प्रिय.. ,
नेहमीप्रमाणे आजही, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही मायन्याशी अडखळतेय मी. अशी कित्येक पत्र पाठवलीत. दरवेळी तुमच्याकडून तत्परतेनी उत्तर आलं. यावेळी ती अपेक्षा नाही.
आज सकाळपासून आपल्या एकत्र आयुष्याचा सारिपाट डोळ्यांपुढे उलगडलाय. चुकलेल्या चाली, सावरून घेतलेले डाव सारं काही. नवं नवरीपण जाऊन, पुरती गृहिणी होऊन फुललेल्या संसारात तुमच्याबरोबर कधी रमले ते कळलं नाही. माझ्या भित्र्या, संकोची स्वभावाला तुमच्या निर्भिड, रोकठोकपणाचं balance out , हो हा देखील तुम्हीच शिकवलेला शब्द, करणारं व्यक्तिमत्व सावरून घेत गेलं. 'घरात कुठली भाजी करायची' पासून ते 'नवं घर घेण्यापर्यंत' प्रत्येक निर्णयात तुमची गरज लागली मला. स्वत:चं वेगळेपण असावं असं वाटलंच नाही. त्यावाचून काही अडलंदेखील नाही. ही अशीच साथ जन्मभर पुरावी ही त्या जगन्नीयत्याला मनोमन प्रार्थना केली, अगदी रोज! पण सगळ्याच प्रार्थना कुठे सुफळ होतात?
गेल्या कित्तेक महीन्यांपासून तुम्हाला गलीतगात्र बघतेय. एकेका दिवसागणिक धीर खचत जातोय. थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी येऊन सांगीतलंय, आता फक्त काही तास फार तर एखाद दिवस मोजा. अनुज पाठीवरून हात फिरवत माझी समजूत घालतोय, "आई, धीर धर! बाबांना आपण आणखी एखाद्या डॉक्टरना दाखवु". आणि काय सांगु, जन्मभर केवळ तुमच्या तोंडाकडे बघत निर्णयासाठी वाट पहात थांबलेली मी त्याला म्हणतेय, "डॉक्टरना विचार, वेंटीलेटर कधी काढायचं म्हणताहेत ते!"
जागे असता, तर तुम्हाला खूप अभिमान वाटला असता माझा! मी लेचीपेची बाई हो, कणखर कशी होईन? पण ती चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली रेशीमगाढ खूप पक्की आहे, हे तुम्हीच सांगीतलय ना पदोपदी?
आज कसली आठवण होतेय माहीती आहे? आपलं नवं घर घेताना मी माहेरी होते. तुम्हाला मुक्कामी पोचून घर घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मी पूर्ण विश्वासानं तो निर्णय तुमच्या हातात दिला होता.
असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच. ती रेशीमगाठ अगदी पक्की आहे यावर खूप विश्वास आहे माझा! माझी काळजी करु नका. जीव गुंतवु नका.
तुमच्या निरोपाची वेळ समीप आलीय! अश्रु जुमानत नाहीत. आणि कितीही नाही म्हंटलं तरीही हा माझा खुळा जीव घोटाळतोय, माझे डोळे कोरडे करणार्या हातांची वाट बघंत!..
--- अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुमच्या सोबतीला येणारी तुमचीच..!
प्रतिक्रिया
17 Feb 2009 - 4:06 am | विंजिनेर
नेटकं आणि छोटेखानी लेखन! छान उतरलं आहे.
हे लेखन काल्पनिक आहे का तुमच्या पहाण्यात आले आहे माहीत नाही पण वाचून असे वाटले की जर ह्याच्यात एखादी गुंफलेली कथा असती तर(शेवट हाच.) वाचायला जास्त आवडलं असतं.
17 Feb 2009 - 5:27 am | विसोबा खेचर
असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच.
लै भारी!
तात्या.
17 Feb 2009 - 5:39 am | त्रास
असलं काही सकाळी सकाळी वाचायाला मिळेल असे वातले नव्हते. ~X(
17 Feb 2009 - 6:25 am | रामदास
डोळ्यात पाणी आणलं हो तुम्ही.
मला हा लेख एका मोठ्या कादंबरीचा अखेरचा परीच्छेद वाटला.
17 Feb 2009 - 6:32 am | अनिल हटेला
सहमत ~!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
17 Feb 2009 - 7:00 am | केशवराव
म्रूण्मयी ,
काहीच्या काही सुंदर लिहीले आहेसच ; पण हे काय आहे? मन सैरभैर झाले. हे सर्व कोणाचे मनोगत? कुठून आणलेस हे ? सकाळी सकाळी मन अस्वस्थ झालेच ;पण बर्याच गोष्टींचा उलगडाही झाला नाही. लिखाणाबद्दल १०५/१०० मार्कस देता येत नाहीत म्हणून १०० देतो. मार्क लिखाणाला देवू कि त्या भावनांना देवू? मी कित्येक जणांच्या अखेरच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अगदी ३ महीन्यांपूर्वी माझे ९८ वर्षांचे वडील मला सोडून गेले तेव्हाही मी त्यांच्या ऊशाशी बसून होतो. त्या वेळच्या भावना मी अनूभवल्या आहेत. तरी पण तूझ्या लिखाणानी मन हलले. जबरदस्त ताकद आहे ह्या लेखात. [ ती कसली आहे ते उमगले नाही ; तुझ्या भाषा शैलीची म्हणावी तर तुझ्या भावनांचा मी अपमान तर करीत नाहीना?]
वेड लावलेस एवढे खरे!!!
17 Feb 2009 - 7:22 am | आनंदयात्री
छान लिहले आहे. कृपया लेखन काल्पनिक असेल तर तसे इथे कुठेतरी प्रतिसादात लिहा.
17 Feb 2009 - 7:24 am | दशानन
अत्यंत सुदंर ! हेलावलो आतून !
विचार व्यक्त करावेत मनाने तर असे !
17 Feb 2009 - 8:06 am | सहज
वाचुन एकदम सिरीयस केले.
छोटा पण अतिशय दमदार लेख!
18 Feb 2009 - 2:31 am | शितल
सहमत. :)
17 Feb 2009 - 8:09 am | मैत्र
तुमची शैली खूप सुंदर आहे आणि शब्दयोजना त्याहून चांगली. कुठेही विनाकारण जड न होता इतकं हेलावणारं लिहिणं अवघड आहे. अप्रतिम...
17 Feb 2009 - 8:50 am | झेल्या
केवळ अप्रतिम!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
17 Feb 2009 - 10:56 am | समिधा
खरचं वाचुन डोळ्यात पाणी आले.
तुमच्या निरोपाची वेळ समीप आलीय! अश्रु जुमानत नाहीत. आणि कितीही नाही म्हंटलं तरीही हा माझा खुळा जीव घोटाळतोय, माझे डोळे कोरडे करणार्या हातांची वाट बघंत!..
--- अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुमच्या सोबतीला येणारी तुमचीच..!
अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहीला. अप्रतिम.. =D>
17 Feb 2009 - 11:14 am | संजय अभ्यंकर
तुमच्या लेखाने हलवून टाकले!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
17 Feb 2009 - 11:22 am | जागु
खुप मनाची ताकद वापरली आहे नायीकेने. तुमचे लिखाण खुपच छान आहे.
17 Feb 2009 - 8:14 pm | मृण्मयी
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!
लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं!
'एखाद्या मोठ्या कथेचा किंवा कादंबरीचा अखेरचा भाग असावा' असं बर्याच जणांना वाटलं. पण ते तसं नाही.
17 Feb 2009 - 8:16 pm | छोटा डॉन
>>लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं!
हुश्श्श ऽऽऽऽ
ह्याच प्रतिसादाची वाट पहात होतो खरेतर ...
काळीज चिरले जावे, मन ओथंबुन यावे असे हे लिखाण होते.
काही क्षण अगदीच "भरुन आले आहे व कधीही बांध फुटु शकतो" असे गेले होते ...
मग त्यासाठीच प्रतिसाद द्यायच्या आधी वाट पहात होतो ...
एकदम उच्च लिखाण, अगदी क्लासच ...!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Feb 2009 - 5:49 am | लवंगी
वाचून मन कसनुस झालेल.. आता बर वाटल..
17 Feb 2009 - 11:53 pm | प्राजु
खरंच काळजात चर्रर्र.. झालं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Feb 2009 - 12:13 am | शशिधर केळकर
खर्या अर्थाने हृदयस्पर्शी लिखाण! कोणाचे व्यक्तिगत लेखन वाचताना वाटावा तसा संकोच ही वाटून गेला - इतकं वास्तवदर्शी! <लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं!> हे वाचून समाधान झालं.
18 Feb 2009 - 4:40 am | बेसनलाडू
(भावुक)बेसनलाडू
18 Feb 2009 - 6:02 am | मुक्तसुनीत
मला हा कथा किंवा कादंबरीचा एक भाग न वाटता , एक स्वयंपूर्ण कथाच वाटते ! सार्या आयुष्याचे संदर्भ आहेत , पण कथा आहे एका क्षणाबद्दलची. एक असा क्षण जो आपल्या सर्वांना न चुकणारा आहे केव्हा ना केव्हा तरी. कथेचे शीर्षक असे शकते "निरोप".
18 Feb 2009 - 6:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पत्रलेखन केवळ सुंदर ! शेवटच्या ओळी वाचतांना हेलावून गेलो. कोणत्या तरी कादंबरीचे शेवटचे हुंदका फुटणारे पान वाचले असे वाटले.
लेखन काल्पनिक असेल तर चांगले होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
18 Feb 2009 - 7:48 am | ब्रिटिश
मस्तच लीवलय
>>>कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे , अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थ रामदास.
मानसाला यवड कलालं क दुख होत नाय. मन खंबीर व्हत.
मिथुन काशिनाथ भोईर
18 Feb 2009 - 11:10 pm | सर्किट (not verified)
प्रतिसाद काढलेला आहे.
- सर्किट
18 Feb 2009 - 7:40 pm | मृण्मयी
पुन्हा एकदा, अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद!
सर्किट, अश्या दुर्दैवी परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य आपल्याला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
18 Feb 2009 - 7:50 pm | अनुजा
अप्रतिम ! शब्दच नाहीत वर्णन करायला......
18 Feb 2009 - 7:56 pm | लिखाळ
हृदयाला हात घालणारे लेखन.. फार सुंदर..
-- लिखाळ.
19 Feb 2009 - 2:06 pm | प्रकाश घाटपांडे
नका वाचायला लावु असलं. त्रास होतो.
नि:शब्दप्रकाश घाटपांडे