आवरताना काल मिळाल्या काही कविता...

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
29 Oct 2008 - 6:16 pm

आवरताना काल मिळाल्या काही कविता
लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता

लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर
जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता

तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी
आले नाही कधीच पण ते मज गोठवता

दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे
गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता

अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित
वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता

कधी एकटा असलो की मी रडून घेतो
सवयीने मग येते आता हुकुमी हसता

खूप ठरवले सारे सारे विसरायाचे
कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?

-अनिरुद्ध अभ्यंकर

गझल

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

29 Oct 2008 - 6:30 pm | छोटा डॉन

आज पुन्हा एकदा चतुरस्त्र प्रतिभा भरभरुन वाहिली आहे ... :)

लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर
जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता

तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी
आले नाही कधीच पण ते मज गोठवता

वाह, क्या बात है !!!
अगदी "ह्रॄदयाच्या नाजुक व हळव्या भागातुन" म्हणतात ते ...

खूप ठरवले सारे सारे विसरायाचे
कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?

खल्लास !!!
एकदम टची कविता ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शाल्मली's picture

29 Oct 2008 - 6:38 pm | शाल्मली

मस्त कविता. आवडली.

अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित
वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता

कधी एकटा असलो की मी रडून घेतो
सवयीने मग येते आता हुकुमी हसता

ह्या ओळी मस्तच..
--शाल्मली.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Oct 2008 - 6:44 pm | बिपिन कार्यकर्ते

खूपच छान.

तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी
आले नाही कधीच पण ते मज गोठवता

हा क्षण गोठवण्याचा वेडेपणा तरी थांबत नाही.

बिपिन कार्यकर्ते

रामदास's picture

29 Oct 2008 - 7:05 pm | रामदास

मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली होती. सुंदर कविता आहे.आवडली.रेग्यांच्या कवितेची आठवण झाली.आठवणीच्या भरवशावर चार ओळी लिहीतो आहे
कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?

पहीले प्रेम कळत नाही
कळून ते टळेल का
पहीले मर टळत नाही
टळून तेही कळेल का?
कळो टलो मरो उरो
पहीला लाभ शून्याचा
माझ्या लेखी एकच एक
मरण तेच प्रेम तेच.

नारायणी's picture

29 Oct 2008 - 8:44 pm | नारायणी

सुरेख कविता.

आजानुकर्ण's picture

29 Oct 2008 - 8:55 pm | आजानुकर्ण

फारच सुरेख कविता आहे. किती तरी वेळा वाचून झाली पण समाधान झाले नाही.

आपला,
(चाहता) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

30 Oct 2008 - 12:20 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चतुरंग's picture

29 Oct 2008 - 8:55 pm | चतुरंग

अतिशय हळवी आणि भावगर्भ आहे.

दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे
गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता

अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित
वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता

कधी एकटा असलो की मी रडून घेतो
सवयीने मग येते आता हुकुमी हसता

कमाल आहेत ह्या ओळी!
(कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:57 am | विसोबा खेचर

(कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!)

अच्छा, म्हणजे तिथे लगेच प्रसिद्ध झाली नाही म्हणून मग इथे प्रतिक्रिया लिहिलीत होय? बरं बरं! :)

चतुरंग's picture

30 Oct 2008 - 1:06 am | चतुरंग

तात्या,
तुला सगळीकडे वाकडंच कसं दिसतं रे? असो असतो एकेकाचा गुण!

चतुरंग

लिखाळ's picture

29 Oct 2008 - 8:59 pm | लिखाळ

सुंदर कविता--पुन्हा पुन्हा वाचावी अशी..
--लिखाळ.

प्राजु's picture

29 Oct 2008 - 9:15 pm | प्राजु

सुरेखच.. गझल..
प्रत्येक ओळ न् ओळ.. खास.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

29 Oct 2008 - 10:07 pm | सर्वसाक्षी

आज बरेच दिवसानी तुमची गजल वाचली, आवडली.

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:34 am | विसोबा खेचर

आवरताना काल मिळाल्या काही कविता
लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता

ह्या पहिल्या ओळीच अल्टिमेट आहेत..!

जियो..

अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :)

आपला,
(मिपाकर) तात्या.

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..!

असो,

मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..!

(मिपाकर) तात्या.

चन्द्रशेखर गोखले's picture

30 Oct 2008 - 7:31 am | चन्द्रशेखर गोखले

भावमधुर कविता खुप खुप आवडली!

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

31 Oct 2008 - 8:30 am | अनिरुद्ध अभ्यंकर

आमची उष्टी बोरं गोड मानुन प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

सर्किट's picture

31 Oct 2008 - 8:33 am | सर्किट (not verified)

सख्या रे घायाळ मी शबरी !!! (जरी असे जबरी, मनोगताची खबरी, चाक जरी रबरी, गूळ अन खोबरी, मस्जिद मी बाबरी इत्यादि इत्यादि)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)