Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वडापाव on Sat, 11/09/2013 - 16:34
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही. एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता. ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.' 'का गं, काय झालं?' 'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.' मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली. 'तू ब्राह्मण आहेस?' 'हो!!' 'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.' मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो. आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो. जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.
  • 44517 views

प्रतिक्रिया

Submitted by यसवायजी on Sat, 11/09/2013 - 21:48

In reply to मलाही "तू ब्राह्मण??? वाटत by बॅटमॅन

Permalink

@मलाही "तू ब्राह्मण??? वाटत

@मलाही "तू ब्राह्मण??? वाटत नाही" अशा प्रतिक्रिया एकदोनदा ऐकाव्या लागल्या आहेत>> मलाही.. बर्‍याचदा.. ------ बुधवारी मेसमधे चिकन असते.श्रावणा-बुधवारी आज चिकन का नाही? असे विचारले तर मेसवाल्या ताईने चार्-चौघात लायकीच काढली राव.. म्हणे "अरे काय लाज बीज वाटते का नाही? सगळं गाव श्रावण पाळतंय आणी कुलकर्ण्यांना चिकन पाहीजे झालंय.." :D

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 11/10/2013 - 02:23

In reply to मलाही "तू ब्राह्मण??? वाटत by बॅटमॅन

Permalink

त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे

त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे नसल्याने अजूनच Wink
गोरा देशस्थ आणि काळा कोकणस्थ, लै डेंजरस असाही एक समज आहे.

Submitted by मंदार कात्रे on Sat, 11/09/2013 - 23:22

In reply to 'तू ब्राह्मण आहेस का?' by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

बीग्रेडी दहशतवाद

खरी डोक्यात जाणारी लोकं म्हणजे "बी"ग्रेडी लोकं. दोन-तीन "बी"ग्रेड्यांना त्यांच्या आई-बहीणीची आठवण करुन दिल्यावर त्यांचं टोचुन बोलणं बंद झालं.
अगदी बरोबर !

Submitted by योगी९०० on Sun, 11/10/2013 - 00:01

In reply to 'तू ब्राह्मण आहेस का?' by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

हा हा..

शिवाय त्यावर काही लोकांच्या "तुमच्या मुळे नॉन-व्हेज महाग झालयं अश्या प्रतिक्रिया" ;)..!! असे मला कोणी म्हणाले तर मी म्हणतो ..." तुम्ही तुमच्या हातातली तलवार आमच्या हातात दिलीच का? आता दिलीत ना, मग आम्ही आता नॉन्वेज खाऊ नाहीतर मस्तानीला ठेऊ. काही विचारायचे नाही.".

Submitted by भुमन्यु on Sun, 11/10/2013 - 10:39

In reply to हा हा.. by योगी९००

Permalink

+१

+१ ... हाच अनुभव खूप ठिकाणी आलाय!!! तुमच्यामुळे नोन-व्हेज महाग झालंय (जरी मी शाकाहारी आहे तरी) ---- रागा ---

Submitted by सुबोध खरे on Sun, 11/10/2013 - 11:47

In reply to +१ by भुमन्यु

Permalink

नॉन व्हेज महाग

माझ्या चुलत भावाला त्याच्या सी के पी मित्राने सांगितले कि तुम्ही भट लोक नॉन व्हेज खायला लागल्यापासून नॉन व्हेज महाग झालंय. त्यावर माझा भाऊ म्हणाला तुम्ही परभट भाज्या खायला लागल्या पासून भाज्या महाग झाल्या आहेत. यावर त्याने तसे बोलणे सोडून दिले.

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sun, 11/10/2013 - 14:24

In reply to नॉन व्हेज महाग by सुबोध खरे

Permalink

सगळ्या ब्राम्हणांना हे ऐकावेच लागते

मला कोणी असे म्हणाले तर मी म्हणतो "आम्हाला परवडते म्हणुन खातो, तुम्हाला जे परवडते ते तुम्ही खा, उगाच आमच्या खाण्याकडे बुभुक्षीतासारखे पाहु नका." एकदा असे उत्तर मिळाले की परत कोणी नादाला लागत नाही.

Submitted by वडापाव on Sat, 11/09/2013 - 20:34

Permalink

सांभाळून बुवा!!

एका गो-या आणि घा-या मित्राला कोब्रा समजून देब्रांची उडवायला गेलो तर तोच देब्रा निघाला. सावरासावर करताना पळता भुई थोडी झाली पण मित्रच होता त्यामुळे फारसं मनाला लाऊन घेतलं नसावं त्यानं

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 11/10/2013 - 10:35

In reply to सांभाळून बुवा!! by वडापाव

Permalink

आडनाव जोशी होतं का हो त्याचं?

आडनाव जोशी होतं का हो त्याचं? ;)

Submitted by बाबा पाटील on Sat, 11/09/2013 - 20:37

Permalink

पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ?

सुरुवातीस आयुर्वेद शिकायला सुरुवात केल्यावर, पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ? हे वाक्य बर्‍याच वेळा टोचल.मग ????

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 11/09/2013 - 20:43

In reply to पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ? by बाबा पाटील

Permalink

हे मात्र प्रत्यक्ष पाहीलयं.

हे मात्र प्रत्यक्ष पाहीलयं. माझा एक पाटील नावाचा मित्र चांगला वैद्य आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्याला पण लोकं असचं विचारायचे आणि आता तेचं लोकं त्याच्याकडुन पथ्य-पाणी लिहुन घेतात. ;). जातीवर काय असतय हो. सगळं डोक्यात आणि हातातल्या कौशल्यावर आहे.

Submitted by रेवती on Sat, 11/09/2013 - 20:51

In reply to पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ? by बाबा पाटील

Permalink

अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे

अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे आहे. या गोष्टींना खरेच कितीसा अर्थ उरलाय? माझ्या एका मैत्रिणीची म्हातारी काकू पहिल्या भेटीतच "आम्हाला तुम्ही आयुष्यभर कमी का लेखलत?" असे विचारत होती. अश्चर्याचा धक्का बसला होता. आपण ज्यांना पहिल्यांदा भेटतोय त्यांनी असे बोलावे? टोचून तुम्हाला, मला, आणि शेकडोजणांना बोलले गेले आहे. अगदी स्वजातीयही त्यातल्यात्यात पोटजातीतल्यांनाही बोलतात, अगदी तीच जात असली तरी आर्थिक कारण, रंग, रूप, मालमत्ता, फक्त मुली होणे असे बोलायला काय काहीही चालते. ;)पण आजकाल लगेच भावना दुखावतात आणि हातात तलवारी येतात त्याचे वाईट वाटते. मी देशस्थ असल्याने माझ्या सासरचे कोकणस्थ नातेवाईक (सासूसासरे नव्हेत.....त्यांनीच पसंत केल्याने ते काय बोलणार? ;) ) बोलल्याशिवाय राहिले असतील का? किती मनाला लावून घ्यायचे याबद्दल म्हणतीये.

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 11/10/2013 - 02:41

In reply to अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे by रेवती

Permalink

होतं असं कधी कधी....

माझ्या एका मित्राबरोबर, त्याच्या ओळखितल्या, श्री. वरूणगावकर नांवाच्या गृहस्थांच्या घरी गेलो असता दरवाजातच माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर माझ्या मित्राने ओळख करून दिली. 'हा माझा मित्र, प्रभाकर पेठकर'. त्यावर त्यांची प्रतिक्रिया 'पेठकर? म्हणजे बाय कास्ट?' मी खवटपणे 'देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण' असे खणखणीत शब्दात सांगितले. मला आपादमस्तक न्याहाळत पण उत्तरातील कडवटपणा जाणवून त्यांनी घरात तर घेतले. पण मित्राचे काम संपून पुन्हा निघेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. बाहेर आल्यावर मित्राला मी म्हणालो, 'पुढच्या खेपेस मी खालीच पानवाल्याजवळ उभा राहीन तुझे काम आटपेपर्यंत.' सुदैवाने तेवढी वेळच आली नाही. माझ्या आयुष्यातला हा एवढा एकच प्रसंग. बाकी, मित्रमंडळी कधी प्रेमाने, कधी कौतुकाने तर कधी 'खेचताना', 'अरे! भटा.' असे सहज म्हणायची. पण ते मैत्रीच्या नात्यातील प्रेमळ संबोधन असे, म्हणून कधी गांभिर्याने घेतलेच नाही.

Submitted by ग्रेटथिन्कर on Sat, 11/09/2013 - 20:49

Permalink

भारतात प्रत्येक गोष्ट जातीय

भारतात प्रत्येक गोष्ट जातीय फिल्टर लावून बघितली जाते, उकडीच्या मोदकाच्या मालकीवरुन आंजावर जातीय भांडणं करणारे लोकही आहेत ,हे बघुन कदाचीत ऑक्सीजनपेक्षाही जात महत्वाची असावी असे वाटते... (उकडीचे ,कणकेचे कोणतेही मोदक हादडून मिळतील-ग्रेथिं )

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 11/09/2013 - 20:50

Permalink

अंतरजातीय विवाह हे जे जात

अंतरजातीय विवाह हे जे जात तोडण्याचं हत्यार आहे,त्याची परिपूर्णता अपत्याची जात ,आई/वडिलांची मिळून.. अशी मिश्र सांगितली गेली(च) पाहीजे. (उदा-ब्राह्मण मराठा/कायस्थ माळी/सोनार शिंपी)..... नाहीतर असे विवाह हे नुसतेच सोपस्कार होऊन बसतील!

Submitted by वडापाव on Sat, 11/09/2013 - 21:00

In reply to अंतरजातीय विवाह हे जे जात by अत्रुप्त आत्मा

Permalink

असं नाही काही. समजा

असं नाही काही. समजा उदाहरणादाखल आई मराठा आणि बाप ब्राह्मण असेल, तर अपत्याला दोन्ही जातीच्या माणसांच्या बाजू समजतील आणि दोन्ही जातीतील जी काही दरी असेल, ती कमी करण्यात आणि निदान आपल्या परिवारापुरता त्यांच्यात समेट घडवण्यात त्याला यश येऊ शकतं. इतकंच नाही तर वादाच्या प्रसंगांत दोन्ही जातींपैकी कोणत्यातरी एका जातीची बाजू घेणं म्हणजे एका पालकाच्या विरोधात जाण्यासारखं झाल्याने, अपत्य हे जातींच्या बाबतीत तटस्थ भूमिका घ्यायला शिकेल. आंतरजातीय विवाहांचं प्रमाण वाढलं की अशी तटस्थ भूमिका घेणारी नवी पिढी जन्माला येईल आणि आपोआपच अगदी वैयक्तिक स्वरुपातल्या जातीभेदालासुद्धा खीळ बसेल. आणि मग सामाजिक स्तरावर, आपली राजकीय पोळी पिकवू पाहणा-यांना जातीवादाचा बोभाटा करता येणार नाही.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 11/09/2013 - 22:33

In reply to असं नाही काही. समजा by वडापाव

Permalink

वडापाव,

वडापाव, तुंम्ही व्यवहारात सांगताय,तेच मी 'तत्वात' पूर्ण करावं असं म्हणतोय. आपल्याकडे व्यवहार बदलतात, आणि तत्व तशीच रहातात. बरीचशी टीका ,ही तत्वावरूनच होते...आणि त्यामुळे मग 'बदललेली' माणसेपण 'बिघडायला' लागतात! म्हणुन तत्व(ही) बदलणं आवश्यक आहे. दुसरं असं की , हा नवेपणा समाजावर संस्कारित होण्यासाठी सांगितला जाणं ही आवश्यक आहे. :)

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 11/09/2013 - 21:09

In reply to अंतरजातीय विवाह हे जे जात by अत्रुप्त आत्मा

Permalink

असहमत

असहमत :( यात धोका असा की त्यामुळे "ब्राम्हण-मराठा" ही जात "ब्राम्हण-माळी" जातीपेक्षा जास्त भारी आहे अशी नविन प्रकारची जातीरचना तयार व्हायची ! :( त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे: बाप : माणूस आई : माणूस अपत्य : माणूस काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल. +D

Submitted by यसवायजी on Sat, 11/09/2013 - 22:51

In reply to असहमत by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+१

@ त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे: बाप : माणूस आई : माणूस अपत्य : माणूस >> असेच वाटते. सरकारी कागदपत्रांतुनसुद्धा जात/धर्म विचारणे बंद होईल असा दिवस बघायची इच्छा आहे..

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 11/10/2013 - 00:47

In reply to असहमत by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

@यात धोका असा की त्यामुळे

@यात धोका असा की त्यामुळे "ब्राम्हण-मराठा" ही जात "ब्राम्हण-माळी" जातीपेक्षा जास्त भारी आहे अशी नविन प्रकारची जातीरचना तयार व्हायची ! Sad>>> होय! असल्या तूलना होत राहतील. पण त्यानंतर पुढच्या/पुढच्या पिढित जात लांबत जाऊन जात सांगणं निर्रथक व तापदायक होइल,आणि आपल्याला अपेक्षित असलेली माणूस-हीच जात सांगावी/पाळावी लागेल. :) त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे:>>> सांगायला नव्हे,पाळायला पाहीजे. पण ते आपोआप होणं शक्य नाही.त्या साठि जाति 'मोडण्याचे' कार्यक्रमच हवेत. @बाप : माणूस आई : माणूस अपत्य : माणूस>>> हा भाबडा आशावाद आहे... असो! :) @काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 11/10/2013 - 01:31

In reply to @यात धोका असा की त्यामुळे by अत्रुप्त आत्मा

Permalink

@काही दिवसांनी (पिढ्यांनी)

@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे. नो प्रॉब्लेम ! एका किंवा अनेक कोणत्याही प्रकारे भारतातील अयोग्य रुढी-परंपरा जर दूर झाल्या तर आनंदच आहे... त्या भूतकाळात जाणे जास्त महत्वाचे. (एखादी गोष्ट करण्याचे एकापेक्षा जास्त प्रकार बरोबर असू शकतात यावर विश्वास असणारा) इए

Submitted by रेवती on Sat, 11/09/2013 - 21:00

Permalink

माननीय वडापावजी, तुमच्या

माननीय वडापावजी, तुमच्या धाग्याच्या विषयामुळे एका संपादकाला हितं तळ ठोकून र्‍हावं लागतय व प्रतिसाद देत बसावं लागतय. असे धागे विकांताला काढून संपादकांना सुट्टीचा आनंद मिळू देत नाही तुम्ही! आता निदान तुमच्या धाग्याला चार प्रतिसाद दिलेत हे लक्षात ठेऊन माझा धागा येईल तेंव्हा सव्याज परतफेड करावी.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 11/09/2013 - 21:17

In reply to माननीय वडापावजी, तुमच्या by रेवती

Permalink

संपादकीय अधिकारांचा वापर करून

संपादकीय अधिकारांचा वापर करून "माझा कंपू" ही जात बनविण्याचा अशक्त प्रयत्न असल्याचा वास या प्रतिसादाला का ब्रे येतोय ? ;) (मिपा जमातीच्या रितीभातींप्रमाणे टीव्र णीशेढ वेग्रे करावा काय या विचारातला) इस्पीकचा एक्का (हघ्या)

Submitted by रेवती on Sat, 11/09/2013 - 21:29

In reply to संपादकीय अधिकारांचा वापर करून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मिळाला, नव्या धाग्याचा विषय

मिळाला, नव्या धाग्याचा विषय मिळाला! "आहेच मी कंपूबाज!!! मग?" ;) मदनबाण, वडापाव यांना एवढ्यात चार प्रतिसाद देऊन झाल्याने त्यांच्याकडून किमान दोन दोन प्रतिसाद, तुम्ही एखादा द्या, मउवा, बाबा पाटील यांना आत्ताच एक उपप्रतिसाद दिलाय त्यामुळे तेही देतील. संपादकांना चावडीवर आणि महिलांना अनाहितामध्ये आवाहन केल्यास बघता बघता शंभरेक प्रतिसाद मिळतील.

Submitted by वडापाव on Sat, 11/09/2013 - 21:49

In reply to मिळाला, नव्या धाग्याचा विषय by रेवती

Permalink

रेवतीताई,

प्रतिसादांबद्दल आभारी आहे. :) तुमच्या कंपूत यायलाही आवडेल, तसंही सांजसंध्यांनी माझा मित्रपरिवार वाढावा असा आशीर्वाद दिलेलाच आहे.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 11/10/2013 - 00:51

In reply to रेवतीताई, by वडापाव

Permalink

@मित्रपरिवार वाढावा असा

@मित्रपरिवार वाढावा असा आशीर्वाद दिलेलाच आहे.>>> =)) =)) =))

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 11/09/2013 - 22:08

In reply to मिळाला, नव्या धाग्याचा विषय by रेवती

Permalink

मतांची जमवाजमव करण्याची

मतांची जमवाजमव करण्याची कोष्टकं पाहून निवडणूका जवळ आल्याची खात्री झाली ;) आमीपण तुमच्या कंपूत. तेवढेच दोनचार छानछान प्रतिसाद मिळले तर कोणाला नको आहेत? +D
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 11/10/2013 - 00:55

In reply to मतांची जमवाजमव करण्याची by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ते कंपू बिंपू काय नको पण

ते कंपू बिंपू काय नको पण आंतरजातीय विवाहाबद्दल सहमत. ;)

Submitted by मारवा on Sat, 11/09/2013 - 21:14

Permalink

थोड सफ्जुन घ्या !

'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती. म्हणुन ब्राम्हण जर मांसाहार करीत नसतील तर ते आधुनिक ठरतात कारण ते आपल्या पुर्वजांची जुनी मांस खाण्याची परंपरा मानायला नकार देत आहेत. ते आधुनिक आणि बंडखोर आहेत म्हणुन आपल्या पुर्वज ब्राम्हणांची मांस खाण्याची परंपरा नाकारुन शाकाहार करीत आहेत. आता यझ संचालन करण्याचा अधिकार केवळ फ़क्त ब्राम्हणांना च होता हे तुम्हाला माहीत आहे हे गृहीत धरुन चालतो. क्षुद्र आदींना त्याच्या आसपास ही येण्यास मनाई होती हे ही माहीत असेल असे समजतो. एतरेय ब्राम्हण आपण वाचलेच असेल. आणि हा त्यातील प्रसिध्द श्लोक ज्यात यज्ञात बळी दिलेल्या प्राण्याच्या अवयवांची वाटणी यझ संचालित करणार्याक ब्राम्हणांत कशी करावी याचे स्वच्छ वर्णन केलेले आहे. याचा मुळ संस्कृतश्लोका ची लिंक ही देतो आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ही देतो. हे समजण्यास काही अडचण आली तर अजुनही खोलात जाउ शकतो. तुर्तास एवढे पुरेल बहुधा आणि एक मधुपर्क म्हणजे काय ? तो कोणी कोणाला द्यायचा असतो ? आणि त्याच्या व्याख्येत नांमासो मधुपर्क भवति असे का म्हटलेले आहे हे जरा शोधुन काढा. Indology चा अगदी पहीला प्राथमिक धडा जरी अभ्यासला तरी चालेल. http://hinduonline.co/Scriptures/Brahmana/AitareyaBrahmana.html "Now follows the division of the different parts of the sacrificial animal (among the priests). We shall describe it. The two jawbones with the tongue are to be given to the Prastotar; the breast in the form of an eagle to the Udgatar; the throat with the palate to the Pratihartar; the lower part of the right loins to the Hotar; the left to the Brahma; the right thigh to the Maitravaruna; the left to the Brahmanuchhamsi; the right side with the shoulder to the Adhvaryu; the left side to those who accompany the chants; the left shoulder to the Pratipasthatar; the lower part of the right arm to the Neshtar; the lower part of the left arm to the Potar; the upper part of the right thigh to the Achhavaka; the left to the Agnidhra; the upper part of the right arm to the Aitreya; the left to the Sadasya; the back bone and the urinal bladder to the Grihapati (sacrificer); the right feet to the Grihapati who gives a feasting; the left feet to the wife of that Grihapati who gives a feasting; the upper lip is common to both, which is to be divided by the Grihapati. They offer the tail of the animal to wives, but they should give it to a Brahmana; the fleshy processes (maanihah) on the neck and three gristles (kikasaah) to the Grahvastut; three other gristles and one half of the fleshy part on the back (vaikartta) to the Unnetar; the other half of the fleshy part on the neck and the left lobe (Kloma) to the Slaughterer (Shamita), who should present it to a Brahmana, if he himself would not happen to be a Brahmana. The head is to be given to the Subrahmanya, the skin belongs to him (the Subrahmanya), who spoke, Svaah Sutyam (to morrow at the Soma Sacriice); that part of the sacrificial animal at a Soma sacrifice which beloings to Ilaa (sacrificial food) is common to all the priests; only for the Hotar it is optional. All these portions of the sacrificial animal amount to thirty-six single pieces, each of which represents the paada (foot) of a verse by which the sacrifice is carried up..." "To those who divide the sacrificial animal in the way mentioned, it becomes the guide to heaven (Swarga). But those who make the division otherwise are like scoundrels and miscreants who kill an animal merely." "This division of the sacrificial animal was invented by Rishi Devabhaaga, a son of Srauta. When he was departing from this life, he did not entrust (the secret to anyone). But a supernatural being communicated it to Girija,the son of Babhru. Since his time men study it." [Aitareya Brahman, Book 7, Para 1, ]

Submitted by बॅटमॅन on Sat, 11/09/2013 - 21:25

In reply to थोड सफ्जुन घ्या ! by मारवा

Permalink

ब्राह्मणांच्या मांसाहाराचे

ब्राह्मणांच्या मांसाहाराचे पुरावे वेदकाळापासून आहेत- नाकारत कोणीच नाही. पण शाकाहार करणे हा प्रकार गेली दीडेक हजार वर्षे तरी सुरू आहे. त्यामुळे अगोदरची मांसाहारी परंपरा मोडली अन शाकाहारी परंपरा सुरू झाली त्यालाही लै वर्षे झाली, त्यामुळे सद्यस्थितीत मांसाहार करणे हे आधुनिक आहे इतके सांगून मी आपली (फुल्लि पेड) रजा घेतो.

Submitted by आनंदी गोपाळ on Sat, 11/09/2013 - 21:44

In reply to ब्राह्मणांच्या मांसाहाराचे by बॅटमॅन

Permalink

ब्याटोबा,

अख्खी मानवजातच शाकाहारी होती आधी, नंतर ऑम्निवोरस म्हणून उत्क्रांत झाली, असे पुरावे आहेत. मांसाहार चुकीचा नाहीच. अन आपण मानव १००% मांसाहारी ही नव्हेत. आधुनिक, अर्वाचिन, प्राचीन, नक्की कोणत्या काळापासून हे फक्त चष्मे आहेत. खाण्याचाच विषय आहे, तर जातींशी जोडलेला आहार हा एक चष्मा छानही आहे अन वाईटही. रामग्याचं/शेंडीचं मटन, अन उकडीचा मोदक, किंवा आमटी-पाटवड्या, किंवा पाया सूप... जे असेल ते. एका विशिष्ट समाजघटकाच्या नेहेमीच्या खाण्यापिण्याचा भाग म्हणून विकसित झाले, अन त्या त्या 'जाती'ची ओळख म्हणून प्रसिद्ध झालेत. पूर्वी 'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत... लेखापाठचा मुद्दा, 'आजकाल अस्मिता जास्तच हुळहुळ्या झाल्यात', हा असावा.

Submitted by बॅटमॅन on Sat, 11/09/2013 - 21:48

In reply to ब्याटोबा, by आनंदी गोपाळ

Permalink

मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन

मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन स्मायल्या र्‍हाऊन गेल्या बगा अम्मळ :) लै शिरेस न्हौतो आमी. बाकी ते हुळहुळ्या अस्मितांबद्दल सहमत आहे. अस्मितेची गळवे लै ठसठसलेली आहेत अलीकडे ;)

Submitted by ग्रेटथिन्कर on Sat, 11/09/2013 - 23:30

In reply to ब्याटोबा, by आनंदी गोपाळ

Permalink

जातीशी संबंध फक्त आहाराचाच

जातीशी संबंध फक्त आहाराचाच नाही, पत्येक गोष्टीचा लावला जातो ,जसे की 'देवता'... गणपती, दत्त, श्रीराम- ब्राह्मणांचे म्हसोबा, खंडोबा- धनगरांचा तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे एकविरा देवी- कोळ्यांची शंकर- लिंगायतांचे परशुराम -कोकणस्थांचे... (जातिअनुषंगाणे टिपाकल आहेत)

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Sun, 11/10/2013 - 00:13

In reply to जातीशी संबंध फक्त आहाराचाच by ग्रेटथिन्कर

Permalink

तुळजाभवानी ,ज्योतिबा

तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे काय राव कैच्या काय ? दोन्ही आमच्या कडे कुलदेवता व कुलदेव आहेत देवाला तरी जातीच्या बंधनात बांधू नकोस रे ग्रेट्या तुम्हाला कोणी अडवलेय दत्त गुरुन्जी, गणपतीची किंवा परशुरामाची भक्ती करायला ?करत जावा कि ! (काही भाग अप्रकाशित) - संपादक मंडळ. स्वतःला फक्त (शाकाहारी )हिंदू समजणारा

Submitted by प्यारे१ on Sun, 11/10/2013 - 00:55

In reply to तुळजाभवानी ,ज्योतिबा by चेतनकुलकर्णी_85

Permalink

कुलकर्णी साहेब,

कुलकर्णी साहेब, त्यांनी फक्त जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. नि त्यात 'थोडंसं' तथ्य आहे. तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात. तिथं 'वशाटा'च्या सवासणी जेवायला घातल्या जातात नि तुलनेने ब्राह्मणांची संख्या खरंच कमी असते. ज्योतिबालासुद्धा पुजारी ब्राह्मण नाहीत. तिथं सुद्धा ब्राह्मणांची संख्या तुलनेनं कमी असावी. कुलदेव/देवी म्हणून दर्शनाला जाणं हा भाग वगळता 'आवड' म्हणून देवाला जाणारा वर्ग पाहिला तर वरचं स्टेटमेंट लक्षात येईल. मी वाईचा. मांढरदेवी (काळूबाई) इथं जाणारा वर्ग हा मुख्यत्वे गावाकडचा नि त्यातसुद्धा हरिजन वर्गातला असा असतो. तिथं मराठा समाज सुद्धा कमीच पहायला मिळतो. विठोबाच्या दर्शनाला जाणारा माणूस काळा, रापलेला, सुरकुतलेल्या चेहर्‍याचा कष्टकरी शेतकरी असतो. नि कृष्णाच्या दर्शनाला जाणारा गोरा, श्रीमंती छटा असलेला असतो. हे 'सामान्य' विधान आहे. जनरल स्टेटमेण्ट. असाच फरक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या, आश्रमांच्या विषयी करता येतो. -इतरांपेक्षा मागास म्हणून इतरमागास ;) प्यारे
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 11/10/2013 - 01:02

In reply to कुलकर्णी साहेब, by प्यारे१

Permalink

जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके.

तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात
हे जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. अन्यथा चूक आहे. ;) -मागास प्यारेचा अतिमागास मित्र ;) अभ्या

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 11/10/2013 - 01:12

In reply to जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. by अभ्या..

Permalink

+१

+१ :-D अतिमागास अभ्याचा बहूमागास मित्र-आत्मू! ;-)

Submitted by प्यारे१ on Sun, 11/10/2013 - 01:14

In reply to जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. by अभ्या..

Permalink

अबे अभ्या,

अबे अभ्या, आम्ही गेलो ते 'कदम' म्हणून होते... अगदी देवळासमोर. त्यांनी अगदी देवीची पूजा वगैरे सगळं सांगितलं नंतर मंगळावर म्हणून सवाष्णं आहेत म्हणे, मटण होतं. आम्ही पुरणपोळ्या घेतल्या बांधून. ते कदम पूजा करतात ना? देवीच्या पुजार्‍यांना काय म्हणतात ते नेमकं विसरलो बघ. (पंढरपूरचे विठोबाचे बडवे, रुक्मिणीचे उत्पात तसे) बाकी ज्योतिबाचे पुजारी नक्की ब्राह्मण नाहीत.

Submitted by प्यारे१ on Sun, 11/10/2013 - 01:16

In reply to अबे अभ्या, by प्यारे१

Permalink

>>>मंगळावर...

>>>मंगळावर... खिक्क. ते मंगळवार असं वाचावं. ;)
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 11/10/2013 - 01:19

In reply to अबे अभ्या, by प्यारे१

Permalink

भोपी भोपी.

भोपी भोपी. कदम असतात ते भोपी किंवा भोप्या. कोंडो, पोफळे आहेत ते उपाध्ये. पूजेची वर्णी त्यांना असते. जातवार डिट्टेल लैच आहेत पार आदिलशाही, निजामशाहीपासून चालत आलेत. असल्या अधिक माहितीसाठी दै. सकाळ ची उस्मानाबाद आवृत्ती वाचावी नवरात्रात. ;)

Submitted by चावटमेला on Sun, 11/10/2013 - 21:37

In reply to अबे अभ्या, by प्यारे१

Permalink

(पंढरपूरचे विठोबाचे बडवे,

(पंढरपूरचे विठोबाचे बडवे, रुक्मिणीचे उत्पात तसे)
बडवे हे पांडुरंगाचे पुजारी नव्हेत हे नमूद करू इच्छितो. विठोबाच्या पुजार्‍याचे आडनांव पुजारी च आहे. बडवे हे केवळ विश्वस्त आहेत. बडवे हे मूळचे कर्नाटकातील देवर निंबर्गी गावचे. ह्या पुजार्‍यांचे आणि बडव्यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. पण एकूणच संख्या बळात जास्त असल्यामुळे बडव्यांचा वचक वाढत गेला. असे असले तरी विठठलाच्या पूजेचा अधिकार पुजार्‍यांनाच आहे. आपण विठ्ठ्लापुढे पहिल्यांदा जी दक्षिणा ठेवतो ती बडव्यांकडे जाते (आता ती मंदिर समितीकडे जाते) आणि पुढची ठेवलेली दक्षिणा (ज्याला ओवाळणी म्हटले जाते) पुजार्‍यांना मिळते. ह्याच कारणामुळे आलेल्या भक्ताकडे बर्‍याचदा दुसर्‍यांदा दक्षिणेची मागणी केली जाते. ज्यांना ही विभागणी माहिती आहे ते स्वखुशीने ठेवतात, पण ज्यांना माहीत नाही, त्यांचा गैरसमज होतो आणि वादाचे प्रसंग उद्भवतात. अर्थात ह्यात भाविकांचा काहीच दोष नाही. असो, बरेच अवांतर झाले. बाकी चर्चा चालु द्या (विठोबाच्या पुजार्‍यांचा भाचा) चावटमेला

Submitted by मालोजीराव on Mon, 11/11/2013 - 15:20

In reply to अबे अभ्या, by प्यारे१

Permalink

कदम पाटलांना येथील तुळजापूर

कदम पाटलांना येथील तुळजापूर धरून १६ गावची पाटीलकी होती, ते येथील पारंपारिक पुजारी आहेत.देवीच्या विधीचे ,कार्याचे इतर काही मान आहेत ते वेगवेगळ्या समाजाला आहेत. देवीचा विड्याचा मान मुस्लिम धर्मियांना आहे.देवीच्या खानपानाचा मान दीक्षितांना आहे. देवीला मटनाचा नैवैद्य असला तरी पहिला नैवैद्य हा साधी भाजी आणि भाकरीचा असतो

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Wed, 11/13/2013 - 17:22

In reply to तुळजाभवानी ,ज्योतिबा by चेतनकुलकर्णी_85

Permalink

चेतन कुलकर्णीं

तुमच्या सहीवर आपण एकदम फिदा

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 11/10/2013 - 02:53

In reply to ब्याटोबा, by आनंदी गोपाळ

Permalink

नांवात काय आहे?

'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत...
मी तर, 'संत ज्ञानेश्वर मटण शॉप' अशी पाटीही पुण्यात पाहिली आहे.

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 11/13/2013 - 12:46

In reply to नांवात काय आहे? by प्रभाकर पेठकर

Permalink

मी तर शेतकी महाविद्यालय चौकात

मी तर शेतकी महाविद्यालय चौकात (पोलिस ग्राऊंडच्या समोर) वीर चाफेकर मटण मार्केट देखील पाहीले होते. महानगरपालिकेचे मटण मार्केट होते ते. नंतर लोकांनी आंदोलन करून ते नाव बदलायला लावले.

Submitted by आनंदी गोपाळ on Sat, 11/09/2013 - 21:37

Permalink

जात नाही ती जात.

http://www.maayboli.com/node/46230 हे असलं अजूनही असतं. बाकी लेख उत्तम व संतुलित आहे. प्रतिसादही छान आहेत. टायटलवरून पर्सूरामब्रिगेड वर्सेस संबाजीब्रिगेड अस्लं कायतरी असेल असं वाटलेलं. ते चुकीचं निघालं याचा आनंद आहे. -आनंदी, गोपाळ.

Submitted by एस on Sun, 11/10/2013 - 01:12

In reply to जात नाही ती जात. by आनंदी गोपाळ

Permalink

मायबोलीवरचा लेख वाचून

अजिबात धक्का बसला नाही. कोरियातच काय, कुठेही अशा प्रकारचा जातीयवाद व उलटजातीयवादही चालतच आहे. अगदी आजही. आणि ग्रेथिंच्या म्हणण्यानुसार मुली जास्त जातीयवादी असतात हेही खरंच आहे. "आणि तोपर्यंत?" हा प्रश्नमात्र कायम अनुत्तरितच राहतो. काय करायचे तोपर्यंत?

Submitted by वडापाव on Sat, 11/09/2013 - 21:44

Permalink

अहो प्राचीन काळापासुन

अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती.
ऐकून आहे. म्हणूनच त्याकाळी त्यांच्याकडे गायी भरपूर असायच्या... नंतर ते जसेजसे दक्षिणेकडे वळले तसं-तसं त्यांचा मांसाहार कमी झाला आणि मग ते कालांतराने शाकाहारी झाले इ इ असंही ऐकलंय. याची आठवण करुन दिल्याबद्दल आणि त्यापुढे एवढी विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. पण याचा अर्थ 'शाकाहार करणे' हे चल तत्त्वांत गणावे लागेल का? आधी मासांहार करायचे, मग बंद झाले, आता काही जण करतात काही जण नाही. धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे - मंदार कात्र्यांच्या या बोलण्यावरुन ते शाकाहार हे स्थिर तत्त्वांत मोडतायत असं दिसतं. मुळात इथे ब्राह्मणांनी किंवा कोणीही मांसाहार करावा की करु नये हा मुद्दाच मांडायचा नव्हता - नाहीये. मांसाहार करणे हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून आहे - मान्य. पण मांसाहार न करण्यामागची भूमिका ही 'माझा धर्म किंवा माझी जात भ्रष्ट होईल' अशी असेल तर ते त्या व्यक्तीचं मागसलेपण आहे.

Submitted by मारवा on Sat, 11/09/2013 - 21:44

Permalink

अहो बॅटमॅन

अहो तुम्ही नाकारत नाही ही चांगलीच गोष्ट आहे पण मी या धागाकत्यांना उत्तर देत होतो त्यांच्या लेखावरुन तरी त्यांना याविषयी काही माहीती असेल असे दिसत नाही. अन्यथा त्यांनी जे त्यांना मांसाहारा वरुन हीणवत आहेत अशांना मांसाहाराच्या उज्वल परंपरे च्या समर्थनार्थ त्याच जोशात उत्तर दिले असते ज्या जोशात त्यांनी हा लेख लिहीलेला आहे.

Submitted by बॅटमॅन on Sat, 11/09/2013 - 21:51

In reply to अहो बॅटमॅन by मारवा

Permalink

पण धागाकर्त्याचे मत कै

पण धागाकर्त्याचे मत कै 'शाकाहार हेच जीवन आणि मांसाशन हा मृत्यू' असे दिसत नै. त्या प्रतिक्रिया अजून तरी इथे आल्या नैत हे बरेच झाले.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com