मेनोपॉज एक संक्रमण!
लेखनप्रकार (Writing Type)
मेनोपॉज.... एक संक्रमण!
स्त्री साधारण चाळीशीच्या पुढे सरकली की तिच्यात अनेक बदल व्हायला लागतात. मुलं स्वतःच शाळा/कॉलेज स्वतःच सांभाळायला लागलेली असतात. नवरा नोकरी/धंद्यात सेट झालेला असतो. ती स्वतः नोकरी करत असली तर ती देखील काम, पगार आणि होणारी धावपळ यात adjust झालेली असते. नोकरी नसली तर घर सांभाळत तिने स्वतःला थोडं बिझी केलेलं असतं. सासू-सासरे असले तरी आता एकमेकांचं काय पटत आणि काय नाही ते एकमेकांना बरोबर माहीत असतं. त्यामुळे एक सुखी-संसारी स्त्री तिच्या अंगा-प्रत्यांगातून आणि वागण्या-बोलण्यातून दिसायला लागलेली असते.
पण मग या सुखात देखील तिला काहीतरी खुपायला लागतं. ते नक्की काय असत ते तिला देखील कळत नाही. पण वयात येणाऱ्या मुलांनी कधीतरी थोडसं जरी उलट उत्तर दिल तरी तिच्या डोळ्यात पाणी उभं राहत. ती मनापासून काहीतरी सांगत असते आणि नवरा नेहेमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो आणि तिला वाटायला लागत 'याला मी नकोशी झाले आहे.' हिने ठरवलेला मेनू सासूने बदलला आणि त्याचं घरात सगळ्यांनी कौतुक केलं की तिला वाटत आता आपली गरजच संपली आहे.
दर महिन्याला येणारी पाळी अलीकडे स्वतःच्या मनाप्रमाणे तारखा बदलायला लागलेली असते. कधी स्त्राव जास्त तर कधी फारच कमी झाल्याने अजून गोंधळ माजलेला असतो मनात. वाढत्या वयाची जाणीव व्हायला लागते. आरशासमोर थोडा जास्त वेळ ती उभी राहायला लागते. वाढणार वजन आणि चेहेऱ्यावरच्या इतराना सहज न कळणाऱ्या सुरकुत्या तिला जाणवायला लागलेल्या असतात. एरवी 'घाई आहे'; म्हणून जेमतेम पावडर-टिकली आणि लिपस्टिक लावणारी ती आवर्जून एखादं क्रीम आणते स्वतःसाठी. मनात होणारी खळबळ तिला कळत असते देखील आणि नसते देखील. 'मेनोपॉज सुरु झाला असेल का ग?' मैत्रिणीला प्रश्न विचरला जातो. 'अग, याला प्रि-मेनोपॉज म्हणतात. मी वाचलं आहे इंटरनेट वर.' मैत्रिणीच उत्तर. मग गूगलबाईला जागं करून ती देखील माहिती गोळा करायचा प्रयत्न करते. होणारे बदल... घ्यायच्या काळज्या... गायनॉकॉलॉजीस्टची भेट घेण... सगळ ती करत असते. कारण अस्वस्थ मनातला एक कोपरा तिला सांगत असतोच,'तू उभी राहिलीस तर घर उभ राहील.'
आणि तरीही...... ती मनातून खूप घाबरलेली आणि एकटी असते. नवऱ्याच्या एका प्रेमळ कटाक्षासाठी डोळे आसुसलेले असतात. एक हात मुलांना जवळ घेण्यासाठी अस्वस्थ असतो; तर दुसरा हात संसार हातातून सुटत तर नाही न या भितीने सगळ घट्ट जवळ ओढत असतो. एकाच वेळी तिला सगळ हवं देखील असत आणि नको देखील.
आणि तिचं मन! ते मात्र एकूणच संक्रमणात अडकलेलं असत. तिला तिच्या आपल्यांनी इतकच म्हणायला हव असत.... मला कळतय ग... तू बोल मनातलं! मी घेईन समजून.
प्रतिक्रिया
चांगलं लिहिलंय
धन्यवाद
ज्योती ताई..!!
धन्यवाद विशुमित
छान लिहिलय.
स्त्री जीवनातले एक महत्वाचे संक्रमण
चामुंडराय,