✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१० वी 'क' - भाग १

क
किसन शिंदे यांनी
Tue, 09/11/2012 - 14:21  ·  लेख
लेख
आज ३० एप्रिल! रिझल्ट्चा दिवस. मनात धाकधूक होतीच पास होईल की नाही याची. याचं कारण म्हणजे वर्षभर अभ्यासापेक्षा जास्त केलेली टवाळकी आणि वार्षिक परीक्षेला कठीण गेलेले बीजगणित आणि भूमिती! बाकीच्या विषयांचा तर तसा बरा अभ्यास केला होता पण आता पास होतो की नाही कोणास ठाऊक? च्यायला!! नापास झालो तर आईच्या हातचा खूप मार खावा लागेल आणि दादा टोमणे मारेल ते वेगळंच. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आठवीतून पास होऊन नववीत आलेल्या मुलांची ती कुत्सित नजर. देवा हनुमंता, वाचव रेऽऽऽ देवा! शीऽऽऽ..ऐला काय घाणेरडे विचार आहेत. जाऊ दे. झटपट नाश्ता उरकून वेळेच्या अर्धा तास आधीच शाळेत पळालो. शाळेच्या फाटकावर माझ्यासारखीच बावरलेल्या आणि गोंधळलेल्या चेहर्‍यांची बरीच गर्दी उभी होती. काहींचे पालक सोबत आले होते, काही एकटेच आले होते. आपण पास झालोय आणि सगळ्या वर्गात आपला पहिला नंबर आलाय अशा थाटात काही स्कॉलर पोरं उगाचंच शायनिंग मारत उभी होती. 'पाल्या' पण आला होताच. पाल्या म्हणजे देवेंद्र पालेकर. माझा जिवश्च कंठश्च मित्र. आठवी आणि नववीच्या वर्षातला माझा बेंचसोबती. पालेकर एक नंबरचा स्कॉलर होता. अभ्यासू किडा. आठवीला असताना पहिल्यांदा आमची ओळख झाली. तेव्हापासूनच आम्ही एकत्र होतो. बापलेकरशी ओळख ही नववीच्या वर्षातली. नववीच्या सुरूवातीच्या दिवसात कधीतरी एक दिवस आमच्या बेचंवरची तिसरी जागा रिकामी होती आणि त्यादिवशी बापलेकर तिथे बसायला आला तो कायमचाच. मी, पालेकर आणि बापलेकर असे तिघेही एकत्रच शाळेत यायचो आणि एकत्रच घरी जायचो. सुरूवातीला अगदीच शामळू वाटणारा बापलेकर नंतर हळू हळू आम्हाला समजू लागला. चेहर्‍यावरून बराच सभ्य दिसणारा बापलेकर प्रत्यक्षात मात्र पक्का बेरकी होता. एके दिवशी इतिहासाच्या तासाला पाटील बाईंचा १८५७ चा राष्ट्रीय उठाव अगदी जोरात सुरू होता. सगळी मुलं शांत चित्ताने ऐकत होती. आमचंही बाईंच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. बापलेकरही बेंचवर कोपर रोवलेला डावा हात कानावर ठेऊन अगदी तन्मयतेने ऐकत होता. मला त्याची सवय माहीत होती म्हणून मला त्याच्या या एकाग्रतेने ऐकण्याचं कौतूक वाटलं, पाल्याला कोपराने ढोसून मी त्याच्याकडे लक्षही वेधलं. पाल्या हसला आणि हळूच माझ्या कानात कुजबूजला "साल्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याने दप्तरात वॉकमन आणलाय आणि त्यात कॅसेट टाकून तो कुछ कुछ होता है ची गाणी ऐकतोय." कानात लावलेला इयरफोन लपवण्यासाठी त्याने डावा हात कानावर ठेवला होता याचा उगडला मला तेव्हा झाला. साला भेंचोत. "बापल्या कुठंय रे?" मी नख कुरतडत त्याला विचारलं. "माहित नाही रे. मी आज सकाळीच गावाहून रिझल्टसाठी आलोय." शाळेचे टोल पडले आणि पळत पळत आम्ही दोघंही वर्गात शिरलो. आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक सुर्यवंशी सर अजून आले नव्हते. वर्गात नुसता गोंधळ चालू होता. प्रत्येकाला आपला काय 'निकाल' लागतो याची उत्सुकता कमी चिंताच जास्त होती. "शूऽऽऽऽ शांत बसा." अतिशय खणखणीत आवाजात बोलत सुर्यवंशी सरांनी वर्गात प्रवेश केला. एका हातात रिझल्टचा गठ्ठा होताच. सगळे एकदम चिडीचूप्प. "मला तुमच्याकडून जशी अपेक्षा होती तसा आपल्या वर्गाचा रिझल्ट लागलाच नाही. काही जण तर काठावर पास झालेत. शाळेत अभ्यासाच्या तासाला लक्ष कुठं असायचं तुमचं?" सरांनी आपल्या 'भाषणाला' सुरूवात केली. आणि मग आणखी पाच मिनिटं लेक्चर झाडून सरांनी एक एक रिझल्ट द्यायला सुरूवात केली. मोरे..पास चव्हाण..पास पवार..पास पालेकर...पास. पालेकरला ९०% पडले होते. सरांनी त्याचं खूप कौतूक केलं डोंगरे..नापास. 'गाढवा, मला वाटलंच होतं तु काय दिवे लावणार ते' सरांनी असं म्हणताच वर्गात एकच हशा पिकला. सगळी पोरं हसली खरी पण लगेच सरसावून बसली, कारण अजून बरेच रिझल्ट यायचे बाकी होते. साळवी...पास पवळे...काठावर पास शेरकर..नापास. मग शेरकरकडे पाहून सरांनी अशी काही मान फिरवली कि बिचार्‍या शेरकरला भयंकर लाजल्यासारखं झालं. बापलेकर काठावर पास झाला होता त्याची आई आली होती रिझल्ट घ्यायला. आयला! सगळ्यांचे रिझल्ट येताहेत, माझा कधी?? एकदम आतुरतेने मी माझ्या 'निकालाची' वाट पाहत होतो. आणि मग सर म्हणाले "बनकर..पास." जसे कानावर हे शब्द पडले मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मन एकदम पिसासारखं हलकं हलकं झालं. सरांनी सांगितलेल्या नंतरच्या रिझल्टकडे आम्ही लक्षच दिलं नाही. आमच्या लगेच गप्पा सुरू झाल्या. सगळ्यांचे रिझल्ट वाटून झाले आणि पुढे येणार्‍या दहावीच्या वर्षासाठी शुभेच्छा देऊन सर निघून गेले. जाताना 'चांगला अभ्यास करा रे' असं सांगायलाही ते विसरले नाहीत. सगळ्यांना तुकड्या विभागून दिल्या. काही जण 'अ' तुकडीत गेले, काही जण 'ब' तुकडीत गेले. सुदैवाने आम्हा तिघांनाही १०वी 'क'च्या तुकडीत जागा मिळाली होती. जे पास झाले होते त्यांचा नुसता दंगा सुरू होता आणि जे नापास झाले होते कडूलिंबांच्या पाल्याचा रस प्यायल्यासारखा चेहरा करून बसले होते. पास झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आम्ही वडापावची पार्टी करायचं ठरवलं. मग मी, पालेकर, पवळे, सामंत, अहिरे असे सगळे आनंदाच्या भरात उड्या मारतच रस्त्यापलीकडील वडापावच्या गाडीवर पोहचलो. "मी तर चाटे क्लासला अ‍ॅडमिशन घेणारे. माझे गणित, विज्ञान आणि इतिहास थोडेसे कच्चेच आहेत." बटार्‍या डोळ्याचा पवळे म्हणाला. "थोडेऽऽऽऽ..साल्या काठावर पास झालायंस या विषयात आणि म्हणे थोडेसे कच्चेच आहेत" एकाच वेळी किंचाळत आणि पवळ्याची नक्कल करत सामंत बोलला. आम्ही सगळे खदाखदा हसलो. 'मी अजून कुठे अ‍ॅडमिशन घेतली नाही पण मी कर्नावट क्लास लावणार आहे' पाल्या सुमडीत माझ्या कानात बोलला. मी फक्त तोंडाने ह्म्म केलं आणि त्याला एक डोळा मारत हसलो. १४ जुनला सगळ्यांनी नक्की शाळेत यायचं असं म्हणत आम्ही ऐकमेकांचे निरोप घेतले. घरी जाताना आईची थोडीशी गम्मत करायचं मी मनात ठरवलं. नापास झाल्यासारखा रडवा चेहरा करू घरात शिरायचं आणि तिला घाबरवायचं असं ठरवलं. त्याचबरोबर मला दादा काय म्हणतोय हे ही पाहायचं होतं. त्याप्रमाणे अगदी रडवेला चेहरा करून घरात पाऊल टाकलं. बॅट हातात घेऊन कुठंतरी क्रिकेट खेळायला निघालेले बंधुराजही मला पाहताच दारात थबकले. "काळ्या नापास झालास ना?" माझा असा चेहरा पाहून त्याने लगेच विचारलं. तोपर्यंत इकडे आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिला वाटलं मी नापास झालोय म्हणून असा चेहरा केलाय. "शेंडेफळ ना. तुम्ही लोकांनीच त्याला जास्त लाडावून ठेवलंय." त्यात दुसरीकडून दाद्याही यथाशक्ती तिचे कान फुंकतच होता. एवढा वेळ तोंडाने बडबड करत असलेल्या आईने मग कोपर्‍यातली काठी उचलत माझ्याकडे मोर्चा वळवला. आता मात्र टरकलो, म्हटलं काठीचा पहिला तडाखा बसण्याआधीच सांगून टाकावं म्हणून मग हातातला रिझल्ट वर उंचावत मी मोठ्ठ्याने ओरडलो, "मी पास झालोयऽऽऽऽ" "उगाच आगाऊपणा का करतोस मेल्या." रागाने थरथरत असलेल्या आईने तरीही माझ्या पाठीत एक जोरदार धपाटा मारला. मला आता मार बसणार नाहीये हे कळताच "हॅ...नाटक्या कुठचा." असं तोंड वेंगाडून म्हणत दादाने बॅट खांद्यावर टाकत घरातून पलायन केलं. तो दिवस खूप कौड-कौतुकात गेला. दहावीचं वर्ष सुरू होण्याआधी महिनाभर आराम मिळावा म्हणून दुसर्‍या दिवशी बॅग भरून आम्ही गावी निघालो. क्रमशः
  • १० वी 'क' - भाग २
  • १० वी 'क' - भाग ३
  • १० वी 'क' - भाग ४
  • १० वी 'क' - भाग ५

Book traversal links for १० वी 'क' - भाग १

  • १० वी 'क' - भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
26522 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

आयला

इरसाल
Tue, 09/11/2012 - 14:27 नवीन
भारी लिहीलेय. थोड्याफार फरकाने हेच अनुभवलेय पण पालेकरच्या जागेवरुन.
  • Log in or register to post comments

एकदम आतुरतेने मी माझ्या

पियुशा
Wed, 09/12/2012 - 15:00 नवीन
एकदम आतुरतेने मी माझ्या 'निकालाची' वाट पाहत होतो. आणि मग सर म्हणाले "बनकर..पास." जसे कानावर हे शब्द पडले मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मन एकदम पिसासारखं हलकं हलकं झालं. हा किस्सा तुमचा स्वतःचा आहे का हो किसन ? असल्यास तुमचे आडनाव शिंदे आहे ना ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

..

गवि
Wed, 09/12/2012 - 15:14 नवीन
कट्ट्यांना येत चला.. खरी नावे माहीत होतात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

गविंना अनुमोदन.. आणि पियुषा

किसन शिंदे
Wed, 09/12/2012 - 15:24 नवीन
गविंना अनुमोदन.. आणि पियुषा बै, मी वर कुठे लिहलंय हा माझा अनूभव आहे ते? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो किसन दादा म्हनून तर आधी

पियुशा
Wed, 09/12/2012 - 15:27 नवीन
अहो किसन दादा म्हनून तर आधी विचारले ना हा किस्सा तुमचा आहे का म्हणुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

दादा

इरसाल
Wed, 09/12/2012 - 16:05 नवीन
दादा :O अरे किस्ना बाबा आहेस ना रे की......................... क्षेपणास्त्र डायवर्ट होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

(No subject)

किसन शिंदे
Wed, 09/12/2012 - 16:21 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

वाह.... अगदी स्वतःचा अनुभव

सुहास झेले
Tue, 09/11/2012 - 14:31 नवीन
वाह.... अगदी स्वतःचा अनुभव वाचतोय की काय असं वाटलं... शाळेबद्दल वाचताना खूप छान वाटतं :) पुढचा भाग लवकर येऊ देत :) :)
  • Log in or register to post comments

प्रतिसादकांनो, चला गावाला

अन्या दातार
Tue, 09/11/2012 - 14:32 नवीन
प्रतिसादकांनो, चला गावाला ;)
  • Log in or register to post comments

वा किसन द्येवा लिखाण फक्कड

स्पा
Tue, 09/11/2012 - 14:33 नवीन
वा किसन द्येवा लिखाण फक्कड जमलेय . पु. भा . प्र .
  • Log in or register to post comments

फर्मास अन प्रांजळ

सस्नेह
Tue, 09/11/2012 - 14:46 नवीन
फर्मास अन प्रांजळ लिखाण. प्.भा. प्र.
  • Log in or register to post comments

शाळा एकदम!!! जिंकलात

बॅटमॅन
Tue, 09/11/2012 - 14:48 नवीन
शाळा एकदम!!! जिंकलात किसनमहाराज :)
  • Log in or register to post comments

किसनदेवा, नववीच्या रिझल्टच्या

पिंगू
Tue, 09/11/2012 - 14:51 नवीन
किसनदेवा, नववीच्या रिझल्टच्या दिवसाची सहल घडवून आणलीत..
  • Log in or register to post comments

+ १ खरोखर रिझल्टच्या दिवशीची

हरिप्रिया_
Tue, 09/11/2012 - 15:07 नवीन
+ १ खरोखर रिझल्टच्या दिवशीची धाकधूक आठवली..
  • Log in or register to post comments

मस्त लिवलय हो किसनदेवा

मृत्युन्जय
Tue, 09/11/2012 - 15:22 नवीन
मस्त लिवलय हो किसनदेवा
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Tue, 09/11/2012 - 18:09 नवीन
शाळा खूप आवडली. किसना, खूपच छान झालीय कथा. आणि शेवट क्रमशः बघून बरं वाटलं. फक्त लटकत ठेवू नको!
  • Log in or register to post comments

शाळा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/11/2012 - 18:15 नवीन
वाचतोय. लवकर येऊ दे पुढचा भाग. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाचतोय.

सूड
Tue, 09/11/2012 - 19:04 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

अभ्या..
Tue, 09/11/2012 - 19:08 नवीन
किसन देवा छानच लिहिले आहे हो. (एला एखादी शिरोडकर नव्हती का? ;-)) लवकर भेटा पुढचा भाग घेऊन.
  • Log in or register to post comments

गडबड गडबड!!!

अन्या दातार
Tue, 09/11/2012 - 20:41 नवीन
एला एखादी शिरोडकर नव्हती का?
कित्ती गडबड करशील? आत्ता कुठे निकाल लागलाय. वर्ग चालू झाला की सगळी पात्रे येतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शाळे ची गोष्ट नववीतच घडते आणि

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/11/2012 - 21:15 नवीन
शाळे ची गोष्ट नववीतच घडते आणि नववीच्या रिझल्ट च्या दिवशी संपते. म्हणून विचारत आहेत हो ते. बाकी किसन असे (म्हणजे ललित लेखन) लिहितो हे माहित नव्हते. लिखाण आवडले. एक-दोन समीक्षकीय टिप्पण्या आहेत, पण त्या खाजगीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

दहावी नावाचं भयाण वर्ष !!

सूड
Tue, 09/11/2012 - 21:41 नवीन
या कथेत कदाचित दहावी नावाच्या भयाण वर्षात काहीतरी घडणार असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आवडेश.

गणपा
Tue, 09/11/2012 - 19:10 नवीन
आवडेश.
  • Log in or register to post comments

वाचतोय

मन१
Tue, 09/11/2012 - 20:24 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments

मस्तच रे द्येवा....!

प्यारे१
Tue, 09/11/2012 - 20:41 नवीन
मस्तच रे द्येवा....!
  • Log in or register to post comments

छान लिहीलय.

शुचि
Tue, 09/11/2012 - 20:44 नवीन
छान लिहीलय.
  • Log in or register to post comments

खि खि खि

अर्धवटराव
Tue, 09/11/2012 - 21:43 नवीन
९ वी 'ब' म्हटलं असतं तर आमचीच कथा वाटली असती... अगदी पास व्हायचे वांधे वगैरे नव्हते, पण आमच्या तिर्थरुपांना आमचे पाळण्यातले पाय न दिसल्यामुळे त्यांनी उगाच अपेक्षांचे ओझे आमच्या टार्गट खांद्यावर टाकण्याचा अपराध केला होता... ते विमान आम्हि दाणकन खाली आपटले :D अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१

आनंद भातखंडे
Wed, 09/12/2012 - 12:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मस्त लिखाण... पुढच्या भागाची

मदनबाण
Tue, 09/11/2012 - 21:55 नवीन
मस्त लिखाण... :) पुढच्या भागाची वाट पाहतो !
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात

प्रचेतस
Tue, 09/11/2012 - 22:35 नवीन
बर्‍याच दिवसांनी किसन शिंदे लिहिते झाले. कथेला छान सुरुवात झालेली आहेच. टंकाळा न करता पुढचे भाग पटापट येऊ द्यात. बाकी ही कथा काल्पनिक की सत्यघटनेवर आधारीत?
  • Log in or register to post comments

मस्तच हो किसनराव! क्रमशः

सोत्रि
Tue, 09/11/2012 - 22:41 नवीन
मस्तच हो किसनराव! क्रमशः वाचून बरे वाटले. पु.भा.प्र. - ( दहावी 'ड' ) सोकाजी
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. शाळेतल्या

शिल्पा ब
Tue, 09/11/2012 - 23:15 नवीन
छान लिहिलंय. शाळेतल्या दिवसांची आठवण आली.
  • Log in or register to post comments

¨¨¨¨शाळेतल्या दिवसांची आठवण

प्यारे१
Fri, 09/14/2012 - 19:50 नवीन
¨¨¨¨शाळेतल्या दिवसांची आठवण आली. शिकवायच्या??????? की शिकायच्या??????? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

जुने दिवस आठवले. नवीन

निनाद मुक्काम …
Tue, 09/11/2012 - 23:49 नवीन
जुने दिवस आठवले. नवीन गुणार्थी वर्णव्यवस्था निर्माण झाली होती. ८० टक्क्यांच्या अलीकडील सवर्ण जे तिन्ही तुकड्यातून मोजून १५ होते आणि उरलेले मागासवर्गीय सवर्ण लोकांचा काय रुबाब त्यांना सर्व खोड्या , गैरहजर राहणे माफ होते. शालांत परीक्षेत एक दिवस वृत्त पत्रात शाळेचे आणि ह्या सवर्णांच्या मधील कोणाचे नाव झळकावे म्हणून शाळेतील सत्ताधारी आणि हे मुठभर ह्यांचा यत्न चालायचा. बाकीचे शाळेत हजेरी बुक भरायला यायचे. कमी मार्क मिळाले म्हणजे देशद्रोह किंवा बाहेर शेण खाऊन आल्याच्या अविर्भावात पालक पाल्यांचा पालापाचोळा करायचे.
  • Log in or register to post comments

मस्त लिखाण...

मोदक
Wed, 09/12/2012 - 00:00 नवीन
मस्त लिखाण... :-)
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात आहे मालक, फक्त

५० फक्त
Wed, 09/12/2012 - 06:05 नवीन
मस्त सुरुवात आहे मालक, फक्त तेवढं वाचायचं वाचवा जरा, संदर्भ लागलाच असेल, आणि खाजगीत का होईना पण सांगाच शिरोडकरताईंबद्दल.
  • Log in or register to post comments

मस्त आठवणी पुलेशु.

अरुण मनोहर
Wed, 09/12/2012 - 07:15 नवीन
मस्त आठवणी पुलेशु.
  • Log in or register to post comments

दैना (दिनी)..

नाखु
Wed, 09/12/2012 - 08:47 नवीन
११ सप्टेंबर २०१२... किसनाचा ले़ख वाचला आणि शाळेची आठवण खपली निघाली ..वैताग साला हे लोक असे कही ल्हितात आणि आम्च्या डोक्याला शॉट्...जाऊदे उगी र्‍हावे .... १२ सप्टेंबर २०१२.. शाळेची आठवण असलेले आपण एकटेच नाही हे पाहून बरं वाटल.( च्यायला आपल्याला का नाही सुचत अस चांगल चुंगल लिहायला... (पुढच्या सहलीला किसनदेवाची शिकवणी लावणे आले)....
  • Log in or register to post comments

किसना.. शाळेत परत घेऊन

गवि
Wed, 09/12/2012 - 10:20 नवीन
किसना.. शाळेत परत घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद रे. उत्तम चाललं आहे. आता दीर्घ फेरफटका मारुन आण..
  • Log in or register to post comments

आवडला

चावटमेला
Wed, 09/12/2012 - 10:52 नवीन
लेख आवडला. सुरुवात छान झालीये. बाकी ते शिरोडकर ताईंचं विसरू नका ;) पुलेशु
  • Log in or register to post comments

सही

मी_आहे_ना
Wed, 09/12/2012 - 12:04 नवीन
किसनदेवा...मस्त. येऊद्या लवकर पुढचा भाग. (नॉस्टॅल्जिक करून मनाचा ठाव घेणार्‍यांमधे तुमचाही समावेश) आम्हीही "१०वी क" वाले, पण आम्हाला ९वी रिझल्ट नंतर लगेच अर्धा दिवस शाळा सुरू केलेली (व्हेकेशन बॅच), त्यामुळे त्या वर्षी सुट्टीत कुठे जाणे नव्हते झाले :(
  • Log in or register to post comments

मस्त.

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/12/2012 - 12:06 नवीन
वाचतोय हो शिंदे सरकार. छान जमले आहे वातावरण.
  • Log in or register to post comments

किसनदेवा...... शाळेत परत

विजय मुठेकर
Wed, 09/12/2012 - 15:58 नवीन
किसनदेवा...... शाळेत परत घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद. आमच्या शाळेत निकाल रोल नंबरनुसार देत. या शाळेत तसे देत नव्हते वाटते................. (खूप वेळाने बनकर निकाल घ्यायला आले म्हणून जरा किडा वळवळला......) बाकी शाळेत परत घेऊन गेल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.......
  • Log in or register to post comments

आंदो... पु.भा.प्र.

वपाडाव
Wed, 09/12/2012 - 16:57 नवीन
आंदो... पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

किस्ना .. लिखान

गणेशा
Wed, 09/12/2012 - 18:43 नवीन
किस्ना .. लिखान आवडले.. स्वताचेच प्रतिबिंब त्यात पाहिले .. मस्त.. ऊरुळी कांचन ची माझी शाळा आठवली ... ९ वी 'ह' आठवला .. अआणि नववी नध्ये पहिल्यांदाच आलेला पहिला नंबर आठवला.. ५ वी मध्ये असताना , पहिला नंबर जेंव्हा यीइल तेंव्हा घड्याळ घेवु असे अश्वासन मिळाले होते ते पुर्ण झाले, दहावी मध्ये असताना त्याच घड्याळा सहित आणि नविन शुज सहित प्रवेश झाला.. वर्गातील सर्व मित्र ही एकाच वर्गात आले .. १० 'ई'. ९ वी - ते १२ वी मधील तुफान गोंधळ घातलेली वर्षे आठवली .. तु असेच मस्त लिहित रहा.. मनापासुन वाचत आहे...
  • Log in or register to post comments

बाब्बो डायरेक्ट 'ह ' तुकडीत.

प्रचेतस
Wed, 09/12/2012 - 19:00 नवीन
बाब्बो डायरेक्ट 'ह ' तुकडीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

ह ह हुच्चचा असं असेल ओ ते,

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 10:10 नवीन
ह ह हुच्चचा असं असेल ओ ते, तुम्हाला काय माहित नाय, कविता केल्यात का तुम्ही कधी, नुसती विडंबनं मग तुम्हाला काय कळणार 'ह' तुकडी म्हणजे काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मुलींच्या तुकड्या अ,ब्,क,ड

गणेशा
गुरुवार, 09/13/2012 - 13:39 नवीन
मुलींच्या तुकड्या अ,ब्,क,ड अश्या होत्या. आणि टेक्निकल घेतलेले असल्याने त्याच्या विषयानुसार मुलांच्या तिकड्या केल्या गेल्या होत्या. कार्पेंटर हा ट्रेड असल्याने आम्ही 'ह' मध्ये. अ ब क ड ई फ ग ह य ज अश्या तुकद्या होत्या. य आनि ज ह्या टेक्निकल न घेतलेल्या शेती हा विषय घेतलेल्या तुकद्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अ,ब, क, ड अशी नावं देण्याची

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 14:20 नवीन
अ,ब, क, ड अशी नावं देण्याची पद्धत ए,बी,सी,डी या इंग्रजी वर्णमालेचं भाषांतर असेल तर, वाय कुठुन आलं मध्येच जे च्या आधी, गणेशराव, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांच्या सुदृढीकरणाच्या दृष्टीनं तुम्ही माहिती अधिकाराखाली तुमच्या शाळेला एक पत्र पाठवावे आणि सदर प्रकरणाच्या बाबत एक अहवाल अविमसंचामासंला येत्या ३० दिवसांत सादर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अहो 'इ' तुकडी केल्यावर पोरं

sagarpdy
गुरुवार, 09/13/2012 - 14:37 नवीन
अहो 'इ' तुकडी केल्यावर पोरं 'इ' आणि 'ई' मध्ये कंफुस नाय का होणार? मग काय केलाय आयचा वाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा