Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुधीर मुतालीक on Tue, 09/06/2011 - 19:36
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला." मी " ओके, गुड डे." एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं आणि गाडी कडे सटकलो. गाडीत नेमका गुलाम अली ' हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..' ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ' मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.' श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ? गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली - म्हंजे क्वार्टर - उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला. देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ? माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी - गणपतीआदी - कुणाचाच संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या - म्हंजे दिवाबिवाच्या - काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने चराचर व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू " चोरून" एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं. शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती सोन्याची शाल खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे 'प्रामाणिक' पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात? त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ? भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता. पंधरा वीस दिवसापूर्वी असेल, एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० - २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० - २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ....... मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच. sudhirmutalik@gmail.com
  • Log in or register to post comments
  • 28110 views

प्रतिक्रिया

Submitted by शाहिर on Sat, 09/10/2011 - 12:18

In reply to लेख विचारप्रवर्तक आहे by चित्रा

Permalink

बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा

स्वतःच्या अनेक बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा असणे छान पण श्रावण म्हणुन धार्मिक मुलामा देणे चुकिचे ..इतर महिनेहि अहेत कि काबु ठेवायला
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Mon, 09/12/2011 - 04:36

In reply to बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा by शाहिर

Permalink

विषय वाढवत नाही

विषय वाढवत नाही. मुलीच्या उदाहरणामुळे यावरून अधिक चर्चा करावीशी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 09/10/2011 - 13:18

In reply to लेख विचारप्रवर्तक आहे by चित्रा

Permalink

सहमत.

लहानगीची भयंकर गोष्ट न देताही देव नाही आहे अशी 'केस' करता आली असती असे वाटले. सहमत आहे. आकाशतला देव किंवा देव नावाची एक अद्भूत कल्पना सामान्य माणसांच्या अतिशय कष्टप्रद अशा प्रसंगी मदतीला येत नाही, हे अगदी खरं आहे. परंतु हजारो-लाखो श्रद्धाळूंना देव नावाची अद्भूत अशी कल्पना जगण्याचे बळही देते ही गोष्ट नाकारुनही चालणार नाही. बाकी, आमच्याकडे श्रीची स्थापना होत नव्हती तेव्हाही आणि श्रीची स्थापना व्हायला लागल्यापासून श्रावण आणि श्रीच्या उत्सव दरम्यान मच्छी-मटन बंद असते. श्रावण आणि श्रीच्या उत्सव दरम्यान मच्छी-मटन खाल्ले तर काही तरी संकट येते असा समज असल्यामुळे श्रावण आणि श्रीच्या स्थापनेच्या दिवसात आम्हाला ’वशेट’ काही चालत नाही. -दिलीप बिरुटे (श्रद्धाळू)
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Fri, 09/16/2011 - 10:47

In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सहमत

लहानगीची भयंकर गोष्ट न देताही देव नाही आहे अशी 'केस' करता आली असती असे वाटले.... अमुक एका कठीण प्रसन्गातून अतर्क्य वाटेल अशा पद्धतीने मी कसा बचावलो अशी एखादी गोष्ट न देताही (अधिभौतिक जगत आणि अव्याख्य अध्यात्मिक सत्य या व्यतिरिक्त) अधिदैविक प्रान्त प्रचितीला येतो अशी 'केस' कित्येक स्वानुभवसिद्ध साक्षात्कारी सन्तानी आधीच करून ठेवलेली आहे की! हा लेख अमुक एका भीषण सन्कटातून मी कसा अतर्क्य पद्धतीने बचावलो, तेव्हा बोला अमुक बापू की जय या 'केस' च्या उलट्या टोकाची एक 'केसच' आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 09/16/2011 - 19:34

In reply to सहमत by मूकवाचक

Permalink

एकच अशी केस मांडल्यामुळे.....

आपला मुद्दा मान्य आहे की संत महंतांचे साक्षात्कारी अनुभव वाचल्यानंतर देव असल्याची भावना काही भक्तांच्या मनात कदाचित निर्माण होऊ शकते किंवा संकटाच्या प्रसंगी देव आपल्याला मदत करतो, असा एक आशावाद निर्माणही होत असेल, परंतु देव नाहीच ही गोष्ट पटवून देण्यासाठी चिमूरडीवर गुदरलेल्या अमानुष प्रसंगाचे उदाहरण देणे मला वैयक्तिक पटले नाही. अशा घटनेमुळे प्रचंड वाईट वाटते आणि केवळ हळहळ व्यक्त केल्याशिवाय आपण काहीच करु शकत नाही. सदरील घटनेचा संबंध दर्शविल्यामुळे देव मानणा-यांनी किंवा अमानुष घटना वाचल्यापासून अनेकांनी देव मानायला नकार दिला असे काही होत नसते. आणि मनाला त्रास होणा-या अशा घटनांची दुर्दैवाने आपल्याकडे काही कमी नाही. ताजं उदाहरण द्यायचं तर नगर जिल्ह्यातील वीरगावच्या घटनेचाही उल्लेख करता येईल. काहीच गुन्हा नसलेल्या निष्पाप लोकांवर प्रचंड अरिष्टे येतात तेव्हा हा देव काय करतो, असा प्रश्न इतर अनेक अशा घटना दाखवून विचारता येतो. अशा घटनांचा संबंध पाप पूण्याशी जोडून आपण आपल्या बूद्धीला पांगळे कसे बनवतो त्याचीही चर्चा करता येते. ईश्वरवादी विचारात जिथे देवाचा आधार मानणारे वेद, उपनिषदे, स्मृती, गीता, असे जे ग्रंथ आहेत अशा ग्रंथामुळे माणसाचे कसे प्रंचड नुकसान होते ते अनेक उदाहरणे संदर्भ देऊन देवा विरुद्धची केस उत्तम रितीने लढवता येते. अध्यात्म द्वारे परलोकाचे काल्पनिक जग उभे करुन, कधी भीती दाखवून, कधी फळाचे आमिष दाखवून, आणि अन्य कारणाने देव नावाच्या गोष्टीने माणसाला कसे पंगु बनवले त्याचीही उत्तम चर्चा करता येते. बूद्धीने देव निर्माण केला आणि त्याच देवाच्या आहारी माणूस कसा गेला एक मस्त आढावाही घेता येतो. आजच्या विज्ञानयुगातही देवाभोवती पिंगा घालणार्‍या उच्चविद्याविभूषित लोकांनाही तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ विचार कसा करता येत नाही, असेही अनेक उदाहरणाने दाखवता येते. मानवाच्या ज्ञानेद्रिंयाच्या पलीकडेही एक देवाचे गुढ जग आहे आणि ते समजून घेण्यासाठी एक अद्भूत शक्ती थोर विभुतींजवळ असते असे मानणे कसे थोतांड आहे, याचीही उत्तम चर्चा करता येते. देव नाही हे सिद्ध करण्यासाठी अमानुष अत्याचाराचे एकमेव उदाहरण दिलं म्हणजे त्यामुळे देव नाही हे सिद्ध होते असे मला काही वाटत नाही, इतकेच मला म्हणायचे आहे. फार तर अशा उदाहरणाने देवाला शिव्या देता येतात असे मला वाटते. अर्थात देव नाही आणि तो माणसाच्या कष्टप्रद प्रसंगी माणसाला कधीच मदत करत नाहीत. हे सिद्ध करण्यासाठी अशीच उदाहरणे असावी लागतात, असे आपल्याला म्हणायचे असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. (चुभुदेघे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Sat, 09/17/2011 - 12:08

In reply to एकच अशी केस मांडल्यामुळे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

थोडे स्पष्टीकरण

अर्थात देव नाही आणि तो माणसाच्या कष्टप्रद प्रसंगी माणसाला कधीच मदत करत नाहीत. हे सिद्ध करण्यासाठी अशीच उदाहरणे असावी लागतात .... असे मला मुळीच म्हणायचे नाही. आणि तसे केलेले मलाही पटले नाही. उलट अशी टोकाची उदाहरणे देत आपलाच 'अजेन्डा' पुढे रेटण्याला फारसे मूल्य नाही असेच मलाही वाटते. पण उभयपक्षी तसे केले जाते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 09/10/2011 - 12:25

Permalink

आज कल इस तरफ देखता है कम ..

आसमां पे है खुदा और जमीं पे हम आज कल इस तरफ देखता है कम .. आसमां पे है खुदा और जमीं पे हम आजकल किसी को वो टोकता नहीं चाहे कुछ भी कीजिये रोकता नहीं हो रही है लूटमार फट रहें हैं बम आसमां पे है खुदा और जमीं पे हम आज कल इस तरफ देखता है कम .. किसको भेजे वो यहाँ खाक छानने इस तमाम भीड़ का हाल जानने आदमी हैं अनगिनत देवता हैं कम आसमां पे है खुदा और जमीं पे हम आज कल इस तरफ देखता है कम .. जो भी है वो ठीक है फिर्क क्यों करे हम ही सब जहान की फ़िक्र क्यों करें जब उसे ही गम नहीं तो क्यों हमें हो गम आसमां पे है खुदा और जमीं पे हम आज कल इस तरफ देखता है कम .. सौजन्य :- ( फिर सुबह होगी -१९७५)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sat, 09/10/2011 - 12:53

In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार

Permalink

संपूर्ण लेखाशी सहमत !

संपूर्ण लेखाशी सहमत ! परमेश्वराला रिटायर करा हेही बऱ्या पैकी पटत ! परमेश्वर हि संकल्पनाच मानव निर्मित असल्याने आकाशात असा कोणी ठोम्ब्या असेल आणि तो धावून येईल हे मानणे अकल्पनीय आहे. हेच कुठेतरी आपण सर्व मानत असतो म्हणून एखादी वाईट गोष्ट (गुन्हा) करताना आपण बेडरपणे करू शकतो , अश्या प्रकारांना फक्त स्वताच्या मनाची टोचणी आणि योग्य शिक्षण घेवून जाणत झालेलं मन आणि श्रद्धेची योग्य चौकट थांबवू शकते.
किसको भेजे वो यहाँ खाक छानने इस तमाम भीड़ का हाल जानने आदमी हैं अनगिनत देवता हैं कम आसमां पे है खुदा और जमीं पे हम
बहोत खूब कहा है :) ! मान गये साहीर को !!!
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 09/10/2011 - 19:16

In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार

Permalink

वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस

गेला का काय असे आधी वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 09/10/2011 - 21:09

In reply to वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस by रामदास

Permalink

नवीनच भानगड?

आधीच झालं थोडं त्यात सासऱ्याने धाडलं घोडं...
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 09/12/2011 - 19:08

In reply to वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस by रामदास

Permalink

तो मी नव्हेच :-)

वरचा प्रतिसाद पराचाच आहे काका, माझा प्रतिसाद खाली दिला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 09/16/2011 - 17:33

In reply to तो मी नव्हेच :-) by वाहीदा

Permalink

तो मी नव्हेच? ??? पर्‍याचा

तो मी नव्हेच? ??? पर्‍याचा आयडी स्वॅप झाला का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 09/12/2011 - 09:12

In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार

Permalink

फिर सुबह होगी १९७५ ????

हा सिनेमा १९५८ चा आहे ना? http://ww.smashits.com/phir-subah-hogi/songs-8943.html यातले 'फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला' केवळ अप्रतिम. http://ww.smashits.com/audio/player/free-music.cfm?SongIds=76838
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Sat, 09/10/2011 - 12:30

Permalink

सहमत

पुर्ण लेखा शी सह्मत
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 09/10/2011 - 12:57

Permalink

ठोंब्या

एरर ऑफ द प्रोग्रॅम ऑन पार्ट ऑफ ठोंब्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 09/10/2011 - 14:29

In reply to ठोंब्या by विनायक प्रभू

Permalink

बट

बट* मास्तर**, हू रोट द (की, दाय?) प्रोग्राम?*** *ती बट नव्हे हां, तो बट!! मास्तरांचे इद्यार्थी सगळे वाह्यात आहेत म्हणून आधीच सांगून ठेवतो. ** हे आमच्या पुलंच्या 'बट फादर' सारखे वाचावे. *** ह्या स्टारांवरून आठवलं, आमचे पंगाशेठ दिसत नाहीत कुठं, बळी दिला का काय त्यांचा?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 09/10/2011 - 16:34

In reply to बट by Nile

Permalink

ही

ही हीमसेल्फ(असला तर) रोट द प्रोग्रॅम. त्यात काहीतरी मिश्टीक राहुन गेली असेल. किंवा बिग बँग सारखे बिग ढँग झाले असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Sat, 09/10/2011 - 13:32

Permalink

दखल घेण्याच्या लायकीचा लेख

दखल घेण्याच्या लायकीचा लेख वाट्ला नाही... पलीकडिल दारुवाला छाप लेखाची आठवण झाली. अवांतरः ब्रुस अलमाईटीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद अतिअवांतरः थोडेसे विचीत्र वाटेल पण जर हरामखोर बापाने बलात्कार केला नसता तर त्याच्या मनावर बलात्कार झाला असता असे लेख वाचुन वाटते
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 09/10/2011 - 13:50

In reply to दखल घेण्याच्या लायकीचा लेख by चेतन

Permalink

ओ गोरेगांवकर...

भाषा थोडीशी भडक आहे लेखाची... परंतू लेख दखल घेण्यासारखा नक्कीच आहे... असो, अंदाज अपना अपना :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Sat, 09/10/2011 - 14:15

In reply to ओ गोरेगांवकर... by धन्या

Permalink

ओ वाकडे साहेब. लेखाची दखल

ओ वाकडे साहेब. लेखाची दखल घेतली म्हणुनच प्रतिसाद दिला (पण फक्त प्रतिसाद देण्यापुरतीच दखल) एक प्रश्न पडला "परमेश्वर दखल घेण्याच्या लायकीचा नक्की नाही" तर एव्हढा मोठा लेख त्याबद्दल का लिहला. (लेख लिहण्यापुरती दखल घेतली असावी ;) ) आदरणिय स्टिफन हॉकिंग्सचं "The Grand Design" वरची Peter Woit ची प्रतिक्रीया थोडि बोलकी आहे. "One thing that is sure to generate sales for a book of this kind is to somehow drag in religion. The book's rather conventional claim that "God is unnecessary" for explaining physics and early universe cosmology has provided a lot of publicity for the book. तेव्हा जास्त प्रतिक्रीया मिळवण्यासाठि भाषा भडक केली तर त्यात नवल नाही. अवांतरः अंदाज अपना अपनाचा आदर राखाल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 09/10/2011 - 14:26

In reply to ओ वाकडे साहेब. लेखाची दखल by चेतन

Permalink

हे हे हे.. नीट वाचा मग कळेल.

एक प्रश्न पडला "परमेश्वर दखल घेण्याच्या लायकीचा नक्की नाही" तर एव्हढा मोठा लेख त्याबद्दल का लिहला.
कोणी सांगितलं? लोकांचा मुर्खपणा दखल घेण्यासारखा आहे. दखल घेऊन त्याची टर उडवण्यासारखा. तेच केलंय, उगाच गैरसमजात राहू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Sat, 09/10/2011 - 14:45

In reply to हे हे हे.. नीट वाचा मग कळेल. by Nile

Permalink

हा हा हा.... बर टर उडवुन काय

हा हा हा.... बर टर उडवुन काय मिळते प्रतिसाद आणी समाधान... अतिशहाण्या लोकांना बाकीचे लोक मुर्खच वाटतात आणि त्यात नवल नाही... असल्या गैरसमजाबदाल माझे काहीही म्हणणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 09/10/2011 - 14:52

In reply to हा हा हा.... बर टर उडवुन काय by चेतन

Permalink

आसुरी आनंद.

मुर्खांची टर उडवून मला तरी आसुरी आनंद मिळतो ब्वॉ. बघा त्या गावी जाण्याचा प्रयत्न करून जमतंय का ते.
अतिशहाण्या लोकांना बाकीचे लोक मुर्खच वाटतात
असली वाक्यं मुर्खांना खोटे समाधान देऊन त्यांची अजून टर उडवण्याकरताच निर्माण केली असावीत असा आमचा अंदाज आहे. बनवणारा नक्कीच कोणीतरी आसुरी आनंद उपभोगणारा असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Sat, 09/10/2011 - 15:06

In reply to आसुरी आनंद. by Nile

Permalink

असल्या गावी जाण्यात मला तरी

असल्या गावी जाण्यात मला तरी काहीही रस नाही. तेव्हा अंदाज अपना अपना... चेतन अवांतरः लेखातल्या हरामखोर बापाला पण कदाचित आसुरी आनंद मिळाला असेल. अतिअवांतरः आनंद ही मोजता येण्याजोगी फि़जीकल क्वॉंटीटि आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 09/10/2011 - 16:40

In reply to असल्या गावी जाण्यात मला तरी by चेतन

Permalink

आनंद

आनंद हा नक्कीच क्वांटीफाय करता येतो. अगदी मोजता येण्याजोगी फिजिकल क्वाँटीटी आहे. फक्त फ्रेम ऑफ रेफरन्स ठरवायला हवा. (नाईल ला नक्कीच कळेल)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 09/11/2011 - 00:54

In reply to आनंद by विनायक प्रभू

Permalink

जाऊंद्या हो मास्तर

काही लोकांचा आनंद इतका छोटा अन क्षणभंगूर असतो की त्यांना तो मोजताच येत नाही. ;-) बाकी सदा रडा रडीची सवय असण्यार्‍यांना ते कसे कळणार नाही का, तेव्हा जाउंद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Sun, 09/11/2011 - 12:33

In reply to जाऊंद्या हो मास्तर by Nile

Permalink

मी आनंद मोजतच नाही आणि मला

मी आनंद मोजतच नाही आणि मला मोजताही येत नाही. तुमच्याकडे कोणती शास्त्रीय पध्दत असेल तर कळवा. ;) बाकी साप सोडुन भुई धोपटण्याच्या लेखा आणि प्रतिसादांबद्दल अधिक काय बोलणे. अवांतरः ईथली तुमची भाषा तरी थोडि बरी आहे दुसर्‍या लेखावरील भाषा वाचुन मागिल घोषणेचा किती उपयोग झाला याबद्दल शंकाच आहे. (+टिव घ्याल अशी आशा आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 09/10/2011 - 16:09

Permalink

नोंद

लेख वाचला. आवडला. त्या नोंदीपुरती ही प्रतिक्रिया. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sun, 09/11/2011 - 01:12

Permalink

हॅ हॅ हॅ. लेख वाचुन एक गोष्ट

हॅ हॅ हॅ. लेख वाचुन एक गोष्ट कळली की काही चांगले झाले तर त्यात काही विशेष नाही कारण देवाचे ते कामच आहे. पण काही वाईट घडले तर "देवाला सधे एवढे लक्ष देता येत नाही आणि स्वतःला देव म्हणवुन घेतो लेकाचा" ;) बाकी चालु द्या. बर्‍याच दिवसांनी ग्यांग फार्मात आहे तर उगाच रसभंग नको करायला.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 09/11/2011 - 01:22

In reply to हॅ हॅ हॅ. लेख वाचुन एक गोष्ट by मृत्युन्जय

Permalink

सहमत आहे.

लेख वाचुन एक गोष्ट कळली की काही चांगले झाले तर त्यात काही विशेष नाही कारण देवाचे ते कामच आहे. पण काही वाईट घडले तर "देवाला सधे एवढे लक्ष देता येत नाही आणि स्वतःला देव म्हणवुन घेतो लेकाचा"
चांगले झाले तरच देवाची कृपा आणी वाईट झाले तर आम्हा गाढव दैववादी लोकांच्या मागल्या जन्माच्या पापाचे हिशेब हे या मूर्ख लोकांना कसं कळत नाही कोण जाणे! तरी बरं धर्मग्रंथांत अगदी स्पष्टपणे लिहलंय हो!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sun, 09/11/2011 - 10:27

In reply to सहमत आहे. by Nile

Permalink

काही लोकांची करणी बघता

काही लोकांची करणी बघता मागच्या जन्मी ती माणसे असतील असे वाटत नाही (काही लोक तर या जन्मीही चतुष्पादी वाटत असतात) असे असताना त्यांच्या दुर्गती साठी मागच्या जन्माच्या पापांना जबाबदार धरणे म्हणजे खरेच मुर्खपणाचे लक्षण आहे. या जन्माची पापे याच जन्मात भोगावी लागतात असे एका महान संतमाणसाने लिहुन ठेवले आहे ते आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 09/16/2011 - 17:39

In reply to काही लोकांची करणी बघता by मृत्युन्जय

Permalink

सहमत. आवडीने भावे हरीनाम घेसी

सहमत. आवडीने भावे हरीनाम घेसी | तुझी चिंता त्यासी सर्व आहे|| नको खेद करू कोणत्या गोष्टीचा| पती लक्ष्मीचा जाणतसे || एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा| गुरुकृपे त्याचा नाश होय || असे संत एकनाथांनी सांगितले असल्याने बाकीच्या कोणाचे ऐकावे असे वाटत नाही. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 09/17/2011 - 13:17

In reply to सहमत. आवडीने भावे हरीनाम घेसी by llपुण्याचे पेशवेll

Permalink

कोण एकनाथ? आम्हाला एकनाथ

कोण एकनाथ? आम्हाला एकनाथ माहित नाहीत. - कायल्या ;) - ७-७-१४ चिपकली सुरनळी ;) ;) -***ली ;) - बेताल ढोलबडवी ;) ह घ्या, घेऊ नका कसेही.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sun, 09/11/2011 - 10:59

Permalink

देव आहे

परमेश्वर आहे. मी ठाम पणे सांगु शकतो की परमेश्वर आहे. पण तो आपण (म्हणजे मानव) कल्पना करतो तसा नक्कीच नाही यावरही माझा तेवढाच ठाम विश्वास आहे. परमेश्वर म्हणजे या जगाचा निर्माता. जगद् नियंता. तो कसा दिसतो. काय करतो कुठे रहातो याचा नक्की तपास अजुन कोणालाही लागलेला नाही. पण तो आहे हे नक्की. कारण त्याचे अस्तीत्व अमान्य केले तर अनेक प्रश्र्ण उभे रहातात, हे जग कोणी निर्माण केले, या विश्वाचा पसारा कोण सांभाळतो? वगेरे वगेरे, आणि याचे एक सोईस्कर उत्तर म्हणजे परमेश्वर. पण या देवाला जे मानवी रुप दिले गेले ते मानवाच्या रिकाम्या आणि सुपीक डोक्यानेच. त्याच मुळे आमचा देव माणसा सारखा दिसतो आणि त्याला माणसाचे गुणही चिकटवले गेले. मानवाचे सामजीक जीवन सुरळीत चालु रहावे म्हणुन. देव या संकल्पनेचा वापर समाज एकत्र बांधुन ठेवण्या साठी म्हणुन सुरु झाला. देवाच्या नावावर अनेक कथा रचण्यात आल्या. ईतिहासा बरोबर त्यांचे बेमालुम मिश्रण करण्यात आले. आणि मग देवाच्या भीतीने माणसेही निमुट पणे शिकवले तसे वागु लागली. मग समाजाच्या नियंत्रण कर्त्यांनी जे काही नविन नविन नियम बनवले जे देवाच्या नावा खाली तुमच्या आमच्या गळ्यात उतरवले गेले. खरेतर या सगळ्याचा त्या परमेश्वराला मुळी पत्ता सुध्दा नसेल. कारण माझ्या मते परमेश्वर एखाद्या खाटका सारखा असावा. चरकलात ना? पण तो या जगाच्या बाबतीत तितकाच निर्विकार असेल जसा खाटीक खुराड्यातल्या कोंबड्यांकडे तटस्थ पणे पहात असतो तसा. कदाचीत तसा तो या जगा कडे पहात असेल. किंवा कदाचीत पहायचे विसरुनही गेला असेल. उदाहरणच द्यायचे झाले तर गाय जेवढ्या निर्विकार पणे शेण टाकते आणि टाकल्यावर त्याच्या कडे बघतही नाही. पण त्या शेणातही जे एक छोटेसे जग असते. त्या जगा साठी गाय म्हणजे परमेश्वरच झाली ना. पण गाईला त्याचे काही सोयर सुतक असते का? कारण ती रोजच अशा नविन नविन जगांना निर्माण करत असते. आपले जगही कदाचीत असेच एखाद्या रस्त्याच्या कडेला पडलेले असेल. आपण म्हणतो तसा परमेश्वर दयाळु, कॄपाळु, प्रेमळ, या विश्वाची चिंता करणारा असता तर विचार करा तो आता पर्यंत पुर्ण वेडा होउन गेला असता. अहो ईतक्या हजारो कोटी माणसांचे रोजचे हिशोब ठेवायचे, त्यांचे सगळे व्यवहार सुरळीत चालवायचे काय सोपे आहे का राव? त्यात दर दोनशे तिनशे वर्षांनंतर नियम बदलायचे. बघा बरका, सती जाणे १०० वर्षांपुर्वी पर्यंत धर्मे संमत होते, एखाद्या पुरुषाला एका पे़क्षा जास्त लग्न सहज करता येत होती. जर पती सक्षम नसेल तर सुर्या पासुन, ईंद्रा पासुन संतती प्राप्त करुन घेणे धर्मसंमत होते. तर अशा अनेक बदलांचा अचुक हिशोब ठेवायचा. बाबा रे बाबा. मी परमेश्वराच्या जागी असतो तर कधीच हे सगळे टाकुन पळुन गेलो असतो. तर मुद्दा असा की परमेश्वर आहे पण तो तुमच्या आमच्या जीवनात ढवळाढवळ करायला मो़कळा पडला नाही. त्याने त्याच्या प्रयोगशाळेत एक प्रयोग केला आणि कदाचीत तो ते विसरुनही गेला आहे. विसरला नसेल तर तो एका शास्त्रज्ञाइतक्याच निर्विकार नजरेने आपणा गिनीपीगांकडे पहात आहे. त्याला तुमच्याशी त्याला घेणे देणे असण्याचे काहीही कारण नाही. मला नेहमी प्रश्र्ण पडतो चांगले म्हणजे काय? आई लहानपणी नेहमी सांगायची की चांगले वागावे, नेहमी खरे बोलावे, दुसर्‍याला ईजा होईल असे वर्तन करु नये, नाहीतर देव आपल्याला शिक्षा करतो. खर तर ती मला समाजात जगताना काय काळजी घ्यायची ते शिकवत असे. फक्त त्याला देवाच्या आज्ञेचा मुलामा जोडलेला असे. समजा असे झाले की समजातल्या प्रत्येकाने हे नियम पाळायचे नाही असे ठरवले तर केवढे अराजक माजेल? म्हणजेच आपल्याला शिक्षा होईल. ती होउ नये म्हणुन समाजाला जे मान्य आहे तसे आपण वागायचे नाहीतर हा समाज आपल्याला शिक्षा करेल ईतकाच. माझ्या दॄष्टीने त्याचा हाच अर्थ आहे. कदाचीत त्याच मुळे त्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार होताना देव मधे पडला नसावा. परमेश्वर आहे ही जशी माझी ठाम खात्री आहे तशीच खात्री मला त्याच्या निर्विकार पणाबद्दलपण आहे. त्यामुळे त्याला हिरेजडीत शाल भेट देणार्‍या कडे पण तो तितक्याच तटस्थ पणे बघतो जीतक्या तटस्थ पणे तो कसाब किंवा अफजल गुरु कडे पहात आहे. तुमच्या माझ्या कडे पहाण्याची त्याची पण त्याची तीच नजर आहे. खाटका सारखी. (परमेश्वरा बद्द्ल सध्या प्रचंड गोधळात पडलेला)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका on Sun, 09/11/2011 - 12:44

In reply to देव आहे by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर ..

भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आठवला ... मानीतो आम्ही तुला, ना मानीतो ऐसे नव्हे जाणीतो इतकेच की, तू आमुचा कोणी नव्हे !
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 09/12/2011 - 09:50

In reply to भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर .. by बोका

Permalink

दादा थोडी दुरुस्ती

मानतो देवासही, ना मानितो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे. तो ऐवजी 'तू' झाले तर अर्थच बदलेल ना. 'तू' म्हणताना देवाशी संवाद आला ना. पण मानण्यातच जर संदिग्धता असेल तर संवाद कुठला.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका on Mon, 09/12/2011 - 18:59

In reply to दादा थोडी दुरुस्ती by रमताराम

Permalink

आभार

दुरुस्ती बद्दल आभार !
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 09/12/2011 - 08:37

Permalink

होते कधी चिडचिड अश्या बातम्या

होते कधी चिडचिड अश्या बातम्या वाचुन, पण मग आधारा साठी वळायच तर कोठे? अर्थात तुम्ही उल्लेखलेला बलात्कार जरा वेगळ्या दृष्टेकोणातुन पाहिला तर आब वाटु शकतो. जस की आई वडिलांसमोर धुम्रपान वा मद्यपान न करणे हे त्यांचा आदर दाखवण्या साठी असत, तसच काहिस श्रावण पाळण, त्या मुळे का असेना पण तुम्ही आत्म्संयम दाखविता हे ही नसे थोडके, नाहितर साराच नंगा नाच.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/12/2011 - 09:31

In reply to होते कधी चिडचिड अश्या बातम्या by स्पंदना

Permalink

आधारा साठी वळायच तर

आधारा साठी वळायच तर कोठे?
बाहेरचा आधार, तोही अस्तित्त्वात नसणारा हवाच कशाला? बुडत्याला काडीचा आधार म्हण म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात आधार मिळत नाहीच.
अर्थात तुम्ही उल्लेखलेला बलात्कार जरा वेगळ्या दृष्टेकोणातुन पाहिला तर आब वाटु शकतो.
आब म्हणजे? लहान मुलीवर झालेल्या या अन्यायाचं समर्थन देण्याची एवढी का गरज भासावी? (चित्राताई आणि तिच्यासारख्या प्रतिसादकांना हा प्रश्न नाही.) ही मुलगी तुमच्या घरातली, नात्यातली, ओळखीतली असती तर अशीच स्पष्टीकरणं दिली असतीत का?
आई वडिलांसमोर धुम्रपान वा मद्यपान न करणे हे त्यांचा आदर दाखवण्या साठी असत
अनेक भारतीय आई-वडीलही मुलांसमोर शक्यतोवर धूम्रपान, मद्यपान करताना दिसत नाहीत; याचं कारण काय असावं? मांसाहार, धूम्रपान, मद्यपान याला नंगानाच म्हणण्याएवढं वाईट काय आहे*? नंगानाच हा शब्दही थोडा विचित्रच वाटतो; जसं काही नाचणं हे वाईटच असं काही सुचवल्यासारखं वाटतं. तांडवनृत्य करणार्‍या शंकराच्या बर्‍याचशा प्रतिमा अर्धनग्नच दिसतात. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर पॅरिसचा सुप्रसिद्ध कॅबरे वगैरे आठवले की "ज्याची त्याची जाण, समज" वगैरे गोष्टीच आठवतात. भारतातली आणि जगातलीही बहुसंख्य जनता ज्या ज्या गोष्टी अगदी सहजपणे करते त्याला नंगानाच म्हणणं हा शुद्ध स्नॉबिशपणा (मराठी शब्द?) आहे. *मी धूम्रपान करत नाही आणि रूची निर्माण न झाल्यामुळे शक्यतोवर शाकाहारी आहे. तरीही इतर कोणी मांसाहार वा धूम्रपान करण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही. तो धूर फक्त माझ्यापर्यंत येऊ देऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 09/12/2011 - 15:48

In reply to आधारा साठी वळायच तर by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>लहान मुलीवर झालेल्या या

>>लहान मुलीवर झालेल्या या अन्यायाचं समर्थन देण्याची एवढी का गरज भासावी? काहीतरी गैरसमज होत असावा. मन मारण्याला वर लेखकाने (स्वतःवर) बलात्कार करणे असे म्हटले आहे. (लेखातील वाक्य :- "श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ?" ) अपर्णा ताई त्याबद्दल बोलत असाव्यात. खऱ्या बलात्काराला कुणी आब नाही म्हणणार हो.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/12/2011 - 19:09

In reply to >>लहान मुलीवर झालेल्या या by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

काहीतरी गैरसमज होत असावा. हे

काहीतरी गैरसमज होत असावा.
हे तर मी ही म्हटलं पाहिजे. पूर्वजन्मीची पापं वगैरे म्हणणार्‍यांना हा प्रश्न होता. असो. विरामचिन्हांचा उपयोग, लिखाणातल्या खाचाखोचा, उपरोध समजणं, सुस्पष्ट बोलणं खरोखरच एवढं कठीण का असावं?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 09/14/2011 - 07:56

In reply to आधारा साठी वळायच तर by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>बाहेरचा आधार, तोही

>>बाहेरचा आधार, तोही अस्तित्त्वात नसणारा हवाच कशाला? बुडत्याला काडीचा आधार म्हण म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात आधार मिळत नाहीच>> _ देव ही संकल्पना पुर्वी पासुन चिंतना साठी, आत्म चिंतना साठी वापरली जाते. पुजारी पुजतो तो देव नव्हे, त्या सर्वाच्या वर तुम्हा आम्हा धर्म पाळकांच्याही वर जी एक सर्वात्मक अशी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेला मी देव माणते. अन ही संकल्पना मनात असते कुठच्या देवळात तर अगदी १००% नसते. अन मला तिचा आधार वाटतो. बर्‍याचदा चिडुन जाउन बदला घेण्यासाठी अगदी साध्या साध्या गोष्टीतही, आपण खालच्या पातळी वर उतरु शकतो, जस की भाजीवाला फार दर लावतो, चुकुन तो एखादी भाजी मोजायला विसरला, चला मिळाली फुकट, नाही तरी तो लुटतोच आपल्याला, हे एक साध उदाहरण झाल. पण अश्या वेळी मी माझ्या मनाच्या आरश्यात मला निर्भेळ पाहु शकते का? हा विचार मनात येण अन परत फिरुन त्याला पैसे देण हा मी देवाचा आधार मानते. अर्थात हे साध उदाहरण आहे, अगदी हाच प्रसंग असेल अस नाही. पण जे दु:ख आपल्याला झालय तेच दु:ख दुसर्‍या कुणावर येत असेल तर त्या ठिकाणी उभ रहाण वा आपल्या कडुन तसा प्रसंग अगदी शत्रुवरही न येउ देण याला, या आधारा साठी मी माझ्या आंतरिक शक्तीला देव माणते. तुम्हा आम्हाला असतिल हो आधारवड, पण ज्यांना नसतील त्यांच काय? कशान समाधान? या कोणत्या तरी संकल्पनेचच ना? >>>आब म्हणजे? लहान मुलीवर झालेल्या या अन्यायाचं समर्थन देण्याची एवढी का गरज भासावी? (चित्राताई आणि तिच्यासारख्या प्रतिसादकांना हा प्रश्न नाही.) ही मुलगी तुमच्या घरातली, नात्यातली, ओळखीतली असती तर अशीच स्पष्टीकरणं दिली असतीत का?>> खुप वे वर्ड विचार. एक आई म्हणुन या अपराधाला माझ्या कडुन जन्मभर आगिचे चटके देण सुद्धा कमीच. असल्याच काय पण रस्त्यावर धक्के मारणार्‍या हलकटांना सुद्धा तिथल्या तिथ फटके उडवण्याची क्षमता मी बाळगुन आहे. इतर स्त्रियांनी ही बाळगावी असा माझा आग्रह असतो. अन हे बाळ माझ असण नसण नगण्य , एका लहान मुलीची जी अवस्था वर वर्णिली आहे, ते वाचण हाच एक कस्ला अनुभव मी वर्णु नाही शकत इतका त्रागा होतो माझा, अन अश्या वेळी; जेंव्हा आपल मन रोजच्या कामातुनही उडत , तेंव्हा एक क्षणभर त्या पणती समोर उभारण हा आधार असतो माझा. >>मांसाहार, धूम्रपान, मद्यपान याला नंगानाच म्हणण्याएवढं वाईट काय आहे*? नंगानाच हा शब्दही थोडा विचित्रच वाटतो; जसं काही नाचणं हे वाईटच असं काही सुचवल्यासारखं वाटतं. तांडवनृत्य करणार्‍या शंकराच्या बर्‍याचशा प्रतिमा अर्धनग्नच दिसतात. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर पॅरिसचा सुप्रसिद्ध कॅबरे वगैरे आठवले की "ज्याची त्याची जाण, समज" वगैरे गोष्टीच आठवतात. भारतातली आणि जगातलीही बहुसंख्य जनता ज्या ज्या गोष्टी अगदी सहजपणे करते त्याला नंगानाच म्हणणं हा शुद्ध स्नॉबिशपणा (मराठी शब्द?) आह>>>> प्रत्येक संस्कृतीच एक स्व्तःच अस आचरणपद्धती सांगणार दंडक असत. आता आपण आई वडिलांना, गुरु जनांना नमस्कार करतो. पाश्च्यात्त नाहीत करत. मग ते करत नाहीत म्हणुन मी माझ्या आई वडिलांना आदर दाखवणार नाही अस म्हणन योग्य ठरेल का? अन आब हा शब्द दुहेरी आहे. आज मी अन माझा नवरा, दोघे ही, कितीही मजा करावीशी वाटली तरी , मद्यपान वा जे थोडे ऑफ द वे असे इथले प्रकार असतात, ते कधीही मुलांसमोर करत नाही. का? कारण त्यांचा आदर > मुलांचा त्यांच्या वयानुसार आपण धक्कादायक अस वागत नाही हा आब, उद्या माझी मुल, माझे आई वडेल अस वागत नाहीत , त्या मुळ आपण अस वागाव का? हा विचार अगदी एक क्षण भर ही करतील तरी माझी ही धडपड फळास आली म्हणेन मी. अन ही धडपड आपण करावी अस वाटायला लावणारी मानसिक शक्ती हा माझा आधार ! आता पाश्च्यात्त मुल होण हे काही फारस मोठ्ठी गोष्ट मानत नाहीत, एक शरीराचा व्यवहार मानला जातो तो. कारण मुळात संभोग हाच मुळी अगदी फारसा विचार न करण्याची गोष्ट आहे त्यांच्या साठी. आपण असा विचार करु का? मैथुन हे गरजेच्या पलिकडे एक विषेश अस काही तरी मानल जात आपल्यात, आज मी जेंव्हा भोग भोगुन रिकाम्या झालेल्या स्त्री अन पुरुषांना पहाते, त्यांच्या बदलत्या रिलेशनसह सोडुन दिलेली मुल पहाते, अन ती आयुष्यात सुरवाती पासुन्च अस्तित्वाची लढाई लढणारी मुळ पहाते, तेंव्हा आपण आपल्या तरुणपणी अस पाश्च्यात्त्त वातावरणात मोठ्ठे नाही झालो याच एक समाधानच वाटत मला. अन हा स्नॉबीश पणा मला तर आवडतो ब्वा ! जेंव्हा तरुण पण उतरत अन तरीही शरिराच्या भुका, मनाच्या भुका जाग्या असतात तेंव्हा पाश्च्यात्त पद्धतिन एकाकी होउन नको त्या गोष्टींच्या आहारी जाण्या पेक्षा माझा माझ्या भारतिय संस्कृतीन दिलेला साता जन्माचा साथिदार माझ्या सोबत असेल हा आधार वाटतो मला.अर्थात त्यांच्यात ही लग्न धर्म नाही अस नाही पण त्याचा आदर न राखता जे काही वर्तन होत या सार्‍याला मी अगदी बिनधास्त नंगानाच म्हणते. एक आदर, देवा धर्माचा, समतोल, आपण सुशिक्षीत आहोत, तेंव्हा धर्म म्हन्जे काय हे आपण ठरवु शकतो, तो राखुन रहाण याला मी आब म्हणते. अगदीच उलगडायच म्हंटल तर हेलन करायची तो नाच, अन आज राखि सावंत घालते तो नंगा नाच. वरती मुतालिक साहेबांची जी अवस्था एक बातमी वाचुन झाली ती त्यांच्या अपब्रिंगींगची दर्शक आहे. उद्या कुणीही अस असहाय्य त्यांच्या समोर आल तर निदान ते रक्षक जरी नाही झाले तरी राक्षस नाही होणार याची खात्री जाणवते मला त्यातुन अन तोच माझा उद्याचा माझी मु;ल या समाजात सोडायला आधार !
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 09/14/2011 - 08:15

In reply to >>बाहेरचा आधार, तोही by स्पंदना

Permalink

अ प्र ती म

अ प्र ती म प्रतिसाद आवडला ब्वा आपल्याला
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/14/2011 - 08:48

In reply to >>बाहेरचा आधार, तोही by स्पंदना

Permalink

स्वारी; मी धर्म पाळत नाही.

तुम्हा आम्हा धर्म पाळकांच्याही वर जी एक सर्वात्मक अशी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेला मी देव माणते.
अशी संकल्पना माझ्या डोक्यात नाही. त्यामुळे माझ्या लेखी देव हा फक्त एक शब्द आहे, जसा सैतान हा देखील एक शब्द आहे.
बर्‍याचदा चिडुन जाउन बदला घेण्यासाठी ... पण अश्या वेळी मी माझ्या मनाच्या आरश्यात मला निर्भेळ पाहु शकते का?
प्रचंड राग आला तरीही कोणी असभ्य वर्तन करू नये यासाठी जर कोणी भीती दाखवून देव आहे असं सांगत असेल तर मग "धर्म भीतीवर आधारित आहे" हे शंभर वर्षांपूर्वी सांगणारा बर्ट्रांड रसल थोर वाटतो. "जो दुसर्‍यावरी विश्वासला" हे चारशे वर्षांपूर्वी सांगणारे रामदास मला थोर वाटतात. "Je pense, donc je suis" (मी विचार करते म्हणून मी आहे) असं साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणणारा दे कार्ते मला थोर वाटतो; तुमच्या भाषेत माझी विचारशक्ती हाच माझा आधारवड. काडीचा आधार शोधण्यापेक्षा मला पोहायला शिकणं, शिकवणंच योग्य वाटतं. आब म्हणजे नक्की काय हे मला अजून समजलेलं नाही. हा शब्द मला नवीन आहे. बाकी आहार, निद्रा, भीती आणि मैथुन या मनुष्याच्या प्रमुख गरजा आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? झोप झाली की आपण उठून रोजच्या व्यवहारांस लागतो, भीती घालवण्याचा प्रयत्न करतो, पोटात खड्डा पडतो म्हणून खातो आणि एका ठराविक वयानंतर शरीराची भूक असते म्हणून मैथुन. त्यात कसलं आलंय पाश्चात्य आणि भारतीय? आणि कसलं भोग भोगून रितं होणं? लैंगिकदृष्ट्या डिप्रेस्ड लोकं शोधली तर भारतातही चिक्कार सापडतील. मूल होणं हा शरीराचा व्यापार नसतो काय? (अरे बाप रे, मिपावर काय वयाची लोकं येतात?) बरं हे मीच म्हणते असं नव्हे, तर नटसम्राट नाटकात "आमच्या वासनेच्या शिड्यांवरून आलेले जीव" असा काहीसा उल्लेख वि. वा. शिरवाडकरांनीही केला आहे. कामदेव, मदन, रति अशी पात्र जिथे पुराणात वगैरे असतात तिथे मैथुनाचा, रोमँटीक प्रेमाचा उल्लेख असा क्षुल्लक गोष्ट म्हणून व्हावा ही गोष्ट मलातरी समजत नाही.
जस की आई वडिलांसमोर धुम्रपान वा मद्यपान न करणे हे त्यांचा आदर दाखवण्या साठी असत, तसच काहिस श्रावण पाळण, त्या मुळे का असेना पण तुम्ही आत्म्संयम दाखविता हे ही नसे थोडके, नाहितर साराच नंगा नाच.
धूम्रपान, मद्यपान, मांसाहार यात काय आलाय नंगानाच हे अजूनही समजलेलं नाही. असो. एक मजेशीर किस्सा सांगते, आधीही एक-दोनदा लिहिलेला असेल, पण तरीही: तुम्ही ज्या पाश्चात्यांना नंगानाचप्रेमी म्हणता आहात, त्यांच्यापैकीच एका देशातली गोष्ट. नोव्हेंबरच्या दिवसात, संध्याकाळी साडेचारलाच गुडुप्प अंधार होत असे. मी रात्री आठच्या सुमारास, पाणी आणि ब्रेक्स गोठवणार्‍या थंडीत, किर्र अंधारात, खेड्यातल्या रस्त्यावरून सायकलने घरी जात होते. ओरडले असते तरी ऐकायला कोणी नसेल एवढी निर्जन जागा. थोडा वेळ सायकल चालवून हाताला घाम आला म्हणून हातमोज्यांची एक जोडी काढून पाठीवरच्या झोळीत टाकण्यासाठी थांबले तर एक चारचाकी शेजारी थांबली. खिडकीची काच खाली झाली आणि एक गोरा, मध्यमवयीन माणूस बोलला, "तू ठीक आहेस ना? काही मदत हवी आहे का?". "हो, मी ठीक आहे, थोडं उकडलं म्हणून हातमोजे काढत होते." "कुठे चालली आहेस? सायकल मोडली वगैरे नाही ना?" "नाही, नाही. इथेच, त्या टेलिस्कोपच्या इथेच. इथून निघाले की पाच-सात मिनीटांत पोहोचेन." "ठीक आहे, काळजी घे, गुडनाईट" असं म्हणून मी पुन्हा सायकलवर बसायच्या आत गाडी रस्त्यावरून दिसेनाशी झाली. त्या गोर्‍याला श्रावण म्हणजे काय हे ही माहित नसेल, पण संयम आणि सभ्यपणा नक्की माहित असावा. नाही का? असो. आमचीच काय ती संस्कृती आणि पाश्चात्य म्हणजे नंगानाच या विचारांचा मी निषेध करते.* या विषयावर आणखी लिहीण्याची माझी इच्छा नाही. असो. तर मुद्दा असा की चांगलं वागणारे सगळ्या देशांत असतात; तसेच निरीश्वरवादीही असतात. सज्जन आणि सभ्य असण्यासाठी भारतात जन्म होणं, मोठं होणं आणि देवावर निरंतर विश्वास असणं हे काही सक्तीचं नाही. फक्त आपणच काय ते सज्जन, सभ्य आणि वेगळा विचार करणारे ते नंगानाच करतात हा खांब सोडण्यासाठी किंऽचित विचार करावा लागतो. *आम्हीच काय ते पुढारलेले आणि तुम्ही हातांनी जेवणारे आणि धुणारे म्हणजे अविकसित, रानटी टोळ्यावाले याची विचारांचा प्रतिवाद करून मी दमले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 09/14/2011 - 09:17

In reply to स्वारी; मी धर्म पाळत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आपली कशी काय संस्कृती? हे कोण

आपली कशी काय संस्कृती? हे कोण म्हणाल? अन आपलीच जर संस्कृती असती तर आपल्या इथे बलात्कार झाले अस्ते का ? पण होतात ना? का? त्याच कारण हा 'नंगानाच' जो आपल्या इथेच काय पण सारी कडेच चाललाय, मी पाश्च्यात्त वाईट कधीच नाही म्हंटल ना ही माझ्या पहिल्या प्रतिसादात त्यांचा उल्लेख होता. मांसाहार अन मद्य दोन्ही आपल्या संस्कृतीत पुर्वापार आहेत अन राहतील, पण त्याचा वा कशाचाही अतिरेक हा नंगानाचच ! अन बर्‍याचदा असले खांबच कामी येतात, अगदी जातिय वादाच्या दंगलितही. जी दंगल धर्मावरुन सुरु झाली त्या दंगलीत माझा देव मला अस कर म्हणत नाही म्हणणारे खुप जण पाहिले मी लोकल मध्ये. श्रावण, अन तस्तम प्रकार हे जर आपण मनोबला साठी म्हणुन वापरले तरी चालतात. सारच का सोडायच्? मुल होण.. नक्की फक्त शरिराचा व्यापार? मग झाल्या वर ती सोडुन दिली चालतील? कशाला त्यांना वाढवायच? आपल्या आपण दुसरा साथिदार शोधायचा अन मज्जा करायची. शरिराचा व्यवहार तर तो. बघ म्हणुन? वादा साठे वाद घालण अन शब्दच्छलान दुसर्‍याला नामोहरम करण वेगळ अन स्वतःलाही पटेल अस बोलण वेगळ. >>कामदेव, मदन, रति अशी पात्र जिथे पुराणात वगैरे असतात तिथे मैथुनाचा, रोमँटीक प्रेमाचा उल्लेख असा क्षुल्लक गोष्ट म्हणून व्हावा ही गोष्ट मलातरी समजत नाही>> तु स्वतःच्याच विरुद्ध लिहिते आहेस. मी म्हणते आहे ते हेच. आपल्या साठी त्याच मह्त्व शरिराच्या पलिकडे असत. आता आपल्या साठी म्हणजे भारतियांसाठी अस जर वाचत असशील तर मी त्या वादात कधीच नस्ते. तरीही सांगते, ख्रिश्चन लग्नात फक्त थोड्याजणी पांढरा वेडींग गाउन घालतात. बाकिच्या कुठेतरी क्रिम, जरासा कमी पांढरा वापरतात. का ते विचार आहेस तिथच तर. समजेल तुला त्यांच्यातही शारिरीक संबधाला किती महत्व होत ते. अन शिरवाडकर लिहुन गेले, करुन नाही गेले. हा फरक आहे. प्रश्न पाश्च्यात्त्यांचा कधीच नव्हता अन नाही आहे. पण मनुष्याच्या व्यवहाराला आळा घालणार्‍या अश्या संस्कृती वा देव या संकल्प्नेच्या वापराचा आहे. अधार हा असतो की समाजाला हे मान्य नाही. उद्या समाजाला मान्य असण नसण जर नगण्य झाल तर काय याचा आहे. अन म्हणुनच अश्या संकल्पना डोळे उघडे ठेउन रुजवण्याच्या गरजेचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/14/2011 - 10:17

In reply to आपली कशी काय संस्कृती? हे कोण by स्पंदना

Permalink

त्याचा वा कशाचाही अतिरेक हा

त्याचा वा कशाचाही अतिरेक हा नंगानाचच !
आत्मसंयमाचाही?
श्रावण, अन तस्तम प्रकार हे जर आपण मनोबला साठी म्हणुन वापरले तरी चालतात. सारच का सोडायच्?
नाही हो, मी अजून अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा सोडलेल्या नाहीत. शब्दशः कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं नाही. ;-) आणि कशातही काय संयम आणि काय? भूक लागली की उपलब्ध असेल, परवडेल, पचेल, बनवायला जमेल, तब्येतीला झेपेल ते सगळं खावं आणि कामाला लागावं. त्यात कसला महिना बघायचा? आणि हिवाळ्यात मी देवगड हापूसचा हट्ट मी करत नाही हा संयमच नव्हे काय? भूक लागली असली तरी जेवण शिजत असताना स्नॅक्स तोंडात न टाकणं हा संयम नव्हे काय?
ख्रिश्चन लग्नात फक्त थोड्याजणी पांढरा वेडींग गाउन घालतात. बाकिच्या कुठेतरी क्रिम, जरासा कमी पांढरा वापरतात. का ते विचार आहेस तिथच तर.
सध्या तरी कोणाशी एवढी ओळख नाही. पण विकीपीडीया हे म्हणतो आहे: Brides from wealthy families often wore rich colors and exclusive fabrics. It was common to see them wearing bold colors and layers of furs, velvet and silk. त्यातूनही तुम्हाला काय सुचवायचं आहे हे मला समजलं असं वाटलं; म्हणून रॉजर फेडरर आणि मिर्का वाव्हरीनेच यांच्या लग्नाचे फोटो पाहिले. काय सुंदर पांढरा शुभ्र वेडींग ड्रेस होता मिर्काचा! असो. ज्यू लोकांत म्हणे धार्मिक पद्धतीने लग्न केलं तर वधूचं कौमार्य शाबूत आहे का असं जाहीरपणे विचारतात. अनेक इस्रायली ज्यू लोकांनाही हे पटत नाही म्हणून ते लोकं चूपचाप अमेरिकेत येऊन लग्न करतात आणि परत जातात अशी माहिती तिथे काही वर्ष रहाणार्‍या मैत्रिणीकडून मिळाली. "पितृसत्ताक पद्धतीमधली खुळं सगळी, योनीशुचिता वगैरे" ... हे वाक्य कविता महाजन यांच्याकडून साभार.
अन शिरवाडकर लिहुन गेले, करुन नाही गेले. हा फरक आहे.
म्हणजे बोलले तसे वागले नाहीत? "बोले तैसा चाले" वगैरे आम्हाला शाळेत उगाच शिकवलं का??
नक्की फक्त शरिराचा व्यापार? मग झाल्या वर ती सोडुन दिली चालतील? कशाला त्यांना वाढवायच? आपल्या आपण दुसरा साथिदार शोधायचा अन मज्जा करायची.
अरे कर्मा! सगळे, यच्चयावत पाश्चात्य लोकं असंच करतात का काय? बाळंतपणानंतर जर्मनीत सहा महिने (का एक वर्ष?) सक्तीची सुटी असते, आई-वडीलांपैकी कोणाला एकाला किंवा दोघांनाही घ्यावी लागते. अनेक पाश्चात्य देशांत मूल झाल्यानंतर मुलासाठी म्हणून पहिली काही वर्ष ठराविक रक्कम मिळते, मुलाच्या पोषणासाठी, ते काय आई वडील अर्भकांना वार्‍यावर सोडतात म्हणून? जोडीदाराशी जमत नाही म्हणून सरळ वेगळं होणारे पालक पोरांना वार्‍यावरच सोडून देतात का काय? आणि उदाहरणच द्यायचं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लहानाचं मोठं करणारी त्यांची अमेरिकन आईच होती. पाश्चात्य देशांतल्या माझ्या पहिल्या ख्रिसमसला मला स्वतःच्या घरी बोलावणारे माझ्या मित्राचे आईवडील काय त्याची पीएच.डी. सुरू झाल्यावर त्याच्यावर प्रेम करायला लागले होते का काय? लग्न केलेल्या किंवा ज्याच्याबरोबर रहात आहोत अशा व्यक्तीमधला आपला रोमँटीक इंटरेस्ट संपला आहे हे लक्षात आल्यावर वेगळं होणार्‍या लोकांबद्दल मला अजिबात राग नाही, असलाच तर थोडाबहुत आदर आहे. सुख मिळवताना दुसर्‍याला दु:ख होऊ नये अशी अपेक्षा रास्त आहे, पण त्याशिवाय मज्जा करण्यात काय गैर आहे? कोणाला सुखच टोचत असेल तर माझा काही इलाज नाही. (hedonist) अदिती आणि उकीरड्यात, कचर्‍यात सापडणार्‍या, दुधाच्या भांड्यात जन्माला येताच बुडणार्‍या बालिका कोणत्या देशात असतात? त्यांच्या आईबापांनातर दुसर्‍या व्यक्तीत रस आहे हे ही कारण नसतं. निष्कारणच बालिका मरतात नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 09/15/2011 - 07:24

In reply to त्याचा वा कशाचाही अतिरेक हा by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वाद देवावरून सुरु होऊन

वाद देवावरून सुरु होऊन संस्कृतीवर कसा आला कोण जाणे, पण एक गोष्ट नक्कीच जाणवली, देवाची गरज संपली आहे. समाजातल्या काही घटकांचा चरितार्थ, सत्ता वगैरे देवाच्या अस्तित्वावर अवलंबून होते, पण पश्चिमेकडून आलेल्या सुधारणावादी आणि वैज्ञानिक विचारांच्या वार्‍यांनी एकाचवेळी देवाचं संरक्षक छप्पर उडवून लावलं आणि त्याचवेळी त्यांचं तारू प्रगतीच्या नव्या प्रवाहांकडेही वळवलं. देवाच्या संकल्पनेचा या लोकांना आता तितकासा फायदा उरलेला नाही. ज्यांना तो आहे ते आपापल्यापरीने नवनवे जुलूस भरवून तो उठवत आहेत. उर्वरित जे सरळ मनाचे साधेभोळे लोक आहेत ते पूर्वापार चालत आलेल्या देवाच्या गप्पागोष्टींवर अजून विश्वास ठेवून आहेत. बर्‍याच लोकांना परंपरागत देवाचे रूप पटत नसूनही काही तरी वैश्विक शक्ती आहे असा विचार करायला आवडतो. व्यक्तिशः मला गीतेत सांगितलेला परमेश्वर आणि निसर्गाची संकल्पना यात साम्य वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/15/2011 - 09:01

In reply to वाद देवावरून सुरु होऊन by नगरीनिरंजन

Permalink

वाद देवावरून सुरू होऊन इथे या

वाद देवावरून सुरू होऊन इथे या प्रतिसादात संस्कृतीचा उल्लेख प्रथम आला.
... देवाची गरज संपली आहे.
माझ्या बुद्धीला देवाचं अस्तित्व पटलं नाही तेव्हा माझ्यासाठी देवाची गरज संपली. ज्या कोणाला देवाची गरज आहे त्यांच्याबद्दल माझी "नो कमेंट".
व्यक्तिशः मला गीतेत सांगितलेला परमेश्वर आणि निसर्गाची संकल्पना यात साम्य वाटते.
यावर थोडं जास्त विस्तारीत लिहीलंत, कदाचित वेगळ्या धाग्यात, तर वाचायला आवडेल. Gaia सिद्धांतावर तुमचा विश्वास आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 09/15/2011 - 14:18

In reply to वाद देवावरून सुरू होऊन इथे या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

Gaia सिद्धांताची मला

Gaia सिद्धांताची मला शास्त्रीयदृष्ट्या फार माहिती नाही पण त्यातलं जे मुख्य तत्व आहे की सध्याच्या जीवनावश्यक स्थितीचा समतोल साधण्यासाठी काही तरी घडत असतं तेच निसर्ग या संकल्पनेमध्ये अध्यारुत आहे असं मला वाटतं. जीवन सांभाळण्याच्या त्या जगङ्व्याळ, काटेकोर आणि नि:पक्षपाती यंत्रणेत आणि परमेश्वराच्या विश्वरूप दर्शनात बरंच साम्य वाटतं. यावर लिहीण्याची इच्छा बर्‍याच दिवसांपासून आहे. पण विषय माझ्या बुद्धीला झेपेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सेरेपी on गुरुवार, 09/15/2011 - 07:37

In reply to त्याचा वा कशाचाही अतिरेक हा by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

तुझ्या ह्या आणि वरच्या प्रतिसादाला. तू लिहिलयंस तसंच थोडंफार लिहायचं होतं, पण ते सारे विचार वाचून पडलेला जबडा उचलताना राहून गेलं! ;-)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com