Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 11/29/2016 - 10:20
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
...सारंगची भानगड ऐकून मित्रमंडळीत एकदम गडबड उडाली. मध्यमवर्गीय मानसिकता असलेल्या आमच्या मित्रमंडळींची फार मोठी पंचाईत झाली खरी. त्याला आता कसे सुनवायचे, किंवा त्याची मित्रमंडळींतून कशी हकालपट्टी करायची याबद्दल एकत्र व खाजगीत चर्चा झडू लागल्या. खरे तर त्याचा हा वैयक्तिक प्रश्र्न होता आणि आमच्यापैकी कोणालाही त्यात नाक खुपसायची गरज नव्हती. पण समाजाच्या संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावरच असल्यासारखी आमची मंडळी व त्यांच्या बायका वागत होत्या. सारंगने सध्याच्या नैतिक अधिष्ठानाला जोरदार धक्का दिला व आमच्या मित्रमंडळींना व त्यांच्या बायकांना तोंडघशी पाडले. त्यांना समाजात तोंड दाखविण्यास जागा उरली नाही असे त्यांचे म्हणणे होते. बायकांनीही फारसा विचार न करता नवऱ्यांच्या हो ला हो मिळविण्यातच आपली खरी वडपूजा आहे अशा ठामसमजुतीने त्यांच्या विचाराभोवती स्वत:चे धागे गुंडाळले. यात त्या बाईचेही म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे हे त्या सोयिस्कररित्या विसरल्या. सारंग काय म्हणतोय याचा विचार न करता हे सगळे चालले होते. तो सांगून सांगून दमला की त्याचीही बाजू कोणीतरी ऐकावी. पण नाही. पुरुष मंडळी खरे तर त्याच्यावर जळत होती. अशी सुंदर स्त्री त्याच्या नशिबी यावी याचा सगळ्यांनाच मत्सर वाटत होता. मत्सराने विचारांना तिलांजली दिली व त्याच्या धुरात आमच्या मैत्रीचा जीव घुसमटला. सारंगने गावाहून एका बाईला पळवून आणले होते. दुर्दैवाने तिचे लग्न झाले होते. त्यामुळे हे सगळे मोहोळ उठले होते. असो. आज याचा तुकडा पाडायचा असे ठरवून सगळे भेटणार होते. अखेरीस सगळे समीरच्या घरी जमले. बायकांनीही हट्ट धरल्यामुळे सारंगच्या प्रेमपात्रासही हजर होण्यासाठी हुकुम सोडला गेला होता. आता तुम्ही विचाराल की सारंगने हे सर्व कसे काय कबूल केले. एकतर त्याला तो याला यशस्वीपणे तोंड देईल याची त्याला खात्री असावी. दुसरे म्हणजे आम्ही शाळेपासून मित्र असल्यामुळे त्याला हे बंध तोडणे जड जात असावे आणि तिसरे पण मुख्य म्हणजे समाजातील अत्यंत सामान्य विचारांच्या माणसांवर व त्यांच्या सामान्य विचारांवर आसूड ओढण्याची एकही संधी तो सोडत नसे. ग्लास भरल्यावर चर्चा सुरु झाली. प्रत्येकाने त्याचे हे वागणे कसे आवडले नाही, त्याच्या अशा वागण्याने त्यांचीही कशी बदनामी होते इ.इ. ठासून सांगितले. बायकांना खरे तर यात काहीच रस नव्हता. त्यांना रस होता त्यांच्या प्रेमकहाणीत. ते एकमेकांना कसे भेटले, तिच्या नवऱ्याने आता याचा सूड घेतला तर.....म्हणजे त्यांना या कहाणीच्या सिरियलमधे खरा रस होता. पार्वती मात्र गुपचुपपणे एका खिडकीजवळ खुर्चीत बसली होती. फारच झाले की खिडकीबाहेर तंद्रीत नजर लावण्याचे नाटक करीत होती. पुरुष मंडळी तर चोरुन तिच्याकडे चोरुन पहाण्यात गर्क होती. एका दोघांना तिच्याकडे पाहताना सारंगने त्यांना पकडले सुद्धा. त्यांच्या ओशाळलेल्या हास्याकडे पहात त्याने नुसते स्मितहास्य केले. पण त्या हास्याने आमच्या सगळ्यांचे पितळ उघडे पाडले हे मात्र मान्य करायलाच हवे. असो. आता तुम्हाला प्रकरण काय आहे याची कल्पना आली असेल्. अखेर सांरंगने तोंड उघडले. ‘‘मला कल्पना आहे की तुमच्या चारित्र्य या विषयीच्या भ्रामक समजुतींना फार मोठा धक्का बसलाय. अर्थात मी ‘तुम्हाला काय करायचे आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसून?’ असे सहज विचारु शकलो असतो पण मी तसे करणार नाही. त्याची कारणे नंतर पाहू. पण माझी बाजू मांडण्याआधी मी तुम्हाला एक कथा सांगतो. नंतर काही प्रश्र्न विचारतो. त्याची उत्तरे प्रामाणिकपणे देण्याची गरज तुम्हाला आहे. बहुदा त्यानेच हे प्रकरण येथेच संपेल. नाही संपले तर मी तुमच्या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे देईन. या प्रश्र्नांची उत्तरे येथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांनीही द्यायची आहेत कारण त्यांनी एका स्त्रिला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अजून एक. हे सगळे झाल्यावर आणि तुम्हाला माझी बाजू समजा पटली तर झालं गेलं सगळं विसरुन पूर्वीप्रमाणे आपले संबंध रहावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेला तुम्ही प्रामाणिकपणे मान द्यावा असे माझे मागणे आहे. ‘‘माझी अजून एक अट आहे. माझे बोलून झाल्यावर सगळ्यांच्या नावाने चिठ्ठ्या टाकाव्यात व प्रत्येकाने त्याने केलेल्या कुठल्याही स्त्रिवरील अन्यायाची हकिकत सांगावी. मग ती कोणीही असो..प्रेयसी, बायको, आई, बहीण मैत्रिण...इ. इ. आयुष्यात कुठल्याच स्त्रीवर अन्याय केलाच नाही असे होऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना अगदी जवळून ओळखतोच. मान्य असेल तर चिठ्ठ्या टाका.’’ सगळ्यांनी अडखळत होकार दिल्यावर चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. ..अर्थात त्याची ही अट कशाला मान्य केली, असे सगळ्यांना वाटले असणार या बद्दल शंकाच नाही. सात क्रमांक लावण्यात आले. समीरचा दुसरा क्रमांक आला. आठवा सारंग म्हणाला, ‘‘तर ऐका तर... शूरसेन देशात एक मथुरा नावाची नगरी होती. तेथे शूद्र जातीचा एक माणूस रहात होता. तो बुद्धीमान, कलेचा व सौंदर्याचा मोठा भोक्ता होता. मित्रामित्रांमधील कलह मिटविण्यात तर त्याचा हात कोणीही धरत नसे. तो त्याच्या या गुणामुळे एवढा लोकप्रिय झाला की त्याला सर्वजण कलह-कंटक म्हणून ओळखू लागले. एकदा कलहकंटकाने एका चित्रकाराने रंगविलेले कुठल्यातरी स्त्रीचे तैलचित्र पाहिले. ते चित्र पाहताच तो कामातूर झाला व म्हणाला, “महाराज या चित्रात भरपूर विरोधाभास भरलेला दिसतोय.” चित्रकाराने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर त्याने त्याच्या विधानापुष्ट्यर्थ खालील निरीक्षणे नोंदविली- ‘एवढी सुंदर स्त्री सामान्य, सभ्य घरात जन्माला येणे जरा अशक्यच वाटते पण तिच्या शांत, नम्र चेहऱ्यावरुन ती एका घरंदाज घरातील वाटते. तिचा चेहरा तरुण व शरीर एखाद्या तरुण वयातील स्त्रीसारखे दिसत आहे पण तिच्या डोळ्यातील भाव एखाद्या प्रौढ अनुभवी स्त्रीसारखे दिसत आहेत. तिने केसाची एकच वेणी घातली आहे पण तिचा पती परगावी गेल्याच्या इतर खुणा दिसत नाहीत. तिच्या फक्त उजव्या अंगावर नखक्षते दिसतात म्हणजे बहुधा ती एखाद्या वयस्कर माणसाची पत्नी असावी व ती असमाधानी असावी. रतिसुखापासून वंचित राहिलेल्या या स्त्रीचे चित्र तू कुठे काढले आहेस? कोणाची पत्नी आहे ही?’’ त्याने बांधलेले आडाखे बरोबर ठरल्याने त्या चित्रकाराने त्याचे अभिनंदन केले व म्हणाला, “उज्जैनीचा प्रसिद्ध सार्थवाह अनंतकीर्तिची ती पत्नी आहे. तिच्या नितंबाच्या मोहक हालचालींमुळे तिचे नाव नितंबावती पडले आहे. मी तिला प्रथम पाहिले तेव्हाच तिचे सौंदर्य माझ्या मनात भरल्यामुळे मी लगेचच तिचे तैलचित्र रंगविले.’’ कलहकंटक त्या चित्राकडे पहात तिच्या प्रेमातच पडला. तो इतका कामातूर झाला की त्याने तिच्या दर्शनासाठी तडक उज्जैनिचा रस्ता धरला. ज्योतिषाचा वेष करुन तो भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तो तिच्या घरात शिरला. तेथे त्याला त्याच्या आराध्यदेवतेचे दर्शन झाले. तिला प्रत्यक्ष पाहताच तिला प्राप्त करण्याची त्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली. तिच्या दर्शनाने तृप्त झाल्या झाल्या त्याने गावातील प्रतिष्ठितांची गाठ घेतली व स्मशानाचा राखणदार म्हणून ठेवण्याची त्यांना विनंती केली. अर्थातच त्या जागेवर काम करण्यासाठी कोणी मिळत नसल्यामुळे त्याची ती विनंती लगेचच मान्य करण्यात आली. नंतर त्याने एका अर्हंतिका नावाच्या श्रमणिकेशी संधान बांधले व प्रेतांवरील अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊन तिला खूष केले. अर्हंतिकेकडून त्याने नितंबवतीला अनेक निरोप पाठविले पण ते सगळे प्रयत्न वाया गेले. अर्हंतिकेने शेवटी त्याला समजावून सांगितले की घरंदाज स्त्रिया अशा कारस्थानांना बळी पडून गैरमार्गाला लागणे अवघडच असते. हे पटल्यावर त्याने अर्हंतिकेला तिच्याकडे परत एकदा जाण्यास सांगितले व खाजगीमधे तिला निरोप सांगण्यास सांगितले, ‘मी जग फार जवळून पाहिले आहे. जगाचे भलेबुरे मार्ग मला चांगलेच माहीत आहेत पण मी आता सगळे सोडून योगाभ्यासाच्या मागे लागलोय. मी आपल्यासारख्या कुलीन स्त्रीला भ्रष्ट करण्याचा विचार तरी कसा करेन? मी तुमची परिक्षा घेत होतो. अर्थात आपण त्यात उत्तीर्ण झाला आहात हे सांगणे न लगे. आता तुम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी एवढेच माझे परमेश्वराजवळ मागणे आहे. पण आपला पती पंडुरोगाने ग्रस्त आहे त्यामुळे ते अवघड आहे. आपण काळजी करु नका. आपण वृक्षवाटिकेमधे या. तेथे मी एका मांत्रिकाला पाठवतो. तेथे आपण आपले पाऊल त्याच्या हातात ठेवा व त्याला त्याचे मंत्र म्हणू द्या. एकदा हे झाले की प्रणयकाळात त्याच पायाने तुमच्या पतीच्या छातीवर एक लाथ मारा. याने त्याला त्याची शक्ती परत मिळेल व त्याच्यापासून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. एवढेच नाही तर तो शेवटपर्यंत आपल्या आज्ञेत राहील याची मी खात्री देतो..’ ‘मला खात्री आहे हा निरोप मिळाल्यावर ती तुझ्याबरोबर येण्यास तयार होईल. मी रात्री वृक्षवाटिकेत गेल्यावर तू तिला तेथे घेऊन ये. मी तुझे उपकार या जन्मी विसरणार नाही.’ अर्हंतिकेने त्याने सांगितल्याप्रमाणे सगळे केले. त्याच रात्री कलहकंटक आनंदाने वृक्षवाटिकेत गेला. अर्हंतकिनेही नितंबावतीचे मन तेथे जाण्याबद्दल वळविले. मंत्र उच्चारणावेळी त्याने तिच्या पायाला हलकासा हात लावला व चलाखीने तिच्या त्या पायातील पैजण काढून घेतले. एवढेच नाही तर त्याने तिच्या मांडीच्या आतील बाजूस एका सुईने जखम केली व तेथून पळून गेला. ती घाबरली व स्वत:च्या मूर्खपणाला दूषणे देत तिने त्या माणसाचा उद्धार केला व घरी परतली. घरी परत आल्यावर तिने ती जखम धुतली व त्यावर मलमपट्टी केली. आजारी असल्याचा बहाणा करत तिने तिच्या पायातील दुसरे पैंजण काढले व झोपी गेली. काही दिवस असेच गेले. इकडे हा बदमाष अनंतकीर्तिकडे ते पैजण विकण्यास गेला. अनंतकीर्तिने ते पैंजण त्याच्या पत्नीचे आहे हे ओळखले व त्याला ते कुठे सापडले हे दरडावून विचारले. पण तो गप्प बसला. खोदून विचारल्यावर त्याने ती हकिकत व्यापार्यांच्या समितीसमोरच सांगेल अशी अट घातली. अनंतकीर्तिने ताबडतोब त्याच्या पत्नीकडे तिची पैजणे पाठवून देण्यास सांगितले. तिने घाबरुन उत्तर दिले, ‘मी रात्री वृक्षवाटिकेत गेले असता माझे एक पैंजण तेथे पडले आहे. बराच शोध घेऊनही ते सापडले नाही पण मी दुसरे तुमच्याकडे पाठवीत आहे.’ ही माहिती मिळाल्यावर अनंतकिर्तीने ते पैंजण व कलहकंटकाला बरोबर घेऊन व्यापार्यांचे समिती कार्यालय गाठले. त्या बैठकीत उलट तपासणीला उत्तर देत असताना त्याने त्याला ते पैंजण कुठे व कसे सापडले ते सांगितले, “मी स्मशानभूमित रखवालदाराचे काम करतो हे आपल्याला माहितच आहे. आपणच मला ते काम दिले आहे. मी तेथेच राहतो व रात्री स्मशानात झोपतो कारण काही लोभी निशाचर रात्री प्रेते जाळण्यास येतात. त्या दिवशी रात्री मला एक बुरखा घेतलेली स्त्री एक अर्धवट जळालेले प्रेत चितेवरुन खाली खेचताना दिसली. माझ्या कर्तव्याला जागून, न घाबरता मी त्या स्त्रीला पकडले. झालेल्या झटापटीत तिचे हे पैंजण माझ्या हातात आले व तिच्या मांडीवर माझ्या हातातील शस्त्राने जखमही झाली. पण दुर्दैवाने ती पळून गेली. ते हे पैजण, याचे पुढे काय करायचे ते आपण ठरवा!’ त्याच्या कबुलीजबाबावर चर्चा झाल्यावर व मांडीवरील जखमेची खातरजमा केल्यावर सर्वानुमते नितंबावती एक चेटकीण आहे असा निकाल झाला. झालेल्या अपमानाने दु:खी होत तिने आत्महत्या करण्यासाठी स्मशान गाठले. तिला पाहिल्याबरोबर या बदमाषाने तिला गाठले. तिच्या हातापाया पडून, गयावया करत त्याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, ‘हे सुंदरी मी तुला प्राप्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले व शेवटी हा मार्ग स्वीकारला. मी तुझ्यावाचून राहूच शकत नाही. माझ्यावर कृपा कर व माझी हो! तुझ्याशिवाय मला कोण आहे? मी तुझा दास होऊन राहीन.’’ अनेकवेळा तिच्या पाया पडत व अनेक वचने देत त्याने ही विनंती वारंवार केली. शेवटी तिलाही कोठे जाण्यास जागा नसल्यामुळे तिने त्याची विनंती मान्य केली. नंतर ते सुखाने संसार करु लागले... आता माझे प्रश्र्न... १ नितंबावती अपत्यसुखासाठी तडफडत होती, ते चूक आहे का? ती स्त्रिसुलभ भावना नाही का ? २ जर एखाद्या स्त्रिला मूल नाही म्हणून आजही घराबाहेर काढले जाते तर ती नवऱ्यापासून मुल होत नाही म्हणून नवरा सोडू शकत नाही का ? ३ रतिसुख हे एक जिवनाचे महत्वाचे अंग आहे तर नितंबावतीने स्वत:ला त्यापासून वंचित का ठेवावे ? ४ जर नितंबावती तिच्या नवऱ्याला शारीरिक सूख देऊ शकली नसती तर त्याने काय केले असते. ५ आहे तसेच आयुष्य जगून दोघांचेही आयुष्य बरबाद झाले असते. आणि ते केवळ समाजाच्या दबावाखाली. हे बरोबर आहे का ? ६ मी एखाद्या स्त्रिला जर या प्रकरणात अशी मदत केली आणि ती तिच्या नवऱ्याच्या खिजगणतीतही नसल्यास माझे काय चुकले ? ७ या प्रकरणात मी कोणावर अन्याय केला आहे ? थांबा ! उत्तरे देण्याआधी तुम्हालाही बोलायचे आहे हे लक्षात ठेवा. तुम्हालाही प्रश्र्न विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या आणि मग उत्तरे द्या.. अशी माझी विनंती आहे...'' एवढे बोलून त्याने एक मोठा श्र्वास घेतला व काय परिणाम साधला आहे हे पाहण्यासाठी श्रोत्यांवरुन एक भेदक नजर फिरविली... क्षणभर तेथे स्मशान शांतता पसरली.... बायकांची कुजबुज थांबली. त्या त्यांच्या नवऱ्यांकडे पाहू लागल्या. त्याच्या नजरेतच अनेक प्रश्र्न दडलेले होते.... जयंत कुलकर्णी. या लिखाणातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. नितंबावतीची कहाणी मी अनुवाद केलेल्या दशकुमारचरितम्मधून घेतलेली आहे. मुळ लेखक आचार्य श्री दण्डी. (ही पुस्तकाची जहिरात नाही. मी ही कथा लिहिण्याचे ते पुस्तक वाचल्यावाचल्याच ठरविले होते)
  • Log in or register to post comments
  • 21948 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 12/02/2016 - 20:48

In reply to श्री. मदणबाण यांची by जयंत कुलकर्णी

Permalink

श्री. मदणबाण यांची

श्री. मदणबाण यांची प्रतिक्रिया वाचल्यावर मला ही तसेच वाटले. इतर तिघांचे प्रतिसाद वाचल्यावर मला त्याची खात्रीच वाटू लागली आहे. लोकं घाई करतात. शेवटपर्यंत वाचत नाहीत, :-) ठीक आहे.... जयंत काका यू टू ? आपली कथा वाचली तेव्हा खालील ओळ वाचनात आली आणि तेव्हा मी कधी काळी वाचलेली वेताळ पंचवीशीची आठवण ट्रिगर झाली ! एवढेच नाही तर त्याने तिच्या मांडीच्या आतील बाजूस एका सुईने जखम केली व तेथून पळून गेला. कारण त्या कथेतील अशाच आशयाची ओळ जब राजकुमारी सो जाये तो उसकी बायीं जाँघ पर त्रिशूल का निशान बनाकर उसके गहने लेकर चले आना। बर्‍याळ काळाने ती कथा आठवली ती केवळ आपल्या या लिखाणामुळेच ! यात आपल्या लेखना विषयी कोणताही किंतु परंतु माझ्या मनास शिवला देखील नाही, तसेच आपल्या लिखाणाची कोणत्याही प्रकारे चेष्टा करण्याचा किंवा त्यास कमी लेखण्याचा कोणताही मानस नव्हता ! भरपुर मनमोकळ्या गप्पांचा काळ आपण दोघांनीही व्यतित केल्याचे स्मरते, असं असु देखील आपणास माझ्या प्रतिसादानुत काही इतर वाटले याचे आता मलाही आश्चर्य वाटत असुन... काका आपने मेरुकु ओळख्याच नही असे म्हणावे लागेल. :) बाकी इतर ३ प्रतिसाद तसे का आले ते लिहणारे प्रतिसादकच जाणो... यात माझा तर्क काही नाही. असो... आपण असेच लिखाण करत रहावे ही मनःपूर्वक विनंती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikre
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sat, 12/03/2016 - 07:01

In reply to श्री. मदणबाण यांची by मदनबाण

Permalink

मदनबाण,

मदनबाण, मला पहिल्यांदा बिलकूल तसे वाटले नव्हते. पण आपला प्रतिसाद वाचून इतरांच्या मनात तशी शंका उत्पन्न झाली असावी व त्यांनी तसे प्रतिसाद टाकले असावेत. मग मला तसे वाटले हे मान्य करायला हवे. तसे माझ्या मनात आले खरे. असो. तसे काही आपल्या मनात नसेल तर अशी शंका घेतल्याबद्दल मी आपली माफी मागतो. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Fri, 12/02/2016 - 11:59

In reply to +११ by पिलीयन रायडर

Permalink

चोरी पकडल्याच्या आविर्भावात

चोरी पकडल्याच्या आविर्भावात का वरचे प्रतिसाद येत आहेत? की मलाच तसा भास होतोय.
हा नक्कीच तुमचा भास आहे , बाणाने टाकलेली कथा तितकीच उत्कंठावर्धक आहे आणि इतकी मोठी कथा प्रतिसाद म्हणून त्याने टाकलीय चोरीबिरी कोणी म्हंटलच नाहीये (मी तरी नाही) हे म्हणजे मी गोरा आहे असं म्हंटल तर समोरच्या माणसाला वाटावं कि त्याला सावळा म्हंटल असं वाटत तस झालं :)
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 12/02/2016 - 18:33

In reply to चोरी पकडल्याच्या आविर्भावात by माझीही शॅम्पेन

Permalink

+1

+1 हेच म्हणतो, चोरीबिरीचं आमच्या मनात काही नाही हो !!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 12/02/2016 - 20:30

In reply to +1 by जव्हेरगंज

Permalink

तसं असेल तर चाम्गलंच आहे की

तसं असेल तर चाम्गलंच आहे की हो! फक्त गैरसमज होण्याचा थोडा स्कोप असल्याने जयंत काकांना ते थोडं हर्ट्फुल वाटु शकतं असं वाटलं. पण तसा म्हणण्याचा अर्थच नसेल तर मग काही प्रश्नच नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश माने on Mon, 12/05/2016 - 11:05

In reply to +११ by पिलीयन रायडर

Permalink

जयंत काकांवर यांच्यावर

जयंत काकांवर यांच्यावर कथाचोरीचा आळ घेणे हा माझा तरी उद्देश नाही. फक्त मदनबाण यांचा तो एव्हढा मोठा प्रतिसाद आहे म्हणून मी तसे म्हटले आहे. जयंत काकांनी आधीच त्यांच्या कथेत त्यांनी नितंबावतीची कथा कुठून घेतली आहे त्याचा संदर्घ दिलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 12/02/2016 - 00:14

In reply to हो बरोबर आहे. अशा अनेक कथा by जयंत कुलकर्णी

Permalink

प्रतिसाद ऑफ द इयर !

ही चांदोबातली, साधी `विक्रम-वेताळची कथा' आहे, असा त्याचा अर्थ असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by निओ१ on गुरुवार, 12/01/2016 - 22:28

In reply to ही कथा वाचताच माझ्या टकुर् by मदनबाण

Permalink

तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ

तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ कथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 12/02/2016 - 08:24

In reply to तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ by निओ१

Permalink

याचा अर्थ मला समजला नाही.

याचा अर्थ मला समजला नाही. समजावून सांगता का जरा ?
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 12/02/2016 - 12:03

In reply to तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ by निओ१

Permalink

याचा अर्थ मला समजला नाही.

याचा अर्थ मला समजला नाही. समजावून सांगता का जरा ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 12/02/2016 - 20:31

Permalink

१ नितंबावती अपत्यसुखासाठी

१ नितंबावती अपत्यसुखासाठी तडफडत होती, ते चूक आहे का? ती स्त्रिसुलभ भावना नाही का ? अपत्यसुखासाठी तडफडणे , स्त्रिसुलभ भावना या नैसर्गिक गोष्ट आहेत. यासाठी वैद्यकीय उपाय करणे( यात शुक्राणू दान हा हि भाग येतो) आणि ते यशस्वी झाले नाहीत तर मूल दत्तक घेणे हा उपाय आहे. २ जर एखाद्या स्त्रिला मूल नाही म्हणून आजही घराबाहेर काढले जाते तर ती नवऱ्यापासून मुल होत नाही म्हणून नवरा सोडू शकत नाही का ? मूल नाही म्हणून स्त्रीला आजही घराबाहेर काढले जाते हि घोडचूक आहे. म्हणून नवऱ्यापासून मुल होत नाही म्हणून नवरा सोडून देणे हि दुसरी घोडचूक करणे बरोबर आहे का? त्याने गे मारली म्हणून मी वासरू मारतो या तर्हेचा हा युक्तिवाद आहे. ३ रतिसुख हे एक जिवनाचे महत्वाचे अंग आहे तर नितंबावतीने स्वत:ला त्यापासून वंचित का ठेवावे ? रतिसुख हा काही जीवनाचा एकमेव आणि अविभाज्य भाग नाही. ते न मिळणे हे चूक आहे किंवा दुर्दैव पण त्यासाठी अनैतिक मार्गाचा उपयोग करणे म्हणजे मी गरीब आहे म्हणूच भ्रष्टाचार करतो असा युक्तिवाद झाला. ४ जर नितंबावती तिच्या नवऱ्याला शारीरिक सूख देऊ शकली नसती तर त्याने काय केले असते. हा त्या पुरुषाच्या नैतिक बैठकीचा भाग आहे. ५ आहे तसेच आयुष्य जगून दोघांचेही आयुष्य बरबाद झाले असते. आणि ते केवळ समाजाच्या दबावाखाली. हे बरोबर आहे का ? शरीरसुख हा आयुष्याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परंतु जर विभक्त व्ह्याचे असेल तर ते राजरोस व्हावे. चोरी मारीने नव्हे ६ मी एखाद्या स्त्रिला जर या प्रकरणात अशी मदत केली आणि ती तिच्या नवऱ्याच्या खिजगणतीतही नसल्यास माझे काय चुकले ? व्यभिचार किंवा भ्रष्टाचार हा कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. ७ या प्रकरणात मी कोणावर अन्याय केला आहे ? त्या स्त्रीचं नवऱ्यावर. वरील सर्व प्रतिसाद मी मागच्या पिढीचा प्रतिनिधी असल्यामुळे माझ्या बुद्धीने दिले आहेत. नव्या पिढीचे लोक कदाचित स्वैर शारीरिक संबंधाला मान्यता देणारे असतील तर त्यांच्या दृष्टीने वरील प्रतिसाद गौण असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Fri, 12/02/2016 - 23:53

Permalink

खूप सुंदर कथा लिहील आहात्त.

खूप सुंदर कथा लिहील आहात्त. पुढचा भाग असला तर जरूर टाका. कधी कधी आपल्याला प्रश्नांची उत्तर माहित असतात पण ती मनातल्या मनात सुध्दा आपण उच्चारात नाही. तीच उत्तर जर दुसऱ्याने दिली तर बर वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by वीणा३ on Sat, 12/03/2016 - 01:23

Permalink

१ नितंबावती अपत्यसुखासाठी

१ नितंबावती अपत्यसुखासाठी तडफडत होती, ते चूक आहे का? ती स्त्रिसुलभ भावना नाही का ? => ज्या काळात हि कथा घडली त्याचा विचार करता अजिबात चूक नाही. २ जर एखाद्या स्त्रिला मूल नाही म्हणून आजही घराबाहेर काढले जाते तर ती नवऱ्यापासून मुल होत नाही म्हणून नवरा सोडू शकत नाही का ? => हा अतिशय लॉजिकल प्रश्न आहे. जर त्या स्त्री ला वाटत असेल तर उघडपणे मान्य करून नवऱ्याला सोडावे (आजच ती लेडी सीमोर ची कथा वाचली ). फक्त त्यासाठी त्या त्या समाजात जी लढाई लढावी लागेल त्याचीहि तयारी ठेवावी ३ रतिसुख हे एक जिवनाचे महत्वाचे अंग आहे तर नितंबावतीने स्वत:ला त्यापासून वंचित का ठेवावे ? => वरच्या कथेत नितंबावतीला कुठेही आपल्या नवऱ्याला सोडून जायची इच्छा आहे असा दिसत नाही. फक्त मूल व्हावं म्हणून "आपले पाऊल त्याच्या हातात ठेवा व त्याला त्याचे मंत्र म्हणू द्या" ह्या एकाच अटीला ती तयार झाली. नवऱ्याला समजल्यावरही ती सुरवातीला आत्महत्या करायला निघाली. तिची प्रत्येक कृती तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं आहे असाच दाखवत्ये. कदाचित आत्महत्येला घाबरून किंवा एकटेपणाला घाबरून ती त्याच्या बरोबर राहायला तयार झालीये. तेव्हा तयार झाली जेव्हा तिच्या नवऱ्याने आधीच तिला सोडलंय. तिच वागणं बिलकुल अनैतिक वाटत नाही. ४ जर नितंबावती तिच्या नवऱ्याला शारीरिक सूख देऊ शकली नसती तर त्याने काय केले असते. => माझ्या मते समाजात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी नैतिकतेच्या कल्पना सारख्या आहेत. तसं नसतं तर प्रत्येक पुरुषाने लग्नाबाहेर संबंध ठेवले असते. फक्त त्या मोडल्या तर पुरुषाला कमी त्रास होतो. ५ आहे तसेच आयुष्य जगून दोघांचेही आयुष्य बरबाद झाले असते. आणि ते केवळ समाजाच्या दबावाखाली. हे बरोबर आहे का ? => वरच्या गोष्टी मध्ये आधीच म्हटल्याप्रमाणे नितंबावतीला तिच्या नवऱ्याबरोबर राहण्यात कुठलाही त्रास आहे असं वाटत नाही (कारण काहीही असोत), किंवा तिची बाहेर कुठलाही सुख मिळवायची इच्छा दिसत नाही. त्यामुळे खरं तर तिचं आयुष्य आत्तातरी बरबाद झाल्यासारखं दिसतंय. ज्याच्या बरोबर राहायचं आहे त्या नवऱ्याने हाकलून लावलं, आणि ज्याच्यामुळे अपमान झाला, ज्याने एक घर स्वतःच्या इच्छेसाठी मोडलं त्याच्या बरोबर राहण्याशिवाय पर्याय दिसत नाही (जीव द्यायची भीती, आणि समाजात इतर प्रकारे जगण्याचे मार्ग बंद). ६ मी एखाद्या स्त्रिला जर या प्रकरणात अशी मदत केली आणि ती तिच्या नवऱ्याच्या खिजगणतीतही नसल्यास माझे काय चुकले ? ७ या प्रकरणात मी कोणावर अन्याय केला आहे ? ६& ७ => हे त्या स्त्री ची मनापासून काय इच्छा आहे त्यावर अवलंबून. नितंबावतीच्या गोष्टी मध्ये तिच्या इच्छेविरुद्ध तिला तिच्या नवऱ्यापासून दूर केल गेलं. तसंच जर सारंग ने केलं असेल तर पूर्णपणे चूक. "त्याच्या नजरेतच अनेक प्रश्र्न दडलेले होते" => अमेझिंग शेवट. एक अशी शक्यता कि त्या बायकांपैकी एखादीला आपल्या नवऱ्यापासून सुटका हवी आहे का :D
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 12/04/2016 - 20:45

Permalink

कथा छानच

नितंबावती हे नाव एकदम आक्षी ठ्यां मचाकीय आहे. =)) संस्कृतमध्ये संचाक ग्रूप काढला असता तर अशा नावाच्या नायिकेची कथा फिट्ट बसली असती एकदम. =)) बाकी कथाही मस्तच. विचारप्रवर्तक.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 12/05/2016 - 00:23

In reply to कथा छानच by बॅटमॅन

Permalink

संचाक = ?

ब्याटम्यान, संचाक म्हणजे काय? सांभाळून कसे चालावे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 12/05/2016 - 00:23

In reply to कथा छानच by बॅटमॅन

Permalink

संचाक = ?

ब्याटम्यान, संचाक म्हणजे काय? संभाळून कसे चालावे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 12/05/2016 - 00:24

In reply to कथा छानच by बॅटमॅन

Permalink

संचाक = ?

ब्याटम्यान, संचाक म्हणजे काय? संभाळून चालावे कसे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/05/2016 - 00:37

In reply to संचाक = ? by गामा पैलवान

Permalink

मचाकसारखे संचाक ओ गामाशेठ.

मचाकसारखे संचाक ओ गामाशेठ.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 12/05/2016 - 00:50

In reply to मचाकसारखे संचाक ओ गामाशेठ. by बॅटमॅन

Permalink

हां कळलं पण ....

हां कळलं काय ते, पण एक कळलं नाही. तो शब्द उच्चारायला तुम्ही एव्हढे लाजता कसले? ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com