✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

स
स्वामी संकेतानंद यांनी
गुरुवार, 03/03/2016 - 17:09  ·  लेख
लेख
कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>> 'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात. मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक? अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का? मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात. थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.) मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
32334 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

संयमित लिखाण ! आवडले !

चिनार
गुरुवार, 03/03/2016 - 17:37 नवीन
संयमित लिखाण ! आवडले !
  • Log in or register to post comments

योग्य मार्ग

आतिवास
गुरुवार, 03/03/2016 - 17:40 नवीन
जेव्हा डावे आपल्याला उजवे समजतात आणि त्याच वेळी उजवे मात्र आपल्याला डावे समजतात - अशा वेळी आपण योग्य मार्गावर आहोत हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments

हे नक्की कसे होत असेल

तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 17:51 नवीन
हे नक्की कसे होत असेल ह्याबद्दल उत्सुकता आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सहमत. याचे जनरलायझेशनही करता

एस
गुरुवार, 03/03/2016 - 17:56 नवीन
सहमत. याचे जनरलायझेशनही करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

लेख आणि आतिवास यांचा प्रतिसाद

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/03/2016 - 21:48 नवीन
लेख आणि आतिवास यांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

@डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/03/2016 - 18:18 नवीन
@
डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात.
>> दारू बदलली,तरी दारुडेपण बदलत नाही!
  • Log in or register to post comments

लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/03/2016 - 18:50 नवीन
लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची पातळी इतकी खाली येताना दिसते कधीकधी की ध्रुवीकरण होणं स्वाभाविक असतं. ध्रुवीकरण झालं की दोन्ही बाजू टोकाच्या भूमिका घेतात आणि मग चर्चेची पातळी आणखीनच खालावते. हे दुष्टचक्र चालूच राहातं. आपण सामान्यतः जी माणसं बघतो त्यात कोणीच टोकाचं डावं किंवा टोकाचं उजवं नसतं. किंबहुना या विचारसरणींना महत्त्व देण्यापलिकडे सामान्य जीवनातल्या कटकटींमधून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न पडलेला असतो. आणि तसं बघायला लागलं तर बहुतेक सरकारांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहारात डाव्या आणि उजव्या भूमिकांचा समन्वयच साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. असं असताना कुठच्यातरी दोन काल्पनिक व अव्यावहारिक टोकांकडे जाऊन, समोरच्या माणसाला एका टोकावर आणि आपण एका टोकावर बसून सीसॉ खेळत बसणं निरर्थक आहे. मोदीसमर्थक आणि मोदीविरोधी यांचा वाद पाहून मला सतत हे वाटत राहिलेलं आहे की अरे तुमची चर्चा करण्याची, विचार करण्याची पातळी इतकी दहा वर्षाच्या मुलाइतकी खाली आलेली आहे का? कोणी आपल्या प्रकट जीवनात किती मूर्खपणा केला यावरून एकमेकांशी कशाला वाद घालायचा? सरकार चालवणं म्हणजे या प्रकट नौटंकीपलिकडे बरंच काहीतरी असतं. कायदे करणं, योजना राबवणं, सुव्यवस्था राखणं... या चर्चा करणारातले किती लोक एखाद्या कायद्याचा जनतेवर खरोखर काय परिणाम झालेला आहे, त्यातून किती चांगलं झालं आहे, त्याचे फायदे सर्वांना मिळताहेत की नाही वगैरे गोष्टींचा अभ्यास करून त्याच्या भल्याबुऱ्या गोष्टी मांडतं? किती लोकं उजव्या व डाव्या दोघांचंही काही चुकतं काही बरोबर असतं असा समजुतदार विचार करू आणि मांडू शकतात? असो. आता या लेखावरही मोदीचाहते विरुद्ध मोदीविरोधक अशी साठमारी दिसली नाही म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments

+१

तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 19:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सहमत

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 03/03/2016 - 21:03 नवीन
आपल्याकडे कोणतेही सरकार आले तर तिला टोकाची भूमिका घेता येणार नाही. साधारण समाजवादी, welfare स्टेट च्या भूमिकेत राहावे लागेल. मोदींनाही मनरेगा बंद करता आली नाही आणि काँग्रेसलाही सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक करणे सुरु ठेवावे लागले होते. शेवटी सरकार चालवणे एक balancing act आहे. अशावेळी टोकाची मते घेऊन आपण इकडे वेड्यागत भांडतो ते हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

मन१
Fri, 03/04/2016 - 12:44 नवीन
कालपरवाच महेश भट ह्यांचं एक ट्वीट ह्याच अर्थाचं वाचण्यात आलं -- @MaheshNBhatt .... politics is the gentle art of getting votes from the poor & campaign funds from the rich, by promising to protect each from the other. . . ब्यालन्सिंग अ‍ॅक्ट म्हणजे कह्रं तर खूपदा मांडवली केल्यासारखं काम असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

मुळात उजवे आणि डावे हा प्रकार

स्पा
गुरुवार, 03/03/2016 - 18:58 नवीन
मुळात उजवे आणि डावे हा प्रकार काये सांगेल का कोणी? लहानपणापासून एकतोय
  • Log in or register to post comments

+१

असंका
गुरुवार, 03/03/2016 - 19:02 नवीन
+१ तसं स्वतःहून हे कबूल करायची माझी हिंमत झाली नसती, पण आता कुणीतरी म्हणत आहे तर मीही... आहे काय हे उजवी विचारसरणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 19:25 नवीन
हुश्श !! कुणीतरी विचारलं एकदाचं, डावे कोण उजवे कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

मले बी सांग जा

चिनार
Fri, 03/04/2016 - 12:03 नवीन
मले बी सांग जा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आधी मला तर कळू द्या,

नीलमोहर
Fri, 03/04/2016 - 12:47 नवीन
आले लगेच विचारायला ;) डावे म्हणजे साम्यवादी.. ज्यांच्यामते सगळी माणसे समान असतात. उजवे म्हणजे अ-साम्यवादी. ते माणसा-माणसामध्ये भेद करतात आता नेक्स्ट, कम्युनिस्ट म्हणजे काय? निधर्मांध म्हणजे काय? विचारवंत म्हणजे कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

+१

स्पा
Fri, 03/04/2016 - 14:24 नवीन
अभिरुचीसंपन्न,डावी भूमिका,उज्वी भूमिका,किंचित डावीकडे झुकलेली centre leftist, संघी,अतिउजवा 'uncivilized raccoon, यावरही प्रकाश पाडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

लेफ्ट राईट..

नीलमोहर
Fri, 03/04/2016 - 16:00 नवीन
लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत प्रतिसादांबरोबर तुम्हीही उजवीकडे चालले आहात लक्षात येतंय का तुमच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धुत्या आणि जेवत्या हातांकडे

प्रचेतस
गुरुवार, 03/03/2016 - 19:36 नवीन
धुत्या आणि जेवत्या हातांकडे बघ. आपोआप समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धुत्या हाताचे महत्व जाणून

बाळ सप्रे
Fri, 03/04/2016 - 16:44 नवीन
धुत्या हाताचे महत्व जाणून म्हणताय की हलके काम जाणून म्हणताय हे यातून समजत नाहीये. त्यामुळे डाव्यांविषयीची तुच्छता आहे की वेगळेपण दाखवायचय हे समजत नाहीये. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझे २ पैसे.

आनन्दा
गुरुवार, 03/03/2016 - 20:04 नवीन
माझे २ पैसे. डावे म्हणजे साम्यवादी.. ज्यांच्यामते सगळी माणसे समान असतात. उजवे म्हणजे अ-साम्यवादी. यामध्ये सगळे आहे, भांडवलवादी हा सरळ दिसणारा वर्ग, पण त्याबरोबरच वर्गवादी, वर्णवादी, धर्मवादी सुद्धा यांमध्ये येतात. जसे की हिंदू किंवा मुस्लिम यांच्यात आम्ही आणि इतर असे वर्ग असतात. भांडवलशाहीमध्ये मालक आणि कामगार असे वर्ग असतात. हे सगळे उजवे. कारण ते माणसामाणसामध्ये भेद करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

जनरलायझेशन करायचे झाले तर तू

सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 21:45 नवीन
जनरलायझेशन करायचे झाले तर तू उजव्या विचारांचा आहे आणि मी डाव्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

या विषयावर अगदी सोप्या

आतिवास
गुरुवार, 03/03/2016 - 21:56 नवीन
या विषयावर अगदी सोप्या शब्दांत लिहायची खुमखुमी आहे. कधी वेळ मिळतोय त्याची वाट पाहतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पावड्या...

अर्धवटराव
Fri, 03/04/2016 - 00:36 नवीन
तुला आस्तीक/नास्तीक म्हणजे नेमकं काय हे कळलं आहे का ?(मला अजीबात कळत नाहि) तसच काहिसं डावे/उजवे प्रकरण असावे असा कयास आहे माझा :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पा साहेब

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 13:05 नवीन
माझ्या ऐकिव अन तोकड्या वाचीव माहीती नुसार उजवे अन डावे हे शब्द प्रचलन फ्रेंच राज्यक्रांति नंतर उदयाला आले, फ्रेंच राज्यक्रांति जेव्हा झाली तेव्हा त्यांच्या राजाने म्हणे (१६वा लुई बहुदा) एक सभा बोलावली होती (का एक क्रन्तिकारी लोकांची सभा होती) (समन्वयवादी भूमिकेतुन का क्रांतिकारी लोकांचे कान उपटायला ते माहीती नाही) त्या सभेत समाजवादी लोकशाहीवादी क्रांतिकारी (पक्षी वोल्टेर वगैरे) मंडळी डाव्या हाताला बसली होती अन परंपरावादी सरांजमशाही सरदार दरकदार मंडळी उजव्या हाताला बसली होती, म्हणून हे नामकरण झाले म्हणतात खरे खोटे देव जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हे खरं आहे

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 13:16 नवीन
फक्त ही सभा (Estates General) फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

म्हणजे ही राजानेच भरवली असणार

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 14:31 नवीन
म्हणजे ही राजानेच भरवली असणार, नाही का?? शिवाय अशीच एक एस्टेट जनरल -२ नेपोलियन बोनापार्ट ने भरवुन लोकांच्या (सभेत हजर असलेल्या) कानशीलावर बंदुकी टेकवून स्वतःला सम्राट घोषित करायचा ठराव पास करवुन घेतला होता म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

राजाला भरवावी लागली होती.

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 15:12 नवीन
कारण प्रजेतला असंतोष शिगेला पोचला होता. त्यात फर्स्ट इस्टेट म्हणजे धर्मगुरू, सेकंड इस्टेट म्हणजे सरदार-दरकदार आणि थर्ड इस्टेट म्हणजे सामान्य लोक - कामगार, शेतकरी, व्यापारी, इत्यादी असे होते. पहिल्या दोन इस्टेट्स राजाच्या उजव्या हाताला आणि तिसऱ्या इस्टेटचे लोक डाव्या हाताला असे बसले होते, कारण त्यांची संख्या जास्त होती आणि पहिल्या दोन इस्टेट्सचे लोक त्यांच्याबरोबर बसायला तयार नव्हते.डावे आणि उजवे हे शब्दप्रयोग त्यावरूनच आले. अजून एक शब्दप्रयोग म्हणजे प्रसारमाध्यमांना जे Fourth Estate असं म्हटलं जातं त्यालाही हा संदर्भ आहे. नेपोलियनने असं काही केलं होतं का ते संदर्भ चेकवून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

धन्यवाद

स्पा
Fri, 03/04/2016 - 16:16 नवीन
नाना काका आणि बोका काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कधीतरी कुणीतरी कुणाच्यातरी

असंका
Fri, 03/04/2016 - 16:39 नवीन
कधीतरी कुणीतरी कुणाच्यातरी डाव्या उजव्या हाताला बसले म्हणून अख्खी विचारसरणी तशी डावी उजवी!! भलतंच गमतीशीर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

ह्याहुन गमतीशीर एक प्रथा आहे ऐकिवात

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 17:21 नवीन
एक प्रथा ब्रिटिश पार्लियामेंट मधे आहे, तिथे पार्लियामेंट चा बेलिफ का स्पीकरचा राजदंड रक्षक कुठलेतरी एक पद आहे त्या पदावर नियुक्तिसाठीच्या अटीत एक अट म्हणजे त्या व्यक्तीला तपकिर ओढायची सवय हवी, एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यात तंबाकुचं प्रस्थ प्रचंड होते, त्याचाच असर असावा, जगप्रसिद्ध इंग्लिश स्नफ (इंग्रजी तपकिर) ह्या बेलिफ ला देतात, त्याचा खर्च कायदेशीररीत्या बजेट मधे मांडला अन मंजूर केला जातो. ही व्यक्ति तिला पुरवलेल्या चांदीच्या डब्बी मधुन मधेमधे तपकिर नाकात कोंबत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

ऐकावं ते नवल!!

असंका
Sat, 03/05/2016 - 13:30 नवीन
ऐकावं ते नवल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

म्हणजे कोणतीही विचारधारा, जर

Anand More
गुरुवार, 03/03/2016 - 19:17 नवीन
म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती.
+१०००००
  • Log in or register to post comments

:)

पैसा
गुरुवार, 03/03/2016 - 19:33 नवीन
लेख आवडला. समतोल विचार कोणी करू शकतो यावर लोकांचा विश्वास बसणे कठीणच असते. हे डावे काका आणि उजवे काका कोण असावेत याची साधारण कल्पना आहे. तू एवढा किल्ला लढवला असशील तर शाबास!! :D
  • Log in or register to post comments

तुमचा अंदाज चुकलेला असण्याची

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 03/03/2016 - 21:04 नवीन
तुमचा अंदाज चुकलेला असण्याची दाट शक्यता आहे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाहाहा!

पैसा
Fri, 03/04/2016 - 21:25 नवीन
ओक्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

विचारसरणी

तिमा
गुरुवार, 03/03/2016 - 19:43 नवीन
माझी सांपत्तिक स्थिती काही का असेना, माझ्या वर्तणुकीवरुन मी डावीकडे झुकलेला मध्यमवर्गीय आहे, असे वाटते. कुठल्याही प्रकारची उधळपट्टी, संपत्तीचे प्रदर्शन, स्वतःवर जास्त खर्च करणे मला आवडत नाही. आपल्या जेवढ्या गरजा आहेत त्याच प्रतीचा मोबाईल मी वापरतो. कॉल करणे व घेणे आणि प्रसंगी एस.एम.एस. करणे, एवढ्याच माझ्या गरजा. मोबाईलमधे व्हॉटस अ‍ॅप नसल्यामुळे, गुड मॉर्निंग पासून बाकीचे टाईमपास करायचा प्रश्नच येत नाही. भारतामधे लोकं एकमेकांना 'गुड मॉर्निंग' का करतात, हे लहानपणापासूनचे कोडे आहे. बहुतेक, सकाळी बद्धकोष्ठ न होता पोट साफ होणे, म्हणजेच गुड मॉर्निंग झाली, अशी उच्च मध्यमवर्गीयांची समजूत असावी.
  • Log in or register to post comments

जन्तर मन्तर वर जमलेले उच्च

विवेकपटाईत
गुरुवार, 03/03/2016 - 20:09 नवीन
जन्तर मन्तर वर जमलेले उच्च शिक्षित युवा होते, अधिकांश मुले/ मुलींच्या होतात सिगरेटी होत्या, अभिव्यक्ती स्वात्यंत्र म्हणजे हेच. हे उच्चभू दलितांसाठी घोषणा देत होते. बाकी बघे बाबू कुठल्या नजरेने त्यांच्या कडे पाहत होते, न सांगणे योग्य.
  • Log in or register to post comments

अधिकांश मुले/ मुलींच्या होतात सिगरेटी होत्या

होबासराव
गुरुवार, 03/03/2016 - 20:12 नवीन
माझा एक कलिग आहे गुरगाव चा तो सांगत होता कि नुसत्याच सिगरेटी नाहितर बिअर च्या कॅन सुद्धा रहायच्या.
  • Log in or register to post comments

अधिष्ठान

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/03/2016 - 20:45 नवीन
एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, हे ही एक ग्रोस जनरलायझेशन आहे आणि अर्थात ती तुमची विचारधारा असल्याने ती तुम्हाला समर्थनीय आहे हे मला मान्य आहे. :)
  • Log in or register to post comments

नाही, माझ्या विचारांचे आहे,

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 03/03/2016 - 20:51 नवीन
नाही, माझ्या विचारांचे आहे, इतरांच्या नाही. विचारांचे अधिष्ठान प्रत्येकच विचारधारेला असते, नाहीतर ती विचारधारा कशी? मला म्हणयाचे होते की मी विचारपूर्वक तसे ठरवले आहे. ह्यात generalisation नाही. जर कोणी सेन्टर ला असणे म्हणजे कातडीबचावू धोरण म्हणेल तर मला त्याच्याही विचारांचा आदर करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

भारतामाजी डावे उजवे :)

सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 21:09 नवीन
भारतामाजी डावे उजवे :)
  • Log in or register to post comments

लेखन भावलं

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/03/2016 - 21:41 नवीन
स्वाम्या यकदम चतुरस्त्र माणुस हाये :-) . हे लेखन लैच भावलं. आतिवास यांचा एक वाक्याचा प्रतिसाद अन राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद पटला. आजकाल कुणी स्वतंत्र विचारांचा असु शकतो हेच मान्य केलं जात नाही. जर आपल्याशी विचार जुळत नसतील तर तो आपल्याला न पटणार्‍या विचारसरणीचाच असणार हे गृहितक वापरलं जातं.
  • Log in or register to post comments

हृदय आणि मेंदू

हुप्प्या
गुरुवार, 03/03/2016 - 21:47 नवीन
तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे. भारतात डाव्या विचारांना प्रबळ करणारे नेहरु. बाकी काँग्रेसचे आघाडीचे नेते गांधी, पटेल, आझाद वगैरे इतके डाव्या विचारांनी प्रभावित नव्हते. बोस होते पण त्यांना नेहरू व गांधींनी पक्षातून हद्दपार केले होते. त्या सुमारास डावा विचार हा अत्यंत फॅशनेबल होता. नेहरू अशा उथळ प्रकाराला बळी पडले नसते तरच नवल! विशेष म्हणजे मोतीलाल नेहरूंना समाजवाद, साम्यवाद हा साफ नामंजूर होता. असे म्हणतात की दोघे बापलेक रशियाला गेले होते. तिथले साम्यवादी साम्राज्य पाहून धाकले नेहरू (अर्थातच) हुरळून गेले पण मोतीलाल नेहरूंना त्याचे आजिबात कौतुक वाटले नाही. असली सोंगे फार वेळ टिकणार नाहीत असे त्यांचे मत पडले. सगळे उद्योग सरकार चालवणार आणि गोरगरीबांचे भले करणार. श्रीमंत लोक म्हणजे दुष्ट, स्वार्थी, लबाड. खाजगी उद्योग म्हणजे समाजाला लागलेली कीड. हा अस्सल डावा विचार. ह्यातूनच सार्वजनिक उद्योग निर्माण झाले. पंचतारांकित हॉटेले असोत की पोलादाचे कारखाने सगळे काही सरकारच्या मालकीचे. बँका, टेलिफोन, विमा हे सगळेही सरकारी. हा प्रयोग ५० पेक्षा जास्त चालवून आपण बघितले की सरकार उद्योजक झाल्यास ना उद्योगाचे भले होते ना सामान्यांचे. उच्चपदस्थ लोक आपले उखळ पांढरे करुन घेतात आणि बाकी सगळे कफल्लक होतात. अशा उद्योगात काम करणारे हळूहळू कामचुकार होतात आणि मग युनियनबाजी, वशिलेबाजी, भ्रष्टाचार फोफावतो. पश्चिम बंगालमधे अनेक वर्षे साम्यवाद होता. तिथल्या उद्योगधंद्यांची स्थिती काय आहे? माझ्या मते अत्यंत वाईट आहे. डाव्या विचारांचे असे भव्यदिव्य स्वप्न पाहणार्‍या नेहरूंमुळे तसा विचार करणारे बुद्धीवादी, पत्रकार, विचारवंत फोफावले. आज सुंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी त्यांची स्थिती आहे. आपले विचार अमलात आणून काही हितकारी, कल्याणकारी राज्य बनवण्याचे डाव्यांचे दावे पोकळ होते असा आजवरचा इतिहास सांगतो त्यामुळे निव्वळ आक्रमक विचार मांडणे हाच पर्याय उरतो.
  • Log in or register to post comments

तुम्ही विशीत असताना डाव्या

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 10:59 नवीन
तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.
म्हणजे मी विशीत असताना अत्यंत असंवेदनाशील होतो. अजून चाळीशी गाठलेली नाही. पण त्यावेळी मला मात्र मेंदू नक्कीच असेल याविषयी अजिबात शंका वाटत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हा हा हा!

सुमीत भातखंडे
Fri, 03/04/2016 - 14:17 नवीन
सहमत. (सेंटर राईट)सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

तुम्ही विशीत असताना डाव्या

बाळ सप्रे
Fri, 03/04/2016 - 12:09 नवीन
तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.
माझा अनुभव याच्या एकदम उलटा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

जेव्हा डावे आपल्याला उजवे

अजया
गुरुवार, 03/03/2016 - 21:52 नवीन
जेव्हा डावे आपल्याला उजवे समजतात आणि त्याच वेळी उजवे मात्र आपल्याला डावे समजतात - अशा वेळी आपण योग्य मार्गावर आहोत हे लक्षात येते.
पटले! संयमित संतुलित लेख. आवडला.
  • Log in or register to post comments

अमाले फक्त लारा न तेंडुलकर

स्पा
गुरुवार, 03/03/2016 - 22:15 नवीन
अमाले फक्त लारा न तेंडुलकर ठावे
  • Log in or register to post comments

आमच्या काळातील डावे-उजवे....आणि त्यांच्यातील लढती....

मुक्त विहारि
Fri, 03/04/2016 - 08:23 नवीन
मेकेन्रो आणि बोर्ग अमिताभ आणि शत्रूघ्न सिंन्हा (बाँबे टु गोवा) सर गॅरी सोबर्स आणि डेनिस लिली असे बरेचजण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लिली आणि सोबर्स

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 11:09 नवीन
आमनेसामने आले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा