✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तस्मै श्रीगुरवे नमः

स
सतिश गावडे यांनी
Tue, 07/19/2016 - 02:28  ·  लेख
लेख
"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड" आपल्या बोलण्यात "अशुद्ध" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली. शाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक. आमचं गाव वडगांवकोंड गोरेगांवपासून तीन किमी अंतरावर. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंतच. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ना. म. जोशीलाच प्रवेश घ्यावा लागे. तेव्हा गोरेगांव ते वडगांवकोंड रस्ता कच्चा होता. बस सेवेचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गोरेगांवला जाण्यासाठी पायी चालत जाणे, सायकलने जाणे, बैलगाडीने जाणे किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे हेच पर्याय होते. शेवटचा पर्याय उपलब्ध असणारे भाग्यवान पुर्ण गावात हाताच्या बोटावर मोजण्याईतके कमी होते. रस्त्यात वाटेत एक ओढा लागतो. पावसाळ्यात गावाशेजारून वाहणार्‍या काळ नदीला पूर आला की रस्ता पाण्याखाली जातो. आम्हा शाळकरी मुलांसाठी शाळेत पायी चालत जाणे हा एकमेव पर्याय होता तेव्हा. ना. म. जोशीत तेव्हा नविन प्रवेश देताना तुकडी कशी ठरवत असत याची मला काही कल्पना नाही. मात्र पाचवीच्या तेव्हा अ पासून अगदी ग पर्यंत तुकड्या होत्या. सर्वात हुशार मुलं अ वर्गात तर सर्वात ढ, नापास झालेली मुलं ग वर्गात असा काहीसा मामला होता. मी खेडयातला असलो तरी त्यातल्या त्यात हुषार असल्याने मला ब वर्ग मिळाला असावा. पहिल्या तासाला वर्गशिक्षिकेने दिलेल्या वेळापत्रकानूसार तो हिंदीचा तास असावा. एक उंच शिडशीडीत काळे सावळे सर वर्गावर आले होते. वय पन्नाशीचं किंवा थोडंफार कमी असावं. नाकावर जाड भिंगाचा चष्मा. करारी आणि खर्जातला आवाज. पाहताक्षणी दरारा वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव शेख सर हे नंतर वरच्या वर्गात शिकणार्‍या मुलांकडून कळलं. शेख सर हिंदी आणि पी. टी. चे तास घ्यायचे. खो खो हा बहूधा त्यांचा आवडता खेळ असावा. मुलांचा खोखोचा खेळ चालू असला की सर त्या मुलांना मार्गदर्शन करताना त्यांच्यातील एक होऊन जायचे. सर हिंदीही खुप छान शिकवायचे. वर्गात शिकवतानाही ते खेळाच्या मैदानाईतकेच रंगून जायचे. मग ती "मेरा छाता" सारखी कविता असो किंवा "मामा की ऐनक" सारखा धडा असो, सर आवाजात चढ उतार आणून नाट्यमयता निर्माण करायचे. मुलं अगदी रंगून जायची. त्यातूनच एखाद्या मुलाचं लक्ष नसलं ते आवाज वाढवायचे. हातातील डस्टर त्या विद्यार्थ्यावर फेकल्याचा अभिनय करायचे. मात्र तो डस्टर ते हाताच्या मागे हळूच पाडायचे. मुलं खळाळून हसत. सर हिंदीचे व्याकरण शिकवायचे तेव्हा तर धमाल असायची. ते "यह गमला हैं, वह गमले हैं" मुलं त्यांच्या मागोमाग एका सुरात म्हणायची. मला तिमाही परीक्षेत सार्‍याच विषयांत चांगले मार्क्स मिळालेले सरांना कळलं. त्यानंतर सर माझी विचारपूस करु लागले. माझ्यावर विशेष लक्ष देऊ लागले. त्यांनी एकदा मला माझ्या घरच्यांबद्दल विचारले असता आम्हा दोघांमधला वेगळाच ऋणानुबंध समोर आला. माझे बाबाही सरांचे विद्यार्थी होते. ते कळल्यानंतर सर माझ्या बाबांकडेही माझ्या अभ्यासाची चौकशी करु लागले. पाचवीची परीक्षा झाली. निकाल लागला. मी पाचवी ब वर्गात