बरं एवढं नि उगीच थोडं ..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
‘ए आई, दूध गरम करायचंय, मापाचा ग्लास कुठेय ?’ माझा मुलगा विचारतोय.
‘अरे, कशाला हवा ग्लास ? हे एवढं घ्यायचं !’ मी दुधाच्या पातेल्यातून लहान भांड्यात पटदिशी दूध ओतून दिलं. गरम झाल्यावर मुलानं ग्लासात ओतलं. बरोब्बर मापात !
‘आई, तुला कसं गं समजतं, केवढं घ्यायचं ते, न मोजता ?’
बरोब्बर तीस वर्षापूर्वी मी माझ्या आजीला हाच प्रश्न विचारलेला ! आजी मला गरगट्टं करायला शिकवत होती तेव्हा !!
आजी माझी, सुगरण. तिच्या बोटातून रसवंती झरायची. तिच्या हातचं पिठलं आणि गरगट्टं खायला देवांना अमृत सोडून स्वर्गातून खाली उतरावं लागत असे ! गरगट्टं म्हणजे डाळ, चिंच आणि आख्खे शेंगदाणे घातलेली घट्टसर सरसरीत पालेभाजी. त्यातही पेश्शल म्हणजे चाकवताचं गरगट्टं ! ते भरपूर तूप घालून गरम भाकरीबरोबर खावे किंवा जाड्या तांदळाच्या वाफाळत्या भातावर घालून, निवेल तसे कडेकडेने ओरपावे !!
तर तीस वर्षापूर्वी माझी अन्नपूर्णा आजी मला गरगट्टं शिकवत होती.
‘हे बघ, उगीच एवढीशी तूरडाळ घ्यायची, मग बचकभर चाकवताची पानं चिरून त्यात घालायची ! ...’
‘अगं पण आजी, चाकवत धुवून नाही का घेतला ? पालेभाज्या धुवून खाव्यात.’ माझ्या शालेय पोपटाची पोपटपंची. ‘घे, तुला हवा तर ! मी कुठलीच भाजी धुवून घेत नाही गं सोने !’ आजी हनुवटीला हाताचा मुटका लावून बोलली.
धुवाधुवीचा आणि चवीचा व्यस्त संबंध तर नसेल ना ? असा एक विचार शाळेत शिकलेल्या पोपटाला चाटून गेला.
‘बरं मग ? मग काय करायचं ?’
‘मग बरं एवढं खोबरं, उलीशी चिंच, जरा शेंगदाणे फोडणीत घालायचे... मग थोडं मीठ आणि उगीच थोडी हरभरा डाळ...’
‘थांब, थांब. बरं एवढं आणि उगीच एवढं म्हणजे केवढं, गं ? माप सांग ना !’
‘आता त्यात कसलं आणि माप, बिट्टे ? अगं घ्यायचं अंदाजानं !’
‘अगं पण सगळंच कसं अंदाजानं घ्यायचं ? आणि चुकलं म्हणजे ?’ शालेय पोपटाचे डोळे मोठ्ठे झाले.
‘नाही चुकत ! सगळं माप हातात बसलं म्हणजे अज्जिबात चुकत नाही !’ आजी ठामपणे म्हणाली.
ज्जे बात ! माप हातात बसलं म्हणजे चुकत नाही !
आई चहा ठेवताना कप हातातसुद्धा घेत नाही, तरी बरोबर चार कप चहा बनतो. मावशी पातेल्यात कावळ्यानं पाणी घालते आणि त्यात बरोबर आठ लोकांचं पिठलं तयार होतं. आत्याने परातीत घातलेल्या पिठाच्या ढिगाच्या बरोबर मोजून जितकी माणसे तितक्या, किंवा अधिक एक भाकरी होतात. आजीच्या साठवणीतलं धान्य बरोबर नवीन धान्य बाजारात येण्याच्या बेताला कसं संपतं ? आधी नाही आणि नंतर नाही. लहानपणी फ्रीज नव्हता. पण स्वैपाक कधी खूप उरलाय, फ्रीज नसल्याने टाकून द्यावा लागलाय, किंवा दोन दिवस घरातली माणसे शिळे खातायेत, असं काही आठवत नाही. सगळं काही न मोजताही मापात !
हैला, कसं काय जमत असेल यांना हे ? यांच्या डोक्यातच मापं टाकलीयेत की काय देवबाप्पानं ? आपल्याला शिकायचंय हे असं सगळं !
मग मी ‘बरं एवढं अन उगीच थोडं’ यांच्या खनपटीला बसले. सगळी मापं हातात बसवायचा चिकाटीनं आणि अतोनात प्रयत्न करत राहिले.
आणि मग हळूहळू एक दिवस मी, मुलाला दुकानात न नेता बरोब्बर त्याच्या मापाचा शर्ट आणायला कधी शिकले, ते लक्षातपण आलं नाही !
...आज माझा मुलगा मला तेच विचारतोय !
‘माप कसं लक्षात ठेवायचं ?’
‘लक्षात ? नाही रे, ते हातात बसावं लागतं !’ मी आजीला आठवत बोलले.
‘म्हणजे ?’
‘म्हणजे ते असं सारखं ते काम करून करून, खूप वेळा केलं की आपोआप हातात बसतं.’
मुलगा मठ्ठ चेहेऱ्याने बघत राहिला !
बस्स ! ‘बरं एवढं’ आणि ‘उगीच एवढं’ हीच खरी मापं ! बाकी सर्व आभास आहेत !
आजही ‘बरा एवढा’ आणि ‘उगीच थोडा’ अशा पद्धतीने केलेल्या जिन्नसाची सर, टेबलस्पून आणि टीस्पून घेऊन केलेल्या पदार्थाला येत नाही, असा अनुभव आहे. किंबहुना केक, बिस्किटे किंवा तत्सम आंग्लदेशीय पदार्थांना टीस्पून आणि टेबलस्पून ही मापे मानवतात आणि वांगी किंवा बटाटा पोहे, मसालेदार भरले वांगे, मूगडाळीची गुलगुलीत खिचडी, मटकीचा झणझणीत रस्सा, दमाची खुशबूदार बिर्याणी आणि दबदबीत मटण असले बेत, ‘हे एवढं’ किंवा ‘उगीच तेवढं’ अशा मापांनीच सुरस संपन्न होतात.
त्यातही काही जिन्नस असे आहेत की ते सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात केल्यावर, घरच्या निगुतीनं केलेल्या कोणत्याही गोडाधोडाच्या तोंडात मारतात. विशेषत: मसालेभात, कसलीही खीर, वांग्याची पातळ भाजी आणि भरपूर लसूण आणि कढीपत्ता घातलेली पाणीदार पण तरीही झणझणीत आमटी या वस्तू कोणत्याही देवस्थानच्या अन्नछत्रात खाव्या आणि घरी हुबेहूब तशाच बनवून दाखवाव्या. आईशप्पथ, अपुन सर काटके देगा !
मी एकदा कुतूहलानं एका देवस्थानच्या मुदपाकखान्यात जाऊन बघितलं होतं. जेमतेम गुडघ्यापर्यंत पोचणारी पांढरीशुभ्र धोतरे आणि वरती फक्त जानवे अशा युनिफॉर्मातले ढेरपोटे बल्लव, हातात बरण्या घेऊन चुलीवरच्या भीमकाय पातेल्यातल्या भाजीत अन आमटीत डायरेक्ट तिखट मीठ ओतत होते आणि प्रचंड काहिलीतल्या खिरीत पराती भरभरून गुळाचे डोंगर लोटले जात होते ! एकूणच, माप त्यांच्या हातातच नव्हे, तर पुऱ्या देहात भिनलं असावं, असं मानायला जागा होती.
आधी नाक आणि डोळ्यांनी रसपान करून मग जिव्हेने पाणीदार स्वागत करून मग आनंदाने ओठी-पोटी धारण करावेत असे पदार्थ बनतात, ते माप हातात बसल्यानंतरच ! माझं तर मत आहे की फक्कड स्वैपाक जमायचा असेल तर पहिल्यांदा स्वैपाकघरातली सगळी वजनं आणि मापं विसर्जित करावीत. मापांच्या साच्यात बनलेले जिन्नस डोळ्यांना सुखावून जात असतील. पण जो खादीआयटम नाक, डोळे, जीभ, ओठ आणि नंतर उदरापर्यंतचा प्रवास संस्मरणीय करून जातो, तो बिन मापाचाच !
तसेही बघा, निसर्गात कुठे काही मोजमाप आहे का ? पेटत्या ग्रीष्मातल्या निवत्या सायंकाळी पश्चिम क्षितिजावर उमटणाऱ्या आतूनच लवलवत असल्यासारख्या दिसणाऱ्या रंगांच्या उधळणीला काही माप असते ? त्याच रंगांना उरात सामावून धरणीकडे धाव घेणारी प्रत्येक लाट अमुक इतक्या मीटरची असते का? काळ्या मेघांनी भरून आलेल्या कुंद दुपारी अवचित धो धो कोसळणारा पाऊस किती लिटरचा रतीब घातल्यावर थंड होतो ? आणि दोनचार श्रावणसरी पडून गेल्यावर टेकडीच्या उतारावर ऐसपैस तरारून आलेले कोवळेलूस गवत किती ब्रास असते ? हिमालयाची नजरबंदी करणारी पांढरीशुभ्र शिखरे एकमेकांशी कोणता कोन, कोणते प्रमाण साधतात ? सौदर्याचा आदिम वारसा मिरवणारे कोणतेही फूल एकाच मापाच्या सर्व पाकळ्या घेऊन फुलले आहे काय ?
हे सगळे काटेकोर मापात असते तर इतके मोहक, चित्ताकर्षक झाले असते का ? नक्कीच नाही !
बघा हं. लख्ख सूर्यप्रकाशाच्या दिवशी सुर्व्या देवांनी, ‘आजचा कोटा पूर्ण झाला’ म्हणून दोन वाजताच किरणांचा गाशा गुंडाळून पलायन केले. ‘इकडे पन्नास एमेम झाला, चला रे आता तिकडे’ म्हणून परजेन्नराजानं मेघांची मेंढरं हाकलून नेली. किंवा इंग्लंडात आज चार इंच बर्फ झालंय, तीच लेवल स्वित्झर्लंडात वढूया, चला, अशा मोजमापानं हिमवृष्टी होऊ लागली. कसं वाटेल ??
...सगळं औघड होईल राव !!
अन असं सगळं अघळपघळ अंदाजपंचे असूनही या सगळ्यांना एक माप निश्चितच आहे. निसर्गात ‘आडमाप’ आणि अतिरेकी असं कुणीही नाही ! सागराच्या लाटांनी किनाऱ्यावर कितीही लांब धाव घेतली तरी सागर आपली मर्यादा सोडणार नाही. घर महापुरात बुडालं तरी अंघोळीचा नळ सोडून व्हॉट्सॅपवर टीपी करत बसण्याचा बिनघोरपणा पर्जन्यराजा करणार नाही. वीज कितीही जोरात कडाडली, तरी, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत, डेसिबेलची सर्व लिमिट्स निकालात काढून, कानांचे पडदे फाडणाऱ्या डॉल्बीसारखी चोवीस तास कडकडत राहणार नाही. महापूर कुठपर्यंत ताणायचा ते नदीला चांगलं ठाऊक असतं, आणि कडक उन्हात भाजून चराचर सृष्टीची कितपत काहिली झाल्यावर मेघ दाटून यायचेत, त्याचं मापही आधीच ठरलेलं असतं.
समुद्र कधी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे वारेमाप ढीग आपल्या किनाऱ्याला लावत नाही. झाडे भकाभका पेट्रोलचा धूर ओकत जंगलात फिरत नाहीत. रात्रीच्या पार्टीचे अवशेष रानपाखरे आणि वन्य पशु कधी रस्त्यावर फेकत नाहीत आणि ओढे-नाले वाहताना पर्वताच्या सांदीकोपऱ्यात, दुर्गंधीने वसवसणारी सांडपाण्याची डबकी तुंबवीत नाहीत.
..निसर्गात जर ना माप, ना हिशेब, आडमाप आणि अमर्याद, असं कुणी असेल तर माणूस !
‘बरं एवढं नि उगीच थोडं’ माणसाच्या मापात बसत नाही. त्याचं सगळं वारेमाप !
प्रतिक्रिया
कसलं छान लिहिलंय
मस्त... आवडले...
खूप मस्त लिहीलेयत- विचार
अक्षी माझी आजी आठवली की हो.
वा!
केवळ अप्रतिम!!
ज्याचं
मस्त
मस्त!! हातात माप बसलं की
अतिशय सुंदर लिखान!
अतिशय सुंदर लिखान!
रुचकर लेख
अतिशय सुरेख लेख. खुप आवडला.
मस्त लेख
मस्त लेख
खूप छान !!!
लेख आवडलाच. अगदी मापात आहे !
लेख आवडला.
छान लेख, मीही जेवण बनवताना
आईशप्पथ! असेच प्रश्न, हीच
खुपच मस्त!!! खुप दिवसांनी
छान लेख, आवडला !
सुरेख आठवणी!
सुरेख आठवणी!
छान लिहिलं आहे. शेवट करताना
आवडला.. आणि शेवटाकडे येताना
खूप खूप सुरेख लिहिलंय!
आवडला लेख. आजीची रेसिप्या
ब्येष्ट लिहिलंय ग !!!
हे माप फक्त रांधतावाढताच नाही
मस्त
सुंदर लेख ! ‘बरं एवढं नि उगीच
छान.
मस्त लिहिलं आहात.
मस्तच !
खरंय. भाज्या धुतल्या शिवाय
खमंग