पडद्यांचे जग
हौसेला मोल नसतं आणि निराशे इतकी स्वस्ताई शोधून सापडायची नाही. दोन्ही मनाचेच खेळ अगदी दोन टोकांवरले. हौसेत जगणं कृतार्थ झाल्याचा भास आणि निराशेत त्याच्या अंताचा. या दोन मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे जीवन. या रेषेवरचा प्रवास मोठा गमतीदार. पण इथले बरेचसे प्रवासी भरपूर वजन घेऊन या प्रवासाची सुरुवात करतात. आणि त्याचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम होतो. रेषेवर कुठेही असला तरी त्या माणसाची जीवनातली दमछाक काही थांबत नाही. हां सांगायचं राहिलं.. ओझं पडद्यांचं. हो पडदे.. अनेकवचनी! एका स्थिर रंगमंचावर एकाच वेळी अनेक प्रयोग सादर करायचे असतील तर काय करावे लागेल? तो रंगमंच चारही बाजूंनी पडद्यांनी झाकावा लागेल आणि मग ज्या प्रेक्षकांसाठी सादरीकरण करायचे तेवढ्या बाजूचा पडदा वर घ्यायचा. कुणाचे असे चार प्रयोग चालू असतात कुणाचे दहा! ही सगळी ऐच्छिक हमाली फक्त वेगवेगळे भास जपण्यासाठी. कुणी आपले स्वत्व खुले करत नाही आणि म्हणून दुसऱ्या कुणाच्या स्वत्वाची ओळखही करून घेता येत नाही. झाडाच्या सगळ्याच फांद्यांना फळे लागली तर त्या वजनाने झाड मरणार नाही का? अगदी प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांच्या टाळ्याच पडत राहिल्या तर नाटकाचा प्रयोग पुढे सरकणे अशक्य होईल. यशाचं टोक गाठलं तरी जीवनाचा लंबक उद्या अपयशाचं टोक गाठणारच नाही याची शाश्वती खुद्द परमेश्वराला देता येणार नाही. म्हणून जगाला खूष करण्यासाठी माणसाने अशा भरमसाट पडद्यांचा आधार घेऊन 'जगण्याचे नाटक' करू नये. ते पडद्यांचं ओझं फेकून द्यावं आणि खुल्या आसमंताखाली बेफिकीर होऊन हौस आणि निराशेचा झोका खेळावा. कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्वत्वाची ओळखही करून घेता येत नाही.. बरोबर
अतिशय छान philosophy.
छान.
छान लेख
असं नाही ....
यशाची आवड नकोच.
छोटासा तरीही विचार करायला
परदेेमें रहने दो परदा ना उठाओ
:-)
कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.
छान लिहिले आहे...
असं कसं?
प्रयत्न करायचे आपण.
अतिशय सुंदर मांडणी केलीय!
कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी
सुंदर आणि सुटसुटीत लेख
उपाय आहे.