पहिला आलो होतो. पुढचा वर्ग सहावी ब. यावेळी सर आमच्या वर्गाला कोणताच विषय शिकवायला नव्हते. शाळा सुरु होऊन दोन तीन दिवस गेले. एके दिवशी ते आमच्या वर्गाच्या बाहेर आले. सरांबद्दल इतर शिक्षकांमध्ये खुप आदर होता. वर्गावर शिकवणारे शिक्षक बाहेर गेले. त्यांचे सरांशी काही बोलणे झाले. "गावडे, तुला शेख सरांनी बाहेर बोलावलं आहे." त्या शिक्षकांनी आत येताच मला सांगितले. मला कळेना. मी सरांचा तसा लाडका विद्यार्थी जरी झालो होतो तरी मला सरांची तितकीच भीतीही वाटायची. "ऐक, उद्यापासून तू अ वर्गात बस. मी प्राचार्यांशी तुझी तुकडी बदलण्याबद्दल बोललोय. त्यांनी परवानगी दिली आहे." माझीही खुप ईच्छा होती अ वर्गात बसण्याची. कारण अ वर्ग तेव्हा हुषार मुलांचा वर्ग मानला जायचा आणि मला त्या वर्गात बसायचे होते. माझी ही ईच्छा अगदी अनपेक्षितपणे पुर्ण झाली होती. शेख सरांनी माझ्याही नकळत माझ्यासाठी प्राचार्यांकडे शब्द टाकला होता. मात्र त्याक्षणी मला अचानक रडू कोसळले. ब वर्गातून अ वर्गात जाताना आपले गावातील सर्व मित्र ब वर्गातच राहणार आहेत हे मला अचानक आठवले. सारे मित्र मागे टाकून अ वर्गातील शहरी मुलांमध्ये जाण्याच्या कल्पनेचा मी आधी विचारच केला नव्हता. आणि याक्षणी मला ते सुचले. सरांनी मला शांत केले. माझ्या रडण्याचे कारण विचारले. मी ही निरागसपणे कारण सांगितले. त्यांनी मला ब वर्गातील माझ्या सर्वात जवळच्या दोन मित्रांची नावे विचारली. मी ती सांगितली. सरांनी त्या दोघांनाही बाहेर बोलावले. "उद्यापासून तुम्ही दोघे सतिशसोबत अ वर्गात बसा". सर सहावी अ ला हिंदी शिकवायला होते. मी पुन्हा एकदा सरांच्या नजरेसमोर आलो. आमच्या घरी तेव्हा गाई म्हशी होत्या. मी सकाळी शाळेत जायच्या आधी तीन चार तास गुरं चरायला नेत असे. गुरांच्या पाठी अनवाणी माळरानांवर, काट्याकुट्यांमधून वारं प्यायल्यागत हुंदडत असे. एके दिवशी कसा कोण जाणे, गुरांकडे गेलो असताना बाभळीचा काटा पायात अगदी खोलवर रुतला. पायावर भांबूर्डीचा पाला चोळून रक्त थांबवले. लंगडत लंगडत घरी आलो. घरी आल्यावर आईने काटा काढला खरा पण खोलवर गेलेले काट्याचे टोक आतच राहीले. एक एक दिवस जाऊ लागला आणि माझा पाय अधिक अधिक सुजायला लागला. पायात पू झाला. चालता येईनासे झाले. दोन तीन दिवस शाळा बुडाली. शेवटी डॉक्टरकडे जाऊन इलाज करुन घेतला. शाळेत पुन्हा जाऊ लागताच सरांनी माझी शाळेत का येत नव्हतो म्हणून विचारपूस केली. मी जे घडले होते ते सांगितले. सरांनी बाबांना शाळेत बोलावून घेतले. माझ्या पायात चप्पल का नसते म्हणून बाबांची खरडपट्टी काढली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबांनी माझ्यासाठी स्लिपर्स घेतले. केव्हातरी बोलताना सरांनी मला अशफाकबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल सांगितले. तो केमिकल इंजिनीयर झाला होता आणि आय आय टी मद्रास मधून तेव्हा एम टेक करत होता. "इंजिनीयर" या शब्दाशी सरांनी माझी ओळख करुन दिली. सर अशफाकबद्दल भरभरुन बोलायचे माझ्याशी. त्या प्रेमळ बापाला आपल्या हुषार लेकराचे किती कौतुक करु आणि किती नको असे होऊन जायचे. मात्र तेव्हा सर माझ्याही नकळत मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवत होते हे मला खुप उशिरा कळले. सर पाचवी ते सातवी या वर्गांना शिकवायचे. मी आठवीला गेल्यावर त्यांच्याशी माझे प्रत्यक्ष बोलणे कमी झाले. आठवीचा रिझल्ट लागला. सर रिझल्टच्या दिवशी माझ्या वर्गाच्या बाहेर उभे होते. पुन्हा एकदा सहावी ब ला असताना जसे घडले होते तसेच घडले. मुलांचे रिझल्ट देता देता वर्गशिक्षिका सरांना भेटायला बाहेर गेल्या. "गावडे, तुला शेख सर बाहेर बोलावत आहेत", मॅडमनी आत येताच मला सांगितले. "ऐक, तुला बाटू माहिती आहे का?", मी बाहेर जाताच सरांनी मला विचारले. "बाटू बद्दल मी फक्त ऐकलंय. जास्त काही माहिती नाही मला" "बाटू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी. आपल्या लोणेरेला आहे. तिथे इंजिनीयरींगचे शिक्षण मिळते." सरांनी मला समजेल अशा शब्दांत सांगितले. "बाटूला दहा दिवसांचे निवासी शिबीर आहे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी. दहा दिवस तिथेच राहायचे. जेवण वगैरे तिथेच मिळेल. तिथे कॉम्पुटर शिकवणार आहेत. कारखान्यांना भेट द्यायला नेणार आहेत. मी तुझे नाव दिले आहे आपल्या शाळेकडून जाणार्‍या मुलांमध्ये. खुप शिकायला मिलेल तुला. तुझ्या बाबाला सांगतो मी तुला या शिबिराला पाठवायला." सरांनी जर माझे नाव दिले नसते तर माझ्यासारख्या खेड्यातील मुलाचा कुणी कधी विचारही केला नसता तसल्या शिबिरासाठी. पुढे चार वर्षांनी बारावीनंतर मी याच बाटूला इंजिनीयरींगला प्रवेश घेतला. नव्हे, सरांनी अप्रत्यक्षपणे माझे बोट धरुन मला तिथवर नेले होते. मी इंजिनीयरींगला तिसर्‍या वर्षाला असताना एक गंमतीदार प्रसंग घडला. एके दिवशी संध्याकाळी बाबांनी मला "तुला शेख सरांनी भेटायला बोलावले आहे" म्हणून सांगितले. सर माझ्यासाठी निरोप द्यायला बाबांच्या ऑफिसला गेले होते. मी सरांना भेटलो. "अरे माझी मुलगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी कॉम्पुटर करत आहे. तिला एक कॉम्पुटर प्रोग्रामिंगची असाईनमेंट मिळाली आहे. तिला काही ते जमत नाही. मी माझ्या ओळखीतल्या खुप जणांना विचारले. सगळेच आम्हाला नाही जमणार म्हणत आहेत. आपल्या गोरेगांवचा एक मुलगा बाटूला तुला एक विषय शिकवायला आहे. त्याने कदाचित तू हे करु शकशील असे मला सांगितले", सरांनी मला बोलावण्याचे कारण सांगितले. सरांनी असाईनमेंटचा पेपर दाखवला. कॉम्पुटर ग्राफिक्स संदर्भातील ती प्रश्नावली होती. संगणकाला सांख्यिकी विदा पुरवायचा आणि त्या विदापासून विविध प्रकारचे आलेख स्क्रीनवर दाखवायचे अशा आशयाचे प्रश्न होते सारे. मी होतो ईलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनीयरींगचा विद्यार्थी. इंजिनीयरींच्या पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक विषय असतो. मात्र त्यातून मिळणारे कॉम्पुटर प्रोग्रामिंगचे ज्ञान खुपच जुजबी असते. दुसर्‍या वर्षापासून आयटी आणि कॉम्प्युटर वगळता बाकीच्या शाखांचे विद्यार्थी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा नाद सोडून देतात. मी मात्र या विषयाचा मनापासून अभ्यास केला. पुढच्या दोन वर्षात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बर्‍यापैकी येणारा मुलगा अशी माझी कॉलेजमध्ये ख्याती झाली होती. आणि यातूनच शेख सरांपर्यंत माझे नाव गेले होते. आता यातील ग्यानबाची मेख अशी होती की मला आकडेमोड किंवा तार्किक बाबींचे प्रोग्रामींग जमायचे सी प्रोग्रामींग ही भाषा वापरुन. सरांच्या मुलीची असाईनमेंट ग्राफिक्स प्रोग्रामींगमधील होती. मला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. मात्र मी सरांना तसे सांगितले नाही. ज्या गुरुंनी आजवर माझे बोट पकडून मला मार्ग दाखवला त्या गुरुंनी आज पहिल्यांदा माझ्याकडे काही मागितले होते. माझी गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली होती. मी सरांकडून आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढच्या तीन चार दिवसांत कॉलेजच्या वाचनालयातील "ग्राफिक्स प्रोग्रामिंग" संबंधीच्या पुस्तकांचा फडशा पाडला. प्रकरण मी समजलो होतो तितके अवघड नव्हते. मला जमण्यातला प्रकार होता. आणि जमलेही. मी तयार केलेल्या प्रोग्राम्सच्या प्रिंटस काढून घेऊन ते प्रोग्राम्स सरांच्या मुलीला समजावून सांगितले. तिला स्वतः समजून घेऊन लिहून काढण्यास, स्वतः पुन्हा बनवण्यास सांगितले. त्या असाईनमेंटला तिला खुप चांगला शेरा मिळाला. सरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. कोकणातील खेडयात वाढलेल्या मुलांमध्ये मुस्लीम घरांबद्दल ज्या काही चित्र विचित्र कल्पना असतात तशा माझ्याही होत्या. मुख्य वस्तीपासून काहीसे वेगळे असलेले मुस्लीम मोहल्ले त्यात अधिक भर टाकतात. सरांचे घर तसे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर होते. तरीही मी जरा बिचकत बिचकत सरांच्या घरी गेलो. सरांनी माझे त्या असाईनमेंटबद्दल कौतुक केले. माझ्या पाठीवरुन हात फिरवला. त्यांच्या नजरेत कृतकृत्य झाल्याचे भाव होते. त्यांनी रुजवलेलं ज्ञानाचं रोपटं आज त्यांच्या पुढ्यात तरारुन उभं होतं. मी मनातील सारे किंतू झटकून देऊन सरांच्या घरुन चहा नाश्ता करुन सरांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो. मी आज जो कोणी आहे तो माझ्या इंजिनीयरींगच्या पदवीमुळे आहे. मात्र ही पदवी माझी एकट्याची कमाई नव्हे. माझ्या आई वडीलांच्या जोडीने अनेक ज्ञात अज्ञात हातांनी मला मदत केली. शेख सरांनी माझ्या मनात इंजिनीयरींगच्या शिक्षणाचं बीज रुजवलं, त्यांच्या मुलाबद्दल वेळोवेळी सांगून माझ्या मनात रुजवलेल्या त्या बीजाला पाणी घातलं. आठवी संपतानाच एका शिबिराच्या निमित्ताने मला माझ्या भविष्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दारात नेऊन सोडलं. माझ्यासारखा अनवाणी पायांनी गुरं राखणारा, भातशेतीमध्ये कंबरडं मोडेपर्यंत लावणी, कापणी करणारा मुलगा जेव्हा शिक्षण संपल्यानंतर फक्त अडीच वर्ष भारतात काम केल्यानंतर पुढचे दिड वर्ष जेव्हा अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून काम करतो तेव्हा त्यामागे शेख सरांसारख्या आपल्या शिष्याच्या हिताचा कायम विचार करणार्‍या प्रेमळ गुरुंची पुण्याई उभी असते. माझ्या या गुरुने मी जवळपास अजाण वयाचा असताना मला माझं ध्येय काय आहे हे सांगितलं नसतं, वेळोवेळी मला तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवला नसता तर न जाणो मी आज काय असतो, कुठे असतो. जगदगुरु महर्षी व्यासांचे शब्द उसने घेऊन मला माझ्या या गुरुला वंदन करताना म्हणावेसे वाटते, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया | चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः || त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता | संसारप्रतिबोधार्थं तस्मै श्रीगुरवे नमः ||
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
39569 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

अप्रतिम...

निराकार गाढव
Tue, 07/19/2016 - 02:36 नवीन
अप्रतिम...
  • Log in or register to post comments

मस्त

लोथार मथायस
Tue, 07/19/2016 - 03:13 नवीन
तुम्ही शेख सर अगदी आमच्या डोळ्यापुढे उभे केलेत. मला माझ्या शाळेतील यशवंत सरांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लिहिले आहे.

रुपी
Tue, 07/19/2016 - 03:19 नवीन
फारच सुंदर लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 04:31 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

सुरेख लेख!

पद्मावति
Tue, 07/19/2016 - 04:34 नवीन
सुरेख लेख!
  • Log in or register to post comments

छान

अनन्त अवधुत
Tue, 07/19/2016 - 05:11 नवीन
शेख सर अगदी आमच्या डोळ्यापुढे उभे केलेत.
  • Log in or register to post comments

मस्त लेख..

मुक्त विहारि
Tue, 07/19/2016 - 05:18 नवीन
एकदम समयोचित. आज नेमकी गुरुपौर्णिमा.
  • Log in or register to post comments

+११

मोदक
Tue, 07/19/2016 - 07:00 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+ २२२

चांदणे संदीप
Tue, 07/19/2016 - 08:13 नवीन
+२२२ सुंदर लिहिलत सगासर. ___/\___ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनापासून लिहिलेला लेख. अतिशय

रातराणी
Tue, 07/19/2016 - 06:27 नवीन
मनापासून लिहिलेला लेख. अतिशय आवडला!
  • Log in or register to post comments

समयोचित व अप्रतिम लेख!

तुषार काळभोर
Tue, 07/19/2016 - 06:31 नवीन
मला घडवणारे शाळेतील सर्व शिक्षक आठवले.
  • Log in or register to post comments

खूप छान

लालगरूड
Tue, 07/19/2016 - 07:52 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

डोळ्यांत पाणी आले वाचताना

कंजूस
Tue, 07/19/2016 - 08:32 नवीन
डोळ्यांत पाणी आले वाचताना.आणखी लिहू शकत नाही.
  • Log in or register to post comments

+++१११ टू कंजूसकाका.

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/19/2016 - 10:23 नवीन
+++१११ टू कंजूसकाका. स्क्रिन धुसर झाले हात नमस्कारासी आले. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+११११

राजाभाउ
Tue, 07/19/2016 - 11:49 नवीन
+११११ डोळे पुसुनच मग हे लिहु शकलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१११११

राघवेंद्र
Wed, 07/20/2016 - 02:25 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

खरे आहे सतिशजी,

संत घोडेकर
Tue, 07/19/2016 - 08:40 नवीन
खरे आहे सतिशजी, आपल्या जडणघडणीत गुरुजनांचा मोठा वाटा असतो. सर्व ज्ञात अज्ञात गुरुजनांना दंडवत.
  • Log in or register to post comments

सरच का ?

चौकटराजा
Tue, 07/19/2016 - 08:48 नवीन
ओ साहेब तुम्हाला गावडे सर अशी पदवी आहे ती बदलून मी सर सतीश गावडे अशी पदवी करू का ? आपल्या शाळेत मी चक्कर मारली आहे. गोरेगावातील शाळा, तेथील लायब्ररी लक्षात राहिली आहे. आपण कुणी करियरच्या प्रांगणात घडले असू वा नसू पण माणूस म्हणून घडण्यात शिक्षकांच्या सहवासाचा १०० टक्के वाटा असतोच.
  • Log in or register to post comments

वाह सुंदर लिहलंयस सगा. मला

सनईचौघडा
Tue, 07/19/2016 - 08:50 नवीन
वाह सुंदर लिहलंयस सगा. मला आमच्या ठाण्याच्या महाराष्ट्र विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. मेहंदळे सर आठवले. त्यावेळी सगळ्यांनाच बाहेर शिकवणीला जाता येत नसे म्हणुन दहावीला त्यांनी शाळेतच गणित , इंग्रजीच्या जादा शिकवण्या घेवुन मार्गदर्शन केले होते.
  • Log in or register to post comments

मेहेंदळे आणि म.वि.

गामा पैलवान
Wed, 07/20/2016 - 12:27 नवीन
सनईचौघडा, तुम्ही महाराष्ट्र विद्यालयाचे होय! आमचं घर तिथून जवळंच आहे. घराजवळ असूनही महाराष्ट्र विद्यालयाशी कधीच संबंध आला नाही. साहजिकंच त्यांच्याशीही आला नाही. आम्हां पोरांना विद्यालयाच्या मैदानात क्रिकेट खेळू देत नसंत. म्हणून आम्ही त्यांना बन्या म्हणायचो. पण त्यांचं व्यक्तिमत्व भारी होतं याबद्दल आम्हा कार्ट्यांचं एकमत होतं. टोपणनावाने आदरपूर्वक उल्लेख होत असलेले माझ्या आठवणीतले ते एकमेव शिक्षक होत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

तीथुनच हाकेच्या अंतरावर

खटपट्या
गुरुवार, 07/21/2016 - 04:08 नवीन
तीथुनच हाकेच्या अंतरावर गावदेवी मैदान होते की. बाकी पम्याच्या शाळेचा एम.एच. हायस्कूलचा फुलफोर्म आम्ही मेंटल हॉस्पीटल असा करायचो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लांब होतं गावदेवी

गामा पैलवान
गुरुवार, 07/21/2016 - 11:03 नवीन
खटपट्या, गावदेवी, संघशाखा वगैरे लांब होते आमच्यापासून. शिवसमर्थचं मैदान कुलुपबंद असायचं. दहाबारा वर्षांच्या कार्ट्यांना एव्हढं दूर जाऊ देत नसायचे घरचे लोकं त्याकाळी. बाकी मीही एमेचचाच बरं का. आम्हाला कोणी मेंटल हॉस्पिटलचे विद्यार्थी म्हणून चिडवलं तर आम्ही प्रश्न करायचो की, दुरुस्त करू का तुम्हाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अप्रतिम लिहिलं आहेस रे.अगदी

अजया
Tue, 07/19/2016 - 08:51 नवीन
अप्रतिम लिहिलं आहेस रे.अगदी गहिवरून आलं वाचताना.
  • Log in or register to post comments

मनापासून आलेलं. सुरेख.

यशोधरा
Tue, 07/19/2016 - 09:07 नवीन
मनापासून आलेलं. सुरेख.
  • Log in or register to post comments

नेहेमीप्रमाणेच छान लेखन सगा

खेडूत
Tue, 07/19/2016 - 09:15 नवीन
नेहेमीप्रमाणेच छान लेखन सगा सर. थोड्याफार फरकाने आम्हीतुमच्यासारखेच... नकळत डोळ्यात पाणी आले.
  • Log in or register to post comments

छान आठवणी

सिरुसेरि
Tue, 07/19/2016 - 09:18 नवीन
छान आठवणी . "कोण तुजसम सांग गुरुराया , कैवारी सदया "
  • Log in or register to post comments

धन्याशेठ

नाखु
Tue, 07/19/2016 - 09:19 नवीन
जबरदस्त लिहिलेय, शाळा सुटल्यावरच गुरुच महत्व कळतं रे !!! साला माझ्या जीवनात या मास्तर लोकांनी लै उपकार करून ठेवलेत आणि मी जो आहे त्याचे श्रेय फक्त आणि फक्त या मास्तर लोकांचे आहे. उघड्या आभाळाखाली चांगले मास्तर भेटलेला नाखु
  • Log in or register to post comments

शालेय शिक्षकांचा आपल्या कळत

प्रचेतस
Tue, 07/19/2016 - 09:20 नवीन
शालेय शिक्षकांचा आपल्या कळत नकळत आपल्या जडणघडणीत फार मोठा वाटा असतो. महाविद्यालयीन शिक्षक फारसे आठवत नाहित नंतर पण बालपणीचे शिक्षक हे मनावर कोरले गेलेले असतात. ह्याच विषयावर श्री. ना. पेंडसे ह्यांची 'हद्दपार' नामक उत्कृष्ट कादंबरी आहे. प्रत्येकाने ती आवर्जून वाचलीच पाहिजे अशी. लेखन नेहमीप्रमाणेच उत्तम झालंय. शेख सरांबाबत तुझ्याकडून ह्याआधीही ऐकलं होतंच. आता तपशीलवार वाचायला मिळालं.
  • Log in or register to post comments

तुमचा एकंदरीत समतोल, विषय

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/19/2016 - 09:30 नवीन
तुमचा एकंदरीत समतोल, विषय समजून बोलायचा अट्टाहास ह्याचे मूळ सापडले, खूप छान अन डोळे ओले करणारे लेखन आहे, मी आवर्जून तुम्हाला सरच म्हणणार आहे सतीशजी, पुढल्यावेळी सरांना भेटायला जाल तेव्हा आमच्यातर्फे सुद्धा त्यांच्या पाया पडा :)
  • Log in or register to post comments

खूप भावलं

श्रीरंग_जोशी
Tue, 07/19/2016 - 09:33 नवीन
मनापासून लिहिलेलं हे लेखन खूप भावलं. लहानपणीपासूनचे अनेक गुरुजन डोळ्यांपुढे आलेत.
  • Log in or register to post comments

+१११

स्मिता_१३
Tue, 07/19/2016 - 14:18 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आईवडिलांनी चांगले संस्कार

अभ्या..
Tue, 07/19/2016 - 09:44 नवीन
आईवडिलांनी चांगले संस्कार केलेच, त्यांच्यामुळे शिक्षण घेता आले, तसेच ज्यांनी शिकविले घडविले ते सर्वच मला गुरुस्थानी आहेत. त्या सर्वाना आदरपूर्वक प्रणाम.
  • Log in or register to post comments

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः

वामन देशमुख
Tue, 07/19/2016 - 09:53 नवीन
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः। गुरु साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
  • Log in or register to post comments

वा सुंदर लेखन! अतिशय मनापासून लिहिले आहेत सगा!

चतुरंग
Tue, 07/19/2016 - 10:09 नवीन
शेख सरांची तळमळ वाचून डोळ्यात पाणी आले. मुलांचं भलं चिंतणारे शिक्षक्/शिक्षिका त्या मुलामुलीलाच नव्हे तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा एक शिदोरी देऊन जातात! आमच्या रसाळबाई आठवल्या. चौथीच्या स्कॉलरशिपला त्या एकहाती गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी तीनही विषय शिकवायच्या. शाळेच्या आधी रोज एक तास एवढीच शिकवणी शाळेत. त्याचे वेगळे पैसे वगैरे नाहीत. फक्त आपली मुलं स्कॉलरशिपला चमकावीत हा एकच ध्यास! शिकवण्याची हातोटी अतिशय उत्तम. त्या वर्षीच्या बॅचला आम्ही चौदा जणं स्कॉलरशिप मधे चमकलो. जिल्ह्यातल्या पहिल्या दहात सात जण आमच्या शाळेचे होते! शाळेत सत्कार झाला तेव्हा बाई अक्षरशः घळाघळा रडल्या! अजूनही मी नगरला गेलो की आवर्जून बाईंना भेटतो. मला बघताक्षणी "अरे ये रे ये बाळा, कसा आहेस?" असं म्हणत बोटं कानशिलावर मोडून पाठीवरुन प्रेमाने हात फिरवतात तेव्हा भरुन येतं! गोपाळे सरही असेच. त्यांच्याबद्दल मी लिहिले होतेच. (नतमस्तक्)रंगा
  • Log in or register to post comments

सुंदर आठवण

रुस्तम
Tue, 07/19/2016 - 10:37 नवीन
सुंदर आठवण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१ रसाळ बाईंबद्द्ल च विचार

स्रुजा
गुरुवार, 07/21/2016 - 03:14 नवीन
+१ रसाळ बाईंबद्द्ल च विचार करत होते हा लेख वाचताना. खुप छान आहे हा लेख. नॉस्टेल्जिक केलंत आणि खरंच शेवटी डोळ्यात अगदी पाणी आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चौथीला असताना, आमच्या दादा

श्रीगणेशा
Tue, 01/25/2022 - 19:56 नवीन
चौथीला असताना, आमच्या दादा चौधरी शाळेतील कांबळे मॅडम स्कॉलरशिपची विनामूल्य शिकवणी घ्यायच्या. काही वर्षातच नगर सोडल्यानंतर परत त्यांची भेट झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ओघवते आणि सहज सुंदर लेखन.

गणामास्तर
Tue, 07/19/2016 - 10:11 नवीन
ओघवते आणि सहज सुंदर लेखन. आमच्या वाट्याला असे शिक्षक कधी आलेचं नाहीत याची कधी कधी खंत वाटते.
  • Log in or register to post comments

__/\__

रुस्तम
Tue, 07/19/2016 - 10:35 नवीन
तुमच्या लेखामुळे मला माझी बारावी आठवली. खूप खूप धन्यवाद...
  • Log in or register to post comments

क्या बात! एक नंबर लिहिलं आहे.

आदूबाळ
Tue, 07/19/2016 - 10:39 नवीन
क्या बात! एक नंबर लिहिलं आहे. वा!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

आजानुकर्ण
Wed, 07/20/2016 - 00:52 नवीन
सुंदर लेख. खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/19/2016 - 10:45 नवीन
औचित्यपूर्ण....लेख अतिशय आवडला. शेख सरंबद्दल वाचता वाचता माझे सरदेशपांडे सर आणि खाडीलकर बाई आठवल्या. या निमित्ताने मी माझ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक वंदन करतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

_/\_

लॉरी टांगटूंगकर
Tue, 07/19/2016 - 10:51 नवीन
सुंदर लिहीता राव! सरांना आमचापण नमस्कार.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

देशपांडे विनायक
Tue, 07/19/2016 - 10:58 नवीन
अप्रतिम लेख काही वेळा कुणीतरी तुम्हाला चांगल्या अर्थाने शहाणे म्हणतात तेंव्हा त्याचे सगळे श्रेय अशा शेख सरांचे असते
  • Log in or register to post comments

अप्रतिम हृद्य मनोगत !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/19/2016 - 11:03 नवीन
अप्रतिम हृद्य मनोगत ! अश्या अनेक गुरुजनांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभाराने आपण घडत जातो.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलेय,

नीलमोहर
Tue, 07/19/2016 - 11:22 नवीन
असे योग्य मार्ग दाखवणारे गुरुजन मिळायलाही भाग्य लागतं.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!

बोका-ए-आझम
Tue, 07/19/2016 - 11:22 नवीन
माझ्या चुलतबहिणी शेख सरांच्याच विद्यार्थिनी होत्या. त्यांच्याकडून सरांबद्दल ऐकलेलं आहेच. खरोखरच हाडाचे शिक्षक हे नामाभिधान सार्थ होईल असे शिक्षक आहेत ते. अशा माणसांमुळेच गुरु या शब्दाचं पावित्र्य टिकून आहे. _/\_
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहीले आहे !

विभावरी
Tue, 07/19/2016 - 11:26 नवीन
अप्रतिम लिहीले आहे !
  • Log in or register to post comments

खूप सुंदर... अतिशय

शि बि आय
Tue, 07/19/2016 - 11:30 नवीन
खूप सुंदर... अतिशय निर्व्याजपणे त्यांनी तुमच आयुष्य घडवलं.. असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळोत..
  • Log in or register to post comments

मस्त...

असा मी असामी
Tue, 07/19/2016 - 11:36 नवीन
एकदम सही. सरांना हे वाचायला खुप आवडेल. खप वर शेअर करतो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा