त्याला तटबंदी होती आणि सर्व दिशांना वेगवेगळ्या नावांचे दरवाजे आहेत. त्यामुळे या भागाला चार-दिवारी असंही म्हणतात. या भागात सर्व इमारतींना हाच रंग वापरला जावा असा राजाने कायदाच आणला होता. आजही सर्व इमारतींची दर्शनी बाजू आणि किमान पहिला मजला याच रंगाचा आहे. कोणी वर वाढीव बांधकाम केलं असेल तर काही ठिकाणी वेगळा रंग दिसतो, पण सगळीकडे उठून मात्र हाच रंग दिसतो. याच भागात बापु बाजार, जोहरी बाजार, त्रिपोलीया बाजार अशा अनेक प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. त्यातली सर्व दुकाने याच रंगात आहेत. दुकानांच्या फलकासाठी सारखीच जागा आहे आणि बहुतांश दुकानांची ती जागा सारख्याच पद्धतीने रंगवली आहे. नव्या पद्धतीची इलेक्ट्रिकल यंत्रणा फार कमी दुकानांनी वापरली आहे. त्यामुळे इथे अगदी जुन्या काळातल्या बाजारात आल्यासारखंच वाटतं. मंदिराचे पट गोविंद देव मंदिरात पोहोचल्यावर कळलं कि हे मंदिर ५ वाजेपर्यंत बंद होतं. राजस्थानातल्या सर्व मंदिरात हा एक प्रकार होता. दिवसात काही वेळा इथे पट म्हणजे देवासमोरचे पडदे काही वेळा आरती नंतर चालु बंद होतात. पट बंद म्हणजे दर्शन बंद. इथे त्यांनी देवाची सकाळची उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, दुपारच्या वामकुक्षीच्या वेळा, रात्रीचे जेवण, रात्रीची झोप अशा सर्व पद्धती कटाक्षाने पाळलेल्या दिसतात. परंपरा म्हणुन चांगलंच म्हणायचं. स्थानिक लोकांना त्या वेळा माहित असतात, पण बाहेरून फिरायला आलेल्यांचे मात्र हेलपाटे होतात. आधीच जवळपासच्या जागा, तिथे अधेमधे फिरणं, खाणं पिणं याच्या वेळा सांभाळाव्या लागतात. लहान मुलं किंवा ज्येष्ठ सोबत असतील तर अधिकच. आणि त्यात हि भर. चोखी धानी आम्हाला इथून पुढे चोखी धानीला जायचं होतं. ते फक्त संध्याकाळीच असतं आणि ते शहराबाहेर होतं, तिथे जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे आम्ही इथे तासभर दर्शनासाठी थांबायचं मग निघायचं ठरवलं असतं तर बराच वेळ गेला असता. त्यामुळे आम्ही सिटी पॅलेस करायला येऊ तेव्हा पुन्हा प्रयत्न करू असा विचार करून चोखी धानीला निघालो. हि जागा सुद्धा शहराबाहेर असल्यामुळे कॅब ड्रायवरनेच आम्हाला आधीच्या ड्रायव्हरसारखीच मी तुमच्यासाठी थांबतो अशी ऑफर दिली. गलताजी आणि चोखी धानी दोन्ही ठिकाणी मला असं वाटलं कि ओला उबर मिळायला थोडी अडचण होऊ शकते हे खरं, पण काही वेळ थांबण्याची तयारी असेल तर ओला उबर किंवा स्थानिक ऑटो, टमटम असे काही पर्याय मिळूही शकतात. i8 चोखी धानीमध्ये १००० रु., १२०० रु., १३०० रु. प्रति व्यक्ती असे काही तरी ३ पर्याय आहेत. त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला फोटोसहित माहिती आणि अद्ययावत किमती मिळू शकतील. हे शुल्क म्हणजे प्रवेश आणि निवडलेल्या पर्यायात अमर्यादित जेवण असे आहे. आत ढीगभर आणखी कुल्फी, पाणीपुरी, मसाला दूध, कॉर्न चाट, वेगवेगळे गेम्स असे अनेक काउंटर आहेत. तिथे प्रत्येक ठिकाणी २०, ३०, ४०, ५० अशा प्रमाणात खर्च होतोच. त्यापैकी १००० वाला पर्याय म्हणजे, राजस्थानी थाळी, जी भारतीय बैठकीत पंगतीत मिळते. दुसरा मल्टीक्युझिन पर्याय नेहमीसारख्या रेस्टारंट मध्ये असतो तसा प्रकार. आणि एक रॉयल प्रकार ज्यात थोड्या आणखी चकचकीत अशा दालनात चांदीच्या ताट वाटीमध्ये जेवण असे पर्याय आहेत. यातले दुसरे दोन पर्याय आपल्याला पुण्यात किंवा महाराष्ट्रातही सहज मिळतात. त्यामुळे इथे येऊन राजस्थानी खेड्याचा फील पहिल्या पर्यायातच होता, त्यामुळे आम्ही तोच निवडला. यात फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीने आपल्याला ६.३०, ७.१५ अशा वेळा मिळतात. त्यावेळेस गेलो तर आपल्याला प्राधान्य मिळते. उशिरा उशिरा प्रचंड गर्दी होत जाते आणि वाट बघावी लागते. तिथे प्रचंड गर्दी असतेच, परंतु परिसर अतिशय विस्तीर्ण आहे त्यामुळे अगदी गजबज किंवा धक्काबुक्की झाल्यासारखं वाटत नाही. गर्दी आरामशीर पसरते. आम्ही गेल्यावर थोडा वेळ स्टॉल्स मध्ये टाईमपास केला आणि आमच्या वेळेत ७.१५ वाजता जेवायला गेलो. लगेच नंबर लागला आणि निवांत जेवण झालं. i9 तिथे एक एक विभाग २-३ पारंपरिक राजस्थानी वेशभूषा असलेल्या वेटरकडे सोपवलेले असतात. ते सर्व पदार्थ अगदी हसत खेळात अगत्याने, आग्रहाने वाढतात. काही पदार्थ खाण्याची पद्धत कुस्करून, तूप घालून अशी जी काही असेल ती सांगतात आणि तशा पद्धतीने खाऊन बघण्याचा आग्रह करतात. ज्यांनी आपल्याकडे सुद्धा थाळी रेस्टोरंट मध्ये अशी सेवा घेतलेली असेल त्यांनी हा अनुभव घेतला असेलच. पण अशा ठिकाणी पहिल्यांदाच आलेले किंवा राजस्थानी पदार्थांची अजिबात ओळख नसलेले लोकही येतात, त्यामुळे अशी माहिती मिळणे त्यांच्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे. सर्व पदार्थ आम्हाला आवडले, चव छान होती. एवढी सेवा दिल्यावर त्यांना टीप देणे अनिवार्य नसते, पण त्यांची अपेक्षा असते आणि ते राम राम सा म्हणत दोन तीनदा व्यक्त करतात. हेच इथे असलेल्या सर्व कलाकारांचेही आहे. त्यांनाही टीप ची अपेक्षा असते. इथे मेहेंदी काढून घेणे, राजस्थानी लोककला, नृत्य, मटके डोक्यावर ठेवून तोल सांभाळून नाचणे, आगीचे खेळ, जादूगाराचे खेळ, कठपुतळी असे अनेक सादरीकरण आपण निःशुल्क बघू शकतो. त्यासाठी त्या कलाकारांना थोड्या थोड्या अंतरावर मंडप बांधून दिलेले आहेत. दर १०-१५ मिनिटांनी ते आजूबाजूला थोडी गर्दी जमली कि काही मिनिटांचा खेळ सुरु करतात. मागे ३-४ वादक, एखादा गायक बसलेले असतात, ते गाणी म्हणतात आणि त्या तालावर मध्यभागी नर्तक किंवा आगीचे खेळ करणारे कलावंत आपली कला सादर करतात. पण प्रत्येकच ठिकाणी टीप देणे मध्यमवर्गीय मंडळींना सोपे नाही. त्या कलाकारांची मेहनत दिसून येते. दर १५-२० मिनिटात नव्या खेळाला सज्ज व्हावे लागते. रोज रोज हे करून काही जणांच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो, किंवा एकसुरीपणा दिसतो. ज्यांचा स्वभावच हसतमुख असतो असे कलाकार तरी हसत कला सादर करतात. एखाद दुसऱ्या खेळात ठीक आहे, पण आपल्याला प्रवेशालाच १००० किंवा अधिकचा चुना लागलेला असतो. पाण्याच्या बाटल्या, फिरत फिरत काही मुलांचे गेम्स, मुलांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी, काही आपल्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी अशा अनेक ठिकाणी आपला खिसा रिकामा होत असतो. त्यांना १००० रुपयांची थाळी खाणारे लोक श्रीमंत वाटत असतील, आणि ज्यांच्यासाठी १००० रुपये चिल्लर आहे असेही लोक तिथे नक्कीच येऊन जात असतील. पण आपण इतकी वारेमाप दौलतजादा करण्याइतकेही मालदार नसतो. त्यामुळे २-४ खेळ बघितले कि पुढे आपला हात आखडता होतो. प्रत्येक सादरीकरणानंतर बक्षीस मागणे हि त्यांची मजबुरी, आणि आपल्या मर्यादेबाहेर त्यांच्याकडे कानाडोळा करणे हि आपली मजबुरी. इथे सादर होणारे खेळ चांगले आहेत. कुठलंही सादरीकरण अगदी अत्युच्च दर्जाचा असतं असं नाही, पण राजस्थानमध्ये येऊन इथल्या संस्कृती, खेडेगावांची तोंडओळख करून घेत, इथल्या विविध कला एका ठिकाणी काही तासात अनुभवायला मिळते. सर्व लोक आपापल्या कुटुंब मित्रपरिवारासोबत मजा करायला आलेले असतात. संध्याकाळी आल्हाददायक वातावरण असतं त्यामुळे तिथे वेळ छान जातो. महागडं मात्र नक्कीच आहे. त्यांनी प्रवेश शुल्कात कुल्फी, मसाला दूध असे जे काही अधिकचे पर्याय आहेत तिथे एक कुपन देऊन एकदा निशुल्क आणि कोणाला अधिक हवे असेल तर सशुल्क असे करायला हरकत नाही. पण एवढी लूट असूनही तिथे होणारी गर्दी पाहता ते एवढे दिलदार होतील असे वाटत नाही. i10 इथेच त्यांनी हल्दी घाटीच्या लढाईचा दिखावा, भूलभुलैया, फोटो काढण्यासाठी चिक्कार प्रॉप्स, बनारसच्या घाटाची प्रतिकृती आणि तिथे संध्याकाळी दोनदा गंगा आरती असे अनेक मनोरंजक प्रकार केलेले आहेत. राजस्थानी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने आहेत. राजस्थानच्या स्थानिक लोकांना किंवा राजस्थानमध्ये या आधी येऊन गेलेल्या लोकांना इथे काही नावीन्य वाटणार नाही, किंवा पैसे वसुल होत आहेत असे वाटणार नाही. पहिल्यांदा आलेल्यांना छान अनुभव मिळेल. i11 तर इथे भरपेट जेवण आणि मनोरंजनाचा आस्वाद घेतल्यावर आमचा दिवस संपला. पहिल्याच दिवशी असं जोरदार मनोरंजन करून मात्र आम्ही मुलांच्या दृष्टीने थोडी चुक केली असंही वाटून गेलं. त्यांच्या दृष्टीने हि जयपूरमधली सर्वोत्तम जागा होती. कदाचित ट्रीपच्या शेवटच्या दिवशी क्लायमॅक्स सारखी संध्याकाळ इथे घालवणे आणखी उत्तम झाले असते. पण या जर तरच्या गोष्टी झाल्या. आमच्या ट्रीपची सुरुवात तर नक्कीच जोरदार झाली. क्रमशः ।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
897 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

"भटकंती" सदरात समस्या

आकाश खोत
Sun, 02/22/2026 - 18:08 नवीन
मला हा लेख "भटकंती" सदरात टाकायचा होता, पण भटकंतीवर क्लिक केल्यावर "Access Denied" असा एरर आला. यासंदर्भात कोणाला काही माहित असल्यास सांगावे.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय

श्वेता२४
Sun, 02/22/2026 - 22:10 नवीन
फोटो अजून टाका. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

भटकंती आवडली

जुइ
Mon, 02/23/2026 - 02:57 नवीन
अशा ठिकाणी किती खर्च येऊ शकतो ही माहिती देत आहात हे चांगले केले. फोटो तेवढे अधिक टाकावेत.
  • Log in or register to post comments

प्रवास वर्णन आवडले

मुक्त विहारि
Mon, 02/23/2026 - 03:58 नवीन
पुभाप्र...
  • Log in or register to post comments

अरे वा!!

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 02/23/2026 - 17:00 नवीन
मस्त सुरुवात!! पाचव्या प्रचि मधला तो महाल डोंगरातुन उगवुन बाहेर आल्यासारखा वाटतोय. :) मी मागच्या वर्षी सहकुटूंब राजस्थान ला गेलो होतो. पण आठाव्ड्यात पूर्ण होण्यासारखी ही जागा नाहीच. त्यामुळे जयपूर, जोधपूर करुन जैसलमेर केले आणि तिथुन दिल्ली आणि पुणे. त्यामुळे कुनो, उदयपूर ,नाथ द्वारा, चित्तोड गढ, माऊंट अबु सगळे राहीलेच आहे. चित्र भरपूर टाका आणि येउंद्या पटापट पुढचे भाग.
  • Log in or register to post comments

सहमत.

आकाश खोत
Tue, 02/24/2026 - 09:51 नवीन
आम्ही तिथे ८ दिवस फिरलो तरीही भरपुर काही शिल्लक आहे. त्यामुळेच आम्हीही "कव्हर" करत सुटायची गडबड न करता जिथे जाऊ ते व्यवस्थित बघायचं ठरवुन फिरलो. 
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

वाचकांचे आणि प्रतिक्रिया

आकाश खोत
Tue, 02/24/2026 - 09:51 नवीन
वाचकांचे आणि प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

चोखी धानीमधल्या लोककलांचा मी काढलेला व्हिडीओ 

आकाश खोत
Tue, 02/24/2026 - 09:52 नवीन
हा लेखात टाकायचा राहून गेला. https://youtube.com/shorts/UY36Wkc0ChU
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा