✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!

म
मार्गी यांनी
Sun, 04/18/2021 - 18:49  ·  लेख
लेख
सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं. सूर्यास्ताच्या आधीच मंगळ चंद्राच्या पलीकडे गेलेला होता. ठीक ७:२१ ला चंद्राच्या बिंबापलीकडून मंगळ परत समोर आला. माझ्या टेलिस्कोपमधून ह्याचे फोटोज व व्हिडिओज घेता आले. नुसत्या डोळ्यांनीही हे दृश्य बघता आलं. पण चंद्र मंगळाहून फार जास्त तेजस्वी असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी तो दिसण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला व चंद्रापासून थोडा दूर आल्यानंतरच मंगळ दिसला. मंगळ बाहेर येताना टेलिस्कोपमधून घेतलेला व्हिडिओ इथे बघता येईल. काल पंचमीची कोर होती आणि चंद्र व मंगळ वृषभ राशीमध्ये व अग्नी ता-यापासून दक्षिणेला साधारण साडेपाच अंश म्हणजे आपण बघताना हात पूर्ण लांब केल्यास हाताची तीन बोटे मावतील इतक्या अंतरावर होते. ह्यावेळी मृग नक्षत्र, ब्रह्महृदय तारकासमूह, रोहिणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, व्याध, पुनर्वसू नक्षत्र, प्रश्वा, सप्तर्षी आदि ठळक तारे व तारकासमूह सहजपणे बघता आले. चंद्र आपल्यापासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे आणि मंगळ ह्यावेळी सुमारे २९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तरीही ह्या दोघांसह पृथ्वीचे एका रेषेमध्ये येणे आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. आपले छोटेसे डोळेही अतिशय दूर अंतरावरची अशी अद्भुत दृश्यं बघू शकतात.  अशा अनेक खगोलीय दृश्यांना बघण्यासाठी आपले डोळे "उघडे" मात्र असावे लागतात. आपण जवळ जवळ नेहमी आपल्या समस्या व अहंकारामध्ये अडकलेलो असतो. पण जेव्हा आपण आकाशातले असे सुंदर नजारे व इतक्या विराट अंतरावरचे दृश्य किंवा आपल्याहून लाख- कोटी पट मोठे तारे किंवा आपल्या सूर्यापासून हजारो प्रकाशवर्ष दूर अंतरावरचे तारे बघतो तेव्हा आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होते! आपली पृथ्वीच इतकी नगण्य आहे की आपली तर गणतीच होऊ शकत नाही! आणि त्या संदर्भात मग आपला अहंकार किती व्यर्थ आणि आपल्या समस्यांचं स्थान किती नगण्य ही जाणीव होते. आणि त्याबरोबर हेही जाणावतं की, आपले इतके चिमुकले डोळेही ह्या विराट रंगमंचावरची अशी दृश्य बघू शकतात. हजारो प्रकाश वर्ष लांब अंतरावरचे तारे व आकाशगंगा आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी बघता येणं हा मोठाच चमत्कार नाही का?   कालच्या घटनेसंदर्भात अजून एक गोष्ट महत्त्वाची ही की, ती बघण्यासाठी ज्या प्रकारे चंद्र- मंगळ एका रेषेत येणं आवश्यक होतं, अगदी तसंच बघणारा दर्शकही आवश्यक होता. अशा घटनेच्या निरीक्षणामध्ये बघणारा दृष्टा महत्त्वाचा असतो. जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो. -निरंजन वेलणकर (niranjanwelankar@gmail.com, ०९४२२१०८३७६). २१ डिसेंबर २०२० रोजीच्या गुरू- शनी युतीचे फोटोज, व्हिडिओ व त्यासंदर्भातला अनुभव इथे वाचता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2020/12/blog-post.html
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भूगोल
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
8807 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

छान लिहिले आहे

मुक्त विहारि
Sun, 04/18/2021 - 18:55 नवीन
तुम्हाला, ग्रहण वगैरे बघायची आवड दिसते...
  • Log in or register to post comments

सजग बघणार्‍याकडेही दुर्बिणही

सतिश गावडे
Sun, 04/18/2021 - 19:58 नवीन
सजग बघणार्‍याकडेही दुर्बिणही हवी ना :)
  • Log in or register to post comments

फक्त दुर्बिण असून फायदा नाही

मुक्त विहारि
Sun, 04/18/2021 - 20:17 नवीन
आवड पण हवी आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ, ग्रहण बघण्यासाठी, जगांत कुठेही जातात... ग्रहण जर ऑस्ट्रेलिया मध्ये असेल तर, तिथे जातात... खगोलशास्त्र, हा त्यांचा आवडता विषय आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ज्याला आकाशनिरीक्षणाची आवडच

सतिश गावडे
Sun, 04/18/2021 - 20:28 नवीन
ज्याला आकाशनिरीक्षणाची आवडच नाही तो आकाशनिरीक्षणासाठी लागणारी दुर्बिण घेईलच कशाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बाइनो घ्यावी.

