✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जी नाईन

अ
अभ्या.. यांनी
Wed, 08/03/2016 - 17:28  ·  लेख
लेख
रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला. रस्त्यावर नेहमीचाच सीन. मामाच्या कॅन्टीनसमोर एक अ‍ॅक्टीव्हा आडवी पडलेली. टिपटाप युनिफॉर्मातला एक गोमटा जीव मम्मी कशी रिक्षावाल्याशी भांडतेय हे पाहतोय. रिक्षावाला तर गल्लीतला सत्याच होता. गर्दीला आवडणारा परफॉर्मन्स अगदी बिनचूक पार पडला जात होता. शंकर्‍याने गर्दीत घुसताच आवाज दिला. "अय मॅडम, जरा तमीजसे बात करना. गरीब हुये तो भी इन्सान है हम" भांडून त्रासलेल्या अन शिव्याचा स्टॉक संपल्याने गोंधळलेल्या मॅडमने शंकर्‍याकडे पाहिले. गर्दीने हसायला सुरुवात केलीच होती ती आता नवीन सीनसाठी सरसावली. "अरे ये तो नीलम है. क्या मॅडम पहचाना की नही. अपुन शंकर. जीनाईन." "शंकर्‍या, सोड आता तरी मवालीगिरी. बघ ह्या रिक्षावाल्याने काय केलेय, त्यात अथर्वला स्कूलला लेट होतय" .......... "ए हटा, सब हटा. सत्या चल बे. फूट इथून. अपना पुराना वास्ता है" एवढे बोलत पडलेल्या अ‍ॅक्टीव्हाला शंकर्‍याने हात घातला. च्यायला जड होतं प्रकरण. का हाडं कटकटायली. जरा दम लावून उचलताच नीलमने हिसकावल्यासारखा ताबा घेतला. मम्मीने बटनस्टार्ट करायच्या आत पोरगं मागच्या सीटवरुन तिला बिलगलं. गर्दीचा इंटरेस्ट संपला होता. शंकर्‍या सत्याला घेउन कॅन्टींगात टेकला. "यार वो नीलम है. अपने साबकी. बहोत पुराना लफडा. कारसे आती थी इस्कूल. आपुन उदरीइच रुकता था उसके वास्ते" "बस कर बे, उठला आता बाजार तुझा आन तिचा पण. तिचं गाबडं दोन चार वरशात दहावीला येईल. तू आइघाल्या कवा आतनं शाळा तर पाह्यला का?" "सत्या, मेहनत करके रिक्षापे जीता है इसलिये माफ किया तेरेकू. साले कहा नोकरी करता तो नही छोडता मांकसम" "आता गप्पतो का भाऊ. तिच्यायला त्या मिथुननं हेंडगाळ लावलं जिंदगीला. ते बी सोडंना ठुमकं लावायचं. तुझी जवानी उतरना." "क्या बोलता? दादाकी नयी फिल्म? " "बस ना आता. रात्री आसतय टीव्हीवर. डॅन्सच्या शोला. केबलवर" "दादा का डॅन्स. मांकसम. पण सत्या टीव्ही नाय ना आपल्याकडे" "टीव्ही नाय, बीवी नाय, कुच बी नाय तुझ्याकडं गांडो. जिंदगी सगळी जीनाईन करत घाल त्या टेपमदी." "टेपला काय बोलायचं नाय बे सत्या. जिंदगी हाय अपनी. ते जौंदे. शंभर दे की जरा." "भाडखाव, भोनीचा पत्ता नाय ती तुझी बुढ्डी ठोकली सकाळ सकाळी. पैसे कुठनं आणू. आधीचे हजार दे परत. ग्यास भरायचाय" "चल माफ कर दिया. मामा, अपना दो चाय लिख देना खातेपे" "निघंय फुकन्या. इथून तिथून, सम्दं मिथुन. पुढं मागं कोन नाय तवा बोलंना तुला. न्हायतर कुत्रं इचारना तुला" मामा लैच कोकलायच्या आत शंकर्‍या रुमवर आला. कालच्या २० रुपड्याच्या भज्याचा पुडा तसाच पडलेला. टेपची कॅसेट अर्धवट बाहेर आलेल्या जिभेगत रेकॉर्डरच्या तोंडातून लोंबत होती. खाटखाट बटनं दाबत कॅसेट बसताच शंकर्‍यानं भजी घेउन ठिय्या मारला. जिहाले मस्ती मुकं ब रंजिश सुरु व्हायच्या आधीचा मॅडम बस चली जायेगी चा पुकारा शंकर्‍यानं जोरात केला पण आवाज साथ देईना. आवाज काय आख्खं शरीर तुटल्यासारखं झालेलं. सालं ह्या जिंदगीला आपली जरुरत नाय. दादा अजुन फॉर्मात हायेत. उटीला कायतरी हॉटेलं हायत म्हणं. इंडस्ट्रीको जरुरत है दादाकी. बस अपनी जरुरत नही किसिको. कळायला लागल्यापासून लागलेला नाद पिक्चरच. तवा बी आय होती, बाप नव्हता. रस्त्यावर सुध्दा डिस्को मारत जाणारा शंकर्‍या काहीही करुन जगत गेला. वाढत्या वयासोबत अक्कल मात्र मिथुनखाती गहाण पडत गेली. आय गेली ती शरीर वाढायची किल्लीच घेऊन गेली. भजीपाव भरुन अंगावर ना मांस भरणार होतं ना चमक. चमक राह्यली ती फक्त घोट्याच्या वर असलेल्या चेनच्या बुटाला. थेटर, व्हीडीओ जमंल तिथं शंकर्‍या मिथुनला डोळ्यात, मनात साठवत राह्यला. एकाच गोष्टीसाठी आईची आठवण काढत राह्यला ते म्हणजे ठेवलेले नाव शंकर. दादाच्या पिक्चरात हमखास असतंच. गरीबोंका दाता शंकर. बुराइका दुश्मन शंकर. साला शंकर शंकर शंकर. त्याआधी जिम्मी म्हणायचे यारदोस्त. नंतर जी नाईन झालं. जी नाईन. कमांडोतला मिथुनदा जी नाईन. त्या नावाबरोबर स्वप्नात मंदाकीनी दिसायली तेव्हा शंकर्‍याची जवानी सुरु झाली बहुतेक. एकदा मंदाकीनीचे घारे डोळे दिसले शाळेच्या युनिफॉर्मात. तेंव्हा शंकर्‍या सत्याची रिक्षा चालवत होता. दहावीची नीलम पीएसअयसाह्यबाची पोरगी आहे हे कळलं तसं शंकर्‍या खुलला. भ्रष्ट पोलीस अधिकारी बापाच्या तावडीतून नीलमला सोडवतोय अशी स्वप्ने तर कायमच पडायली. रात्री फुटकी फरशी रंगीत काचात बदलायची. पांढर्‍या उंच टाचाच्या बुटातला शंकर्‍या डिस्कोच्या तालावर स्वप्ने रंगवायचा. रुपाया रुपाय जोडून ड्रायरने सेटींग केलेले केस मिंटामिंटाला हाताने सेट करायचा. नीलमला बघायला शाळेच्या पायर्‍या झिजवून झाल्या. तिच्या घरासमोरचा कट्टा घासला. तिच्या बापाकडं ड्रायव्हरची नोकरीपण करुन झाली. नाचरे दिवस सरत गेले. नीलम कॉलेज बिलेज करुन सुखाने बोहल्यावर गेली. त्या लग्नात नाचायची सुपारी मात्र शंकर्‍याने नाकारली. इतक्या दिवसात शंकर्‍या पोराचा बाप्या झालेला. जीवापाड सांभाळलेल्या केसांनी साथ सोडायला सुरवात केली. फिटींगच्या पांढर्‍या पॅन्ट आणि लूज टीशर्ट विटले. उंच बुटांसोबत जिंदगीपण घासून सपाट झाली. लग्नकार्यात नाचून नायतर ऑर्केस्ट्रात नाईटवर मिळालेल्या पैशात टेप न कॅसेटी एवढीच इस्टेट जमा झालेली. खोली तर आयच्या नावावर. ती पण जाणारच अतिक्रमणात एक दिवस. "साला गरीबोंकी नही ये दुनिया. अपनी प्रेमप्रतिज्ञा ऐसेइच जायेंगी अपने साथ" "नीलमचं पोरगं मोठ्ठं झालं. अपना दादा बडा आदमी बन गया. अपना क्या? " "डॅन्स. बस्स डॅन्स." "आयामे डिस्को डॅन्सर." "नये लडकोंका डॅन्स जज करते है अपने दादा. अपुन जानेका क्या?" "जानेकाच. दादा समझ लेंगे अपनी जिंदगी" दुखर्‍या पाठीला अन भरुन आलेल्या पोटर्‍यांना सांभाळत डोक्याला रुमालाची पट्टी आवळून शंकर्‍याने टेपचा आवाज वाढवला. "जिंदगी मेरा गाना, मै कीसीका दिवाना. तो झूमो, तो नाचो, आ मेरे साथ नाचो गावो. आयमे डिस्को डॅन्सर" . . दुपारपर्यंत टेप वाजत राहिला. कॅसेट साईड बदलत राहिल्या. पाय थिरकत राह्यले. . . संध्याकाळी सत्या पैसे द्यायला आला. भजी अन तुटक्या कॅसेटीच्या राड्यात डॅन्स संपला होता. पत्र्याच्या त्या खोलीत जिवंत असलेला एकमेव जीव म्हण्जे तुटक्या रीळाच्या कॅसेटचा टेप फिरत होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
43837 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

अफाट लिहिलंय बे.

किसन शिंदे
Wed, 08/03/2016 - 17:39 नवीन
अफाट लिहिलंय बे.
  • Log in or register to post comments

जिंदगी मेरा गाना...

संजय पाटिल
Wed, 08/03/2016 - 17:40 नवीन
:(
  • Log in or register to post comments

मस्त

कमवू
Wed, 08/03/2016 - 17:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Wed, 08/03/2016 - 17:51 नवीन
"टेपची कॅसेट अर्धवट बाहेर आलेल्या जिभेगत रेकॉर्डरच्या तोंडातून लोंबत होती." हे...आणि.... "पत्र्याच्या त्या खोलीत जिवंत असलेला एकमेव जीव म्हण्जे तुटक्या रीळाच्या कॅसेटचा टेप फिरत होता." ही दोन्ही वाक्ये जबरदस्त.
  • Log in or register to post comments

साला, तुम एकीच लिखता, पुरा

संदीप डांगे
Wed, 08/03/2016 - 17:58 नवीन
साला, तुम एकीच लिखता, पुरा बाजार उठवता है...
  • Log in or register to post comments

+११

नाखु
गुरुवार, 08/04/2016 - 08:48 नवीन
इथून तिथून मिथून ची पारायणे करणार्या (आणि अता हयात नसलेल्या) दोस्ताची याद आली..त्याचीही जिंदगी "आज का ऐश देखो कलका मत सोचो" असे म्हणत गेली फरक इतकाच इथे कथानायकाला नायीका नाही मिळाली पण त्याला मिळाली तीही पोलिसाचीच (अगदी फिल्मी ष्टाइल लव्ह मॅरेज) पण लग्ना आधीच्या "साथ संगत" आणि नशाबाजीने विवाहाच्या सुखाला कधी सुरुंग लावला त्यालाही कळले नाही आणि ते पेरलेले भु-सुरूंग प्रत्येक वाटचालीत मध्ये आले. मागे दोन छोटी मुले ठेऊन हा "मिथून" इथून गेला.(साल २००१) पुण्यातून कोल्हापूरला गेल्यावर माझ्याशी संपर्क कमी-कमीच झाला होता त्याचा.... अवांतराबद्दल क्षमस्व पण मिथून बाहेर यायला हे निमित्त होते. नि:शब्द नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जबरदस्त!!

पद्मावति
Wed, 08/03/2016 - 17:59 नवीन
जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

__/\__

सूड
Wed, 08/03/2016 - 18:02 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

जबरदस्त !!!

राजाभाउ
Wed, 08/03/2016 - 18:09 नवीन
जबरदस्त !!!
  • Log in or register to post comments

मनुष्यस्वभावाची निरिक्षणशक्ती

प्रचेतस
Wed, 08/03/2016 - 18:17 नवीन
मनुष्यस्वभावाची निरिक्षणशक्ती आणि भाषाशैलीवर प्रभुत्व अफाट आहे तुझे.
  • Log in or register to post comments

खतरनाक, तोडलेस लका

स्पा
Wed, 08/03/2016 - 18:40 नवीन
खतरनाक, तोडलेस लका
  • Log in or register to post comments

मिथुन फॅनची फरफट

सिरुसेरि
Wed, 08/03/2016 - 18:43 नवीन
मिथुन फॅनची फरफट अफाट मांडली आहे . बाकी जी ९ मिथुन म्हणले की त्याचे सुरक्षा , वारदात हे चित्रपट आणि त्यातली "देखा है मैने तुझे फिरसे पलटके " , "प्यार करना तो जरुरी है " हि गाजलेली गाणी आठवतात . "जीते है शानसे " , "प्यारका मंदीर" ,"गुरु" या चित्रपटांमुळे त्याची "गरीबोंका अमिताभ" अशी इमेज बनत गेली . असे असंख्य शंकर्‍या त्याचे फॅन बनले .
  • Log in or register to post comments

+१००

संदीप डांगे
Wed, 08/03/2016 - 18:46 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

होय मिथुन ला गरीबोंका अमिताभ

राजाभाउ
गुरुवार, 08/04/2016 - 12:36 नवीन
होय मिथुन ला गरीबोंका अमिताभ म्हणायचे, म्हणजे गरीब निर्मात्यांचा अमिताभ असेच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

नाही.

खेडूत
गुरुवार, 08/04/2016 - 12:43 नवीन
नाही. गरीब चाहत्यांचा अमिताभ...ज्यांची स्वप्नंही गरीब असतात ते. नव्वदीच्या दशकात पुण्यात 'गरीबांचा मिथुन' पण एखाद्याची हेटाई करण्यासाठी म्हणत असत. (हे खडकी-दापोडी ला पर्यायी होतं.) बाकी व्यक्तिचित्र एकदम आवडलं. असे मिथून पाहिले होते त्या काळी. स्टार नावाचा कुमार गौरवचा एक पिच्चरही आठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

ओह अस आहे होय ते, मी वेगळच

राजाभाउ
गुरुवार, 08/04/2016 - 13:24 नवीन
ओह अस आहे होय ते, मी वेगळच समजत होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

गरीबांचा मिथुन'

स्पा
गुरुवार, 08/04/2016 - 17:24 नवीन
गरीबांचा मिथुन'
लोल अपमान करायला शिकावे तर पुणेकरांकडून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

म्हणजे गरीब निर्मात्यांचा

कानडाऊ योगेशु
Sat, 08/06/2016 - 08:36 नवीन
म्हणजे गरीब निर्मात्यांचा अमिताभ असेच ना ?
ह्यावर मित्रांसोबत वादविवाद झालेला आठवतोय. गरीब जर प्रेक्षकांसाठी असेल तर त्यांना थिएटरमध्ये मिथुन्चा चित्रपट पाहायचा असेल तर तेवढेच पैसे द्यावे लागतील जितके बाकीच्या बिगबजेट चित्रपट पाहायला लागतात. त्यामुळे गरीब हे विशेषण निर्मात्यांसाठीच असेल ह्य निष्कर्षाप्रत आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

बरोबर आहे योगेशा, ज्यावेळी

अभ्या..
Sat, 08/06/2016 - 08:49 नवीन
बरोबर आहे योगेशा, ज्यावेळी अमिताभ सर्वोच्च मानधन घेत असे आणि कथा दिग्दर्शनात चुजी असे त्यावेळी मिथुनने लो बजेट आणि भारंभार फिल्म्स नव्या बॅनरखाली पण केल्या. त्यामुले हा समज वाढला. गरिबांचा अमिताभ म्हणायला मात्र एक कारण होते. अमिताभ ताडमाड उंच, विशेष आवाज आणि रूप असलेला स्टार. पब्लिक त्याची कॉपी फक्त हेअरस्टाइल आणि कपड्यात मारू शके. त्यासारखे दिसणे अवघड असे. मिथुन मात्र सर्वसाधारण लोकांना आपला वाटणारा, त्यांचासारखा दिसणारा हिरो. केस वाढवून, कपडे आणि थोड्या डान्सच्या जीवावर लोकल मिथुन बनणे इझी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अभ्या,

कानडाऊ योगेशु
Mon, 08/08/2016 - 20:17 नवीन
अभ्या,
रूप असलेला स्टार.
ह्याबाबत किंचित असहमती. ज्या ज्या गोष्टी तू गुण म्हणुन सांगितल्यास त्याबद्दलच त्याची हेटाळणी झालेली होती. राजकुमारने त्याची ताडमाड उंची पाहुन "जानी,इनकी टांगे तो गर्दनसे शुरु होती है" अशी कॉमेंट मारली होती.रूपाबद्दल तर चेहर्या घोड्यासारखा दिसतो आणि एकुण बॉडी लेंन्ग्वेज एका दूधवाल्या भैयासारखी अशी हेटाळणी केली गेली होती. आवाजाबद्दल तर ऑल इंडिया रेडिओने हाकलुन लावले होते. कदाचित इतक्या मानहानीनंतरसुध्दा हा माणुस सुपरस्टार बनला जे अविश्वसनीयच होते सामान्य पब्लिकसाठी त्यामुळे त्यासम तोच असे मानुन कुणी त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला नसावा. जी वैगुण्ये म्हणुन आधी हेटाळणी पदरात पडली होती त्याच गोष्टी त्याने स्वतःच्या स्ट्रेंथ बनवल्या. डोळ्यातल्या किंचित तिरळेपणाचा इंटेन्स सीन मध्ये जबरदस्त वापर केवळ तोच करु जाणे. ( १. दिवारमधला मेरे पास मॉ है डायलॉग नंतर स्तब्ध झालेला चेहरा फक्त डोळ्यातुन बोलतो. २. डॉनमध्ये खोटा डॉन जेव्हा यादगाश्त चली गयी है ची अ‍ॅक्टींग करतो तेव्हा फोकस फक्त त्याच्या डोळ्यांवर आहे. ३. कालापत्थर मध्ये शत्रुघ्न सिन्हा जेव्हा त्याची उगाचच खोड काढतो तेव्हा काय भंकस माणुस आहे हा डोळ्यातुन व्यक्त केलेला भाव जबरदस्तच. एकुण अमिताभ म्हणजे अद्वितिय व्यक्तिमत्व आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हेटाळणी स्टार होण्याआधी

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 21:38 नवीन
हेटाळणी स्टार होण्याआधी झालेली योगेशा. फॅन पण स्टार झाल्यावरच होतात. ते गुण कि अवगुण हा विषयच नाही. फॅन्स फक्त गुण पाहतात. हिरोसारखा थोडा जरी लाईकनेस असला तरी प्रयत्नपुर्वक तो वाढवतात. काही जण तर काहीच नसताना कॉपी मारतात. काहींचे आयुष्याचे ध्येय बनून जाते ते. तेच क्रेझी फॅन फॉलोविंग. बस्स बाकी कुछ नही यार इस कहांनिमें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

प्रचंड सहमत. शाळेत असताना एक

कानडाऊ योगेशु
Tue, 08/09/2016 - 20:24 नवीन
प्रचंड सहमत. शाळेत असताना एक हुशार मुलगा सनी देओलचा अगदी डायहार्ड फॅन होता. सनीचा एक डोळा इंटेन्स प्रसंगात थोडा तिरळा होतो व एक भुवई उडते. हा ही डिट्टो तसेच करायचा प्रयत्न करायचा. नोकरीच्या ठिकाणी एक शाहरुखचा फॅन होता. एकदा लंगडत लंगडत कंपनीत आला व काही दिवस असेच चालत होता.मी दुसर्या एका कलिगला विचारले ह्याला झालेय काय? तो कलिग म्हणाला कि कभी अलविदा ना कहना मध्ये शाहरुख असाचा लंगडत चालतो म्हणुन हा ही असाचा चालतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सनी देवलच्या एका डोळ्यात एक

अभ्या..
Tue, 08/09/2016 - 21:18 नवीन
सनी देवलच्या एका डोळ्यात एक काळा डाग आहे छोटासा, सेम तसाच अगदि माझ्या डोळ्यात पण आहे. पर हाथ ढाई किलोका नही ना. ;) म्या पण सनिभाऊंचा लै जबरा फॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सनी देवलच्या एका डोळ्यात एक

अभ्या..
Tue, 08/09/2016 - 21:19 नवीन
सनी देवलच्या एका डोळ्यात एक काळा डाग आहे छोटासा, सेम तसाच अगदि माझ्या डोळ्यात पण आहे. पर हाथ ढाई किलोका नही ना. ;) म्या पण सनिभाऊंचा लै जबरा फॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अप्रतिम, अद्भुत आणि अफाट

अभिरुप
Wed, 08/03/2016 - 18:50 नवीन
काय लिहिलंय दादा....जबर्‍या एकदम.असे दोन-तीन मिथुन बघितले आहेत. एकाने तर अक्षरशः स्वतःची किडनी विकून आलेल्या पैश्यात मिथुन बनायची हौस भागवली होती. नंतर पुन्हा भणंग जीवन वाट्याला आले त्याच्या.
  • Log in or register to post comments

जबरदस्त लिहिलंय. भारीच!

आदूबाळ
Wed, 08/03/2016 - 19:08 नवीन
जबरदस्त लिहिलंय. भारीच!
  • Log in or register to post comments

+++++++++

कंजूस
Wed, 08/03/2016 - 19:29 नवीन
+++++++++
  • Log in or register to post comments

अफाट

रांचो
Wed, 08/03/2016 - 19:29 नवीन
कसल अफाट लिवलयस बे..
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली. माया नगरीत

विवेकपटाईत
Wed, 08/03/2016 - 19:54 नवीन
गोष्ट आवडली. माया नगरीत मायावी दुनियेत येणार्या अधिकांश लोकांची कर्मगाथा बहुतेक अशीच असेल..
  • Log in or register to post comments

कड्क

विखि
Wed, 08/03/2016 - 20:02 नवीन
अबे अई... कसम पैदा करने वाले की क्या.........
  • Log in or register to post comments

मस्तच अभ्या !!!

राघवेंद्र
Wed, 08/03/2016 - 20:08 नवीन
मस्तच अभ्या !!!
  • Log in or register to post comments

ज्ये बात

तिमा
Wed, 08/03/2016 - 20:10 नवीन
कं लिवलंय, कं लिवलंय!
  • Log in or register to post comments

च्यायला,

जव्हेरगंज
Wed, 08/03/2016 - 20:24 नवीन
लईच कडक! खतरी!!
  • Log in or register to post comments

भाई आपण तुमको सलाम करता हैं !

हेमन्त वाघे
Wed, 08/03/2016 - 20:39 नवीन
https://cdn.meme.am/instances/500x/51258871.jpg
  • Log in or register to post comments

Photo

हेमन्त वाघे
Wed, 08/03/2016 - 21:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

डोस्क भंजाळलं

टवाळ कार्टा
Wed, 08/03/2016 - 20:45 नवीन
डोस्क भंजाळलं
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिखाण अभ्या..

उडन खटोला
Wed, 08/03/2016 - 20:51 नवीन
अप्रतिम लिखाण अभ्या.. एखाद्या क्लासिकल सिंगर ने आपल्याला हे सुद्धा गाता येतं म्हणत एखादं फिल्मी गाणं टेचात म्हणून दाखवावं तसं लिहिलायस. जिगर है भौ!
  • Log in or register to post comments

कसलं लिवायलाय बे तुफान एकदम

महासंग्राम
Wed, 08/03/2016 - 20:58 नवीन
कसलं लिवायलाय बे तुफान एकदम
  • Log in or register to post comments

एक नंबर...

अमितदादा
Wed, 08/03/2016 - 21:24 नवीन
एक नंबर...
  • Log in or register to post comments

:(

नीलमोहर
Wed, 08/03/2016 - 22:12 नवीन
डोक्याला शॉट.. एक नंबर लिहिलंय.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

सुंड्या
Wed, 08/03/2016 - 22:14 नवीन
खूप आठवणी जाग्या केल्या भौ...मी अश्या व्यक्तींना भेटलो आहे त्यांची 'भक्ती' अनुभवली आहे. सर्वांची स्टोरी 'अतृप्त'...राजेश खन्ना, बच्चन, शत्रुघ्न, किशोर.
  • Log in or register to post comments

क्या बात, क्या बात, क्या बात!

NiluMP
Wed, 08/03/2016 - 22:29 नवीन
क्या बात, क्या बात, क्या बात!!!
  • Log in or register to post comments

अभ्या.. लका..

तुषार काळभोर
Wed, 08/03/2016 - 22:37 नवीन
अंगावर काटा आला राव! शप्पथ!
  • Log in or register to post comments

जबरदस्त.... खूप आवडलं. मनाला

ज्योति अळवणी
Wed, 08/03/2016 - 22:53 नवीन
जबरदस्त.... खूप आवडलं. मनाला स्पर्श करणार लिहिता
  • Log in or register to post comments

परिणामकारक लेखन...

बहुगुणी
Wed, 08/03/2016 - 23:23 नवीन
शंकर्‍या डोळ्यांसमोर पर्फेक्टली उभा केलात!
  • Log in or register to post comments

अगदी ..

ब़जरबट्टू
गुरुवार, 08/04/2016 - 08:53 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

:(

रातराणी
Wed, 08/03/2016 - 23:23 नवीन
:(
  • Log in or register to post comments

अभ्या, व्यक्तिचित्रण प्रकारात

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/03/2016 - 23:49 नवीन
अभ्या, व्यक्तिचित्रण प्रकारात तुला पेडिस्टल वर ठेवले गेले आहे, अधिक काहीच बोलायला सुचत नाहीये, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

च्यायला, काय कथा आहे!

गामा पैलवान
गुरुवार, 08/04/2016 - 02:22 नवीन
अभ्या.., साली काय म्हणावी शंकऱ्याची जिंदगी? मायावी दुनियेचा इतका मोह पडावा? मानवी जीवन इतकं सवंग असू शकतं? ज्याम प्रश्न पडलाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

भन्नाट

फारएन्ड
गुरुवार, 08/04/2016 - 06:21 नवीन
टोटल भन्नाट लिहीले आहे! हे एकदम टोकाचे उदाहरण्/वर्णन आहे, पण असे एखाद्या अ‍ॅक्टर ला किंवा त्याच्या एखाद्या चित्रपटातील कॅरेक्टरला तारूण्यभर जगणारे लोक बघितले आहेत. अमिताभ चा शराबीतील रोल, किंवा मुकद्दर का सिकंदर मधला वगैरे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा