एस. पी. आम्ही फक्त तुलाच नाही तर आमच्या तारुण्याला देखील गमावलं आज....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
हॅलो SP ... कालच बातमी आली तू आम्हाला सोडून गेल्याची आणि खरं सांगतो तुझा चेहरा आणि आमच्या आठवणीतलं आमचं तारुण्य दोन्हीही पकडीतून निसटून गेलं बघ...
बातमी वाचली तेव्हा कुठे कळलं की तू ७४ वर्षांचा होतास. हो कारण या अगोदर आम्ही तुला तुझ्या आवाजामुळे सतत तरुणच समजत होतो. आवाजाला कुठे रे असतं कधी वय? आणि तू जी हिट गाणी दिलीस ना तेव्हा आमचं तारुण्य ऐन भरात होतं त्यामुळे SP कधी म्हातारा होऊच शकत नाही अशी ठाम समजूत झाली होती आमची. मैने प्यार किया (१९८९) पासून तू जो आमच्या तारुण्यात आलास तिथपासून ते हम आपके है कौन (१९९४) पर्यंत म्हणजे आमचं सगळं कॉलेज विश्व तू बरोबर व्यापून राहिलास. मग तू म्हातारा कसा काय असू शकतोस?
का आमचं तारुण्य खरोखरच निघून गेल्याची जाणीव आम्हाला व्हावी म्हणून तर तू आमच्यातून निघून नाही ना गेलास?
तुझ्या आवाजात जी एक सहजता होती त्याने तू आमच्या अगदी शेजारी राहणारा आहेस असं वाटायला लागलं आम्हाला. म्हटलं तर तुझ्या आवाजात भारदस्तपणा होता आणि म्हटलं तर उच्छृंखलपणा. गर्दीश मधलं तुझं, हम ना समझे थे बात इतनी सी हे गाणं ऐकायचो तेव्हा आम्हालाच आम्ही एकदम मॅच्युअर असल्यासारखे वाटायचो आणि मैने प्यार किया मधलं तुझं मेरे रंग मे रंगने वाली हे गाणं ऐकायचो तेव्हा आम्ही अल्लड प्रेमी झाल्यासारखे वाटायचो. आमचीच वेगवेगळी रूपं स्वतःच्या आवाजाने बाहेर काढणारा अवलिया बहुरूपी होतास तू. तुझं, देखा है पहली बार, हे गाणं ऐकताना तर माधुरी आमच्या बाजूला असल्याचा आम्हाला भास व्हायचा आणि रूप सुहाना लगता है हे गाणं ऐकताना सिनेमाचं नाव जरी ‘द जंटलमन’ असलं तरी टपोरी मुलासारखं रस्त्यावर नाचावं असं वाटायचं. मुळात तुझा हा वैविध्यपूर्ण आवाज आणि आमचं कॉलेज विश्व ह्या दोन गोष्टी इतक्या जुळून आल्या की आता तू नाहीस म्हणजे आमचं कॉलेज विश्व देखील खऱ्या अर्थाने इतिहास जमा झालं असं वाटलं बघ.
सागर मध्ये तू म्हणालास, सुनते थे हम ये जिंदगी, गम और ख़ुशी का मेल है, हमको मगर आया नजर, ये जिंदगी वो खेल है...... खरं करून गेलास बघ हे वाक्य तू. आता तुझी रेकॉर्डेड गाणी ऐकत बसायचं आणि गम और ख़ुशी च्या हिंदोळ्यांमध्ये आपलं आयुष्य घालवायचं आणि स्वतःला सांगत बसायचं की हा सगळा त्या परमेश्वराने मांडलेला खेळ आहे म्हणून. कोरोनाने तुझ्यावर हल्ला केला तेव्हा का नाही रे सांगितलंस त्याला ठणकावून तुझ्या ‘एक दुजे के लिये’ मधल्या गाण्यासारखं, हम फिर भी जी कर दिखलाएँगे, एक नया इतिहास बनाएँगे...? का ती गाणी फक्त आमच्या मनोरंजनासाठीच? असं गाणं म्हणणारा माणूसच जर निघून गेला तर आता आम्ही काय करायचं? हम दुनिया की प्यास बुझाएंगे, म्हणालास त्या गाण्यात पण मग आता तुझ्या आठवणींनी आम्ही तहानलेले राहू त्याचं काय?
का तू जसं पत्थर के फूल मध्ये आपल्या प्रेमिकेला, कभी लिंकिंग रोड, कभी वॉर्डन रोड, कॅडल रोड कभी पेडर रोड, असं शोधत राहिलास तसं आम्ही शोधायचं आता तुला? सिनेमात असं शोधणं शक्य असतं रे, पण परमेश्वराने बनविलेल्या या सिनेमात एकदा एग्झिट घेतली की घेतली मग लिंकिंग रोड काय किंवा पेडर रोड काय... काही उपयोग होत नाही. हम आपके है कौन मध्ये तू जेव्हा म्हणायचास, मुझसे जुदा होकर तुम्हे दूर जाना है, तेव्हा काळजाचा ठोका चुकायचा पण नंतर लगेचच तू, पलभर की जुदाई फिर लौट आना है, म्हणायचास तेव्हा जिवात जीव यायचा.
पण आता आपण परत कधी भेटायचं? का तुझ्या रेकॉर्ड केलेल्या आवाजात तुला शोधत राहायचं? मेरी आवाज ही
पहेचान है, अशी आम्ही आमच्यापुरती तुझ्या बाबतीत समजूत करून घ्यायची आमच्या समाधानासाठी? ते काही नाही. आपण परत भेटायचं पुढच्या आयुष्यात. तेव्हाही मी कॉलेज मध्ये आणि तू त्या वेळचा आघाडीचा गायक हे मात्र आत्ताच ठरवूया दोस्ता कारण, दिलसे न जाती है यादें तुम्हारी, कैसे तुम बिन जीना…
माझं तारुण्य व्यापून उरलेल्या महान गायकाला तुझ्याच शब्दांमधली माझी ही मानवंदना समज…
- अनिल जोशी
प्रतिक्रिया
एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली
आवडते गायक. थोडा दक्षिणी टच
व्हॉट्स ऍपवरून आलेला आवडलेला फॉरवर्ड पोस्ट करतो
आवडलेला व्हॉट्स ऍप फॉरवर्ड
एस पी.