कंजूस
Mon, 04/19/2021 - 10:59 नवीन
तीन कामांना उपयोगी पडते. पक्षी,आकाशदर्शन आणि हिल स्टेशनला. न्यायला आटोपशीर. 8x40 साइजची ओलिम्पस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे पटले ....

मुक्त विहारि
Mon, 04/19/2021 - 11:31 नवीन
तुझे बरोबर आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जाहिरात

मदनबाण
Sun, 04/18/2021 - 20:05 नवीन
जाहिरात :- कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन) पुन्हा एकदा चंद्र दर्शन...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana Mogudu
  • Log in or register to post comments

फोटो एकदम छान आलेत.

प्रचेतस
Sun, 04/18/2021 - 20:35 नवीन
फोटो एकदम छान आलेत.
  • Log in or register to post comments

फोटो आणि व्हिडिओ छान! सुंदर

Bhakti
Sun, 04/18/2021 - 20:56 नवीन
फोटो आणि व्हिडिओ छान! सुंदर माहिती. कायप्पावर या घटनेचा एक खुपचं स्पष्टपणे दिसणारा व्हिडिओ फिरतोय,खुपचं जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments

एक विशेष अनुभव

चौकटराजा
Sun, 04/18/2021 - 22:15 नवीन
तुमचा ब्लॉग वाचला व ते विडीओ ही पाहिले ! प्रचंड आभारी आहे ! शनि व गुरु एकाच वेळी इतक्याजवळ (???? ) पाहिल्यामुळे आनद झाला !
  • Log in or register to post comments

यु आर्‍ अमेझिंग

गॉडजिला
Sun, 04/18/2021 - 23:23 नवीन
किप इट अप
  • Log in or register to post comments

अतिशय छान फोटो

तुषार काळभोर
Mon, 04/19/2021 - 09:02 नवीन
पिधानाचे फोटो काढण्याची तांत्रिक माहिती वाचायला आवडेल. कॅमेरा, सेटिंग, लेन्स, इत्यादी.
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/19/2021 - 09:17 नवीन
पिधानपुराण आवडले, फोटो आणि व्हिडिओ ही छान आहेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सजगता

गॉडजिला
Mon, 04/19/2021 - 11:47 नवीन
जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो. हे काहीतरी नवीन आहे अजुन स्पष्ट करु शकाल काय ? की हाच पॅरा परत एकदा सजग होउन बघितला तर समजुन जाइल ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Mon, 04/19/2021 - 14:03 नवीन
वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!!! :) @ सतीश गावडे जी, तुमचा मुद्दा बरोबरच आहे. म्हणून तर मी लिहीलं आहे की, नुसत्या डोळ्याने बघता येणा-याही खूप सुंदर आकाशस्थ गोष्टी आहेतच. तोही आकाश दर्शनातला एक मोठा भाग आहे- अगदी एक डोमेन असल्यासारखा. @ तुषार काळभोर जी, हे फोटोज मी माझ्या सव्वाचार इंची रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून घेतले आहेत. ११४/५०० हा टेलिस्कोप आहे. २५ पट झूम व त्यामध्ये ३ पट डिजिटल झूम. मोबाईल कॅमेरा मोबाईल एडप्टरने सेट केला होता. पण मी म्हणेन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याची जी मजा असते व तो अनुभव जितका मोठा असतो, तितकी मजा फोटोत येत नाही! कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! फोटोज/ व्हिडिओज हे केवळ ५% झलक म्हणून ठीक आहे. असो. @ गॉडजिला जी! ह्याचा अर्थ हाच आहे की, जर एखाद्या गोष्टीवर आपली सजगता असेल, तर ती आपल्याला "दिसते." अन्यथा दिसत नाही. जर आपण गर्दीमध्ये आपल्या मुलाला शोधत असू, तर बाजूनेच गेलेला जवळचा मित्रही "दिसत"‌ नाही, कारण तिकडे लक्ष/ सजगता/ ध्यान गेलेलं नसतं. सवयीने हे लक्ष/ सजगता आपण चालू/ बंद करू शकतो. असो.
  • Log in or register to post comments

ओके ओके

गॉडजिला
Mon, 04/19/2021 - 14:48 नवीन
सजगता म्हणजे फोकस काय... अच्छा. छान समजावलेत. मला वाट्ले होते जर आपण सजग असु तर मुलाला शोधता शोधता आपला मित्रही आपल्याला दिसु शकेल व मुलगाही सापडेल वगैरे वगैरे काही असावे. स्पष्टीकरणासाठी धन्यवाद मार्गीजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्गी

हे फोटोज मी माझ्या सव्वाचार इंची रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून घेतले

तुषार काळभोर
Mon, 04/19/2021 - 15:48 नवीन
ओह! मला वाटलं की कॅमेरा ट्रायपॉड्ला लावून, एखादी टेलीफोटो लेन्स वापरून काढलेत. कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! >> शिवाय फोकस, डायनॅमिक रेंज, ऑटो-अ‍ॅपर्चर हे सगळं (सध्यातरी) कॅमेर्‍यापेक्षा भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्गी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा