असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला
जसा माझ्या रोमरोमी तुझा छंद दाटलेला
मेघांच्या रुपेरी कडा एकाएकी काजळल्या
तुझ्या मीलनाच्या आशा मनामध्ये उजळल्या
खळाळून वाहे पुन्हा झरा जसा आटलेला
इंद्रधनू झूल्यावर मन उंच झोके घेई
कधी तुझ्या वाटेवर चातक होऊन जाई
(जसा पाऊस होऊन तूच त्याला भेटलेला!)
लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे
तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे
मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला
अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना
ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना
साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला