माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते.
गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात. गाईड्स असतात, ट्युशन मध्ये उत्तरे पाठ करून घेतली जातात. अगदी निबंध सुद्धा रेडीमेड असतात. तेच पाठ करायचं आणि परीक्षेला जायचं. परीक्षा द्यायची आणि मार्क्स मिळवायचे. मार्कांची हि धडपड शाळा सुरु झाल्यापासून (बालवाडीपासून) सुरु होते. मार्क्स मिळतात पण शिक्षण बाजूलाच पडतं. मार्क्स मिळविण्यासाठी घोकंपट्टीचा मार्ग स्विकारला जातो. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपाने मार्क्स वाढत असतील पण धड्यातली मजाच जाते. अभ्यास कंटाळवाणा होऊ लागतो.
काल माझ्यासमोर एक मुलगा विज्ञानाचे पुस्तक वाचत होता. धडा होता 'World of Matter'. धड्यातला पहिला परिच्छेद खूप छान आहे. तो वाचून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तुला ह्यातलं काय समजलं?" त्याने पुस्तकातली वाक्यं जशीच्या तशी मला ऐकवली. मी पुन्हा विचारलं, "म्हणजे काय?" आता तो गडबडला. धड्यात काय लिहिलंय त्याचा त्याच्या आयुष्याशी संबंध जोडणं त्याला जमत नव्हतं. matter म्हणजे काय हे सांगताना आजूबाजूची उदाहरणं देणं त्याला जमत नव्हतं. ह्याचा अर्थ असा नाही कि, तो मठ्ठ होता. पण पाठ्यपुस्तकातल्या गोष्टी फक्त परीक्षेतच लिहायच्या असतात असा त्याचा समज झाला होता. आणि त्या तो अर्थ न लावता पाठ करत होता. अशी कितीतरी मुलं आज दिसतात. प्रश्नाची उत्तरे पूर्णविराम, स्वल्पविरामासह पाठ करणारी मुलं सुद्धा आहेत.
'घोकंपट्टी' हा मार्ग खरंतर फार पूर्वीपासून शाळांमध्ये वापरला जातो. पाढे, कविता, सुत्रे ह्या गोष्टींसाठी पाठांतराचा मार्ग पूर्वीपासून वापरला जातो. पण निबंध, प्रश्नांची उत्तरे ह्या गोष्टीही जेंव्हा पाठ केल्या जातात, तेंव्हा विचार करण्याची शक्ती खुंटते. एखादी गोष्ट अर्थ न समजता पाठ केली कि, तात्पुरती लक्षात राहते. त्या गोष्टीमागचा तरतमभाव समजून घेतलाच जात नाही. सुरुवातीला चांगले मार्क्स पडतात म्हणून आई-वडील खुश असतात पण इयत्ता वाढत जाते तशी लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. म्हणूनच, "चौथी पर्यंत किंवा सातवी पर्यंत खूप चांगला अभ्यास करायचा पण नंतर अचानक खूपच मागे पडला/ पडली" अशा अर्थाची वाक्यं पालकांकडून येऊ लागतात. शिक्षण म्हणजे विचार करणं. शिक्षण म्हणजे व्यक्त होता येणं. शिक्षण म्हणजे अनुभव घेणं. जागं होणं. न समजता घोकंपट्टी केली कि, ह्या गोष्टी मागे पडतात. आणि "सब कुछ सिखा हमने न सिखी होशियारी.." असं म्हणण्याची वेळ येते.
