नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in भटकंती
16 Aug 2013 - 10:53 pm
नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

                     सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे मी अगदी लहानपणापासून ऐकूनच होतो. शरीराने धट्टेकट्टे, मनाने खंबीर व जिवावर उदार होऊन वाटचाल करणारेच नागद्वारला जाऊ शकतात, असाच त्या काळी समज होता. त्या काळी नागद्वार तीर्थाला जाण्यास निघालेल्या यात्रेकरूंना सार करायला (निरोप द्यायला) अख्खा गाव मारुतीच्या पारावर गोळा व्हायचा. तो निरोप समारंभ म्हणजे अक्षरशः ओक्साबोक्सी रडारडच असायची. "हा जगून वाचून आला तर आपला" अशीच कुटुंबीयांची मनोभावना असायची. त्यामुळे नागद्वार तीर्थयात्रा म्हणजे अती कठीण व देवदुर्लभ आहे, याची मला जाणीव होतीच. 
                    मी म्हणजे देशाटनाला चटावलेला प्राणी. थोडाफार भाग वगळला तर अनेकदा अनेक कारणामुळे अख्खा देश कानाकोपर्‍यापर्यंत फिरलो आहे. निसर्गरम्य पहाडीतील निरनिराळी निसर्गरम्य स्थळे पाहिली आहेत. चिखलदरा, मैहर, बम्लेश्वरी, वैष्णोदेवी, उटी, कन्नूर, कोडाईकन्नल, माऊंटआबू पाहून झाली आहेत. आठ पैकी सहा अष्टविनायक, बारा पैकी अकरा ज्योतिर्लिंग, चार धामापैकी तीन धाम (रामेश्वर, पुरी व द्वारका) करून झालेत. आता एकदा बद्रीनाथ-केदारनाथ केले की बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम एकाच वेळी पूर्ण होणार. 
                    पण या सगळ्या ठिकाणांपेक्षा नागद्वार सर्वार्थाने खचितच वेगळे आहे. फारच कष्टाचे आहे पण आनंददायी आहे. देशात सर्वत्र फसवेगिरी, ठगगिरी आणि खिसेकापूंचा सुळसुळाट असताना येथे मात्र प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजूनही जिवंत आहे. पंचमढीला गाडी जेथे जागा मिळेल तेथे पार्क करा आणि बिनधास्त निघून जा. कोणी हात देखील लावणार नाहीत. तिथल्या कोरकूकडे सामानाची पिशवी द्या व तुम्ही निर्धास्त व्हा. तो त्याच्या वेगळ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघून जातो. त्याची आणि तुमची दिवसभर भेट होत नाही पण तो तुम्हाला ठरल्या ठिकाणी तुमचे ओझे बरोबर आणून देतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे नाव माहीत करून घ्यायची किंवा ओळखसुद्धा ठेवायची गरज नाही. तोच तुमची ओळख ठेवतो व तुम्हाला शोधून तुमचे सामानाचे ओझे तुमच्या स्वाधीन करतो. यात्रा करणारे सर्व यात्रिक परस्परांशी अत्यंत आपुलकीने वागतात. एकमेकांना चढा-उतरायला स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. ही यात्रा करताना यात्रिकांमध्ये केवळ "भगत आणि भग्तीन" एवढेच नाते असते. दुर्गम रस्ता पार करताना व एकमेकांना मदतीचा हात देताना/घेताना स्त्री-पुरूष या भेदाभेदाचा कुणाच्याच मनात लवलेश देखील नसतो. 
                    सहा-सात वर्षापूर्वी मी नागद्वारला जाऊन आलो होतोच पण या वर्षी पुन्हा मनात ऊर्मी आली आणि पुन्हा जायचा बेत ठरला. यावर्षी अती पावसाने अन्य पहाडीक्षेत्राप्रमाणे नागद्वार पहाडीक्षेत्रातील दरड कोसळून रस्ते अवरुद्ध झाल्याच्या आणि रस्ते चालण्यासाठी अयोग्य तथा प्रतिकूल होऊन बंद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतच होत्या. पण ठरल्याप्रमाणे ८ ऑगष्टला आम्ही प्रवासाला निघालोच. सोबत एक बायको, दोन मुले, एक भाचा आणि १० नातेवाईक असे एकूण १५ जनांचा लवाजमा घेऊन आम्ही निघालो. सौंसर पार केले आणि सुरू झाला घाटाचा रस्ता. प्रचंड नागमोडी वळणे. सौंसर ते पंचमढी या २०० किमी लांब घाटवळणाच्या रस्त्याची तुलना गोवा ते मुंबई या मार्गावरील कोकणी भागातील घाटांशीच होऊ शकेल. पाऊस संततधार कोसळत असताना या वळणांतून स्विफ़्ट-डिझायर चालविण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात सांगणे खरेच कठीण आहे. 
                    सातपुडा पर्वताच्या नैसर्गिक वनस्पतींनी नटलेल्या पर्वतरांगांमध्ये पंचमढी हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. यालाच सातपुड्याची राणी असे म्हणतात. इथे आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोने मे २००९ मध्ये पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय. जैवविविधतेच्या बाबतीत WWF अर्थात World Wildlife Fund ने हा परिसर जगातील ४ थ्या नंबरचा परिसर घोषित केलाय. इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरशः मोहून टाकते. सभोवताल नैसर्गिक झाडाझुडुपांनी वेढलेल्या पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच शिखरावरून जागोजागी दुधाच्या फ़वार्‍यासारखे झरझरणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्याही पेक्षा मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण. पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे सुद्धा कळत नाही. धुवांधार कोसळणारा पाऊस त्रासदायक वाटण्यापेक्षा आल्हाददायक वाटतो. येथे नागद्वारला अनेक यात्रिक दरवर्षी नित्यनेमाने येतात. का येतात याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही कारण लौकिकदृष्ट्या सांगण्यासारखे काहीच नाही. पंचमढीवरून नागद्वारकडे निघालो की कुठेही फुलझाडे नाहीत, बागबगीचे नाहीत, घरे नाहीत, पक्षी-प्राणी नाहीत; पायवाटा आहेत त्यादेखील अत्यंत ओबडधोबड. कुठे-कुठे अक्षरशः दीड-दोन फूट रुंदीच्या पायवाटा आणि बाजूला हजारो फूट खोल दर्‍या. चुकून पाय घसरला तर मानवी देहाचा सांगाडासुद्धा मिळणे कठीण. गेला तो गेलाच. त्याला त्या दर्‍यांमधून शोधून काढू शकेल अशी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. आणि तरीही दरवर्षी लाखो यात्री येथे हजेरी लावायला येत असतात. 
                    आम्ही पंचमढीला रात्री मुक्काम करून ९ तारखेला सकाळी निघालो नागद्वारच्या दिशेने. यात्रेच्या दिवसात पंचमढीवरून पुढे धूपगढपर्यंत स्वतःचे वाहन नेता येत नाही. त्या मार्गाने फक्त स्थानिक परवानाधारक वाहनेच चालतात. आम्हाला एक जीप मिळाली. ९ आसनक्षमतेच्या जीपमध्ये १५ लोकांना कोंबून जीपगाडी ६ किमी अंतरावरील धूपगडाच्या प्रथमद्वाराशी थांबली. 
                    धूपगढ हे सातपुडा पर्वतराजीतील 4430 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्‍या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे. धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आले असावे. 
                    आणि येथून सुरू झाली आमची पायदळ यात्रा. काजरी, श्रावण बाल मंदिर, गणेशाद्वार, नागद्वार (पद्मशेषगुफ़ा), पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाड़ी, आमकी पहाड़ी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता (माई की गिरी) , दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगढ़, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हल्दीशेष हे सुमारे २० किमी अंतर पायी चालून परत धूपगढ असा प्रवास. मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. बॅग किंवा सामानाची पिशवी घेऊन चालणे अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील मुक्कामाच्या साहित्याचे दोन भले मोठे गाठोडे केले व ते दोन कोरकूंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते गाठोडे उचलले आणि भराभरा निघून गेले. काजरीला मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची आमची भेट होणार होती.
 ------------------------------------------------------------------
Nagdwar
अशा पाऊलवाटांनी चालणे म्हणजे अवघडच
---------------------------------------------------------------------------
                     काजरी येथे पोचल्यावर श्रावण बाल मंदिर दर्शन घेतले. काजरी येथेच रात्री एका झोपडीत मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी मोठे अंतर चालायचे होते. म्हणून पहाटे ४ वाजताच पुढील प्रवासाला सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते म्हणून सर्व पहाटेच उठलो, हाती विजेर्‍या घेतल्या आणि अंधारातच जंगलातून ओबडधोबड पाऊलवाटेने "एक डोंगर चढता, एक डोंगर उतरता" या प्रकारे मार्गक्रमण सुरू केले. तेथे सपाट म्हणून रस्ते नाहीतच. सर्व वाटा शिखर चढणार्‍या आणि शिखर उतरणार्‍या. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे "अन्नदानाचा भंडारा" लागलेला असतो आणि तो सुद्धा अगदी फुकट. कुठे काजू-मनुका घातलेला उपमा असतो तर कुठे जिलबी-बुंदा. भात, भाजी, पोळ्या, चहा सारे काही रस्त्याने फुकटच मिळते. अनेक सामाजिक संस्था या कामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करतात. सतत कोसळणारा पाऊस आणि या डोंगरखड्याच्या ओबडधोबड चालण्यास असुरक्षित अशा पायवाटेने स्वतःपुरत्या अन्नाचे ओझे सोबत घेऊन जाणे अशक्य. त्यामुळे एका अर्थाने सर्व यात्रेकरू त्या मार्गावर अन्नासाठी "गरजू" बनतात. त्यांना या भाविक मंडळींच्या सामाजिक संस्था "अन्नसुरक्षा" प्रदान करतात आणि तिही अगदी फुकट. वाटेने फुकटाच्या प्रसादावर ताव मारत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास नागद्वारला पोचलो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
नागद्वाराचे प्रवेशद्वार
 ------------------------------------------------------------------ 
 दोन पहाडांच्या मधोमध एका निरुंद कपारीत पद्मशेष बाबाची छोटीशी मूर्ती आहे. ती कपारी आता थोडी रुंद आणि उंच केली असावी, असे दिसले. त्यामुळे अंदाजे २०० फूट अंतर आता एकावेळी एकाला उभ्याने चालत जाता येते. काही काळापूर्वी सरपटत जायला लागत असावे. असा अंदाज येतो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

पद्मशेषद्वार
 ------------------------------------------------------------------ 
पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही. याउलट सर्वत्र नाडवणूक, खिसेकापू, भंकसगिरी होत असताना या दुर्गम भागात जेथे या संस्थांना सर्व साहित्य प्रचंड कष्टाने डोक्यावर घेऊन जावे लागते तेथे या संस्था लाखो लोकांसाठी फुकटात जेवायची व्यवस्था करतात आणि आग्रहाने जेवू घालण्यात धन्यता मानतात, हे इथले मोठे वैशिष्ट्य ठरावे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

अन्नदानाचा भंडारा - येथे आम्ही पोटभर जेवण घेतले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

काही ठिकाणी अशी लोखंडी निशाणीची व्यवस्था केली आहे. 

------------------------------------------------------------------
Nagdwar

दगडधोंड्यांच्या रस्त्यातून वाट काढत चालताना यात्रिक. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

गुळगुळीत वाट आणि बाजूला शेकडो फूट खोल दरी 
------------------------------------------------------------------
Nagdwar

थकल्यासारखे वाटल्यावर काही क्षणांची विश्रांती घेताना
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

मनोहारी ओढा आणि दुर्गम वाटा
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

या वाटेने अनवाणी चालण्याचा आनंद काही वेगळाच. 
------------------------------------------------------------------ 
दोन दिवस सतत चालून आम्ही १० तारखेला परत धूपगढला रात्री ११ च्या सुमारास पोचलो. माझी चप्पल हरवल्याने मला मात्र प्रवास अनवाणी पायानेच करावा लागला. 
----------------------------------------------------------------------------------------------------------
चौरागढ : पंचमढीला जटाशंकर, गुप्त महादेव अशी देवस्थाने आहेत. ते बघून आम्ही चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून 4315 फूट आणि सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं, की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो. इथे शंकराचं मंदिर असून सभोवताल त्रिशूळांच्या रांगाच रांगा आहेत. अनेक भाविक नवस फ़ेडायसाठी किंवा श्रद्धेने खांद्यावर त्रिशूळ घेऊन येतात. 
 ------------------------------------------------------------------ 
Nagdwarचौरागढाचे प्रवेशद्वार. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

चौरागढ चढण्याला पायर्‍या आहेत पण चढताना देव आठवतोच. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

चौरागढ चढताना क्षणभराची विश्रांती. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

एकदाचे चौरागढाचे शिखर दृष्टीपटात आले, शिवमंदिर दिसायला लागले आणि चेहर्‍यावर हास्य फुलायला लागले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

प्राचीनकाळीन शिवमंदिर
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

हर हर महादेव
 ---------------------------------------------------------------------------------------------------
अन्होनी गरम पाण्याचे कुंड : पंचमढीवरून ४७ किमीवर अन्होनी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. बाजूलाच ज्वाला माता मंदिर आहे. कुंडातील पाणी एवढे गरम असते की त्यातून वाफ निघत असते. या पाण्यात आपण हात घालू शकत नाही. बाजूलाच दोन हौद बांधले आहेत. या कुंडातील पाणी तेथे घेतले जाते. भाविक तेथे आंघोळी करतात. येथे आंघोळ केल्यास चर्मरोग दुरुस्त होतात, अशी जनभावना आहे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

गरम पाण्याचे कुंड - पाण्यातून वाफ निघते
 -----------------------------------------------------------------------------------------------------
काही वैशिष्टे :

१) पश्चिमद्वार गुफेची उंची ३/४ फूट असल्याने गुफेत वाकून चालत जावे लागते.
२) स्वर्गद्वार गुफेची उंची २/३ फूट असल्याने गुफेत रांगत किंवा सरपटत चालत जावे लागते.
३) हल्दीशेष गुफेत रांगत जावे लागते. आत गेलो आणि आतील दगडांना स्पर्श झाला की आपले अंग आणि कपडे हळदीसारखे पिवळे होऊन जातात.
४) गंगावन शेष गुफेत ५०/७० फूट रांगत किंवा बसून किंवा सरपटत जावे लागते. आत मात्र अत्यंत रमनिय मनोहरी दृष्य अहे. मुर्तीवर होणारा नैसर्गिक झर्‍याचा अभिषेक विलोभनिय आहे.

काही अवांतर :
१) पचमढी मध्यप्रदेशात असले तरी नागद्वार, चौरागढ यात्रा करणारे मुख्यत्वे महाराष्ट्रीय आणि सिमेलगतचे मराठी भाषिक यात्रिकच असतात.
२) नि:शुल्क भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करणार्‍या बहुतांश संस्था वैदर्भियच आहेत.
३) प्रांतसिमा आणि पचमढी यामधल्या सौंसर, पांढुर्णा वगैरे भागात अजूनही मराठीच बोलली जाते.
४) नागद्वार यात्रेला प्रशासकिय सुविधा पुरेशा उपलब्ध न होण्यामागे व म.प्र शासकांची भूमिका उदासिनतेची असण्यामागे कदाचित हे एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
५) नागव्दार यात्रा बंद करण्यासाठी म.प्र. शासनाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची आतल्या गोटात चर्चा आहे. यावर्षी केवळ १० दिवसाची परवानगी मिळाली हा त्याचाच परिणाम असावा, असा संशय घ्यायला बराच वाव आहे.
६) नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी, व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाहीत. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकंदरित ट्रेन्ड बनलेला आहे.म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता.

७) शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत.

अ) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे.
ब) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही.
क) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

                पंचमढीला आम्ही नागद्वार, चौरागढ आणि अन्होनी इतकेच पाहू शकलो. तीन दिवस सतत पायी चालून एवढे थकून गेलो की आणखी काही बघायची इच्छाच उरली नव्हती. मात्र येथे बरेच काही बघण्यासारखे आहे. गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात. पंचमढीला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत, तर काही ठिकाणं अवघड आहेत.

पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, धबधबे, बी फॉल, अप्सरा, विहार, पंचमढी मधील सर्वांत उंच म्हणजे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप हा धबधबा वगैरे बघायचे राहून गेले मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा जायचा विचार आहे.

* नागद्वार यात्रा वर्षातून दोनदा असते.

१) गुरूपोर्णिमा ते नागपंचमी परंतु यावर्षी प्रशासनाने केवळ २ ते १२ ऑगष्ट अशी १० दिवसाचीच परवानगी दिली होती. हीच मुख्य यात्रा असते.
२) वैशाख महिन्यात वैशाखी यात्रा, पण यावेळेस पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. जंगली प्राण्यांचा या भागात वावर असतो, नि:शुल्क भोजन किंवा अन्य सुविधा देखील नसतात. अजिबात गर्दी नसते. त्यामुळे ही नागद्वार यात्रेसाठी उपयुक्त वेळ नाही.
३) उर्वरित संपूर्ण काळ हा प्रभाग निर्जन असतो.

पंचमढीला कसे जावे? 
* हवाई मार्गाने जायचे झाल्यास भोपाळ वरून १९५ कि. मी. 
* रेल्वेने जायचे झाल्यास होशंगाबाद जवळील पिपरिया इथे उतरून पुढे बसने - अंतर ४५ कि. मी. आहे. 
* नागपूरहून बसने पंचमढीला जाता येते - अंतर सुमारे २७० कि. मी. आहे.
                                                                                                                              - गंगाधर मुटे 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशचित्रणगरम पाण्याचे कुंडचौरागढनागद्वारप्रवासवर्णनवाङ्मयशेती

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

16 Aug 2013 - 11:21 pm | मनिम्याऊ

छान आहे प्रवास वर्णन.... मागल्याच वर्षी नागद्वार यात्रेला जाण्याचा योग आला. तुमचे प्रवासवर्णन वाचून पुन:प्रत्यायचा आनंद मिळला.

मागील वर्षीच्या यात्रेचे काही फोटो....

.

.

.

.

.

.

कवितानागेश's picture

16 Aug 2013 - 11:48 pm | कवितानागेश

सुंदर आहे ठिकाण.
घरी हट्ट करावा का? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2013 - 2:18 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रवासवर्णन आणि चित्रे.

इतके प्रवासी येत असतानाही काहीच व्यवस्था आणि विषेश म्हणजे सुरक्षाव्यवस्थाही न करणार्‍या प्रशासनाबद्दल काय म्हणावे ?

मुक्त विहारि's picture

17 Aug 2013 - 11:31 am | मुक्त विहारि

आवडले...

विलासराव's picture

17 Aug 2013 - 11:56 am | विलासराव

मी परिक्रमेत असताना बरेच ऐकलेय पंचमढी आनी परिसराबद्दल.

मी पण येतो डिसेंबरला.( अर्थात तुमची हरकत नसेल तर).

सुंदर वर्णन आणी तितकीच सुंदर चित्रे,

फक्त, पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही
याला अपवाद म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदावले इथला....

कपिलमुनी's picture

19 Aug 2013 - 12:57 pm | कपिलमुनी

साधा वरण भात असतो ..दुपारी गेलात की ..
जेवढे भाविक आहेत त्यांना बोलावतात...

अशी अजुन बरीच ठिकाणे आहेत छोटी छोटी

अनिरुद्ध प's picture

19 Aug 2013 - 7:02 pm | अनिरुद्ध प

बरिच स्थाने आहेत्,महाराष्ट्रात्,जीथे दररोज मोफत अन्नदान होते,उदा,शेगाव्,गणपतिपुळे,परशुराम्,नरसोबाची वाडी,सज्जनगड,ईत्यादी.

कानडाऊ योगेशु's picture

19 Aug 2013 - 7:31 pm | कानडाऊ योगेशु

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे देखील श्रीस्वामी समर्थ मंदीरातर्फे अन्नछत्र चालवले जाते.

गंगाधर मुटे's picture

17 Aug 2013 - 1:57 pm | गंगाधर मुटे

@ मनिम्याऊ - धन्यवाद

@ इस्पीकचा एक्का - प्रशासनाच्या भुमिकेबद्दल मूळ लेखात नव्याने माहिती घातली आहे.

@ विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल.
या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. :)

विलासराव's picture

19 Aug 2013 - 1:09 pm | विलासराव

विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल.

चालेल.

या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. smiley

मग तर जाउच.

स्पंदना's picture

17 Aug 2013 - 3:50 pm | स्पंदना

इतक्या दुर्गम ठिकाणी कशी बांधली असतील ही मंदिरे?
बाप रे! कितीही जावेसे वाटले तरी झेपणार नाही हा प्रवास.

गंगाधर मुटे's picture

19 Aug 2013 - 12:40 pm | गंगाधर मुटे

नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी-व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाही. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकून ट्रेन्ड बनलेला आहे.

म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता.

शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत.

१) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे.
२) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही.
३) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

चिगो's picture

19 Aug 2013 - 5:51 pm | चिगो

लहानपणी गावात ऐकलेली "महादेवा जातो गा", "नागद्वारा जातो गा" वगैरे गाणी म्हणत प्रचंड रडारड असलेली निरोपयात्रा आठवली. एकंदरीतच अतीकठीण यात्रा असल्याने यात्रेला जाणार्‍या यात्रेकरुला "शेवटचाच निरोप" देत असल्यासारखे वातावरण असायचे..

विदर्भात ग्रामिण भागात ही यात्रा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे..

विटेकर's picture

19 Aug 2013 - 6:13 pm | विटेकर

सुंदर ओळ्ख .. या स्थानाबद्द्ल कधीच ऐकले नव्हते !
धन्स !

अनिरुद्ध प's picture

19 Aug 2013 - 7:34 pm | अनिरुद्ध प

माहिती व छायाचित्रे उत्तम.

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 Aug 2013 - 7:51 pm | भ ट क्या खे ड वा ला

छायाचित्रे आणि वर्णन दोन्ही सुंदर

गंगाधर मुटे's picture

20 Aug 2013 - 3:05 pm | गंगाधर मुटे

@उगीच काहीतरी, @कपिलमुनी, @अनिरुद्ध प @कानडाऊ योगेशु धन्यवाद

भंडारा आणि अन्नछत्राच्या बाबतीत नागद्वार विरुद्ध अन्य तिर्थस्थळे असे द्वंद मला निर्माण करायचे नव्हते किंवा नागद्वार हेच याबाबतीत सर्वश्रेष्ट आहे, असाही उद्देश माझ्या लिखानाचा नाही.

गोंदावले आणि सजनगड वगळता शेगाव, गणपतिपुळे, परशुराम, नरसोबाची वाडी ही स्थळे मी पाहिली आहेत. पण ही स्थळे संस्थाने/देवस्थान या स्वरुपाची आहेत. शिवाय ही अन्नछत्रे संस्थान तर्फे चालविली जातात.

मात्र ज्याला तिर्थयात्रा मानली गेली अशी स्थळे उदा. पंढरपूर, काशी, प्रयाग, रामेश्वर, द्वारका, हृशिकेश, हरिद्वार, जगन्नाथपुरी वगैरे ठिकाणी अशी व्यवस्था नाहीय.

काही पर्वतीय स्थळे जेथे रस्त्याने चालताना भोजनाची नितांत गरज असते उदा- जम्मूमधील वैष्णोदेवी, मध्यप्रदेशातील मैहर, उत्तरांचलातील मनसादेवी, झारखंडातील बम्लेश्वरी, गुजरातेतील बेटद्वारका किंवा हरसिद्धीमाता वगैरे ठिकाणी मात्र अशी व्यवस्था नाहिये.

गंगाधर मुटे's picture

21 Aug 2013 - 10:12 pm | गंगाधर मुटे

एक जिज्ञासा

प्रवासाला निघण्याआधी दोन दिवसापूर्वी म्हणजे ६ तारखेला माझी Blood Sugar 170 mg/dl होती. प्रवास आटोपून आल्यानंतर सात दिवसांनी आज तपासली असता 130 mg/dl आहे.

दोन वर्षात पहिल्यांदाच श्यूगर एवढ्या नॉर्मल पातळीवर आली आहे. हा एकंदरीत काय प्रकार समजावा, शास्त्रीय किंवा अनुभवावरून किंवा अंदाजावरून काही निष्कर्ष काढता येऊ शकतील काय?

अर्धवटराव's picture

21 Aug 2013 - 10:31 pm | अर्धवटराव

एव्हढे शारीरीक कष्ट, निसर्गाचे सान्निध्य, अत्यंत समाधान देणारा प्रवास, सेन्स ऑफ अचिव्हमेण्ट, नेहमीच्या खाद्यसवयींपेक्षा वेगळं जेवण... असे अनेक फॅक्टर असु शकतील.

अर्धवटराव

वेल्लाभट's picture

21 Aug 2013 - 11:53 pm | वेल्लाभट

भारी आहे हे !

पैसा's picture

24 Aug 2013 - 2:33 pm | पैसा

एका अनोख्या ठिकाणाची तेवढीच सुंदर ओळख! फोटो फार छान आले आहेत. तिथे जाणे कष्टसाध्य आहे आणि तथाकथित टुरिस्टांची वक्र दृष्टी वळली नाही हे नशीबच म्हणा. हल्लीच रेल्वेने येत असताना दूधसागर धबधब्याच्या मागे पुढे सुमारे १० किमि पट्ट्यात रेल्वेरुळाच्या दोन्ही बाजूना प्लॅस्टिक कचर्‍याचा खच आणि जंगल भर टुरिस्टांचे आरडाओरडा करणारे लोंढे पाहिले. आधीच्या स्टेशनमधे रिझर्व्हेशनच्या डब्यात चढून दमदाटी करून झोपलेल्या प्रवाशांना उठवले गेले. पूर्णा एक्सप्रेसची साखळी खेचून रेल्वे थांबवणे रोजचे झाल्यामुळे मोटरमन कंटाळून धबधब्याजवळ रेल्वे थांबवतात आणि या रेडयाना उतरू देतात असे सोबत असलेल्या एका रेल्वेतील कर्मचारी महिलेने सांगितले. तेव्हापासून टुरिस्ट म्हटले की संताप होतो. नागद्वारला असा उपद्रव नसेल तर चांगलेच आहे!