Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 00:42
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच! लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्‍या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही. या सर्व मोठा त्रास करून डॉक्टरकडे जाण्याने दुखणे आणि खर्च आपला वाढतो हे बर्‍याचदा अगदी सुशिक्षित लोकांच्याही ध्यानात येत नाही. दाताच्या अनारोग्याचा नुसताच चावण्यावर परिणाम होत नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. एकाच वेळी अनेक दात किडके असले तर चावण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. चावता न आलेले अन्न नीटसे पचत नाही, त्यामुळे कुपोषण होत राहते. मुलं खूप हळू खाऊ लागतात किंवा खाणे टाळतात. तोडून खाण्याचे पदार्थ, फळं तर ते खाऊच शकत नाहीत. यातून शरीरात निरनिराळ्या जीवनसत्त्वांच्या कमतरता निर्माण होतात. किडून तुटून धारदार झालेले दात हे गाल, जिभेच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. हिरड्या आणि दातावर साठणारे किटण हे हृदय किडनीच्या काही विकारांसाठी जंतू पुरवत असते. तरीही लोक अगदी दात दुखे पर्यंत डॉक्टरकडे जाणे टाळतात. कारणं मुख्यतः भीती, खर्च, दुर्लक्ष, अनास्था, अज्ञान! दाताचे जन्मजात असे फारच कमी आजार आहेत. मुख्यत्वे जे त्रास असतात ते चुकीचे ब्रशिंग, वेळेवर लक्ष न देणे यामुळे उद्भवलेले असतात.या लेखमालिकेचा उद्देशच त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार हा आहे. 'अ स्टिच इन टाइम सेव्ज नाईन' म्हणतात, ते दंत आरोग्याबाबत शब्दशः खरे आहे. ते कसे हे जाणून घेणे, विविध प्रतिबंधात्मक उपचार आणि निरनिराळ्या वयात दाताची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात सांगायचा हा प्रयत्न आहे. दात येण्याची सुरुवात गर्भावस्थेतच होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचारांची सुरुवात प्रेग्नंसीपासूनच सुरू होते.म्हणूनच प्रथम प्रेग्नंसीमध्ये स्वतःच्या दाताचे आरोग्य कसे सांभाळावे हे बघूया. कारण आईच्या तोंडात जर मोठ्या प्रमाणात खराब मुख आरोग्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव असेल तर बाळाला आपोआपच ते वारसाहक्काने मिळतात! त्यामुळेच वेळीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रेग्नंसी लक्षात आल्यावर डेंटिस्टकडे एक रूटीन चेक अप जरूर करून घ्यावे. कारण त्यामुळे किडलेले दात वेळीच लक्षात येतात. त्यांना भरणे सुरुवातीच्या अवस्थेत असल्यास सोपे, कमी खर्चाचे आणि टिकाऊ होते. या काळात किडलेल्या दाताकडे दुर्लक्ष करून थेट सातव्या आठव्या महिन्यात गाल धरून सुजून येणार्‍या महिला बर्‍याचदा पाहण्यात येतात. सातव्या महिन्यापुढे दुखण्याच्या गोळ्या फारशा देऊन चालत नाही. दात काढायची वेळ आल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि रूट कॅनालचे उपचार एक्सरेविना अंदाजाने करावे लागतात. हे सर्वच वेळेवर केलेल्या तपासणीमुळे टाळता येते. या तपासणीच्या वेळीच दात साफ जरूर करून घ्यावे. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे प्रेग्नंसी मध्ये होणारे हिरड्यांचे इन्फेक्शन. दातावर मोठ्या प्रमाणात किटण असल्यास या काळातल्या हार्मोन बदलांमुळे हिरडी सुजून येते, हिरडीतून रक्त येणे, दात हलायला लागणे असे त्रास सुरू होऊ शकतात. हे सर्व फक्त दात साफ करून घेऊन आपण टाळू शकतो!
  • प्रेग्नंसीमध्ये शरीराची कॅल्शियमची गरज वाढलेली असते. त्यासाठी गोळ्या दिलेल्या असतात, त्या नियमित घेणे जरूरी आहे.अन्यथा कॅल्शियमच्या कमतरतेने दात ठिसूळ होऊ लागतात.
  • अनेक स्त्रियांना प्रेग्नंसीमध्ये सकाळी उलट्या होणे(मॉर्निंग सिकनेस) चा त्रास होतो. अशावेळी खळखळून चूळ भरून दातांवर आलेले आम्ल दूर करणे जरूरी आहे.तसेच पेस्टच्या वासाने उलटी होत असल्यास पेस्ट बदलावी पण दात घासणे बंद करू नये.
  • खावेसे वाटते म्हणून अती गोड पदार्थ खाऊ नयेत.
  • खाण्यात वेगवेगळ्या प्रकारची फळं, दही, दूध, चीज जरूर असावे. हे सर्व बाळाच्या दात, हिरड्या यांच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थ आहेत.
  • प्रेग्नंसीच्या सुरुवातीलाच चेक अप झाल्याने काही आवश्यक ट्रीटमेंट असतील तर त्या साधारण चौथ्या ते सहाव्या महिन्यात करता येतात.
  • प्रेग्नंसीमध्ये दाताच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन अचानक कराव्या लागणार्‍या दातांच्या ट्रीटमेंट आपण नक्कीच टाळू शकतो.
प्रेग्नंसी सुखरूप पार पडून बाळ घरी येतं आणि लहान बाळाच्या दंत आरोग्याबाबत काळजी घेणे हा नवा अध्याय सुरू होतो! साधारण सहाव्या महिन्यापासून अडीच वर्षापर्यंत बाळाला वेगवेगळे दात येऊ लागतात. हा कालावधी कमी जास्त असू शकतो. या काळात पालकांकडून एक अत्यंत महत्त्वाची चूक होताना आढळते ती म्हणजे अजून दात येत आहेत, बाळ लहान आहे, या कारणांनी बाळाचे दात स्वच्छच करत नाहीत! तसंच बर्‍याचदा बाळ बाटलीचे दूध पिऊन किंवा आईने पाजल्यावर झोपी जाते. हे दूध बाळाच्या तोंडात शिल्लक असते. त्यावर बॅक्टेरीया ताव मरून अ‍ॅसिड तयार करतात. त्यामुळे बाळाचे समोरचे दात किडायला अगदी लहान वयात सुरुवात होते. आपल्याकडे तर हा इतका सर्रास आढळणारा प्रकार आहे की लोकांना ते दात पडणार म्हणून असे होतात असेही वाटते! मग आईचा प्रश्न असतो इतक्या लहान बाळाचे दात मी कसे घासू? यासाठी केमिस्टकडून एक गॉझचे बंडल विकत आणावे. त्याचे छोटे तुकडे करून ठेवावे. बाळाला पाजले की आपल्या बोटाला ओली गॉझ गुंडाळून दात हलक्या हाताने पुसून घ्यावे. इतका सोपा उपाय!. साधारण पाचपेक्षा जास्त दात आले की बेबी ब्रश आणावा. मुगाच्या डाळीच्या एवढी पेस्ट (साधी कमी फ्लोराईड, साधारण 1000ppm असणारी) दातांवर आपण बोटाने पसरावी. मग हलक्या हाताने ब्रश गोल गोल फिरवून ब्रश करावे. रोज दोन वेळा ब्रशिंग या वयापासूनच सुरू करावे. बाळ करू देत नसल्यास त्याला गुंतवण्यासाठी हातात काहीतरी देऊन ब्रश करावे.
  • बाळाला ज्यूस पॅकमधले फळांचे रस अजिबात देऊ नयेत.दात हमखास किडवणारे असतात हे नुसतेच साखर आणि आम्ल असणारे खोटे फळांचे रस. त्या ऐवजी बाळाला शिजवेलेले सफरचंद, कुस्करलेली केळी असे हळूहळू खाऊ घालावे.
  • दात किडत आहेत असे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. कारण याच दातांनी बाळाला पुढे तेरा वर्ष खायचं आहे!
  • दात येण्याच्या काळात बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे बाळ जे हाताला लागेल ते तोंडात घालू लागते, त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन बाळ हमखास या काळात आजारी पडते. योग्य काळजी घेतल्यास हे आजारपण टाळता येते. दात येत असल्यामुळे बाळ आजारी पडत नाही. ते काय तोंडात घालते आहे याकडे लक्ष दिल्यास हा त्रास उद्भवू नये.
  • तसंच बाळाच्या मनगटाला पूर्वी खारीक बांधत असत. तो उपाय मला अजूनही टीथर वापरण्यापेक्षा आवडतो. प्लॅस्टिकचा टीथर अचानक फुटून त्यातला मऊ द्रव बाळाच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. तसंच कोणते घातक रंग वापरले आहेत याची आपल्याला माहिती नसते. त्यापेक्षा बाळ नजरेसमोर असेल तेव्हा खारीक बांधून दिलेली केव्हाही सुरक्षित उपाय. अर्थात त्यावरही लक्ष हवेच.
अशा प्रकारे बाळाची काळजी घेतल्यास अगदी लहान मुलांचे दात किडून त्यांचे होणारे हाल आपण टाळू शकतो. आता पुढच्या भागात मोठ्या मुलांच्या दातांकडे लक्ष देऊ!
  • Log in or register to post comments
  • 29937 views
  • दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २

Book traversal links for दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १

  • दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २ ›

प्रतिक्रिया

Submitted by जव्हेरगंज on Sun, 12/06/2015 - 00:50

Permalink

धन्यवाद हो अजयाताई, या

धन्यवाद हो अजयाताई, या धाग्याची मी कधीपासून वाट बघतोय. माझ्याही दातांचा जरा प्रॉब्लम झालाय. सविस्तर नंतर. सध्या पोच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 12/06/2015 - 01:00

In reply to धन्यवाद हो अजयाताई, या by जव्हेरगंज

Permalink

आता पुर्ण वाचला!

आता पुर्ण वाचला! अत्यंत माहीतीपुर्ण लेख! ऊद्याच डेंटीस्टकडे जाणार!! बादवे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Sun, 12/06/2015 - 03:48

Permalink

चांगली सुरूवात . पुभाप्र .

चांगली सुरूवात . पुभाप्र .
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Sun, 12/06/2015 - 06:32

Permalink

अरे बापरे...

लहान बाळांच्या दातांची पण एव्हढी काळजी घ्यावि लागते हे माहित नव्हतं. माहिती बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नितीनचंद्र

Submitted by नितीनचंद्र on Sun, 12/06/2015 - 06:38

Permalink

एक वेगळा प्रश्न

डॉक्टर साहेब, माझे वय ५० आहे. माझ्या हिरड्या मागे सरकुन फटी वाढत आहेत. यात अन्न कण अडकुन त्रास होतोच पण दातांच आयुष्यमान कमी होत एक दिवस ते पडतील अशि भिती आहे. यावर उपाय म्हणुन फ्लॅप सर्जरी असे ऐकले होते. या फ्लॅप सर्जरीला काही पर्याय आहे का? धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 09:12

In reply to एक वेगळा प्रश्न by नितीनचंद्र

Permalink

तुम्ही ऐकले आहे की

तुम्ही ऐकले आहे की डेन्टिस्टने सांगितले आहे? कारण फ्लॅप सर्जरी लागेल किंवा नाही हे एक्स रे आणि तुमच्या तोंडातली स्थिती ,तुम्ही सर्जरीनंतर दात हिरड्या कसे मेंटेन करु शकाल यावर ठरते. दरम्यान तुम्ही डेन्टिस्टकडे जाऊन सर्व दातांची सफाई,हिरड्यांची सफाई करुन घेणे,मेडिकेटेड माऊथवाॅश,सेन्सिटिव्हिटीच्या टूथपेस्ट आणि अगदी मऊ ब्रशचा दात घासण्यासाठी वापर हे करुन घेणे आवश्यक आहे.तसंच दातांच्या फटीच्या साईझप्रमाणे ब्रश ,फ्लाॅस इ वापर सुरु करावा. कारणावर मात करुन मगच सर्जिकल आॅप्शन्सचा स्विकार व्हावा. अन्यथा फ्लॅप सर्जरीचा काही उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 06:38

Permalink

धन्यवाद अजया !

धन्यवाद अजया ! दातांच्या आरोग्याविषयी आपल्याकडे खर्म्च खूप उदासीनता आहे. तुझ्या या लेखमालेमुळे सोप्या भाषेत चांगली माहिती मिळेल. पुभाप्र..
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sun, 12/06/2015 - 07:30

In reply to धन्यवाद अजया ! by मितान

Permalink

+111 या लेखाची गरज होती.

+111 या लेखाची गरज होती.
  • Log in or register to post comments

Submitted by पीके on Sun, 12/06/2015 - 06:44

Permalink

छान माहितीपुर्ण लेख.

छान माहितीपुर्ण लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 12/06/2015 - 08:03

Permalink

चांगली सुरुवात. :)

चांगली सुरुवात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Sun, 12/06/2015 - 08:20

Permalink

1+

या कम्युनिटी डेंटिस्ट्री सेवेबद्दल आपले आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by विभावरी on Sun, 12/06/2015 - 08:44

Permalink

उत्तम माहितीपूर्ण लेख !

उत्तम माहितीपूर्ण लेख !
  • Log in or register to post comments

Submitted by विभावरी on Sun, 12/06/2015 - 08:44

Permalink

उत्तम माहितीपूर्ण लेख !

उत्तम माहितीपूर्ण लेख !
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 12/06/2015 - 10:29

Permalink

शीर्षक वाचून 'दंतकथा बळावू

शीर्षक वाचून 'दंतकथा बळावू नयेत यासाठी काय करावं' असं काहीतरी वाटलं होतं, म्हणून गोंधळून गेलो होतो. पण त्या निमित्ताने का होईना माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला. मी लहान असताना वेळेत डेंटिस्टकडे गेलो नाही, त्याचा पुढे त्रास झाला. त्यामुळे मुलाच्या दातांची अगदी लहानपणापासून काळजी घेतो आणि डेंटिस्टकडे नियमितपणे नेतो.
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Sun, 12/06/2015 - 10:41

Permalink

अजयाकाकु माहीतीपुर्ण लेखमाला

अजयाकाकु माहीतीपुर्ण लेखमाला सुरु केल्याबद्दल धन्यवाद, तेवढा तुमच्या दवाखाण्याचा पत्ता द्या की
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 10:43

In reply to अजयाकाकु माहीतीपुर्ण लेखमाला by भीमराव

Permalink

पुतण्या तू कुठे राहतोस सांग

पुतण्या तू कुठे राहतोस सांग.तुला योग्य त्या ठिकाणी पोहचवले जाईल! !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 12/06/2015 - 12:00

In reply to पुतण्या तू कुठे राहतोस सांग by अजया

Permalink

काय हे...काकू म्हणाला म्हणून

काय हे...काकू म्हणाला म्हणून डैरेक्ट पोचवण्याची धम्की =)) बाबूदादा इंस्युरंस काढून ठेव रे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Sun, 12/06/2015 - 18:30

In reply to पुतण्या तू कुठे राहतोस सांग by अजया

Permalink

सध्या मुक्काम वल्लभनगर

सध्या मुक्काम वल्लभनगर(पिंपरीचिंचवड), मुळचे सातारकर. @टका, काकु आहेत ना त्या मग जे करतील ते प्रेमानेच करतील ना, स्मायल्या कशा चिटकवायच्या रे.....
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 19:04

In reply to सध्या मुक्काम वल्लभनगर by भीमराव

Permalink

तुमच्या सातारला बेस्ट

तुमच्या सातारला बेस्ट डेन्टिस्ट आहेत.खरंच गरज असेल तर कळवा.नाव व्यनि करेन.पिंचिचे माहित नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 10:42

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 12/06/2015 - 10:59

Permalink

मस्त धागा, उपयोगी माहीती,

मस्त धागा, उपयोगी माहीती, खरोखर दाताच्या आरोग्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. घ्यायला तर हवी काळजी.
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 12/06/2015 - 11:03

In reply to मस्त धागा, उपयोगी माहीती, by कविता१९७८

Permalink

साधारण सकाळी आणि

साधारण सकाळी आणि झोपण्यापुर्वी ब्रश करावा असे सर्व डेंटीस्ट सुचवतात पण कीतीवेळ करावा आणि कशा प्रकारे ब्रश करावा या बद्दल ही माहीती दे.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 11:12

In reply to साधारण सकाळी आणि by कविता१९७८

Permalink

पुढच्या भागांमध्ये ही माहिती

पुढच्या भागांमध्ये ही माहिती येणार आहे.स्टे ट्युन्ड!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sun, 12/06/2015 - 11:01

Permalink

लेखमालेचे स्वागत

+१ ( दर ६ महिन्याला दातांचा सर्विसिंग करणारा मुनी )
  • Log in or register to post comments

Submitted by भुमी on Sun, 12/06/2015 - 11:09

Permalink

छान मैहितीपूर्ण लेख

पुढचा भाग लवकर येऊ देत!
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेता on Sun, 12/06/2015 - 20:39

In reply to छान मैहितीपूर्ण लेख by भुमी

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 12/06/2015 - 11:57

Permalink

झैरात झैरात =))

झैरात झैरात =)) थोडक्यात तुम्ची फी भारी आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 12/06/2015 - 12:00

In reply to झैरात झैरात =)) by टवाळ कार्टा

Permalink

लेख मात्र एक्दम झ्यॅक :)

लेख मात्र एक्दम झ्यॅक :)
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Sun, 12/06/2015 - 19:56

In reply to झैरात झैरात =)) by टवाळ कार्टा

Permalink

मस्त! सगळे डिट्टेल सांगितलंस

मस्त! सगळे डिट्टेल सांगितलंस पुढच्या मोठयांच्या भागाच्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 12/06/2015 - 13:00

Permalink

माहितीपूर्ण लेख.धन्यवाद.

माहितीपूर्ण लेख.धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sun, 12/06/2015 - 13:09

Permalink

+१ असेच म्हणते.अतिशय उपयोगि

+१ असेच म्हणते.अतिशय उपयोगि लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by जातवेद on Sun, 12/06/2015 - 13:23

Permalink

उपयुक्त माहिती

किडून तुटून धारदार झालेले दात हे गाल,जीभेच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे.
हे कसे होते? गूगलवून पाहिले पण मुख्य कारणे धुम्रपान, तंबाखू सेवन आणि दारूचे अतिरीक्त सेवन अशीच दिसताहेत सगळीकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 14:21

In reply to उपयुक्त माहिती by जातवेद

Permalink

तुटून धारदार झालेले दात

तुटून धारदार झालेले दात,तुटलेली फिलिंग्ज,टोचणारी कवळी,कॅप इ मुळे तोंडाच्या मऊ त्वचेला घर्षण होऊन दुखरे चट्टे,तर कधी अल्सर्स तयार होतात.वर्षानुवर्षे जर हे टोचणे असेच चालु राहिले तर या अल्सर्सचे रूपांतर भरुन न येणाऱ्या जखमेत होऊ शकते.अशा अल्सर्सच्या पेशी कालांतराने कँसरमध्ये परिवर्तित होऊ शकतात.म्हणून त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Sun, 12/06/2015 - 13:35

Permalink

उत्तम माहितीपूर्ण लेख...

उत्तम माहितीपूर्ण लेख...
  • Log in or register to post comments

Submitted by पलाश on Sun, 12/06/2015 - 13:45

Permalink

लेख आवडला. खूप नवीन माहिती

लेख आवडला. खूप नवीन माहिती कळली. नवपालकांनी जरूर वाचावा असा लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Sun, 12/06/2015 - 14:09

Permalink

पु.भा. वाट बघिंग

पु.भा. वाट बघिंग
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sun, 12/06/2015 - 14:29

Permalink

बाबौ !

बत्तिशीची एवढी काळजी घ्यावी लागते हे ती वाजवताना लक्षात आले नव्हते. इथून पुढे जपून वापरण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 12/06/2015 - 14:33

Permalink

उत्तम माहितीपूर्ण लेख.

उत्तम माहितीपूर्ण लेख. तज्ञाकडूनच विश्वासू शास्त्रिय माहिती मिळाल्याने अनेक "दंतकथा" रिटायर्ड व्हायला मदत होईल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sun, 12/06/2015 - 16:17

Permalink

उत्तम लेखमालीका. धन्यवाद अजया

उत्तम लेखमालीका. धन्यवाद अजया.
तज्ञाकडूनच विश्वासू शास्त्रिय माहिती मिळाल्याने अनेक "दंतकथा" रिटायर्ड व्हायला मदत होईल. :)
..हेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 12/06/2015 - 16:30

Permalink

उत्तम

लेख उत्तम, माहितीपूर्ण. पुभाप्र. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/06/2015 - 17:02

Permalink

चांगली मालिका... पुढील

चांगली मालिका... पुढील भागासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 12/06/2015 - 17:43

Permalink

लेख आवडला

लेख आवडला पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 12/06/2015 - 18:26

Permalink

ज्यांचे दात बळकट असतात

ज्यांचे दात बळकट असतात त्यांचे आरोग्य चांगले असते ( रोग प्रतिकारक शक्ती जास्त ) असे मी समजत होतो. तसं नसतं. ज्यांचे आरोग्य चांगले असते ( रोग प्रतिकारक शक्ती जास्त )त्यांचे दात बळकट असतात.असं हत्तींच्या दातावरच्या संशोधनात सिद्ध झालं आहे. बाकी लेख फार उत्तम आणि गरजुंना उपयुक्त ठरावा. छोटे व्हिडिओ अथवा स्टेप बाइ स्टेप फोटो उदाहरण म्हणून टाका अथवा इथे खराब दिसू नये म्हणून ब्लॅागची लिंक द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 12/06/2015 - 18:35

Permalink

उत्तम लेख

उत्तम लेख
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sun, 12/06/2015 - 18:39

Permalink

उत्तम

माहितीपूर्ण लेख. कोणतेही अवडंबर न माजवता लिहिलेला.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 12/06/2015 - 21:48

Permalink

ओके,

ओके, माझं दोन तीन महिन्यांपुर्वी हिरडीचं (खालच्या) रुट कँनॉल झालं आहे. सध्या हिरडीच्या बाजूला एक टेंगुळ आलेलं आहे. बहुदा कडक खाल्ल्यामुळे. pain अजिबात होत नाही. हाताने दाबलं तर थोडसा होतो. काय कारण असावे? पंधरा दिवसांपासून आलयं, पण डॉक्टरकडे जायचा कंटाळा. आज पण गेलो नाही, बहुतेक उद्या जाईन. केवळ माहीती असावी म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 22:43

Permalink

दाताची रुट कॅनाल ट्रीटमेंट

दाताची रुट कॅनाल ट्रीटमेंट होते.ती केल्यानंतर असे टेंगूळ जायला हवे.मुळाच्या खाली असणारे इन्फेक्शन आहे ते.दात डेड झाल्याने दुखत नाहीये.पण डेन्टिस्टना जाऊन दाखवाच.कारण रुट कॅनालमध्ये कदाचित इन्फेक्शन राहून गेलंय किंवा सुरू झालंय.दुर्लक्ष केल्यास तिथे भोक पडून पस पाझरायला लागेल.मूळ आणि हाड झिजून पुढे दात हलु शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Sun, 12/06/2015 - 22:59

Permalink

Uttam lekhamalika. Vat pahtey

Uttam lekhamalika. Vat pahtey pudhlya bhagachi
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Mon, 12/07/2015 - 01:08

Permalink

खूप मस्त लेखमालिका. उत्तम

खूप मस्त लेखमालिका. उत्तम सुरुवात. आमच्या पिल्लाला पण ३ दात आलेत. एकदम रिलेट होतोय. बाकी विषयच असा आहे कि सगळ्यांनाच जवळचा वाटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 12/07/2015 - 08:31

Permalink

वाचतिये. खूपच उपयुक्त लेखन.

वाचतिये. खूपच उपयुक्त लेखन.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com