माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, 'काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?' असे ओरडायची.