ह्या घोकंपट्टी च्या पद्धतीला जबाबदार कोण? असा प्रश्न पुढे आल्यानंतर, नेहमी दोन बाजू पुढे येतात. १) पालकांना मुलांचे मार्क्स हवे असतात. त्यामुळे, मार्कांच्या दृष्टीने शिक्षकांना शिकवावंच लागतं. हि शिक्षकांची बाजू. आणि २) हल्ली, सगळीकडेच मार्क्स महत्त्वाचे आहेत. प्रवाहाच्या दिशेने पोहावंच लागतं, हि पालकांची बाजू. दोन्हीही गोष्टी अगदी मान्य. शिक्षणाचे बाजारीकरण झालं आहे, असा मुद्दा मांडणारेही बरेच असतात. 'पूर्वीसारखं शिक्षण राहिलेलं नाही,' ह्यावर सगळ्यांचं एकमत असतं. थोडासा अजून विचार केला तर जाणवेल, कि, प्रश्न सोडविण्यापेक्षा एकमेकांवर दोषारोप करण्यातच आपण वेळ घालवत आहोत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, आपल्या मुलाने घोकंपट्टी न करता शिकावं असं वाटणारे पालक आहेत तसेच कळकळीने शिकविणारे काही शिक्षकही आहेत. त्यांनी दुसऱ्याने बदलावं असं म्हणण्यापेक्षा स्वत: त्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
आपल्या मुलाने कोणत्या पद्धतीने शिकावं हे आपण नक्कीच ठरवू शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने व्याकूळ झालेले अनेक पालक दिसतात. अगदी पहिल्यापासून मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देणारेही असतात. त्यांनी आपला मुलगा खरंच काय शिकतोय? ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांना कोणत्या वयात काय करता आलं पाहिजे, ह्याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे पाच-सहा वर्षांच्या मुलांना अक्षरओळख असायला हवी. काही अक्षरं एकामागे एक जोडून शब्द बनवता, वाचता यायला हवेत. शाळांमधून जेव्हा धडे च्या धडे ह्या मुलांकडून पाठ करून घेतले जातात, तेव्हा घरी खूप कौतुक होतं. पण इतर ठिकाणी असलेले तेच शब्द मुलाला वाचता येतायत का? ह्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. ह्याठिकाणी, पाठांतर महत्वाचं नसून वाचता येणं महत्वाचं आहे हे शिक्षक आणि पालक दोघंही विसरतात. निबंध लिहिताना स्वत: विचार करायचा, धडा नुसता वाचायचा नाही लेखकाची भूमिका समजावून घ्यायची, कविता फक्त वाचायची नाही, कवीच्या भावनांशी समरस व्हायचं. हे मुलांना शिकवायला हवं. शाळेत जर हे होत नसेल तर घरी आई-वडिलांनी असं शिकवायला काहीच हरकत नाही.
नंतर प्रश्न येतो मार्कांचा. "आम्ही असं शिकविण्याचा प्रयत्न करतो, पण शाळेत मार्क्स मिळत नाहीत, " हे अनेकदा पालकांकडून सांगितले जाते. परिस्थिती खरंचच तशी असेलही. पण शाळेतल्या मार्कांशिवाय शिक्षण होतंच नाही का? शाळेव्यतिरिक्त आपण आपल्या मुलांना काही शिकवूच शकत नाही का? आपल्या दैनंदिनीत थोडासा वेळ मुलांना शिकविण्यासाठी आणि त्यांच्याबरोबरीने शिकण्यासाठी आपण नक्कीच ठेऊ शकतो. हा शाळेचा अभ्यास नसल्यामुळे मुलं आनंदाने शिकतील. रस्त्याने जाताना अक्षरं ओळखायला लावणे, शब्द वाचायला लावणे, भाजी आणायला जाताना, समान घेताना पैशांचा हिशोब करणे, एखाद्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणाविषयी पूर्ण माहिती वाचून मुलांनी आपल्याला सांगणे, मुलांचा एखादा वेगळा विचार त्यांनाच लिहू देणे, एखादी छानशी कविता , गोष्ट ह्याचा अर्थ त्यांचा त्यांनाच समजू देणं अशा असंख्य गोष्टींमधून आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. अशा शिक्षणातून मुलं स्वत: विचार करू लागतील, अनुभव घेऊ लागतील, व्यक्त होऊ शकतील.
आपल्यालाही तेच हवंय नाही का?
वसुधा देशपांडे-कोरडे
clinical psychologist
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
९२२५५०५३६९
प्रतिक्रिया
4 Nov 2016 - 6:39 pm | एस
www.mindmastercounsellors.com
ही तुमचीच वेबसाईट आहे का?
असो. मितानताईंच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
4 Nov 2016 - 7:17 pm | संदीप डांगे
शाळेतली मार्क्स सिस्टीम बंद झालीय ना?
4 Nov 2016 - 7:31 pm | टवाळ कार्टा
अवघड आहे
5 Nov 2016 - 3:19 am | पिलीयन रायडर
शाळांची परिस्थिती वाईटच आहे. माझा मुलगा ज्या तथाकथित "इंटरनॅशनल" अभ्यासक्रमाच्या शाळेत होता तिथे मी इतर पालकांना भेटले असता; गणितं सोडवता येत नाहीत, पाठ करुन घेतात इथवर ऐकलं.
माझा चार वर्षाचा मुलगा घरी ३ पानं लिहायचा होमवर्क असल्याने ढसढसा रडायचा. बर एवढं शाळेत एक पान करुनही त्याला बाजुच्या पानावर तोच अंक वा अक्षर काढता येत नव्हतं. बाई नुसत्या हाताला धरुन गिरवायच्या. ह्याला वाटायचं की पान भरलं की झालं. खाली चार पैकी २ स्टार दिलेले दिसले की नाराज व्हायचा.... चार वर्षाच्या मुलाला शाळेने शिस्तीत मार्कांच्या शर्यतीत ढकललं होतं..
इथे अमेरिकेत एकदम उलटं आहे. नक्की काय शिकवत आहेत मला काहीच पत्ता नाही. अभ्यास नसतोच. मी एकदा शाळेत गेले होते तेव्हा मुलं समोर वेगवेगळी दगडं घेऊन बसली होती. हातात एक एक भिंग दिलं होतं. आणि दगडांना हात लावुन स्पर्श कसाय, रंग कसाय, कुठे वापरले जातात वग्गैरे बाई सांगत होत्या. लिखाण वगैरे तर नाहिचे वाटतं. पण मुलगा रोज शाळेत स्वतःचं नाव लिहीतो म्हणे. आता उद्या भारतात गेल्यावर नक्की हा लिहण्याचा सराव कसा करणारे काय माहिती?
मी भारतातल्या शाळेची पुस्तकं पाहिली होती. चांगली होती. साम्य शोधा, फरक शोधा पासुन ते बेरीज वजाबाकी पर्यंत सगळं होतं. आणि ते मुलांना समजत होतं. प्रश्न इतकाच होता की शिक्षक फक्त पानं भरवायला ते करुन घेत होते. मुलांना खरंच कळलंय की नाही हे कुणी पहात नव्हतं. पण अभ्यासक्रम मात्र झकास!
नक्की कोणती पद्धत चांगली काही कळत नाही. आपण कितीही म्हणलं तरी सगळंच घरी नाही करुन घेऊ शकत. होमवर्क वगैरे कितीही नाही पटला तरी करुन घ्यावा लागतो. परीक्षा द्यावी लागते. मला अजुनही पुण्यात कोणतीही मनाजोगती शाळा सापडलेली नाही.
कुणाला अक्षरनंदनचा अनुभव आहे का?
5 Nov 2016 - 4:35 am | अभिजीत अवलिया
अक्षरनंदनचा अनुभव नाही. पण सध्या माझा मुलगा नळ स्टॉपच्या अभिनव मराठी शाळेत जातो. आता पर्यंतचा अनुभव चांगला आहे. गाणी म्हणणे, खेळणे, चित्रे काढणे, रंगवणे ह्याच गोष्टींवर जास्त भर दिसतोय शाळेचा. पण अजून तो शिशुवर्गात आहे. नंतर भविष्यात पुढच्या वर्गात गेल्यानंतर समजा पाठांतर वगैरे गोष्टींवर शाळेने प्रमाणापेक्षा जास्त भर द्यायला सुरवात केली तर मग शाळा बदलून दुसऱ्या कुठल्या तरी 'शिक्षण' देणाऱ्या शाळेत घालावे लागेल. पण एक आहे काहीही झाले तरी मी त्याचा 'मार्कांच्या रेस मधला घोडा' होऊ देणार नाही.
ह्या लेखात लिहिलेली परिस्थिती येण्यास बहुतांशी पालक देखील जबाबदार आहेत. प्रत्येक मुलाची एक बौद्धिक क्षमता असते. एका पातळीनंतर तुम्ही ती वाढवू शकत नाही. पण हे न जाणता पालक देखील मार्कांच्या रेस मध्ये मुलाला ढकलतात. मग शाळेकडे देखील दुसरा पर्याय नसतो. कारण त्यांना पण आपले नाव करायचे असते आणी हे नाव कसे होणार तर ह्या शाळेतील मुलांना किती मार्क पडतात ह्यावर. मग त्यासाठी घोकंपट्टी करून पाठांतर करणे हा एक सोपा मार्ग असतो शाळेकडे.
ह्यासाठीच प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतातच जे ओळखून स्वतःच्या आवडीप्रमाणे मुलाला करिअर करू दिले तर बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील.
5 Nov 2016 - 6:44 pm | श्रीगुरुजी
मी एका आयआयटीची पूर्वतयारी (IIT Foundation - for standards 8 to 10) करून घेणार्या व नंतर ११ वी आणि १२ वी साठी आयआयटी जेईई परीक्षेचे प्रशिक्षण देणार्या संस्थेत गणित हा विषय शिकवितो. इथे फक्त पुस्तकातील गणिते न सोडवता प्रत्येक सूत्रामागची व सिद्धांतामागची थिअरी समजून घेण्यावर भर असतो. शाळेच्या गणिताच्या पुस्तकातील अभ्यासक्रम शिकविण्याऐवजी आयआयटी व ऑलिंपियाड डोळ्यासमोर ठेवून अॅडव्हान्स्ड गणित ८ वी पासूनच शिकविले जाते. संस्थेच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत भूतकाळात विचारलेला एकही प्रश्न पुन्हा न विचारता प्रत्येक वेळी संपूर्ण नवीन प्रश्न विचारले जातात जेणेकरून पूर्णपणे नवीन गणित समोर आल्याने विद्यार्थी स्वतः पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात. एकच गणित अनेक पद्धतीने कसे सोडविता येऊ शकते हे इथे शिकविले जाते. सूत्रे व सिद्धांत न समजता घोकून पाठ करण्यापेक्षा गणितींनी सूत्र किंवा सिद्धांत कसा शोधून काढला, त्याची संपूर्ण सिद्धता, एकाच सूत्राच्या किंवा सिंद्धाताच्या अनेक वेगवेगळ्या सिद्धता व त्यांचा उपयोग कसा आणि कोठेकोठे करता येऊ शकेल हे शिकविले जाते. कोणतेही सूत्र व सिद्धांत फळ्यावर सिद्ध केल्याशिवाय थेट वापरायचे नाही, ज्या सूत्राची/सिद्धांताची सिद्धता शिकलेली नाही ते उत्तरात वापरायचे नाही असा इथला नियम आहे.
ही पद्धत सुरवातीला विद्यार्थ्यांना अवघड वाटते. परंतु मुळापासून सर्व गोष्टी शिकविल्या जात असल्याने काही महिन्यांनंतर विद्यार्थी गणित सोडविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती स्वतःच शोधून काढतात. अर्थात या ज्ञानाचा शालेय अभ्यासक्रमासाठीही आपोआपच उपयोग होतो. शालेय अभ्यासक्रमात Pythagoras Theorem, Apollonius Theorem, Heron's Formula, वेगवेगळ्या कोनीय आकृत्यांच्या क्षेत्रफळाची सूत्रे इ. सूत्रे/सिद्धांत विद्यार्थ्यांना सिद्धता न दाखविता थेट सांगून गणितात वापरले जातात. परंतु या संस्थेत सर्व सूत्रे/सिद्धांत सिद्ध केल्याशिवाय वापरली जात नाहीत.
5 Nov 2016 - 7:47 pm | एस
यावर तुम्ही सविस्तर लिहावे ही विनंती.
7 Nov 2016 - 6:34 am | उपयोजक
श्री गुरुजी आपण यावर लिहाच.
7 Nov 2016 - 7:29 pm | शलभ
+११११११
7 Nov 2016 - 8:57 pm | श्रीगुरुजी
नक्कीच. याच्यावर सविस्तर प्रतिसाद लिहितो.
7 Nov 2016 - 10:12 am | वसुधा आदित्य
मुलांना शिकवताना अशाच प्रकारे मुळातून शिकविले जायला हवे. पण बऱ्याच शाळा आणि क्लासेस मध्ये असे होत नाही. तुम्ही ह्याबद्दल अजून सविस्तर लिहिलेत तर फार चांगले होईल. धन्यवाद!
7 Nov 2016 - 8:12 pm | शब्दबम्बाळ
माफ करा पण माझा स्वतःचा अशा IIT फौंडेशन वगैरेचा अनुभव चांगला नसल्याने मला या गोष्टी मुलांच्या लहान वयात त्यांच्यावर लादलेल्या वाटतात!
मुळात असे IIT साठी म्हणून का शिकायचे? शिकायचे म्हणून शिकायला काय हरकत आहे...
8 वी-10 वी मध्ये मुलांना करायला बऱ्याच गोष्टी असतात पण चुकून मुलगा हुशार आहे हे पालकांना आणि शिक्षकांना कळले कि त्याला असल्या गोष्टींमध्ये घातले जाते!
मग दिवसभर शाळा आणि परत शनिवार-रविवारदेखील या क्लास मध्ये!
मुलांच्या आयुष्यात बाकी काही करायला जागाच ठेवत नाहीत. ते हि त्याच्या अशा वयात जेव्हा त्याला IIT म्हणजे काय हे नक्की माहित देखील नसते. भयानक राग येतो अशा लोकांचा... परत म्हणायचं कि हे त्याच्याच उज्वल भविष्यासाठी वगैरे आहे!
हे झालं कि पुन्हा 11 वी 12 वी ला तर फुल्ल फॉर्म मध्ये कलासेस असतात याचे!
ज्या गोष्टी वर्गमित्रांना अजून शिकवलेल्या देखील नसतात, या मुलांना त्या आणि बऱ्याच पुढच्या गोष्टी शिकवल्या जातात. यात चुकीचे काय असे वाटेलही, पण त्यामुळे वर्गमित्रांशी असलेला अभ्यासाचा दुवा निखळतो...
असो, बरंच काही आहे लिहिण्यासारखं पण जाऊ दे.. श्रीगुरुजी तुमच्यावर टीका करण्याचा हेतू नाही पण नाही पटत हे IIT फॅड...
7 Nov 2016 - 9:01 pm | श्रीगुरुजी
काही मुलांच्या बाबतीत हे खरे आहे. सर्वांनाच असा अभ्यासक्रम झेपत नाही. परंतु प्रत्येक वर्गात किमान १०% मुले अत्यंत बुद्धीमान असतात व त्यांच्या बुद्धीची भूक भागविण्यास शालेय अभ्यासक्रम खूपच अपुरा पडतो. अशांच्या बाबतीत बुद्धीला योग्य ते खाद्य देणे आवश्यक असते. योग्य ते प्रशिक्षण मिळाल्यास अशी मुले खूप अवघड गोष्टी सुद्धा तुलनेने लवकर आत्मसात करतात.
7 Nov 2016 - 9:35 pm | शब्दबम्बाळ
मी अशाच 10% मुलांबद्दल बोलतोय ज्यांना हा अभ्यासक्रम झेपू शकतो!
किंवा असे म्हणा कि त्यांना झेपू शकतो म्हणूनच अशा क्लास मध्ये घेतलं जात. (त्यांचे मार्क, प्रज्ञा शोध परीक्षा, स्कॉलरशिप या सगळ्याचे रेकॉर्ड पाहिलं जात)
पण ते हुशार आहेत म्हणून त्यांच्या मजा करायच्या वयात त्यांच्यावर हे क्लास लादायचं काय कारण आहे?
पालक देखील पुढच्या काळजीने आपल्या पाल्याला 'तयार' करण्यासाठी अशा ठिकाणी घालतात.
IIT पास होण्यासाठी तर 8 वी पासून वगैरे तयारी करून घेण्याची "काहीही" गरज नसते.
योग्य त्या प्रशिक्षणाने सिंह देखील जळणाऱ्या गोल रिंग मधून उड्या मारू शकतो. मग या मुलांचं काय घेऊन बसलात!
7 Nov 2016 - 10:22 pm | श्रीगुरुजी
क्लास लावल्याने मजा करण्यात अजिबात अडथळा येत नाही. समजा हा क्लास लावला नाही तरी पालक दुसरा क्लास लावतातच. माझ्या पाहणीतले बहुतेक विद्यार्थी किमान २ वेगवेगळ्या क्लासला जातात. त्यात एक अभ्यासाशी संबंधित असतो व दुसरा एखादी कला/खेळ/नवीन भाषा इ. साठी असतो. समजा आपल्या मुलांना कोणताच क्लास लावायचा नाही असे एखाद्या पालकांनी ठरविले तरी शाळा मुलांना अजिबात मोकळे सोडत नाही. बहुतेक सर्व शाळा विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या नावाखाली गुंतवून ठेवतात. त्यातले बहुसंख्य विद्यार्थी गुगलवरून माहिती शोधून त्याचे एखाद्या फाईलमध्ये संकलन करणे व ती फाईल प्रकल्प म्हणून सबमिट करणे यात धन्यता मानतात.
काही विद्यार्थ्यांची मजेची कल्पना म्हणजे एखादा खेळ खेळणे अशी असते, काही जणांना एखादी कला शिकण्यात आनंद मिळतो, काही जणांना अभ्यासाबाहेरील आव्हानात्मक विषय शिकणे आवडते. प्रत्येक विद्यार्थी खेळात किंवा कलेत किंवा अभ्यासाबाहेरील कोणत्या तरी क्षेत्रात प्रवीण असेलच असे नाही. काही जणांना अभ्यासाशी संबंधित विषयाची जास्त माहिती मिळवून त्यात काहीतरी करून दाखवावेसे वाटते. माझ्या ओळखीतल्या एका मुलाने ९ वीत असतानाच असेंब्ली लँग्वेज शिकून स्वतःच एक अँटीव्हायरस लिहिला होता. काही जणांना विज्ञान किंवा गणित या विषयात प्रचंड गती असते. परंतु अशांना शाळेतील शिक्षण पुरत नाही. अशा विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान दिले तर ते सहज ग्रहण करतात. साधारणपणे आयआयटी मध्ये जाण्याची इच्छा असलेल्या मुलांना खेळ, कला इ. मध्ये फारसा रस नसतो व त्यांचा जास्त भर अधिकाधिक शिकण्यावर असतो.
आयआयटीचा अभ्यासक्रम खूपच अवघड असल्याने ८ वी पासूनच तयारीला लागणे योग्य असते. ज्या मुलांचा आयआयटीकडे कल आहे अशांनी उशीरा सुरूवात केली तर फारसा उपयोग होत नाही. अर्थात काही मुलांच्या बाबतीत आयआयटी हा मुलांच्या आवडीपेक्षा पालकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असतो व त्यामुळे मुलांवर बळजबरी केली जाते. अशी मुले लगेच लक्षात येतात व अशा मुलांच्या पालकांशी आम्ही बोलून त्यांना मुलांच्या बाबतीत योग्य तो फीडबॅक आम्ही देतो.
एकंदरीत ३-४ प्रकारची मुले असतात. काही मुलांना स्वतःलाच आव्हानात्मक गणित, विज्ञान शिकण्याची खूप आवड असते व त्यात त्यांचा कल असल्याने ते पुरेसे परीश्रम घेऊन त्यात यशस्वी होतात. काही मुलांना यात फारशी आवड नसते परंतु पालक बळजबरी करून मुलांना यात ढकलायचा प्रयत्न करतात. काही मुले अत्यंत बुद्धीमान असली व कलही असला तरी पुरेसे परीश्रम घेण्याची त्यांची मानसिकता नसते. आपल्याला कशात आवड आहे व ते आपल्याला जमू शकेल का हेच काही मुलांना समजत नाही. आपला मित्र जातो म्हणून ते पण क्लास लावतात. परंतु थोड्याच दिवसात त्यांचा भ्रमनिरास होतो.
आपल्या मुलाला/मुलीला नक्की काय आवडते, नक्की काय आवडत नाही, जी गोष्ट आवडते ती शिकण्यासाठी जी तळमळ, परीश्रम लागतात तेवढे करण्याची आपल्या मुलाची मानसिकता आहे का इ. गोष्टी पालकांनी मुलांशी बोलून ओळखल्यास मुलगा/मुलगी योग्य त्या दिशेने जाउ शकतील व अपयशाची शक्यता कमी होईल.
5 Nov 2016 - 6:57 pm | चौकटराजा
एकूणच आपली नव्हे तर जगातीलच शिक्षण पद्धति याविषयी माझ्या मनात प्रचंड राग आहे. ती अत्यंत नालायक शिक्षण तज्ञांच्या हातात गेली आहे. एवढेच बोलून मी आपली रजा घेतो. ( तरीही वैयक्तिक क्षमता व प्रयत्न याद्वारे निरनिराले उपयुक्त शोध लागले जात आहेत हे मात्र विशेष आदरास पात्र )
7 Nov 2016 - 7:42 pm | जॉनी
दहावी पर्यंत याच पाठांतराच्या चक्रात अडकलो होतो. पण मला वाटतं की नंतर ह्यातून आपोआप बाहेर पडलो. अर्थात, मार्क कमी झाले पण बुद्धिमत्ता कमी झालीये असं कधी वाटलं नाही.
दिल्ली मधल्या काही चांगल्या कॉन्व्हेंट शाळा ह्याबाबतीत चांगली पावलं उचलत आहेत असं ऐकलं आहे खरं. बाकी पुण्यातल्या प्रथितयश मराठी शाळेतील माझा अनुभव पण पाठांतराचाच आहे.
10 Nov 2016 - 8:58 pm | आनन्दा
दहावीला असताना एकदा एक आख्खा दिवस प्रयत्न करून सुद्धा मला एका प्रश्नाचे उत्तर पाठ झाले नव्हते. पाठांतराचा नाद तेव्हापासून सोडला. दहावीला थोडे कमी मार्क मिळाले, पण पुढचे सगळे चांगले झाले.
समजण्याचा एक क्षण असतो.. तो साधला तर सगळे झाले. तो नाही साधला तर मग फार कठीण.
10 Nov 2016 - 6:51 pm | विजुभाऊ
क्लासेस मधे देखील सरावाच्या नावाखाली पाठांतरच करुन घेतात.
बारावीत केमिस्ट्री चांगले कळत असताना सुद्धा फिजीक्स , गणीत न उमगल्यामुळे चक्क ४३% पडले होते मला.