आरसा (भाषांतर)

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
10 Jun 2021 - 6:30 pm

काही वर्षांपूर्वी मी या कथेवर आधारित एक शशक लिहिली होती. त्याच संपूर्ण कथेचं हे भाषांतर.
मूळ कथा : The Mirror by Catulle Mendes

***

आरसा

त्या देशात मुळी आरसेच नव्हते. किती शोधले, तरी अगदी औषधाला सुद्धा सापडले नसते.

राणीची आज्ञाच होती ना, "तोडून टाका ते आरसे. फोडून अगदी बारीक चुरा करून टाका. कोणाच्या घरात एक एवढासा तुकडा जरी सापडला तर याद राखा. घरातल्या सगळ्यांना हाल हाल करून मारून टाकीन." यापुढे कोणाची काय बिशाद, आरसे बाळगायची!

कसली ही विचित्र आज्ञा!

हं.. त्यामागे एक रहस्य दडलं होतं.. राणी अतिशय कुरूप होती. पाहणाऱ्याचा भीतीने थरकाप होईल, इतकी कुरूप. तिला वाटे, "चुकूनसुद्धा आरशात माझं रूप दिसू नये. ती भयंकर प्रतिमा माझी मलासुद्धा बघावी लागू नये."

पण देशात इतर अनेक सुंदर स्त्रिया होत्या. एकदा राणीच्या मनात आलं, "या सगळ्या सुंदऱ्या आनंदाने आरशात बघत असतील, नटत मुरडत असतील. छे छे. मी राणी आहे. मला जे सुख नाही ते त्यांना तरी का मिळावं?" झालं. आरसे फोडण्याचं फर्मान सुटलं.

आता तुम्हीच सांगा, तरुण मुलींना हे कसं काय आवडणार? आरशात स्वतःला निरखता आलं नाही, तर काय उपयोग त्या सौंदर्याचा?

मुली म्हणाल्या, "ठीक आहे, आरसे नाहीत ना, आपण तळ्यात डोकावून पाहू, झऱ्याच्या पाण्यात पाहू."

पण राणीने हे आधीच ओळखलं होतं. तिने पक्की फरसबंदी करून झरे आणि तळी बंद करून टाकली होती. विहिरींमधून बरंचसं पाणी काढून टाकलं होतं. इतकं, की उरलेलं पाणी दिसतसुद्धा नव्हतं. बादल्या वापरायला बंदी घातली होती. फक्त उथळ भांडी वापरायला परवानगी होती. कारण बादलीतल्या पाण्यात प्रतिबिंब दिसलं तर?
किती हा दुष्टपणा! सुंदर अवखळ तरुणींना किती जाच हा. जगातल्या कुठल्याही देशात जा, सुंदर तरुण मुली असणारच, आणि त्यांच्या भावनाही एकसारख्याच असणार.
पण राणीला दयामाया नव्हती. सर्वत्र आरसेबंदी झाली, आणि राणी खूष झाली. आरसा बघून तिला जितकी चीड यायची, तितकीच चीड आरसेबंदीमुळे तिच्या प्रजेला वाटताना बघून तिला आसुरी आनंद झाला.

तिथल्या एका शहराच्या उपनगरात जसिंता नावाची एक तरुणी राहत होती. इतर तरुणींपेक्षा ती काहीशी आनंदात होती. आणि याला कारण तिचा प्रियकर, वॅलेंटिन. प्रियकराच्या नजरेत आपण सुंदर दिसावं, आणि तसं सांगण्याची एकही संधी त्याने वाया घालवू नये.. मग आरशाची गरजच काय?

"खरं खरं सांग, " ती त्याला म्हणे. " माझे डोळे कुठल्या रंगाचे आहेत?"

"दव पडलेल्या फर्गेट मी नॉट फुलांसारखे निळेशार."

"आणि माझा रंग? काळी तर नाही ना मी दिसत?"

"तुला ठाऊक आहे ना प्रिये, नुकत्याच पडलेल्या बर्फासारखा शुभ्र चेहरा आहे तुझा, आणि तुझे गाल म्हणजे जणु फुललेले गुलाब."

"आणि माझे ओठ?"

"त्यांच्यापुढे चेरीची फळं फिकी पडतील."

"आणि माझे दात? सांग ना.."

"तांदळाच्या दाण्याहूनही शुभ्र."

"आणि माझे कान? कसेतरी लाजिरवाणे दिसत नाहीत ना ते?"

"लाज? हो तर.. सुरेख कुरळ्या केसांमधून डोकावणाऱ्या दोन गुलाबी नाजुक कानांची लाज वाटायची तर वाटून घे बापडी."

त्यांचा हा प्रेमळ संवाद सतत चालत असे. वॅलेंटिन आपलं हृदय ओतून तिचं वर्णन करत असे. तिच्याकडे टक लावून पाहायला मिळतं, म्हणून तो खूष, आणि त्याच्या तोंडून आपल्या सौंदर्याचं कौतुक ऐकून ती खूष. तर अशा रीतीने आरसेबंदीमुळे जसिंता आणि वॅलेंटिनचं एकमेकांवरचं प्रेम तासागणिक वाढू लागलं, जास्त हळवं होऊ लागलं.

मग एके दिवशी वॅलेंटिनने जसिंताला लग्नाची मागणी घातली. ती ऐकून तिचे गाल लालबुंद झाले.. अं हं .. रागाने नव्हेत.

त्यांच्या प्रेमाची परिणती लग्नात होणार, इतक्यात ही बातमी त्या दुष्ट राणीच्या कानावर गेली. दुसऱ्यांचा छळ करणं हे तिचं एकमेव आवडतं काम होतं. आणि जसिंताचं सौंदर्य इतकं अप्रतिम होतं, की राणी जणु तिचा छळ करायची वाटच बघत होती.

एका संध्याकाळी जसिंता बागेत फिरत होती. लग्नाचा दिवस जवळ येत होता. तितक्यात एक जख्ख म्हातारी भिकारीण तिच्याजवळ आली. भीक मागू लागली. म्हातारीने जसिंताला पाहिलं मात्र, जणु बेडकावर पाय पडला असावा अशा वेगाने उडी मारून ती मागे सरली, आणि तिने मोठी किंकाळी फोडली, "अरे देवा! काय पाहते आहे मी हे?"

"बाई, काय झालं? काय दिसलं तुम्हाला? सांगा तरी.." जसिंता म्हणाली.

"काय दिसलं? जगातला सर्वात कुरूप प्राणी! मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात कुरूप प्राणी!"

"हो का? म्हणजे तुम्ही माझ्याकडे पाहत नव्हता हे नक्की." अगदी निष्पाप अभिमानाने जसिंता म्हणाली.

"अरे देवा! पोरी, तुलाच तर पाहते आहे मी. इतकी वर्षं काढली मी या जगात, पण तुझ्याइतकं कुरूप कोणी पाहिलं नव्हतं."

"काय? मी? आणि कुरूप?"

"नुसती कुरूप नव्हेस. मला शब्दांनी सांगता येईल त्यापेक्षा शंभरपट कुरूप!"

"पण माझे डोळे.. "

"डोळे? कसले मचूळ मातकट डोळे आहेत हे. तेही चाललं असतं म्हणा. म्हणजे, इतकी पार तिरळी नसली असतीस, तर डोळ्यांचा रंग चालून गेला असता."

"माझा रंग.."

"रंग कसला? गालांवर, कपाळावर काजळी फासली आहे जणु."

"माझा चेहरा.."

"सुकलेलं विटलेलं फूल..अशक्त फिकट नुसतं."

"आणि माझे दात.."

"हं.. आता पिवळ्या फताड्या दातांना सुंदर म्हणायचं ठरवलं, तर इतके सुंदर दात मी उभ्या जन्मात पाहिलेले नाहीत."

"निदान माझे कान तरी.."

"किती ते मोठ्ठे कान, किती लालबुंद..आधीच केसांच्या जटा.. त्यात हे विद्रुप कान. मी सुंदर नाही हे ठाऊक आहे मला, पण माझे कान जर असे असते ना, तर लाजेने जीवच दिला असता मी."

झालं. राणीने पढवलेलं बोलून संपलं. जसिंताच्या कानात गरळ ओकून झाल्यावर थेरडी क्रूरपणाने बेडकासारखी हसली, आणि गडबडीने तिथून नाहीशी झाली.

बिचारी जसिंता.. सफरचंदाच्या झाडाखाली जमिनीला खिळून ती तशीच उभी राहिली. तिला अश्रू अनावर झाले होते.

वॅलेंटिनने तिला समजवायचे किती प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्याने अनेक शपथा घेतल्या, पण जसिंताचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तिचं दुःख ओसरत नव्हतं.

"मी कुरूप आहे.. मी कुरुप आहे.. " ती एकसारखी म्हणत बसे.

ती वॅलेंटिनला सांगे, "जा.. दूर निघून जा. माझ्याजवळ सुद्धा येऊ नकोस. तुला माझी कीव येत असणार, म्हणून तू काहीतरी खोटंनाटं रचून सांगत होतास मला. आता माझ्या लक्षात येतंय, तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस. फक्त माझी कीव केलीस. ती म्हातारी भिकारीण कशाला खोटं सांगेल? खरंच असणार ते. मी कुरूप आहे. तुला माझ्याकडे पाहावतं तरी कसं?"

तिची समजूत पटावी म्हणून वॅलेंटिनने दूरदूरवरून माणसं बोलावली. त्यांची साक्ष काढली.

एकजात सगळे पुरुष म्हणाले, "आम्हाला नेत्रसुख मिळावं म्हणून देवाने घडवली आहे हिला."

सगळ्या स्त्रियांनीही जसिंता सुंदर असल्याची साक्ष दिली.. तशी कबुली द्यायला त्या फारशा उत्सुक नव्हत्या म्हणा, पण तरीही.. दिलीच एकदाची.

इतकं करूनही पोरगी बिचारी हबकलेलीच होती. आपण कुरूप आहोत हे तिच्या मनातून जात नव्हतं.

वॅलेंटिनने तिला गळ घातली, "चल, आपल्या लग्नाची तयारी करूया. कोणता दिवस निवडायचा आपण?"

ते ऐकताच ती जोरात किंचाळली, "लग्न! नाही, नाही, अजिबात नाही. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तुला इतकी कुरूप बायको मिळालेली मला नाही चालणार."

बिचारा वॅलेंटिन..कल्पना करा, तो किती निराश झाला असेल.. त्याने अक्षरशः गुडघे टेकून तिच्या विनवण्या केल्या, हात जोडून तिची प्रार्थना केली. तिच्याकडे प्रेमाची भीक मागितली. पण तिचं उत्तर बदललं नाही. "मी इतकी कुरूप.. तुझ्याशी लग्न करायची लायकी नाही माझी."

आता काय करावं? वॅलेंटिनला काही सुचेना. त्या थेरडीचे खोटारडे शब्द उलटवून तिच्या घशात घालायचे, आणि जसिंताला खरं काय ते समजावून द्यायचं, तर त्यासाठी एकच मार्ग होता. तिच्यासमोर आरसा धरणे! पण अख्ख्या देशात आरसा नावाची चीज उरली नव्हती. सगळा देश राणीच्या दहशतीपुढे चळाचळा कापत होता. त्यामुळे एखादा आरसा बनवून द्यायला कोणी कारागीर तयार झाला नसता.

शेवटी निराशेच्या भरात वॅलेंटिनने ठरवलं, "मी राणीच्या दरबारात जाईन. राणीचा स्वभाव कडक आहे, ठाऊक आहे मला. पण जसिंतासारख्या सुंदर मुलीचे अश्रू पाहून तिला नक्कीच दया येईल. निदान थोड्या तासांसाठी तिने तिची ती क्रूर आज्ञा मागे घेतली, तर.. आमचा प्रश्न सुटेल!"

त्याने जसिंताला आपल्याबरोबर बोलावलं. पण ते काही तितकंसं सोपं नव्हतं. ती तयार होईना.

"मला कोणासमोर जाऊन माझं हे कुरूप तोंड दाखवावंसं वाटत नाही. आणि हवाय कशाला तो आरसा? माझंच दुर्दैव माझ्यावर पुन्हापुन्हा ठसवायला?"

वॅलेंटिन रडू लागला. ते पाहून जसिंताचं हृदय विरघळलं, आणि त्याला बरं वाटावं, म्हणून शेवटी ती त्याच्याबरोबर राणीकडे जायला तयार झाली.

"कसला गोंधळ आहे हा? कोण आहेत ही माणसं? कशाला आली आहेत इथे?"

"राणीसरकार, मी जगातला सर्वात दुर्दैवी प्रियकर तुमच्यासमोर उभा आहे."

"प्रत्यक्ष राणीला त्रास द्यायचं हे कारण?"

"माझ्यावर दया करा, राणीसरकार!"

"तुझ्या प्रेमप्रकरणाशी माझा काय संबंध?"

"एका आरशापुरती परवानगी द्यावी, राणीसरकार.. "

राणी ताड्कन उभी राहिली. संतापाने थरथर कापू लागली. तिचे दात करकर रगडू लागले. "कोण रे तू, माझ्यासमोर आरशाचं नाव काढणारा?"

"अशा रागावू नका, राणीसरकार. दया करा.. हात जोडतो.. माझं जरा ऐकून घ्या. ही इथे उभी असलेली सुंदर तरुणी पहा. तिला एक विचित्र भास झाला आहे. आपण कुरूप आहोत अशा कल्पनेने तिला घेरलं आहे."

राणीने एक दुष्ट हास्य जसिंताकडे फेकलं. "मग? खरंच आहे ते. हिच्यापेक्षा कुरूप असं कोणी मी आजपर्यंत पाहिलेलं नाही."

राणीचे हे निर्दयी शब्द ऐकल्यावर जसिंताला स्वतःची लाज वाटू लागली. तिच्या मनात आलं, "यापेक्षा मरण आलं तर बरं. प्रत्यक्ष राणीसरकार सांगताहेत, म्हणजे मी नक्कीच अतिशय कुरूप असले पाहिजे. संशयाला जागाच उरलेली नाही." तिने डोळे मिटून घेतले. भावनेच्या भरात तिची शुद्ध हरपली आणि धाड्कन ती सिंहासनाच्या पायऱ्यांवर कोसळली.

आणि वॅलेंटिन? तो संतापाने खवळून उठला आणि मोठ्याने किंचाळला, "राणीसरकार, हे साफ खोटं आहे. तुमचं डोकं फिरलं असलं पाहिजे."

पुढे तो आणखी काही बोलणार, इतक्यात सैनिक पुढे झाले, आणि त्यांनी वॅलेंटिनला ताब्यात घेतलं. राणीने खूण करताच मारेकरी पुढे झाला. तो सतत तिच्या सिंहासनाशेजारी उभा असे. कोण जाणे, कधीही गरज लागेल, म्हणून.

"हं .. कर तुझं काम." राणीने वॅलेंटिनकडे बोट दाखवलं. मारेकऱ्याने कुऱ्हाड उचलली. कुऱ्हाडीचं पातं लख्खकन चमकलं. नेमकी त्याच क्षणी जसिंता शुद्धीत आली, आणि तिने डोळे उघडले.

क्षणार्धात दोन जोरदार किंकाळ्या आसमंत भेदून गेल्या.

एक होती आनंदाची.. त्या चमकत्या पात्यामध्ये जसिंताला आपलं रूप दिसलं होतं.. केवळ अप्रतिम सौंदर्य..

दुसरी होती तीव्र संतापाची.. त्याच क्षणी, त्याच तात्पुरत्या आरशामध्ये, राणीला आपला कुरूप आणि दुष्ट चेहरा दिसला होता..

***

वाङ्मयकथाभाषांतर

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

10 Jun 2021 - 6:43 pm | कुमार१

छान. आवडली.

पाषाणभेद's picture

10 Jun 2021 - 6:44 pm | पाषाणभेद

व्वा छान आहे कथा.

गुल्लू दादा's picture

10 Jun 2021 - 7:46 pm | गुल्लू दादा

आवडलं. शेवटचा ट्विस्ट आवडला. दुसरी किंकाळी राणीची होती हे ऐकून सुकून वाटला.

सौन्दर्य's picture

10 Jun 2021 - 10:47 pm | सौन्दर्य

एकदम छान कथा.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

10 Jun 2021 - 11:02 pm | सौ मृदुला धनंजय...

कथा आवडली.

कॉमी's picture

10 Jun 2021 - 11:07 pm | कॉमी

झक्कास कथा !

गॉडजिला's picture

11 Jun 2021 - 8:58 am | गॉडजिला

ते पातं खाली आलं की नाही ?

बिचारा वॅलेंटींन मराला...

स्मिताके's picture

11 Jun 2021 - 6:29 pm | स्मिताके

असाच प्रश्न मलाही पडला होता. शशक मध्ये मी थोडं स्वातंत्र्य घेऊन, किंकाळ्यांमुळे मारेकरी दचकला आणि वॅलेंटिन पळाला असा शेवट केला होता. पण मूळ कथा दोन किंकाळ्यांवर संपली आहे.

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2021 - 5:10 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप छान ! परिणामकारक !

तुषार काळभोर's picture

11 Jun 2021 - 5:33 pm | तुषार काळभोर

एका राणीच्या टोकाच्या हट्टापायी बिचारा व्हॅलेंटिन जीवाला मुकला!

स्मिताके's picture

11 Jun 2021 - 6:32 pm | स्मिताके

कुमार१, पाषाणभेद, गुल्लू दादा, सौन्दर्य, सौ मृदुला धनंजय..., कॉमी, गॉडजिला, चौथा कोनाडा, तुषार काळभोर

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

स्मिताके's picture

14 Jul 2021 - 9:55 pm | स्मिताके

म्हणजे खरंच, ही कथा यूट्यूबवर ऐका..

श्री. आणि सौ. चौथा कोनाडा यांनी केलेले आरसा या कथेचे अभिवाचन यूट्यूबवर कलामंच चॅनेल वर प्रकाशित झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=z2ANyopGqFk

तुषार काळभोर's picture

15 Jul 2021 - 6:32 am | तुषार काळभोर

मागच्या वर्षी चौ को यांनी रामदास यांच्या कथेचं सुंदर अभिवाचन केलं होतं.
ही कथा सुद्धा मस्त सादर केली आहे.
तिघांचं अभिनंदन!

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2021 - 9:09 pm | चौथा कोनाडा

खुप खुप धन्यवाद, तुषार काळभोर !
👍

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2021 - 9:05 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद & थॅन्क्यु व्हेरी मच स्मिताके !
💖