आमचे बालपण
मुलांच्या परीक्षा होत आल्या आहेत. पालक आपापल्या मुलांना वेगवेगळ्या शिबिरात पाठवण्याच्या खटपटीत आहेत. जर बाहेर पडलं तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या शिबिरांच्या जाहिराती लागलेल्या दिसत आहेत. दिवसभर मुले घरात.. त्यामुळे आया...'आता बघायला नको..दोन महिने नुसता धुडगूस...'असे बोलत आहेत. शेजारीही मुलांच्या आवाजामुळे त्रस्त आहेत.
अशावेळी मला माझे बालपण आठवते. आमच्या लहानपणी मे महिन्यात आमचा एकच कार्यक्रम असायचा..तो म्हणजे दापोली तालुक्यातील कोळथरे या आमच्या गावी जाणे. माझे काका व त्यांचे कुटुंबीय तेथे राहत असत.
समुद्रकिनारी वसलेलं आमचं छोटंसं गाव. रस्त्याच्या दुतर्फा घरे..एका बाजूला समुद्र आणि दुसर्या बाजूला डोंगर. आमचे घर समुद्राच्या बाजूला. घराच्या मागे नारळ-सुपारीची वाडी आणि लगेच मागे समुद्र. घरात समुद्रा ची गाज सतत ऐकू येते.
दर वर्षी मे महिन्यात गावी जायचे. आमच्या सारखीच शेजारीपाजारी सुद्धा पाहुणे मंडळी आलेली असायची. एरवी शांत असणारे गाव त्यामुळे गजबजून गेलेले असायचे. आम्ही सगळी मुले विविध खेळ खेळायचो. डबा ऐसपैस, जोडसाखळी, लपंडाव असे धावपळीचे खेळ, त्याशिवाय आम्ही मुली दोरीच्या उद्या खेळायचो. हजार-हजार दोरीच्या उड्या आम्ही मारायचो.
देवपूजेसाठी फुले गोळा करायची, अंगण झाडायचे, घरातील केर काढायचे अशी कामे असायची. पाण्याचा पंप होता तरी घरापर्यंत पाणी येत नसे. त्यामुळे विहिरीवरून हंडा-कळशीने पाणी भरायचे.
मग सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ-भात असायचा. चुलीवर तांब्याच्या भांड्यामध्ये शिजवलेला, घरच्या शेतातले लाल तांदूळ..असा गरम गरम गुरगुट्या भात केळीच्या पानावर वाढला कि केळीच्या पानाचा छान वास सुटायचा. जोडीला घरच्या म्हशीच्या दुधाचे घट्ट विरजलेले दही आणि फोडणीची मिरची. त्या भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. जेवण झालं की केळीचं पान म्हशीच्या पुढ्यात नेउन टाकायचं. त्यावेळी जेवण झालं की जमिनीला शेण लावायचे काम माझ्यावर सोपवलेलं असायचं. ते मला अजिबात आवडायचं नाही कारण त्या शेणाचा हाताला लागलेला वास जाता जात नसे. मग मी साबण लावून लावून हात धूत असे व सगळे माझी चेष्टा करत.
काकांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पण सर्व पाव्हण्या रावण्यांचे ते आनंदाने सर्व करत असत. कोकण बघायला दूरचे नातेवाईक यायचे. घरात १७-१८ माणसे असायची. स्वयंपाक चुलीवर. मुंबईकर पाहुणे तर चुलीवर होणार्या साध्या सुध्या स्वयंपाकावर खुश असायचे. घरात शेणाने सारवलेली जमीन असायची. पिवळे बल्ब , पंखे तर नाहीच. त्यामुळे झोपाळ्यावर बसण्यासाठी चढाओढ लागायची. बायका स्वयंपाक करून आल्या की आम्हा मुलांना झोपाळ्यावरून हाकलून लावायच्या. तसेच दुपारी जेवणे झाली की त्यांना झोपायचे असायचे. पण आम्हाला झोप कुठली? मग पुन्हा आमची हकालपट्टी!
मग आम्ही वाडीत जायचो. नारळाचे पडलेले झाप गोळा करायचे आणि नारळाच्याच झाडाखाली पसरायचे. मग सगळे त्यावर बसायचो आणि गप्पागोष्टी सुरु व्हायच्या. जोडीला समुद्राची गाज! पाण्याच्या आवाजावरून भारती आहे की ओहोटी ते कळायचे. कधी त्या झापांवरच आडवे व्हायचे आणि पानाच्या गर्दीतून तुकड्यातून दिसणारे आभाळ न्याहाळत राहायचे.
त्यावेळी आमच्याकडे गुरे होती. पण पावसाळ्याची तयारी म्हणून वाड्याची डागडुजी करायची असायची. त्यामुळे गुरांना बाहेर बांधलेले असायचे. वाड्याची जमीन करून तो शेणाने स्वच्छ सारवलेला असायचा. मग दुपारी आम्हा मुलांचे वाड्यात बसून झब्बू, तीनशे चार, गुलामचोर, बदामसात, मेंढीकोट असे पत्त्यांचे डाव रंगायचे.
कधी काका फरमान काढायचे.. चला झाप विणायचे आहेत. झापांचे हिर काढायचे आहेत. मग केरसुण्या बनवण्यासाठी हिर काढायचे. काका इतकी घट्ट केरसुणी बांधत असत की केरसुणी झिजली तरी बांधणी सुटायची नाही. त्यावेळी अशी कौशल्ये सुद्धा आत्मसात झाली. कधी नारळ पाडण्याचा कार्यक्रम असायचा. मग चढाओढीने जास्तीजास्त नारळ टोपलीत भरून डोक्यावरून घरापर्यंत आणायचे. वाडीचे शिपणे काढायचे. यामुळे कष्टाच्या कामाची सुद्धा सवय होत गेली.
आमचे शेत डोंगरावर. अर्धा तास डोंगर चढून जायचे ..मग करवंद, जांभळे, अळू यांचा समाचार घ्यायचा.
या शिवाय जोडीला आंबे - फणस सुद्धा असायचे. फणसाची सांदणे, काप्या फणसाची नारळाच्या दुधातील खीर यांवर आम्ही तुटून पडायचो.
संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे समुद्रावर जाणे. तिथे आम्ही मनसोक्त हुंदडायचो. एकदा मी मोठ्या मुलींबरोबर समुद्राच्या पाण्यात गेले. त्यांच्या गुडघ्या एवढे पाणी माझ्या कमरेपर्यंत आले. मोठी लाट आली आणि मी पाण्यात पडले. मग त्या मुली मलाच ओरडू लागल्या, कशाला आलीस आमच्याबरोबर म्हणून! मग समुद्राच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे एका बाजूला खाडी तर एका बाजूला खडकाळ भाग आणि स्मशान, अशी मोठ्ठी रपेट मारली आणि कपडे वाळून गेले. शिवाय घरी सांगू नकोस हं, असा दमही मिळाला.
वाळूचे किल्ले करायचे, पाण्यात जायचे आणि सुर्य समुद्रात बुडाला कि घरी यायचे. स्वच्छ हात पाय धुवून झोपाळ्यावर बसून आधी परवचा म्हणायचा. रामरक्षा, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र म्हणायचे. शेजारपाजारची मुलं एकत्र बसून परवचा म्हणताना आपोआपच नवनवीन श्लोक पाठ केले जायचे. पाढे पाठ होऊन जायचे. मला आठवतंय आम्ही पावकी-निमकी सुद्धा पाठ केली होती.
तोपर्यंत पोटात कावळे ओरडू लागलेले असायचे. रात्रीचे जेवण म्हणजे चुलीवर शिजवलेला घरच्या तान्दुलांचा भात आणि कधी कुळथाचे पिठले किंवा एखाद्या कडधान्याची उसळ असेच असायचे. पण ते अमृताहूनही गोड लागायचे. त्याकाळी भौतिक सुखे फारशी नव्हती, पण भरपूर माणसांना सामावून घेईल एवढे घर होते आणि माणसांची मने मोठी होती.
काळ पुढे जात राहतो. परिस्थिती बदलते, त्याबरोबर माणसेही बदलतात. पण आठवणी मात्र कायम राहतात. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटलेच आहे.
आता लठ्ठ झालेली टीवी समोर बसलेली, मोबाईलवर गेम खेळणारी मुले पहिले कि वाटते, त्यांना सुद्धा टीवी, कॉम्प्युटर पासून लांब अशा एखाद्या खेड्यात पाठवावे आणि मनसोक्त हुंदडू द्यावे.


वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
खुप सुरेख लिहिलेय.
व्वाह.. भारी लिहिले आहे.
पाकृ दिली आहे
आठवणी आवडल्या. आपल्या
फोटो
छान!
खरे आहे. माझ्याकडे फोटो
अतिशय सुंदर ठिकाण आहे हे!
होय, फारच सुन्दर आणि शांत
कोळेश्वराच्या मंदिरातील
कोळेश्वराचे मंदिर
फक्त तेवढा 10 टक्के भगवा कलर
प्लस वन.
काप्या फणसाच्या गर्यांची खीर ( ४ माणसांसाठी)
धन्यवाद.
सुंदर मनोगत !
खरे आहे
आमची वाडी
नारळी-पोफळीची वाडी कोणत्याही
कात्री जास्वंद सुंदरच!शिवाय
कात्री जास्वंद खूप फुलली की,
वा सुंदर , तुमचा गाव कोणता?
वडखळ-अलिबाग रस्त्यावरच्या
वाह! असे काही वाचले की
सुन्दर
छान गेले तुमचे बालपण. चांगले
धन्यवाद
फार छान लेख
कोकण खुउप छान आहे. खरंच भेट
सुंदर!
अजूनही
अजूनही
गाव बरेचसे तसेच आहे. पण
अगदि
सुरेख लेख.
धन्यवाद
सुंदर !!!!
धन्यवाद
प्रसन्न
:) ___/|\___
किती रम्य!!
सुरेख.
खूप सुंदर लिहिलंय. कोकणातलं
खुप रम्य आठवणी आणि जिवंत
कोळेश्वर