✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 12/24/2015 - 20:17  ·  लेख
लेख
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत पृथ्वीचा जन्म साडेचार अ-ब्ज वर्षांपूर्वी झाला. या नुकत्याच जन्मलेल्या ग्रहाचे रूपडे गोंडस गोजिरवाणे बिलकुल नव्हते. प्रचंड उष्णता, सतत होणारे ज्वालामुखीचे स्फोट, अजूनही जवळपास द्रव असलेल्या 'जमिनी'तून बाहेर पडणारे उष्ण वायू आणि वाफा यामुळे सजीव तग धरू शकतील अशी शक्यताच नव्हती. पहिल्या शंभरेक कोटी वर्षांमध्ये वरचे थर थंड होऊन घट्ट व्हायला लागले. वाफेचे बाष्पीभवन होऊन समुद्र तयार व्हायला लागले. त्याच काळात पृथ्वीचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र तयार झाल्याने वातावरणाचे शक्तीमान सौरवाऱ्यांपासून रक्षण झाले. प्लेट टेक्टॉनिक्समुळे लाव्हावर तरंगणारी जमीन एकत्र गोळा झाली, खंडांमध्ये तुटली, पुन्हा गोळा झाली. हे चित्र डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला मान्य करावे लागते की सजीव त्यानंतरच उद्भवले असणार. पण कसे? कोणीतरी अचानक नोहाच्या नौकेत प्रत्येक प्राण्याची जोडी भरून पृथ्वीवर आणून सोडली का? तसे झाले असले तरी त्या प्राण्यांचा जन्म कसा झाला हा प्रश्न सुटत नाहीच. कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या लाव्हांमध्ये सापडणारे जीवाष्म पाहिले तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळे प्राणी राहात होते हे दिसून आलेले आहे. तेव्हा प्रश्न असा येतो की आपल्याला एक काळ निश्चित माहीत आहे, जेव्हा पृथ्वीवर जीव नव्हते. आणि आता तर जागोजागी सजीव सृष्टीच्या खुणा दिसतात. त्यावरून एक उघड आहे की पृथ्वीवरच्या भौतिक पदार्थांतूनच जीवसृष्टी निर्माण झाली. पण कशी? प्राणी उत्क्रांत होतात, बदलतात, परिस्थितीशी मिळतेजुळते घेणारे टिकून राहातात हे आपल्याला पटते. पण परत प्रश्न येतो 'समजा घटकाभर मान्य केले की अगदी साध्या एकपेशीय जीवांपासून सुधारणा होत, बदल होत आजचे प्राणी आपल्याला दिसतात. पण हा पहिला एकपेशीय प्राणी कसा तयार झाला?' हे समजून घेण्यासाठी आपल्याला 'पहिला प्राणी' म्हणजे काय हे तपासून पाहावे लागेल. गेल्या लेखात आपण पाहिले की सजीव आणि निर्जीव यांच्यात काळा-पांढरा फरक नाही. किंबहुना सजीवांची व्याख्या करायची झाली तर 'जे पुनरुत्पादन करून आपल्यासारखेच इतर निर्माण करतात ते सजीव' हीच व्याख्या सर्व सजीवांना लागू पडते. त्यामुळे रेणूंपासून सजीव कसे बनले हे पाहाण्यासाठी पुनरुत्पादनाची पद्धत अगदी साध्या रेणूंमध्ये कशी आली आणि त्यातून बदल होत होत त्यांना पेशींचे स्वरूप कसे प्राप्त झाले हे पाहावे लागेल. त्यासाठी 'पहिला सजीव' ही संकल्पना आपल्याला बाजूला ठेवावी लागेल. कारण उत्क्रांती ही क्रांती नाही. एका झटक्यात, एका उडीत कुठच्यातरी रेणूपासून पेशीपर्यंत पोचलो किंवा निर्जीवांपासून सजीवांपर्यंत पोचलो असे होत नाही. हा प्रवास टप्प्याटप्प्यांनी होतो. आणि यातल्याच कुठच्यातरी टप्प्याला म्हणावे लागते की हे, यापुढचे जे आहेत त्यांना आपण सजीव म्हणू, याआधीच्यांना निर्जीव म्हणू. ही रेषा कुठे काढू हे सुनिश्चित नाही, त्यासाठी काही विशिष्ट निकष नाहीत. निव्वळ सोयीसाठी ती कुठेतरी आखावी लागते. उदाहरणार्थ, दारिद्र्यरेषा आखताना असेच काही निकष तयार करून लावावे लागतात. त्या रेषेच्या अलिकडचे गरीब आणि पलिकडचे श्रीमंत नसतात. तसंच काहीसे सजीवतेचे आणि निर्जीवतेचे असते. जेव्हा या प्रक्रियेला सुरूवात झाली तेव्हा आपल्यापैकी कोणीच तिथे नव्हते. किंबहुना त्याकाळची स्थिती इतकी उत्पाताची होती की तेव्हाचे पुरावेही हाती लागणे मुष्कील ठरते. पण आपल्यासाठी नक्की काय झाले, यापेक्षा कुठच्या मार्गांनी रेणूंपासून पेशींपर्यंतचा प्रवास होऊ शकेल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही कथा आहे ती एका संभाव्य प्रवासाची. त्याकाळचे वातावरण ज्वलंत, अस्थिर होते. ज्वालामुखीचे स्फोट, पृथ्वीचे तापमान, कोसळणाऱ्या विजा यामुळे मुबलक ऊर्जा होती. अनेक रासायनिक अभिक्रिया होत होत्या. अनेक नवीन रेणू बनत होते, तुटत होते. परस्परांशी प्रक्रिया करत होते. आणि उर्जा मुबलक असल्या मुळे नवीन अधिकाधिक क्लिष्ट रेणू आपली हजेरी लावत होते. पण "मी इथे होतो" असे लिहिण्याची कोणताच शक्ती नव्हती. कारण चिरंतन स्थैर्य कोणालाच नव्हते. "अणू असशी अणूंत मिळशी" हा न्याय सर्वच रेणूंना लागू होता. पण या सर्व कोट्यावधी वर्षे चाललेल्या उलाढालीत एक नवीन प्रकारचा रेणू बनला. तो सर्वात मोठा नव्हता की सर्वात क्लिष्टही नव्हता. पण त्यात एक विशेष गुण होता. तो म्हणजे स्वत:च्या प्रती निर्माण करण्याचा. या गुणामुळे त्याला आपण स्वजनक म्हणू. स्वजननात खरे तर तितके आश्चर्यकारक काही नाही. अगदी साध्या पद्धतीचे स्वजनन आपण मिठासारख्या साध्यासुध्या पदार्थातही पाहातो. संपृक्त द्रावणाला उष्णता दिली की कुठच्यातरी एका कणाभोवती सोडियम आणि क्लोराइडचे आयन गोळा होतात आणि मिठाचा स्फटिक मोठा होतो. त्या एकाच रेणूच्या प्रती असतात. एकत्र चिकटलेल्या असतात इतकंच. आता तुम्ही म्हणाल की असलेलाच मीठ पुन्हा बनते व विरघळत. नवीन मीठ होत नाही. पण सजीव सृष्टीचे एरवी काय होते? असलेलेच जीव पुन्हा मातीत मिळून पुन्हा त्या मातीतून जन्म घेतात. मिठाच्या बाबतीत ही फारच सोपी प्रक्रिया आहे. पण पुनरुत्पादनाची सुरुवात ही अशाच सामान्य पातळीवर झाली. हा स्वजनक रेणू मात्र मिठापेक्षा थोडा क्लिष्ट होता. त्याचा गुणधर्म असा की स्वतःच्या घटक अणूंसारखे अणू आकर्षित करून स्वतःची दुसरी प्रत बनवली की ती नवीन प्रत वेगळी होत असे. या प्रक्रियेला जरी प्रचंड वेळ लागत असेल तरीही दुप्पट, चौपट करत संपूर्ण मोकळे घटक अणू-रेणू 'खाऊन' टाकून संपून जातील. आता जरी उष्णतेने, रासायनिक प्रक्रियांनी यातले काही मोडले आणि घटक रेणू मोकळे झाले, तरी इतर स्वजनक त्यांना वापरून नवीन स्वजनक तयार करतील. या स्वजननामुळे एक नवीन प्रकारचे स्थैर्य निर्माण झाले. म्हणजे एक विशिष्ट वस्तु केव्हाही निसर्गाच्या माऱ्याने मोडू शकते, पण तिच्या प्रतिकृतींमधून तो गट शिल्लक राहातो. यातच 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट'चे - 'सर्वात लायक तग धरतात' या तत्त्वाचे मूळ आहे. एक विशिष्ट प्राणी काही वर्षच जगेल, पण ती प्रजाती टिकून राहाते. स्वजनक तयार झाला, मान्य. पण त्यापासून पेशी कशी तयार होईल? त्यासाठी पुनरुत्पादनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचा विचार करावा लागतो. ते म्हणजे प्रतिकृती काढताना अनेक वेगवेगळ्या कारणाने काही चुका किंवा बदल घडतात. कुठचीच प्रतिकृती काढण्याची प्रक्रिया १००% अचूक नसते. म्हणजे समजा आपला स्वजनक अ-ब-क अशा तीन प्रकारच्या रेणूसंचांनी बनलेला असेल, तर कधीकधी त्याची प्रतिकृती अ-ब-ड बनू शकेल. (अ, ब, क, ड हे उदाहरणासाठी घेतलेले आहेत. ते कदाचित कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे मुबलक अणूंचे बनलेले वेगवेगळे रेणू असू शकतात) आता नवीन, चुकून झालेला रेणू एकतर स्वजनक असेल किंवा नसेल. तो जर स्वजनक नसला तर प्रश्नच मिटतो. काळाच्या उदरात तो कधीतरी गडप होतो, त्याच्यासारखे इतर तयार होत नाहीत. पण तो जर स्वजनक असेल तर तो आपल्या प्रतिकृती बनवू लागेल. म्हणजे आता अ-ब-क आणि अ-ब-ड तयार होत राहात आहेत. मूलभूत अणूरेणूंसाठी आता त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. जर काही कारणाने अ-ब-ड तयार व्हायला सोपा किंवा अधिक काळ टिकून राहाणारा असेल, तर त्या विश्वात त्या अ-ब-ड ची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि अ-ब-क ची संख्या तुलनेने कमी होत जाईल. एकवेळ अशी येईल की अ-ब-क ची संख्या इतकी कमी होईल, की सगळे अ आणि ब रेणूगट अ-ब-ड मध्येच अडकलेले राहातील. त्यानंतर अ-ब-क नष्ट होऊन जातील, आणि केवळ अ-ब-ड शिल्लक राहातील. या कडे बघताना आपल्याला अ-ब-क आणि अ-ब-ड मध्ये असलेली स्पर्धा म्हणून पाहाता येते. मात्र या दोन्ही रेणूंना ती 'जाणीव' नाही. ते काही अ रेणूगट आपल्यावर येऊन चिकटावा म्हणून युद्ध करत नाहीत. कारण त्यांना तशी इच्छाच नाही. कदाचित अ-ब-ड रेणूत त्यांना आकर्षित करण्याची शक्ती काही रासायनिक कारणांमुळे जास्त असेल. कशामुळे का होईना, त्या लोकसंख्येकडे आपण काळानुरुप बघत गेलो तर अ-ब-क घटताना आणि अ-ब-ड वाढताना दिसतील. ही स्पर्धा आपोआप घडते, आणि त्यात अ-ब-ड विजयी ठरतो. त्या रेणूत असे काही गुणधर्म आहेत ज्यांमुळे टिकून राहाण्यात, स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करण्यात तो अधिक लायक अधिक सरस आहे. तो टिकतो, आणि हाच 'जिंकण्या'चा निकष आहे. प्रत्येक रेणूचे काही रासायनिक गुणधर्म असतात. अनेक रेणू असे असतात की ज्यांमुळे आसपासच्या विशिष्ट रसायनांच्या अभिक्रिया वेगाने होऊन त्यांची जोडणी होते. आणि नवीन रसायन तयार होते. आता पुन्हा आपण काल्पनिक अ-ब-ड आणि नवीन अ-ब-ई प्रकारचे रेणू पाहू. समजा अ-ब-ईचा गुणधर्म असा आहे की त्यामुळे एक नवीन रसायन तयार होते. आणि या रसायनामुळे अ-ब आणि ड मधला बंध मोडून पडतो, पण अ-ब आणि ई मधला बंध तुटत नाही (किंवा अगदी कमी प्रमाणात तुटतो). आता अ-ब-ई काही इच्छा करत नाही, की आपण अ-ब-ड ला तोडू आणि त्यातले अ-ब खाऊन टाकू. पण त्याच्या अस्तित्वामुळे, रासायनिक गुणधर्मामुळे हेच घडते. एका अर्थाने हा पहिलावहिला भक्षक रेणू म्हणता येईल. असा रेणू तयार झाला तर लवकरच त्या भागातले अ-ब-ड संपून जातील आणि फक्त अ-ब-ई शिल्लक राहील. यापुढच्याही पायरीची कल्पना करता येते. म्हणजे अ-ब-फ आणि अ-ब-ग हे एकमेकांना 'खाणारे' रेणू आहेत. मात्र अ-ब-ग मध्ये असे काही रासायनिक गुणधर्म आहेत की त्यामुळे इतर काही प्रतिरोधक रेणू त्याच्या आसपास जमतात. म्हणजे एक प्रकारचे कवच तयार होते. आता अशा कवचामुळे अ-ब-फने टाकलेले 'विष' कमी परिणामकारक होईल. आणि कवच नसलेले रेणू नष्ट होतील. आता जे नवीन तयार होतील ते टिकायचे तर कवच निर्माण करणारे हवे. आणि यापुढे जी स्पर्धा होईल ती कवच 'सुधारण्याची' स्पर्धा होईल. अशा कवचात बंद असलेला स्वजनक म्हणजे पहिल्या पेशी. आता हे पहिलेवहिले स्वजनक कुठे आहेत? माहीत नाही. या कवचांबरोबरच स्वजनकांतही स्पर्धा चालूच होती. सध्याचे स्वजनक पेशीच्या आत, केंद्रकात राहातात. अजूनही ते आपल्या आसपासच्या पदार्थांच्या रासायनिक अभिक्रिया नियंत्रित करून वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करतात. आता या पेशी म्हणजे विशिष्ट उत्पादने तयार करणाऱ्या फॅक्टरी बनल्या आहेत. इतकंच नाही, तर त्या पेशींचे समूह होऊन अवयव बनतात, अवयवांपासून प्राणी बनतो. आणि तो प्राणी अन्न मिळवतो, आपल्या पेशी जास्तीत जास्त काळ टिकवतो, लैंगिक पुनरोत्पादन करून त्या स्वजनकांची निर्मिती नवीन पेशींच्या गोळ्यात करतो. तो आपला पोटचा गोळा म्हणून वाढवतो, आणि हे चक्र चालू राहाते. आपल्याही शरीराच्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात आजचे स्वजनक लपून आहेत. आपले शरीर आणि काही प्रमाणात आपली प्रवृत्ती काय आहे यावर त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते. हे स्वजनक म्हणजे आपले डी. एन. ए. (मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत

  • ‹ विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत
  • Up
  • विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
23590 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

सरळ आहे

विवेक ठाकूर
Mon, 01/04/2016 - 10:30 नवीन
काळ आहे म्हणून भ्रमण आहे असं ते म्हणतायंत. भ्रमणासाठी काल नाही,अवकाशाची आवश्यकता आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

तुम्ही धन्य आहात ! __/\__

sagarpdy
Mon, 01/04/2016 - 11:22 नवीन
तुम्ही धन्य आहात ! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

:)

अर्धवटराव
Mon, 01/04/2016 - 11:13 नवीन
काळ आणि अवकाश एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत ना? राघांनी काहिच नाकारलेलं नाहिए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

काल हा भास आहे आणि

विवेक ठाकूर
Mon, 01/04/2016 - 11:23 नवीन
स्पेस किंवा अवकाश ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तुमच्या लेखी काळाची व्याख्या काय माहित नाहि.

अर्धवटराव
Tue, 01/05/2016 - 00:19 नवीन
काळ म्हणजे अवकाशाची ट्रान्स्फॉर्मेशन प्रॉपर्टी. वर म्हटल्याप्रमाणे स्थिरता आणि स्थित्यंतर एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यात कुठेच भास वगैरे नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

काळ म्हणजे अवकाशाची ट्रान्स्फॉर्मेशन प्रॉपर्टी ?

विवेक ठाकूर
Tue, 01/05/2016 - 10:24 नवीन
जे कदापिही बदलत नाही त्याला अवकाश म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ओके.

अर्धवटराव
Tue, 01/05/2016 - 11:10 नवीन
मला वाटायचं सर्व काहि अवकाशातच, अवकाशानेच, बनतं आणि त्यातच विलय होतं. हि सगळी ट्रान्फॉर्मेशन्स काहितरी वेगळ्याच एलीमेण्टची होत असावी मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

येस !

विवेक ठाकूर
Tue, 01/05/2016 - 13:43 नवीन
मला वाटायचं सर्व काहि अवकाशातच, अवकाशानेच, बनतं आणि त्यातच विलय होतं हे बरोबर आहे पण तरीही अवकाशात कणमात्र फरक पडत नाही हि सगळी ट्रान्फॉर्मेशन्स काहितरी वेगळ्याच एलीमेण्टची होत असावी मग. तेच तर रहस्य आहे ! निराकारातून आकार निर्माण होतो, काही काळ स्थिरावतो आणि त्यातच विलीन होतो आणि तरीही निराकार अलिप्तच राहातो. अर्थात, हे सगळं इथल्या सदस्यांना समजण्याची सुतराम शक्यता नाही. आणि जो सदस्य समजावू शकत होता तो संकेतस्थळानं गमावलायं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

त्याचा पुनर्जन्म झालाय असं

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/05/2016 - 14:36 नवीन
त्या ज्ञानी सदस्याचा पुनर्जन्म झालाय असं ऐकून आहे ;) :) निराकारातून आकार निर्माण होतो, काही काळ स्थिरावतो आणि त्यातच विलीन होतो आणि तरीही निराकार अलिप्तच राहातो. तर मग त्या सर्वव्यापी अलिप्ततेचा अविभाज्य भाग असलेल्या त्या सदस्याला किंवा त्याच्या ड्युआयडीलाच नव्हे तर इतर साकार-सगुण सदस्यांनाही, या जन्मी किंवा पुर्नजन्मी, हे सगळे समजले-नासमजले तरी काय फरक पडतो ?! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

हे सगळे समजले-नासमजले तरी काय फरक पडतो ?

विवेक ठाकूर
Tue, 01/05/2016 - 15:33 नवीन
फरक पडतो किंवा नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असं कसं, असं कसं ? दुसर्‍याला

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/05/2016 - 17:58 नवीन
असं कसं, असं कसं ? दुसर्‍याला काय फरक पडतो किंवा नाही हे ठरवण्याचा हक्क केवळ अध्यात्मातिल अधिकारी व्यक्तीच्याच नावे पेटंट केलेला असतो, नाही का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

चयापचय !!

अर्धवटराव
Wed, 01/06/2016 - 00:58 नवीन
निराकारातून आकार निर्माण होतो, काही काळ स्थिरावतो आणि त्यातच विलीन होतो
म्हणुनच म्हटलं कि काळ हा अवकाशाची ट्रान्सफॉर्मेशन प्रॉपर्टी आहे. तो भास नाहि.
अर्थात, हे सगळं इथल्या सदस्यांना समजण्याची सुतराम शक्यता नाही. आणि जो सदस्य समजावू शकत होता तो संकेतस्थळानं गमावलायं.
असं काहि नाहि. प्रत्येकजण आपापल्यापरिने सत्याला गवसणी घालत असतो. आपल्याशिवाय कोणालाच सत्य समजु शकत नाहि सदस्याला हाच अहंकार 'त्या' ससस्याला नडला. किंबहुना 'त्या'ची एकुण तडफड बघुन सत्य उमगल्याने असं होत असेल तर मरो ते सत्य अशा अशी भावना झाली पब्लीकची. असो. त्याबद्दल आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मरो ते सत्य !

विवेक ठाकूर
Wed, 01/06/2016 - 11:23 नवीन
शाब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

भले शाब्बास !!

अर्धवटराव
Wed, 01/06/2016 - 23:00 नवीन
अपेक्षीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

राजेश लेखमाले बद्द्ल तुझे

प्रकाश घाटपांडे
Sun, 01/03/2016 - 12:30 नवीन
राजेश लेखमाले बद्द्ल तुझे अभिनंदन लेखांना असलले शब्दांचे बंधन काढून टाकले तर याचे एक उत्तम पुस्तक तयार होईल. अगोदरच्या लेखातील अ ते स अक्षरांतर फारच आवडले. आंतरजालावर ही लेखमाला अनेक ठिकाणी अनेकदा येवू देत. काही लोकांसाठी पुनरावृत्ती होईल पण अनेकांसाठी तो नवीन वाचल्याचा आनंद असेल याची मला खात्री वाट्ते.
  • Log in or register to post comments

राजेशजी

मराठी कथालेखक
Mon, 01/04/2016 - 13:18 नवीन
राजेशजी छान लेख आहे, सगळ्या प्रतिक्रिया मी अजून वाचल्या नाहीत. पण माझ्या मनात जो प्रश्न निर्माण झाला तो बहूधा वरील प्रतिक्रियांत कुणी विचारला नसेल असा माझा कयास आहे (तरी प्रश्नाची द्विरुक्ती असल्यास क्षमस्व) माझा प्रश्न : स्वतःच्या प्रती काढू न पाहणारा किंवा काढण्याची अतितीव्र इच्छा नसणारा डी एन ए असू शकेल काय ? हे विचारायचे नेमके कारण म्हणजे ब्रम्हचर्य /अविवाहित राहणे, चाईल्ड फ्री लाईफ स्टाईल म्हणजे (विवाहित किंवा तत्सम नात्यात असूनही) मुलांंना जन्म न देणे ईत्यादी मानसिकतेचे डी एन ए च्या आधाराने विश्लेषण आहे का ? (अर्थात अशा व्यक्तीचा डी एन ए सुध्दा पेशी निर्माण करुन अनेक वर्ष जगतोच पण त्यापलिकडे जावून पुनरुत्पादन करुन आपल्या डी एन ए अजरामर करण्याचा मानस अशा व्यक्तीचा नसतो. )
  • Log in or register to post comments

स्वतःच्या प्रती काढू न

राजेश घासकडवी
Mon, 01/04/2016 - 19:11 नवीन
स्वतःच्या प्रती काढू न पाहणारा किंवा काढण्याची अतितीव्र इच्छा नसणारा डी एन ए असू शकेल काय ?
'डीएनएला इच्छा' नसते, त्या डीएनएपासून घडलेल्या शरीराला, मेंदूला इच्छा असतात/नसतात. पण तुमच्या प्रश्नावरून तुम्हाला तेच म्हणायचं असावं असं दिसतं आहे. अनेक लोकांना मूल जन्माला घालावं अशी इच्छा नसते. मग अशी इच्छा बाळगू शकणारे मेंदू उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण कसे होतील, आणि टिकतील कसे असा प्रश्न आहे. हा खरोखरच उत्तम प्रश्न आहे. सर्वप्रथम, 'मूल होऊ नये अशी इच्छा मनात निर्माण करणारा' असा विशिष्ट जीन नसतो. लहान मुलांविषयी प्रेम वाटणं, असहाय बालकाची काळजी घेण्याची प्रवृत्ती व्हावी, आपलं ज्ञान कोणाला देण्याची इच्छा असणं, संभोग करण्याची तीव्र गरज असणं, विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणं अशा वेगवेगळ्या आंतरिक इच्छा, ऊर्मी या मेंदूमध्ये बऱ्यापैकी हार्डवायर्ड असतात. या सर्वांचा परिपाक म्हणून मूल वाढवण्याची इच्छा होते. मेंदूची क्लिष्टता जशी वाढली आणि समाजाची क्लिष्टता वाढली तशी परस्परविरोधी विचार करण्याची क्षमताही आली. यातून त्यातल्या काही जणांना 'मूल नको, इतर गोष्टी हव्यात' अशी इच्छा होऊ लागली. नेचर आणि नर्चर यांच्या रस्सीखेचीतून यातला काही भाग आला असावा. (म्हणजे नात्यात असूनही मूल होऊ न देण्याचा पर्यायच काही शतकं आधी उपलब्ध नव्हता.) थोडक्यात, मेंदूच्या हायर फंक्शन्स - विचारक्षमता ही उत्क्रांतीतून आली. त्याचा बहुतांश प्रमाणात मनुष्यजातीला, आणि तो मेंदू बाळगणाऱ्या व्यक्तींना जगण्यासाठी आणि आपले जीन्स पुढच्या पिढीत पाठवण्यासाठी फायदाच झाला. त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काहींना मूल न होण्याची इच्छा असते. उत्क्रांतीत 'शुद्ध फायदेशीर गुणधर्मच फक्त जोपासले जातील' असं होत नाही. प्रत्येक फायदेशीर जेनेटिक बदलाबरोबर इतर बाबतीत काही तोटेही निर्माण होतात. जोपर्यंत सर्वसाधारण लोकसंख्येत या हायर फंक्शन्सचे फायदे अधिक आणि तोटे कमी असतील, तोपर्यंत माणसाच्या जीनपूलमध्ये मेंदूची हायर फंक्शन्स असण्याचे जीन शिल्लक राहातील. उदाहरणार्थ जिराफाच्या मानेची लांबी वाढली त्याबरोबर त्याच्या हालचालींवर मर्यादा आली. कारण एवढी मोठी मान आणि त्या मानेच्या तुलनेचे उंच पाय बाळगायचे, तर शरीराचं स्थैर्य कमी होतं. जिराफाला पाणी प्यायला त्रासही होतो. कुठच्याही इंजिनियरींग सिस्टिममध्ये या प्रकारची फायद्या-तोट्यांची देवाणघेवाण असते. जोपर्यंत एका विशिष्ट इव्होल्यूशनरी नीश मध्ये जगण्यासाठी फायदा होतो तोपर्यंत इतर तोटे स्वीकारता येतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मराठी कथालेखक
Tue, 01/05/2016 - 13:29 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सर्वप्रथम, 'मूल होऊ नये अशी इच्छा मनात निर्माण करणारा' असा विशिष्ट जीन नसतो.
नसेल कदाचित, पण आपल्याला मुल व्हावे किंवा अजून प्राथमिक पातळीवर म्हटले तर आपल्या जीन्स पिढ्यान पिढ्या टिकाव्यात अशी इच्छा निर्माण करणारी प्रवृत्ती तर जेनेटिक आहे ना ? आतापर्यंतच्या माझ्या (इतरत्र ) वाचनातून आनंदी राहणे , दु:खी होणे , क्रोधित असणे ई भावना जरी संस्कार, आहार, सभोवतालची परिस्थिती यांमुळे बदलत असल्यातरी या प्रवृत्ती काही अंशी जीन्समुळे प्रभावित असतात असे मला वाटते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा नेहमीच आनंदी राहण्याकडे (वा कमी दु:खी होण्याकडे) कल असू शकतो तर एखादी व्यक्ती नेहमीच काहीशी अधिक उदास वा कमी आनंदी असते तेव्हा त्या प्रवृत्तींवर जीन्सचा प्रभाव असू शकेल असे मला वाटते. आत्महत्या या टोकच्या गोष्टीचा विचार केला तरी संस्कारातून आलेली मानसिकता, तत्कालिक कारणे या पलीकडे मला वाटते की काही जीन्स आत्महत्येची प्रवृत्ती नियंत्रित करत असू शकतील (असे काहीसे मी वाचल्याचे स्मरते). तुलनेने आत्महत्या ही फार तात्कालिक गोष्ट आहे आणि तत्कालिक भावनांचा कल्लोळ त्यास कारणीभूत असू शकतो. परंतू निपुत्रिक राहण्याचा निर्णय हा दीर्घकालीन निर्णय आहे. यात काहीजणांची भूमिका फक्त पालकत्वातून येणारी जबाबदारी नको इतकीच असेलही परंतू मूल होण्याची क्षमता असून दत्तक घेणारे पण लोक आहेत. शारिरिक समस्या नसतानाही हेतुपुर्वक अविवाहित राहणे (इतर प्राण्यात जोडिदार न शोधण्याच्या घटना/उदाहरणे आहेत का हे माहित करणे रंजक ठरेल), लग्नानंतरही मुल जन्मास न घालणे, मुल दत्तक घेणे हे सगळं करणार्‍यात 'मला माझ्या जीन्स दीर्घकालीन जतन करायच्या आहेत' या सहजप्रवृत्तीचा अभाव असेल का ? एक अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय गायिका , देशातील जनतेचे लाडके (अनेक) नेते,एक यशस्वी आणि सन्माननीय उद्योगपती जेव्हा अविवाहित राह्तात , अपत्यांना जन्म देत नाहीत तेव्हा "त्यांना फक्त जबाबदारी नको होती" किंवा "तरुणपणी विशिष्ट अर्थिक/कौटूंबिक परिस्थितीमुळे लग्न करता आले नाही" असे मानणे कठीण आहे, किंवा एखाद्या तत्कालिक कारणात गुंतून (प्रेमभंग ई) 'जीन्स जतन करण्याची ' आसक्तीच त्यांच्या मनातून नाहीशी होण्याइतके ते अपरिपक्व असतील असे मानण्याचे कारण नाही. म्हणजेच 'विशिष्ट जीन्सचा अभाव' असण्याची शक्यता वाढते. तुम्ही म्हणता तसे कदाचित जीन्स मधील बदलाने त्यांना काही खास असामान्य कौशल्ये बहाल केली असण्याची व त्याचवेळी काही आसक्ती त्यांच्यातून हिरावून घेतली असण्याची शक्यता आहे.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं अशी आशा आहे.
खरंतर.. विषय खूपच रोचक आहे. मी म्हणेन 'अभी तो चर्चा शुरु हुई है'... पण तुम्ही या संपुर्ण लेखमालच्या कार्याला भिडलेले असताना तुलनेने कमी महत्वाच्या उपविषयात तुमचा वेळ आणि उर्जा अडकवणे मला योग्य वाटत नाही. तरी पुन्हा कधी याबद्दल काही लिहलेत तर वाचायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हा सर्व विषय रोचक आहे यात

राजेश घासकडवी
Tue, 01/05/2016 - 18:21 नवीन
हा सर्व विषय रोचक आहे यात वादच नाही. माणसाच्या इच्छा या निव्वळ जीन्समुळे येत नाहीत. मेंदूच्या जडणघडणीत जन्मजात क्षमता, धारणा, कल असतात तसंच वाढत्या वयात होणारे संस्कारही कारणीभूत असतात. त्या दोनचे परिणाम अलग करणं कठीण जातं. या विषयावर एखादा लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन. कारण मुलांना जन्म देण्याची, संगोपन करण्याची ऊर्मी हीदेखील सर्वांमध्ये कमी-जास्त असते. स्वतःच्या लैंगिकतेचं भानही कमी-अधिक तीव्र असतं. तुम्ही ज्या प्रकारच्या इच्छांबद्दल लिहिलेलं आहे त्याचं टोकाचं उदाहरण म्हणजे समलैंगिकता. हीदेखील जनुकीय असते. माणसांमध्येच नाही, तर प्राण्यांमध्येही आढळते. ती पुढे जाऊ शकते याचं एक कारण म्हणजे लैंगिक पुनरुत्पादन. समजा समलैंगिकतेचा एक जीन आहे - तर पुनरुत्पादन न केल्यामुळे तो पुढे कसा जाऊ शकतो? असा प्रश्न येतो. त्याचं थोडक्यात उत्तर असं की समलैंगिक नसलेले लोकही तो बाळगून असू शकतात, आणि पुढच्या काही संततीमध्ये तो जाऊ शकतो. मेंडेलच्या फुलांच्या प्रयोगाप्रमाणे. असे जीन टिकून राहाण्याची इतरही कारणं सांगता येतात. किन सिलेक्शन थिअरीनुसार माझ्यात एखादा जीन असेल ज्यायोगे मला स्वतःला जनुकीय तोटा पत्करूनही माझ्या नात्यातल्या अनेकांचा फायदा करून देता येत असेल तर माझ्यातला तो जीन मी मुलं तयार करण्यापेक्षा जनुकीय फायदेशीर पद्धतीने इतरांद्वारे पुढे नेऊ शकतो. जर 'मुलं होऊ न देण्याची इच्छा' निर्माण करणारा एक जीन आहे असं सोयीसाठी धरलं तरी त्याचा जर माझ्या भावा-पुतण्यांना प्रचंड फायदा होत असेल तर तो जीन त्यांच्यामार्फत पुढे जाईल. किन सिलेक्शन थियरीवर निश्चितच काही ना काही लिहायचं आहे, कारण त्याशिवाय कुठचीच उत्क्रांतीविषयक चर्चा पूर्ण होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

पुस्तके

स्वधर्म
Tue, 01/05/2016 - 12:43 नवीन
राजेशजी, लेख वाचत अाहे. छान विषयावर लेखमाला सुरू केल्याबद्दल अाभार. या मिमित्ताने याच विषयावरील तीन मराठी पुस्तकांची माहीती खालीलप्रमाणे: गोफ जन्मांतरीचा - डॉ. सुलभा ब्रम्हनाळकर क्लिष्ट विषय अत्यंत रंजकतेने उलगडून सांगणारे सुंदर पुस्तक. अनेक विषयांना जे ‘देवबाप्पाचं कुलुप’ लागलंय, ते विज्ञानाच्या किल्लीने (पूर्ण नाहीतरी) उघश्डण्याचा प्रयत्न. अापण जे करतो, त्याला अनेकदा अापली गुणसूत्रंच कशी कारण असतात, हे लख्खपणे समोर अाणणारं. कहाणी मानव प्राण्याची - नंदा खरे या पुस्तकाचा अावाका, उत्क्रांतीपुरता मर्यादित नसून पुरातत्व शास्त्र, जीवशास्त्र, जनुकशास्त्र, अौद्योगिक क्रांती, संस्कृती इ. अनेक परिमाणांमधून मानव व समाज कसकसे बदलत गेले याचा रोचक आढावा. यातील पहिल्या भागात उत्क्रांतीविषयी सुंदर पण थोडक्यात माहिती सांगितली अाहे. वारूळपुराण - नंदा खरे यांचा अनुवाद व माधव गाडगीळ यांची सविस्तर प्रस्तावना मुंग्यांच्या वारूळातील क्रियाकलापांच्या अाधारे उत्क्रांती समजावून सांगण्याचा प्रयत्न. अजून एक नविन पुस्तक मराठीत अाले अाहे, परंतु मी अजून वाचले नाही, त्यामुळे फारशी माहीती नाही. ते म्हणजे ‘जनांसाठी जेनेटिक्स’.
  • Log in or register to post comments

सुरेख लेखमाला ........

सुधीर कांदळकर
Tue, 01/05/2016 - 19:36 नवीन
सुरुवातीच्या काही लेखात अध्यात्मसदृश सुरुवात असल्यामुळे लेख अध्यात्मविषयक आहे असे समजून वाचले नव्हते. या लेखाचे शीर्षक स्पष्ट असल्यामुळे वाचला आणि मागील सगळे लेख वाचले. साधीसोपी पण ओघवती भाषा आणि बहुतांशी अचूक शब्दयोजना यामुळे लेखमाला वाचनीय झालेली आहे. मागील काही लेखातील ऋग्वेदातील वगैरे अवतरणे मला व्यक्तिश: आवडली नाहीत. त्यांचे प्रयोजनही समजले नाही. आपल्याला अध्यात्माचा विज्ञानाशी संबंध वगैरे जोडायचा आहे असा माझा समज झाला होता. विज्ञान मानवाच्या आणि निसर्गाच्या कल्याणासाठी असावे एवढे तत्व पुरेसे आहे. अर्थात काय लिहायचे हे लेखनस्वातंत्र्य आपल्याकडे आहेच. आक्षेपांना संयत भाषेत दिलेली उत्तरे आवडली. पु भा प्र
  • Log in or register to post comments

धन्यवाद. पहिले काही भाग

राजेश घासकडवी
Tue, 01/05/2016 - 20:03 नवीन
धन्यवाद. पहिले काही भाग प्रस्तावनात्मक असल्यामुळे मुक्त, लालित्यपूर्ण रूपकांचा वापर केलेला होता. ऋग्वेदाची ऋचादेखील उत्कृष्ट दर्जाचं काव्य म्हणून वापरली होती. अध्यात्माचा विज्ञानाशी संंबंध लावण्याचा वगैरे बिलकुल हेतू नाही. 'आहे हे असं आहे' असं सांगण्याचाच प्रयत्न आहे. मला वाटतं अशी भाषा आपण आध्यात्मिकतेशीच संलग्न केलेली आहे. विज्ञानाविषयी बोलायचं म्हणजे ते 'एक्स्ट्रा ड्राय मार्टिनी'प्रमाणे कोरडं ठणठणीत असाव अशी अपेक्षा असते. असो, तुमचा मुद्दा ध्यानात आलेला आहे. मला खात्री आहे की पुढच्या लेखांमध्ये जास्त थेटपणा आढळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा