✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिढ्यांमधल्या धार्मिकतेतील बदल - कौलाचं विश्लेषण

र
राजेश घासकडवी यांनी
Sat, 09/19/2015 - 22:22  ·  लेख
लेख
भारतीय समाजाची मनोवृत्ती ही कायमच धार्मिक राहिलेली आहे. निरनिराळ्या रुढी, परंपरा आजही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडल्या जातात. त्यात अनेक कर्मकांडांचा समावेश आहे. सण साजरे करणं, दिवाळीसारख्या उत्सवात जल्लोष करणं, गणपती बसवणं, दुर्गापूजा करणं या अनेक सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना धार्मिक, पौराणिक कथांचा आधार आहे. वैयक्तिक पातळीवरदेखील बारसं, मुंज, लग्न, मरण, तेरावं, श्राद्ध यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीदेखील धार्मिक संस्कार करून त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होतो. यापलिकडे हरताळकेसारखं व्रतं, वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावांनी बोलले जाणारे नवस, चालणारे उपासतापास या सगळ्यांतूनही 'अमुक देवाला साकडं घातलं, तपश्चर्या केली की माझं भलं होईल' असा दृढ विश्वास आणि श्रद्धा दिसून येते. गेली शेकडो वर्षं या ना त्या प्रकाराने हे सर्व कमी अधिक प्रमाणात चालू आहे. या सर्व परंपरा, रुढी हे भारतीय समाजमनाचं एक मोठं अंग आहे. या सामाजिक रुढीपरंपरांबरोबच वैयक्तिक धार्मिक स्वभाव, श्रद्धा, देवाची उपासना करण्याची मानसिक ओढ किंवा गरज हाही एक सहज न दिसणारा भाग आहे. नियमाने पूजा करणं, देवळात जाणं, मुलांवर विशिष्ट संस्कार करताना देवाचं नाव घेणं या स्वरूपात तो स्वभाव घराघरातून दिसतो. पावित्र्याची कल्पना, पापपुण्याची कल्पना, आपल्याला सद्गती मिळण्याची इच्छा ही त्यामागे असते. तसंच आपल्या हलाखीच्या परिस्थितीपुढे येणारी हतबलता आणि त्यातून देवाला, सर्वोच्च शक्तीला शरण जाऊन 'तूच माझं रक्षण कर रे बाबा' म्हणण्याची गरजही कारणीभूत आहे. थोडक्यात, आपल्याला दिसणाऱ्या धार्मिकतेची ही दोन अंगं आहेत - एक सामाजिक, सार्वजनिक तर दुसरी वैयक्तिक. वैयक्तिक धार्मिकता जिथे अधिक आहे तिथेच सामाजिक, जाहीर स्वरूपात ती दिसणार हे 'यत्र वह्निस्तत्र धूम्रः' या न्यायाने उघड आहे. मात्र सध्या भारतात सामूहिक धार्मिकतेला उधाण आलेलं दिसतं. शहराशहरांतून प्रत्येक उत्सव धूमधडाक्याने डॉल्बी भिंतींसकट साजरा होतो. गोविंदाच्या हंड्यांसाठीचे थर दरवर्षी वाढताना दिसतात. महाराष्ट्रीय सण कमी पडले की काय म्हणून दांड्यारास, कडवाचौथ वगैरे इतर राज्यांमधले सणही साजरे होताना दिसतात. हे जे चित्र दिसतं त्यामागे नक्की काय कारण आहे? गेल्या वीसपंचवीस वर्षांत अचानक धार्मिक मानसिकता वाढलेली आहे का, की जेणेकरून आग वाढली त्यामुळे आगीतून येणारा धूरही वाढला? की यामागे इतर कारणं आहेत? हे तपासण्यासाठी मी १२ सप्टेंबर २०१५ ला एक सर्वेक्षण घेतलं. त्यात लोकांना विचारलेला प्रश्न असा "तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते?" ते उत्तर देण्यासाठी १. बरेच धार्मिक २. मध्यम धार्मिक आणि ३. कमी धार्मिक असे तीन गट केले. व स्वतः व आईवडील कुठल्या गटांत बसतात ते सांगायला सांगितलं. सर्वप्रथम सर्वेक्षणाच्या मर्यादेविषयी. हे सर्वेक्षण मी 'ऐसीअक्षरे.कॉम' आणि 'मिसळपाव.कॉम' या दोन मराठी संस्थळांवर घेतलं होतं. या संस्थळांवर वावरणारे लोक हे संपूर्ण भारतीय समाजाचे प्रतिनिधी नव्हेत. किंबहुना सुशिक्षित/उच्चशिक्षित, खाऊनपिऊन सुखी, कॉंप्युटर व इंटरनेट मध्ये प्रवीण, बुद्धिजीवी असा मर्यादित लोकगट आहे. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, किंवा झोपडपट्टीत राहाणाऱ्या व्यक्ती, अशिक्षित अर्धशिक्षित कामगारवर्ग असा मोठा समूह त्यातून वगळलेला आहे. त्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष त्या गटापुरतेच लागू आहेत. हे जरी खरं असलं तरी या गटातल्या लोकांचं या सर्वेक्षणातून निर्माण होणारं चित्र डोळे उघडणारं आहे. एकूण ४९ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. 'ऐसीअक्षरे.कॉम' वरून ३८, तर 'मिसळपाव.कॉम' वरून ११. हे आकडे कमी असले तरी दोन वेगवेगळ्या संस्थळांवर मिळणारे निष्कर्ष हे बऱ्यापैकी मिळतेजुळते आहेत. त्यावरून प्राथमिकदृष्ट्या विश्वासार्ह असावेत अशी मला आशा आहे. या एकोणपन्नास लोकांनी 'आईवडील १ मी २' या स्वरूपाची उत्तरं दिली. याचा अर्थ आईवडील बरेच धार्मिक, तर मी मध्यम धार्मिक. पिढीमधला बदल मोजण्यासाठी मी या आकड्यांची वजाबाकी केली. २-१ = १ याचा अर्थ या घरासाठी या पिढीत धार्मिकता थोडी कमी आहे. जर उत्तर 'आईवडील १ मी ३' असं असतं तर ३-१ = २ याचा अर्था घरासाठी या पिढीत धार्मिकता बरीच कमी आहे. जर या वजाबाक्या ऋण असत्या म्हणजे -१ किंवा -२ असत्या तर या पिढीत धार्मिकता थोडी जास्त किंवा बरीच जास्त असं म्हणता येईल. मुख्य हेतू विशिष्ट गटात कुठल्या पिढीत किती लोक आहेत हे तपासण्यापेक्षा प्रत्येक घरात होणारा असा बदल, किती प्रमाणात, किती घरांत दिसतो हे तपासून पाहाण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आलेख खाली दिलेला आहे.
धार्मिकतेत बदल
सर्वात प्रथम हे दिसून येतं की 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच कमी धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण सुमारे ७१ टक्के आहे. याउलट 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच अधिक धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण फक्त ६ टक्के आहे. त्यातही ज्यांनी 'आईवडिलांइतकेच धार्मिक' असं म्हटलेलं आहे त्यातल्या सुमारे निम्म्यांनी 'आईवडिल नास्तिक, आम्हीही नास्तिकच' असं म्हटलं आहे. म्हणजे सर्वेक्षणात भाग घेणारे सुमारे ८५% लोक हे स्वतः नास्तिक किंवा आईवडिलांपेक्षा कमी धार्मिक आहेत. हा फारच प्रचंड मोठा आकडा आहे. स्वतःला अत्यंत कमी धार्मिक किंवा नास्तिक म्हणवणारांची संख्याही प्रतिसादांमधून जाणवते - हा आकडा सुमारे ८०% आहे. कुठल्याही पद्धतीने बघितलं तरी या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष दिसून येतात. सर्वेक्षणात भाग घेणारांमध्ये - १. बहुतांश नास्तिक किंवा रोजच्या जीवनात धर्माला कमी महत्त्व देणारे आहेत २. फार मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आईवडलांपेक्षा मुलं कमी धार्मिक आहेत. ३. आईवडलांपेक्षा अधिक धार्मिक असणारांची संख्या नगण्य - सुमारे ६ टक्के आहे. हे सर्व एकत्रितपणे पाहिलं तर आपल्याला अचंबा वाटणारं चित्र निर्माण झालेलं दिसतं. बाहेर भारतीय समाजात धर्माचे सोहळे वाढलेले दिसतात, मात्र या गटात वैयक्तिक पातळीवर धर्माचं महत्त्व कमी झालेलं आहे. धूर बराच वाढलेला दिसतो, पण जवळ जाऊन बघावं तर काही ठिकाणी तरी आग कमी झालेली, विझत आलेली दिसते. मग या सगळ्याचा अर्थ कसा लावावा? एक शक्यता अशी आहे की या सर्वेक्षणाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे त्याचे निष्कर्ष सरसकटपणे सर्व समाजाला लागू पडत नाहीत. या मर्यादा आपण जरा खोलात जाऊन तपासून पाहू. १. हे सर्वेक्षण एका अत्यंत लहान गटाचं आहे - ही सर्वात गंभीर मर्यादा आहे आणि सुरूवातीलाच ती मान्य केलेली आहे. मात्र हा गट नक्की किती लहान आहे याचा आपण अंदाज घेऊन पाहू. हा गट आहे सुशिक्षित, इंटरनेटमध्ये प्रवीण, खाऊनपिऊन सुखी, मुख्यत्वे शहरांत राहाणारांचा, आणि मुख्य म्हणजे तरुण म्हणता यावं अशा लोकांचा. आता भारतात सध्या ७५ टक्क्यांच्या आसपास साक्षरता आहे. पण तरुणांमध्ये हे साक्षरतेचं प्रमाण बरंच जास्त आहे - २०१५ सालची आकडेवारी पाहिली तर ९०%. म्हणजे गेली पिढी सुमारे ५०% साक्षर आणि आजची पिढी सुमारे ८५-९०% साक्षर - अशा गोळाबेरजेतून हा आकडा येतो. उच्च शिक्षणाबाबत तर गेल्या पिढीत आणि आजच्या पिढीत फारच तफावत आहे. एकंदरीत भारतात सुमारे २० ते २५% लोक कॉलेज पूर्ण केलेले असावेत. त्यातले बहुतांश आजच्या पिढीत. तेव्हा सुशिक्षितांचा आकडा सुमारे २५%चा येतो. हेच बहुतांशी खाऊनपिऊन सुखी गटात आहेत. आणि यांच लोकांकडे कॉंप्युटर प्रावीण्य आहे. तेव्हा सर्वेक्षणात दिसणारा गट लहान असला तरी तो सुमारे २०% लोकांचा बनलेला आहे. आणि हे सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिकदृष्ट्या वरच्या २० टक्क्यातले आहेत. त्यांचा आदर्श इतर करतात, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आत्ता लहान स्वरूपात दिसणारे परिणाम हे जसजसा काळ जाईल तसतसे मोठ्या मोठ्या गटात दिसून येतील. २. कदाचित या गटातही धार्मिक लोक असतील, पण त्यांनी मतं नोंदवली नाहीत - हेही शक्य आहे. त्यामुळे दिसणारे आकडे एवढे मोठे राहाणार नाहीत. मात्र असा प्रश्न उद्भवतो, की अशांनी मतं का नोंदवली नाहीत? जाहीर फोरमवर आपण कमी धार्मिक आहोत हे सांगायला लोकांना कमी लाज वाटते, तर अधिक धार्मिक आहोत हे सांगायला लाज वाटते का? तसं असेल तर तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. या सुशिक्षित समाजात राहायचं असलं तर धार्मिकतेचा बडिवार कमी व्हायला हवा अशी सार्वत्रिक अपेक्षा त्यातून दिसून येते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी 'आमच्या घरात पवित्रता जपण्याचे हे धार्मिक नियम आहेत' असं जेवढ्या ठासून सांगितलं जायचं तितकं आज त्या गटात सांगितलं जात नाही. पावित्र्य या कल्पनेची जागा स्वच्छता, सर्वसमावेशकता यांनी हळूहळू घेतली आहे की काय, असा प्रश्न पडतो. ३. सर्वेक्षणात भाग घेणारांची संख्या लहान आहे - जितके जास्त लोक भाग घेतील तितकं स्टॅटिस्टिक्स सुधारतं हे खरं असलं तरी ४९ हा आकडा अगदी लहान नाही. ५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल काय येतील हे ठरवण्यासाठी सुमारे एक लाख लोकांचं सर्वेक्षण घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी फक्त २०० लोक. त्यातही या सर्व्हेचे दोन भाग दोन संस्थळांवर घेतले गेले. त्यांच्यात सर्वसाधारणपणे सारखीच आकडेवारी दिसली. त्यामुळे अशा अनेक संस्थळांवर कौल घेतला तरीही साधारण हीच आकडेवारी मिळेल याची शक्यता जास्त आहे. यामागची कारणं काय असावीत? १. शिक्षण - ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना सिव्हिल सर्व्हिससाठी शिक्षण द्यायला सुरूवात केली तेव्हा ते शिक्षण घेणाऱ्या वर्गाला बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळायला लागलं. लोकशाही, स्वायत्तता, नागरिकांचे अधिकार, राज्यपद्धती या गोष्टींबद्दल जागरुकता आली. त्यातून एक वैचारिक उत्थान झालं, आणि स्वातंत्र्यचळवळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तेच काहीसं मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर झालेलं आहे. त्याकाळी साक्षरतेचंच प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास होतं. उच्चशिक्षित मोजकेच. आताच्या पिढीत साक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि उच्चशिक्षितांचं प्रमाणही मोठं आहे. शिक्षणातून विज्ञानाची माहिती होते. पृथ्वी कशी जन्मली, तिचं या विश्वातलं स्थान काय, ती गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती कशी फिरते, या व अशा गोष्टींसाठी सोपी वैज्ञानिक स्पष्टिकरणं मिळतात. मग जगात असलेल्या गूढांची संख्या कमी होते. या गूढांचं उत्तर देण्यासाठी गरज असलेल्या 'अत्त्युच्च शक्ती'चं महत्त्व कमी होतं. शिक्षणामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे धार्मिकतेची गरज, विशेषतः कर्मकांडांची गरज कमी होते. हे भारतातच नाही तर इतरत्रही दिसून आलेलं आहे. गॅलप संस्थेने घेतलेल्या सर्व्हेमध्ये जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं तसतसं देवावरचा विश्वास, धर्माचं महत्त्व आणि धर्मातून जगाच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यावरचा विश्वास कमीकमी होताना दिसतो.
शिक्षण आणि धार्मिकता
२. आरोग्य - एके काळी भरमसाठ मुलं व्हायची आणि त्यातली बरीच अकाली मरायची. रोगराईच्या साथी यायच्या आणि धट्टीकट्टी कर्तबगार माणसं, हाताशी येणारी तरुण मुलं त्यात जायची. सदासर्वकाळ दुष्काळांतून पिचत पिचत, अर्धपोटी जगणं हे नेहेमीचं होतं. अशा दीन प्रसंगी देवाचा धावा करण्याची गरज न पडली तरच आश्चर्य. मात्र आता हे चित्र थोडं बदललेलं आहे. सहासात मुलं होण्याऐवजी दोनतीनच मुलं होतात. आणि ती जगतात. त्यासाठी तुटपुंज्या का होईना वैद्यकीय सुविधा आहेत. रोगराईच्या साथी म्हणजे देवाचे कोप वगैरे म्हणण्याची सोय नाही, कारण अनेक साथीच्या रोगांवर ताबा मिळालेला आहे. लोकांचं आयुर्मान वाढलेलं आहे. त्यासाठी देवाकडे धावा करणं किंवा पावित्र्य राखण्यापेक्षा स्वच्छता, ठीकठाक अन्न आणि वैद्यकीय मदत यावर अवलंबून राहाण्याकडे लोकांचा कल राहिलेला आहे. आणि या बदलाचे परिणाम दिसताहेत. म्हणून सुधारलेलं सामाजिक आरोग्य हे धार्मिकतेत घट येण्याचं एक अप्रत्यक्ष कारण आहे. ३. सुबत्ता - दरिद्री माणसाच्या आयुष्यात येणारी दुःखं निवारण्यासाठी लागणारा पैसा नसतो. त्यामुळे मुलाचं ऑपरेशन करता येत नाही, धनदांडग्यांची दडपशाही सहन करावी लागते. दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर माणसाला हतबल करतं. आणि अशा गांजलेल्या व्यक्तीला देवाचा सहारा घ्यावासा वाटला तर काय नवल? दुर्दैवाने दारिद्र्य आणि अशिक्षितता हे हातात हात घालून जातं. त्यामुळे हे प्रश्न अधिकच बिकट होतात. गॅलपने घेतलेल्या मोठ्या सर्वेक्षणातही http://www.gallup.com/poll/142727/religiosity-highest-world-poorest-nations.aspx हेच दिसून आलेलं आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या गरीब देशांमध्ये ९० टक्क्यांवर लोक 'धर्म महत्त्वाचा आहे' असं सांगताना दिसतात. याउलट स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, फ्रान्स, जपान वगैरे श्रीमंत देशांत फक्त १७ ते ४० टक्के लोक या प्रश्नाला हो असं उत्तर देतात.
धर्म आणि गरिबी
४. जागतिकीकरण - जागतिकीकरणाचा फायदा सुशिक्षित, समृद्ध वर्गाला मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे. भारताबाहेरचं जग प्रत्यक्ष बघून येणं या गटाला परवडू लागलेलं आहे, आणि नवीन संधीही उपलब्ध झालेल्या आहेत. इंटरनेटमुळे सगळं जगच हाताशी आलेलं आहे. यातून काही ना काही प्रमाणात या वर्गाचा परीघ विस्तारलेला आहे. जुनं उगाच जपत बसण्यापलिकडे नवीन, स्वतःला पटेल असं शोधण्याची प्रवृत्ती आणि संधीही वाढलेली आहे. त्यामुळे 'हरतालिका व्रत मी का बरं करावं?' असा प्रश्न विचारण्याची कुवत येते. इतर देशांतल्या तरुणी काही असं व्रत करत नाहीत, पण त्यांचं ठीकठाक चालू आहे की - हे स्वतःच्या डोळ्याने पाहाता येतं. या संस्कृतीच्या सपाटीकरणातून आपल्या वागणुकीतले कंगोरे घासले जातात. हेही एक कारण या वर्गात देवधर्म कमी करण्यामागे आहे. ५. वाढलेल्या संधी - एके काळी जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं, मोबाइल नव्हतं त्यावेळी लोकांकडे मनोरंजनासाठी साधनं कमी होती. त्यावेळी समाजातल्या मंडळींना एकत्र आणणारं धर्म हे एक महत्त्वाचं सोशल नेटवर्क होतं. लग्न, मुंजी, सत्यनारायण यांसाठी लोक हमखास एकत्र यायचे. रोज देवळांत जाणं, तिथे मैत्रिणींना भेटणं हा अनेक स्त्रियांसाठी हक्काचा वेळ असायचा. कारण त्यापलिकडे फारसं काही करण्यासारखंच नव्हतं. आज अशी अनेक सोशल नेटवर्क्स तयार झालेली आहेत, आणि त्यांमध्ये व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या संधी आहेत. त्यातही आपली आवड-निवड जिथे मिळतीजुळती आहे तिथे जाण्याचं आणि इतरत्र न जाण्याचं स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यामुळे मी म्हणू शकतो की मी या फोटोग्राफीच्या ग्रुपवर जाऊन वेळ घालवेन. केवळ लोक भेटण्यासाठी मला भजनी मंडळात मारून मुटकून जाण्याची गरज नाही. ६. राजसत्ता-धर्मसत्ता चढाओढ - गेल्या साठेक वर्षांत जगाने लोकशाहीची प्रचंड वाढ होताना पाहिलेली आहे. त्यात एकाधिकारशाहीचा ऱ्हास होऊन विविध देशांत लोकशाहीची सुरूवात झालेली आहे. लोकशाहीत जनसामान्याला पटेल अशी सेक्युलर विचारसरणी स्वीकारणं आवश्यक ठरतं. त्यामुळे धर्मांतर्गत बाबी वैयक्तिक लोकांच्या हाती असल्या तरी शासकीय पातळीवर बऱ्यापैकी निधर्मी वागणूक दिसते. अभ्यासाची पुस्तकं लोकशाहीने ठरतात. त्यामुळे त्यातून एकाच धर्माचा संदेश देणं कमी होतं. हे कारण त्यामानाने गौण असावं असं वाटतं. मात्र गेल्या अनेक शतकांत धर्मसत्तेचा प्रभाव सर्वत्र जगभर कमी होताना दिसतो आहे हे मात्र खरं आहे. ७. विज्ञान/तंत्रज्ञानाचा प्रसार - गेल्या पिढीने ज्याची कल्पनाही केली नाही अशी इंटरनेट, कॉंप्युटर आणि मोबाइलसारखी यंत्रं आजच्या पिढीला सहज वापरता येतात. माहितीच्या विस्फोटामुळे टेस्ट ट्यूब बेबी, क्लोनिंग वगैरे शोधांची माहिती चटकन कळते, पसरते. जीवनिर्मितीसाठी देवाची गरज नाही यावर अधिक लोकांचा विश्वास बसतो. त्याहीपलिकडे 'आपलं आयुष्य आपल्या हाती आहे, आणि ते हाताळण्यासाठी नवीन आयुधं आहेत' यातून एक जगण्याविषयी आत्मविश्वास येतो. हा आत्मविश्वासही अप्रत्यक्षपणे देवाधर्माचं महत्त्व आयुष्यातून कमी होण्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत असावा. ८. शहरीकरण - विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतात मोठ्या शहरांच्या वाढीमुळे शिवाशीव, अस्पृश्यता हे प्रश्न शहरांपुरते गौण झाले. ट्रेनमध्ये बसताना आपल्या मांडीला मांडी लावून कोण बसला असेल हे सांगता येत नाही. हॉटेलात, रस्त्यावर खाताना ते अन्न कोणी बनवलं आहे याचा हिशोब ठेवता येत नाही. ऑफिसात कोण आपल्याबरोबर काम करतं आहे यावर फार ताबा ठेवता येत नाही. आर्थिक प्रगती साधायची तर ही बंधनं सोडून द्यावी लागली. आणि बहुतांशांनी थोड्या थोड्या तडजोडी करत ती सोडून दिली. याच शहरीकरणातून वैयक्तिक धर्माची उठबस कमी होते. कारण एके काळी प्रत्येक समाज जवळजवळ राहात असे, तसं आता इथे होत नाही. त्यामुळे वैयक्तिक कर्मकांडंही चार भिंतींच्या अजूनच आत गेली. ही सर्वच कारणं सारखीच महत्त्वाची आहेत असं नाही. मात्र गेल्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक आरोग्यवान, समृद्ध, सुशिक्षित आहे हे नाकारता येत नाही. तिला असलेल्या नेटवर्किंगच्या संधी वाढलेल्या आहेत, जगाची तिला जास्त ओळख आहे. हातात इंटरनेट-मोबाइलसारखी आयुधं आहेत. कुठचीही माहिती मिळवायची असेल तर तिला ती चुटकीसरशी मिळू शकते. त्यामुळे कोणीतरी सांगितलेलं ऐकून घेण्यापेक्षा तिला स्वतः तपासून बघणं अधिक रुचतं. 'बाबावाक्यं प्रमाणं' हे मानायला ती तयार नाही. आणि जर शब्दप्रामाण्यावरचा विश्वास कमी झाला, तर धार्मिकता कमी होणं साहजिकच आहे. या सर्वामुळे या सर्वेक्षणातून दिसणारे आकडे अचूक नसले तरी चित्र साधारण बरोबर आहे असं म्हणता येतं. परिणाम इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात धार्मिकता कमी झालेलीच आहे. अमेरिकेत नव्वदीच्या दशकाआधी फक्त चार टक्के लोक म्हणत 'मी निधर्मी आहे' - आता २३ टक्के लोक ते म्हणतात. इंग्लंडमध्ये चर्चमध्ये जाणारी लोकसंख्या वेगाने कमी होत जाते आहे, आणि तिचं सरासरी वय दरवर्षी वाढतंच आहे. याचा अर्थ चर्चमध्ये जाणारी वयस्क पिढी संपत चाललेली आहे, आणि तरुण लोक तिथे जात नाहीत. वरची कारणं तिथेही लागू आहेत. किंबहुना या प्रगत देशांमध्ये ती आधीपासून लागू आहेत म्हणून तिचा परिणाम आत्ताच दिसायला लागला आहे. भारतात हा परिणाम कधी दिसेल? मुळात दिसेल का? हा परिणाम काही काळाने भारतातही दिसू लागेल याबाबत मला बिलकुल शंका नाही. किंबहुना सुशिक्षित, समृद्ध वर्गात हे स्थित्यंतर दिसायला लागलं आहे हेच या सर्वेक्षणावरून सिद्ध होतं. किती वर्षं लागतील हाच खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देणं सोपं नाही. सर्वसाधारणपणे आपण बऱ्याच बाबतीत अमेरिकेच्या सुमारे पन्नास वर्षं मागे आहोत - तेव्हा अजून सुमारे पन्नास वर्षांनी अगदी स्पष्ट दिसायला लागेल एवढंच भोंगळ उत्तर देता येतं. पुढच्या पाच ते दहा वर्षांचं काय? इथे खरी रोचक परिस्थिती निर्माण होते. आपण पाहिलं की ३० कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. त्याचा प्रसार अर्थातच वाढत जाणार आहे. चार वर्षांनी आत्ताच्या वयस्क पिढीतले चारेक कोटी लोक या जगात नसतील. हे अर्थातच मोठ्या प्रमाणावर अशिक्षित, गरीब - त्यामुळे जास्त धार्मिक. याउलट त्यांपेक्षा जास्त सुारे आठ ते दहा कोटी तरुण आपली नवी पिढी बनवतील. देशातलं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असेल. गेल्या काही वर्षांप्रमाणेच प्रगती होत राहिली तर समृद्धीचं प्रमाणही वाढलेलं असेल. अर्थातच आपला सध्याच्या सर्वेक्षणाचा जो सुमारे वीस टक्के वर्ग असेल तो वाढून पंचवीसेक टक्के झालेला असेल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर धार्मिक असणारांची मतदारांमधून पाचेक टक्के घट - आणि मोठ्या प्रमाणावर अधार्मिक असणारांची मतदारसंघात दहा टक्के वाढ झालेली असेल. हा सुमारे पंधरा टक्क्यांचा स्विंग असेल. सध्याचं भाजपाचं सरकार हे धर्म आणि विकास या दोन्ही डगरींवर पाय ठेवून निवडून आलेलं आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नसून मारक आहेत. समृद्धी वाढली की धार्मिकता कमी होते. आणि विकास तर हवाच. आणि त्यासाठी हे सरकार निश्चितच कटिबद्ध राहील याची मला खात्री आहे. तसंही भारताने गेली दहा-पंधरा वर्षं सुमारे ७ टक्के विकासदर ठेवलेला आहे. तो किंचित वाढेल किंवा तेवढातरी निश्चित राहील. तोपर्यंत आपला समृद्ध, सुशिक्षित वर्ग पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढलेला असेल. आणि अशिक्षित धार्मिक वर्ग कमी झालेला असेल. या निवडणुकीत विकासाचं आवाहन आणि धार्मिकतेवरचा भर यांचा जो समतोल साधला होता, त्यापेक्षा अधिक झुकतं पारडं विकासाला पुढच्या निवडणुकीत द्यावं लागेल. मला वाटतं हे चित्र मला दिसतं त्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने भाजपाला दिसत असावं. 'विज्ञानावर आधारित नसलेल्या हिंदू परंपरा त्यागायला हव्या' या अर्थाचं जे विधान मोहन भागवतांनी केलं त्यामागे हीच जाणीव असावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
13236 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

आपलीच मते तुम्ही दुवे म्हणून दिली आहेत.

दत्ता जोशी
Mon, 09/21/2015 - 20:36 नवीन
वेळ मलाही नाही. संपूर्ण जगात अनेक वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ या विषयावर भांडत आहेत. शेकडो मिलियन डोल्लर अशा प्रकल्पांवर खर्च होत आहेत. तेव्हा आपण पामर वाट पाहू कधी एकदा ठोस वैज्ञानिक पुरावा मिळतोय ते या बिग बँग आणि उत्क्रांती बद्दल. या जन्मी तरी तो मिळेल अशी शक्यता दिसत नाही. मी दिलेले दुवे पण वेळ मिळेल तसे पहा. अवकाश आणि काळ अस्तित्वात येण्यापूर्वी नक्की काय होते, नेमका कशाचा आणि कशाचा बँग झाला, अशा बँग मधून इतकं नियमित आणि सुसंबद्ध विश्व कसा निर्माण झालं? एकाद्या स्फोटातून किंवा धडकेतून असे नियमित आणि सुसंबद्ध विश्व तयार होण्याचे चान्सेस किती? हे प्रश्न फसवे नाहीत तार्किकच आहेत त्यना टाळून पुढे जाने अशक्यच नव्हे अशास्त्रीय आहे. असो.
  • Log in or register to post comments

काळ अस्तित्वात येण्यापूर्वी

राजेश घासकडवी
Mon, 09/21/2015 - 20:40 नवीन
काळ अस्तित्वात येण्यापूर्वी
अहो काळच अस्तित्वात नाही तेव्हा आधी नंतर कसं असणार? मी वेळ काढून वरच्या लेखांत तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ती कृपया वाचावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

ऑ? काळ अस्तित्वात नाही? हे

मांत्रिक
Mon, 09/21/2015 - 21:15 नवीन
ऑ? काळ अस्तित्वात नाही? हे कसं? जरा स्वतंत्र धागा काढून इस्कटून सांगाल? वाचायला आवडेल! मीनव्हाईल हा दिव्य शोध लावणार्या शास्त्रज्ञाचेही नाव सांगा म्हणजे आंजावर सर्च मारता येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

चारपाच प्रतिसाद वर मी माझ्या

राजेश घासकडवी
Mon, 09/21/2015 - 22:44 नवीन
चारपाच प्रतिसाद वर मी माझ्या लेखाचे दुवे दिलेले आहेत, त्यातला 'नासदीय सूक्त' लेख वाचावा ही विनंती. तसंच बिग बॅंग किंवा महास्फोट म्हणजे नक्की काय हे समजावून घेण्यासाठी हा दुवा उपयुक्त ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

चुकिचे निष्कर्ष ...

अभिदेश
Tue, 09/22/2015 - 05:39 नवीन
आपण म्हणता की सुशिक्षित, इंटरनेटमध्ये प्रवीण, खाऊनपिऊन सुखी, मुख्यत्वे शहरांत राहाणारांचा, आणि मुख्य म्हणजे तरुण लोक कमी धार्मिक होतायत. असे असेल तर , इकडे अमेरिकेत वाढ्ती देवळे काय सान्गतायत आणि त्यात जाणार्या तरुण लोकान्बाद्दल काय म्हणणे आहे ? ती तर सगळिच तुम्हि म्हणता त्या वर्गात मोडतात.
  • Log in or register to post comments

अमेरिकेत किती देवळं वाढली?

राजेश घासकडवी
Tue, 09/22/2015 - 08:58 नवीन
अमेरिकेत किती देवळं वाढली? त्यादरम्यान अमेरिकेत भारतीयांची संख्या किती वाढली? ते सांगितलंत तर त्याविषयी काही बोलता येईल. परदेशात राहाणाऱ्या विशिष्ट गटाची लोकसंख्या ही नेहमीच बदलती असते, त्यामुळे तिचा अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढणं कठीण असतं. त्यामुळे त्याच देशातल्या लोकांची वर्तणुक तपासून बघणं जास्त योग्य ठरतं. अमेरिकेत खुद्द चर्चेस ओस पडत आहेत. अनेक चर्चच्या बिल्डिंगी विकल्या जात आहेत. चर्चमध्ये जाणारांची संख्या कमी होते आहे आणि सरासरी वय वाढतं आहे. हे गेले कित्येक वर्षं चालू आहे. भारतात या प्रक्रियेला आत्ता सुरूवात झालेली आहे. त्याचे परिणाम दिसायला अजून दोनतीन दशकं जावी लागतील असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

लेख पटला / लेखातल्या आकडेवारितले निश्कर्ष अजिबात नाही पटले

मिसळपाव
Tue, 09/22/2015 - 06:52 नवीन
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही. -------------------------------------------------------------------------------------------------- राघा, आधी न पटलेल्या गोष्टिंबद्दल लिहितो.
.....तेव्हा सर्वेक्षणात दिसणारा गट लहान असला तरी तो सुमारे २०% लोकांचा बनलेला आहे.....
ज्या ४९ लोकानी सर्व्हे पुरा केला ते २०% शिक्षीत गटातले असले तर त्याचा अर्थ "हा सर्व्हे या २०% लोकांचा प्रातिनिधिक आहे" असा होत नसून "जरी १०००, ५००० कींवा १०,००० मिपा व ऐसीच्या मेंबरानी ह्या सर्व्हेत भाग घेतला असता तरी त्याने फक्त २०% शिक्षीत लोकांच्याच मतांचा अंदाज आला असता" असा होतो.
.....४९ हा आकडा अगदी लहान नाही. ५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल काय येतील हे ठरवण्यासाठी सुमारे एक लाख लोकांचं सर्वेक्षण घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी फक्त २०० लोक. त्यातही या सर्व्हेचे दोन भाग दोन संस्थळांवर घेतले गेले. त्यांच्यात सर्वसाधारणपणे सारखीच आकडेवारी दिसली. त्यामुळे अशा अनेक संस्थळांवर कौल घेतला तरीही साधारण हीच आकडेवारी मिळेल याची शक्यता जास्त आहे......
ईथे परत चुकीचं निदान केलं गेलंय. हा असा निश्कर्ष काढणं म्हणजे - "५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल ठरवण्यासाठी आत्तापर्यंत ५४ मतदारसंघातनं २०० लोकांचं सर्वेक्षण घेतलंय. त्यात अबक पार्टीला बहुमत मिळाल्याचं दिसलं. उरलेल्या मतदारसंघात कौल घेतल्यानंतर तिथेही अबक पार्टीलाच बहुमत मिळेल याची शक्यता जास्त आहे" असं म्हणण्यासारखं आहे.
सर्व्हे ईतक्या तुटपुंज्या गटावर आधारित आहे हे मान्य करूनही पुढचं विश्लेषण करणं हे बरोबर वाटंत नाही. "मी फोटोशॉप जेमतेम अर्धा तासच वापरलंय. पण तरिही मी त्याबद्दल रिव्ह्यू लिहितो. तो अर्थातच अचूक असायची शक्यता फारच कमी आहे पण अर्धा तासतर वापरलाय त्यामुळे लिहितो तरीही" असं केल्यासारखं वाटतंय.
आता मी पुढे जे लिहिणारे, पटलेल्या गोष्टिंबद्दल, त्यामुळे मी नक्की काय पिउन लिहायला बसलोय अशी शंका तुम्हाला येणं साहजिकच आहे - ईतकं सगळं असलं तरी "यामागची कारणं काय असावीत?" या पुढचा सगळा लेख बरोब्बर वाटतो नी पटतो!! कारण मला वाटतं 'यामागची' याचा अर्थ "गेल्या दोन पिढ्यांमधे - विज्ञानाने अनेक घटनांची/परिणामांची/अनुभवांची कारणमिमांसा विशद केल्यामुळे - दैववाद, देव/वाईट शक्तिंमुळे अमुक-तमुक गोष्ट होते अशा कार्यकारणभावावरचा विश्वास, धार्मिक कर्मकांडांचा आधार घेणं अशा गोष्टींमधे झालेली (लक्षणीय) घट".
सर्व्हे घेउन 'साधार' स्पष्टिकरण देण्याचा तुमचा उद्देश असावा असं वाटतं. पण मला वाटतं हि अशी घट झालेली आहे असं सर्व्हे न घेताही म्हणायला प्रत्यवाय नसावा कारण आपण त्याची उदाहरणं आपल्या आसपास बघतो आहोत. गणेशोत्सव वाढले आणि दहिहंड्या जास्त लागतात याचा निश्कर्ष धार्मिकता वाढली असा काढणं चुकीचं ठरेल. गणेशोत्सव वाढले पण सह्स्त्रावर्तनं करणं, २१ गणपती बघून येणं, गणपतीच्या कार्यक्रमात कीर्तन असणं हे झपाट्याने लयाला जातंय / गेलंय, दहिहंड्या जास्त लागतात पण त्यात लाखा-लाखांच्या रोख उत्पन्नाची सोय असते आणि दहिहंडी पथकातल्या कीती जणाना कृष्णजन्माशी देणं-घेणं असतं देव जाणे! उलट एकादष्ण्या, भूत उतरवणं, एका दिवसात गुरूचरित्र वाचणे हे ईतकं ऐकू येत नाही. मी तर म्हणेन दोन नाही, तीन पिढ्यांपासून अशी घट होतेय. कीती वेळा तुम्ही बोडण भरलेलं ऐकलंय, कीती वेळा घागरी फुंकणं नी त्या बाईच्या अंगात येणं हे पाहिलंय, गावात साप/विंचू चावल्यावर देवॠषाकडे / तालुक्याच्या हॉस्पिटलात जाणार्‍या लोकांचं गुणोत्तर पन्नास वर्षांपूर्वी किती होतं आणि आता किती आहे त्याचा विचार करून बघा. असो.
राघा, पंचवीस वर्षानी हा लेख वाचला जाईल तेव्हा जग कसं असेल याची उत्कंठा आहे. :-)
  • Log in or register to post comments

"मी फोटोशॉप जेमतेम अर्धा तासच

राजेश घासकडवी
Tue, 09/22/2015 - 08:51 नवीन
"मी फोटोशॉप जेमतेम अर्धा तासच वापरलंय. पण तरिही मी त्याबद्दल रिव्ह्यू लिहितो. तो अर्थातच अचूक असायची शक्यता फारच कमी आहे पण अर्धा तासतर वापरलाय त्यामुळे लिहितो तरीही"
पण जिथे "मी फोटश़ॉपच्या सॉफ्टवेअरचा बॉक्स उचलून त्यात डिस्क असल्याचं हलवून बघितलंय" "मी त्या बॉक्सला हात लावून बघितलाय" "मी तर पंधरा बॉक्सेसचे रंग बघितले आहेत" असं म्हणून ठाम मतं मांडली जातात, त्यात अर्धा तास वापरणाराचं मत अधिक महत्त्वाचं नाही का? आणि ज्यांनी वर्षभर वापरलंय अशांचे रिव्ह्यू तुम्हाला मिळतात का? संपूर्ण भारतीय समाजाच्या क्रॉससेक्शनचा, डेमोग्राफिकवाइज पद्धतशीर सर्व्हे वाचायला मिळाला तर मी माझा कचऱ्याच्या टोपलीत टाकायला तयार आहे.
पण मला वाटतं हि अशी घट झालेली आहे असं सर्व्हे न घेताही म्हणायला प्रत्यवाय नसावा कारण आपण त्याची उदाहरणं आपल्या आसपास बघतो आहोत.
याच्यापुढे तुम्ही लिहिलेलं बरोबरच आहे. मात्र तुम्ही जितक्या ठामपणे हे सांगत आहात तितक्याच ठामपणे इतर काहींनी 'असली काही घट-बिट झालेली नाही, आणि होणारही नाही' (कारण मी फोटोशॉपचा बॉक्स व्यवस्थित न्याहाळलाय!) असं म्हटलं आहे. म्हणूनच व्यक्तिगत निष्कर्षापेक्षा लहान का होईना समूहाचा सहभाग महत्त्वाचा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

तुमचे वरचे दोन्ही मुद्दे पटले.

मिसळपाव
Tue, 09/22/2015 - 18:32 नवीन
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही. -------------------------------------------------------------------------------------------------- तुमचे वरचे दोन्ही मुद्दे पटले. सर्व्हेतली आकडेवारी देण्यामागे 'साधार स्पष्टिकरण' देण्याचा तुमचा हेतू असावा हा माझा कयास बरोबर आहे तर. पण त्यामुळे मूळ लेखनाला (जे सुसंगत आहे, पटतंय) त्याला बाधा येत्येय असं वाटलं म्हणून प्रतिक्रियेचा खटाटोप केला ! आणि मोठ्ठ्या प्रमाणाचा सर्व्हे जरी असला, मोठ्ठ्या समूहाचा प्रातिनिधिक जरी असला तरी जोपर्यंत Theory of Evolution एव्हढं वाचल्यावर "घ्या. अहो निव्वळ थिअरी आहे ही नुसती. पुरावा कुठाय याचा? कसलं विज्ञान बिज्ञान घेउन बसलात? " इथपासून सुरू करणाते भिडू आहेत तोपर्यंत ५०० प्रतिसादाना मरण नाही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जेथून जगाची व्युत्पत्ती झाली तो बिंदू

दत्ता जोशी
Tue, 09/22/2015 - 09:48 नवीन
जगाच्या व्युत्पत्तीचा शोध घ्यायचा प्रयत्न वेदांनी केला आहे. आता तुमचे अंदाज सिद्ध करण्यासाठी जर वेद हे प्रमाण ठरत असतील तर मग मला काही म्हणायचे नाही, कारण त्याच रुग्वेदामधील सुक्त घेऊन आपण बिग बँग च्या सिद्धांताला चिकटवण्यचा प्रयत्न केला आहे. नक्की काय झालं ते कोणालाच माहिती नाही. (जगात काही लोक ते याची देही याची डोळा देखिल्या प्रमाणे सर्वज्ञाचा आविर्भाव आणतात त्यांची क्षमा मागून). कारण वेदांनुसार या सर्वांच्या पलीकडे जावून सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेशवराला (supreme power - देव देवता नव्हे, देव आणि देवता या सृष्टीच्या निमितीनंतर अस्तित्वात आल्या.) समजून घेणे अशक्य आहे. (जो वेदांनाही कळला नाही). असो. जेव्हा आकाश पृथ्वी (पंच महाभूते नव्हती), आपल्याला अभिप्रेत असा काळ ( time ) अस्तित्वात नव्हता तेव्हाही या उत्पात्तीनान्तारच्या काळाला ( time after creation ) व्यापणारा असा एक महांकाळ ( great time ) होताच कि.म्हणजेच सर्व सृष्टी " भूतकाळात" जावून आकुंचन पावत पावत एका बिंदू मध्ये सामावेल तो बिंदू या महाकाळ आणि हे सर्व जिथे घडले तिथे एक अवकाश (space ) असणारच कि. जे अवकाश या स्फोटानंतर सृष्टीच्या प्रसारणाला वाव देईल. म्हणजे time आणि space नव्हतेच हा तर्क अगदीच एकाकी पडतो. फक्त time before creation आणि time after creation असे दोन भाग या बिन्दुमुळे होतात. आपण सर्व दुसर्या काळाविषयी ( time ) बोलतो कारण आपल्याला तो समजतो किंवा लागू होतो पण हा काळ आपल्यात समाविष्ट करून घेणारा एक सुपर टाईम आहेच कि. जो सृष्टी आधी होता आणि सृष्टी नंतर हि राहील. बरं अश्या स्फोटामुळे किंवा धडके मुळे प्रसारण पावणारे विश्व इतके नियमित कसे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या या सृष्टीआधी पंचमहाभूते कोणत्या स्वरुपात होती आणि ती नक्की कशी अस्तित्वात आली याचे काहीच स्पष्टीकरण मिळत नाही. ( हे मी अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर लिहितो आहे. तेव्हा विरोधासाठी विरोध करतो आहे असा गैरसमज करून घेवू नये. आपल्याला याचे स्पष्टीकरण देणारा शास्त्रीय आधार मिळाला असल्यास कृपया दुवा देणे. पण असे कोणतेही स्पष्टीकरण आज तरी उपलब्ध नाही.) एकूणच पाहता जगाच्या निर्मितीची नास्तिक/ परमेश्वर न मानणाऱ्या वैज्ञानिकांची बिग बँग थियरी आणि श्रद्धाळु लोकांची सृष्टीकर्ता परमेश्वर निर्मिती ची थियरी या दोन्ही तितक्याच हायपोथेटिकलच आहेत. म्हणूनच बिग बँग, बिग बँग करून परमेश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि श्रद्धाळू लोकांची टर उडवणाऱ्या विभूतींना मी कायमच कोपरापासून नमस्कार करत आलो आहे. .
  • Log in or register to post comments

सर्वेक्षण आणि कौलाचं विश्लेषण दोन्हिशी असहमत!

नया है वह
Tue, 09/22/2015 - 11:12 नवीन
You may wonder why the name PSVL-C13 was missing from the Polar Satellite Launch Vehicle (PSLV) series. This omission was purely based on widely held belief in numerology about the number 13 which is considered unlucky. Following the advice of some numerologist, ISRO had chosen to skip the problematic number and name the next space mission as PSLV-C14 after PSLV-12. Last year, the success of India’s first mission to moon, Chandrayaan-1, was an astounding feat. As usual, before the launch, ISRO officials visited the Tirupati temple to offer special prayers for the success of the mission.
(मराठी मधे नाही लिहिले त्यासाठी क्षमस्व!) या बद्दल आपले विचार काय आहेत?
  • Log in or register to post comments

बरं या सर्वेक्षणसहभागाबद्दल

द-बाहुबली
Tue, 09/22/2015 - 20:34 नवीन
बरं या सर्वेक्षणसहभागाबद्दल पार्टी वगैरे मिळणार आहे का ? का सदस्यांना आपलं आपलं मत जाणून घेण्यासाठीच फक्त याचा उपयोग समजायचा ?
  • Log in or register to post comments

स्टॅटिस्टिक्स

उपाशी बोका
Wed, 09/23/2015 - 00:51 नवीन
ऐसीअक्षरेवर माझ्या उत्तराला खवचट श्रेणी मिळाली आहे, म्हणून तिथे दिलेले उत्तर इथेपण डकवत आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये महत्वाचे आहे म्हणजे विदा आणि त्याचे विश्लेषण. The point of statistical analysis is to determine to what degree, if at all, the hypothesis may be said to hold true for a generic class of subjects, when all other possible influencing factors are accounted for or eliminated. This is usually done by taking a large enough number from a sufficiently diverse pool of subjects within the said class. Statistics published in peer reviewed journals are likely to be better, and are at least open about the methods, but even then there are often arguments about the validity of the analysis used and possible biases in the population. सर्वात महत्वाचे म्हणजे काढलेला निष्कर्श अचूक आहे, ही बाब पुन्हा-पुन्हा सिद्ध करता आली पाहिजे. (It should be reproducible.) याकरता लॉ ऑफ लार्ज नंबर्स वापरतात. स्टॅटिस्टिकचा वापर करून आपल्याला पाहिजे तसा निष्कर्श काढता येतो. बर्‍याचदा आपले मत पुढे करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स वापरले जाते. ते कसे हे पाहू. १. स्वतःला सोयीस्कर डेटासेट वापरायचा. समजा तुम्हाला सिद्ध करायचे आहे की हल्लीची मुले/मुली पालकांच्या तुलनेत तंबाखू कमी वापरतात. मग तुम्ही सर्वे घेताना उदगीरच्या, फक्त २ कॉलेजात, मुलींना प्रश्न विचारायचे पण निष्कर्श काढताना "महाराष्ट्रात तंबाखू वापर कमी झाला" असे म्हणायचे. समजा तुम्हाला सिद्ध करायचे आहे की हल्लीची मुले/मुली पालकांच्या तुलनेत तंबाखू जास्त वापरतात मग तुम्ही आयटीसी कंपनीचा वाढता रेवेन्यू सर्वेसाठी वापरायचा. २. सोयीस्कर प्रश्न विचारायचे. बाबरी मशीद पडली किंवा गुजरातमध्ये दंगे झाले, तेव्हा सरकारला दोष द्यायचा असेल तर पुढील प्रश्न विचारायचे. तुमच्या मते सरकारला अपयश आले का? a) No, they did everything possible. b) Yes, security could have been a bit tighter. c) Yes, the government is hopelessly incompetent. d) Yes, the government did it on purpose. e) Not sure. अर्थात फार कमी लोक a) पर्याय वापरतील, म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध झाला. ३. अ‍ॅवरेज, मीन, मिडियन हे स्वतःच्या सोयीनुसार वापरायचे. मी काही विचारवंत नाही, पण पुढील मते पुरेशी बोलकी आहेत. * There are lies, damned lies and statistics. - Mark Twain * Statistics are used much like a drunk uses a lamppost: for support, not illumination. - Vin Scully * There are two ways of lying. One, not telling the truth and the other, making up statistics. - Josefina Vazquez Mota * It is the mark of a truly intelligent person to be moved by statistics. - George Bernard Shaw * I can prove anything by statistics except the truth. - George Canning * Do not put your faith in what statistics say until you have carefully considered what they do not say. - William W. Watt
  • Log in or register to post comments

तिथेच दिलेलं उत्तर इथे कॉपीपेस्ट...

राजेश घासकडवी
Wed, 09/23/2015 - 01:38 नवीन
हे सगळंच मान्य आहे. म्हणूनच कौल घेताना त्यामागचं उद्दिष्ट आणि त्यासाठी तयार केलेले प्रश्न हे सगळ्यांसमोर स्वच्छपणे मांडलेले असले पाहिजेत. मला प्रश्न असा पडतो की कौलाबद्दल घेतलेले आक्षेप कौलावरच का नाही नोदंले गेले? विश्लेषण करताना कौलाच्या मर्यादा स्पष्टपणे मांडल्या असल्या पाहिजेत. इथे त्या केलेल्या आहेत. निष्कर्ष आख्ख्या समाजाला लागू नाहीत तर या कौलाला प्रतिसाद देणाऱ्यांच्या गटाबद्दल बोलतो हेही स्पष्ट म्हटलेलं आहे. असं असताना हे स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर कशासाठी? इथे प्रश्न असा आहे की या कौलांमध्ये भाग घेणारांचं खरोखर प्रमाण भारतातल्या लोकसंख्येमध्ये किती आहे. माझा अंदाज सांगितला - २० टक्के. तो तितका का असावा याबद्दल काही सपोर्टिंग आकडेवारीही दिलेली आहे. जर हा २० टक्के आकडा मान्य असेल तर त्या २० टक्क्यांसाठी निष्कर्ष लागू आहेत असंच म्हटलं पाहिजे. आणि लेखात तेवढंच म्हटलेलं आहे. तुम्हाला जर हा आकडा कमी असेल असं वाटतं तर त्यासाठी काहीतरी आकडेवारी, कारणपरंपरा द्या. ज्या ४९ लोकांनी उत्तरं दिली ते कुठच्या ना कुठच्या गटाचे प्रतिनिधी आहेतच. तो गट किती मोठा आहे, अथवा लहान आहे यावर वाद होऊ शकतो. कौलच इनव्हॅलिड कसा ठरतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका

वा बोकोबा! काय खतरनाक ओचकरलंय

मांत्रिक
Wed, 09/23/2015 - 01:42 नवीन
वा बोकोबा! काय खतरनाक ओचकरलंय! वादाची बाजू फटक्यात पलटवलीत की! आवडला मुद्दा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा