✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चोरी प्रकाशाची (१)

स
सस्नेह यांनी
Mon, 07/25/2016 - 15:04  ·  लेख
लेख
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते. सर्वसाधारण पणे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्वेकडे हे प्रमाण जास्त आहे. काही प्रतिष्ठित उद्योगधंदेसुद्धा वीज-चोरीसारख्या अनिष्ट गोष्टी सर्रास करताना आढळले आहेत. वीज चोऱ्या पकडण्यासाठी खास पथके नियुक्त केलेली असतात. पूर्वेकडच्या भागात अशाच एका पथकाचे नियंत्रण करण्याची एकदा वेळ आली होती. तेव्हा विजेची चोरी करण्यात आणि ती पकडण्यातही किती कल्पकता असते हे बघायला मिळाले. त्यातले काही मजेदार किस्से. भाग बरेचदा अनोळखी असे. पोलिसांचे जसे खबरे असतात, तसे आमचेही. हे खबरे म्हणजे लोकल माहितगार व्यक्ती. त्या त्या भागातल्या वायरमन लोकांना सर्वसाधारणपणे चोऱ्यावाले ठाऊक असत. पण त्यांनी चोरी पकडली तर नंतर त्या भागात काम करणे जिकिरीचे होई. म्हणून ते प्रत्यक्ष भाग न घेता आम्हाला मार्ग दाखवत. पुढे चोरी पकडली तरी ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करणे फार तापदायक काम असे. डायरेक्ट मीटरमध्ये लुडबुड केलेली बरेचदा वरवर पाहणी करून दिसत नाही. मग मशीन लावून युनिटची तुलना केल्यावर फरक दिसे. त्यानंतर मीटर काढून सील करून त्यावर ग्राहक आणि साक्षीदाराची सही घेणे, ते व्यवस्थित सील करणे, तपासणीला पाठवणे, मग टेम्परिंग कन्फर्म झाल्यावर चोरीचा हिशेब काढणे इ. सोपस्कार होत. तत्पूर्वी ग्राहकाकडून अंदाजे फरकाची रक्कम भरून घ्यावी लागे. तिथेच मतभेद होत. वीज चोर काही केल्या सहकार्य करीत नसे. चोरी नेमकी कधीपासून सुरू होती, ते कळायला पुष्कळदा मार्ग नसे. मग कमीतकमी कालावधी म्हणजे सहा महिन्याच्या बिलाची फरक रक्कम काढून कोटेशन द्यायचे आणि रक्कम भरून घ्यायची. ही रक्कम ग्राहक काही केल्या मान्य करत नसे. ग्रामीण भागात दादागिरी. ‘चोरी बिरी काही नाही, बिल भरणार नाय, कनेक्शन बंद करू देणार नाय’ ही भाषा. मग पोलिसांची मदत घ्यावी लागे. हजार लफडी. एकदा एका घरात मीटरमध्ये गडबड आहे असे अनेक जणांकडून कळले होते. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे आणि आपण घरात जाऊन दार बंद करून बसे. कुत्रा वायरमन लोकांना कंपाउंडच्या आत येउच देत नसे. मग आमच्या वायरमनने एकदा गुंगीचे औषध घातलेले बिस्कीट आधीच कुत्र्याला चारले आणि मग मागील दाराने जाऊन चेकिंग केले. चोरी होतीच. मीटरमध्ये अंदाधुंद गडबड. मशीन लावायची गरजच पडली नाही. टेम्परिंग सरळ दिसत होते. सापडली ना चोरी न काय ? घरमालकीण कधी न ऐकलेल्या शिव्या देऊ लागली. पोलिसांचं नाव काढल्यावरच गप्प झाली. असाच आणखी एक किस्सा. बऱ्याच दिवसापासून ही केस सस्पेक्टेड होती. दुमजली घर. मीटर जिन्यात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी. तिथे उजेड बेतास बात होता. मीटर बघायला दिवसासुद्धा टॉर्च वापरावा लागे. घरात बारा पंधरा माणसे. वर-खाली मिळून आठ-दहा खोल्या. आठ दहा ट्यूबलाईट्स, दोन फ्रीज, दोन टीव्ही,आणि इतर भरपूर वापर. पण बिल जेमतेम पन्नास युनिट्स. वायरमनला पक्की खात्री होती की चोरी आहे. पण मीटरच्या पारदर्शक कव्हरमधून टॉर्चच्या उजेडात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. कुठे अन कशी गडबड केलीय तेच समजत नव्हते. बरं, जास्त तपास अन चिकित्सा करायचा प्रयत्न केला तर वायरमनचीच गचांडी धरली जाण्याची शक्यता. मागच्याप्रमाणेच आम्ही तिघे चौघे सस्पेक्टेड स्पॉटवर गेलो. जाताना दुसऱ्याच भागातल्या वायरमनला बरोबर घेतले होते. मोठा टॉर्च बरोबर नेला होता. अडचणीच्या चिंचोळ्या जिन्यात आमचे पथक खाटखुट करू लागताच घरातले अन शेजारचे दहा-पाच मेंबर गोळा झाले अन आमचे अंधारातील कृष्णकृत्य (?) टाचा उंचावून उत्सुकतेने पाहू लागले. नित्याप्रमाणे त्या भागातील नेहमीच्या वायरमनला पाचारण केले गेले. तो आल्यावर पहिले त्याची झाडाझडती. मग मुख्य काम सुरु झाले. चोरी ओळखण्याची हमखास पद्धत म्हणजे मीटरचा मेनस्विच बंद करायचा अन मग घरातील लाईट्स अन विजेची उपकरणे एकामागोमाग एक सुरु करायची. एक जरी सुरु झाले, तरी चोरी आहे, हे निश्चित झाले. त्याप्रमाणे वायरमनला मेनस्विच बंद करण्यास फर्मावले आणि ट्रायल घेतली. मेनस्विच बंद असूनही वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागातील सर्व लाईट्स आणि उपकरणे सुरूच होती ! म्हणजे चोरी आहे हे नक्की झाले. आता कुठून अन कशी ते शोधल्याशिवाय पंचनामा कसा करणार ? आम्ही पाच जणांनी मिळून डोळ्यात तेल घालून सगळे वायरिंग तपासले. घरातील वायर अन वायर पिंजून काढली. मीटर खालून वरून तपासले. पण छे ! कुठेच काही गडबड दिसेना. आता काय करावे ? चक्कीत जाळ झाला ! मग खाली जाऊन आम्ही डोक्याला डोकी लावली. पलीकडच्या भागातून बोलावून आणलेल्या वायरमनमामांनी युगत लढवली. आम्हाला डोळा मारला आणि शेजारीच रहात असलेल्या घरमालकाच्या पुतण्याला हाक मारून गल्लीच्या कोपऱ्यावर घेऊन गेले. आम्ही पलीकडच्या गल्लीतल्या हॉटेलात च्यापाणी करत बसलो. इकडे पुतण्याला वायरमनने हॉटेलात नेऊन चहा पाजला आणि अघळपघळ गप्पा सोडल्या. चुलत्या-पुतण्यांचे काही बरे नव्हते, ही गोष्ट वायरमनमामांना ठाऊक होती. चहा पोटात गेल्यावर पुतण्या बोलता झाला. मीटरची मेख त्याला बरोब्बर माहिती होती. लगेच मामा परतून आले आणि आम्हाला फोन मारला. गेलो. परत बघे मंडळी जमा झाली. मामांनी खिशातून एक भक्कम चाकू काढला. मीटर अन भिंतीच्या मधल्या सापटीत टॉर्चचा झोत टाकला आणि चाकूचे पाते आत खुपसले. जsरा ताण दिला अन फट मोठी झाली. मग त्यांनी आम्हाला एकेकाला येऊन फटीत डोकवायला सांगितले. बघतो तर काय, त्या फटीतून एक केबल मीटरच्या बाहेरून थेट भिंतीत गेलेली दिसली. आमच्या खांबावरची केबल मीटरमध्ये जाण्यापूर्वीच तिला वाटा फुटल्या होत्या. भिंतीला बेमालूम आरपार भोक पाडले होते अन त्यातून ती केबल जिन्याच्या आधार-पाईपमध्ये अलगद शिरली होती ! आणि तिथून छुप-छुपके वरच्या अर्ध्या मजल्याला वीज पुरवत होती ! झाले. समोरच्या बघ्यांमधल्याच दोघांना पकडले आणि पंच बनवले. पंचनामा केला. मालकाची घाबरगुंडी उडालेली. त्याच्या सह्या घेतल्या. बिलाचे रेकॉर्ड काढून हिशेब केला आणि फरकाचे बिल काढून मालकाच्या हातात ठेवले. या प्रकाशाची किंमत काही हजारात गेली होती ! (क्रमशः )
  • प्रकाशाची चोरी (२)

Book traversal links for चोरी प्रकाशाची (१)

  • प्रकाशाची चोरी (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
34228 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

वाचतेय. पुभाप्र

प्रीत-मोहर
Mon, 07/25/2016 - 15:10 नवीन
वाचतेय. पुभाप्र
  • Log in or register to post comments

मस्त लेखन, पुढील भागाच्या

कविता१९७८
Mon, 07/25/2016 - 15:12 नवीन
मस्त लेखन, पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

एनर्जीवर एकेकाळी काम केल्याने

खेडूत
Mon, 07/25/2016 - 15:28 नवीन
एनर्जीवर एकेकाळी काम केल्याने हा जिव्हाळ्याचा विषय. अश्या अनेक सुरस कथा ऐकल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे चोर्‍या होतच असतात. प्रीपेड मीटर्स हा वसूलीवर एक चांगला उपाय आहे, पण चोर्‍या शोधण्याला पर्याय नाही!
  • Log in or register to post comments

ताई ते वायरमन करुन देतेत ते

अभ्या..
Mon, 07/25/2016 - 15:40 नवीन
ताई ते वायरमन करुन देतेत ते कसलं मशीन ओ? असा छोटा डब्बा असतोय ट्युबलाईटच्या चोकएवढा. त्याला वायर आणि प्लग असतो. मीटरशेजारी सॉकेटमध्ये प्राइम टाइमला (सं. ६ ते १०) टाकतात. रीडिंग स्लो होते म्हणे. बिलात हाफ फरक पडतो असे ऐकलेय ब्वा.
  • Log in or register to post comments

अरे !

सस्नेह
Mon, 07/25/2016 - 17:27 नवीन
तूपण नाही त्या लोकांच्या नादी कशाला लागतोस ? बादवे तो चोक जुन्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरला लागू पडायचा. आता सगळी इलेक्ट्राॅनिक मीटर्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्या ह्या, तोच आलेला विचारत.

अभ्या..
Mon, 07/25/2016 - 17:33 नवीन
ह्या ह्या, तोच आलेला विचारत. माझ्याचयाने काय असले धंदे होत नाहीत. असे किती वाचणार होते? लै झाले 400-500 फक्त. तेवढ्यासाठी चोरीचा ठप्पा नको. जे काय ते लीगल. दोन कामे जास्त करिन पण बिल इमानदारीने भरीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वाट पाहीन पण यष्टीनेच जाईन???

उडन खटोला
Mon, 07/25/2016 - 17:38 नवीन
वाट पाहीन पण यष्टीनेच जाईन????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाई. कधी रेल्वे तर कधी बाईकने

अभ्या..
Mon, 07/25/2016 - 17:44 नवीन
नाई. कधी रेल्वे तर कधी बाईकने पण जातो. ;) बाईकने गेलो तर मात्र डोक्यावर हेल्मेट घालूनच जाईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

रोचक

नाखु
Mon, 07/25/2016 - 15:56 नवीन
आणि विस्मयकारक. सध्या एक जण सांगत होता कसलेसे चुंबक आहे म्हणे (लै पावरबाझ त्याच्याच भाषेत) मीटरशेजारी खालून लावले की मीटर निम्म्यावर येतयं पळायच खरे खओटे मीटर आणि त्यो बाबा जाणे. गुमान नाखु
  • Log in or register to post comments

चुंबकाने जुन्या प्रकारचे मिटर

मार्मिक गोडसे
Mon, 07/25/2016 - 16:13 नवीन
चुंबकाने जुन्या प्रकारचे मिटर स्लो व्हायचे. मागे मुंब्र्याच्या एका युवकाने इलेक्ट्रॉनिक मिटरसाठी रिमोट तयार केला होता, त्या रिमोटने मिटरचे रिडींग बंद करता येत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

रिमोटने अफेक्ट होणारी मीटर्स

सस्नेह
Mon, 07/25/2016 - 17:30 नवीन
रिमोटने अफेक्ट होणारी मीटर्स आता आय आर (इन्फ्रारेड) नी रिप्लेस होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

काय एक एक लोक असतात?

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/25/2016 - 16:00 नवीन
मस्त अनुभव, हे सम्भावीत दरोडेखोरच म्हणायचे की यांना खडी फोडायला पाठवता येते का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

येते की!

खेडूत
Mon, 07/25/2016 - 16:03 नवीन
येते की! अन मोठ्या प्रमाणात केली तर विधानसभेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

झकास!

बहुगुणी
Mon, 07/25/2016 - 19:14 नवीन
अन मोठ्या प्रमाणात केली तर विधानसभेत! याला म्हणतात शालजोडीतला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

काही मंडळी चाळीस वर्षे मस्त

खेडूत
Tue, 07/26/2016 - 10:02 नवीन
काही मंडळी चाळीस वर्षे मस्त वीज मंडळाकडून घेऊन ती म्हणे शेतकर्‍यांना विकतात, अन मंडळाला पैसे देतच नाहीत. बावीसशे कोटींची थकबाकी! व्याजाचं काय? हे महाराज मधे एकदा त्यातून सुटण्यासाठी सेनेत पण जाऊन आले. उर्वरित महाराष्ट्रातल्या गळतीपेक्षा ही एकटी रक्कम बरीच जास्त असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हे हे !

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 10:27 नवीन
तिकडे आमाला पावर नाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

बाब्बौ...भारीये

टवाळ कार्टा
Mon, 07/25/2016 - 16:02 नवीन
बाब्बौ...भारीये
  • Log in or register to post comments

चांगला विषय व लेख.

मार्मिक गोडसे
Mon, 07/25/2016 - 16:02 नवीन
चांगला विषय व लेख. एखाद्या विभागातील विजचोरी (विज गळती?) त्या विभागातील अन्य विजग्राहकांच्या बिलात कुठलातरी दर (बहुतेक इंधन समायोजन दर) लावून वसूल केली जाते. विजचोरी पकडल्यावर चोरी केलेल्या ग्राहकाकडून ती वसूल केली जाते, परंतू संबंधीत विभागातील ग्राहकांकडून ती अगोदरच वसूल केलेली असते. ती पुढील बिलातून वजा करून त्या विभागातील ग्राहकांना परत केली जाते का?
  • Log in or register to post comments

हे हे..!

खेडूत
Mon, 07/25/2016 - 16:05 नवीन
हे हे..! अहो त्या महिन्याचा सुद्धा तोटा अजून मोठा नसणार का? हां, रामराज्य आल्यावर नक्कीच होईल तसं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

वीजगळती त्याठिकाणच्या

सस्नेह
Mon, 07/25/2016 - 17:36 नवीन
वीजगळती त्याठिकाणच्या वीजबिलातून वसूल होत नाही. तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात त्या त्या वाहिनीवर लोडशेडिंग केले जाते. या पद्धतीला भारतात प्रथम क्रमांक दिला गेला आहे. इंधन समायोजन आकार कोळशाच्या दरावर अवलंबून असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात

मार्मिक गोडसे
Mon, 07/25/2016 - 22:28 नवीन
तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात त्या त्या वाहिनीवर लोडशेडिंग केले जाते.
किती प्रमाणात वीजचोरी झाल्यावर लोडशेडिंग सूरू होते?
इंधन समायोजन आकार कोळशाच्या दरावर अवलंबून असतो.
ह्यात पारदर्शकता असते काय? वीजबिलात स्थिर आकार कशासाठी आकारला जातो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

किती प्रमाणात वीजचोरी

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 10:42 नवीन
किती प्रमाणात वीजचोरी झाल्यावर लोडशेडिंग सूरू होते?
किती प्रमाणात असे नाही. जेव्हा सिस्टीम शॉर्टफॉल येतो तेव्हा सर्वात जास्त गळती असलेल्या वाहिन्या प्रथम बंद केल्या जातात. त्यांनतर शॉर्टफॉल वाढेल तसतसे त्याहून कमी गळतीवाल्या वाहिन्या क्रमक्रमाने बंद केल्या जातात. इंधन समायोजन आकाराबाबत रोजचे अपडेट्स महावितरण किंवा महानिर्मितीच्या साईटसवर मिळतात. आपल्या घरापर्यंत वीज वाहन करण्याकरिता जे नेटवर्क उभे करावे लागते, त्याकरिता आणि त्याच्या देखभालीकरिता स्थिर आकार आकाराला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात

स्रुजा
Tue, 07/26/2016 - 08:22 नवीन
तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात त्या त्या वाहिनीवर लोडशेडिंग केले जाते.
म्हणजे माझ्या आजुबाजुला कुणी वीज चोरत असेल तर आमच्या लायनीचं जास्त शेडिंग करणार? च्यामारी ! याला काय अर्थ आहे? बादवे, तुझे लेख वाचुन माझी लाईन चुकली का काय वाटायला लागलंय. सॉफ्टवेअर मध्ये असलं थ्रिलिंग का ही ही नसतं ! नेहमीसारखाच खुसखुशीत लेख :) पुढचा भाग लवकर टाका हो लाईट वाल्या बाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

म्हणजे माझ्या आजुबाजुला कुणी

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 10:49 नवीन
म्हणजे माझ्या आजुबाजुला कुणी वीज चोरत असेल तर आमच्या लायनीचं जास्त शेडिंग करणार?
होssय ! असंच आहे. :) ते अशासाठी की लोकांनीच वीज-चोरीला पायबंद घालावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

केवळ ग्राहकांना शिक्षा नको

१.५ शहाणा
Wed, 07/27/2016 - 21:23 नवीन
ज्या वाहिनीवर गळती जास्त आहे , त्या उपविभागातील सर्व कर्मचारीनच्या पगारातून गळतीमुळे होणार्या नुकसानीचा काही भाग वसूल केला पाहिजे. कारण त्यांचाही अप्रत्यक्ष आशीर्वाद असतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

काय एकेक लोक तरी!

पैसा
Mon, 07/25/2016 - 16:08 नवीन
चिंधीचोर हे! आकडे टाकून मोठमोठ्या चोर्‍या पण करतात ना काहीलोक!
  • Log in or register to post comments

आकडे

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 10:50 नवीन
हा एक स्वतंत्र आणि मोठ्ठा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्याला कतियाबाजी असा लय भारी शब्द आहे.

बोका-ए-आझम
Sat, 07/30/2016 - 18:52 नवीन
हे प्रकार उत्तर प्रदेशात/ बिहारमध्ये सर्रास चालतात. मोरादाबादला एका मित्राने आपल्या दुस-या स्थानिक मित्राची ओळख अशीच करुन दिल्यावर मला पहिल्यांदा समजलंच नव्हतं. मला तो रीतसर वायरमन वाटला होता. पण त्याचा एकंदरीत थाट पाहिल्यावर समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

भारी किस्से. पुभाप्र.

एस
Mon, 07/25/2016 - 16:10 नवीन
भारी किस्से. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

खरं गरिब लोक इमानदारीने येईल

प्रमोद देर्देकर
Mon, 07/25/2016 - 16:12 नवीन
खरं गरिब लोक इमानदारीने येईल ते बील भरतात पण हे श्रीमंत लोकच आकडा टाकुन लाईट घे कधी, मीटर मध्ये गडबड कर असे प्रकार सर्रास करतात. खरं तर वीज चोरीची खबर जो वीजमंडळाला देईल त्याला बीलाची १० रक्कम बक्षिस दिली जाईल असा नियम आहे पण या बड्या धेंड्याविरुध्द तक्रार कोण करणार. शिवाय मंडळाचे लोकही सामिल असतात म्हणजे झालंच आपलाच जीव धोक्यात.
  • Log in or register to post comments

खरं तर वीज चोरीची खबर जो

मार्मिक गोडसे
Mon, 07/25/2016 - 16:29 नवीन
खरं तर वीज चोरीची खबर जो वीजमंडळाला देईल त्याला बीलाची १० रक्कम बक्षिस दिली जाईल असा नियम आहे
खरंच हे माहीत नव्हतं, शाळेत असताना अशी छेडछाड केलेली अनेक मिटर मला माहीत होती, पॉकेटमनी नक्कीच सुटला असता. मिटरच्या काचेच्या फटीतून मोटर वाईंडींगचा पेपर सरकवून मिटरच्या फिरणार्‍या चाकाला अडथळा येऊन ते फिरायचे थांबायचे. रिडींगच् तारखेच्या ५-६ दिवस अगोदर तो कागद काढून टाकला की पुन्हा मिटर चालू. असे प्रकार करणारे मला माहीत होते.
  • Log in or register to post comments

बरोबर

अमितदादा
Mon, 07/25/2016 - 16:58 नवीन
आमच्या गावी एक्स-रे शिट चा तुकडा वापरायचे मीटर च्या व्हील ला थांबविण्यासाठी. परंतु आता सगळे मीटर घराबाहेर काढलेत तसेच सगळे मीटर नवीन आहेत म्हणून चोरीचे प्रमाण कमी झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

लिहीण्याची स्टाईल लै भारी.

मितभाषी
Mon, 07/25/2016 - 16:35 नवीन
स्नेहांकीता तै दामिणी पथक का. सहकार्य करा विजबील भरा.
  • Log in or register to post comments

दामिनी नाही हो

सस्नेह
Mon, 07/25/2016 - 17:14 नवीन
हे ऑकेजनल चेकिंग. दामिनीला हे लोक दाद देत नाहीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

हाहाहा ते आहेच.

मितभाषी
Mon, 07/25/2016 - 17:52 नवीन
आमच्याकडे आता इलेक्ट्रोमेकॅनिकल आयआरने रिप्लेस होतायत. जे संशयित कंझुमर आहेत त्यांचे जुने मिटर बदल्यावर ते त्यांच्यासमोर सिल करून टेसटींगला पाठवत आहेत. त्यात काही गैर आढळल्यास रिकव्हरी निघू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुमि बि येमेशिबि मदे हाये?

उडन खटोला
Mon, 07/25/2016 - 18:38 नवीन
तुमि बि येमेशिबि मदे हाये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

नाही.

मितभाषी
Mon, 07/25/2016 - 18:44 नवीन
तेवढे नशीब नाही . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

वेगळा विषय !!. भारी किस्से

राजाभाउ
Mon, 07/25/2016 - 17:53 नवीन
वेगळा विषय !!. भारी किस्से आहेत. अजुन येउद्या.
  • Log in or register to post comments

व्वा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 18:47 नवीन
वाचतोय किस्से छानच. पण, माझा एमएस्सीवर लै राग. सालं अंदाजपंचे बील मारत गेले ते रीडींग नेणारे आणि एकदा टोटल ३५ ह्जार रिकव्हरी काढली. :( बरं.... आम्ही इमानदार लोक बील भरतो म्हणून आमच्या मागे लागतात. आणि जिथे सर्रास चोरी होते त्या भागात हिम्मत नाही या पथकांची जाण्याची. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सालं अंदाजपंचे बील मारत गेले

यशोधरा
Tue, 07/26/2016 - 07:43 नवीन
सालं अंदाजपंचे बील मारत गेले ते रीडींग नेणारे
असाच अनुभव आहे. :( बरे ऑफिसात जाऊन तक्रार करावी तर कोणी हजर नसते ऑफिसात वेळेवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 10:53 नवीन
यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ‍ॅप डालो करून कम्प्लेंटस, चुकीचे रीडिंग, हे सगळे ऑनलाईन करता येते. http://www.mahadiscom.in/mobile_app/msedcl_mobile_app.php
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद. ऍप डाउनलोडवले आहे.

एस
Tue, 07/26/2016 - 12:25 नवीन
धन्यवाद. ऍप डाउनलोडवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद. अ‍ॅप डाऊनलोड करते

स्रुजा
Tue, 07/26/2016 - 18:28 नवीन
धन्यवाद. अ‍ॅप डाऊनलोड करते. बिल भरता येत असेल यातुन अशी आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लगेच करते स्नेहाताई, धन्यवाद

यशोधरा
Tue, 07/26/2016 - 19:24 नवीन
लगेच करते स्नेहाताई, धन्यवाद गं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

. पण चेकिंगला गेले की

मितभाषी
Mon, 07/25/2016 - 19:48 नवीन
. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे
=)))) मिटररिडिंग ऐवजी कुत्राचा फोटो छापल्याचे एक बिल मध्यंतरी पाहीले .
  • Log in or register to post comments

सापडला. =))

मितभाषी
Tue, 07/26/2016 - 05:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

=))

संदीप डांगे
Tue, 07/26/2016 - 18:54 नवीन
=)) आमच्या बिलावर एकदा बंद फाटकाचा फोटो आला होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

भारी किस्से आहेत एकेक.

प्रचेतस
Mon, 07/25/2016 - 21:39 नवीन
भारी किस्से आहेत एकेक.
  • Log in or register to post comments

अ‍ॅलिस्टर मक्लिनच्या " पॉवर

जयन्त बा शिम्पि
Mon, 07/25/2016 - 22:50 नवीन
अ‍ॅलिस्टर मक्लिनच्या " पॉवर लोड " कादंबरीत एक ठिकाणी असा प्रसंग लिहिला आहे . नायिका बाहेर गावाहून घरी परत येते . तिच्या घरी वीज पुरवठा बंद आहे हे तिला माहीत असते. म्हणुन घरी येण्यापुर्वी, ती वीज कंपनीच्या कार्यालयातुन १० युनिट चे कार्ड खरेदी करते आणि घरात शिरण्यापूर्वी, एका यंत्रामध्ये ते कार्ड सरकवते. घरातील दिवे व पंखे सुरु होतात. १० युनिट एव्हढी वीज वापरून झाली की वीज आपोआप बंद . मोबाइलच्या रीचार्ज सारखी पद्धत. बॅलन्स आहे तर बोला ,नाहीतर ' बोंबलत बसा " हा फंडा वीज मंडळाने वापरण्यास काय हरकत आहे ? बनावट कार्डे तयार करण्याची शक्यता आहे , पण त्यावरही काहीतरी तोडगा निघेलच की.
  • Log in or register to post comments

रिलायन्स चे प्रिपेड मिटर चालू

मितभाषी
Mon, 07/25/2016 - 23:00 नवीन
रिलायन्स चे प्रिपेड मिटर चालू आहेत मोठ्या शहरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा