✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सांख्य दर्शन

श
शरद यांनी
Tue, 07/28/2015 - 19:56  ·  लेख
लेख
सांख्य दर्शन सांख्य हे सर्वाधिक प्राचीन दर्शन आहे. एक महत्वाची विचारधारा. साख्यांचा गौरव करतांना महाभारत म्हणते ज्ञानंच लोके यदिहास्ती किंचित् ! सांख्यांगतं तच्च मह्न्महात्मन् !! गार्बे लिहतो In Kapil"s doctrine, for the first time in the history of the world, the complete independence and freedom of human mind, its full confidence in its own power were exibited. It is the most significant system that India has produced. या दर्शनाने जे महत्वाचे सिद्धांत दिले, विचार दिले, त्यातील कांही ना कांही भाग पुढील दर्शनांनी उचलला. मग ते अवैदिक बौद्ध/जैन दर्शन असो किंवा स्वत:ला सांख्यांचा शत्रु समजणारे अद्वैत असो. लो.िळक यांच्या मते सांख्य व अद्वैत यांच्यामधील ज्या कल्पना सारख्या आहेत त्या सांख्यांनी उपनिषदांतून कीं उपनिषदांनी सांख्यांतून उचलल्या हे सांगणे अवघड आहे.दोघांची वाढ दोन भावंडांसारखी बरोबरीनेच झाली. भारतातील सर्व विचारधारा सांख्यांच्या ऋणी आहेत. परंपरा : कपिलमुनी हा आद्यसंस्थापक. मग तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र (महाभारत) म्हणा किंवा विष्णुचा अवतार (भागवत पुराण).गीतेत श्रीकृष्ण म्हणतात "सिद्धानाम कपिलो मुनी ". कपिलाला झालेले परमज्ञान त्याने आसुरीला व आसुरीने पंचशिखास दिले. पंचशिखाने त्याचा विस्तार केला. त्यानंतर येतो ईश्वरकृष्ण. हा ऐतिहासिक. पहिल्या तिघांचा एकही ग्रंथ मिळत नाही. ईश्वरकृष्णाची सांख्यकारिका हा सर्वात प्राचीन उपलब्ध ग्रंथ. याचा काल इ.स.दुसरे शतक (किंवा त्यापुढे). ग्रंथाचे चीनी भाषांतर मिळते. या नंतरचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. आता दर्शनाचे थोडे प्राथमिक स्वरूप बघू.. (१) आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक दु:खांचे निवारण करणे हे दर्शनाचे उद्दिष्ट आहे. (२) प्रत्यक्ष, अनुमान व आगम ही तीन प्रमाणे होत. (३) सत्कार्यवाद हा मूलभूत आधार. प्रत्येक वस्तूचे कारण असतेच कारणाशिवाय कार्य निर्मित होणे अशक्य आहे. शून्यातून विश्व निर्माण होत नसते. (४) प्रकृति व पुरुष हे विश्व निर्मितीचे कारणरूप अनादी द्वंद्व आहे. (५) प्रकृति ही त्रिगुणात्मिका, अविवेकी, अचेतन व प्रसवधर्मी आहे. (६) प्रकृति व पुरुष दोन्ही अव्यक्त आहेत. (७) सत्व, रज व तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत. (८) प्रकूति एक आहे. (९) पुरुष अनेक आहेत. (१०) प्रकृति व पुरुष हे आंधळ्या-पांगळ्याच्या जोडीसारखे एकमेकाच्या मदतीने विश्वसर्ग करतात. (११) चेतन पुरुषाच्या संगतीने अचेतन प्रकृती चेतनवत् भासते. (१२) अव्यक्त प्रकृतीपासून प्रथम महत् (बुद्धी) व व्यक्त अहंकार निर्माण होतो. अहंकारापासून एकीकडे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, व मन हा सात्विक सर्ग तर दुसरेकडे पंचतन्मात्रे व पंचमहाभुते हा तामस सर्ग निर्माण होतो. (१३) प्रकृतीचा हा सर्ग पुरुषाच्या मुक्तीसाठी असतो. (१४) सांख्यशास्त्राच्या सम्यक ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. (१५) सांख्य हे स्वभाववादी व परिणामवादी आहे. लक्षात घ्या : इथे कोठेही ईश्वर नाही. सांख्य तत्वज्ञान निरीश्वरवादी आहे. २५ तत्वे : प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच महाभुते, पाच तन्मात्रा या पंचवीसांना तत्वे म्हणतात. यांच्यापासून विश्वनिर्मिती होते. संतसाहित्यात आढळणारा "पंचवीसा पलिकडला " हा शब्दप्रयोग ईश्वरदर्शक असतो. योगशास्त्राने ही पंचवीस तत्वे स्विकारली व त्यात आपले सव्वीसावे "ईश्वर " हे तत्व मिसळले प्रकृती अचेतन आहे. ती स्वत:हून काहीही करण्यास असमर्थ आहे.चेतन पुरुष्याच्या सहाय्यानेच ती विश्वनिर्मिती करू शकते. पण या सर्व कार्यात पुरुष संपूर्णत: निष्क्रिय, उदासिन, अलिप्त आहे. विश्वनिर्मिती कशी हा कोणत्याही तत्वज्ञानातील मूल प्रश्न. सांख्य विचाराप्रमाणे अचेतन प्रकृती २३ तत्वे (प्रधान) व चेतन पुरुष यांच्या सहाय्याने हा विश्वाचा पसारा मांडते. हा झाला प्रधानकारण वाद. एकापासून निर्मिती कशी होणार ? किमान दोघे पाहिजेतच. म्हणून सांख्यांनी द्वैत स्विकारले. वेदांतामते "अकेला" ब्रह्म विश्वनिर्मिती करण्यास समर्थ आहे (ब्रह्मकारणवाद) म्हणून ते अद्वैतवादी. ब्रह्मसूत्रे वा शंकराचार्य सांख्यांवर तुटून पडतात ते यामुळे. प्रधानकारणवाद व ब्रह्मकारणवाद हा दोन दर्शनांमधील वादाचा प्रमुख मुद्दा आहे.सांख्य सत्कार्यवादी आहेत. प्रत्येक कार्य हे उत्पत्तीपूर्वी कारणात अव्यक्त रुपाने विद्यमान असते. जसे दह्यात दूध. वेदांताच्या ब्रह्म्याला तो एकटा असूनदेखील कारणाशिवाय कार्य निर्माण करता येते. असो. सर्वसामान्यपणे आपण जीवात्मा-परमात्मा यांतील ऐक्याला अद्वैत म्हणतो. दोन माणसांत एकाच परमात्म्याचा अंश असल्याने दोघांत अद्वैत आहे असेही म्हणतो. हे अद्वैत "आध्यात्मिक" आहे. माणसा-माणसामध्ये फरक असणारच, भले दोघांमधील जीवात्म्याचा अंश एक असला तरी. सांख्यमते ही भानगडच नसल्याने त्यांनी प्रत्येक व्यक्तीत निरनिराळा पुरुष मानला. हा निष्क्रिय पुरुष व प्रसवशील पण स्वत: काही करावयास असमर्थ अशी प्रकृती विश्वसर्गाची निर्मिती कशी करतात ? सांख्यांच्या मते ती आंधळ्या-पांगळ्याच्या जॊडीप्रमाणे आहेत.आंधळा धडधाकट आहे पण त्याल दिसत नाही. तो पांगळ्याला खांद्यावर घेतो व दोघे वाट चालू शकत्रात. .आणखी जास्त खोलात न शिरता श्री माहीतगार यांच्या गोष्टीकडे वळू. अध्यात्म व आजचे विज्ञान या दोन निरनिराळ्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. त्यांची एकमेकात गल्लत करणे. फक्त श्री वर्तकांना शक्य आहे. आपण शरीरांत ७२००० नाड्या व कुंडलिनी शोधू नये हेच उचित. दुसरे पुराणे व सांख्य यांच्यांत शेकडो वर्षांचे अंतर आहे. पुराणातील वांगी वीजेच्या ग्रीलवर भाजण्यात अर्थ नाही. दर्शनांवर मी लिहलेले मागचे लेख दर्शने १ ... प्रास्ताविक http://www.misalpav.com/node/15041 दर्शने २ !! थोड्या विस्ताराने http://www.misalpav.com/node/15109 दर्शने ३ मिमांसा http://www.misalpav.com/node/15316 दर्शने ४ अद्वैत http://www.misalpav.com/node/15384 दर्शने ५ चार्वाक किंवा लोकायत http://www.misalpav.com/node/15418 दर्शने ६ पातंजल योगदर्शन http://www.misalpav.com/node/15809 तंत्रदर्शन -१ http://www.misalpav.com/node/28774 तंत्रदर्शन -२ http://www.misalpav.com/node/28774 तंत्रदर्शन -३ http://www.misalpav.com/node/28863 शरद .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
7954 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

वाचनखूण साठवली आहे. सवडीने

एस
Tue, 07/28/2015 - 20:21 नवीन
वाचनखूण साठवली आहे. सवडीने सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

असेच बोलतो.

द-बाहुबली
Wed, 07/29/2015 - 16:12 नवीन
सविस्तरच चर्चा करणेत येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हा लेख पाहुन आमच्या निराकार

प्रसाद गोडबोले
Tue, 07/28/2015 - 20:37 नवीन
हा लेख पाहुन आमच्या निराकार गुर्देवांची फार आठवण आली हो ! असो :
वेदांताच्या ब्रह्म्याला तो एकटा असूनदेखील कारणाशिवाय कार्य निर्माण करता येते.
हे वाक्य फार घोळात पाडणारे आहे , १)ब्रह्मा एक सृष्टी निर्माता व्यक्ती ह्या अर्थाने वेदांतात वापरल्याच्याचे ऐकिवात नाही. आपण बहुतेक ब्रह्म ह्या अर्थाने बोलत असावा. २) जर कार्य केले तर कर्टुत्वाचा दोष ब्रह्म ला लागेल , पण ब्र्ह्म तर संपुर्ण पणे अलिप्त आहे ( बाय डेफिनीशन ) तेव्हा हे विधान सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी ठरते ! ३) महत्वाचे काय : नुसते ब्रह्म-माया ईश्वर-कर्म सांख्य-अद्वैत सज्जन-सुधारक वगैरे चर्चा करुन काय लाभणार ? नेहमी म्हणतो तसे इशावास्योपनिषद पहिले दोन श्लोक लक्षात आले आणि आचरणात आणता आले की झाले ! सुटलो !! असो . ह्या निमित्ताने आमचा आवडता श्लोक क्वोट करत आहोत यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं लो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शरद
Tue, 07/28/2015 - 21:32 नवीन
(१) बह्म आणि ब्रह्मा यांतील भेद मला कळत नसावा असे कां बरे वाटले ? वर ब्रह्म असे लिहून मग रामचे "रामाला" होते तसे ब्रह्मचे "ब्रह्माला"होते असे मला वाटते. व्याकरणात चूक झाली आहे कां ? ब्रह्माला ऐवजी ब्रह्म्याला ही टकलेखनातील चूक आहे हे कळावयास हरकत नाही. तरीही चूक दाखविल्याबद्दल धन्यवाद. (२) कर्तृत्वाचा दोष ही काय भानगड आहे ? मी फक्त" एकटा ब्रह्म विश्वनिर्मिती करू शकतो " ही माहिती दिली आहे "ब्रह्म" ला दोष लागेल कीं नाही हे मला माहीत नाही (३) हा लेख "माहिती" या सदरात दिला आहे. मी चर्चा केलेली नाही. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपल्यावर टीका करण्याचा हेतु

प्रसाद गोडबोले
Wed, 07/29/2015 - 13:31 नवीन
आपल्यावर टीका करण्याचा हेतु नव्हता नाही . कृपया गैरसमज नसावा. एकटा ब्रह्म विश्वनिर्मिती करू शकतो >>> हे विधान चुकीचे आहे कारण ब्रह्म काहीच करत नाही .. जे जे काही कर्तुत्व भासते ते सारे मायेचेच : मायेनेंचि माया चाले । मायेनेंचि माया बोले ॥ मायेनेंचि माया हाले । वायोरूपें ॥ बाकी मलाही ह्या विषयावर चर्चा करायला आवडत नाही , हा सारा अनुभवाचा मामला आहे , साखर कशी गोड किती गोड का गोड ह्यावर चर्चा करुन काय उपयोग ? आपण आपली साखर खावी अन गप्गुमान बसावे ... फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ ह्या अवस्थेत ! इत्यलम ! शुभं भवतु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

मस्तच! लिहाल, अशी अपेक्षा

जडभरत
Tue, 07/28/2015 - 20:52 नवीन
मस्तच! लिहाल, अशी अपेक्षा होतीच. ती पूर्ण केलीत. छान मुद्दे मांडलेत. आता काही प्रश्न: १. पंच कर्मेंद्रिये हा सात्विक सर्ग कसा? कारण ती तर जड गोष्टींचे ज्ञान करून देतात? २. प्रकृती अचेतन कशी? मग ती पुरुषाला विश्वनिर्मितीत सहाय्य करणे शक्य नाही. ३. प्रगोसाहेबांच्या सर्व मुद्द्यांशी सहमत. असो. खूप छान वाटले. अभ्यास बघून. तसेच लेखाची भाषा देखील नर्मविनोदी आहे त्यामुळे कुठेही कटुता निर्माण न करता चर्चा चालू करण्यात आपण यशस्वी ठरलाय. असो. धन्स!!!
  • Log in or register to post comments

शाक्त मते प्रकृती किंवा शक्ती

जडभरत
Tue, 07/28/2015 - 20:57 नवीन
शाक्त मते प्रकृती किंवा शक्ती हीच चैतन्यमय मानतात. पहा: सौंदर्यलहरी प्रथम श्लोक: Shivah shakthya yukto yadi bhavati shaktah prabhavitum Na chedevam devo na khalu kusalah spanditumapi; Atas tvam aradhyam Hari-Hara-Virinchadibhir api Pranantum stotum vaa katham akrta-punyah prabhavati Lord Shiva, only becomes able. To do creation in this world along with Shakthi Without her, Even an inch he cannot move, And so how can, one who does not do good deeds, Or one who does not sing your praise, Become adequate to worship you Oh , goddess mine, Who is worshipped by the trinity.
  • Log in or register to post comments

पुराणातील वांगी वीजेच्या ग्रीलवर भाजण्यात अर्थ नाही.

अर्धवटराव
Tue, 07/28/2015 - 21:45 नवीन
=)) _/\_
  • Log in or register to post comments

+१११११

प्यारे१
Tue, 07/28/2015 - 23:51 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

छान .. लेखन आवडले.

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/28/2015 - 22:34 नवीन
छान .. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद आणि काही शंका

माहितगार
Wed, 07/29/2015 - 09:03 नवीन
@ शरद, माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद. माझी काही कनफ्यूजन प्रधानकारणवाद व ब्रह्मकारणवाद हा दोन दर्शनांमधील वादाचा प्रमुख मुद्दा आहे. या माहितीने दूर झाली. पण मनात अजून काही प्रश्न/शंका शिल्लक आहेत. १) सांख्य तत्त्वज्ञानात पुरुष अनेक असण्याचे प्रयोजन काय आहे (अथवा असावे?) २) माझी गल्लत (१५) सांख्य हे स्वभाववादी व परिणामवादी आहे. याचा संबंध कदाचित पुरुषाशी लावल्यामुळे माझी गल्लत झाली असावी. मी स्वभाव ह्या शब्दावर कॉन्संट्रेटरून तो पुरुषाशी जोडला असावा. इथे स्वभाववाद म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते ? सत्व, रज व तम की २५ तत्वांच्या परिणामाने होणारा सर्ग की अजून काही ?
  • Log in or register to post comments

नुसते ब्रह्म-माया ईश्वर-कर्म

तुडतुडी
Wed, 07/29/2015 - 12:38 नवीन
नुसते ब्रह्म-माया ईश्वर-कर्म सांख्य-अद्वैत सज्जन-सुधारक वगैरे चर्चा करुन काय लाभणार ? नेहमी म्हणतो तसे इशावास्योपनिषद पहिले दोन श्लोक लक्षात आले आणि आचरणात आणता आले की झाले ! सुटलो !!>>>+११११११११११. (८) प्रकूति एक आहे. (९) पुरुष अनेक आहेत.>>> केवळ फुकाची चर्चा आहे हि सगळी . खरं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न कोणीच करत नाही . केवळ चर्चा होत राहते . म्हणूनच असे हास्यास्पद सिद्धांत निर्माण होतात
  • Log in or register to post comments

थोडी जास्त माहिती

शरद
Wed, 07/29/2015 - 12:46 नवीन
जडभरत पंच कर्मेंद्रिये हा सात्विक सर्ग कसा? सात्विक अहंकारापासून पंचेंद्रिये झाली हे मत ईश्वरकृष्ण व वाचस्पती मिश्र या आचार्यांचे आहे. विज्ञानभिक्षू मात्र सात्विक ऐवजी राजस अहंकारापासून इंद्रियांची उत्पत्ती झाले असे म्हणतो. तुम्ही दुसया पार्टीचे ! प्रकृती अचेतन कशी? सांख्यांनी दोन भाग केले; चेतना पुरुषाला दिली व काम करण्याचे, निर्मितीचे काम प्रकृतीला दिले व तिला काम करण्याकरिता २३ तंत्रेही दिली. पण हे सगळे घेऊनही अचेतन असल्यामुळे एकट्याने ती काहीही करू शकत नाही. तिला निष्क्रीय परंतु चेतना असलेल्या प्रु’रुषाचे सहाय्य घ्यावे लागतेच. बरेच आहे कीं, नाही तर ती हिटलरच झाली असती, नाही कां ? (आजही आपण बघतोच की मरमर काम करणार्‍या बाईला संसार ओढण्यासाठी आळशी नवर्‍याच्या एक तारखेच्या पगारावर अवलंबून रहाअवे लागते!) प्रगोसाहेबांच्या सर्व मुद्द्यांशी सहमत. तर मज अडाण्याला शेवटचे श्लोक कुठल्या ईशावास्योपनिषदातले आहेत तेवढे कृपया सांगा ना माहितगार सांख्य तत्त्वज्ञानात पुरुष अनेक असण्याचे प्रयोजन काय आहे आपण बघतो एक मुलगा सकाळी खेळत असतो तर दुसरा अभ्यास करत असतो. दोघांत एकच आत्मा असेल तर असे घडू नये. सांख्यांनी दोघांना दोन निरनिराळे आत्मे दिले; Quits. पुरुष अनंत झाले.
  • Log in or register to post comments

१.आपण त्रिगुणांना समजून

जडभरत
Wed, 07/29/2015 - 16:37 नवीन
१.आपण त्रिगुणांना समजून घेण्यात काहीतरी चूक करताय असे मला वाटते. कर्मेंद्रिये जर सात्विक सर्गापासून उत्पन्न झाली असती तर त्यांनी मायात्मक जगतातील आनंद धुंडाळण्याचे सोडून ईश्वरी शोध चालू केला असता. पण तसे न होता त्यांना क्षणभंगुर सुखाचे प्रबळ आकर्षण आहे, म्हणजे त्यांची उत्पत्ती प्रकृतीजन्य तमोगुणांपासूनच आहे. मात्र त्यांचे संचालन होते, ते मात्र रजोगुणाकडून. आणि या सर्वांचा निर्गुण निराकार प्रेक्षक म्हणजे परब्रह्म. २.प्रकृती अचेतन कशी? सांख्यांनी दोन भाग केले; चेतना पुरुषाला दिली व काम करण्याचे, निर्मितीचे काम प्रकृतीला दिले व तिला काम करण्याकरिता २३ तंत्रेही दिली. पण हे सगळे घेऊनही अचेतन असल्यामुळे एकट्याने ती काहीही करू शकत नाही. ही आपली विधाने Self Contradictory आहेत. जर चैतन्य गुण प्रकृतीकडे नसेल तर ती निर्मितीचे काम करणार कशी? आपणच तर तिला प्रसवशील असे वर म्हटले आहे. मग जी अचेतन ती प्रसवशील कशी? मुळात प्रकृती व पुरुष असा भेद मानणेच चुकीचे आहे. आपण वर नवराबायकोचे मजेशीर उदाहरण दिले आहे. परंतु सामान्य जोडप्याप्रमाणे शिव आणि शक्ति यांच्यात भेदाची कल्पना करणे चूक आहे. त्यालाच तर अर्धनारीनटेश्वर म्हणतात ना? ३. प्रगोसाहेबांच्या सर्व मुद्द्यांशी सहमत. तर मज अडाण्याला शेवटचे श्लोक कुठल्या ईशावास्योपनिषदातले आहेत तेवढे कृपया सांगा ना हा प्रश्न इथे अनाठायी आहे. "हा माझा आवडीचा विषय आहे, अभ्यासाचा नाही. मी लिहावयाच्या आधी शक्य तेवढी काळजी घेतो पण सर्व प्रश्नांची उत्तरे, प्राथमिक संदर्भासह द्यावयाचे म्हटले तर भांडारकर ग्रंथालयात सहा महिने सकाळ संध्याकाळ जाऊन बसावे लागेल. माझ्यासारख्या रिकामटेकड्यालाही हे शक्य नाही. परिक्षेला बसावे असे आता वय नाही; त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर खुशाल नापास करा, मला वाईट वाटणार नाही." हे आपलेच आपल्याच एका धाग्यावरचे उत्तर येथे क्वोट करतो. ४.आपण बघतो एक मुलगा सकाळी खेळत असतो तर दुसरा अभ्यास करत असतो. दोघांत एकच आत्मा असेल तर असे घडू नये. सांख्यांनी दोघांना दोन निरनिराळे आत्मे दिले; Quits. पुरुष अनंत झाले. आत्मा जर प्रत्येकागणिक स्वतंत्र असेल तर तो चैतन्य कसा? जी गोष्ट व्यक्तिव्यक्तिगणीक बदलते ती जड पदार्थांच्या संयोगानेच बनलेली असली पाहिजे. कारण एखाद्या पुरुषाला जेव्हा मुलगा होतो तेव्हा तो नवा आत्मा त्या पुरुषाने तयार केला असा अर्थ होतो. तसे तर शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

आजही आपण बघतोच की मरमर काम

तुडतुडी
Wed, 07/29/2015 - 15:14 नवीन
आजही आपण बघतोच की मरमर काम करणार्‍या बाईला संसार ओढण्यासाठी आळशी नवर्‍याच्या एक तारखेच्या पगारावर अवलंबून रहाअवे लागते!>>> हि हि हि . चांगलं उदाहरण आहे . आता बघा . आपल्याकडे काही समारंभ अहे. लायटिंग ची सगळी व्यवस्था झालीये . अनेक प्रकारचे बल्ब्स , tubes, झुंबरं , दिवे काय काय लावून झालंय . पण वीजच नसेल तर ? इथे वीज हे ब्रम्ह आणि बल्ब्स , tubes, झुंबरं , दिवे हे सगळं म्हणजे प्रकृती . आपण बघतो एक मुलगा सकाळी खेळत असतो तर दुसरा अभ्यास करत असतो. सांख्यांनी दोघांना दोन निरनिराळे आत्मे दिले>>> इथेही असंच म्हणता येईल . अनेक प्रकारचे, रंगांचे बल्ब्स आहेत . प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं . पण सगळ्यांना प्रकाशमान करणारी वीज (Electricity) एकाच . तेव्हा दोन निरनिराळे आत्मे नसून एकंच अहे. सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा